Search This Blog

Sunday 3 November 2019

॥ आधी लोहारकी ॥

॥ आधी लोहारकी ॥

१४ नोव्हेंबर हा आमच्या सौ. 'इंदिराजीं' चा जन्मदिन... ...
त्यानिमित्तानं त्यांना छानशी वाढदिवसाची भेंट द्यावी, असं मनांत आलं...
म्हणून हा कथा प्रपंच... ... ...
' आधी लोहार की '
 

-- रविशंकर.
 

***********************************************************************************************
 

आमच्या सौभाग्यवतीं चं वास्तवातलं नांव आहे सौ. सुमीता...
पण त्यांना वरमाला घातल्यास आजतागायत मी त्यांना 'इंदिराजी' याच टोपणनांवानं तहहयात संबोधत आलो आहे.
सुरुवातीला त्यांना ती कुचेष्टा वाटायची...त्यांच्या कळा काढून पळून जाणं हा माझा आवडता उद्योग असल्यामुळंही तसं होत असावं... ...
पण कालांतरानं मी त्यांना हे संबोधन आदरानं योजतो आहे हे पटलेलं असावं...म्हणून घरांत आणीबाणी पुकारली जात नाही, इतकंच काय ते.

आतां ह्या आमच्या सौभाग्यवती मुळात 'इंदिराजी' कधी झाल्या, आणि 'इंदिराजी' च कां झाल्या, याचं सरळ साधं कारण म्हणजे माझा लंगोटियार शर्‍या दातार म्हणतो तसं,"हा आमचा नाना म्हणजे 'सौ  सुनारकी', अन्‌ ह्या नानी म्हणजे 'एक लोहारकी'... ..."
खरं सांगायचं, तर आमच्या सौ. इंदिराजीं चं व्यावहारिक कर्तृत्त्व 'आधी लोहारकी' म्हणावं असलंच कांहीतरी आहे... ...
आजही माझी कळा कांढायची खोड कांही जात नाही, त्यामुळं कळ कांढली रे काढली, की दुसर्‍या क्षणीं सूं बाल्या करावा लागतो... ...!!
ती 'आधी लोहारकी' टाळक्यात हाणून घ्यायला कोण थांबणार?... ...म्हणून.



तर त्याचं काय झालं, की सौ. इंदिराजीं बरोबर माझी जन्मगांठ ही ब्रह्मदेवानं बांधलेली नसून आमच्या दिवंगत आज्जी नं (वडिलांच्या मातोश्री)  बांधलेली आहे... ...
विद्यार्थी दशेत पुण्यात असतांना मी आणि सौ. इंदिराजी एकाच महाविद्यालयात, पण अलग अलग शाखांत शिकत होतो.
मी शास्त्र शाखेचा विद्यार्थी, तर सौ.इंदिराजी कलाशाखेच्या विद्यार्थिनी...
त्या काळच्या सनातनी वातावरणांत अध्यापक-प्राध्यापक-प्राचार्यां च्या करड्या नजरांखाली जे कांही चारदोन शब्दांचे संवाद व्हायचे, त्यालाच काय ते संभाषण म्हणायचं...
आजच्या काळातल्या 'मारो गोली यार...' असले तडाखेबन्द संवाद फेंकणार्‍या विद्यार्थिनी, त्या काळांत तरी नव्हत्या...!!
असो... ...
त्या काळांत-म्हणजे ऐंशीच्या दशकात-माझी आज्जी ( म्हणजे ती. काकां ची आई ) ऐंशी वय पार करून जवळपास अंथरुणाला खिळलेली होती...
ह्या माझ्या आज्जी ची माझ्यावर अपरंपार डोंळस माया होती... होय...डोळस माया होती... ...आंधळी नव्हे.
मी शेंडेफळ असल्यामुळं, हयात असेतोंवर 'शेंडे सून' बघायची माझ्या आज्जी ची अतीव इच्छा होती... ...
त्या काळांतल्या रिवाजानुसार नात्यागोत्यातल्या, आईच्या महिला मण्डळातल्या चारदोन बायांनी त्यांच्या घरच्या 'उपवरां' खातर उपरोक्त 'शेंडे सून' पदासाठी यथाशक्ति मोर्चेबांधणीही आरंभलेली होती, असं कांहीबाही माझ्याही ऐकिवात होतं... ...खरं खोटं देव जाणे.
पण ही माझी आज्जी म्हणजे शर्‍याच्याच भाषेत सांगायचं, तर 'पाव लोहारकी' प्रकरण होतं... ...'आधी लोहारकी'पण नव्हे !!!
तिनं कुठल्याच मोर्चेबांधणी ला दाद दिलेली नसावी... ...
तर अभियांत्रिकी च्या तृतीय वर्षांत शिकत असतांना १९७३ सालच्या उन्हाळीं सुट्टीत मी जेहां कोल्हापूरला आमच्या मूळ घरीं गेलो होतो, तेव्हां आज्जी नं हा विषय खासगीत माझ्याजवळ काढला, आणि मी तिला सौ.इंदिराजीं बद्दल सांगितलं. त्या वर्षीं मराठी विषयांत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावलेला असल्यामुळं सौ. इंदिराजीं चा महाविद्यालयात सत्कार झालेला होता, आणि महाविद्यालयाच्या स्मरणिकेत त्यांचं सुवर्ण पदकासह रंगीत छायाचित्रही प्रकाशित झालेलं होतं. योगायोगानं ती स्मरणिका माझ्या बॅगेत होती.
जेव्हां आज्जी नं 'ही मुलगी दिसायला कशी आहे रे?' असं मला विचारलं, तेव्हां मी स्मरणिकेतलं ते छायाचित्र आज्जी ला दाखवलं......
आज्जी नं ते क्षणभर बारीक नजरेनं निरखलं - पारखलं, अन्‌ 'छान आहे...आवडली मला' इतकंच म्हणाली.
'पाव लोहारकी' च्या त्या 'छान आहे... ...' चा दणका असला तडाखेबन्द होता, की त्या वर्षीच्या दसरा-दिवाळी पावेंतोंच  सौ. आई आणि काका तांतडीनं पुण्याला सौ. इंदिराजी नां 'पहायला' म्हणून जे आले, ते आमचं लग्न ठंरवूनच कोल्हापूरला परत गेले... ...!!!
 

