Search This Blog

Thursday 28 November 2019

॥ उषःकाल होतां होतां ॥

॥ उषःकाल होतां होतां ॥

१९७६ - ७७ च्या आसपास ख्यातकीर्त दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा 'सिंहासन' नांवाचा एक अविस्मरणीय चित्रपट मी पाहिलेला होता.
सध्याच्या काळांत मतदार नांवाच्या जनतेला वार्‍यावर सोडून सत्तासुंदरी च्या प्राप्तिसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात जी कांही किळसवाणी नवटंकी चाललेली आहे, अश्या राजकारण नांवाच्या खेंळाचं यथातथ्य विदारक चित्रण सादर करणारा हा अत्युत्कृष्ठ चित्रपट म्हणावा लागेल.
या चित्रपटातल्या तमाम व्यक्तिरेखा आपल्याला जागोजागीं-गल्लोगल्लीं आजही बघायला मिळतात...
म्हणूनच हा चित्रपट अजरामर झालाय् असं मला वाटतं.
राजकारण नांवाच्या चिखलाच्या आगराचं इतकं वास्तववादी भेदक चित्रण क्वचितच कुठं बघायला मिळेल...
मी स्वतः हा चित्रपट तब्बल एकवीस वेळा पाहिलेला आहे, आणि तरीही त्याचं आकर्षण तसूंभरही कमी होत नाही... ...

या चित्रपटाचं एक जगावेगळं वैशिष्ठय  म्हणजे, वार्‍यावर गेलेल्या जनतेच्या विदारक व्यथा-वेदनांचं तितकंच मर्मभेंदी वर्णन करणारं एक गाणं त्या सबंध चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अथ पासून इति पर्यन्त  सारखं पुन्हां पुन्हां वाजत राहतं, आणि या अस्वस्थ करणार्‍या गीताचाच दृष्याविष्कार पडद्यावर प्रेक्षकांसमोर साकारत राहतो.
या गाण्यामुळं त्यावेळच्या आणीबाणी पुकारलेल्या काळांत, हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या केवळ चोवीस तासांत त्याच्या प्रदर्शनावर भारत सरकारनं बंदी घातलेली होती.
यथावकाश सर्वोच्च न्यायालयानं ती बंदी उठवली, आणि हा चित्रपट आठवड्यामागून आठवडे गावोंगांवची चित्रपटगृहं गाजवीत तुफान चालला.

अजरामर म्हणावं अश्या त्या पार्श्वगीताच्या ओंळी अश्या आहेत... ...

"उषःकाल होतां होतां काळरात्र झाली
 अरे, पुन्हां आयुष्यांच्या पेंटवा मशाली ॥

आम्ही चार किरणांचीही आंस कां धंरावी ?
नशीबांत नव्हते, त्याची वाट कां पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे, पुन्हां आयुष्यांच्या पेंटवा मशाली ॥

...............................................
...............................................

तर, हे सगळं आज पुन्हां आंठवायचं कारण म्हणजे, कांही वेळां सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यांतही अचाट म्हणावेत असे समरप्रसंग समोर उभे राहतात...
खर्‍या अर्थानं त्या माणसांच्या सत्त्वपरीक्षेची वेंळ समोर उभी ठांकलेली असते... ...
चहूंबाजूंनी संकटांमागून संकटं अंगावर कोंसळायला लागतात...बुद्धी-विवेक-शहाणपण सगळं सगळं कुंठित होऊन जातं... ...
आणि त्या माणसाचा अक्षरशः चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू होऊन बसतो... ...
पण अश्या परिस्थितीतही अजिबात न डगमगतां त्या चक्रव्यूहाचा पण सफाचट भेंद करून दाखवणारी माणसंही मी बघितलेली आहेत...
नव्हे, मी स्वतःच तसल्या थंरार नाट्यातलं एक पात्रही झालेलो होतो... ... ...
आणि काळरात्रीत वाट शोंधण्यासाठी आयुष्यांच्या मशाली कश्या पेंटवाव्या लागतात, याचाही जिवन्त अनुभव मी त्या एका रात्रीत घेंतला... ...
त्या काळरात्रीचीच ही थरार कथा... ...


' उषःकाल होतां होतां.....'
 



********************************************************************************************** 

," चारू... ...तुझी वैद्यकीय व्यावसायिक निष्ठा आणि नीतिमत्ता वादातीत आहे, हे माहीत आहे मला ...गेले बारा दिवस-रात्र मी अनुभवतेय् ती... ...तरी पण आतां 'नरो वा कुंजरो वा' व्हायला नकोय् मला... ...घरातल्या आम्हां सगळ्यांचे जीव कसे टांगणीला लागलेय्‌त ते तूंही बघतोय्‌स... ...होय ना?"
माझी ज्येष्ठ मेहुणी सौ. वृन्दा साटम, पर्डीकर रुग्णालयातले ज्येष्ठ मज्जा शल्य विशारद (न्यूरो सर्जन) श्री. चारुचन्द्र थोंपटे यांच्या नजरेला नजर भिडवत थेंट विचारती झाली.

१९९८ सालातला मे महिन्याचा दुसरा-तिसरा आठवडा होता...वेंळ होती दुपारी साडे चार ची...
स्थळ होतं पर्डीकर रुग्णालयातला अतिदक्षता विभाग... ...
आमच्या समोरच एका खाटेवर माझी धांकटी मेहुणी चि. सौ. विनिता निश्चल अवस्थेत पडलेली होती... हातापायांना कसल्या कसल्या नळ्या लावलेल्या, आणि नाकावर प्राणवायू चा मुखवटा बसवलेला...
... 

ही विनिता म्हणजे आमच्या सौ. इंदिराजीं ची सख्खी धांकटी भगिनी... ...वय वर्षे बेचाळीस फक्त.
सौ. इंदिराजी नां सख्खा भाऊ नाही... ...तिघी बहिणीच...सौ. इंदिराजी या मधल्या...
घरीं सौ. इंदिराजीं चे आई-वडील दोघेच असायचे...आई नं सत्तरी ओलांडलेली, अन्‌ बाबा ऐंशी च्या पुढच्या वयाचे... ...दोघेही थंकलेले.
भंरीला सौ. आई ना उच्च रक्तदाबाचा विकार, अन्‌ बाबां ना कांही वर्षांपूर्वीच हृदय विकाराचा झंटकाही येऊन गेलेला... ...
आमचा सगळ्यांचा ह्या विनिता वर विलक्षण जीव होता. एकतर शेण्डेफळ म्हणून, आणि स्वभावानंही ती अगदी मिठ्ठास म्हणावी, असली गोड पोर होती...
तिचे यजमान नोकरी निमित्त सौदी अरेबियात असायचे, आणि ही इकडं पुण्यात दोन मुलग्यांसोबत तिच्या घरीं असायची.
मुलंही अगदी
लहान होती... ...थोरला मुलगा आठ वर्षांचा, आणि धांकटा जेमतेम चार वर्षांचाच असेल.
एका बॅंकेत नोकरी करून आपला ऐन भरातला संसार उत्तम सांभाळत होती... ...आणि अडी-नडीला आई-बाबां ची काळजी पण व्यवस्थित घेत होती... ...
पण प्राक्तनाला हा सुखी संसार मंजूर नसावा कदाचित... ...
१९९७ च्या अखेरीस तिला जी डोंकेदुखी जडली, तिचं पर्यवसान अखेरीस मेंदूच्या ट्यूमर चं निदान होण्यात झालं...
मग जगण्याची सगळीच गणितं उलटी पालटी झाली... ...
आणि तिच्या आयुष्यात उषःकाल होतां होतां दिवस उगवण्या ऐवजी काळरात्र उगवली... ...



तिचे यजमान नोकरीचा दहा वर्षांचा करार केलेला असल्यामुळं परदेशांतच अडकून पडलेले...त्यांना मायदेशीं परतही येतां येई ना.
मोठी मेहुणी सौ. वृन्दा च्या यजमानां चा नवीनच सुरूं केलेला कारखानदारी चा व्यवसाय... ...
तिचा मुलगाही तसा तरूण वयाचाच, त्यामुळं व्यावसायिक जम बसेतोंवर तिचे यजमान पण रात्रंदिवस कारखान्यातच अडकून पडलेले... ...
त्यामुळं, सौ. विनिता ची पुढची सगळी व्यवस्था बघायची जबाबदारी मी स्वतः, सौ. इंदिराजी, आणि सौ. वृन्दा अशी आम्हां तिघांच्याच खांद्यावर पडलेली होती... ...
सौ. इंदिराजी या आमचं स्वतःचं आणि त्यांच्या माहेरचं अशी दोन्ही घरं सांभाळायच्या...
तात्पर्य, सौ.विनिता चं आजारपण निभावायची धुरा स्वतः मी, आणि थोरली मेहुणी सौ. वृन्दा आम्ही दोघांनीच उचललेली होती.
आणि आळीपाळीनं आम्ही ती पुढचे पांच सहा महिने पर्डीकर रुग्णालयात दिवसरात्र मुक्काम ठोंकून निभावत होतो... ...
सुदैव एव्हढंच होतं, की तिथले प्रमुख मज्जा शल्य विशारद डॉ. चारुचन्द्र थोपटे हे घरचेच म्हणावेत इतके जवळच्या संबंधातले असल्यामुळं, त्या बाबतीत तरी आम्हांला कांही चिन्ता नव्हती.
दुसरी एक जमेची बाजू होती...ती म्हणजे माझी ज्येष्ठ मेहुणी सौ. वृन्दा... ...माझ्यापेक्षां फक्त सहाच वर्षांनी मोठी...
पण व्यावहारिक कर्तृत्त्वाच्या कसोटीवर जोंखायचं म्हटलं, तर सौ. वृन्दा माझ्यापेक्षा वीसएक वर्षांनी तरी मोठी म्हणावी लागेल... ...
कुठल्याही परिस्थितीत वस्तुनिष्ठ विचार करून तर्कशुद्ध निर्णय घेण्याचा, आणि भाव-भावना बाजूला सारून ते कठोरपणे अंमलात आणण्याचा गुण आमच्या दोघांत अगदी एकसमान आहे.
गतजन्मीं आम्ही दोघे जुळी भावण्डं होतो की काय म्हणावं, इतक्या सहजतेनं आम्हां दोघांना एकमेकांच्या डोंक्यात-मनांत काय चाललंय् याचे अगदी अचूक अंदाज येतात.
तेव्हां प्राप्त परिस्थितीत ही आमच्या दृष्टीनं दुसरी फार मोठी जमेची बाजू होती...

