Search This Blog

Wednesday 18 March 2020

॥ जुगाड व्यवस्थापन - अंतिम भाग ४ ॥

॥ जुगाड पे जुगाड ॥ 

आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यांत मी शेंकडों ' जुगाड बहाद्दर ' पाहिलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेची चंमक बघून मी त्या त्या प्रसंगीं तोंडात बोंट घातलेलं होतं... ...
तथापि त्या ' जुगाड बहाद्दरां 'नीही ज्यांच्याकडून धंडे घ्यावेत, असले ' जुगाड उस्ताद ' मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेंच आजवर मला भेंटले, ज्यांच्या कल्पकतेचा अफाट आंवाका बघून मी च आं वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावलेला होता... ... ...
या निवडक उस्तादांपैकी एक म्हणजे माझे वडील कै. शंकर बाळकृष्ण ऊर्फ काका नानिवडेकर... ...ज्यांच्या पुढ्यात बसून कह्णत-कुंथत या ' जुगाड व्यवस्थापना ' चे धंडे मी तरूण वयात गिरवले...



या प्रशिक्षणाचा मला माझ्या अवघ्या आयुष्यात अभियांत्रिकीतल्या तीन पदव्यांत मिळवलेल्या शिक्षणाच्याही कित्येक पटीनं ज्यास्त उपयोग झाला.........
शिक्षणानं कलाशाखेचे पदवीधर, आणि व्यवसायानं आयुष्यभर शेतकरी म्हणून वावरलेले हे माझे वडील, जन्मतःच अभियांत्रिकी चे उच्च पदवीधर होते असं म्हणायला कांही हरकत नाही, इतकी त्यांची अभियांत्रिकीची जाण आणि कौशल्य वादातीत होतं.

त्यांची तोंड ओंळख करून घ्यायची असेल, तर इथलीच ' कार्यनिष्ठा ' ही कथा आधी वांचावी.

मला आंठंवतंय्‌... ...मी नववी-दहावी इयत्तेत शिकत असतांना, आमच्या घरांत त्या साठीच्या दशकांत खूप लोकप्रिय असलेली ' सुवेगा ' नांवाची एक पेट्रोलवर चालणारी स्कूटरेट वापरात होती.
एक दिवस सकाळी ती कांही केल्या पेडल मारून सुरूं च होई ना.
मग मी गाडी चं ' स्फुल्लिंग बूच ' - म्हणजे स्पार्क्‌ प्लग - खोंलून ते साफ करून पुन्हां इंजिन ला परत बसवलं, तरी गाडी आपली ढिम्म च...
तेव्हां मग ,"तूं जरा हो बाजूला...मी काय ते बघतो... ... " असं म्हणत ती. काकां नी हे खोलून बघ-तें खोंलून तपास - असं करत करत शेंवटी आख्खं इंजिन खोंलून घरातल्या चौकभंर इतस्त
त: पसरून ठेंवलेलं होतं... ...!!!
सरते शेंवटीं इंजिन च्या दट्ट्या ची ' ओ रिंग ' खराब झालेली त्यांना सापडली... ...

ती नवीन आणून मग ती. काकांनी एकट्यानंच ते आख्खं इंजिन परत जोंडलेलं होतं... ...कुठल्याही मेकॅनिक च्या मदतीशिवाय... ... ...!!
ते ही इतकं कौशल्यपूर्णतेनं, की पुढं सहा वर्षांनी लॅंब्रेटा स्कूटर खरेदी करतेवेंळीं ती सुवेगा आम्ही विकून टांकेपर्यंत त्या गाडीला दुरुस्तीसाठी परत कुणाला हातही लावावा लागला नाही... ...!!!

काका नेहमी मला सांगायचे, की ,"कुठलीही वस्तू बनवायला अभियांत्रिकी ही लागतेच, पण ज
प्रसिद्ध किंमत घेंऊन जगप्रसिद्ध वस्तू बनवणं ही अस्सल अभियांत्रिकी नव्हे, तर कमीतकमी खर्चात, कमीतकमी श्रमांत, कमीतकमी मनुष्यबळांत, कमीतकमी वेळेत, आणि कमीतकमी किंमतीत जगप्रसिद्ध वस्तूं बनवणं, ही खरी अभियांत्रिकी... ..."
आज तीस-चाळीस वर्षं अभियांत्रिकी केल्यानंतर माझ्या वडिलांचं हे विधान म्हणजे अगदी दगडावरची रेघ आहे, हे मी स्वतः च छातीठोंकपणे सांगूं शकतो..........