(ह्या आमच्या आज्जी ची ओंळख करून घ्यायची असेल, तर वाचकांनी याच ब्लॉगवरची 'प्लास्टरायन' ही कथा आधी वांचावी.)
 

बाकीच्या मोर्चेबांधणीवाल्या बायाबापड्यांचं काय झालं ते कांही कळलं नाही मला... ...
पण आज्जी ची पारख किती चाणाक्ष होती, ते सौ. इंदिराजी ना माळ घालून घरीं आणल्यावर मला लख्खपणे समजलं... ...
आपलं लाडकं 'शेण्डेफळ' कसल्या 'गुणां' चं आहे हे आज्जी अचूक ओंळखून असावी... ...
चाणाक्ष नजरेनं 'प्रति आज्जी' च म्हणावी, असली ही 'आधी लोहारकी' नेमकी वेंचून, तिच्याच गळ्यात आपल्या लाडक्या 'शेण्डेफळा' ला लंटकवून ती 'पाव लोहारकी' धन्य धन्य झालेली होती... ...!!
'शेण्डे सून' प्रत्यक्ष बघायची आज्जी ची इच्छा दुर्दैवानं कांही पुरी झाली नाही... ...
बिचारी आमचं लग्न ठंरल्यानंतर कांही महिन्यांतच सुखानं परलोकवासी झाली... ...
आणि १९७४ च्या हिंवाळ्यापासून मी तहहयात सौ. इंदिराजींच्या आणीबाणीतल्या वरवंट्याखाली गुण्यागोविंदानं नांदायला लागलो...!!!
त्यावेंळी पुण्यात आमच्या राहत्या घरीं फक्त मी एकटाच राहत होतो.
आई-काका कोल्हापूर मुक्कामीं मूळ घरीं, अन्‌ भावण्डं मुंबई-कोल्हापूर-बेळगांव अशी विखुरलेली. तात्पर्य पुण्यातल्या माझ्या घरीं मी एकटाच होतो.
आज्जी नुकतीच देवाघरीं गेलेली असल्यानं, लग्नादिवशीचा सायंकाळचा स्वागतसमारंभ आटोंपल्यानंतर, 'नांदा सौख्यभरे' असे आशीर्वाद देऊन समस्त गणगोत वर्‍हाडाच्या गाडीनं रातोंरात कोल्हापूर
ला रवाना झाले, आणि मी सौ. इंदिराजी नां घेऊन रिक्षा पकडून घरीं आलो.
उंबरठ्यावरचं माप ओलाण्डून घरांत आल्या आल्याच आमचे संवाद 'भारत' अन्‌ 'आपले वायव्यस्थित सख्खे शेंजारी' यांच्यातल्या द्विस्तरीय-त्रिस्तरीय वाटाघाटीं च्या भाषेत सांगायचं म्हटलं, तर असे झाले... ... 