यथावकाश जून महिन्याच्या पहिल्या आंठवड्यात सौ. विनिता च्या ब्रेन ट्यूमर ची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली... ...डॉ. थोपट्यानीं स्वतःच शस्त्रक्रिया केली...




नंतरचा सी. टी. स्कॅन चा अहवालही ठाकठीक आला, आणि आम्ही एकदाचा सुटलेचा सुस्कारा टांकला...
पण 'कश्यात काय आणि फांटक्यात पाय' म्हणतात ना, तसं कांहीतरी झालं...
आणि शस्त्रक्रिया होऊन तब्बल बारा दिवस होत आले, तरी सौ. विनिता कांही केल्या भूल उतरून शुद्धीवर येईच ना...!!!
डॉ. थोपट्यांनी त्यांचं सगळं कौशल्य पणाला लावलं, पण सौ. विनिता निश्चल ती निश्चलच... ...
आश्चर्य असं, की दररोजच्या तमाम सगळ्या चांचण्यांचे अहवाल अगदी ठाकठीक यायचे... ... कुठंही वावगं कांही आढळत नव्हतं...
आणि तरी सौ. विनिता खाटेवर निश्चल अवस्थेतच पडलेली... ...
पुढं काय करायचं ते कुणालाच कांही कळे ना, आणि मग त्या दिवशीं सगळीच परिस्थिती निकरावर आली... ...
हे असं
किती दिवस चालणार...?
अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही तिघे म्हणजे मी स्वतः, सौ. वृन्दा, आणि डॉ. थोपटे असे तिघेच त्या अतिदक्षता विभागातल्या दालनात बोलत होतो   

डॉ. थोपटे,"खरंय्‌ तुझं वृन्दा... ..."
सौ. वृन्दा,"आतांपावेतों सगळ्या भाव-भावनांच्या पलीकडं गेलेय् मी चारू... ...कळलं? तेव्हां तुझी व्यावसायिक गुप्ततेेची शपथ बिपथ बाजूला ठेंवून माझ्या एका प्रश्नाचं सरळसोट उत्तर हवंय् मला... ...देशील?"
डॉ. थोपटे,"बोल वृन्दा... ...काय हंवंय् तुला?...काय हवं ते विचार...देतो उत्तर."
सौ.वृन्दा,"हे बघ चारू...तुझ्या शल्यकौशल्याबद्दल आम्हांला कसलीच शंका नाही... ...आणि विनिता चे दररोजचे वैद्यकीय अहवाल पण ठाकठीक येताय्‌त... ...बरोबर?"
डॉ. थोपटे,"बरोबर आहे तुझं म्हणणं वृन्दा...आणि शस्त्रकिया अगदी एकशे दहा टक्के यशस्वी झालेली आहे याची मी च तुला खात्री देतो... ..."
सौ. वृन्दा,"अरे मग ती एखाद्या...फार फार तर दोन दिवसात तरी शुद्धीवर यायला हवी की नको सांग मला?... ...हे...हे असं किती दिवस चालणार?"
डॉ. थोपट्यांनी आतां चक्क आकाशाकडं हात केले... ...म्हणाले,"खरं सांगूं वृन्दा तुला?... ...गॉड् इज् ग्रेट... ...बस्स...

इतकं सगळं ठाकठीक असूनही ही अजून शुद्धीवर कशी काय येत नाही, हा प्रश्न मला पण छळायला लागलाय्... ...पण त्याचं ठाम उत्तर माझ्याजवळही नाही... 
परमेश्वरावर भंरवसा ठेंवून ती शुद्धीवर यायची फक्त वाट बघणं एव्हढंच आपल्या हातात आहे... ..."
सौ. वृन्दा आणि मी दोघेही कपाळांना हात लावून डॉ. थोपट्यांच्याकडं बघायला लागलो... ...आणि सुन्न बधिर होत बघतच बसलो... ...
डॉ. थोपटे,"हे बघ वृन्दा...या क्षणीं तरी मी इतकंच ठामपणे सांगूं शकतो... ...पण...प्राप्त परिस्थितीत तुला दुसर्‍या एखाद्या मज्जा तज्ञाचं मत जाणून घ्यायचं असेल तर... ...
सौ. वृन्दा नं डॉक्टरांना मध्येच तोंडलं,"तुझा हात धंरूं शकेल, असा दुसरा कुणी तज्ञ असेल तुला माहीत, तर तूं च बोलाव की त्याला... ...अं?...मी कश्याला पाहिजे त्यासाठी?"
डॉ. थोपटे,"हे बघ वृन्दा... ...तुझा माझ्यावर असलेला ठाम विश्वास ठाऊक आहे मला...तरी पण परिस्थितीच अशी उपटलीय्‌ की मला म्हणणं भाग पडतंय्‌ की माझ्यावर देखील आंधळा विश्वास ठेंवू नकोस... ... 

दुसर्‍या कुणा तज्ञाचं मत तुला जाणून घ्यायचं असेल, तर माझी कांही हरकत नाही, एव्हढंच म्हणायचंय्‌ मला..."
सौ.वृन्दा आतां डॉ. थोपट्यांच्यावरच तंडकली," हे बघ चारू... ...तूं स्वतःच पांचपन्नास वेळां पुनःपुन्हां तपासण्या करून काय खातरजमा करून घ्यायची असेल, ती खुशाल घे करून... ...पण मी तुझ्या  हातांत एकदां सोपवलेली केस बघायला दुसर्‍या कुठल्याच डॉक्टरला बोलावणार नाही... समजलं ?"
डॉ. थोपटे,"वृन्दा... ...जरा समजून घे मी काय सांगतोय् ते... ..."
सौ. वृन्दा,"हे बघ चारू... ...विनिता च्या जे काय नशिबात असेल ते तुझ्या ताब्यातच होईल... ... दुसर्‍या कुणालाच मी बोलावणार नाही... ...अजिबात नाही..."
आतां मात्र डॉ. थोपट्यांनी सौ. वृन्दापुढं हात टेंकले, आणि त्यांनी परिचारिकेला 'पेशंटला ताबडतोब सी. टी. स्कॅन मशीनवर घ्या' म्हणून सांगितलं, आणि सौ. वृन्दाला म्हणाले," हे बघ वृन्दा...ही केस या क्षणीं तरी जगावेगळी ठंरलेली आहे...आतां मी सुद्धां एक माणूसच आहे...तेव्हां परत एकदां स्कॅन करून खात्री घेऊं या, की शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी झालेली आहे काय याची... ...हे माझ्या   समाधानासाठी असं समज हवं तर... ...ठीकाय्‌ ना?... ...तुम्ही दोघेही चला माझ्याबरोबर, म्हणजे प्रत्यक्ष मशीनवरच दाखवतो..."
पुढं अर्धा तास डॉ. थोपटे आम्हांला संपूर्ण मेंदू चा सी.टी. स्कॅन मशीनवर दाखवत समजावून सांगत होते... ...



ट्यूमर काढलेल्या जागेवर झालेली पोकळी पण आम्हांला स्वच्छपणे बघायला मिळाली... ...
मग मशीन बन्द करून पांढरा कोट उतरवून ठेंवत ते शेंवटी म्हणाले,"आपल्या हातांत होतं ते सगळं करून झालंय्‌ वृन्दा... ...

आतां आपण व्यवहारी भाषेत म्हणतो ना, तसं 'हरि वर हवाला' ठेंवून फक्त वाट बघायची... ...दुसरं कांहीही आपल्या हातीं उरलेलं नाही..."
अखेर त्या विधात्यालाच सौ. विनितासकट आमची सगळ्यांची दया आली असावी ...
शस्त्रक्रिया झाल्याच्या तब्बल चौदाव्या दिवशी सौ. विनिता नं शुद्धीवर येत डोंळे उघडले, आणि डॉ. थोपट्यांच्यासकट आम्हां सगळ्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला.
डॉ. थोपटे तसे हाडाचे खेळाडू...
चौपाईवर उठून उठून बसलेल्या सौ. विनिताच्या पाठीवर धंपाधंपा थोंपटत म्हणाले,"उठा मॅडम आतां... ...धन्य आहांत..."
सौ. विनिता नं क्षीण आवाजांत विचारलं,"म्हणजे काका?... ...काय झालं?"
आणि डॉ. थोपटे खोः खोः हंसत म्हणाले," काय झालं?... ...माझी वैद्यकी ची पदवी आणि अनुभव डब्यात घालून मलाच सुळीं चंढवायला निघाला होता तुम्ही...!!... ...काय?

हरकत नाही...कांही हरकत नाही... ...पण खेळातला हा सेट पण मी च खिश्यात घातलाय्... ...समजलं?"
सौ. विनिता फक्त क्षीणसं हंसली, आणि पुन्हां डोंळे मिटून चौपाईवर आडवी झाली... ...
पुढं तीन-चार दिवसांतच सौ. विनिता ची तब्येत झंपाट्यानं सुधारली, आणि डॉ. थोपट्यांनी तिला डिस्चार्ज पण दिला... ...
रुग्णालयातनं तिला सौ. वृन्दा थेट स्वतःच्याच घरीं घेऊन गेली... ...

पुढच्या दोन-तीन महिन्यात सौ.विनिता ची तब्येतही आश्चर्यकारक रीत्या झंपाट्यानं सुधारली. ती जवळपास थोडीफार हिंडायला-फिरायलाही लागली...
आणि घरातल्या सगळ्यांनी अखेरीस सुटकेचा निःश्वास टांकला.
ऑगस्ट महिन्याच्या शेंवटच्या आंठवड्यात तर तिनं बॅंकेलाही कळवून टाकलं, की पुढच्या एक तारखेपासून ती पुन्हां नोकरीवर रुजूं होते आहे म्हणून... ...
तथापि सांप्रतच्या उषःकालाच्या पांठोपाठ उगवायला घातलेल्या पुढच्या काळरात्रीची मात्र आम्हां कुणालाच सुतराम कल्पना नव्हती...

