Search This Blog

Friday 28 February 2020

॥ जुगाड व्यवस्थापन - भाग २ ॥


॥ ' हॅरिश ' ची करामत ॥

पीप् पीप् पीप् असा हॉर्न वाजवीत टॅक्सी आमच्या घराच्या दारात येऊन उभी राहिली, आणि मी पायांत सपाता संरकवून बाहेर जात टॅक्सी चालकाला आंत यायला सांगितलं... ...
त्यानं आत येऊन ती. काका [माझे वडील] व आमच्या सौ. इंदिराजीं चं सामान-सुमान टॅक्सी च्या डिकी त भंरण्यासाठी एकेक डाग बाहेर न्यायला सुरुवात केली... ...

१९७८ सालातल्या कडक उन्हाळ्यातले मे महिन्याचे दिवस होते. आम्ही त्या काळांत सातारा शहरांत रहायला होतो. तिथं महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा नवीन प्रकल्प सुरूं झालेला होता, जिथं मी नुकताच नोकरीला लागलेलो होतो, आणि सौ. इंदिराजी तिथं आयुर्विमा महामण्डळांत नोकरी करीत होत्या...
आमचं पहिलं अपत्य चि. स्निग्धा च्या वेळीं सौ. इंदिराजीं च्या गरोदरपणा चे दिवस भंरत आलेले होते... ...
म्हणून पहिले सहा-सात महिने माझी आई सातार्‍यातल्या आमच्या घरीं मुक्काम ठोंकून होती...
सौ. इंदिराजीं चं माहेर पुणे. आतां समाज रीतीनुसार आतां त्यांना पहिल्या बाळंतपणाला त्यांच्या माहेरीं पोंचवायची अगत्याची विनंति त्यांच्या मातोश्री नी धांडलेली होती... ...
तेहां नवीनच नोकरी असल्यामुळं माझ्या गांठीला रजा अशी कांही नव्हतीच. म्हणून सौ.इंदिराजी नां माहेरीं पुण्यापर्यंत घेऊन जायला माझे वडील ती. काका दोन दिवसापूर्वींच सातार्‍याला आले होते. आणि थोडा विचार करून मग असं ठरलं होतं की माझा साप्ताहिक सुटीचा वार रविवार असल्यामुळे, ती. काका आणि सौ. इंदिराजी रविवारी सकाळच्या आगगाडी नं पुण्याला जातील, आणि पांठोपाठ मी माझ्या मोटर सायकल वरून पुण्याला प्रयाण करायचं.
आगगाडी ला सातारा पुणे प्रवास करायला सहा तास लागणार होते... ...म्हणून मग मी मोटर सायकल वर तीनएक तासांत त्यांच्या आधीच पुण्याला सासरीं पोंचायचं... ...तिथली सगळी व्यवस्था लावायचं काम उरकून मग काका-इंदिराजी नां उतरवून घ्यायला पुणे स्टेशनवर हजर व्हायचं असा एकंदरीत कार्यक्रम आम्ही ठंरवलेला होता... ...