पुढं नव्वदी च्या दशकात पुण्याला रहात असतांना, चित्रकलेच्या कामांत वापरला जाणारा माझा वातभारक - म्हणजे एअर कॉंप्रेसर - लागोपाठ दोनवेळां अचानक बिघडला होता... ...
पहिल्या वेंळीं ती. काकांनी त्यांची ' जुगाड बहाद्दरी ' वांपरून तो घरच्या घरीं च दुरुस्त केला होता... ...त्यापुढं तो मी साधारण महिनाभंर वापरला... ...
त्या वेळीं काकांनी घाईघाईत जे कांही जुगाड बांधलेलं होतं, नेमकं तेंच महिनाभरानंतर परत तुटलं, आणि वातभारक पुन्हां एकदां बंद पडला...
ते बघितल्यावर मग,"आतां या ' वातभारका ' चं पुरतं श्राद्ध घातल्या शिवाय हा कांही आतां ताळ्यावर येणार नाही..." असं म्हणत काकांनी मग दुसर्‍या वेंळी तो दुरुस्त करतांना त्यांच्या जातिवन्त ' जुगाड उस्तादी ' चा जो कांही आविष्कार साकार करून दांखवला, त्याला खंरो
खंरीच तोड नव्हती... ...
त्या दुसर्‍या ' जुगाडा ' ला मात्र मला आजपावेंतों परत हात ही लावाला लागलेला नाही... ...
तो वातभारक मी त्यापुढं जवळपास शंभर एक कलाकृतींसाठीं वापरला, आणि आजतागायत विनातक्रार-विनाबिघाड वापरतो
आहे... ...!!!
या दुरुस्तीच्या कामांत पहिल्या जुगाडाचंच पुनश्च दुसरं जुगाड बांधावं लागलं...म्हणून ते झालं ' जुगाड पे जुगाड '...
या दोन्ही जुगाडां ना वेळ लागला प्रत्येकीं एक, म्हणजे एकूण दोन दिवस...
मनुष्यबळ फक्त एक माणूस...म्हणजे ती. काका स्वतःच एकटे... ...
आणि खर्च आला शून्य रुपये शून्य पैसे... ... ...!!!
मला वाटतं, यालाच ती. काका ' अस्सल अभियांत्रिकी ' म्हणत असावेत..........
त्यांची आंठवण या माझ्या ब्लॉग्‌वर अखण्ड तेंवत रहावी, म्हणून त्यांची ती असामान्य ' जुगाड उस्तादी ' कवेंत घेणारी ' जुगाड व्यवस्थापन ' प्रांतातली ही चंवथी आणि शेंवटची कथा... ... ...
' जुगाड पे जुगाड '

-- रविशंकर.
मार्च १५ २०२०

 *****************************************************************************************
 

'धंड...धंड...धंड...धंड...धंड...धंड...धंड...धंड...कडाक्... ...टण्ण्... ...टण्ण्...टण्ण्... टण्  टण् टण् टण् टण् ..............'
समोरच्या जलरंगचित्रावर भंराभर फिरत असलेला माझ्या हातातला वातकुंचला - म्हणजे एअर ब्रश - तो विचित्र आंवाज कांनीं पडतांच थांबला, आणि मी त्वरेनं उठून थंडथंडणार्‍या वातभारकाचं - म्हणजे एअर कॉम्प्रेसर चं - विजेचं बटण
प्रथम बंद केलं...
१९८४ सालातल्या नोव्हेंबर महिन्याची ती आठ तारीख होती...
ऐन भंराला आलेलं चित्रकर्म अर्ध्यांतच थांबवून हातातला जलरंगानं भंरलेला वातकुंचला मी रिता करून नीटपणे हुकाला अडकवून ठेंवला...
फंड
क्या नं हात पुसून साफसूफ केले...मग काय झालं होतं तें बघितलं, आणि कपाळाला हात लावला... ...
वातभारका ची वायुगाळणी - म्हणजे एअर फिल्टर - ची आंटे असलेली मानगूट, जी वातभारकाच्या दण्डगोलमस्तका ला - म्हणजे सिलिण्डर हेड ला - पिर
गाळून जोंडलेली असते, ती मानगूटच तुटून वायुगाळणी ' टण् टण् टणाटण् ' असा आंवाज करीत धंराशायीं झालेली होती.. ...!!!
 
 

हा वायुभारक होता ' रेनो ' नांवाच्या फ्रेंच कंपनीचा. मी चटकन् घरातल्या दूरध्वनी अनुक्रमणिकेतनं कंपनी वितरकाचा संबंधित क्रमांक शोंधून तिथला दूरध्वनी लावला, तेव्हां वितरकानं सांगितलं की ते फक्त आख्खे वायुभारक च आयात करून विकतात... ...त्यांचे सुटे भाग उपलब्ध नाहीत म्हणून...
म्हणजे नवीन वायुगाळणी आणून ती बंसवून वायुभारक चटकन्‌ पुनश्च चालूं करायची पहिली सोंपी शक्यता मावळली... ...!!
तेव्हां वायुगळणी हातानं उचलून घेंत ती मी नीट निरखून बघितली, अन्‌ मला दिसलं की तिचा वायुभारकाला जोडणारा आंटे असलेला नळीसारखा भाग अर्धा तुटलेला होता...
मग मी वायुभारक ओंढत खिडकीजंवळ उजेडात नेला, आणि त्याचं दण्डगोलमस्तक जरा बारकाईनं निरखून बघितलं... ...
आणि मग मात्र फाड्‌दिशी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंत त्या प्लॅस्टिक च्या तुटलेल्या वायुगाळणी ला लाखोंली वहायला सुरुवात केली...
कारण वायुगाळणी चा
आंटे असलेला अर्धा तुटलेला उर्वरित नळीसारखा भाग वायुभारकाच्या दण्डगोलमस्तकाच्या भोंकांत गच्च अडकून बसलेला होता... ...!!!
हे म्हणजे ' तेल गेलं, तूप गेलं, आणि धुपाटणंही गेलं ' असलं कांहीतरी ते लचाण्ड होऊन बसलेलं होतं... ...



ते बघून माझं डोकं च चक्रावून गेलं...
आतां चित्रकला राहिली बाजूलाच... ...मी घरातली हत्यारं-म्हणजे पकडी, मळसूत्र चालक किंवा मार्तूल [ स्क्रू ड्रायव्हर ], कटावण्या वगैरे - पेटीतनं बाहेर काढून वायुभारकाच्या दण्डगोलमस्तकाच्या भोंकात अडकून बसलेलं तें प्लॅस्टिक चं बूच बाहेर काढायची भगीरथ खटपट एक तासभंर करून बघितली, पण सगळी मेहनत वाया... ...
भोंकात अडकून फंसलेलं ते तुटकं बूच जाग्यावरनं रेंसभंरही हलायचं नांव घेई ना... ... ...
थोंडक्यात सांगायचं तर मला जे नुस्तं लचाण्ड वाटत होतं, तें खरं तर एक महालचाण्ड होऊन बसलेलं होतं.
ते निस्तरायला आतां माझ्या कपाळीं सदर वायुभारक पाठुंगळीला मारून आसपासचे सगळे स्थानिक कारखाने धुण्डाळत फिरायची वेंळ आलेली होती...!!! 

