Search This Blog

Friday 21 February 2020

॥ जुगाड व्यवस्थापन - भाग १ ॥

॥ गुर्‍हाळ ॥



," इट्या... ...भोंसडीच्च्या...तुजं डोस्कं-बिस्कं फिरलंय् काय रे?... ...काय चाललंय्‌ हे तुझं?... ...ऑं?... ...चरकाच्या इंजिनाच्या चाकावर काकवी सांडून हा काय राडा करून ठेंवलाय्‌स तूं? हातातली ती काकवीच्या राळे ची बारडी पहिली खाली ठेव... ...आणि इंजिना चं चाक आधी धुवून साफ करून घे... ...!! "
माझे वडील ती. काका आमच्या शेंतावरच्या गुर्‍हाळाचे 'जनरल मॅनेजर' श्री. विठ्ठलराव टोपेकरांवर डोंळे तांबारत भंडकून खेंकसले... ...
काका विठोबांवर भंडकणं अगदी साहजिकच होतं...
१९७६ सालातल्या त्या हिंवाळ्यात आदल्या रात्रीच राशिवड्यातल्या आमच्या शेंतावरच्या गुर्‍हाळाची नारळ फोंडून दंणक्यात सुरुवात झालेली होती. पहिल्या काहिलीतल्या पंचवीस एक गुळाच्या ढेपा तयार झालेल्या होत्या... ...त्या गुर्‍हाळातल्या एका कोंपर्‍यात रचून ठेंवलेल्या होत्या.



गुर्‍हाळ सुरूं व्हायच्या आदल्या आठवड्यातच मार्केट यार्डातल्या आमच्या अडत्यानं पहिल्या शंभर ढेपांची ऑर्डर आगाऊ रक्कम पोंच करून दिलेली होती...माल पुढच्या दोनतीन दिवसांतच पोंचता करायची अट घालून.
आणि आतां पहिला घाणा उरकल्या उरकल्या च ऊंस पिळायचा चरक फिरवणार्‍या डीझेल इंजिनाच्या चाकापासून चरकाच्या चाकाभोंवती फिरलेला रबरी पट्टा इंजिनाच्या चाकावरून सटकायला लागला, आणि नुस्तं इंजिनाचं चाक च फिरत राहिलं... ...कांही केल्या घाण्याचं चाक कांही फिरेच ना...!!
झालं असं होतं, की आदल्या दोन-तीन वर्षांचे हंगाम पुरे होईतोंवर इंजिनाच्या चाकावर घांसून घांसून पट्ट्याचा आणि इंजिनाच्या चाकाचा असे दोन्ही पृष्ठभाग पॉलिश केल्यासारखे अगदी चंकचकीत-गुळगुळीत झालेले होते, आणि त्यामुळं पट्टा जागच्या जागींच स्थिर रहात होता...आणि त्याला चालना देणारं इंजिनाचं चाक नुस्तंच गरगरत त्याखाली फिरत होतं... ...!!!

  

झालं... ...सगळं गुर्‍हाळच बघतां बघतां थंडावलं...
हयातीत प्रथमच गुर्‍हाळाचं काम कसं चालतं ते बघायला गेलेल्या माझ्या उत्साहावरही विरजण पडलं...
एकीकडं पुढच्या दोनतीन दिवसांत एक टनभर तरी उसाचं गाळप करून, गळित उकळून, शंभर एक ढेपा ओंतवून त्या कोल्हापूरला मार्केट यार्डात अडत्याकडं पोंच करायचा वायदा डोंक्यावर बसलेला, आणि नमनालाच ' प्रारंभे च मक्षिकापातः ' अशी इथं अवस्था होऊन बसलेली... ...त्यामुळंच काका कांतावलेले होते.
बिचार्‍या इटोबांची कांहीच चूक नव्हती. पहिल्या पंचवीस ढेपांच्या घाण्याचं ओंतकाम झाल्यावर बाळा गुळव्या [ खड्ड्यात ओंतलेली काकवी ढंवळून थंड करून ती बादल्यात ओंतून गुळाच्या ढेपा बनवणार्‍या कामकर्‍याला 'गुळव्या' म्हणतात ] रिकाम्या झालेल्या काकवी आटवायचा खड्डा साफ करीत खाली चिकटलेली राळ-साळ, खोर्‍यानं काढून, टाकून द्यायला बादलीत भंरत होता. ती उचलून नेतांना इंजिनाच्या चाकाला बादली धंडकली... ...बादलीतला सगळा महाचिकट राडा इंजिनाच्या चाकावर सांडला, आणि मग सगळंच काम ठप्प झालं... ...