सौ. इंदिराजी (प्रवेशद्वाराच्या उंबर्‍याकडं बोंट दाखवत)," ही आपली 'एल्. ओ. सी.'... ...मान्य आहे?"
मी,"म्हणजे... ...उंबर्‍याच्या आंतला प्रदेश तुमचा...म्हणजे भारताचा... ...असंच ना?"
सौ. इंदिराजी,"अगदी बरोबर... ...तुम्हांला ज्या कांही उचापती करायच्या असतील, त्या भारतात करतां येणार नाहीत... ...समजलं?"
मी,"छान छान... ...एकदम मान्य...मला आमच्या देशातच नांदायला आवडेल... ...बरं असतं ते...तब्येतीच्या दृष्टीनं...!!"
सौ. इंदिराजी,"आंचरटपणा नकोय् मला... ...नेमकं काय म्हणायचंय् ते स्पष्ट बोला..."
मी,"म्हणजे असं की तिकडं आमच्या देशांत एकूण छान असतं सगळं...तिथं ते अतिरेकी-बितिरेकी बरेच मित्र भेंटतात...पैसा-अडका ही बक्कळ देतात... ... ए. के. ४७ पण हवी असली तर अगदी उड्या मारत देतात... ...शिवाय घातपाती प्रशिक्षण सुद्धां आय्. एस्. आय्. वाले फुकटात देतात... ...खायची-प्यायची अगदी चंगळ असते... ...काय?"
सौ. इंदिराजी,"तसल्या उचापती-कुरापती ज्या काय करायच्या असतील त्या तिकडंच करायच्या... ...भारतात केल्यात तर धंरपकड करून तत्क्षणीं गोळ्या घातल्या जातील..."
मी,"ते धंरपकडीचं तेव्हढं काय ते सोडून बोला ... ...दहशतवाद्यांना भूमिगत करण्यात आमचा हात जगांत कुणी धंरीत नाहीत... ...कळलं?... ...शिवाय 'एल्. ओ. सी.' वरचे आमचे रेंजर्स् मस्त खंमके आहेत  काय ते बघून घ्यायला... ...काय?"
सौ. इंदिराजी,"तुमच्या रेंजर्स् चं श्राद्ध घालायला आमचे लेह लडाख चे पोलीस देखील पुरेसे आहेत... ...बी.एस.एफ्. ची पण गरज नाही... ...समजलात?

