Search This Blog

Monday 9 March 2020

॥ जुगाड व्यवस्थापन - भाग ३ ॥

॥ अडला नारायण ॥

माझ्या वाचन छंदात मी कथा वाचतो, कविता वाचतो, कादंबर्‍या, चरित्रं, इतिहास, रहस्य-भयकथा, शास्त्रीय माहिती, प्रवासवर्णनं इत्यादि इत्यादि सगळं वाचतो, पण विशेष करून म्हणजे कटाक्षानं जर काय वांचत असेन, तर ते म्हणजे संस्कृत भाषेतली सुभाषितं, म्हणी, आणि वाक्प्रचार वगैरे.
भाषापण्डितांनीं म्हटलेलं च आहे की

॥ भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती
  तस्मादपि रसास्वादं तस्मादपि सुभाषितम्‌ ॥

हे शब्दशः खरं आहे.
तात्त्पर्य, तमाम साहित्यभांडारात मला सुभाषितं वांचायला आणि त्यावर चिंतन करायला सर्वा
ज्यास्त आवडतं... ...कारण अगदी साधं सरळ आहे.

त्याचं काय आहे, की कुठलंही सुभाषित म्हणजे त्याच्या रचनाकारानं माण्डलेला एक तात्त्वज्ञानिक सिद्धांत असतो, बहुतांशी एखादा चपखल दृष्टांत सुभाषितात गुंफून तत्त्वज्ञानं त्यातला सिद्धांत बिनतोड सिद्धही केलेला असतो, आणि जसजसा त्यावर विचार करावा, तसतसं त्यातलं मर्म आत्मसात होत जातं, आणि ते तत्त्वज्ञान आपल्याला रोजच्या व्यवहारांत वापरतांही येतं... ...स्वतः समृद्ध होण्यासाठी.
ही सुभाषितांची गोडी मला माझ्या आद्य गुरू नी - म्हणजे श्री. टिकेकर मास्तरांनी - शाळकरी वयातच लावली. नंतर मी जसजसा सुभाषितं अभ्यासत गेलो, तसतशी त्यातली गंमत आणि अनमोल व्यावहारिक शहाणपण मला भुरळ घालायला लागलं, आणि मग तो एक कायमचा छंदच जडून बसला... ...
या छंदामुळंच आजच्या घडीला माझ्या 
जवळ जवळपास साडे बारा हजार सुभाषितांचा संग्रह झाला आहे.
मला वाटतं की मानवी जीवनाचं असं एकही अंग नसेल, की ज्यावर संस्कृत सुभाषितकारांनी भाष्य केलेलं नाही, अणि या दृष्टीनं सुभाषितं म्हणजे उत्तम जगण्याची सार्वकालीन कालातीत अशी एक प्रकारची भगवद्गीताच आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठंरणार नाही.
या सुभाषितांची एक गंमत अशी आहे, की त्यात मांडलेले सिद्धान्त आपल्याला रोजच्या जीवनातही पदोंपदीं अनुभवाला येतात, आणि वेगवेगळ्या परिस्थितीत ते मोलाचं मार्गदर्शनही करूं शकतात, हे मी स्वतःच शेकडों वेळां अनुभवलेलं आहे.

आतां हे च सुभाषित पहा... ...

॥ प्राप्ते त्वापदाकाले शेषशायी न साह्यकृत्‌
  वामनोऽनुपयोगीचायुधमाराध्य दैवतम्‌
  विपन्निवारणेऽनिष्टो युक्तायुक्तेषु संभ्रमः
  खरात्प्राप्तं ज्ञानं वाऽसुरात्प्राप्तं गदायुधम्‌ ॥

इतकं उत्कृष्ठ सुभाषित क्वचितच वाचनांत येतं.. ...
याचा अर्थ काय?
 

संस्कृत भाषेत खर म्हणजे गाढव.
तर सुभाषितकार म्हणताय्‌त की माणूस जेव्हां संकटात सापडतो, तेव्हां तो काय करतो? तर नारायणाचा धांवा करतो, साकडं घालतो, नवस बोलतो, पूजा-अर्चा-कर्मकाण्डं-होम हवनं-उपास तापास इत्यादी इत्यादी उपाय करीत सुटतो...थोंडक्यात काय तर स्वतः हातपाय हलवायचे सोडून संकटमोचनार्थ सारी भिस्त तो बिचार्‍या नारायणावर ढंकलून मोकळा होतो...!!!
आतां नारायण स्वतःच मुळात शेषशायी निद्रिस्त... ...तो असल्या माणसांना कसलं काय सहाय्य करणार? त्याचा वामनावतारही निरूपयोगी...आपत्तींच्या रणांगणावर त्या लंगोटीधारी बटु चा काय उपयोग? तेव्हां त्या नारायणानं जन्मतःच माणसाला दिलेली बुद्धिमत्ता, आणि संकटांशी झुंजायला लागणारी आयुधं ही च
खर्‍या अर्थानं माणसाची संकटकाळांतली आराध्य दैवतं असतात... ...ती विवेकानं वापरून माणसाला स्वतःच संकटांचा खात्मा करावा लागतो...ते करायला (ह्या कलियुगात तरी) स्वतः नारायणही माणसाची जबाबदारी पत्करत नसतो... ...

दुसरं असं की संकट अंगावर आलेलं असतांना प्रथम त्याचा सफाचट खात्मा करणं ही गोष्ट सर्वाधिक निकडीची असते... ...हाताला लागतील ती संसाधनं आणि मार्ग वापरून... ... ...
तिथं उपायांच्या वा संसाधनांच्या योग्यायोग्यतेविषयीं व्यर्थ काथ्याकूट करत बसणं आत्मघातक ठरूं शकतं, असंही सुभाषितकार सांगताय्‌त... ...
आणि हाताला लागतील ती साधनं म्हणजे तरी काय? तर प्रसंगी गाढवाकडूनही प्राप्त झालेली अक्कल, आणि दैत्याकडून सुद्धां मिळालेली गदा अगदी  बिनदिक्कतपणे वापरणं, हे न्याय्य आणि समर्थनीयही ठंरतं, कारण अस्तित्त्वाचाच प्रश्न जेव्हां समोर उभा ठांकतो, तेव्हां कसला धर्म नी काय अधर्म?
अक्कल ही अक्कल च असते...
ती गाढवाकडून मिळवलेली असली तरी, आणि गदा ही गदा च असते... ती राक्षसाकडून कां मिळालेली असेना... ...
लढाई सफाचट्‌ मारणं हे निर्णायक महत्त्वाचं... ...आणि भगवद्गीता नेमकं हेंच अधोरेखित करते, की मैदानात शस्त्र परजत उतरण्यामागचा हेतु जर विवेकाधिष्ठित असेल, तर मग जे कांही पुढं होतं, तो च खरा धर्म असतो...