चित्रकलेच्या तमाम माध्यमांत जलरंग हे माध्यम हाताळायला सर्वात कठीण, क्षणोंक्षणीं चंकवे देणारं, आणि कलाकाराची परीक्षा बघणारं माध्यम म्हणावं लागेल.
जलरंगातली चित्रकारी - विशेषतः निसर्गचित्रं - सर्वसाधारणपणे दोन टप्प्यांत केली जाते...
पहिल्या टप्प्यात कच्चं आरेखन - म्हणजे स्केचिंग् - आणि मग चित्राच्या पार्श्वभूमी च्या सर्व भागाचं रंगकाम हे पाण्यानं थंबथंबलेल्या ओंल्याचिंब कागदावर केलं जातं...या टप्प्याला ओंल्यावर ओंला टप्पा - म्हणजे वेट इन् वेट पेंटिंग - असं म्हणतात. हा टप्पा खडखडीत वाळल्यानंतरच मग चित्रातले अग्रभागीचे विषय त्या कोंरड्या कागदावर ओंल्या रंगांत रंगवले जातात, आणि चित्रं पूर्ण केलं जातं. या दुसर्‍या टप्प्याला कोंरड्यावर ओंला टप्पा - म्हणजे वेट ऑन ड्राय - असं म्हटलं जातं. या दोन टप्प्यांपैकी पहिला टप्पा हा चित्रकाराचा खरा कस अजमावणारा असतो... ...कारण कुंचल्यावरचे रंगही ओंले असतात, आणि ते ज्यावर लावायचे, तो कागद तर ओंलाचिंब च असतो. साहजिकच कागदावर कुंचला नुस्ता टेंकवला, तरी क्षणार्धांत कुंचल्यातला ओंला रंग कागदावरच्या ओल्या रंगांत आणि पाण्यात चौखूर उधळतो, आणि मग माकडा चा बोकड व्हायला क्षणाचाही वेंळ लागत नाही.
आमच्या वायुभारकानं नेमक्या या ' वेट इन वेट ' टप्प्यातल्या कामाचा च पुरता बोजवारा उडवलेला होता.
रंगवायला घेंतलेलं चित्र पण एव्हांना कोंरडंठाक पडून वाया गेलेलं होतं...त्यामुळं माझी आणखीनच चिडचिड व्हायला लागली... ...
वास्तविक रंगवायला घेतलेलं चित्र वाया गेलेलं असलं तरी फारसं कांही बिघडलेलं नव्हतं... ...
तसंच चित्र परत रंगवणं कांही अशक्य नव्हतं... ...फक्त ते वेंळेत तयार होणार नाही म्हणून माझी चिडचिड झालेली होती...

झालं असं होतं की, उपरोक्त रामायण ज्या दिवशीं घडलं, ती तारीख होती ८ नोव्हेंबर १९८४.
आमच्या सौ. इंदिराजीं चा जन्मदिवस १४ नोव्हेंबर... ...म्हणजे बरोबर सहाच दिवसांनीं उगवूं घातलेला होता.
१९८४ साल हे आमच्या विवाहाचं दशाब्दी वर्ष होतं... ...
आतांपांवेंतों दरवर्षीं झालेल्या वाढदिवसांना साड्या-दागिने-भांडीकुंडी-गृहोपयोगी वस्तूं-वाहन वगैरे वगैरे भेंटवस्तूं घेंऊन सौ. इंदिराजींच्या सगळ्याच हौशीमौजी फिटल्यात जमा होत्या... ...
मग वेगळं असं आतां काय द्यायचं त्यांना? असा प्रश्न पडला, तेव्हां सलग दहा वर्षं अखण्डपणे आख्खं घरदार कनवटीला लावून, सर्कशीतल्या त्या एकचाकी सायकल चालवणार्‍या कलावतीच्या थाटात आमचा एकचाकी संसारही खंबीरपणे एकहातींच चालवणार्‍या सौ. इंदिराजीं च्या कर्त्तृत्त्वाला दाद मिळेल अशी कांहीतरी यथोचित भेंट त्यांना द्यावी, असा विचार माझ्या डोंक्यात घोळत होता...
म्हणून मग बर्‍याच विचारान्तीं मी ठंरवलं होतं, की एखाद्या निसर्गचित्राच्या पार्श्वभूमीवर आमची दोघांची छायाचित्रं, आणि त्यांच्या कर्त्तृत्त्वाची दाद देणारी एखादी समर्पक रचलेली कविता, अशी एक सुंदरशी तसबीर - जिला इंग्रजीत इन्सेट् असं म्हणतात - तयार करून त्यांना द्यावी.
कविता आणि निसर्गचित्र तयार झालं, की मग ते फोटो स्टुडिओ वाल्या कलाकाराकडं नेऊन इन्सेट् तयार करून आणायची जबाबदारी ती. काका नी अंगावर घेतलेली होती, आणि माझं योगदान संपवायला १० नोव्हेंबर ही शेंवटची तारीख त्यांनी मला सांगितलेली होती.
म्हणून मग मी तांतडीनं कामाला लागलेलो होतो... ...
कविता तशी चंटकन् सुचली, आणि कागदावरही उतरली.
चार कडव्यांच्या त्या रचनेतल्या शेंवट
च्या कडव्याचे शब्द असे होते... ...