अतिरेक्यांची भारतात धंरपकड झाल्यास त्यांना तत्क्षणीं गोळ्या घातल्या जातील... ...मान्य आहे?"
मी,"अजिबात नाही... ...तुम्ही ज्यांना अतिरेकी म्हणताय् ते आमचे देशभक्त स्वातंत्र्य सैनिक असतात... ...त्यांना आंरतराष्ट्रीय कायद्यानुसार सन्मानाचीच वागणूक द्यावी लागेल...विना चौकशी गोळ्याबिळ्या घातलेल्या खंपणार नाहीत आम्हांला... ..."
सौ. इंदिराजी,"पर्यायी व्यवस्था बोला काय ती... ..."
मी,"द्विपक्षीय वाटाघाटी करूनच काय तो फैसला करावा लागेल... ...गोळ्याबिळ्यांचा."
सौ. इंदिराजी,"ठीकाय् ठीकाय्... ...तुमच्या बाजू नं कोण माझ्याशी वाटाघाटी करणार ते बोला... ..."
मी,"आमच्या देशांत परराष्ट्रमंत्री-राजदूत अश्या दर्जाच्या मान्यवरांना असं तोंफेच्या तोंडी द्यायची पद्धत नाही... ...वाटाघाटी तुमच्या परराष्ट्रमंत्री-राजदूतांबरोबरच होतील... ..."
सौ. इंदिराजी,"ठीकाय्... ...वाटाघाटीत जे कांही निर्णय होतील ते तत्क्षणीं अंमलात आणले जातील... ...याद राखा... ...अट मान्य?"
मी,"एकदम मान्य... ...वाटाघाटी पिढ्या न् पिढ्या रखडवत ठेंवण्यात आमचे राजनैतिक अधिकारी जगप्रसिद्ध आहेत... ...निकालच लागेना झाला तर करणार काय तुम्ही....? त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही... ...मान्य?"
सौ. इंदिराजी,"ठीकाय्... ..."
मी,"ठीकाय् नाही... ...मान्य आहे काय ते सांगा..."
सौ. इंदिराजी,"जागतिक शब्दकोषांत इंदिराजीं च्या 'ठीकाय्' लाच 'मान्य आहे' असं म्हणतात... ...समजलात?"
(दिवाणखान्या कडं बोंट दांखवत),"हा निर्मनुष्य प्रदेश असेल... ...म्हणजे 'नोमॅन्स् लॅण्ड्' म्हणतात तो... ...अट मान्य?"
मी,"ठीकाय्... ..."
सौ. इंदिराजी,"ठीकाय् चालणार नाही... ...मान्य आहे म्हणा..."
मी,"कां म्हणून चालणार नाही?"
सौ. इंदिराजी,"तुमच्या 'ठीकाय्' ला जगात कुणी कवडीची किंमत देत नाहीत म्हणून... ...समजलात?"
मी,"ठीकाय्... ...नाही नाही...मान्य आहे..."
सौ. इंदिराजी,"आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस्सं.......
(माझ्या शयनकक्षाकडं बोंट दाखवीत),"इथं भारतात धंरपकड झालेल्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था असेल... ...वाटाघाटींचा निकाल लागेपर्यन्त...काय?"
मी,"एकदम मान्य..."
सौ. इंदिराजी,"छाऽऽऽऽऽऽऽऽऽऽन..."
(स्वयंपाकघराकडं बोंट दाखवीत),"राजधानी दिल्लीत उचापती केलेल्या अजिबात खंपवून घेतल्या जाणार नाहीत...आणीबाणी च्या वरवंट्याखाली त्वरित एकपक्षीय फैसला करून काय तो निकाल लावला जाईल... ...हा प्रदेश द्विपक्षीय वाटाघाटींच्या कक्षेबाहेरचा असेल, आणि इथं आमचाच निकाल अंतिम असेल...इथले प्रश्न यूनोत देखील नेतां येणार नाहीत... ...मान्य आहे?"
मी,"हा कायदा दोन्ही बाजूंना जश्यास तसा लागूं असेल... ..."
सौ. इंदिराजी,"ठीकाय् ठीकाय्... ...अजून कांही?"
मी,"तात्पुरत्या निवासांत असेतों आमच्या नागरिकांच्या खाण्यापिण्याची-कपड्यालत्त्याची जबाबदारी भारत सरकारवरच असेल... ..."
सौ. इंदिराजी,"ठीकाय्... ...पण तात्पुरत्या निवासांत असेतोंवर भारताच्या कुरापती काढल्यास कपडालत्ता घालण्याऐवजी फक्त लत्ता घातल्या जातील... ...याद राखा..."

असला कांहीतरी तो तहहयात तहाचा करारनामा झाला, आणि त्यानुसार आमच्या संसाराचा त्या दिवशीं जो श्रीगणेशा झाला, तो करार गेली पंचेचाळीस वर्षे अबाधित आहे...थेट मोझेस् च्या 'टेन कमाण्डमेण्ट्स्' सारखा... ...त्याला 'धूमशान संसार' असं कांहीतरी म्हणतां येईल...

तर झालं असं, की संसार सुरूं करून पुढच्या चार-पांच वर्षांत आम्ही प्रथम १९८६ सालीं जंवळ होतं नव्हतं तें ओंतून आमचं डहाणूकर कॉलनीतलं राहतं घर बांधलं... ...
पुढं १९९६ सालीं जवळच दीडदोन कि. मी. अंतरावर नव्यानं उभ्या राहत असलेल्या 'विजय कॉम्प्लेक्स' नांवाच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत अजून एक तीन खोल्यांची छोटीशी सदनिका मुलांच्या अभ्यासासाठी विकत घेंतली... ...
आणि मुलांनी ती कधीच वापरली नाही, म्हणून मग अखेर ती भाड्यानं दिली.....