विनिताला  नोकरीवर पुनश्च रुजूं व्हायला केवळ तीन दिवस उरलेले होते...
मी व सौ. इंदिराजी नेहमीप्रमाणं तिची वास्तपुस्त करायला सौ. वृन्दाच्या घरीं गेलेलो होतो... ...
आमच्या बाहेरच्या बैठकीत गप्पाटप्पा चाललेल्या होत्या.
रात्रीचे दहा वाजत आले, आणि आमच्या सासूबाई नी सगळ्यांना जेवायला बसायची हांक दिली,"वृन्दा... ...अगं ऐकलंस काय? ताटं वाढून घे सगळ्यांची,आणि जेवायला बसून घ्या बघूं सगळे... ...दहा वाजायला आलेय्‌त...मी विनिताचं ताट वाढून आलेच."
आम्ही सगळेच बैठक सोडून जेवायला उठलो...
सहज म्हणून सौ. विनिता चं ताट घेऊन तिच्या खोलीकडे निघालेल्या सासूबाईंच्या पाठोंपाठ मी तिच्या खोंलीत शिरलो... ...
सासूबाई नी हांक मारतांच सौ.विनिता ताट हातांत घ्यायला म्हणून चौपाईवरून उठून जी उभी राहिली, ती अखेरचीच...

काय झालं कांही कळलंच नाही... ...
एखादा पाऊस पाडणारा ढग वार्‍यानं सरकत जातांना, पावसाची जमिनीवर पडलेली रेघ जशी सरसरत पुढं पुढं सरकत जाते, अगदी तश्शी उभ्या-उभ्याच सौ. विनिताच्या अंगातली रक्ताची लाली डोंक्यापासून थेट पावलांपर्यन्त खाली खाली सरकत क्षणार्धांत नाहिशी झाली, आणि ती मागच्या मागं चौपाईवर धाड्‌दिशी कोंसळून पडली... ...!!!
झालं... ...सासूबाई नी हुंदके देत डोंळ्यांना पदर लावून तिथंच बसकण मारली...
आवाज ऐकून मग सौ. वृन्दा-इंदिराजी पण हातांतली भांडी-कुंडी टांकून धांवल्या... ...
मी घड्याळांत पाहिलं... ...रात्रीचे सव्वादहा होत आलेले होते... ...
सौ.वृन्दानं,"रवि...ताबडतोब 
रुग्णवाहिकेच्या व्यवस्थेला लाग..." असं ओंरडून तात्काळ डॉ. थोपट्यांचा फोन लावला, नी त्यांना काय झालं ते सांगून,'तूं ताबडतोब रुग्णालयाकडं धांव...आम्ही विनिताला घेंऊन   पंधरा मिनिटांत तिथं पोंचतोय्‌' म्हणून निरोपही दिला... ...
पांचएक मिनिटांत रुग्णवाहिका दारात दाखल झाली...
मी अन्‌ सौ.वृन्दा नं विनिता ला तशीच स्ट्रेचर वर घालून पटापट रुग्णवाहिकेत सरकवली ... ...
सौ. वृन्दा कपाटातल्या तिजोरीतली हाताला लागली तितकी रोकड पर्स मध्ये कोंबत चटकन् विनिताच्या शेंजारी जाऊन बसली... ...
आणि ती कांही बोलायच्या आधी मी च तिला म्हणालो,"वृन्दा...मी परत डॉ. थोपट्यांना फोन करून सगळ्या तयारीनिशी रुग्णालयाच्या फाटकातच थांबायला सांगितलंय्‌... ...तेव्हां तूं सरळ तिकडंच गाडी वळव...मी पांठोपाठ मोटर सायकलवर आलोच ... ...हाताशी स्वतःचं वाहन असलेलं बरं अश्या वेंळीं... ..."

,"अगदी माझ्या मनांतलंच बोललास बघ... ...चल निघते मी... ...तूं ये पाठोंपाठ...", असं म्हणत सौ.वृन्दा सौ. इंदिराजींकडं वळली," हे बघ सुमे... ...कसलीही चिंता करूं नकोस आमची...काय होईल ते बघून घ्यायला मी आणि रवि बस्स आहोत... ... आम्ही घरीं परत येईतोंवर आई-बाबां ना सांभाळ, आणि घर सोडून कुठंही बाहेर जाऊं नकोस... कळलं?"
सौ. इंदिराजी,"ठीकाय् आक्का... ...काळजी घे, आणि फोन कर काय झालं ते सांगायला..." असं उत्तर देऊन
सौ. इंदिराजी सासूबाई नां हाताला धंरून घरांत घेऊन गेल्या, आणि त्यांनी पाठीमागं दरवाजा बंद करून घेंतला...

ऑगस्ट महिन्यातल्या त्या भयाण ओंलसर रात्रीं मी बुलेट् ला एक सणसणीत लाथ घातली, आणि वेगवर्धक पिरगाळून वार्‍याच्या वेगानं पर्डीकर रुग्णालयाच्या फाटकाकडं गाडी दामटली... ...
योगायोगानं शंकरशेठ रस्ता ते शिवाजी नगर मधलं आठ कि. मी. चं अंतर कापेंतोंवर मधल्या दहा बारा वाहतूक सिग्नल वर प्रत्येक ठिकाणी मला मिनिटभर थांबावं लागलं...
जणूं कांही दैवानं पण आमच्याशी असहकार पुकारलेला असावा...मी घड्याळ बघितलं... ...रात्रीचे अकरा वाजलेले होते.


रुग्णालयाच्या फाटकावरच कळलं की पेशंट ला अतिदक्षता विभागात तांतडीच्या उपचारांसाठी हलवलेलं आहे म्हणून...
तिथं पोंचेतोंवर रात्रीचे सव्वा अकरा वाजत आलेले होते...
शस्त्रक्रिया दालनाच्या दरवाज्यावरचा लाल दिवा लागलेला होता... ...
क्षणाक्षणाला त्या दरवाज्यातनं विविध उपकरणं-साहित्य घेंऊन परिचारिका-सहाय्यकांची आंत बाहेर धांवपळ चाललेली होती... ...
आणि दरवाज्या समोरच्या एका खुर्चीत सौ. वृन्दा बधिर अवस्थेत बसलेली होती... ... ...
मी तिच्या शेंजारच्या खुर्चीत बसलो, आणि सौ. वृन्दा नं उलट्या बाजूला तोंड फिरवलं...
मी मूकपणेच खिश्यातला रुमाल काढून तिच्या हातात कोंबला,"वृन्दा... ...ए वृन्दा..."
डोंळे टिपून सौ. वृन्दा म्हणाली,"आतां ठीकाय् रवि...कधी कधी हे आंवरतच नाही बघ... ...काय करणार?"
मी तिचा हात धंरून थोंपटत नुस्तीच मान डोंलवली.
तेंव्हढ्यात स्वतः डॉ. थोपटे च त्यांचा कोट झंटकत बाहेर आले...
आम्हांला बघून किंचितसे दंचकलेच... ...पण शांतपणे सामोरे येत म्हणाले,"आय ऍम सॉरी वृन्दा... ...विनिता इज नो मोअर नाऊ... ..."
माझी नजर नकळत मनगटावरच्या घड्याळाकडं गेली...
बरोबर रात्रीचे बारा वाजून पांच मिनिटं झालेली होती... ...
त्या भयाण काळरात्रीची नुकतीच सुरुवात झालेली होती... ... ...





आतां तर माझ्याच डोंळ्यात पाणी तंरळायला लागलं...तसा माझा हात पकडत सौ. वृन्दा म्हणाली,"नेमकं काय झालं चारू?"
डॉ. थोपट्यांनी आतां हताशपणे दुसर्‍यांदा हात आकाशाकडं केले,"कदाचित परमेश्वराला आपलं हे यश मंजूर नसावं वृन्दा... ...तूं रुग्णालयाच्या फाटकावर विनिताला जेव्हां घेऊन आलीस, तेव्हांच तिची हृदयक्रिया बन्द पडलेली होती... ...!!
गेला अर्धा तास आम्ही तिला पुनश्च जीवदान द्यायचे सगळे प्रयत्न केले... ...पण सगळं सगळं वाया गेलं वृन्दा...आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी... ..."
सौ. वृन्दा,"अरे मग त्यात तुझा काय दोष?... ... तिच्याच प्राक्तनात अधिक आयुष्य नव्हतं, त्याला तूं तरी काय करशील?... ...मग आतां पुढं काय?"
डॉ.थोपटे,"काय उरलंय् पुढं आतां?... ...पुढचं सगळं पार पाडणं...मृत्यू चा दाखला मी स्वतःच तुला ताबडतोब तयार करून देतो...

बाकी सगळे सोपस्कार तांतडीनं निपटून शव तुझ्या ताब्यात द्यायच्या सूचना पण मी सगळ्या कर्मचर्‍यांना देऊन ठेंवलेल्या आहेत...या असे माझ्या बरोबर..."
डॉ. थोपट्यांनी पुढं दहा-पंधरा मिनिटांतच विनिताच्या मृत्यूचा दाखला सह्या शिक्के ठोंकून सौ. वृन्दाच्या स्वाधीन केला... ..."





तो हातात घेतांना सौ. वृन्दाचे हात थंरथंरले...पण क्षणभरच...
दुसर्‍या क्षणीं तो कागद पर्समध्ये ठेंवत तिनं विचारलं,"चारू... ..."
डॉ. थोपटे,"काय गं?"
सौ. वृन्दा,"हे बघ चारू... ...आतां वाजतहेत रात्रीचे सव्वा बारा ... ...विनिताच्या यजमानांना-रोहन ला
- हे कळवल्यावर, तो सौदी वरून तत्क्षणीं जरी धांवत सुटला, तरी तो पुण्यापर्यन्त पोंचेस्तंवर कमीतकमी   अठरा ते चोवीस तास तरी उलटतील...आणि रोहन इथं आल्याशिवाय पुढचं कांहीच करतां येणार नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हां सकाळपर्यंत तरी विनिताला इथं ठेंवूं शकतो काय आपण? ते शक्य  असेल, तर पुढचं सगळं कसं काय करायचं, त्याचा विचार करायला तरी वेळ मिळेल आम्हांला...आणि सकाळी मी आणि रवि परत इथं येतो शव ताब्यात घ्यायला... ...चालेल?"
आतां मात्र डॉ. थोपट्यांचाही चेहरा चिंताग्रस्त झाला," हे बघ वृन्दा... ...पेशंट कोमात जरी असता, तरी तूं म्हणते आहेस ते शक्य झालं असतं... ...