काकांचा आवाज असा चंढल्यावर मग सगळाच कल्ला उडाला. दस्तुरखुद्द 'इटोबा' च सदरा उतरवून ठेंवत आतां आखाड्यात उतरले.
त्या काळची रस्टन कंपनीची डिझेल इंजिनं आजच्यासारखी सडपातळ बहुदण्डगोलीय [मल्टिपल सिलिंडर्ड] नसायची... ...
एकच लडदू दण्डगोल आणि दट्ट्या असलेलं ते डीझेल इंजिन नऊ फूट उंचीचं अगडबंब इंजिन होतं. त्याचं पट्टा फिरवणारं गतिचक्र [फ्लाय व्हील] बारा फूट व्यासाचं आणि एक फूट रुंदीचं महाकाय चाक होतं. इंजिन चालूं करण्यासाठी दांडा बसवून ते चाक गोल गोल फिरवायलाच आठ एक गडी लागायचे...!!
झालं...'इटोबां' ची पांचसात गडी सोंबत घेऊन इंजिनाच्या चाकाबरोबर झटापट सुरूं झाली, आणि मग आपापल्या कनवट्यांच्या पानतंबाखूच्या चंच्या सोंडून चुलाणाच्या कट्ट्यावरच सगळ्या 'टेकी' बेण्यांची काकांच्याबरोबर, पुढं कसं काय करायचं त्याची चर्चा करायला बैठक बसली...जिला आजच्या मॅनेजमेण्ट च्या परिभाषेत 'स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मीटिंग' असं म्हणतात.
गुर्‍हाळांत उसाचा रस उकळायची काहिल तांपवणारं चुलाण कायमच धंडाडून पेंटलेलं असतं. त्याच्या जबर उष्णतेच्या झळा लागून कामकर्‍यांची विलक्षण दमछाक होत असते. म्हणून गुर्‍हाळं ही रात्रभंर चालवली जातात, आणि दिवसभर कामकर्‍यांना विश्रांति दिली जाते.



आतापावेतों रात्रीचे साडेबारा वाजत आलेले होते... ...
मीटिंग मध्ये आतां 'आडव्या डोंस्क्यानं इच्च्यार करनं' - म्हणजे मॅनेजमेण्ट् च्या भाषेत ज्याला 'ब्रेन स्टॉर्मिंग' - चा अध्याय सुरूं झाला... ...
काका,"असं बघा विष्णु विठोबा... ...आतां हे निस्तरायला कोल्हापूरला जाऊन गावडे मेस्त्रीला धंरून आणण्या शिवाय कांही उपाय राहिलेला नाही. तेव्हां मी आणि हा [म्हणजे स्वतः मी] सकाळच्या सातच्या गाडी नं कोल्हापूरला जातो. तेव्हां आम्ही परत येईतोंवर ऑर्डर पुरी करायला लागणार्‍या टनभर ऊंस तोडणीचं काम पुरं करून घ्या...आणि... ..."
विष्णु,"तेचा काय बी उपेग न्हाई व्हनार काका... ..."
काका,"कां?"
विष्णु,"काका...आवो उद्या 'व्हळी' हाय न्हवं?... ...इसारलासा काय? त्ये गावड्ये म्येस्तरी तुमास्नी घावनार हाय व्हंय् कोल्लापुरात? त्ये सटाकलं आसंल कोकनांत त्येच्या घावाला... ...
आतां आटवडाभर तरी काय त्ये घावत न्हाई बगा... ..."
काका,"अरे खरंच की विष्ण्या... ...पार विसरूनच गेलो होतो बघ मी...आतां काय करायचं?"
बाळा गुळव्या,"इस्नुदादा... ...म्होडं गावांत योक म्येस्तरी हाय माज्या वळकीतला... ...त्येला घिऊनश्यान् यिऊं काय म्या?"
इटोबा,"डिजिल विंजनाची कामं करतंय्‌ काय त्ये?"
बाळा गुळव्या,"त्ये काय ठावं न्हाई बा आपल्याला... ...पर गावामंदी त्येला म्येस्तरी म्हनत्यात समदी, म्हून आपलं इच्च्यारलं म्या..."
विष्णु,"आरं पन काम काय करतंय् त्ये ब्येनं... ...?"
बाळा गुळव्या,"काय की बा... ...पर सायकली रिपिर करतांनी म्या बगटलंय्... ...त्ये करंल की कायतरी... ...!!"
जमलेले सगळे 'टेकी' आतां पान तंबाखू च्या गुळण्या थुंकून खीः खीः करायला लागले... ...