या सुभाषिताचं मूर्तिमंत रूप म्हणजे आमच्या मातोश्री करवीर निवासिनी श्री 
अंबा देवी... ...



आदिशक्ति-आदिमाये चं हे महिषासुरमर्दिनी-भद्रकाली चं रूप म्हणजे स्वत्त्वाचं, शुचितेचं, सामर्थ्याचं, पराक्रमाचं, आणि दुर्दम्य निष्ठेचं मूर्तिरूपच... ...
माणसाला बसल्या खाटल्यावर कुठलंही वरदान  नाकारणारं, आणि रणांगणावर सदैव त्याच्या मस्तकीं वरदहस्त ठेंवणारं हे दैवत, म्हणूनच माझं आद्य उपास्य दैवत होऊन बसलं.

।। ॐ महालक्ष्मीम्‌ च विद्महे, शक्तिमाताम्‌ च धीमही, तन्नो अंबा प्रचोदयात्‌ ... ... ...  ।।

आतां हें सगळं तत्त्वज्ञान झालं... ...पण प्रत्यक्ष व्यवहारात याचा उपयोग काय?
तर गंमत अशी, की उपरोक्त सुभाषितकारांनी म्हटल्याप्रमाणं माझ्या प्रारंभीच्या व्यावसायिक कारकीर्दीत १९७४ सालीं एकदां मी आणि माझे सहकारी अश्या कांही चमत्कारिक परिस्थितीत सापडलो होतो, की ती वेंळ निभावण्यासाठी आम्हांला खरोखरीच्या ' खरा ' कडून - म्हणजे गाढवाकडून-शिकलेलं शहाणपण च उपयोगी पडलेलं होतं... ...!!!
त्याचीच ही सुरस कथा...
' अडला नारायण '

-- रविशंकर.
८ मार्च २०२०.
      
            
************************************************************************************* 

," ओय्‌ सिद्दप्पा... ...आरं त्यो व्हायब्रेटर वाला काय तंबाकू चोळतोया, कां उतारल्याली न्हाय त्याची काल रातच्याला ढोंसल्याली?... ...ह्याण्डल मारूनश्यान् व्हायब्रेटर चालूं करा झंटक्यात आन् लावा हितं कालम च्या टोपीला... ...आरं ये म्हाद्या... ... सुक्काळीच्च्या...तुज्या आयला तुज्या...ठीव ती पान्याची बाल्टी खालती पयली... ...कितींदा वराडलं तरी राण्डंचं पानी वततंया बदांबदां घान्यामंदी... ...
ओ इक्बाल मेस्त्री... ...तितं सलाप च्या सळ्या जरा कटावण्यानी वरती वडूनश्यान् खापरं लावा त्येंच्या खालती झपां झपां... ...भरमाप्पा... ...त्या वडारणी
स्नी थांबव पयलं...कांकरीट वताया लागल्यात बग बदाबदां श्यान पडल्यागत... ...हेंच्या मायला हेंच्या... ...गाडवास्नी बी मायंदाळ आक्काल आसंल हेंच्यापरीस...", 
आमचे ' नरवीर तानाजी ' ऊर्फ शिंगटे सुपरवायझर हे वडारी, सळी काम करणारे फिटर, कॉंक्रीट मिसळणार्‍या मिक्सर वर काम करणारे कामगार, सुतार, गवण्डी इत्यादी इत्यादी स्लॅब भरणीच्या कामावर जुंपलेल्या एकजात सगळ्या ' गाडवां ' वर चौफेर डाफरत सुटले होते... ...

१९७४ सालच्या ऑक्टोबर महिन्यातली ती एक रणरणती सकाळ होती...
त्या काळांत मी राज्य परिवहन महामण्डळातल्या बांधकाम खात्याच्या सातारा विभागात विभागीय अधिकारी 
या हुद्यावर स्थापत्य अभियांत्रिकी करीत होतो. कराड ला माझं उपविभागीय कार्यालय होतं. तेव्हां उत्तर-दक्षिण कराड ते शिरवळ पर्यंत आणि पूर्व-पश्चिम फलटण ते कोयनानगर पर्यंत चा प्रदेश माझ्या अखत्यारीत होता. त्या वर्षातलं पाटण च्या बस स्थानकाचं सर्वात मोठं काम चालूं होतं, आणि त्याच्या पहिल्या स्लॅब च्या कॉंक्रीटीकरणाचा त्या दिवशी धुमडा सुरूं होता... ...


साधारण दीडएकशे सिमेंटची पोती खपतील इतकी मोठी स्लॅब असल्यामुळं आदल्या आठवड्यातच सगळ्या सामानाची, बिगार्‍या-वडार्‍यांची व्यवस्था आधीच जय्यत तयार करून ठेंवलेली होती, आणि सकाळी आठ वाजतांच आमचे उप अभियंता पॉल साहेबांच्या हस्ते नारळ बिरळ फोंडून स्लॅब भंराईच्या कामाचा आम्ही धंडाका उडवून दिलेला होता... ...महत्त्वाची स्लॅब असल्यामुळं पॉल साहेब उन्हाळी टोपी-बिपी घालून स्वतः जातीनं देखरेख करायला साईट वर आलेले होते... ...ओंतकाम पुरं करायला अंदाजे रात्रीचे आठ तरी वाजतील असा आमचा होरा होता, तरीपण नेहमीच्या साठ एक वडार्‍यांऐवजी ऐंशी वडार्‍यांचा जथा कामाला जुंपून शक्यतों सूर्यास्त व्हायच्या आंत-म्हणजे संध्य्काळीं साडेसहा वाजेंपर्यंत-स्लॅब भंरायचं काम तडीला न्यायचा आम्ही घाट घातलेला होता, आणि वडार्‍यांचा ठेकेदार सिद्दाप्पा नं तशी खात्री पण दिलेली होती.
याकारणेच स्लॅब भंरणीच्या त्या कामाला अक्षरशः कुरुक्षेत्राचं स्वरूप आलेलं होतं. तथापि आमचा अनुभवी तडाखेबंद शिंगटे सुपरवायझर (ज्याला सगळे चेष्टेनं 'नरवीर' म्हणायचे) हाताशी असल्यानं मी निर्धास्त होतो... ... ...
पण आमचा निर्धास्तपणा दैवाला मंजूर व्हायचा योग नसावा त्या दिवशीं कदाचित... ... ...