पण दगावलेल्या पेशंटला रुग्णालय असं ठेंवून घ्यायला तयार होईल काय, ते मलाही नाही सांगतां येणार... ...आम्ही शल्यतज्ञ केवळ आमच्या कामांपुरतेच रुग्णालयाशी संबंधित असतो... ...बाकी त्यांच्या कारभारात आम्हांलाही कसली ढवळाढवळ करतां येत नाही... ...रुग्णालयाचे डीन माझ्या माहितीतले आहेत...तरी त्यांच्याशी आत्तां अश्या आडवेळीं कसा काय संपर्क करणार आपण?
सकाळी म्हटलीस तर शब्द टांकून बघतां येईल, काय म्हणताय्‌त ते..."
सौ. वृन्दा,"तात्पर्य, ही वेळ आपली आपल्यालाच निभावून न्यावी लागणार... ...असंच ना?"
डॉ. थोपटे,"असं करूं या वृन्दा... ...तूं एकटी बाईमाणूस, आणि ही अशी आडमुठी वेंळ...तेव्हां हवं तर मी स्वतःच थांबतो तुझ्याबरोबर काय ती व्यवस्था होईपर्यन्त..."
सौ. वृन्दातली अस्सल राणी लक्ष्मीबाई आतां जागी झाली,"चारू...हे बघ... ...रक्ताच्या नात्याची माणसंही करणार नाहीत, इतकं तूं आमच्यासाठी केलंय्‌स...मी समजूं शकते तुझी अडचणीतली अवस्था .

तेव्हां मनांत कसलाही किंतु न धरतां तूं घरीं जा आतां... ...मी बघते पुढं कसं काय करायचं ते..."
डॉ. थोपटे,"अगं पण तूं एकटीच...इतक्या अपरात्रीं काय करशील?... ...मी थांबतो तुझ्यासोबत..."
सौ. वृन्दा,"सोबत थांबून करणार काय तूं?... ...उद्या सकाळच्या शस्त्रक्रियांचा धबडगा तुला थोडाच टाळतां येणाराय्‌?... ...

आणि रवि आहे की माझ्या सोबतीला... ...कांही अपराधी वगैरे वाटून घेऊं नकोस अजिबात... ...नीघ तूं आतां...उद्यां फोन करून तुला कळवीन मी काय काय झालं ते."
डॉ.थोपटे मग,"तरी काळजी घे बरं वृन्दा...कांही मदत लागली, तर तत्क्षणीं फोन कर मला..." असं वृन्दाला पुन्हां पुन्हां बजावून त्यांच्या घरीं रवाना झाले... ...
आणि अतिदक्षता विभागातल्या त्या दालनात आम्ही तिघेच मागे उरलो... ...
मी, सौ. वृन्दा, आणि निष्प्राण झालेलं सौ. विनिताचं कलेवर...
एव्हांना रात्रीचे साडे बारा वाजलेले होते... ...




दोन-पांच मिनिटं आपापली डोंकीं खाण्यांत शांततेतच गेली, आणि मग मी सौ. वृन्दाकडं प्रश्नार्थक नजरेनं बघितलं...
सौ. वृन्दा भानावर येत त्या कलेवरा शेजारीच चौपाईवर बसत म्हणाली,"रवि...ताबडतोब रात्रपाळीच्या व्यवस्थापकाला गांठ, आणि देयकाची अंदाजे रक्कम किती झालीय्‌ त्याची खात्री करून परत ये...मी इथंच   विनिताजवळ थांबते."
मी तात्काळ
व्यवस्थापकाच्या कक्षाकडं धांव घेतली... ...
त्यांनी देयकं हाताळणार्‍या लिपिकाला कागदपत्रांसह बोलावून घेतलं, आणि मला सांगितलं ,"अंदाजे अडतीस हजारांचं देयक होईल... ...हजारभर कमी-ज्यास्त धंरून चाला...देयक अदा केलंत, की लगेचच मृताचा ताबा मात्र घ्यावा लागेल तुम्हांला... ...

कारण अतिदक्षता विभागात अखण्ड चोवीस तास रुग्ण दाखल होत असल्यामुळं तिथली जागा फार वेळ अडकवून ठेंवतां येत नाही आम्हांला...माफ करा."
इतकं स्वच्छपणे त्यांनी सांगितल्यावर मग पुढं,'सकाळी देयक अदा करून देह ताब्यात घेतला तर चालेल काय्?' असं विचारायला तोंड उघडायचीही कांही सोय उरलेली नव्हती... ...
मी ताबडतोब अतिदक्षता विभागांत परतलो, अन्‌ सौ. वृन्दाला काय झालं ते सांगितलं... ...
तोंपावेतों तिनं विनिताच्या सगळ्या सामानाची बांधाबांध करून प्रस्थानाची तयारीही केलेली होती...!!!
सौ. वृंदा शांतपणे मला म्हणाली,"हे बघ रवि...आतां सगळंच संपलंय्‌... ...तेव्हां उगीच हळवं होऊन आततायीपणानं कांही करायला जाण्यात कांही अर्थ नाही...बरोबर?"

मी,"अगदी बरोबर आहे तुझं वृन्दा... ...वास्तवाकडं बघूनच काय करायचं ते ठंरवायला हवं...भावजी नां फोन करून बोलावून घ्यायचं काय?"
सौ. वृन्दा,"नको रवि... ...असल्या बाबतीत त्यांचा कांहीही उपयोग नाही... ...हळवे आहेत ते...तेव्हां हे आतां तुला- मलाच पार पाडावं लागणाराय्..."
मी,"ठीकाय्‌ वृन्दा... ...काय करायचं पुढं?... ...बोल ."
सौ. वृन्दानं तिची पर्स उघडून तीत ठेंवलेली रोकड माझ्या हवाली केली,"आपल्याला ताबडतोबीनं आधी देयक चुकतं करून विनिताचा देह ताब्यात घेण्यावांचून दुसरा कांही पर्याय उरलेला नाही....

तेव्हां आधी ही रक्कम मोजून बघ, की देयक भागवायला ती पुरेल काय ते..."
मी रक्कम मोजली...तीस हजार आणि वर कांही थोडे पैसे होते.
मी,"तीस हजार आहेत वृन्दा...अजून दहाएक हजारांची तरी व्यवस्था करावी लागेल देयक भागवायला... ..."
सौ. वृन्दा,"आणि इथनं बाहेर पडल्यावर जर ऐनवेळीं अजून पैसे लागले, तर काय करायचं मग? तेव्हां देयक भागवून शिवाय अजून दहाएक हजार तरी जवळ असायला हवेत...तात्पर्य, आणखी वीसएक  हजारांची तरी अतिरिक्त रक्कम आपल्याला तांतडीनं उभी करावी लागेल... ...बरोबर?"
मी,"खरंय्‌ तुझं वृन्दा... ..."
सौ.वृन्दा,"आतां कुणीतरी एकानं इथं थांबायचं, आणि दुसर्‍यानं पैसे गोळा करून आणायला सुटायचं... ...

आतां घरांतनं निघतांना घाईघाईत जितकी रोकड हाताला लागली, तितकी न मोजतांच मी पर्समध्ये कोंबली...अजून फार फारतर हजार-दोन हजार असतीलही तिजोरीत...पण तेव्हढ्यानं काय होणार?
आणि सकाळ उगवल्याशिवाय बॅंकांचाही कांही उपयोग नाही... ...मला एक सांग...सुमी च्या तिजोरीत किती रोकड असेल या वेळी?"
मी,"मी घरातलं कांहीच बघत नाही वृन्दा...सगळं सुमीताच बघते. त्यामुळं घरीं नक्की किती रोकड निघेल ते मला नाही सांगतां येणार... ...एक मिनिट थांब...सुमीताला च फोन करून विचारून घेतो."
इतकं बोलून मी रुग्णालयातल्या सार्वजनिक दूरध्वनिकडं जायला उठलो, तसं सौ. वृन्दा नं बखोट पकडून मला पुन्हां खुर्चीत बसवलं,"कांही नको सुमी ला फोन करायला... ...घोटाळा होईल सगळा."
मी गांगरलोच,"अगं सुमीता ला फोन करण्यांत अडचण ती कसली काय आहे?"
सौ. वृन्दा शांतपणे म्हणाली,"हे बघ रवि...ही फोनाफोनी, अन्‌ पैश्यांच्या व्यवस्थेच्या धांवपळीचा आई ला नुस्ता संशय जरी आला, तरी तिचा रक्तदाब वर उसळायला मिनिटभरही लागणार नाही...

आणि दुर्दैवानं जर तसं झालं ना, तर हे समोरचं तडीला लावणं राहील बाजूलाच...सुमीला च आई ला रिक्षात घालून दुसरं रुग्णालय गांठावं लागेल... ... कळलं आता? तेव्हां आपलं आपल्याला गुपचुप     कांहीतरी करायला हवं..."
मी,"मग काय करायचं म्हणतेस तूं?... ...मी घरीं जाऊन असेल तेव्हढी रोकड गोळा करून परत येतो हवा तर...पण घराची चावी सुमीताकडंच आहे, तेव्हां आधी तुझ्या घरीं जाऊन ती मला हस्तगत करावी  लागेल... ...काय करायचं?"
सौ. वृंदाचाही चेहरा आतां चिंताग्रस्त व्हायला लागला,"नशीब पण कसं खत्रुड आहे बघ रवि... ...आतां समज,
की कांहीतरी होऊन रोकड हाताशी आली, तरी प्रश्न कुठं सुटताय्‌त सगळे?"
मी चक्रावलोच,"म्हणजे वृन्दा?...मी समजलो नाही तुला काय म्हणायचंय्‌ ते... ..."
सौ. वृन्दा,"असं बघ...की इथलं देणं चुकतं करून आपण विनिताला जरी ताब्यात घेतली, तरी तिला घेऊन जाणार कुठं आपण? एक तर रोहन सौदी अरेबियाहून निघून इथं येऊन थंडकल्याशिवाय पुढचं कांहीच होऊं शकत नाही... ...कमीत कमी पुढचे चोवीस तास तरी... ...बरोबर?"
मी,"खरंय्‌ ते... ...मग?"
सौ. वृन्दा,"आतां रात्रीचा एक वाजायला आलाय्‌... ...तात्पर्य, विनिताचं निधन झाल्याला आतांपावेतों तीनचार तास उलटत आलेले आहेत...तेव्हां इथून बाहेर पडल्यावर रोहन येईस्तंवर कलेवराची व्यवस्था  आपल्याला कुठल्या तरी शीत
शवागारात लावून मगच घरीं जातां येईल...तोपर्यंत नाही... ...!!! "
आतां माझाही रक्तदाब वाढायला लागला... ...  
सौ. वृन्दा,"आतां आपण इथं बसलोय्‌ शिवाजी नगरला...आणि माझ्या माहितीनुसार शीत शवागारं पुण्यात फक्त तीनच इस्पितळांत आहेत... ...पहिलं सरकारी रुग्णालय...ते राहिलं स्टेशन जवळ, म्हणजे सहा किलोमीटरवर...दुसरं नायर रुग्णालय...ते राहिलं कसबा पेठेनजीक...इथनं आठ किलोमीटरवर, आणि तिसरं कर्वे रस्त्यावरचं तेजस्विनी रुग्णालय... ...तेही इथनं पांचसहा किलोमीटरवर... ...माझं घर शंकरशेठ रस्त्याला...म्हणजे दहा किलोमीटर अंतर...तुमचं कर्वे रस्त्याला...तेही इथनं सात किलोमीटरवर... ... असली ही बारा ज्योतिर्लिंगांची कर्मकठीण यात्रा होऊन बसलीय्... ...
मी सुन्न-बधिर होत कपाळाला हात लावून ऐकत राहिलो... ...
सौ. वृन्दा मग विनिताच्या कलेवराकडं निर्देश करीत म्हणाली,"आणि आतांपावेतो ह्या देहाचं जैविक विघटन व्हायची प्रक्रिया सुरूं होऊन सुद्धां तासभर उलटला असेल... ...!!