                                         ' झोंळीत तोंकड्या माझ्या
                                              तूं अशी गंवसणी घाली
                                              मी पंख पसरतां, सारे
                                              आभाळ वांकले खाली '

या रचनेला शोंभून दिसेल अश्या, विशाल आकाशाच्या पटावर स्वच्छन्दपणे भंरारणार्‍या पक्ष्यांच्या पार्श्वभूमी चं निसर्गचित्र मी रंगवायला घेंतलेलं होतं, आणि आकाशाचं रंगकाम सुरूं असतांनाच आमच्या वायुभारकानं बिघडून सगळ्या कामाचा असा बट्ट्याबोळ करून ठेंवलेला होता...
सरते शेंवटी अंतर्बाह्य वैतागून मी ' जाऊं दे सगळं खड्ड्यात ' म्हणत तमाम चित्रकलेचा पसारा आणि वायुभारक वगैरे सगळा गदाडा गुण्डाळून जागच्या जागीं लावून ठेंवायला सुरुवात केली, आणि
इन्सेट् चा नाद सोंडून देऊन मोकळा झालो... ...

ती. सौ. आई दुपारची जेवणंखाणं आटोपून झोंपायच्या खोंलीत विश्रांति घेत होती...
ती. काका दुपारीं कधीच झोंपत नसत...ते माझ्या अभ्यासिकेत कुठलंतरी पुस्तक उघडून वांचत बसलेले होते... ...
माझ्या उचापतींचा कक्षातले आवाज ऐकून हातातलं पुस्तक खाली ठेंवून
ती. काका खोंलीत आले," काय झालं रे... ...धंडपडलास की काय?... ...आवाज कसला झाला, ते बघायला आलो..."
मी मग ती. काकां ना काय झालं होतं ते दाखवलं... ...
ती. काका,"अरे चालायचंच...यंत्रच आहे ते... ...कधीतरी बिघडणारच की...त्यात काय एव्हढं?... ...मी जरा बघूं काय
नेमकं काय झालंय् ते?"
मी कळ काढली,"बघा की जरूर...कांही हरकत नाही... ...पण कॉंप्रेसर ची ' सुवेगा ' करून ठेंवूं नका, म्हणजे झालं...!!"
ती. काका,"कर तुला काय टंवाळी करायची ती... ...पण तुला नाही ना जमलं हे निस्तरायला?...आतां मी कसं निस्तरतो ते
पण बघ...!!... ...काय?"
मी,"पण तासाभरांत होईल काय कॉंप्रेसर दुरुस्त?...म्हणजे...चित्र परत काढायचं आहे म्हणून विचारतो..."
ती. काकांनी आतां मघांचच्या चिमट्या चं उट्टं काढलं,"तासाभंरांत उरकण्यासारखी ही दुरुस्ती आहे काय रे?... ...अभियंता आहेस, की रेम्याडोंक्या?... ...ऑं?"
आतां अधिक द्रौपदीवस्त्रहरण नको, म्हणून मग मी पांढरं निशाण बाहेर काढलं...,"मग सुमीता च्या भेंटवस्तूं चं काय?...चित्र झाल्याशिवाय ते इन्सेट् कसं काय तयार होणार?"
ती. काका,"आतां इन्सेट् चा विषय ह्या वाढदिवसापुरता तरी डोंक्यातनं काढून टाक, आणि दुसरी कांहीतरी तजवीज कर तिच्या वाढदिवसाची... ...
अश्या रीतीनं माझ्या डोंक्यातलं ते इन्सेट् चं काम तेव्हां जे एकदां बाजूला पडलं, ते पुढं तब्बल सत्तावीस वर्षं उलटेंतोंवर त्याला परत हात च लागला नाही...
पुढं मग २००१ सालीं सौ. इंदिराजीं च्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाला माझं गोव्यातल्या मिरामार समुद्रकिनार्‍याचं चित्र पार्श्वभूमीसाठी वांपरून आम्ही एक छानसं इन्सेट् करून ते सौ. इंदिराजी नां वाढदिवसाला भेंट दिलं...
आजतागायत सौ. इंदिराजीनीं ते त्यांच्या वैयक्तिक तिजोरीत जपून ठेंवलेलं आहे... ...



ती. काकां नी मग वायुभारकाचं जुगाड बांधायला कंबर कसली... ...
याचाच दुसरा अर्थ म्हणजे माझा कांटा ढिला व्हायचा योग उगवलेला होता... ...!!!
ती. काका,"तो तुटलेला एअर फिल्टर जरा बघूं दे मला..."
मी मग कपाटातल्या दुरुस्त्यांच्या खोंक्यात ठेंवलेला तो एअर फिल्टर काढून ती. काकांच्या हवाली केला...त्यांनी तो नीट न्याहाळून बघितला,"आतां कॉंप्रेसर दांखव मला जरा ..."
मी मग भिंतीलगतचा
कॉंप्रेसर बाहेर ओंढून काकां ना त्याचं सिलिंडर हेड दाखवलं," हे बघा काय भदं होऊन बसलंय्‌ ते..."
ती. काकांनी मग माझी समस्त हत्यारांची पेटी मागून घेतली, आणि स्क्रू चालक लावून दंडगोलमस्तकाच्या भोंकात अडकून बसलेलं वायुगाळणी चं ते बूच कंटवून काढायची खटपट करून बघितली. पण बुचाला आंटे असल्यामुळं तें कांही जागचं हले ना.
ती.काकां ची मग वायुभारक आणि वायुगाळणीकडं बघत हाताच्या मुठीवर हनुवटी टेंकवून समाधी लागली... ...
मी आपला गप्प च बसून सगळं बघत होतो... ...
अचानक ती. काका उठले,"तुझ्या फुटकळ सामाना चा डबा कांढून आण जरा इकडं... ...
दुरुस्त्यांत जमा झालेले स्क्रू, खिळे, नट-बोल्ट, पत्र्याचे तुकडे, सळ्या-नळ्या इ. सामान भंरलेलं खोकं मग मी कपाटातनं काढून त्यांच्या पुढ्यात ठेंवलं...
त्यातनं त्यांनी निरनिराळ्या व्यासाच्या दोन-तीन धातू च्या नळ्या बाहेर काढल्या, आणि वायुभारकाच्या दण्डगोलमस्तकातल्या भोंकात साधारणपणे बसेल अशी एक नळी निवडली, पण तीही तशी भोंकापेक्ष्या जरा लहान व्यासाचीच होती.
ती. काका,"हे बघ, आतां ह्या नळी चा एक इंच लांबीचा एक तुकडा कांपून काढ लवकर... ..."
मी," तो कश्यासाठी?"
ती. काका,"आत्तां
कांही प्रश्न विचारत बसूं नकोस...मला काम आहे दुसरं... ...तुझं ते वाया गेलेलं चित्र आण जरा इकडं...आणि कात्री पण दे मला..."
मी त्यांना कागद आणि कात्री देऊन पांच एक मिनिटांत नळीचा तुकडा कापून काढला आणि त्यांना दिला...
ती.काका,"जरा डिंकाची बाटली बघ बरं कुठाय् ती... ..."
मी डिंकाची बाटली घेंऊन येईतोंवर ती. काकां नी माझ्या वाया गेलेल्या चित्राच्या जाडसर कागदाच्या दोनतीन पट्ट्या अश्या अचूक मापात कांपलेल्या होत्या, की ज्यांची रुंदी मी कापलेल्या धातूच्या नळीच्या तुकड्याच्या लांबीपेक्षा दोन केंसच कमी भंरत होती.