२००१ च्या ऑगस्ट महिन्यात याच विजय कॉम्प्लेक्स च्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पटांगणावर भंरलेली होती.
उपरोक्त सदनिकेच्या मालकीणबाई सौ. इंदिराजी स्वतःच असल्यानं, रीतीनुसार आम्ही दोघे त्या सभेला उपस्थित होतो...साधारण शेसव्वाशे सभासद सभेला हजर होते...
झालं असं होतं, की संस्थेनं पहिल्याच सर्वसाधारण सभेत असा ठंराव मंजूर करून घेतलेला होता, की ज्या सदनिका सभासदांनी भाड्यानं दिलेल्या असतील, त्यांना बाकीच्या सभासदांपेक्षा वीस टक्के ज्यास्त रक्कम इमारत निधी आणि देखभाल खर्च म्हणून भंरावी लागेल. याबद्दल सहकार आयुक्तांकडं अनेक सोसायट्याकडील कांही याचिका प्रलंबित होत्या. २००१ सालीं त्यांचा निकाल असा लागला की अश्या भाड्यानं दिलेल्या सदनिकांच्या मालकांकडून कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेला इतर सभासदांच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा ज्यास्त आकार वसूल करतां येणार नाही.
सौ. इंदिराजी ह्या पैश्याअडक्याच्या व्यवहारांच्या बाबतीत रीझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर असल्यामुळं, त्यांनी पत्राद्वारे संस्थेकडून आम्ही गेल्या चारपांच वर्षांच्या कालावधीत दहा टक्क्यापेक्षा जितका ज्यास्त निधी भंरलेला होता त्याच्या परताव्याची रीतसर मागणी केलेली होती... ...
आतां नीटसं कांही स्मरत नाही, पण साधारणपणे वीस-बावीस हजारांच्या आसपास तो आंकडा होता.
२००१ सालाच्या मानानं रक्कम चांगली भक्कम असल्यामुळं, तो एक ठंराव आमच्या व्यक्तिगत जिव्हाळ्याचा होता...
सभा सुरूं झाली...प्रथम उपस्थितांचं स्वागत, नंतर हिशेब ठिशेब ताळेबंदाच्या खडाजंगी चर्चा... ...नंतर पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकावरच्या हाणामार्‍या वगैरे यथास्थित पार पडलं,  मग पंधरावीस मिनिटांच्या मध्यंतरांत चहापान गप्पाटप्पा पण झाल्या, आणि पुढच्या सत्रात अध्यक्षांनी ऐनवेळचे विषय ऐरणीवर घेतले... ...

श्री. शिंदे (चेअरमन),"तर उपस्थित सभासद हो, गेली पांचसहा वार्षें आपल्या सोसायटीतली डी-१६ क्रमांकाची सदनिका ही एकमेव सदनिकाच भाडेपट्ट्याच्या करारानं दिलेली आहे... ...बा
की सर्व सदनिका त्यांचे मालक सभासद स्वतःच वापरतात. सदनिकेच्या मालकीणबाई सौ. नानिवडेकर यांनी गेली पांचसहा वर्षे संस्थेच्या नियमानुसार वीस टक्के ज्यास्त दराने इमारत निधी आणि देखभाल खर्च नियमितपणे वेळच्या वेळीं रोखीने भंरलेला आहे... ...
आपण सर्व जाणताच की या वर्षी सहकार आयुक्तालयानं जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेला भाडेपट्ट्याने दिलेल्या सदनिकाधारकांवर इतर सभासदांच्या तुलनेत दहा टक्क्यांपेक्षा अधिक इमारत अन् देखभाल निधी लादतां येणार नाही, आणि हा कायदा पूर्वलक्षी प्रभावनं लागूं झालेला आहे.
साहजिकच डी-१६ च्या धारक सौ. नानिवडेकर यांनी संस्थेकडे रीतसर अर्ज करून आजतागायत त्यांनी दहा टक्क्यापेक्षां ज्यास्त भंरलेल्या एकूण रकमेच्या परताव्याची मागणी केलेली आहे, आणि तो त्यांचा अधिकार पूर्णपणे वैध आहे. एकूण रक्कम रु. २२८६७ /- इतकी आहे.
सदर प्रस्तावावर कुणाचं कांही म्हणणं असल्यास त्यांनी ते उभे राहून मांडावं... ... ...