तात्पर्य, ही सगळी व्यवस्था लावायला आपल्या हातांत फक्त कांही तासांचाच अवधी आहे... ...फार फार तर दोन-चार तासच...बस्स... ...
आतां आलं लक्ष्यांत सगळं तुझ्या...काय होऊन बसलंय्‌ ते?"

माझं काळीज आतां मात्र लटपटायला लागलं... ...पण सौ. वृन्दा शांतच होती... ...
मी मग कपाळावर हात मारून घेत विचारता झालो," आणि ह्या...ह्या असल्या परिस्थितीच्या कंचाट्यात सापडलोय्‌ आपण... ...

हे सगळं कसं काय जमणार गं वृन्दा दोनचार तासांच्या अवधीत?... आणि नाहीच कांही मार्ग सापडला, ... ... तर काय मग?"
सौ. वृन्दा,"दुर्दैवानं जर तसाच दावा साधला, तर मग विनिताची उत्तरक्रिया आपल्याला ताबडतोब पार पाडावी लागेल... ...मग रोहन वेळेत नाही येऊं शकला, तरी बेहत्तर... ..."
माझं काळीज आतां गोठलंच,"अगं मग आयुष्यभर ह्याचा ठपका आपल्या कपाळीं वागवत बसायचं?"
सौ. वृन्दा शांतपणे उत्तरली,"ह्याच शृंगापत्तीत सापडलोय्‌ आपण रवि... ...पण मला सांग...दुसरं करूं तरी काय शकतोय्‌ आपण प्राप्त परिस्थितीत? आपला सद्‌सद्विवेक तरी शाबूत आहे ना भक्कम?...हातीं होतं त्यात
लं कांहीही करायचं शिल्लक ठेंवलं नाही आपण...हे समाधान तर नक्कीच आहे ना? मग कोण काय म्हणेल याचा विचार कश्याला करत बसायचं?... ...ती ही वेळ नव्हे रवि...ही वेळ आहे कुरुक्षेत्रावरची ही लढाई सफाचट्‌ मारायची... ... विचार विनिमय सगळं नंतर... ...!!! समजलं सगळं नीट?"
मी कपाळाला हात लावून आं वांसत सौ. वृन्दा च्या तोंडाकडं बघतच बसलो... ...
माझ्या आज्जी व्यतिरिक्त, असल्या परिस्थितीतही इतका वस्तुनिष्ठ विचार करूं शकणारी दुसरी खंमकी बाई मी प्रथमच बघत होतो...!!!
सौ. वृन्दा,"आतां हेही तुझ्या लक्ष्यांत आलं असेल, की अजून वीसएक हजार तरी हाताशी लागतील, असं मी कां म्हणत होते ते... ..."
मी,"धन्य आहेस तूं वृन्दा... ...हे माझ्या ध्यानातच आलेलं नव्हतं बघ..."
सौ. वृन्दा,"अरे, वास्तव विसरून कधी असल्या लढाया सफाचट् मारतां येतात काय सांग मला?... ...आतां एक करूं या...चल माझ्याबरोबर..."
मी,"आणि इथं कोण थांबणार...विनिता जवळ?"
सौ. वृन्दा,"कुणी जवळ थांबायची गरज पडायच्या पलीकडं ती केव्हांच गेलीय्‌... ...आतां हातपाय गाळून थोडंच निभावणाराय्‌?... ...चल तूं माझ्याबरोबर... ...

ही कोंडी तर फोंडायला हवी ना कांहीही करून?...की रात्रभर असे इथंच बसून राहणार आहोत आपण... ...डोंकीं पिकवत?"
मी सौ. वृन्दाच्या बरोबर मुकाट्यानं चालायला लागलो, आणि दोनचार मिनिटांत तिथल्या देयक कक्षांत पोंचलो...
तिथं रात्रपाळीचा लिपिक अर्धवट पेंगत बसलेला होता...त्याला हलवून मी जागा केला... ...
मग सगळं देयक तयार केलं... ...
एकूण सदतीस हजार आठशे साठ रुपये  इतका भरणा करावा लागणार होता... ...
माझ्या घश्याला आतां कोरड पडायला लागली... ...
पण सौ. वृन्दा ची परिस्थितीवरची पोलादी पकड अजूनही तशीच भक्कम होती...
तिनं त्या लिपिकाला सगळी परिस्थिती तपशीलवार समजावून सांगितली, आणि ' ताबडतोब दहा हजार भरून देह ताब्यात घेतो, आणि उर्वरित रक्कम सकाळी बारा वाजेपर्यन्त भंरतो ' असं सांगितलं...
पण तो
बिचारा पडला नोकर माणूस... हुकुमाचा ताबेदार... ...,"सॉरी मॅडम... ...मला अंशतः देयकाची रक्कम घेऊन तुम्हांला मोकळं करतां येणार नाही... ...संपूर्ण रक्कम भंरल्यावरच तुमच्या ताब्यात देह दिला जाईल... ...रुग्णालयाच्या कायद्यानं मी बांधलेला आहे...माफ करा..."
अन्‌ कांही कळायच्या आतच सौ. वृन्दा नं स्वतःच्या अंगाखांद्यांवरचे तमाम सुवर्णालंकार उतरवून त्या लिपिकाच्या पुढ्यात ठेंवले,"हे बघ बाबा... ...तुला दोष देत नाही मी...

उद्यां सकाळी म्हणालास, तर पांच लाखांचं देयक सुद्धां चुकतं करायची ताकद आहे माझी...पण या क्षणीं तरी माझ्याजवळ ही एव्हढीच रोकड आहे... ... तेव्हां हे दागिने बाकी देय रकमेसाठी तारण म्हणून ठेंवून घे, आणि मोकळं कर आम्हांला...उद्यां सकाळीच बाकी सगळी रक्कम रोंखीनं भंरून मी परत घेऊन जाईन हे दागिने... ... एव्हढा विश्वास आमच्यावर ठेंवायला कांही हरकत नसावी तुला... ... काय?"
लेखनिक तसा भला माणूस होता... ...पण त्यालाही वाटेल ते करायचे अमर्याद अधिकार नव्हते...
त्यानं नम्रपणे सगळे दागदागिने गोळा करून सौ. वृंदाच्या हातात दिले,"माफ करा मॅडम... ...पण हे दागिने असे तारण म्हणून नाही ठेंवून घेतां येणार मला... सकाळ उजाडायच्या आंतच नोकरी गायब होईल माझी... ...
तुमची परिस्थिती समजूं शकतो मी...आणि माणुसकी जपून तुम्हांला या बाबतीत कसलीही मदत करायला मी असमर्थ आहे, याचं वाईटही वाटतंय्‌ मला... ...
आतां तुम्हीच सांगा...माझ्या जागीं तुम्ही स्वतःच असतां, तर काय केलं असतं तुम्ही तरी?"
आतां सौ. वृन्दाची पण सहनशक्ति संपली,"ठीकाय्... ...आपले तीर्थरूप कुठे असतात?"
लेखनिक बांवचळला,"म्हणजे मॅडम?... ...मी जळगांवचा आहे... ..."
सौ. वृन्दा,"घरचे नव्हेत... ...तुमचे इथले तीर्थरूप कुठं असतात ते विचारतेय्‌ मी
!!!... ...इथले निवासी  व्यवस्थापक."
लेखनिकानं आपल्या कपाळाला हात लावत त्या 'तीर्थरूपां' ना फोन लावून समक्ष यायची विनंति केली... ...
निवासी व्यवस्थापक तसेच झोंपेतनं उठून खाली आले, आणि त्यांच्या समोर पुनश्च सगळी उजळणी झाली... ...
परिस्थिती अडचणीची आहे यात त्यांनाही कांही शंका नव्हती... ...
पण ते ही  म्हणाले,"मॅडम... ...तुमची अवस्था सम
तेय्‌ मला... ...आणि हे असं झालं याचं तुमच्या इतकंच मलाही दुःख होतंय्‌... ...
पण अश्या परिस्थीतही हे दागिने तारण म्हणून ठेंवून घेतां येणार नाहीत आम्हांला...कृपा करून गैरसमज करून घेऊं नकां...आमच्याबद्दल, आणि रुग्णालयाबद्दल पण...
रुग्णालयाला गतकाळांत आलेल्या अत्यंत वाईट अनुभवातनं बोध घेऊन आतां हे असे माणुसकी विसरायला लावणारे कडक नियम तयार झालेले आहेत.
याला ना तुम्ही जबाबदार आहांत... ...ना आम्ही... सध्याच्या कलियुगाची देणगी आहे ही... ... काय करायचं?... ...तुम्हीच सांगा..."
सौ. वृन्दा,"म्हणजे रोखीन देयक चुकतं करून शव ताब्यांत घेणं, हा एकच मार्ग उरलाय् असं म्हणताय् काय तुम्ही?"
 
व्यवस्थापक,"होय मॅडम... ...तोच एकमेव मार्ग उरलेला आहे... ..."
सौ. वृन्दा,"मग शव राहूं द्या इथंच... ...सकाळी बारा वाजायच्या आंत मी स्वतःच येऊन सगळं पार पाडते... ...चालेल?"

व्यवस्थापक,"तिथंही अनिवार्य अडचण आहे मॅडम... ... "
सौ. वृन्दा,"कसली अडचण आलीय्‌ त्यात?... ...मला समजतच नाही तुमचा
हा आडमुठेपणा..."
आतां
व्यवस्थापकांनी सौ. वृन्दाला चक्क हात जोडले," मॅडम... जरा ऐकून घ्या माझं... ...इथं रुग्णालयाच्या अतिदक्षता दालनातल्या सर्व खाटा या क्षणीं भंरलेल्या आहेत... ..."
सौ. वृन्दा," बरं... ...मग?"
 