मी,"हं.........ही घ्या फेव्हिकॉल ची बाटली..."
ती.काकांनी मग कांपलेल्या कागदाच्या पट्ट्यांना एका बाजूनं फेव्हिकॉल चोंपडलं, आणि त्या पट्ट्या कांपलेल्या धातूच्या नळीवर चिकटवत गुण्डाळायला सुरुवात केली... ...
मी आपला शांतपणे पुढ्यात बसून ते ' जुगाड व्यवस्थापन ' बघत होतो... ...
शेंवटची पट्टी गुण्डाळत त्यांनी मला विचारलं,"चटकन् सुकणारं अराल्डाईट् आहे काय रे तुझ्याकडं?"
मी," नाही बुवा... ...कश्याला हवंय् ते?... ...फेव्हिकॉल आहे ना?"
ती. काकांनी माझी अब्रू बाहेर काढली,"तुला नाही ते कळायचं...!! ...नसेल घरांत, तर घेऊन ये जवळच्या दुकानातनं... ..."
मी मुकाट पायांत चपला संरकवून अराल्डाईट् आणायला बाहेर पडलो...
घरीं परत येईतोंवर ती. काकांचं नळीवर पट्ट्या गुण्डाळून चिकटवायचं काम पुरं झालेलं होतं...,"मिळालं तुला अराल्डाईट्?... ...हं आण ते इकडं... ..."
ती. काकांनी मग पट्ट्या चिकटवलेली ती पुंगळी सुकायला ठेंवली,"
हे बघ...आतां पंधरावीस मिनिटं तरी जातील हे सुकायला...तोंपर्यंत जरा चहा करतोस?"
मी तडक स्वयंपाकघर गांठून चहा उकळायला ठेंवला... ...
दोघांसाठी चहा गाळून कप उचलत मी पुन्हां आमच्या उचापती कक्ष्यांत गेलो...आणि ती. काकांच्या हातात त्यांचा कप दिला,"ह्या पुंगळी चं पुढं काय करणार तुम्ही आतां?"
ती. काकांनी कांही उत्तर न देतां चहा प्यायला सुरुवात केली...
चहा होईतोंवर पुंगळी खडखडीत वाळलेली होती. ती. काकांनी तिचा परीघ कानशीनं
सावकाश घांसत घांसत ती दण्डगोलमस्तकाच्या भोंकांत चपखल बसती केली," हं... ...आण ते अराल्डाईट् आतां इकडं..."
मग त्यांनी त्या पुंगळी च्या बाहेरच्या परिघावर अर्ध्या लांबीत ते चंटकन् सुकणारं अराल्डाईट् व्यवस्थितपणे चोंपडलं, आणि ती पुंगळी दण्डगोलमस्तकाच्या भोंकांत अशी सफाचट् चिकटवून बसवली, की नळीची अर्धी लांबी भोंकाबाहेरच राहिली.


   
ती.काका," हं... ...आतां तो तुटलेला एअर फिल्टर दे बघूं इकडं मला... ...
मी दिलेला एअर फिल्टर घेऊन ती. काकांनी मग त्याच्या मुण्डीचं वेडंवांकडं तुटलेलं तोंड कानशीनं घांसून नीट सरळ करून घेंतलं...
मग त्या मुण्डीच्या नळीच्या आंतल्या परिघाला चंटकन् सुकणारं अराल्डाईट् चोंपडलं...
त्यानंतर वायुभारकाच्या दण्डगोलमस्तकाच्या भोंकात बसवलेल्या पुंगळीचा जो अर्धा भाग बाहेर उघडा ठेंवलेला होता त्या परिघावरही उरलेलं अराल्डाईट् चोंपडलं... ...
आणि पुढच्या दोन सेकंदांतच वायुगाळणीची मानगूट त्या पुंगळीवर चंढवून पिर
गाळून बंसवत त्यांचं जुगाड संपवून मोकळे झाले... ... ...!!!
आणि मी आ वांसून ती ' जुगाड बहाद्दरी ' बघतच राहिलो...
जणूं कांही नवीन वायुगाळणीच वायुभारकाला बसवल्याइतकं ते जुगाड फर्मास झालेलं होतं... ...!!!
ती. काका हात धुवायला उठत म्हणाले,"झालं... ...आतां एक तासाभंरानं कॉंप्रेसर बघ चालूं करून नीट चालतोय् काय ते... ..."
' नीट चालतोय् काय ' कसलं...तो वायुभारक मी त्यानंतर पुढं महिनाभंर अगदी यथेच्छ वापरला... ...!!!