आतां विष्णुपंत पण चंवताळले,"आतां गुमान तंबाकू चगळत गप बसा भडव्यानूं... ...ह्या बाळ्या रांडंच्याला गाडवाची बी आक्काल न्हाय... ...इंजान रिपिर कराया सायकलचा मिस्तरी आनाया निगालंय... ...आनि तुमी ख्या ख्या करत सुटलायसा... ...तुमचीबी डोस्की तंरकाटल्यात का काय रं आतां? येळ कस्ली आलीया आवदाण्ड... ...गाळाप ठप् व्हाया आलंया, आनि तुमास्नी दात काडाया आंगात आलंया... ...काय डोंस्की चालत आसत्याल तर बोला, न्हायतर गुमान बसा तंबाकू चगळत..."
विष्णुदादा ही असे भंडकल्यावर मग 'मीटिंग' जरा गंभीर झाली...
पांड्या,"काका... ...मला काय वाटतंया... ..."
काका," बोला...कुणालाही काय काय सुचतंय्‌ ते बोला... ...गावडे मेस्त्री हाताशी नाही म्हटल्यावर आतां आपल्यालाच कांहीतरी करून घाणा चालूं करायला पाहिजे... ...हं बोला पांडोबा...काय डोंक्यात आहे तुझ्या?"
पांडोबा,"इस्नुकाका... ...मंजी चाकाचा आक्षी चम्मनगोटा झालाया म्हूनश्यान पट्टा फिरंना झालाया... ...व्हय् का नाय?"
विष्णु,"व्हंय् पांड्या तसलंच कायतरी झालंया बग..."
पांडोबा,"मंग म्या काय म्हन्तो... ...की चाकाच्या बोडक्यावर चिक्कानमाटी वतली तर काय व्हईल?... ...फिरंल का न्हाय चाक?"
विष्णु,"आरं रेम्याडोस्क्याच्या... ...माटी वतली तर चाक धरंल की रं पट्टा... ...पर येकदां कां विंजान सुरूं झाल्याव् चाक फिराया लागलं न्हवं कां गार गार गार... ... मंग तुजी चिक्कानमाटी र्‍हाईल काय रं बाबा जाग्यावर... ...ऑं?"
आतां पांडोबांचं पण तोंड बंद झालं... ...
मग विष्णुकाकानी च तोंड उघडलं,"काका...मला काय वाटतंया...पट्टा आतां जुना झालाया न्हवं?... ...दोन गुराळं क्येली आपुन त्येच्यावर... ...तंवा वाईच ढिलं झालं आसंल बगा त्ये.
तर म्या काय म्हन्तो... ...म्हाद्या चांबार आत्तां आसंल घरामंदी... ...त्येला धंरूनश्यान आनाया पाटवूंया काय इट्याला?"
काका,"म्हाद्या इथं येऊन काय करणार विष्णु?"
विष्णुपंत,"म्हंजी आसं काका, की ढिला झाल्याला पट्टा आरी नं वाईच कांतरून घट करून दील की वो त्ये... ...पायत्तानं कातारतंय् न्हवं रोजच्याला?... ...जमंल की बेन्याला येवडं काम... ...
आनि येक डाव पट्टा घट क्येला का न्हाय, की मंग घाना घुमवाया कसला येळ लागतूंया म्हन्तोय् मी?"
काका,"विष्णु , तुझं डोकं बरोबर चाललंय्... ...पण पट्ट्याची दोन्ही तोंडं म्हाद्या चांभार कशी जोडणार? त्या जोडाला बोंटभर जाडीचे डझनभर नटबोल्ट आहेत आंवळलेले... ...आतां ते खोलायला-आंवळायला आपल्याकडंच जिथं पाने नाहीत, तिथं म्हाद्याकडं काय डोंबल असणाराय्‌त?... ...म्हाद्याच्या वकूबातलं काम नाही हे... ...इंजिनाचा मेस्त्री च लागेल हे निस्तरायला..."
आतां सगळेच डोक्यांवरच्या टोंप्या मागंपुढं सरकवून आपापली टाळकी खांजवायला लागले... ...
गंमत म्हणजे आतांपावेंतो गुर्‍हाळाचे जी. एम्. 'इटोबा' बंद चुलाणाच्या कट्ट्यावर बसून तोंडातल तोबरा चंघळत शांतपणे एकटक इंजिन आणि घाण्याला जोडणार्‍या पट्ट्याकडं बारीक नजरेनं बघत होते... ...तोंडातनं चकार शब्द न कांढतां... ...
त्यांची कसलीतरी तंद्री लागलेली असावी बहुतेक.
आणि इतका वेळ तंबाखूची गुळणी चंघळत गप्प बसलेल्या 'इटोबा' नी च आतां तोंड उघडलं,"काका...म्या काय म्हन्तो..."
काका,"हं बोला इटोबा... ...तुम्हीच बाकी राह्यलाय्"