स्लॅबच्या एकूण बारा गाळ्यापैकी दुसरा गाळा भंरायचा कल्ला उडालेला होता.
आमच्या नरवीरा चा चेंहरा एव्हांना घामेजलेला होता, आणि आवाज पण ओंरडून ओंरडून पिचलेला होता. म्हणून मग मी शिंगटे ला हात हलवून जवळ बोलावलं... ...
मी,"नरवीर... ओ तानाजीराऽऽऽऽऽऽऽऽऽव"
शिंगटे वडार्‍यांच्या घोंळक्यातनं वाट काढत आम्ही 'साहेब लोक' उभे होतो, तिथं आला,"काय साहेब...?"
मी,"हे बघ शिंगटे...तूं सकाळपासून धांवपळ करून जरा दमलेला दिसतोय्‌स... ...तेव्हां एक काम कर... ...
स्थानकावरच्या उपाहारगृहात जाऊन जरा चहा बिहा घे आणि ताजातवाना होऊन परत ये... ...तोंपर्यन्त मी आणि परांजपे [ म्हणजे आमचे मुख्य सुपरवायझर ] साईट सांभाळतो... ...काय?"
शिंगटे,"आवो सायेब... ...ह्यो...ह्यो आस्ला गदाडा तुमास्नी आंवरंल काय, म्या मागारी यीपत्तोर?"
परांजपे,"नरवीर... ...अरे ये बाबा जाऊन जरा...किती कुथशील असा?...आणि मी आहे की इथं साहेबांच्या बरोबर सगळं बघायला... ...जा तूं...जरा चहा-पाणी घेऊन ये तासाभरात... ... जा पळ."
नरवीर मग बांबूंच्या पहाडावरनं माकडाच्या चपळाईनं सरसर खाली उतरून उपाहारगृहाकडं सटकले, आणि मग मी आणि परांजप्यानी अनुक्रमे सळीकाम आणि कॉंक्रीटच्या ओंतकामाच्या गदाड्यात सूर मारले.
तासाभर कुठला जातोय्‌... ...अर्ध्या तासातच माझ्या कानांवर नरवीरांची हांक आदळली," साहेब... ...ओ नानासाहेब... ..."
शिंगटे खाली कॉंक्रीट मिश्रकाजंवळच रचून ठेंवलेल्या सिमेंट च्या पोत्यांच्या थप्पीजवळ उभा होता, आणि उत्तेजित होऊन हातवारे करत मला हांका मारत होता... ..."
मी वरूनच विचारलं,"काय झालंय् रे बाबा...‌?... ...नाष्टा झाला तुझा?"
शिंगटे,"नाष्टा आत्तांच झाला साहेब... ...प
खाली या आधी झंटक्यात... ...इथं बल्ल्या झालाया मोठ्ठा... ...काय खरं न्हाय आतां आपलं... ..."
मी सावकाश बांबूं चा आधार घेत पहाडावरनं खाली उतरून त्या थप्पीकडं मोर्चा वळवला,"काय झालंय्‌ तानाजीराव?" 
शिंगटे नं थप्पीवरची ताडपत्री हातानं बाजूला
रून थप्पीच्या तळाकडं बोंट दाखवलं, आणि मी कपाळाला हात लावला... ...
बस स्थानकावरच्या नळ कोंडाळ्यापासून कॉंक्रीट मिश्रकापर्यंत टाकलेली कामचलाऊ पाण्याची लाईन तीवरनं वडार्‍यांची नाचानाच झाल्यामुळं नेमकी सिमेंट च्या पोत्यांच्या थप्पीजवळच उकललेली होती, आणि तुटक्या सांध्यातनं उडणारी पाण्याची पिचकारी लागून थप्पीतली सगळ्यात खालच्या थरातली पोती चिंब भिजून त्यांचा दगड व्हायला लागलेला होता... ...!!!
मी शिंगटे ला वेळ न दंवडतां खिश्यातला हातरुमाल काढून दिला,"तानाजीराव...हा तुटका सांधा ह्या रुमालानं बांधून आधी पाणी गळती बंद करा ताबडतोब... ..."
मग शिंगटे नं रुमाल मला परत देत मिश्रकावरच्या गदाड्यातले दोन बिगारी बाहेर काढले, आणि रिकाम्या झालेल्या सिमेंटच्या गोण्या तुटक्या सांध्यावर घट्ट बांधून त्यांनी पाणी गळती थांबवली एकदाची... ...
मी,"शिंगटे...आतां अजून दोन बिगारी मदतीला घ्या, आणि थप्पीतली सर्व कोरडी पोती आधी लांब त्या तिथं हलवून घ्या, आणि किती पोती भिजून वाया गेलेली आहेत ते मोजून मला कळवा... ...मी वर जाऊन परांजप्यांना खाली पाठवतो..."
शिंगटे,"साहेब...आमी बास्‌ हाय ह्ये निस्तारायला... ...परांजपे सायबांची काय बी जरूरी न्हाय मला... ...तुमी जावा वर बिन्दास... ...म्या आर्द्या तासात किती गोण्या भिजल्याती त्ये तुमास्नी सांगाया वर येतंय्‌..."