व्यवस्थापक,"आतां आमच्याकडं शीत-शवागाराची जर सोय असती, तर तिथं आपल्या बहिणीसाठी माझ्या अखत्यारीत मी तात्पुरती विनामूल्य जागाही उपलब्ध करून दिली असती, आणि तुम्हांला होईल तितकी मदतही केली असती... ...पण दुर्दैवानं तशी कांही व्यवस्थाही नाही इथं आमच्या रुग्णालयात... ...काय करायचं?"
सौ. वृन्दा,"मग आम्ही असल्या परिस्थीत काय करायचं ते तरी सांगा... ..."

व्यवस्थापक,"आतां असं बघा, की तुम्ही इथनं घरीं गेलात, आणि दुसर्‍या क्षणीं भोंगा वाजवत एखादी रुग्णवाहिका कुणा अत्यवस्थ रुग्णाला घेंऊन जर दारांत उभी राहिली, तर तुम्हांला दिलेली खाट मोकळी नाही,   म्हणून मृत्यू च्या दारांत उभ्या असलेल्या त्या रुग्णाला प्रवेश नाकारूं शकतोय्‌ आम्ही?...तुम्हीच सांगा... ...अमानुषपणा होईल ना तो?"
आतां मात्र आम्ही दोघेही सफाचट् निरुत्तर झालो... ...डोक्यांचा भुगा व्हायचाच काय तो शिल्लक राहिलेला होता... ...
शेंवटी
व्यवस्थापक च म्हणाले,"मॅडम... ...या लिपिकाला मी घरीं न सोडतां तुम्ही परत येईतोंवर इथंच थांबवून ठेंवतो...तुमची कसलीही अडचण होऊं नये म्हणून...
तुम्ही आलांत की तुमचं सगळं काम पुरं करून मगच घरीं जाईल हा... ...तेव्हढं सहकार्य आम्ही नक्की देऊं तुम्हांला...पण प्राप्त परिस्थितीत हे एव्हढंच करणं शक्य आहे आम्हांला...तेव्हां कृपया गैरसमज   नसावेत..."
सौ. वृन्दा,"ठीक आहे सर... ...समजतंय्‌ मला सगळं... ...आम्ही बघतो काय करायचं ते."
 
व्यवस्थापक मग लिपिकाला जरूर त्या सूचना देऊन निघून गेले... ...
आणि आम्ही पुनश्च विनिताच्या खाटेजवळ येऊन सुन्नपणे बसलो... ...

एव्हांना पहाटेचा दीड वाजत आलेला होता... ...



घाम यायला लागला, म्हणून तो पुसायला रुमाल काढण्यासाठी मी पाटलोणीच्या पाठीमागच्या खिश्यात हात घातला न घातला... ...
आणि किंचाळलोच,"वृन्दा...तूं थांब इथंच... ...मी अर्ध्या तासात पैश्याची सगळी व्यवस्था करून परत येतो... ...हा गेलो अन्‌ हा आलो"
असं म्हणून मी निघायला उठलोच...
सौ. वृन्दा नं माझी बखोटी धंरून मला खाली बसवलं,"इतकं उत्तेजित व्हायला काय झालंय्‌ काय तुला रवि?...आणि इतके पैसे कुठून पैदा करणाराय्‌स अश्या अपरात्री?... ...ऑं?"
मी दुखायला लागलेली बखोटी सोंडवून घेत उत्तरलो,"असली चर्चा करायची ही वेळ आहे काय वृन्दा?... ...हे दिव्य एकदांचं पार पडलं, की मग चर्चा करायला हवा तितका वेळ पडलाय्‌ की नंतर... ...रक्कम किती लागेल तेव्हढं बोल फक्त... ..."
सौ. वृन्दा बखोटी ज्यास्तच कसून धंरत म्हणाली,"हे बघ रवि... ...कितीही निकराची वेळ येऊन ठेपलेली असली, तरी कसलाही अविचार करून पैसा उभा करायचा नाही, एव्हढंच लक्ष्यांत ठेंव... ..."
मी मग खिश्यातलं हाताला लागलेलं माझ्या बॅंकेचं क्रेडिट् कार्ड तिला दाखवलं,"वृन्दा... ...प्रत्येक कृष्णमेघाला कुठंतरी तेजस्वी प्रकाशाची किनार असतेच असते...
मातोश्री (करवीर निवासिनी श्री. महालक्ष्मी) नी आजपावेतों भल्या भल्या प्रसंगातनं सफाचट् तारून नेलंय्‌ मला...काय?
आतां सगळी चिन्ता सोडून फक्त आंवरा आंवरीच्या मागं लाग तूं ... ...आणि पैसे किती लागतील तेव्हढंच, कसलीही काटकसर डोंक्यात न धंरतां बोल फक्त... ..."
सौ. वृन्दा,"पंधराएक हजार बस्स होतील रवि... ...उगीच भरमसाठ उधारी करूं नकोस... ..."
"ठीकाय्‌ वृन्दा... ...अर्ध्या तासात आलोच मी", असं सांगून मी रुग्णालयाच्या वाहनतळावर धांव घेत बुलेट् च्या जीन वर मांड घातली... ...

पहांटेचे दोन वाजत आलेले होते... ...थंडगार बोंचरी हवा... ...अंगात गरम कपडा कांही नाही...आणि बॅंकेचं ए. टी. एम. केन्द्र आठ कि. मी. अंतरावर बंड गार्डन परिसरात...
मी कसलाही विचार न करतां गाडी सुसाट दामटली...
जरा पुढं संगम पुलापर्यंत आलो, तर पु
ढं  एक छोटा ट्रक दिसला, आणि तसल्या थंडीतही मला घाम फुटायला लागला... ...
समोरचा ट्रक म्हणजे ज्या ए. टी. एम. कडं मी निघालो होतो, त्या माझ्याच बॅंकेची ए. टी. एम. यंत्रांत रोकड भंरणारी गाडी नेमक्या त्याच केन्द्राच्या दिशेनं निघालेली होती... ...!!
आतां फुकट तासाभराचा खोळंबा... ...कर्म माझं...!!
कसलाही विचार करायच्या आंत वेगवर्धकावरची माझी मूठ नकळत पिरगाळली गेली...
डाव्या हाताचा अंगठा हॉर्न च्या बटणावर दाबला गेला... ...
आणि ताशी ११० कि. मी. वेगानं माझी बुलेट् त्या रोकड गाडी ला मागं टाकून
पिसाटासारखी सुसाट पुढं गेली...!!
सुदैवानं ए. टी. एम. केन्द्र रिकामंच होतं... ...
रोकड गाडी मागं हजर व्हायच्या आंतच, मी क्षणार्धात केन्द्राचा दरवाजा लाथ घालून धाड्‌दिशी उघडला, आणि दुसर्‍या क्षणीं यंत्राच्या फटीत कार्ड सरकवलं... ...
पाथोंपाठ कर्कश्श्य हॉर्न वाजवीत रोकड गाडी हजर झालीच...पण ए. टी. एम. केन्द्रात यंत्रासमोर मी उभा असल्यानं गाडीतल्या कर्मचार्‍यांना हात चोंळत बाहेरच थांबावं लागलं.
मातोश्रीं चा वरदहस्त डोंक्यावर असावा कदाचित... पण पहिल्याच फटक्यात वीस हजारांची रक्कम धंडधंडत यंत्रातनं बाहेर पडली... ...
आणि ती खिश्यात कोंबून बाहेर थांबलेल्या कर्मचार्‍यांच्या त्रासिक नजरांकडं दुर्लक्ष करीत मी पुन्हां बुलेट वर मांड घालून सुसाट माघारी पर्डीकर रुग्णालयात परत आलो... ...
दारांत एक शववाहिनी उभी होती, आणि स्वागत कक्षांतच सौ वृंदा माझी वाट बघत उभी होती... ...
खिश्यातली सगळी रक्कम मी तिच्या स्वाधीन केली,"वीस हजार मिळाले वृन्दा... ...असूं देत...ऐन वेळी कुठं पंचाईत व्हायला नको, म्हणून पांच हजार ज्यास्त
काढून आणलेत..."




पुढं देयक अदा करायचे सगळे सोपस्कार पांच दहा मिनिटांतच पार पडले... ...भरणा-पावती आणि देयक सौ. वृन्दानं तपासून ताब्यात घेतलं, आणि आम्ही रुग्णालयाबाहेर थांबलेल्या शववाहिनीजवळ आलो...
मी,"आतां पुढं कुठं जायचं वृन्दा?"
सौ. वृन्दा,"असं करूं या रवि... ...सुमी एकटीच घरीं आहे...आतांपावेतों आई नं तिला नाना शंकाकुशंका विचारून भंडावून सोडलं असेल...
मी,"बरं... ...मग?"
सौ. वृन्दा,"तर आतां तूं थेट घरी जा, आणि सुमी ला आई च्या तावडीतनं मोकळी कर... ...काय?"
मी,"आणि तुझं काय?"
सौ. वृन्दा शववाहिनी कडं निर्देश करत म्हणाली,"मी आतां ' ह्या ' ची  मिळेल त्या शीत शवागारात व्यवस्था लावायला जाते, आणि काम झालं, की येते परत घरीं..."
मी आं वांसून सौ. वृन्दा कडं बघतच बसलो... ...माझा माझ्याच कानांवर विश्वास बसे ना...
मग भानावर येत तिचे दोन्ही खांदे धंरून तिला ग
दांगदां हलवली,"वृन्दा... ...अगं काय झालंय्‌ काय तुला... ...? ... तूं काय बोलतीय्‌स ते तुझं तुला तरी समजतंय्‌ काय?... ...ऑं? ... इतक्या अपरात्री सख्ख्या बहिणीचं कलेवर सोबत घेऊन ह्या शववाहिनीतनं शीत-शवागारं धुंडाळत फिरणाराय्‌स तूं?... ...
डोकं बिकं फिरलंय्‌ की काय तुझं?"
सौ. वृन्दा च्या पोलादी चेहर्‍यावरची रेषासुद्धां विचलित झाली नाही,"हे बघ रवि... ..."
मी तिचं बोलणं मध्येच तोडलं,"हे बघ वृन्दा... ...ह्या असल्या अपरात्रीं हे सगळं निस्तरायला मी तुला एकटीला मुळीच सोडणार नाही... ...समजलं?