इटोबा,"आसं बगा काका... ...आज हाय ऐतवार [म्हणजे रविवार]... ...मंजी गावडे म्येस्त्री बी येक डाव घावल बी तुमास्नी कोल्लापुरांत... ...पर समदी हात्यारा-बित्यारांची दुकानं आस्नार बंद... ... त्ये म्येस्तरी काय करनार हाय हात्यारांबिगर हतं यिऊन?... ...खरं हाय का न्हाई?"
काका,"खरंय्‌ तुझं विठ्या... ...अरे पण कांहीतरी करून हा घाणा तर चालूं करायला पाहिजे ना? नाहीतर त्या आडत्या देशिंग्या कडं गुरुवारपर्यंत बैल गाड्यात गुळाच्या ढेपांऐवजी काय दगड-धोंडे भंरून पांठवणाराय् आपण... ...ऑं?"
विष्णू,"काका...जरा दमानं घ्या... ...फुकाट डोस्कं तंरकाटून काय बी व्हनार न्हाय आतां... ...ह्ये इट्या काय म्हन्तंय्‌ त्ये वाईच आयकून तर घिऊं या... ...मंग बगूं फुडं कसं काय करायचं त्ये..."
काका,"ठीकाय् विष्णू... ...हां बोल रे विठ्या... ...काय म्हणणं आहे तुजं?"
विठोबा,"इस्नुदादा... ...काका वाईच बाजूला व्हनार आसतील सप्पाचट्‌ , तर म्या बगतो काय जमतंया काय त्ये... ..."
काका,"अरे पर काय करणार काय आहेस तूं...?"
विठोबा,"त्ये मला नकां इच्च्यारूं... ...तुमची पायत्तानं खायाची न्हाईती आपल्याला फुक्काट्... ...हां...!!!"
आतां विष्णुपंत मध्ये पडले,"काका काय बी करनार न्हाईती तुला इटोबा... ...म्या हाय न्हवं हतं?... ...पर घाना कसा चालता करनाराय्‌स तूं ?...त्ये तर सांगशील येक डाव?"
इटोबा तोंडातली गुळणी पंच्च्‌दिशी थुंकत म्हणाले,"आसं बगा इस्नुपंत... ...ह्यो भंडवा घाना अन्‌ ह्ये इंजान आतां आडव्या डोस्क्यानं कायतरी विलाज करूनश्यान् हालवाया लागनार आसं मला वाटतंया..."
विष्णुपंत,"मला पन तस्लंच कायतरी वाटाया लागलंय् बग इट्या... ...मंग काय करायचं म्हन्तोयास आतां?"
इटोबा डोंक्यावरची गांधी टोपी जरा पुढं सरकवीत डोंकं मागनं खाजवत म्हणाले,"काकां ना आतां रविंदा संगट [म्हणजे मी] जाऊं द्या घरला... ...
पर सक्काळपत्तोर काकांनी आजाबात गुराळाकडं याचं न्हाय, येवडंच माजं म्हननं...आसं व्हत आसंल, तर घाना चालूं करून गाळाप काडायची हामी माजी..."
आतां विष्णुपंतां नी विठोबां च्या नकळत काकांना नजरेनंच गप्प रहायची खूण केली,"काका... ...आतां गावडे म्येस्तरी ला तुमी धंरून आनंस्तंवर येक-दोन दीस तरी जात्याल फुक्काट्... ...तंवा पत्तोर ह्यो बंद घाना काय नुस्ताच बगत बसनार हाय काय आपुन? तवा ह्यो इट्या म्हन्तोय् तसं तुमी आतां जावा घराकडं धांकट्या मालकां संगट...आन्‌ झोंपा आरामशीर रातभर... ...म्या सोत्तां, इटोबा, आन्‌ समदं गडी करतो कायतरी खटपट... ...काय?"
विष्णुपंत आणि विठोबा हे काकांचे शेंती च्या कारभारातले उजवे-डावे हात... ...
तेव्हां जरा कां कूं करत, पण अखेर विष्णुपंत स्वतःच थांबताय्‌त म्हटल्यावर काका म्हणाले,"ठीकाय् विष्णु... ...करा काय तुम्हांला हवं ते...मी सकाळी आठ वाजतां इथं परत येतो.पण कांही उपायानं घाणा जर चालूं झाला, तर मात्र ताबडतोब मला बोंलवायला या कुणी तरी... ..."
काका थांबणार नाहीत म्हटल्यावर आतां विठोबानां चेंव चंढला,"तुमी बिनघोर जावा घरला काका... ...समदं माज्यावर द्या सोडूनश्यान्... ...ह्यो इस्न्या आन् म्या बगून घ्येतो ह्ये रांडंचं खालती बसल्यालं जुगाड कसं उटवायचं त्ये..."
मग सगळी मदार 'विष्णु-पांडुरंगा' च्या जोडीवर सोंडून देत ती. काका आणि मी आमच्या गावांतल्या घरीं परत आलो, आणि थोडं फार जेंवून पहांटे दीड वाजायच्या सुमाराला झोंपलो... ...