मी मग परत वर आलो... ...पॉल साहेब अजून स्लॅबवरच उभे होते...म्हणून मग मी आधी परांजप्यानां जरा एका कोंपर्‍यात बोंलावून घेतलं, आणि त्यांना काय झालं होतं ते सांगितलं," आतां काय करायचं हो परांजपे?"
परांजपे तसे अनुभवी, आणि वीसेक वर्षं या धंद्यातच मुरलेले,"किती गोण्या भिजल्याय्‌त साहेब?"
मी,"शिंगटे ला लावालाय आत्ताच थप्पी हंलवायला... ...तो येईलच एक अर्ध्या तासात... ...मग नक्की कळेल..."
परांजपे," तरी पण... ...तुमचा कितीचा अंदाज आहे साहेब?"
मी,"साधारण खालची दहा-बारा पोती तरी गेली असतील  कामातनं..."
परांजप्यांनी मग बोंटावरच आंकडेमोड करत सांगितलं,"साहेब दीडशे पोत्यांची स्लॅब भंरायची, म्हणून १५५ पोत्यांची थप्पी लावलेली होती... ...बरोबर?"
मी,"बरोबर..."   
परांजपे,"इथंच बल्ल्या झालाय्‌ साहेब... ...एकूण बारा गाळे, म्हणजे प्रत्येक गाळ्याला साधारण साडेबारा पोती लागणार...त्यातली समजा बारा-तेरा पोती भिजलीत म्हटलं, तर फारतर शेंवटचा एक गाळा भंरायचा बाकी राहील...त्या
कांही अडचण येणार नाही... ...आपण गाळ्याच्या अलीकडच्या तुळईवर बरोबर भंरणी तोंडूं... ...उरलेला गाळा मग पाहिजेतर सातार्‍याहून ज्यादा चं सिमेंट मागवून उद्याही भंरतां येईल... ...फक्त तेंव्हढ्यासाठी हे सगळं जुगाड उद्या पुन्हां बांधावं लागणार... ...कांही इलाज नाही त्याला...
बारा-तेरा पेक्ष्या ज्यास्त पोती जर भिजली असतील, तर मग मात्र सगळीच पंचाईत होणार... ...तेव्हां असं करूं या... ...सुदैवानं पॉल साहेब इथंच आहेत...त्यांच्या कानांवर तुम्ही हे घाला, तोपर्यंत मी सिद्दाप्पाशी बोलून उद्याची बिगार्‍यांची काय ती व्यवस्था पक्की करून ठेंवतो... ...काय?"
मी," ते तर मी करणारच आहे परांजपे... ...
पण पंधारावीस पोती ज्यास्तीचं सिमेंट सातार्‍याच्या विभागीय कार्यालयातनं आणवायचं म्हणजे ते पॉल साहेबांच्या सही शिक्क्या च्या गरजपत्राशिवाय (रेक्विझीशन्‌) थोडंच मिळणाराय्‌?... ...तुम्ही सिद्दाप्पाचं काय ते बघा...मी बोलतो साहेबांशी तोंपर्यंत."
एव्हढ्यात आमचे तानाजीराव मला शोंधत पहाडावर आलेच...,"साहेब शिमिट कमी पडनार बगा... ...आटरा गोण्या खराब झाल्याती... ...वायल्या [ म्हणजे बाकीच्या ] हालवूनश्यान्‌ म्या नवी थप्पी मारलीया सुक्या गोण्यांची, आनि हरबा पलंबर
ला बी जुपलाया लाईन रिपिर कराया... ..."
आतां परांजप्यांनी च कपाळाला हात लावला,"हे आतां लचाण्डच झालंय्‌ साहेब... ...अठरा पोतीं म्हणजे दीड गाळ्याचं सिमेंट खराब झालं... ...आतां एकतर शेवटचे दोन गाळे सोडून भंराई तरी आर्‍या करावी लागणार, नाहीतर आपल्यालाच सातार्‍याला धावत जाऊन वीस पोती सिमेंट आणण्याशिवाय गत्यंतर नाही... ...काय करायचं?"
मी,"परांजपे...चला माझ्याबरोबर... ...आपण बोलून बघूं या आधी पॉल साहेब काय म्हणताय्‌त ते, आणि मग काय कसं करायचं ते ठंरवूंया...चला."
आम्ही मग पॉल साहेबांपाशी गेलो, आणि त्यांना काय झालं होतं ते सांगितलं... ...एव्हांना सकाळचे दहा वाजत आलेले होते.  
पॉल साहेब," नाना... ...केवळ दहावीस पोतीं सिमेंट कमी पडणार म्हणून हे स्लॅब
भंराईचं काम आज अर्धवट सोंडून केवळ एका गाळ्यासाठी उद्या परत हा सगळा उपद्व्याप करत बसणं शहाणपणाचं होणार नाही...आतां दहा वाजताय्‌त... ...सिद्दाप्पा चा माती-वाळू वाहणारा एखादा टेंपो मोकळा करून घेऊन तुम्ही आणि परांजपे दोघं सातार्‍याला निघा लगेच. मी सोबत हातानं लिहून सही करून गरजपत्र देतो...ठीकाय्‌? सातार्‍याला तुम्ही पोंचून सिमेंट ताब्यात घ्यायला अंदाजे बारा तरी वाजतील. आणि जेवणखाण उरकून तुम्ही साधारण एक वाजेपर्यंत जरी परत फिरलात, तरी तीन-उशीरात उशीरा साडे तीन-वाजेपावेतों तुम्ही परत येऊं शकताय्... ...तेव्हां वेळ न दंवडतां तुम्ही निघा लगेच... ...हा किल्ला आतां मी आणि शिंगटे दोघं सांभाळतो तुम्ही परत येईपर्यंत. आणि तुम्ही परत आलात की मग मी परत जाईन सातार्‍याला... ..."
पॉल साहेबांनी मग भराभर सातारा विभागीय भाण्डाराच्या नांवे एक गरजपत्र खंरडून सही करून माझ्या हातात दिलं, आणि आम्ही सिद्दाप्पा चा रेती वाहणारा एक दोन टनर टेंपो घेऊन सातार्‍याच्या दिशेनं निघालो... ...

सातार्‍याला पोंहोचून आमचं सिमेंट गोडाऊन गांठलं. तिथल्या मलकापुरे लेखनिकानं ज्यास्तीचं वीस पोती सिमेंट म्हटल्यावर जरा खळखळ केलीच, पण खुद्द पॉल साहेबांच्याच सहीशिक्क्याचं गरजपत्र त्याच्या मेजावर आपटल्यावर मग मात्र त्यानं वीस पोती मोजून माझी सही घेऊन ती टेंपोत भंरून दिली
एकदाची. वीस पोत्यांच्या मानानं टेंपो चा हौदा तसा बराच मोठा असल्यानं हमालांनी अंगचोरपणा करून सगळी पोती इतस्ततः हौद्याच्या मागच्या कडेलाच टेंपोत टाकली, आणि ड्रायव्हर थोरात नं आमचा टेंपो परत कराड च्या दिशेनं हाकारला... ...एव्हांना सकाळचे पावणे बारा वाजलेले होते...
आतां जेवायला अर्ध तास जाणार, आणि पुढं पाटण गांठायला अजून दोन तास...म्हणजे साधारण अडीच-तीन वाजेपर्यंत आम्ही अगदी आरामांत पाटण ला पोंचणार अश्या समजुतीत होतो.
पॉल साहेबांचं वेळेचं गणित अगदी अचूक ठंरलेलं होतं... ...
म्हणून मग सातार्‍याच्या बाहेर पडून हमरस्त्याला लागल्यावर आम्ही वाटेत लागणार्‍या पहिल्याच अतित नांवाच्या खेडेगांवाच्या बस स्थानकावर टेंपो लावून स्थानकावरच्या परळीकराच्या उपाहारगृहांत शिरलो, आणि मिसळ-पावावर तांव मारीत पोटं गच्च भंरून घेतली. माझा चहा होईतोंवर परांजपे-थोरात जोडगोळी नं त्यांचा तंबाखू च्या बाराचा कार्यक्रम उरकून घेतला, आणि बरोबर साडेबारा वाजतां आम्ही अतित स्थानकावरनं सातार्‍याच्या दिशेनं सुटलो.
गाडी जेमतेम पुढच्या उंब्रज गांवाच्या बस स्थानकाच्या तिठ्यापर्यंत आली
, आणि अचानक पाठीमागनं ' फंटाक्‌...... च्युंईऽऽऽऽऽऽऽऽऽऽ फुस्स्ऽऽऽऽऽऽऽऽ ' असा मोठ्ठा आवाज झाला.... ....
चालक थोरातनं चपळाईनं गाडी कशीबशी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली, आणि आम्ही तिघेही गाडीतनं खाली उतरून टेंपो च्या पाठीमागं गेलो.
पाहतो तर काय...गाडीचं डाव्या बाजूचं पाठीमागचं चाक भोंक पडून खाली बसलेलं होतं... ... ...
ते बघून थोरात सकट आम्ही तिघांनीही ' च्यायला... ' म्हणून शिवी हांसडत कपाळांना हात लावले...!!!