पण ' तकदीर हराम, तो क्या करे राम ? ' असं म्हणतात ना?...माझं नशीबही तंसलं च कांहीतरी असावं.
झालं असं, की वायुभारक एकदां नीट चालायला लागल्यावर माझ्या डोंक्यात एकदां बिघडून वाया गेलेलं तें मोकळ्या आकाशात विहरणार्‍या पक्ष्यांचं चित्र पुनश्च घोंळायला लागलं... ...तोंपावेतों डिसेंबर महिना उगवलेला होता...
९ डिसेंबर हा आमच्या लग्नाचा वाढदिवस... ...म्हणून सौ. इंदिराजी नीं घरीं खास भोजनाचा बेंत आंखलेला होता, आणि भंरीला सगळ्यांचं आवडतं चितळ्यांचं आम्रखण्डही आणलेलं होतं...
योगायोग असा, की त्या दिवशीं सकाळीच मी ते चित्र परत एकदां रंगवायला बसलो... ...
आणि नशीब असं खत्रूड निघालं, की वायुभारक चालूं करतांच ' पुनश्च हरि ॐ ' झालं... ...
'कडाक्... ...टण्...टण्...टणाटण्... ...असा आवाज करत वायुभारकाची वायुगाळणी दुसर्‍यांदा मानगूट तुटून धारातीर्थीं पडली...!!!
नशीब...की चित्रं रंगवायचं काम मी सुरूं केलेलं नव्हतं... ...
तें बघितल्यावर मग परत एकदां वायुभारकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी ते रामायण आंवरायला लागलो... ...
आणि ती. काका खोंलीत डोंकावले...,"काय झालं रे रवि?... ...कसला आवाज
झाला एव्हढा?"
मी कपाळाला हात लावत निःशब्दपणेंच तुटलेल्या त्या वायुगाळणीकडं बोंट दाखवलं... ...

एव्हढ्यात सौ. इंदिराजीं चा भोजनाचा पुकारा कांनांवर पडला,"अहो...ऐकलंत काय ?... ...पानांवर बसून घ्या सगळ्यांनी चंटकन्... ...वाढलेलं गार व्हायला लागलंय्‌... ..."
ती. काका वायुभारक खिडकीजंवळ ओंढत म्हणाले,"तूं घे बसून पानावर... ...मी आलोच पांच मिनिटांत... ..."   
आमची जेवणं सुरूं झाली... ...दहा निनिटांनी मग ती. काका पण येऊन माझ्या शेंजारच्या पानावर बसले,"अरे... ...कॉंप्रेसरला मी जी पुंगळी बंसवली होती ना, ती अगदी ठंणठंणीत आहे... ..."
मी,"मग काय गोची झालीय्‌ आतां ?"
ती. काका," झालंय् असं की गेल्या वेळेला एअर फिल्टरची मानगूट जी काय थोडीफार शाबूत राहिलेली होती ना, ती च तुटलीय् आतां...आणि फिल्टर चा उरलेला गोल भाग फक्त निखळून खाली पडलाय्‌...!!"
ते ऐकून मी कपाळाला हात लावला,"मग आतां तो शिरच्छेद झालेला फिल्टर कसा काय वापरणार आपण?"
ती. काका,"तो आतां कसला वापरतां येतोय्... ...तो गेला फुकट...आयुष्य संपलं त्याचं... ..."
                                                   

मी,"मग आतां काय करायचं?... ... ...ते इन्सेट् चं गेल्यावेळीं वाया गेलेलं चित्र च परत काढायला बसत होतो...तर हा गोंधळ होऊन बसलाय्‌... ...मला नाही वाटत ते आतां कधी काळीं जमेल असं..."
ती. काका,"अरे
पण मी आहे ना?... ...नको काळजी करूं तूं... ...आपण करूं कांहीतरी जुगाड त्याचं पुन्हां..."
आमच्या सौ. इंदिराजी तश्या धोंरणी गृहिणी... ... आम्रखण्डाच्या बाबतीत त्या नेहमी च, एक किलो चा डबा आणण्याऐवजी २०० ग्रॅमचे लागतील तितके छोटे छोटे डबे च आणतात... ...
त्यामुळं आम्रखण्ड वाढायला वेगळ्या वाट्या लागत नाहीत... ...प्रत्येक ताटात एकेक डबा ठेंवला, की झालं...मग घासायला भाण्डी पण कमी पडतात हे त्यांचं मजेशीर तर्कशास्त्र... ...
आमची जेवणं निवान्तपणे उरकली...
वायुभारकाचं पुनश्च लचाण्ड झाल्यामुळं माझं तोण्ड
जरा कंडवट च झालेलं होतं...आणि आम्रखण्डही नेहमीसारखं गोड लागत नव्हतं... ...मी आपला ताटातला डबा उघडून यांत्रिकपणे च चमचा तोंडात भंरवत बसलो होतो... ...
ती. काका मात्र भोजनाच्या अखेंरीस मोठ्या रसिकतेनं आम्रखण्डाचा आस्वाद घेंत होते... ...
भोजन आटोंपलं, तसे काका अचानक आम्रखण्डा चा रिकामा झालेला डबा घेंऊन उठले, आणि बेसिनवर नेऊन तो घांसायला लागले... ...
सौ. इंदिराजी,"काका... ...अहो काका...राहूं द्या तो डबा तिथंच...मोलकरीण आत्तां एव्हढ्यातच येईल... ...ती घांशील की सगळी भाण्डीकुण्डी... ...तुम्ही कश्याला घांसताय्
तो डबा ?"
ती. काकांनी शांतपणे डबा घांसून पुसून चंकचंकीत केला, आणि मला विचारलं,"काय रे... ...हा डबा घेऊं मी वापरायला ?... ...जरा काम आहे माझं..."
सौ. इंदिराजीं चा घरांतल्या रिकाम्या डबे-बाटल्या-खोंकीं इत्यादी साठवणुकीच्या वस्तूंवर विलक्षण जीव... ...
त्यामुळं मी सौ. इंदिराजींकडं निर्देश करीत उत्तरलो," तें काय तें डबे बाटलीवालीला च विचारा... ...मी काय सांगूं?"
आणि सौ.इंदिराजीं चा रट्टा पाठीत बसायच्या आंत चंटकन् उठून हात धुवायला बेसिनकडं गेलो... ...
कानांवर संवाद पडत होते,"घ्या की काका... ...पण डब्या चं तुम्ही काय करणार?... ...खिळे-स्क्रू वगैरे ठेंवायला हवाय् काय तो तुम्हांला?"
ती. काका,"कश्यासाठी हंवाय्‌ ते बघायचं असलं तर ये इकडं..." असं म्हणत आमच्या उपद्व्याप कक्षाकडं निघाले... ...
त्यांच्या मागोमाग उत्सुकतेनं सौ. इंदिराजीही निघाल्या, आणि आगगाडीच्या गार्डाच्या डब्यासारखा सगळ्यांच्या पाठीमागनं
मी पण निघालो.