पण कसली झोंप, अन्‌ कसलं काय... ...
पहांटे पावणे-सहा वाजायच्या सुमारासच घराच्या दरवाज्यावर धंपाधंप् थापा पडायला लागल्या,"काका... ...आवो काका... ...उटा !!"
ती. काकांनी अर्धवट झोंपेतच उठून दार उघडलं... ...पांठोंपाठ मी पण अंगाभोंवती घोंगडं लपेटून बाहेर गेलो... ...
दरवाज्यात बाळू गुळव्या धांपा टाकत उभा होता... ...,"काका...चला बिगि बिगी गुराळावर... ...इस्नु काकांनी बलिवलंया तुमास्नी..."
काका,"कां रे बाळ्या......काय झालंय्?...आसं धांपा कां टाकाया लागलाय्‌स लोहाराच्या भात्यागत... ...ऑं?"
बाळू,"इटोबा नं इंजान चालूं क्येलं काका... ...गाळाप बी चालूं झालंया बगा...म्हून इस्नू काकांनी हाकाललं मला तुमास्नी बंलवाया...चला बिगि बिगि गुराळाकडं... ..."
काका बाळ्या च्या तोंडाकडं आं वांसून बघतच बसले... ...आणि बाळा गुळव्या नं पांठ वळवून गुर्‍हाळाकडं धूम ठोंकली... ... ...
मग आम्ही दोघांनी पण पटापट आंवरा आवर करून कसाबसा घोंटभर चहा करून घेतला, आणि बाळा गुळव्या पांठोंपाठ पारोसे च गुर्‍हाळाकडं पळत सुटलो... ...
फर्लांग भर अंतरावरनंच आमच्या त्या अगडबंब रस्टन च्या डीझेल इंजिनाचा 'भुक्‌...भुक्‌...भुक्‌...भुक्‌' वाला परिचित आवाज कानांवर पडला...
आतां काकांचा चेहरा सैलावला, आणि पावलं झपाझप पडायला लागली... ...
गुर्‍हाळावर पोंचलो, अन्‌ बघतो तर काय, दररोंजचा कल्ला उडालेला होता... ...
चुलाण धंडाडून पेंटलेलं होतं...
अठरा फुटी व्यासाची पत्र्याची काहिल चुलाणावर चंढलेली होती... ...
डीझेल इंजिनाचं अजस्र गतिचक्र आणि ऊंस पिळायच्या घाण्याची कप्पी, लाटा, सगळंच गरागरा फिरत होतं... ...