एकतर आपण दोघेही बरोबरच राहूं काम पार पडेतोंवर , नी बरोबरच घरी जाऊं या... ...
नसेल, तर या क्षणीं तूं घरचा रस्ता धंर... ...' ह्या ' ची काय व्यवस्था लावायची ती मी स्वतःच लावून मग घरीं परत येतो... ...
पण कुठल्याही परिस्थितीत असला अविचार करायला मी तुला अजिबात एकटी सोडणार नाही... ...!!! ...आतां तूं खुशाल काय समजायचं ते समज."
सौ. वृन्दाच्या नजरेत एक क्षणभरच ओंलावा तंरळला ... ...
दुसर्‍या क्षणीं माझे खांदे पकडलेले दोन्ही हात हातांत घेऊन थोंपटत म्हणाली,"हे बघ रवि...हे असंच निभावण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाहीय्‌ मला... ...

ही शीत-शवागाराची व्यवस्था नीट लागेपर्यंत, सौ. विनिता गेलीय् हे सत्य आई ला कळून अजिबात परवडणार नाही आपल्याला... आई चं डोकं कसं सुतावरनं स्वर्ग गाठणारं आहे, हे ठाऊक आहे तुला... ...होय ना?
आणि आम्हां पोंटच्या मुलींपेक्षांही आई तुझ्याच शब्दावर पुरता विश्वास ठेंवणार... ...सगळ्यांना माहीत आहे ते... आतां मला सांग, की हे सगळं तुझ्यावर सोंपवून इथनंच जर मी घरीं गेले, तर तूं घरीं पोंचेपर्यंत मी कितीही कोंकलून सांगितलं की 'विनिताची अवस्था ठीक आहे' म्हणून, तरी आई विश्वास ठेवेल माझ्या सांगण्यावर? आणि नाना कुशंकांचं वादळ डोंक्यात घोंघावून तिचा रक्तदाब जर वर उसळला, तर काय करायचं मग?... ...कसा सोडवायचा तो सगळा तिढा... ...अं?
'भीक नको पण कुत्रं आंवर' म्हणायची आफत ओंढवेल आपल्यावर... ...समजलं?
आणि माझी काळजी तरी किती करशील?... ...हा चक्रव्यूह भेंदून यातनं बाहेर तर पडायला हवं ना आपल्याला?
तेव्हां कसलाही प्रतिवाद न करतां सरळ घरीं जा तूं... ... आई नं कांही विचारलं, तर खुशाल ठोंकून दे 'विनितावर उपचार सुरूं आहेत, म्हणून वृन्दा थांबलीय् रुग्णालयात' म्हणून...आणि 'परिस्थिती निवळली, की वृन्दा पाठोपाठ घरी येतेय्‌' असंही खुशाल सांगून टाक आई ला... ...
मलाही वेदना होताय्‌त हे असं सांगतांना, पण याव्यतिरिक्त या चक्रव्यूहातनं बाहेर पडण्याचा दुसरा कांही इलाज-उपाय दिसत नाही मला...तेव्हां वेळ न दंवडतां तूं नीघ लगेच... ...
आणि माझी चिन्ता तुझ्या मातोश्रींवर सोडून दे खुशाल... ...पैश्यांचा तिढा तर त्यांनीच सोंडवलाय्‌ ना?... ...सगळं ठीक होईल...चिंता करूं नकोस मुळीच.
आत्तां पहांटेचे तीन वाजताय्‌त... ...मी सगळी व्यवस्था लावून सकाळी सात वाजेपर्यंत घरीं येते परत... ...
आणि हो... ...मी घरी पोंचेस्तंवर विनिता गेलेली आहे, हे कुणालाच...अगदी ह्यां ना सुद्धां कळतां कामा नये... ... ...सगळं समजलं नीट?...ठीकाय्‌... ... नीघ आतां तूं."
इतकं समजावून सौ.वृन्दा मागं वळून देखील न बघतां शववाहिनीतल्या क्लीनर च्या आसनावर जाऊन बसली, आणि क्षणार्धात स्टार्टर मारून गाडी भुर्रदिशी निघूनही गेली... ...
आणि पहांटे तीन वाजताच्या त्या भयाण वेळेला सुनसान रस्त्यात मी एकटाच मागं राहिलो... ...


मग डोंक्यातली सगळी जळमटं झंटकून बुलेट् शंकरशेठ रस्त्याकडं वळवून पहांटे साडेतीन वाजतां मी
सौ. वृन्दाच्या घरीं पोंचलो... ...
घरीं सगळे जागतच बसलेले होते...
मी घरांत येतांच सोफ्यावर बसलेल्या सासूबाई नी डंबडंबलेल्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं... ...
आणि सद्सद्विवेकावर धोंडा घालून मी वृन्दा च्या सूचनां तंतोतंत अंमलात आणून मोकळा झालो...
त्या साध्वी नं देवघरातलं निरांजन तेल घालून उजळवलं, आणि त्या तिथंच पाटावर बसून राहिल्या...
ते सगळं उघड्या डोंळ्यानीं बघत 'नरो वा कुंजरो वा' म्हणतांना सत्यभाषणी धर्मराजाची काय कुतरओढ झाली असेल, ते त्या क्षणीं मला लख्खपणे समजलं... ... ...
सौ. इंदिराजी ना पण मी झोंपायला जायला सांगितलं, आणि घराचा दरवाजा बंद करून घेऊन बाहेर पायर्‍यावरच सौ. वृन्दाची वाट बघत बसलो...............

डोळा कधी लागला ते मला कळलंच नाही. जाग आली तेव्हां सौ. वृन्दा च मला हंलवून जागं करत होती... ...
घड्याळात बघितलं तर सकाळचे साडेसहा वाजलेले होते... ...
मी बोलायला तोंड उघडणार तोंच सौ. वृन्दा नं ओंठावर बों
ठेंवून मला गप्प रहायचा इशारा केला आणि हंळूच,"चल माझ्या बरोबर" म्हणाली.
घरांत अजून तरी सगळी सामसूम दिसत होती... ...
वृन्दाचे डोंळे रात्रभर जागून तारवटलेले... ...केसही अस्ताव्यस्त... ...माझीही अवस्था कांही फारशी वेगळी नव्हती...
तश्याच अवतारात आम्ही चालत
चालत कोपर्‍यावरच्या उडप्याच्या हॉटेलात जाऊन स्थानापन्न झालो... ...आणि फक्त चहा मागवला...
भुकेचं काय झालेलं होतं, ते त्या परमेश्वरालाच माहीत... ...
चहा घेतां घेतां मी तोंड उघडलं,"झाली सगळी व्यवस्था वृन्दा?"
सौ. वृन्दा,"झाली बाबा एकदाची... ...सांगते सगळं...पण आधी एक नीट लक्ष्यात ठेंव..."
मी,"काय ते?"
सौ. वृन्दा," हे बघ...आतां घरीं जाऊन अंघोळी-बिंघोळी उरकून घेऊं या प्रथम...ठीकाय् ?"
मी,"तूं म्हणशील तसं वृन्दा... ..."
सौ. वृन्दा,"मग आई-बाबां चा नाष्टा पार पडेंतोंवर कांही वाच्यता करायची नाही... ...कळलं ?

कारण काय झालंय्‌ ते एकदां कां बाहेर पडलं, की त्यांच्या पोंटांत अन्न-पाणी कधी जाईल, कांही भंरवसा वाटत नाही मला... ...काय् ?"
मी,"ठीकाय्... ..."
सौ. वृन्दा,"आतां तुझी शेवटची एकच जबाबदारी... ..."
मी,"कसली जबाबदारी ?"
सौ. वृन्दा,"सांगते... ...अंघोळी-नाष्टा उरकला सगळ्यांचा, की मग तूं घरातनं आठ वाजतां बाहेर पडायचं... ...' दवाखान्यात जाऊन येतो ' म्हणून... आणि..."
मी,"आणि काय?"
सौ. वृन्दा,"आणि बाहेरनं कुठूनही बरोबर ९ वाजतां घरीं फोन करायचा...आणि कुणीही फोन उचलला, तरी मलाच फोनवर बोलावून घ्यायचं... ..."
मी,"आणि फोनवर काय बोलायचं गं वृन्दा?"
सौ. वृन्दा," कांहीही थातुर मातुर बोल...कांही फरक पडत नाही...फोन खाली ठेंवला, की मगच मी घरीं  सगळ्यांना सांगेन खरं काय झालंय् ते... ... सगळं समजलं नीट?"
मी,"होय...समजलं सगळं... ...कांही काळजी करूं नकोस...सगळं बरोबर होईल... ...

आतां मला सांग... ..."
सौ. वृन्दा,"सांगते सगळं रामायण काय काय झालं ते... ...
तर तुला तिथं सोडून प्रथम आम्ही नायर रुग्णालय गांठलं...त्यातल्या त्यात तेंच सगळ्यात जवळ होतं म्हणून..."
मी,"अगदी बरोबर केलंस..."
सौ. वृन्दा," तर नायर रुग्णालयातलं शीत शवागार पूर्ण भंरलेलं... ...तोंवर पावणेचार वाजत आलेले होते ..."
मी," मग काय केलंस तूं? "
सौ. वृन्दा,"काय करणार दुसरं?...शववाहिनी तशीच कर्वे रस्त्याकडं वळवली, आणि तेजस्विनी रुग्णालय गांठून तिथल्या कर्मचार्‍यांना हांका मारल्या... ...

तरी दार उघडेना... ...मग दरवाज्यावर चक्क लाथा मारून त्यांना जागं केलं... ..."
मी,"बापरे बाप... ..."
सौ. वृन्दा,"मग करणार काय दुसरं?...असल्या वेळीं टक टक करून दरवाजे उघडेना झाले, तर ते लाथा घालूनही उघडावे लागतात बाबा... ...

तर तिथला शीत-शवागार सांभाळणारा कर्मचारी वातानुकूलन यंत्रणा तपासायला कुठंतरी गेलेला होता... ...तो उगवेतोंवर वाजले साडेचार... ..."
मी,"अरे बापरे... ...मग?"
सौ. वृन्दा,"ऐक तर खरं... ...तर तेजस्विनीतही नकारघंटाच वाजली... ...शवागारातल्या सगळ्या जागा भंरलेल्या..."





मी,"मग पुढं?"
मी,"तरी मी एक उपाय म्हणून थोडाफार तमाशा करून रुग्णालयाच्या व्यवस्थापकांना तिथं यायला भाग पाडलं... ...त्यांना सगळी कूळकथा सांगितली...