ती. काकां चा सग
ळ्या च सुनांवर विलक्षण जीव...
उपद्व्याप खोंलीत गेल्यावर
मग त्यांनी भ्यासिकेतली खुर्ची आणून तीत सौ. इंदिराजी नां बसवलं,"डब्याचं मी काय करणाराय् ते बघायचं आहे ना तुला?... ...बस अशी इथं."
मग माझ्याकडं वळले,"ड्रिल मशीन आणि बिट्स् जरा दे इकडं... ...आणि भोकं पाडतांना
ड्रिल खाली घालायचा आपला तो लाकडी पाट पण घेऊन ये..."
मी सगळं साहित्य गोळा करून आणल्यावर मग ती. काकांनी डब्याचं झांकण काढून बाजूला ठेंवलं, मग
तो डबा लाकडी पाटावर ठेंवून मला घट्ट पकडायला सांगितला... ...
आणि ड्रिलिंग मशीन लावून डब्याच्या तळाला मधोंमध एक वाटाण्याएव्हढं भोंक पाडलं...
मग डब्याचं झांकण मला पाटावर धंरायला सांगून त्यालाही फुलाच्या पाकळ्यांसारखी तीन भोकं पाडली... ...
सौ. इंदिराजींचा चेहरा आतां फोटो काढण्यासारखा झाला...!!!
पण तसं कांही न भांसवतां त्या गप्प राहून पुढं काय होतंय् ते बघत बसल्या... ...
ती. काका मग रीमर लावून डब्याच्या तळाला पाडलेलं ते भोंक हातानं मोठं करीत मला म्हणाले,"ह्या डब्यापेक्षा जरा मोठा, पाव इंच जाडी चा एक स्पंज चा तुकडा लागेल आपल्याला रवि... ...
असं कर ... स्वैपाकघरातल्या भाण्डी घांसायच्या बेसिनवर जी स्पंज ची लादी आहे ना, ती आण इकडं... ...
आतां मात्र सौ. इंदिराजी खुर्चीत च चुळबुळायला लागल्या !!!...
... पण महत्प्रयासानं स्वतःला सांवरून गप्प च बसल्या...

ती. काकांनी हातानं रीमर फिरवत हळूं हळूं तें भोंक वायुभारकाच्या दण्डगोलमस्तकाच्या भोंकांत पूर्वींच बसवलेल्या पुंगळी इतकं अचूक विस्तृत करून घेंतलं... ...
मग मी आणलेल्या घांसणीच्या स्पंज
च्या लादीतनं डब्यात चपखल बसतील असे गोल आकाराचे दोन तुकडे कांपून काढले...,"रवि...झालं सगळं... ...आतां ते त्वरित वाळणारं अराल्डाईट् दे जरा इकडं..."
मग अराल्डाईट् पुंगळीवर चोंपडून ती. काकांनी तो डबा पुंगळीवर चंढवून दण्डगोलमस्तकाला घट्ट चिकटवून टाकला...
मग त्या डब्यात, कापलेल्या स्पंजच्या गोलाकार चकत्या सपाट बसवल्या... ...
आणि डब्याचं भोंकं पाडलेलं झांकण कटक् दिशी जाग्यावर बसवीत मला म्हणाले,"झाला तुझा कॉंप्रे
र दुरुस्त?...दहा पंधरा मिनिटांनी चालूं करून बघूं या काय होतंय्‌ ते... ..."

 

ती. काकांचा तो प्रश्न ऐकतांच सौ. इंदिरजींचा चेंहरा क्षणार्धात नुस्ता फुलून आला... ...
आणि सासर्‍यांची ती जगावेगळी कल्पकता आणि कौशल्य बघून खोः खोः खोः करत सौ. इंदिराजीनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
तोंपावेतों दुपारचे साडेचार होत आलेले होते... ...सौ. आई झोंपेतनं उठलेली होती... ...सगळेच एका खोलीत दिसल्यावर मग ती पण आंत येऊन सौ. इंदिराजीं जंवळ बसली... ...,"काय चाललंय् गं तुमचं ए
व्हढं सुमीता ?... ...असं खिदळायला काय झालंय् तरी काय तुला?"
सौ. इंदिराजी आई च्या प्रश्नाला बगल देऊन तश्याच खिदळत उठल्या," आई...तुम्ही बसा इथं...मी चहा करून आणते काका... ...आलेच दहा मिनिटांत... ... ..."