शे-सव्वाशे पिळलेल्या उसांची चिपाडं घाण्याच्या बाजूला पडलेली होती... ...
काहिलीत उसाचा रस खंदखंदत होता... ...
गुर्‍हाळावरच्या कामकर्‍यांची चारी दिशांत धांवाधांव सुरूं होती... ...
आणि या गदाड्याच्या केन्द्रस्थानीं मधोमध आनखशिख गुळाच्या काकवी नं माखलेले विष्णुपंत आणि इटोबा पानतंबाखू चे तोंबरे चंघळत देखरेख करीत उभे होते... ...!!!



तो तंसला चमत्कार बघून ती. काकानी च आतां आ वांसत इटोबांना हाळी दिली,"इटोबा... ...विष्णू... "
काकांना बघतांच विष्णु-विठ्ठलाची जोडगोळी समोर हजर झाली...
काकानी खूष होत इटोबां च्या हातात शंभराची कोरी करकरीत नोट कोंबली,"एकदम झ्याक् काम केलंस बघ इट्या... ...शाब्बास रे पठ्ठ्या...बहाद्दर आहेस खरा..."
इटोबा,"काका...आतां ह्यो 'शीजन' उरकंस्तंवर घान्याकडं बगायचं कामच उरल्यालं न्हाई... ...
ह्यो हांगाम सपला रं सपला, की मंग कोल्लापुरास्नं गावडे म्येस्तरी ला आना धंरूनश्यान्‌ काय आसंल त्ये काम कराया......काय?"
काका,"आरे पण केलंस काय तूं घाणा चालूं करायला?... ...आणि ही काकवी नं अंघोळ कशी काय झाली तुम्हां दोघांना?"
इटोबा मग गुर्‍हाळाबाहेर जाऊन तोंडातला पान-तंबाखू चा तोंबरा थुंकून आले,"चला काका घान्यापाशी म्हंजी दावतो... ..."