आणि कसंही करून विनिताचा देह दोन दिवस तरी ठेंवायची सोय करा म्हणून गळ घातली ..."
मी,"मग काय झालं पुढं?"
सौ. वृन्दा,"तर व्यवस्थापकही म्हणाले की ' मी समजूं शकतोय्‌ तुमची अडचण मॅडम... ...पण खरोखरीच सगळ्या जागा भंरलेल्या आहेत... ... नाईलाज आहे आमचा... ... हवं तर तुम्ही स्वतःच याच्याबरोबर शवागारात जाऊन खात्री करून घ्या... ..."
मी आतां कपाळाला हात लावला,"आणि गेलीस तूं तिथं शवागारांत खात्री करून घ्यायला?"
सौ. वृन्दा," काय करणार मग ?... ... ... गेले...!!!"
मी,"खरंच...धन्य आहे वृन्दा तुझी... ... ...आणि कांटा नाही आला तुझ्या अंगावर तिथं आंत गेल्यावर ?"
सौ. वृन्दा,"अरे कसला कांटा न्‌ बिटा घेऊन बसलाय्‌स रवि... ...आख्खी रात्रभर गाडीत सख्ख्या बहिणीचं कलेवर घेऊन फिरतांना जितके काय कांटे आले अंगावर... त्यात त्या काट्यानं अजून कसली काय भर पडणार होती सांग मला?...तर तिथल्याही सगळ्या जागा खरोखरीच भंरलेल्या होत्या... ..."
मी,"खरंच वृन्दा... ...तूं एकटी जायला नको होतीस अशी...मी सोबत असायला हवा होतो... ..."
सौ. वृन्दा,"जाऊं दे आतां ते...इतिहासजमा झालंय् सगळं... ...आणि तूं घरी होतास ते च बरं झालं म्हणायचं... ...मी एकटी पटापट निर्णय घ्यायला मोकळी तरी होते..."
मी,"अगं मग पुढं केलंस
काय तूं?"
सौ. वृन्दा,"ऐक तर... ...तोंपावेतों वाजलेले होते पावणे पांच...मग शववाहिनीच्या चालकाच्याही अंगात यायला लागलं... ...
मी,"म्हणजे काय?"
सौ. वृन्दा,"तो म्हणायला लागला, की त्याला ठंरलेल्या ठिकाणी शव पोंचतं करून लगेच गाडी रुग्णालयाकडं परत न्यावी लागते... ...' असं लोंबकळत थांबतां येणार नाही ' म्हणायला लागला... "
मी आतां आं च वासला,"मग त्याची वासलात कशी काय लावलीस ?"
सौ. वृन्दा,"तो म्हणाला की गाडी परतायला तासाभरापेक्षा ज्यास्त उशीर झाला, तर त्याचा मालक त्याला दोनशे रुपयांचा दंड लावतो म्हणून... ..."
मी,"मग काय गं ?"

सौ. वृन्दा,"मग काय... ...त्याच्या हातावर पांचशे ची नोट वाजवली, आणि बजावून सांगितलं की ' मी सोडेंतोंवर तुला गाडी कुठंही नेतां येणार नाही' म्हणून... ... त्याला काय?... ...राहिला बसून गाडीतच."
मी,"आणि तीच शववाहिनी तूं टॅक्सीसारखी वापरलीस ?"
सौ. वृन्दा,"मग करणार काय दुसरं तसल्या परिस्थितीत ?"
मी,"धन्य आहे तुझी वृन्दा... ...बरं... पुढं काय केलंस मग?"
सौ. वृन्दा,"काय करणार?... ...मग गाडी स्टेशनच्या दिशेत फिरवून थेंट सरकारी सर्वोपचार रुग्णालय गांठलं... ...

आतां तीच एक शेंवटची आशा होती..."
आतां माझ्या जिवाचे कान झाले,"तिथं काय झालं मग?"
सौ. वृन्दा,"तिथं पोंचेतोंवर सव्वा पांच वाजत आलेले होते, आणि शवागारातल्या कर्मचार्‍यांची पाळी बदलायची वेंळ भंरत आलेली होती... ...

मग तिथल्या प्रमुखांच्या कानांवर परत ' पुनश्च हरि ॐ ' करत सगळी कर्मकथा घातली, तर त्यांनीही सांगितलं की शीत शवागारात एकही जागा मोकळी नाही म्हणून... ...
मग मात्र मला घेरी यायचीच काय ती शिल्लक राहिली बघ... ..."
मी,"बाऽऽऽपरेऽऽऽऽऽऽ... ...मग काय केलंस गं वृन्दा? "
सौ. वृन्दा,"तिथं मला अचानक लक्ष्यांत आलं की, सरकारी रुग्णालयातल्या शीत शवागारांत रस्त्यावर सापडलेली बेवारस प्रेतं पण ठेंवलेली असतात... ... वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी     वापरायला..."
मी,"धन्य आहेस तूं... ...मग पुढं?"
सौ. वृन्दा,"मग काय... ...महाविद्यालयाच्या डीनना च थेंट घरीं फोन लावला मग... ...कुणीतरी बाई आहेत सध्या त्या जागीं...

इथं मात्र तुझ्या मातोश्री च पावल्या बघ... ... त्या बाई ना सगळी समस्या बरोबर समजली... ...
आणि त्यांनीच मग हस्तक्षेप करून एक बेवारस शव विच्छेदनासाठी महाविद्यालयात पांठवायला सांगितलं, आणि त्या मोकळ्या केलेल्या जागीं अखेर विनिताच्या देहाची सोय लागली... ...
त्या
लाही मलाच हातभार लावावा लागला, ते वेगळंच ... ..."
मी,"म्हणजे........................???"
सौ. वृन्दा,"अरे शवागारात देह जतन करायला फंवारलेल्या औषधाचा कसला ऊग्र भंपकारा येतो... ...ठाऊक आहे तुला ?...पोंटातलं सगळं
अन्न ढंवळून येतं वर... ...
म्हणून तर तिथं प्रेतं हाताळणारे कर्मचारी बहुतांशी दारू ढोंसूनच काम करीत असतात... ...सगळ्यांना ठाऊक असतं ते... ...पण नाईलाज असतो...तर त्या वेळीं तिथं एकच कर्मचारी हजर होता... ...तो म्हणाला की सकाळच्या पाळीतला
दुसरा माणूस तासाभरात मदतीला येईल, तोंवर थांबा म्हणून... ..."
मी,"मऽऽऽऽऽऽऽऽऽऽग?"
सौ. वृन्दा,"मग काय करणार?... ...त्याच्या हातावर दारू ढोंसायला शंभराची नोट टिकवली, आणि सांगितलं की,' बाबा रे...आतां हे सगळंच माझ्या सहनशक्तीच्या पलीकडं गेलंय्‌... ...

इथं आतां रेंगाळत थांबायला मी अजिबात तयार नाही...तेव्हां तुला मढ्यांची हलवा हलव करायला जी कांही मदत लागेल ती पण मी च करते... ...पण हे आंवरून मला ताबडतोब इथनं बाहेर पडायचंय्... ... "
मी,"अरे माझ्या देवा... ... ...मऽऽऽऽऽऽऽग?"
सौ. वृन्दा,"मग काय? गेले त्याच्यासोबत त्या बर्फाळ थंडगार शवागारात... ...तरी नशीब...की संबंधित ड्रॉवर तळातल्या रांगेतलाच होता, म्हणून निभावलं सगळं... ...
डोकं धंरायला तो बिचारा, आणि पाय धंरून उचलायला मी स्वतःच... ...!!!




आतलं बेवारशी प्रेत बाहेर काढून ठेंवलं, आणि विनिताला उचलून ठेंवलं आत, नी केला बंद ड्रॉवर ढंकलून... ... ...काय करणार ?
मग तिथल्या कार्यालयात पैसे भंरून रीतसर पावती बिवती घेतली... ... बाहेर थांबलेल्या शवाहिनीच्या चालकाला सांगितलं 'आतां नीघ ' म्हणून... ...
तोंपावेतों सकाळचे सहा वाजत आलेले होते... ... डेक्कन क्वीन गांठायला निघालेल्या तमाम रिक्षा स्टेशनच्याच दिशेत निघालेल्या... ...उलट दिशेला जाणारी एकही रिक्षा सांपडेना...
मग ठंरवलं की घराच्या दिशेनं चालायला लागावं, आणि वाटेत मिळेल तिथनं रिक्षा पकडावी... ...
म्हणून जी चालत निघाले, ती थेट घरापाशी
आले बघ, तरी रिक्षाचा पत्ता नव्हता... ..."
आतां मात्र मी सौ. वृन्दाला कोंपरांपासून हात जोडले,"धन्य आहांत... ...राणी लक्ष्मीबाई... ... खरोंखरीच धन्य आहांत आपण..."
आणि दुसर्‍या क्षणीं सगळे बांध फुटून सौ. वृन्दाच्या डोंळ्यांना धारा लागल्या... ...
मी फक्त तिचे टेबलावर असलेले हात गच्च पकडून निःशब्द बसलेलो होतो... ... ...

पुढचं सगळं सौ. वृन्दानं सांगितल्याप्रमाणंच आम्ही दोघांनी मिळून पार पाडलं... ...
सौ. विनिताला अग्नि देतेवेळी सरणाला लावायची चूड धंरायलाही रोहन चा धीर होई ना...तेव्हां ह्या वृन्दानं पलिता हातात घेऊन स्वतःच तिला अग्नि दिला...
पुढचे सगळे तेराव्यापर्यंतचे विधी पण कर्त्या पुरुषाला लाजवील, अश्या धंमकीनं तिनं स्वतःच तडीला नेले ...अगदी शेवटचा काकबळी सुद्धां... ...

म्हणून तेव्हां पासून मी ह्या आमच्या ज्येष्ठ मेहुणीला नेहमीच ' लक्ष्मीबाई ' म्हणून हांक मारायला सुरुवात केली... ...
सौ. वृन्दाला आवडत नाही ते... ...कधी कधी चिडते पण माझ्यावर... ...
पण तत्क्षणींच मी तिला माझ्या आज्जी चं आवडतं वाक्य ऐकवून माझी सफाचट् सुटका करून घेतो...
,"राणी लक्ष्मीबाई... ... ...आहे हे सगळं असं आहे !!! ... ...काय करायचं?"


***********************************************************************************************

-- रविशंकर.
२७ नोव्हेंबर २०१९.

No comments:

Post a Comment