पण करणार काय? त्या दिवशीं मातोश्री आमच्यावर प्रसन्न निश्चितच दिसत नव्हत्या... ...पण रुष्टही नसाव्यात कदाचित. कारण उंब्रज बस स्थानकापासून अलिकडं साधारण पाव किलोमीटरवरच आमची गाडी थांबलेली होती... ..."
मी ,"नशीब आज अगदीच खत्रूड झालेलं दिसतं‌य्‌ परांजपे... ...आतां काय करायचं?"
परंजपे,"साहेब, उंब्रज स्थानक चालत जाण्या इतक्याच पल्ल्यावर आहे... ...
आतां असं करूं या...तुम्ही उंब्रज गांठून बस नं सुटा पाटणकडं... ...मी आणि थोरात हे पंक्चर चं काम निस्तरलं की येतो पांठोपाठ...काय?"
मी,"नको परांजपे...मी थांबतो तुमच्या बरोबर... ...दोघांपेक्षा तिघे जण असलेले बरे अश्या वेळेला... ...ह्या चाकाचं काय ते निस्तरून मग
 जायचं पुढं..."
मग मी आणि परांजपे शेंजारच्याच रस्त्याकडेच्या मैलाच्या दगडांवर बसकण मारली.
थोरात नं मग एक मोठा धोंडा जवळच्या शेतातनं शोंधून आणला, बरोबरच्या बिगार्‍यांना मदतीला घेऊन तो गाडीच्या मागच्या आंसाखाली ( म्हणजे ऍक्सल खाली ) आधाराला रेंटून बसवला, आणि चाक खोंलून
ते गाडी गाडी करत तिठ्यावरच्या पंक्चरवाल्या ण्णा च्या दुकानात घेऊन गेला... ...
आम्ही दोघे जमिनीवर उगवलेल्या गवताच्या काड्या काढून चंघळत गप्पच बसलो होतो... ...'आतां वेळेत पाटणला कसं पोहोचायचं?'
परांजपेही बहुधा हे च कोडं सोंडवत असावेत... ...

पंधरावीस मिनिटं उलटली असतील-नसतील, तोंच थोरात गाडी गाडी करत चाक माघारी घेऊन येतांना दिसला... ...
परांजप्यानी तोंड उघडायच्या आतच थोरातनं ते चाक जमिनीवर आडवं टाकलं आणि त्याला एक सणसणीत लाथ घातली,"च्या
मायला हेच्या मी... ...राण्डंच्याला आत्तांचा पंचर हुयाला म्हूरत घावला जनूं... ..."
आम्ही दोघे दगडावरून उठून थोरात जवळ गेलो,"काय रे बाबा... ...झालं चाक दुरुस्त एकदाचं...?"
थोरात,"कस्लं चाक आन्‌ कस्लं काय सायेब... ..."
परांजपे,"कां?... ...काय झालं?"
थोरात,"सायेब... 
त्ये आन्ना म्हन्तंया की बैलाच्या नालं चा खिळा घुसूनश्यान्‌ वालटूब (व्हाल्व्ह ट्यूब ) फांटलीया... ...आख्खी टूब बदलाया लागंल...निस्तं पंचर चं काम न्हाई ह्ये... ..."
परांजपे,"अरे मग बदलून टाकूं या की ट्यूब... ...काय अडचण आहे त्यात?... ...पैसे बियसे काय कमी पडताय्‌त काय तुला?...आम्ही देतो हवेतर..."
थोरात,"मायला त्या आन्नाच्या बी... ...पैसं हायती सायेब माज्यासंगट...
पर त्ये आन्ना म्हन्तंया की त्येच्या जवळ मोट्या धा टनी टरकच्या चाकाचीच टूब हाय... ...आपल्या टिंपू च्या चाकाची टूब न्हाय तेच्याकडं..."
आतां मात्र मी आणि परांजपे आम्ही दोघांनीही कपाळांवर हात मारून घेतले... ... ...!!!
खत्रूड नशीबानं असा अचूक दावा साधत आम्हांला बरोबर कंचाट्यात धंरलेलं होतं... ... ...
थोरात नं लाखोली वाहत ते चाक टेंपोच्या मागच्या हौद्यातल्या सिमेंटच्या गोण्यावर आदळलं...मग फाड्‌दिशी टेंपो च्या हौद्याची मागची फळी आंपटून बंद केली... ...
आणि आम्ही तिघेही आतां रस्त्याकडेच्या मैलाच्या दगडावर बसून आमची डोंकीं खांजवायला लागलो... ... ...
काय करायचं आता? कसा काय सोडवायचा हा तिढा?

आम्ही गवताच्या काड्या चंघळत विषण्णपणे समोर बघत बसलो होतो... ...
रस्त्याच्या पलीकडच्या काठावरनं एक भिस्ती त्याच्या वीस-पंचवीस गाढवांचा जथा घेऊन त्यांना हांकत निघालेला होता... ...सार्वनजिक बांधकाम खात्याच्या जवळच्या कुठल्यातरी रस्त्याच्या कामावर निघालेला असावा तो... ...गाढवांच्या पाठीवर लादलेल्या पाण्याच्या पखाली दोन्ही बाजूंनी
खाली लटकत होत्या, आणि स्वारी हॅक्  हॅक्  करत गाढवं हांकत मजेत चाललेली होती.
त्याकाळीं बहुतांशी रस्ते, कालवे, छोटे पूल अश्यासारख्या वस्तीपासून दूर असलेल्या ठिकाणी चालणार्‍या स्थापत्य कामांवर माती-रेती-पाणी-मुरूम वगैरे वस्तूंच्या वाहतुकीसाठी असे गाढवांचे जथे
 वापरले जायचे... ...कारण तसली वाहतूक ट्रक-टेंपो लावून करण्यापेक्षां, असे गाढवांचे जथे लावून करून घेणं फारच स्वस्त आणि सोयीचं पण पडायचं.