घाण्याजंवळ जाऊन बघितलं, तर डीझेल इंजिना चं गतिचक्र [फ्लाय व्हील], घाण्याची कप्पी [पुली], आणि त्या दोन्हीवर चंढवलेला पट्टा, सगळंच गुळाच्या महाचिकट काकवी च्या राळेनं लडबडलेलं होतं... ...
आतां इटोबां नी तोंड उघडलं,"तेचं काय झालंतं काका... ...की तुमी आन् इस्नू रातच्याला जे काय म्हाद्या चांबाराला बंलवून पट्टा कातरून घट करायचा इच्च्यार चालिवलावतासां न्हवं? त्येची काय बी गरज न्हवती... ...इंजानाचा पट्टा ढिला झाल्याला न्हवताच... ..."
काका,"म्हणजे काय इटोबा?"
इटोबा,"आवं पट्टा ढिला झाला आस्ता, तर त्येला मदूमद झोळ आला आस्ता कां न्हाय काका?... ...पट्ट्याला झोळ कुटं आलाता?"
काका,"मग काय झालंवतं इटोबा? घाण्याचं चाक कां फिरत नव्हतं मग?"
आतां निरूपण विष्णुपंतांनी पुरं केलं,"काका...पट्टा घट च हुता... ...झाल्तं आसं की इंजान आन् घान्याची चाकं पट्टा घांसून घांसून श्यान् पार गुळगुळीत झाल्ती... ...भादरलेल्या रेड्यागत... ...म्हून चाकं फिरत हुती, पर पट्टा फिरं ना झाल्ता बगा..."
काका," बरं मग?"
विष्णु,"आवो झालं आसं, की तुमी घरला ग्येल्यावर मंग पट्ट्याला खालच्या आंगाला काय झालंया काय त्ये बगाया चार गड्यानी पट्ट्याला आयदानं लावलीती इंजानाच्या चाकावरनं पट्टा कटवून काडाया, तर बेन्यांचा घाम निगाला, पर पट्टा काय हालायचं नावच घीना... ...जाम घोरपडीगत डंसून बसल्याला हुता इंजानाच्या चाकाला..."
काका,"ते कसं काय?"
विष्णु,"आवो रातच्याला ह्या बाळ्या गुळव्यानं काकवी च्या राळंची बारडी न्हवती काय पलटी केल्याली इंजानाच्या चाकाच्या बोडक्यावर... ...त्येच्या पायी पट्टा बसलावता डंसून जागच्या जागंला... ..."
काका,"मग कसा काय पट्टा खोलला तुम्ही?"
विष्णु,"आवं मंग ह्या इट्याच्या आडव्या डोंस्क्यात आयडिया ब्येंबाळली बगा... ...त्येनं दोन गड्यांना बारड्या घिऊनश्यान हाकाललं, त्येनीं भाईरच्या डबर्‍यात काल रातीं वतल्याली गुळाच्या खाईतली काकवीची समदी राळ भंरून मागारी आनली आन् वतली समद्या पट्ट्यावर... ...इंजानाच्या चाकापास्नं पार घान्याच्या चाकापत्तोर...आन्‌ मंग तासभर च्या-पान-तंबाकू साटी आर्‍या क्येला बगा... ..."
काका,"मग पुढं काय झालं?"
विष्णु,"आवो तासाभरापत्तोर सुकल्याल्या काकवीच्या राळं नं पट्टा आस्ला काय जाम चिक्काटलाय म्हन्ताय्‌सां चाकांस्नी... ...
गड्यांनी निस्तं इंजानाचं चाक फिरिवल्या फिरिवल्या घाना लागला बगा फिराया गार गार गार गार... ...
ह्यो इट्या म्हनत व्हता न्हवं...आडव्या डोंस्क्यानं इच्च्यार करूनश्यानच कायतरी कराया लागनार म्हून?... ...त्ये समदं आसं झालं काका...
गाळाप चालूं झालं म्हना, पर पट्टा फिराया लागला, आन् आमास्नी काकवीच्या राळं नं ही आशी आंगूळ बी झाली न् काय इच्चारतायसा... ..."
इतकं सांगून ती 'विष्णु-विठ्ठला' ची जोडगोळी बेहद्द खूष झालेल्या काकांच्या तोंडाकडं प्रस्नार्थक नजरेनं बघायला लागली... ...
अन् खुद्द काकानी च त्या 'जुगाड बहाद्दर' जोडगोळीला कोंपरांपासून हात जोंडत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!
१९७६ सालीं मी द्वितीय वर्षं अभियांत्रिकी ला 'यंत्रशास्त्रा' ची ढिगानं पुस्तकं पालथी घालत होतो... ...
पण प्रत्यक्ष व्यवहारात यंत्रशास्त्र कोंळून प्यालेले ते निरक्षर 'विष्णु-विठोबा' बघून धन्य होत काका पाठोंपाठ मग मीही स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!! 



***********************************************************************************************
-- रविशंकर.
 २१ फेब्रुवारी २०२०

No comments:

Post a Comment