टॅक्सी त सामान भंरल्यावर मग मग काका, आणि त्यांच्या मागं मागं अवघडलेल्या सौ. इंदिराजी डुलत डुलत टॅक्सी त बसले, आणि टॅक्सी सातारा स्टेशन च्या दिशेनं रवाना झाली, आणि मी माझ्या बुलेट चा स्टार्टर मारून त्यांच्या पांठोपाट च स्टेशन ला पोंहोचलो... ... ...
सुदैवानं सह्याद्री एक्सप्रेस कधी नव्हे ती अगदी वेंळापत्रकानुसार सकाळीं आठ पांच ला सातारा स्थानकात दाखल झाली. सगळं सामान-सुमान गांडीत चंढवून मी ती. काका आणि सौ. इंदिराजी नां त्यांच्या आरक्षित आसनांवर बसवून दिलं, आणि गाडीबाहेर उतरलो...
पाठोंपाठ सौ. इंदिराजीं नी मला हाकांरलंच,"अहो आमच्या पांठोंपाठ तुम्ही अंघोळ-नाष्टा वगैरे उरकून निघा बरं का लगेच... ..."
मी,"अगं हो...हो...हो...किती वेळां सांगशील तेंच ते?"
सौ.इंदिराजी,"नाही... ...घरीं गेल्यावर वर्तमानपत्र उघडून शब्दकोडं सोंडवत बसूं नकां म्हणजे झालं... ...!!...नाहीतर... ..."
मी,"नाहीतर काय?"
सौ. इंदिराजी," नाहीतर आम्ही पुणे स्टेशनवर तांटकळत तुमची वाट बघत बसलोय, आणि तुमची गाडी खंबाटकी घाटात... ...!!! म्हणून सांगतेय्‌... ...आक्का च्या घरीं सगळी तयारी करायला तुमची मदत लागूं शकेल...तेव्हां बारा वाजेपर्यंत तरी पुण्याला पोंचायचं आहे तुम्हांला... ...हे लक्ष्यांत ठेंवा... ...काय?"
मी,"ठीकाय...ठीकाय... ...कांही काळजी करूं नकां...मी पोंहोचतो वेळेत..."
ती. काका,"काय आहे रवि...ही अशी अवघडलेली...आणि एकवेळ मुंबई ला जायचं असतं, तर वेगळी गोष्ट होती... ...मुंबई ची मला खडा न्‌ खडा माहिती आहे रे... ...पण पुण्यात मी फार क्वचितच वावरलेलो आहे, आणि तिथले रस्ते-बिस्ते ही कांही धडपणे मला माहीत नाहीत... ...म्हणून सुमीता सांगतीय्‌ तसा वेळे आधीच पुण्याला पोंच म्हणजे मिळवली..."
मी,"कांही काळजी करूं नकां काका...अजून चार-एक तासांचा अवधी हातात आहे. आणि बुलेट वर सातारा-पुणे अंतर म्हणजे फार फारतर दोन तास...तेव्हां मी अंघोळ आंवरून नऊ वाजेपावेतों जरी निघालो, तरी अकरा-साडे अकरापर्यंतच पुण्याला पोंचेन...तेव्हां अगदी निर्धास्त रहा तुम्ही."
तितक्यात गार्ड नं हिरवा झेंडा दाखवला, इंजिनानं एक कर्कश्श्य शिट्टी दिली, आणि गाडी नं पुण्याच्या दिशेनं प्रस्थान ठेंवलं... ...आणि काका-इंदिराजी नां हात हलवून टा टा करीत मी निरोप दिला... ...

बुलेट म्हणजे खरं तर भक्कम भरंवश्याचा अरबी घोडाच... ...पण त्या दिवशीं अगदी रविवारचा मुहूर्त साधून शनिमहाराजांची वक्रदृष्टी माझ्याकडं वळलेली होती की काय कोण जाणे... ...
निघायच्या गडबडीत घरीं सकाळचा चहा च घ्यायचा राहूनच गेला होता, म्हणून मी स्टेशन च्या फलाटावरच्या उपाहारगृहातलाच रेल्वे चा खास फुळकवणी चहा घश्याखाली ढंकलला...
बाहेर येऊन बुलेट वर स्वार होत ती चालूं केली, आणि पहिला गिअर टाकायल क्लच ओंढला, आणि कपाळावर हात मारून घेतला...!!
क्लच केबल ची क्लच लीव्हर च्या भोंकात अडकवलेली गुंडीच तुटली, आणि मान टांकत निस्त्राण झाल्यासारखी क्लच लीव्हर लडबडायला लागली... ...!!!...कर्म माझं...



गिअर्स च टांकतां येईनात म्हटल्यावर मग घरीं जाणार कसा मी?... ...
तश्यात रविवार असल्यामुळं माझी बुलेट हाताळणार्‍या 'हॅरिश' मेस्त्री चं गॅरेज पण बंद... ...
बरं त्याच्या घरीं जाऊन त्याला धंरावा, तर त्याच्या घराचा ठाव-ठिकाणा पण मला ठाऊक नव्हता... ...
शनि महाराजांनी एका बाजू नं सौ. इंदिराजीं ची गाडी वेळेत सोंडून, आणि दुसर्‍या बाजू नं बुलेट ची क्लच केबल निकामी करून मला बरोब्बर पावनखिंडीत कंचाट्यात धंरलेला होता... ... ...
माझा बाजीप्रभू करून ठेंवायचा घाट त्या दिवशीं नियती नं घातलेला होता...!!!

एकेक मिनिट सरत होतं...अन्‌ डोकं सुन्न झालेलं होतं... ...काय करावं कांही सुचेच ना... ...
बरोबर एखादी सुटी क्लच केबल असती, तरी स्वतःच कांहीतरी खटपटकरून ती बसवतां आली असतीही कदाचित... ...
पण डोंक्यात घोंघावणार्‍या सार्‍या कल्पना 'आत्याबाई च्या मिश्या' झालेल्या होत्या... ...
केबल तर जवळ नव्हतीच, पण रविवार असल्यामुळं बुलेट च्या सुट्ट्या भागांची दुकानंही दिवसभर बंदच... ...
हरे राम... ... ...आतां काय करायचं?
एक एक मिनिट जसं उलटायला लागलं तसं माझ्या लक्ष्यात आलं की तिथं आगगाडी च्या स्थानकावर नुस्तं च डोकं पिकवत बसून कांहीही होणार नव्हतं...
कसंही करून बुलेट मला गावापर्यंत नेणं भागच होतं... ...
मग सगळे विचार-कल्पना बाजूला सारून मी परत बुलेट चालूं केली आणि एक प्रयोग म्हणून जरा दोन्ही पायांनी ती पुढं ढंकलत क्लचशिवायच पट्‌कन पहिला गिअर टाकला... ...
एक धक्का बसला जोरात, पण गाडी कांही गंचके मारून बंद पडली नाही... ...ती पहिल्या गिअरमध्ये पुढं सरकायला लागली... ...अहो आश्चर्यम्...!!
मग मात्र मी नेहमीसारखीच ती चालवीत वेग वाढवून धक्के खात कां होई ना, पण पटापट तिसरा गिअर टाकला, आणि त्याच गिअरमध्ये गाडी ठेंवून सावकाश सावकाश चालवत एकदाचा बस स्टॅण्ड समोर असलेल्या आमच्या 'हॅरिश' मेस्त्री चं गॅरेज गांठलं...

माझी बुलेट हाताळणारा हा 'हॅरिश' मेस्त्री म्हणजे एक वल्ली होती. त्याचं नांव 'हॅरिस डेव्हिड'... ...पण त्याच्या गॅरेज वर 'लक्ष्मी ऍटो हॅरिश वर्कशॉप' अशी मजेशीर पाटी झंळकत होती... ...
वयानं माझ्यापेक्षा चार एक वर्षांनी मोठा असल्यामुळं मी आपलं त्याचं 'हॅरिशभाऊ' असं नामकरण केलेलं होतं.
ह्या गाड्या-दुरुस्तीच्या पाट्या रंगवणार्‍या पेंटर लोकांची एक नामी गम्मत असते...ते बिनचूक पणे पाटीवर 'ऍटो गॅरेज' असं च लिहितात... ...
'ऑटो गॅरेज' अशी पाटी मी उभ्या हयातीत एकही पाहिलेली नाही...!!
पाटी विनोदी असली, तरी अवघ्या पंचक्रोशीत 'बुलेट दुरुस्ती' त ह्या 'हॅरिश' मेस्त्री चा हात धंरणारा मात्र दुसरा कुणीही मेस्त्री त्या काळीं तरी नव्हता...
दुरुस्तीला आलेल्या गाड्या स्टॅण्डवर चंढवून, हा हॅरिशभाऊ एका तिपाईवर गाडीशेंजारी बसायचा, आणि इंजिन चालूं करून फक्त मिनिटभरच कान देऊन इंजिनाच्या फिरणार्‍या विविध भागांचे बारीक आवाज ऐकायचा, आणि हाताखालच्या पोरांटोरांना नेमका कुठला भाग उघडून काय-कसं दुरुस्त करायचं तें अगदी अचूक सांगायचा... ...असलं भन्नाट कसब त्याच्याजवळ होतं... ...
आणि सातार्‍यातल्या माझ्या एकूण तीनएक वर्षांच्या वास्तव्यात त्याचं निदान एकदांही चुकलेलं मी पाहिलेलं नव्हतं, हे विशेष... ...
पण कठीण परिस्थितीत ' जुगाड बहाद्दरी ' तही ह्या 'हॅरिश' मेस्त्री चा हात धंरणारा दुसरा कुणी पंचक्रोशीत नव्हता, हे मात्र मला ठाऊक नव्हतं... ... ...

रविवार असल्यामुळं माझ्या अपेक्षेप्रमाणंच हॅरिशभाऊ च्या गॅरेजच्या बंद दरवाज्याला असलेलं भलंमोठ्ठं कुलूप मला वांकुल्या दांखवत लंटकत होतं... ...
तथापि गॅरेज ला लगटून असलेली दादू पहिलवानाची चहा-भज्यांची टपरी मात्र उघडी होती.
चहा-भज्यां चा खमंग वास आसमंतात दरवळत होता, टपरीवर चारदोन स्थानिक लोक चहा घेत गप्पा-टप्पा करीत निवांत उभे होते, आणि खुद्द दादू च फंरफंरणार्‍या स्टोव्ह वर ठेंवलेल्या पातेल्यात चहाचं रसायन ढंवळत उभा होता... ..."
हरीभाऊ च्या गॅरेज समोर स्टॅंड ला लावून गाडी बंद करत मी खाली उतरलो... ...
गाडी दुरुस्त करून घेऊन, घर गांठून, अंघोळ-नाष्टा उरकून, उशीरात उशीरा साडे दहापर्यंत कां होई ना, मला पुण्याच्या दिशेत सुटणं क्रमप्राप्त होतं...
मी मनगटावरच्या घड्याळाकडं नजर टाकली... ...तर एव्हांनाच साडे नऊ वाजत आलेले होते... ...
माझ्या हातात नशीबाला आलेली लढाई मारायला फक्त अर्ध्या तासाचाच काय तो अवधी होता... ... ...!!!
मला घाम फुटायला लागला...
,"या या सायेब... बसा... ...कसला घोर लागलाया वो सक्काळच्या पारी तुमास्नी?... ...घ्या च्या घ्या... ..." म्हणत दादू नं 'पहिल्या धारेचा' कप माझ्या पुढ्यात ठेंवला... ...
मी आपला सचिंत मुद्रे नं यांत्रिकपणे च कप उचलून तोंडाला लावला...
डोंक्यात विचार घोंघावतच होते... ...'हॅरिशभाऊ' ला धंरायला आतां कुठं कुठं धांवायचं?

इतक्यात पाठीवर एक जोरदार थाप पडली,"काय नाना सायेब?... ...आज वयनींच्या हातचा च्या सोडून हिकडं कुटं आलाय्‌सा च्या प्याला ह्या दादू कडं सक्काळच्या पारीं?"
दंचकून वर बघितलं तर साक्षात 'हॅरिशभाऊ' च खोः खोः हंसत पुढ्यात दत्त म्हणून उभे... ...!!!
मातोश्री नां [करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी] मनांतल्या मनांत साष्टांग दंडवत घालत, मी 'हॅरिशभाऊ' ला उघडपणे मिठी मारायचीच काय ती बाकी ठेंवली... ...!!!
मग दादू कडं वळत मी हॅरिशभाऊ साठी 'अजून एक पेश्श्यल' ची हर्षभंरित आरोळी ठोंकली... ...
हॅरिश,"काय झालंया नानासायेब... ...त्वाण्ड लई च उतारल्यालं दिसतंया तुमचं... ..."
मी कपाळाला हात लावत माझ्या बुलेट कडं बोंट दाखवलं,"गाडीची क्लच केबल तुटलीय्‌ हॅरिशभाऊ... ...म्हणून काळजीत पडलोय्‌...आणि आतां खुद्द तुम्ही च देवासारखे भेंटलात... ..."
हॅरिश,"सायेब... ...मंग गाडी र्‍हाऊ द्या की हितं च... ...तुमी जावा घराकडं बिनधास... ...उद्यां सक्काळच्यालाच नवी क्येबल टाकूनश्यान् गाडी घरला पाटिवतो तुमच्या...मंग तर झालं?"
मी मग हॅरिशभाऊ ला काय लोच्या होऊन बसला होता, तें सगळं सविस्तर रामायण सांगितलं...
आणि कांहीही करून मला बारा-साडेबारा पर्यंत पुण्याला पोंहोचायलाच हवं हे पण सांगितलं... ...
आतां मात्र हॅरिशभाऊही च्या कपाळावर आठ्यांचं जाळंपसरलं... ...,"चला नानासायेब...काय ढेंपाळलंया त्ये दावा मला येक डाव..." म्हणत हॅरिशभाऊ बाकड्यावरनं उठला...
मग मी त्याला गाडीजवळ नेऊन लडबडीत झालेली क्लच लीव्हर दांखवली,"हे असलं लचाण्ड झालंय्‌ बघा हॅरिशभाऊ... ...मघांशी मी च विचारात पडलो होतो, की आज सुट्ट्या भागांची एकजात सगळीच दुकानं बंद असतांना तुम्ही तरी हे कसं काय निस्तरणार म्हणून... ..."
हॅरिशभाऊ नी मग क्लच लीव्हर नीट खालनं वरनं निरखून बघितली...
मग सदर्‍याच्या खिश्याला सदैव असलेला बारीक स्क्रू ड्रायव्हर काढून क्लच लीव्हर च्या गोल भोंकात घुसडला, आणि त्यांत केबल पासून सुटून अडकलेली वाटाण्याएव्हढ्या आकाराची पितळेची गुण्डी बाहेर काढून माझ्या हातावर ठेंवली.


,"क्येबलीला काय बी झाल्यालं न्हाई सायेब... ...ही डाग मारल्याली गुण्डी त्येवडी डाग तुटूनश्यान् सुटलीया बगा... ...हेंच्या मायला हेंच्या ...
साद्या क्येबली बी धड बनिवतां यीना झाल्यात, आन्‌ गाड्या बनवूनश्यान् इकत सुटल्यात राण्डंची... ...!!!"
हॅरिशभाऊ आतां गाड्या बनवणार्‍या कंपनीचा उद्धार करायला लागला... ...
मी,"आतां कंपनीला शिव्या देऊन काय उपयोग आहे हॅरिशभाऊ?... ...दामटीत तर मी च सापडलोय्‌ ना?...आतां तुमच्यावरच भरंवसा टाकलाय्‌ सगळा... ..."
खरं हाय नानासायेब तुमचं... ...दामटीत घावलायसां खरं सप्पाचट्... ...आतां ग्यारीज बी बंद हाय, आन्‌ हात्यारं-बित्यारं बी समदी आडाकल्यात आतच... ..."
मी,"मग तुमच्या घरीं जाऊन किल्ल्या आणायच्या काय?"
हॅरिशभाऊ,"नानासायेब आवो मी र्‍हातो परळी ला...त्ये हाय हितनं ईस मैलावर... ...मंजी येष्टी गांटून घरला जाऊनश्यान चावी आनंस्तंवरच वाजतील दोनपारचं तीन-चार... ...काय उपेग हाय तेचा?"
मी,"मग आतां काय करायचं हो हॅरिशभाऊ?... ...संपलंच सगळं..."म्हणत मी कपाळाला हात लावला.
हॅरिशभाऊ,"नानासायेब, आवो आसं हातपाय गाळूनश्यान्‌ कुटं काय व्हतंया काय... ...ऑ?... ...पर म्या हाय न्हवं?... ...चला...बगूं या कायतरी करतां येतंय्‌ काय त्ये... ... चला..."
इतकं बोलून हॅरिशभाऊ नी मग केबल चा तांणवर्धक हातांनी सैल करून तुटलेली केबल बाहेर काढली, आणि आम्ही दादू च्या चहा टपरी वर परत आलो... ..."

आतां खुद्द हॅरिशभाऊनी च पुनश्च 'दोन पेश्श्यल' ची ऑर्डर दिली. चहा पुढ्यात आल्यावर कप तोंडाला लावत मी मूकपणेच चहा प्यायला लागलो...
हॅरिशभाऊ कसल्यातरी तंद्रीत असल्यासरखा शून्यात बघत चहा पीत होता...मी गप्पच होतो... ...
दादू स्टोव्हवर रटरटणारं चहा चं पातेलं साण्डशी त धंरून उचलून किटलीवर ठेवलेल्या फडक्याच्या गाळणीत ओंतून चहा गाळत होता... ... ...

अन्‌ अचानक चटाक्‌दिशी चुटकी वाजवत हॅरिशभाऊ उठून दादू च्या चहा च्या स्टोव्ह कडं निघाले,"चला सायेब... ...जाताय्‌ तुमी पुन्याला आगदी येळंवर... ...फकस्त जरा हात लावाया लागल तुमास्नी कामाला...काय?"
मी,"हॅरिशभाऊ... ...अहो हातच काय, दोन्ही हात अन्‌ दोन्ही पाय सुद्धां लावायला एका पायवर तयार आहे मी... ...!! पण गाडी नक्की दुरुस्त होईल ना वेळेत?"
हॅरिशभाऊ,"आगदी बेशक सायेब... ...दादू...ह्ये तुजं आदान जरा उतरीव इष्टूवरनं... ...आऽऽऽऽऽऽऽऽस्सं... ...आनि ती साण्डशी जरा द्ये वाईच हिकडं... ...आमास्नी जरा काम करूं द्ये ईस मिण्टं...काय?"

दादू नं स्टोव्ह वरचं पातेलं खाली उतरवलं, साण्डशी दादू च्या हवाली केली,"झालं मिस्तरी?... ...कां आजून काय लागतंया?"
हॅरिशभाऊ,"आजून येकादा चिमटा हाय काय रं तुज्याकडं?... ...आजून योक चिमटा लागंल मला... ..."
दादू,"न्हाय बा... ...चिमटा योक च हाय माज्याकडं... ..."
हॅरिशभाऊ पंप मारून स्टोव्ह मोठा करीत म्हणाले,"येक काम कर दादू... ...पल्याड कोंपर्‍यावरची म्हादबा ल्हवाराची भट्टी चालूं हाय आत्तां... ...त्या म्हादबाकडनं दोन चिमटं आन मागूनश्यान...म्या मागितल्यात म्हनावं त्येला... ...जा पळ."
हॅरिशभाऊ नी गाडीच्या काढलेल्या क्लच केबल चं गुण्डीकडचं तोंड सर्वप्रथम दादू च्या स्टोव्ह वर तांपवायला घातलं... ...तोंवर दादू लोहाराकडं जाऊन दोन भक्कम चिमटे घेऊन परत आला.
दोन तीन मिनिटांत केबलचं टोंक तांपून लालभडक दिसायला लागलं, तसं ते एक वावभर अलीकडं चिमट्यात धंरून उचलीत चिमटा माझ्या हातात देत हॅरिशभाऊ म्हणाले,"नानासायेब...तुमी आतां येवडंच करायचं... ...ह्यो चिमटा गच्‌ धंरून ठिवायचा... ...क्येबल आजाबात सटाकाय नाय पायजेल...येवडंच सांबाळा... ...बाकीचं काय त्ये म्या बगतंय्‌... ...काय?"
चिमटा दोन्ही हातांच्या पकडीत गच्च धंरून ठेंवत मी उत्तरलो,"तुम्ही काळजीच सोडा हॅरिशभाऊ... ...करा तुम्हांला काय करायचं ते... ..."

जुगाड बहाद्दरांचा उस्ताद म्हणावा, अश्या हॅरिशभाऊ नी मग लालभडक तांपलेल्या त्या केबल च्या तारा दुसर्‍या चिमट्यात धंरून उलट्या पिरगाळत मोकळ्या केल्या...


मग पुन्हां एकदां केबल रसरशीत तांपवून चिमटा मला धंरायला सांगितला, आणि दुसर्‍या चिमट्यानं सफाईदारपणे ती मोकळी झालेली टोकं वांकडी करत करत फक्त पांच एक मिनिटांतच केबलच्या टोंकाशी अंगच्या तारांची च एक फर्मासपैकी गुण्डी तयार केली, आणि माझ्या हातातला चिमटा घेऊन ते लालभडक तांपलेलं टोंक स्टोव्ह शेंजारच्या थंडगार पाण्याच्या बादलीत बुचकळलं... ...
बादलीतनं फुस्स्‌ फुस्स्‌ असा आवाज झाला नि पाण्याच्या वाफाही वरा उसळल्या... ...
हॅरिशभाऊ नी मग गार होऊन दगडासारखी टणक झालेली ती तारांची गुण्डी क्लच लीव्हर च्या भोंकात अडकवली, मग तांणवर्धकातनं केबल ओंवून घेऊन इंजिनाच्या बाजूच्या क्लच लीव्हर ला जोडली... ...
आणि तांणवर्धकाचा नट चिमट्यानं फिरवत क्लच हवा तेंव्हढा घट्ट करून घेतला... ... ...



आणि गाडी च्या सीटवर थांपट्या मारत म्हणाला,"नानासायेब... ...झाली तुमची गाडी दुरुस्त... ...जरा ट्रायल घिऊनश्यान बगा, कसं काय झालंया काम त्ये..."

मी गाडी चालूं करून हॅरिशभाऊ ला मागं बसवला, आणि क्लच ओंढून बघतो तर काय... ...नवी केबल झक् मारील असली तुटलेली केबल हॅरिशभाऊ नं दुरुस्त करून बसवलेली होती... ...!!!
गाडी चे गिअर्स पण अगदी लोण्यासारखे पटापट पडत होते... ... ...
हॅरिशभाऊ चं ते कौशल्य बघून मी थक्क होत कपाळाला हात लावला,"धन्य आहांत हॅरिशभाऊ... ...किती पैसे द्यायचे तुमचे?"
हॅरिशभाऊ,"र्‍हाऊं द्या त्ये सायेब... ...आडचान वारली न्हवं तुमची?... ...बास् झालं... ...आवो येळंला मानसाच्या उपेगी पडायचं नसंल, तर निस्तं पैकं घिऊनश्यान काय चाटायचं आसत्यात व्हंय?"
तरी मी जरा साशंकच होतो,"दुरुस्ती झालीय्‌ खरी फर्मास...पण हॅरिशभाऊ... ...गाडी पुण्यापर्यंत जाईल ना धड?... ...मध्येच कुठं अडकून पडायला नको ,म्हणून आपलं विचारतोय्‌ परत..."
हॅरिशभाऊ मग तेलानं बरबटलेल्या मुठीनं मिश्यांवर तांव देत म्हणाले,"बिन्दास्त जावा नानासायेब... ...आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽगदी दिल्लीपत्तोर बी जावा की खुश्शाल... ...क्येबलीचा टंवका जरी निगाला कां नाय, तर ग्यारिज बंद करतंय् मी उद्यापास्नं बगा... ... ...काय?"

हॅरिशभाऊ ना धन्यवाद देत मी घरीं येऊन अंघोळ आंवरली...आणि नाष्टा वाटेतच जमेल तिथं करायचा, असं ठंरवून बुलेट पुण्याच्या दिशेनं अशी सुसाट सोडली, की नाष्टा राहिला बाजूलाच... ...
मी नियोजित वेळेपेक्षां फक्त पंधरा मिनिटं उशीरा, म्हणजे सव्वा बारा वाजतांच आमच्या मोठ्या मेव्हणीच्या-म्हणजे सौ. वृन्दा च्या-घरीं पोंहोचलो... ...


पुढील तीनचार दिवसांतच सौ. इंदिराजींची सुखरूप प्रसूती होऊन आमचं पहिलं वहिलं अपत्य-चि. स्निग्धा-अवतरलं.
पुढच्या सगळ्या धांदली-गडबडीत 'बुलेट ची केबल बदलायची आहे' हे च डोंक्यातनं जे काय गायब झालं, ते कायमचं विसरलंच.
पुढची आख्खी पांचएक वर्षं माझी बुलेट हॅरिशभाऊ नं दुरुस्त केलेल्या त्याच क्लच केबलवर विनातक्रार चालली...अगदी थेंट १९८२ साली मी ती विकेपर्यंत... ...!!!
१९८२ सालीं सौ. इंदिराजी स्कूटर चालवायला लागल्या, तेव्हां त्यांनाही वाहन वापरतां यावं म्हणून मी ती बुलेट विकायला काढली, नवीन बजाज चेतक स्कूटर घ्यायला.
तेव्हां बुलेट मी जेव्हां हॅरिशभाऊ कडं दाखवायला गेलो, तेव्हां त्यांचं लक्ष्य चटकन्‌ क्लच कडं गेलं... ...
हॅरिशभाऊ,"नानासायेब... ...आवो ही कलच क्येबल आजून तीच हाय काय आपुन वळूनश्यान् बशिवल्याली?"
तेव्हां कुठं काय झालं ते माझ्या लक्ष्यात आलं,"बहुतेक तीच असणार हॅरिशभाऊ... ...कारण त्यानंतर क्लच केबल बदलल्याचं कांही मला आंठवत नाही..."
हॅरिशभाऊ,"म्हंजी?... ...तुमी आश्शीच गाडी हानत बसलावतासां नानासायेब आत्तांपत्तोर... ...ऑं?"
मी आतां हॅरिशभाऊची फिरकी तांणली,"अहो गाडी चालत होती फक्कड...म्हटल्यावर मी परत कश्याला बघतोय्‌ त्या केबल कडं? आणि तुम्हीच तर म्हटला नव्हतां काय की 'बिन्दास गाडी पार दिल्लीपत्तोर बी जा घिऊनश्यान्' म्हणून?... ...म्हणून मी मग कांहीच केलं नाही पुढं... ... फक्त गाडी वापरली...बास...आत्तांपर्यन्त पांच सात वेळां तरी काश्मीर ते कन्याकुमारी इतकं अंतर चालली असेल बघा ही गाडी... ...त्या दिवशीं अंगात आलेल्या त्या क्लच केबल ला तरी हॅरिशभाऊ मेस्त्री चा हिसका कुठं ठाऊक होता?... ...काय?"
अशी फिरकी तांणून मी हॅरिशभाऊ ची पांठ कंडकंडून थोंपटली... ... ...
आणि स्वतःचीच ती अविश्वसनीय 'जुगाड उस्तादी' बघून आं वांसत दस्तुरखुद्द हॅरिशभाऊ मेस्त्रीनं च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!!

***********************************************************************************************
-- रविशंकर.
२९ फेब्रुवारी २०२०

No comments:

Post a Comment