त्या गाढवांच्या जथ्यातलं एक गाढव दुडक्या चालीनं (म्हणजे लंगडत) चाललेलं असल्यामुळं जथ्याच्या मागं पडत होतं...
त्याच्या 
पांठीमागच्या डाव्या पायाला एक फडकं बांधलेलं दिसत होतं... ...बहुधा कांहीतरी इजा झालेली असावी, त्यामुळं ते जरा लंगडत चाललेलं होतं... ...
भिस्त्याच्या जेव्हां लक्ष्यात आलं की ते गाढव जथ्याच्या बरंच मागं पडायला लागलंय्‌ म्हणून, तेव्हां तो त्या गाढवाजवळ गेला आणि त्यानं गाढवाचा लंगडणारा पाय जरा चांचपडून बघितला... ...
मग पायाला बांधलेलं फडकं त्यानं घट्ट करून जरा नीटनेटकं बसवलं, आणि परत हॅक् हॅक् हॅक् करत गाढवाला हांकायला लागला... ...
पण गाढव कांही वेग पकडे ना...ते बिचारं परत दुडकत दुडकत जथ्याच्या मागं मागं च रेंगाळायला लागलं...
आम्ही आपले गवताच्या काड्या चंघळत ती गंमत बघत होतो... ...
भिस्त्यानं मग परत गाढवापाशी  
जाऊन त्याच्या पांठीवरच्या पखालींपैकी डाव्या बाजूच्या पखालीच्या तोंटीचं बूच काढलं, तशी पखालीतनं पाण्याची बोंटभर जाड धार खाली जमिनीवर गळायला लागली... ...
गाढव दुडकत चालतच होतं. पण जसजसं पाणी गळून डावी पखाल रिकामी होत गेली, तसतसं गाढव जरूरीपुरताच दुखावलेला पाय टेंकत चालायला लागलं, आणि दोन पाच मिटांत वेग पकडून त्यानं जथाही गांठला...
ही सगळी गंमत आम्ही दगडावर बसून बघत होतो...



आतां थोरात ला अचानक कसला काय झंटका आला कुणास ठाऊक...
तो एकदम ताड्‌दिशी टेंपोच्या सांवलीत पान-तंबाखू चंघळत निवांत बसलेल्या बिगार्‍यावर ओंरडतच जाग्यावरनं उठला,"ये म्हाद्या...पक्या...बाळ्या...उटां उटां राण्डंच्यानूं... ...हितं काय मुक्कामाला र्‍हायाला आलाय्‌सा काय रं... ...ऑं?... ये बाळ्या...त्ये हौद्यातलं चाक घ्ये खाल्ती उतरूनश्यान्‌ झंटक्यात..."
परांजपे,"थोरात... ...काय कुत्रं बित्रं चांवलं की काय रे तुला?... ...काय झालंय्‌ काय असं ओंरडायला?"
थोरात,"परांजप्ये सायेब... ...आपुन आतां चार वाजंपत्तोर पोंचिवतो बगा तुमास्नी पाटान ला... ...काय?"
मी आंवाकच झालो,"अरे बाबा, पण कसं काय पाटण गांठणार आपण?... ...ह्या बसलेल्या चाकाचं काय?"
थोरात,"त्ये काय बी आत्तां इच्च्यारूं नगासा मला
सायेब... ...चाराच्या आदुगर तुमास्नी पाटान ला पोंचिवलं मंजी झालं न्हवं?... ...परांजप्ये सायेब...उटा...जरा या माज्यासंगट हात लावाया..."
परांजप्यांनी मला डोंळ्यानंच गप्प रहायची खूण केली, आणि आम्ही सगळेच आतां टेंपोकडं धांवलो... ... ...
आतांपांवेतों आम्ही अर्धं अंतर पार केलेलं होतं...आतां एक वाजत आलेला होता... ...अजून पाटण पर्यंत पोंचायला तासभर म्हटला, तर कमीतकमी दोन वाजणार.
थोरातनं कांहीतरी करून जर टेंपो चालता केला, तर सावकाश गतीनं कां होई ना, चार वाजेपावेतों पाटण गांठायची आशा तरी होती... ...आहे त्या ठिकाणीच अडकून पडण्यापेक्षा ते परवडलं, असा विचार करून मी गप्प राहून काय
काय होतंय्‌ ते बघत बसलो.
थोरात,"नानासायेब...तुमी जरा डायवर शीटवर बसा निस्तंच... ...फकस्त म्या सांगंस्तंवर हालायचं न्हाई जागंवर
नं... ...काय?...परांजप्ये सायेब... ...ह्या बाळ्या संगट म्या चाक जाग्यावर चंडवूनश्यान्‌ बशिवतंय्... ...तंवर तुमी पक्या-म्हाद्या दोगास्नी घ्या बरूंबर, आनि शिमिट च्या थैल्या हौद्यात पार म्होरच्या बाजूला सरकावून डायवर साईडला हालवूनश्यान्‌ घ्या... ...ईस थैल्या हायती न्हवं?...तर पांच-पांच थैल्यांच्या चार थप्प्या मारायच्या डायवरच्या पाटीलगतच्या कोन्यात सप्पाचट्... ...काय?"

मग ' थोराताज्ञा ' प्रमाण मानून मी नुस्ताच चालकाच्या आसनावर जाऊन ठिय्या मारला...
परांजप्यांनी म्हाद्या-पक्या ला कामाला लावून ' शिमिट ' च्या थैल्या
हंलवायला सुरुवात केली... ...
आणि स्वतः ' जनरल थोरात ' बाळ्याबरोबर बाह्या सरसावून ऍक्सलवर चांक चंढवून बसवायच्या खटपटीला लागले... ... ...




माझ्या कानांवर संवाद पडत होते,"... ...हंगाश्शी... ...बाळ्या...आतां ही चाकाची र्‍हायल्याली दोन नटं आवाळ कंतरूनश्यान् ... ...आटापलं काय परांजप्ये सायेब तुमचं?"
परांजपे,"आटपलं माझं आत्तांच...झाल्या गोण्या हंलवून... ...आतां काय करायचं पुढं?"
थोरात,"आतां तुमी डायवरची शीट पकडा, आन्‌ सायबास्नी द्या पाटवूनश्यान्‌ हिकडं... ...ये पक्या-म्हाद्यानूं... ...हिकडं या जरा ह्या धोंड्याला हात लावाया... ..."
आतां परांजपे केबिन च्या खिडकीतनं डोंकावले... ...,"उतरा साहेब आतां... ...थोरात बोलावतोय्‌ तुम्हांला..."
मी उतरून मागच्या चाकाजवळ बसलेल्या थोरात कडं गेलो,"आतां पुढं काय करायचं रे बाबा?"
थोरात,"आतां बगा नानासायेब...आक्षल (ऍक्सल) खाल्ती लावल्याला धोंडा आतां म्या काडनाराय्... ...काय? आतां तुमी येवडंच करायचं... ...
मगां जितं रस्त्याकडंला दगडावर बसलावतासा न्हवं तुमी, तितंच जाऊनश्यान्‌ बसा... ... आतां ह्ये चाक बगा जरा नीट...आक्षल खाल्ती ह्यो धोंडा घातलाय्‌ न्हवं?... ...म्हून चाक जिमनीला लागंना झालंया... ...आलं ध्येनात?"
मी,"हं...हं...आलं ध्यानांत माझ्या बरोबर... ...आतां काय करायचं मी?"
थोरात,"आतां तुमी त्या दगुडावर बसूनश्यान्‌ फकस्त चाकावर डोळा ठिवायचा येकटाक...आन्‌ आमी तिगंजनं ह्यो धोंडा हालवूनश्यान्‌ ढिला करतूं वाईच... ...
आतां ह्ये बगा सायेब", थोरात चाकाच्या टायर खाली हात घालत म्हणाला,"... ...ह्यो टायर आत्तां जिमनीच्या वरती चार ब्वाटं र्‍हायलाया... ...बरूबर?
मी,"बरोबर..."
थोरात,"तर तुमी येकच करायचं... ...टायर जिमनीच्या वरती दोन ब्वाटं र्‍हायला रं र्‍हायला, की लगीच वरडायचं नरडं फुटंस्तंवर... ...काय?."
,"ठीकाय्‌ थोरात... ..आलं ध्यानात सगळं," म्हणत मी मघांचच्या त्याच मैला
च्या दगडावर जाऊन बसलो.
थोरात चा अंदाज अगदी अचूक होता... ...खाली बसल्यामुळं माझी नजर थेंट चाकाच्या समपातळीत आलेली होती... ...टायर चार बोंटं जमिनीच्या वरच तरंगत होता, आणि तो जमिनीच्या वर दोन बोटांवर आला, की तत्क्षणीं ते मला कळणारही होतं...



"हां... ...आतां बगा सायेब", असं म्हणत थोरात-पक्या-म्हाद्या नी ऍक्सल ला लावलेल्या धोंड्याखालच्या दगडाच्या कपच्या कांढून टाकायला सुरुवात केली... ...
मी एकटक बघत होतो... ...
अर्ध्याअधिक कपच्या निघेतोंवर चाक एक बोंटभर खाली उतरलं... ...
थोरात,"किती वरती हाय सायेब आजून?"
मी," अजून तीन बोटं अंतर आहे थोरात... ..."
सगळ्या कपच्या काढून टाकतांच चाक बरोबर दोन बोटं जमिनीच्या वर राहिलं, आणि मी आवाज दिला,"थोरात... ...कायम"
(आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी च्या कामांत साईटवर कुठलंही मोजमाप बरोबर जुळलं, की 'कायम' असा आवाज द्यायची प्रथा आहे... ...कायम म्हणजे 'पक्कं झालं')
थोरात मग चाक सोंडून माझ्याजवळ आला, आणि त्यानं शेंजारी बसून स्वतःच्या नजरेनं एकदां चाक बघून घेतलं... ...
मग परत चाकाजवळ जाऊन महारथी कर्णाच्या थाटात
चाकाला हात घालत त्यानं आवाज दिला,"पक्या-म्हाद्या...धोण्डा काडा भाईर वडूनश्यान् झंटक्यात... ...वडा...वडा"
पक्या-म्हाद्या नीं मग दगडाला हात लावले आणि 'हय्या-हुप्पा' करत एका हिसड्यात तो ऍक्सल खालनं ओंढून बाहेर काढाला... ...
आणि टायर जेमतेम किंचित्‌ जमिनीला टेंकला, आणि थांबला...




मग थोरात नं परत एकदां माझ्याशेंजारी बसून चाक नीट बघून घेतलं,"नानासायेब... ...काम झाल्यात जमा हाय...पर आजून वाईच बोजा लागंल भराया हौद्यामंदी... ..."
मी,"मग?..."
थोरात,"सायेब...आसं बगा... ...मी करतंय्‌ कायतरी जुगाड बरूबर... ...पर शिद्दाप्पा ला ह्यातलं काय बी बोलायचं न्हाय... ...काय?... ...बाकी ह्ये जुगाड पाटान ला सप्पाचट्‌ न्ह्याची जिम्मेदारी माजी... ...चालंल?"
मी,"अरे बाबा... ...तूं करतोय्‌स एव्हढं सगळं... ...
मग मी कश्याला सिद्दाप्पाला काडी लावायला जाऊ उगीच?..."
,"सायेब तुमी आतां थांबा हितंच... ...म्या येतंय्‌ मागारी धा मिण्टात", असं सांगून 'जनरल थोरात' उंब्रज बस स्थानकाच्या दिशेनं सटकले...
आणि आमच्या राज्य परिवहन महामंडळाच्या
उंब्रज बस स्थानकावरचे पाटण च्या फलाटावर थांबलेले एक डझनभर प्रवासी माणशी दहा रुपये भाड्याच्या बोलीवर गोळा करून घेऊन आले... ...
मग त्या बहुतेक सगळ्या प्रवाश्यांना त्यांनी हौद्यात कोंबून ' डायवर साईडच्या म्होरच्या ' कोंपर्‍यात ' शिमिट ' च्या थप्प्यावर बसवलं... ...उरलेले दोनचार जण टेंपोच्या केबिन च्या छपरावर बसवले... ...
मग सगळ्या ' प्याशिंजरां ' ना त्यांनी ' म्या उतरा म्हनंस्तंवर आजाबात हालायचं न्हाय जाग्यावरनं ' अशी सज्जड तंबी भंरली... ...
आणि मला म्हणाले,"झालं सायेब आतां... ...चला...बसूनश्यान् घ्या गाडीत."
मी,"अरे बाबा, पण जाणार कसं पंक्चर काढल्याशिवाय आपण?"
थोरात नं मग दारासिंगच्या थाटात छाती पुढं काढली,"सायेब... ...चाक येकडाव बगा जरा पुन्यांदा... ..."
मी चंमकून चाकाकडं बघितलं... ...
दहाबारा माणसं हौद्यात बसवल्यावर ते जमिनीला जेमतेम टेंकलेलं पंक्चर झालेलं चाक आतां नेमकं दोन बोटं जमिनीच्या वर उचललं गेलेलं होतं...अन्‌ चक्क हवेतच तरंगत होतं... ...!!!
आमचा चार चाकी टेंपो आतां तीन चाकांवरच तोंलला गेलेला होता... ...
तेहां कुठं माझी ट्यूब भक्क्‌दिशी पेंटली... ...
टेंपो पाटणपर्यंत चालवत न्यायला थोरातला आतां त्या लुळ्या झालेल्या च
थ्या चाकाच्या आधाराची कांही गरजच उरलेली नव्हती... ...!!!