आमचं दुपारचं चहापान मग उपद्व्याप कक्षात च पार पडलं... ...तें होंईतोंवर पंधरा वीस मिनिटं उलटली...
ती. काका,"हं करा चालूं कॉंप्रेसर आतां... ..."
मी,"काका...पण दाबनियंत्रकाचं सेटिंग कुठल्या पातळीवर ठेवायचं?..."
ती. काका,"एकदम वरच्या पातळीला राहूं दे ते... ...पूर्ण दाबानं भरूं दे हवा... ...बघूं या काय होतंय्‌ ते..."
मी बटण दाबून वायुभारक चालूं केला...
आणि अहो आश्चर्यम्... ...वातभारक पहिल्यासारखाच तालात धंडधंडायला लागला... ...!!
हवेच्या दाबमापकाचा कांटा हळूं हळूं वर वर संरकायला लागला... ... ...
तसे माझ्या हृदयाचे ठोंके
ही जलद पडायला लागले... ... ...
होतां होतां भारमापकाचा कांटा १४० पाउण्ड प्रति चौरस इंच दाबापर्यंत उच्चतम पातळी
ला चंढला, आणि नेहमीप्रमाणं खटाक् असा आवाज होऊन वायुभारक बंद झाला... ...
दाबमापकाचा कांटा आतां १४० पाउण्डांवर स्थिर राहिलेला होता...
आणि तरीही ती. काकांचा ' चितळे
आम्रखण्ड एअर फिल्टर ' अगदी ठंणठंणीत राहिलेला होता... ...नव्हे जाग्यावरनं रेंसभंरही हललेला नव्हता... ...निखळून पडणं तर दूरच राहिलं... ...!!!
तेव्हां कुठं मला ती. काकांच्या ' जुगाड उस्तादी ' चं खरंखुरं आकलन झालं, आणि थक्क  होऊन आ वांसत
मग मी च कपाळाला हात लावला... ... ...
ती. काका मग सौ. इंदिराजीं कडं वळून हंसले," आतां सोपं झालं की नाही हे सुमीता ?... .."
सौ. इंदिराजी ची सफाचट् दाण्डी उडाली,"म्हणजे काय काका ?... ...मला समजलं नाही..."
ती. काका,"अगं न समजण्यासारखं आहे काय त्यात?... ...
आतां ' कॉंप्रेसर बिघडलाय् ' असं रवि म्हणाला रे म्हणाला, की तत्क्षणीं चितळे आम्रखण्ड आणून खायचं...!!! ... ... ...काय?"

तर वाचकहो...जातिवन्त ' जुगाड उस्तादी ' ही अशी असते... ...
ह्याच वातभारकावर मी त्यानंतर जवळपास शंभर एक कलाकृतीही साकारल्या... ... ...
पण तें आकाशांत विहरणार्‍या पक्ष्यांचं चित्र काढायचं जे दोन वेळां राहून गेलं ते गेलंच... ...
आणि माझं दुर्दैव असं, की ती. काकांच्या हयातीत तरी तें
चित्र कांही कागदावर साकारलं गेलं नाही.
ती. काकां चं १९९८ सालीं दुःखद देहावसान झालं...

पण त्यांनी माझ्या वायुभारकाचं बांधलेलं भक्कम जुगाड मात्र पुढंही अखण्ड कार्यरत राहिलं... ..
शतक उलटल्यानंतर मग कधीतरी २०११ सालीं तो योग आला, आणि तें चित्र एकदाचं कागदावर साकार झालं,
नंतर तें माझ्या आंतरजालावरच्या अल्बम मध्येही मी प्रकाशित केलं... ...
योगायोग असा, की त्याच वर्षीं इटली च्या संघराज्या चा एकशे पन्नासावा वर्धापन दिन होता.
दक्षिण इटलीस्थित एका ' इम्मागिने ऍण्ड पोएशिया ' - म्हणजे ' इमेजिस ऍण्ड पोएट्री '- नांवाच्या संस्थेला त्या समारंभाची स्मरणिका कांढायची होती... ...
त्यांनी
तें चित्र माझ्या आंतरजालावरच्या अल्बम मध्ये पाहिलेलं होतं, म्हणून त्यांनी मला ई-मेलवर संपर्क करून तें चित्र त्या स्मरणिकेमध्ये प्रसिद्ध करायची माझ्याकडं परवानगी मागितली... ... ...     
यथावकाश इटलीच्या संघराज्याच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवीं स्मरणिकेत मी चितारलेलं आकाशांत विहरणार्‍या पक्ष्यांचं 
तें जलरंगचित्र झंळकलं... ...
चित्राला एका इटालियन साहित्यिका नं  असं समर्पक शीर्षकही दिलेलं होतं.


' व्ही फॉर् व्हिक्टरी '



चित्रानं दिग्विजय केला खरा, पण काळाबरोबरची शर्यत मात्र मी हरलो होतो... ... ...
माझे टिकेक
मास्तर मला नेहमी सांगायचे," हे कायम स्मरणांत ठेंव ऍरिस्टॉटल् , की आयुष्यांत जे जे कांही आपल्याला करायचं असतं, ते उचित वेंळेत करणं हे निर्णायक महत्त्वाचं असतं... ...
एकदां ती वेळ टंळून गेली, की मग जे
कांही करायचं होतं, तें केलं काय किंवा नाही केलं काय, सगळं सारखंच असतं..."
मास्तरांच्या त्या वचनाचं महत्त्व मला आज जाणवतं... ...
आणि कधी कधी डोंळे एव्हढ्यासाठीच ओंलावतात, की ती. काका हे चित्र बघायला आज हंवे होते... ...
 

खरंच हंवे होते... ... ...

 *****************************************************************************************
-- रविशंकर.
१७ मार्च २०२०

4 comments: