Search This Blog

Wednesday 19 February 2020

॥ जुगाड व्यवस्थापन - प्रास्ताविक ॥

॥ जुगाड व्यवस्थापन - प्रास्ताविक ॥



- प्रास्ताविक 

,"हे बघ ' ऍरिस्टॉटल् '... ...",
माझे आद्य गुरू श्री. टिकेकर मास्तर मला प्रेमानं जवळ बसवून घेत म्हणाले," माणसाची कल्पक बुद्धिमत्ता, त्याचं कर्तृत्त्व, आणि  प्रतिकूल परिस्थितीशी यशस्वी टक्कर घ्यायला लागणारा ताच्यातला कणखरपणा- म्हणजे 'स्वत्त्व' असं ज्याला आपण म्हणतो तें - हे गुण जर फळा-फुलायचे असतील, तर त्याच्या खांद्यावरची झोंळी सदैव अर्धी रिकामी असणंच अत्यावश्यक असतं... ...
प्रतिकूल परिस्थिती, संसाधनांची तुटपुंजी उपलब्धता,
आणि  खडतर नशीब ही एका दृष्टीनं माणसाला देवानं दिलेली वरदानंच असतात, हे कधीही विसरूं नकोस... ... ...
आतां पदवी धारण करून बाहेरच्या जगात पाय रोंवायला निघालाय्‌स... तेव्हां हे कायम लक्ष्यांत ठेंव, की मनुष्याला त्याच्या गरजा भागवणार्‍या एकूण एक गोष्टी मुबलक प्रमाणात जर आयत्याच उपलब्ध होत असतील, तर मनुष्य कश्यासाठी हातपाय हलवील?... ...त्याचा शेंवटी ' आयतोबा शिराळशेठ ' च होणार, अन्‌ प्रतिकूल परिस्थितीत तो कोलमडून पडायला मग असा कितीसा वेंळ लागणाराय्?... ...
ये आतां... ...समृद्धो भंव."
१९७४ सालच्या उन्हाळ्यांत पोंटापाण्याच्या उद्योगासाठी मुशाफिरी करायला जन्मगांव कोल्हापूर सोडून निघतांना हे जे अनमोल विचार धन मास्तरांनी माझ्या ओंजळीत भंरलं होतं, तें पुढं आयुष्यभर मला पुरलं...


[या माझ्या आद्य गुरूं चा परिचय करून घ्यायचा असेल, तर या ब्लॉगवरची 'आचार्य देवो भंव' ही कथा वांचावी.]


ही हाताशी उपलब्ध असलेल्या संसाधनांचा कल्पक वापर करून परिस्थितीवर मात करण्याची जी कला आहे, तिला आपल्या भारतात ' जुगाड व्यवस्थापन ' असं म्हणतात. आणि ज्यानीं ते आत्मसात करून पंचवलेलं असतं, अश्या माणसांचं कुठल्याही परिस्थितीत कांहीही अडत नाही, हे मी अक्षरशः शेंकडों वेळां निरनिराळ्या प्रसंगांत स्वतःच पाहिलेलं, आणि अनुभवलेलंही आहे.  
माझ्या सबंध हयातीत व्यावसायिक कारकीर्दीत, कौटुंबिक आयुष्यात, आणि माझ्या गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या भ्रमंत्यांत मला असे शेंकडों ' जुगाड बहाद्दर ' भेंटलेले आहेत... ...ज्यांची जिद्द आणि कल्पकता बघून मी स्वतःच अचंबित होत कपाळाला हात लावलेला आहे. समृद्धि कश्याशी खातात हे तत्त्वज्ञान मला माझ्या मास्तरांनी शिकवलं, पण त्याचे व्यवहारातले जिवन्त आविष्कार साकार करून दाखवणारे सदर ' जुगाड बहाद्दर ' हे एका अर्थानं माझे व्यावहारिक गुरु च होते, असं म्हणायला कांही हरकत नाही.

मराठी भाषेत ' जुगाड ' हा शब्द खेंड्यापाड्यातल्या मातीतनं रुजलेला आहे. आपला भारत देश हा शेतीप्रधान कृषीवलांचा देश. माझ्या बालपणीं मी कोल्हापूर-कर्नाटक-कोंकणपट्टीतल्या अनेकविध खेड्यापाड्यांत प्रसंगोपात राहिलेलो आहे... ...त्या 'साठी' च्या जमान्यात सर्वसामान्यपणें गोरगरीबांचं बैलगाडी हेंच प्रवासाचं हातचं साधन असायचं. शेतकर्‍यांच्या घरीं पहांटे शेताकडं प्रयाण करायला किंवा प्रवासासाठी, गाडीला बैलजोडी जुंपून इतर सामानसुमानाची जी बांधणी-जोडणी केली जाते, त्या प्रक्रियेला ' जुगाड ' असं म्हणतात. जुगाड आवरलं की मग शेतकर्‍याचा दिवस खर्‍या अर्थानं सुरूं होतो. आतां बर्‍याच वेळां या जुगाडासाठी हाताशी असलेल्या वस्तूंतल्या कांही वस्तूं ऐनवेळीं बिघडलेल्या-मोडलेल्या आढळतात, आणि मग त्याला कांही चमकदार कल्पक पर्याय वापरून शेतकर्‍याला हे ' जुगाड ' दररोज चालतं ठेंवावंच लागतं... ...आहे त्या परिस्थितीत, हाताशी असलेल्या पैश्या अडक्यांत, आणि तुटपुंज्या साधनसामुग्रीत. आणि इथंच माणसांतली कल्पकता खर्‍या अर्थानं बहरून येते, असं मला वाटतं.
हे एक प्रकारचं ' व्यवस्थापन कौशल्य ' च असतं, म्हणून त्याला व्यवहारात ' जुगाड व्यवस्थापन ' असं म्हणतात.
साहजिकच या कलेतले उस्ताद बहुतांशी पौर्वात्य अप्रगत देशांतच बघायला मिळतात... ...सधन-सुखासीन पाश्चिमात्य देशांत नव्हे.     
आपला भारत (आणि जवळचे पौर्वात्य देश ) यांचं एक मजेशीर - पण नागरिकांच्या भल्याचं - अढळ असं वैशिष्ठ्य आहे...ते म्हणजे प्रचण्ड कल्पकता, जिद्द, आणि कष्टाळूपणा.
संसाधनांची सदैव तुटपुंजी उपलब्धता असूनही, परिस्थितीला वा नशीबाला दोष देत हताश-निष्क्रिय न होतां, केवळ स्वतःच्या बिनतोड कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या जोरावर कुठल्याही कसल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारी माणसं या सगळ्याच देशांत ढिगानं बघायला मिळतात...मग तो जपान असो,चीन असो, म्यानमार असो, मलेशिया असो, आपला भारत असो, वा इतर कुठलाही पौर्वात्य देश असो.
सधन सुखासीन पाश्चिमात्य आणि कष्टकरी काटक पौर्वात्य माणसांतल्या या नजरेत भंरणार्‍या फंरकाची शेकडों जिवन्त उदाहरणं माझ्या गेल्या तीस-चाळीस वर्षांतल्या भरमंतीत मी पाहिलेली -अनुभवलेली आहेत.
म्हणूनच, रोज सकाळ-सायंकाळीं घराबाहेर पाऊल टाकण्याआधी मी जेव्हां स्नानोत्तर माझ्या मातोश्रीं समोर ( उपास्य दैवत श्री करवीर निवासिनी ), त्यांचा गायत्री जपतो, तेव्हां शेंवटी हीच प्रार्थना करतो... ...," मातोश्री, माझ्या खांद्याची झोंळी सदैव अर्धी रिकामी च राहूं द्या... ... ..."
ह्या ' जुगाड व्यवस्थापन ' कलेची मी इतकी असंख्य अविश्वसनीय उदाहरणं पाहिलेली आहेत, की ती सगळी च्या सगळी कथाबद्ध करायची म्हटली, तर उर्वरित आयुष्य तरी पुरे पडेल काय, ही च शङ्का आहे... ...!!!
तथापि पुढील तीन कथांत या ' जुगाड व्यवस्थापन ' कलेचे कांही घटित नमुने सादर करावेत असे म्हणतो... ...
तोंपर्यन्त, इथल्या इतर कथांचे मुख्य विषय वेगळे असले, तरी आपल्याला ' खाटकाचे दात ', ' मॅकेन्नाज्‌ गोल्ड', ' स्वावलंबन ', ' युरेका युरेका ', ' प्लास्टरायन ', यासारख्या इतर कथांतही बर्‍याच ठिकाणीं या ' जुगाड व्यवस्थापना ' ची जिवन्त उदाहरणं बघायला मिळतील.
फक्त वांचायचा दृष्टिकोण तेव्हढा किंचित बदलायचा... ...की झालं.
धन्यवाद. 

********************************************************************************************
-- रविशंकर.
१९ फेब्रुवारी २०२०.

No comments:

Post a Comment