थी नापास थोरात ची ती अफलातून 'जुगाड उस्तादी' बघून बोलती बंद होत मग मी च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!
थोरात,"चला सायेब... ...मारूं या ष्टार्टर आतां?"
थोरात चा आवाज ऐकून परांजपे चालकाच्या आसनावरनं पाय उतार होऊन केबिन बाहेर आले... ...
मी कपाळाला हात लावलेला बघून त्यांनी विचारलं,"काय झालं साहेब एव्हढं खोः खोः हंसायला?"
मी खिदळतच फक्त थोरात च्या त्या ' अफलातून जुगाडा
' कडं बोंट दाखवलं... ...
ते बघून मग खुद्द परांजप्यानीही आ वांसत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला... ...!!!

मग अजिबात वेळ न दंवडतां आम्ही आपापल्या आसनांवर बसलो, आणि ' जनर
थोरातां ' नी ' ष्टार्टर ' मारून गाडी पाटण च्या दिशेंत पिटाळली.
कराडचा तिठा ओंलांडून पाटण च्या फाट्याला लागेंपर्यंतही मला हे कोडं सुटत नव्हतं, की जिथं अभियांत्रिकी शिकलेल्या माझं, आणि स्थापत्य कामांत वीसएक वर्षं मुरलेल्या परांजप्यांचंही डोंकं बधिर झालेलं होतं, अश्या निकराच्या वेळीं या निरक्षर माणसांची डोंकी इतकी भन्नाट कशी काय चालत असावीत?

ही अशिक्षित पण हुषार माणसं ज्याला ' आडव्या डोस्क्यानं इच्च्यार करनं ' म्हणतात, त्या कौशल्यालाच एडवर्ड् डी बोनो इंग्रजीत ' लॅटरल् थिंकिंग् ' म्हणत असावा... ...!!
म्हणून थोड्या वेळानं पाटण दृष्टीपथात आल्यावर साकुर्डी च्या थांब्यावरच्या उपाहारगृहात थांबून चहा घेतां
ना मी थोरातला छेडलंच,"थोरात... ..."
थोरात," हां सायेब...?"
मी,"अरे मघांशी उंब्रज नाक्यावर जेव्हां चाक पंक्चर झालं होतं, तेव्हां मी आणि परांजपे...आमची डोंकी सुद्धां चक्करलेली असतांना, तुझ्या डोंक्यात ही भन्नाट कल्पना कशी काय आली?... ... ...म्हणजे नुस्ती गाडीच चालती झाली एव्हढंच नव्हे... ... तुझा खिसा पण बक्कळ गरम झालाय्‌ की... ...होय ना?"
थोरात नं बशीतला चहा संपवून शांतपणे बशी खाली ठेंवली,"सायेब...
तेचं काय हाय, की जंवा मानसाचं डोंस्कं गारेगार व्हतंया न्हवं, तंवा गाडवापास्नं बी आक्काल शिकाया लागती... ...!!!
म्हूनच मगां तुमास्नी सांगटलं की शिद्दाप्पाला हेच्यातलं काय बी बोलूं नगासा म्हून..."
मी,"अरे मी नाही कांही सांगणार सिद्दाप्पाला... ...काळजी करूं नकोस तूं... ...पण तुला काय फरक पडणाराय्‌ मी सांगितलं तरी?"
थोरात,"आसं बगा सायेब... ...आतां पाटान ला टिंपू पोंचिवला कां न्हाय, की परांजपे सायेब खूष...तुमी बी खूष...थोरलं सायेब बी खूष..."
परांजपे,"खरंय्‌ तुझं थोरात... ..."
थोरात,"आन्‌ शिद्दाप्पा बी खूष... ...बेन्याला उद्या गाडवं हांकत परत याया नगं म्हून... ...खरं हाय कां न्हाय सायेब?"
मी,"अगदी बरोबर आहे तुझं थोरात... ...मग?"
थोरात मग खिश्यातली नोटांची थप्पी थोंपटत म्हणाला,"आवो समदी व्हत्याल खूष... ...पर आमचं तिगांचं काय... ...ऑं?
आतां दिसभर आस्ला घाम निगाल्यावर रातच्याची काय सोय बगाया नगं आमास्नी?... ...ती काय शिद्दाप्पा लावनार हाय व्हंय्? त्येचं जुगाड बी आमचं आमालाच बांदाया नगं?..."
मी,"रातच्याची कसली काय सोय थोरात?"
थोरात नं कांही न बोलतां उजव्या हाताचा पंजा पसरत आंगठा बाहेर काढून ओंठांना लावला... ...
परांजपे आतां फिदी फिदी हंसायला लागले... ...
आणि थोरात चं ते ' मल्टिपल्‌ जुगाड कौशल्य ' बघून थक्क होत
मग मी ही कपाळाला हात लावून खीः खीः खीः करायला लागलो...!!!

पाटण ला आम्ही बरोब्बर पावणे चार वाजतां पोहोचलो...
आणि पॉल साहेबांना ' जनरल थोरातां ' चं कर्तृत्त्व समजल्यावर त्यांनी थोरातांच्या खिश्यातल्या गल्ल्यात आणखी एक्कावन्न रुपयांची भर घालून त्यांची पाठ थोंपटली... ...
मग स्लॅब भंराई चं काम संपवून निघतांना परांजप्यानी थोरातला जवळ बोलवलं,"आतां सुटा थोरात तुमची रातीची ' ती ' सोय बघायला... ... ...
आतां थोरल्या साहेबांनीच गल्ला दीडपट केलाय् तुमच्या खिश्यातला... ...म्हणून ' पावशेरा ' ऐवजी शेरभर ढोंसून लोळूं नकां म्हणजे मिळवलं...!!! ... काय?"
असं सांगून परांजपे थोरात कडं सूचक नजरेनं रोंखून बघायला लागले... ...
आणि खुद्द ' जनरल थोरा
तां ' नी च निरुत्तर होत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
  *****************************************************************************************
-- रविशंकर.
९ मार्च २०२०

No comments:

Post a Comment