हरएक गृहनिर्माण संस्था म्हणजे एक छोटासा भारत देशच असतो... ...
अठरापगड तर्‍हांची नमुनेदार माणसं तिथं एकत्र नांदत असतात... ...
त्यात संत असतात, महात्मे असतात, नाकासमोर वाले असतात, तसे नाकानं कांदे सोलणारी ढालगज माणसं पण असतात... ...
असलंच एक ढालगजातलं गाळीव रत्न म्हणावं, अश्या सौ. करंदीकर आडनांवाच्या बाई आमच्या डी इमारतीत चौथ्या मजल्यावर रहायच्या.
गतकालांत चारदोन वेळां इमारतीतल्या पार्किंगच्या मुद्द्यावरून त्यांचे सौ. इंदिराजीशी खंटकेही उडालेले होते... ...
आणि सौ. इंदिराजींची '
आधी लोहारकी' खाऊन त्यांचं चारचौघात यथासांग द्रौपदी वस्त्रहरण ही पार पडलेलं होतं...!!
पण असल्या गाळीव ढालगजांची खुमखुमी कुणीतरी त्यांचा भंर चंव्हाट्यावर सफाचट तेरावा घातल्याशिवाय कधीच जिरत नसते............
तो साडेतीन मुहूर्तातला गाळीव योग त्या दिवशी जमून आलेला असावा कदाचित... ...
नेमकं हे गाळीव रत्न दस्तुरखुद्द सौ. इंदिराजीना च टांग मारायला भंरसभेत उभं राहिलं... ... ....

श्री. शिंदे," हं बोला करंदीकरबाई... ...काय म्हणणं आहे तुमचं?...नावरकर... ...जरा करंदीकरबाईं कडं माईक द्या... ..."
सौ.करंदीकर," आम्ही सौ.नानिवडेकर यांच्या इमारतीतच डी २४ सदनिकेत राहतो... ...चांगले आपुलकीचे संबंध आहेत आमचे... ...म्हणजे सौ.नानिवडेकर बाईंबद्दल आम्हां सगळ्यांचंच मत आणि अनुभव अतिशय चांगले आहेत...सर्वसाधारण सभेत आणि सोसायटीच्या कार्यक्रमांत अतिशय आपुलकीनं त्या भाग घेतात हे पण सगळ्यांनाच ठाऊक आहे... ..."
श्री. शिंदे बाईंच्या चर्‍हाटाला कंटाळले,"ते सगळं ठीकाय् सौ. करंदीकर, या ठंरावावर तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तेव्हढंच थोंडक्यात स्प्ष्टपणे मांडा..."
मी आतां कान टंवकारले...
सौ. इंदिराजी ढिम्मपणे चेंहर्‍यावरची सुरकुतीही हलूं न देतां ऐकत होत्या... ...





सौ.करंदीकर,"तेव्हां माझी अशी नम्र सूचना आहे की सौ. नानिवडेकर बाईनीं मन मोठं करून उदारपणानं सदर परताव्याची रक्कम सोसायटीच्या विकासकामांसाठी सोसायटीला देणगी म्हणून द्यावी आणि सर्व सभासदांचे धन्यवाद घ्यावेत... ..."
इतकं बोलून ते गाळीव रत्न आमच्याकडं बघून सूचक गोड हंसत खाली बसलं...!!
सभेतलं वातवरण विलक्षण औत्सुक्यानं तांणलं गेलं... ...अगदी तुटेस्तंवर तांणलं गेलं...
माझ्या पोंटात गोळाच उठला... ...
ही महाढालगज गाळीव भटीण भंरसभेत आमच्या घाम गाळून कमावलेल्या पैश्यावर चक्क तुळशीपत्र ठेंवायला निघालेली होती... ...!!
तीही तमाम सभासदांचे धन्यवाद मोफत खिश्यात घालून... ...!!!
शे-सव्वाशे सभासदांच्या उपस्थितीत ह्या भटणी नं सौ. इंदिराजींना च कंचाट्यात धंरलेलं होतं... ...
प्रसंग बांका होता... ...'
आधी लोहारकी' च्या सत्त्वपरीक्षेची घटका भंरलेली होती... ...
मी सौ. इंदिराजीकडं दंचकून पाहिलं... ...
त्यांनी ढिम्म चेंहर्‍यानं फक्त उजवा हात वर केला... ...
आणि माझ्या कानांत हंलकेच कुजबुजल्या,"ह्या
लांडगी भटणीवर जरा बारीक लक्ष ठेंवा... ..."

श्री. शिंदे,"सौ. नानिवडेकर बाई नां यावर कांही बोलायचं आहे असं दिसतंय्‌... ...नावरकर... ...जरा माईक नानिवडेकर बाईंच्या हातात द्या... ...हं बोला मॅडम."
सौ. इंदिराजीनी उभ्या राहत माईक हातात घेंतला... ...
आणि शांतपणे त्यांच्या खास इंदिराजी थाटात खणखणीत आवांजात '
आधी लोहारकी' सुरूं केली... ...
,"सर्वप्रथम हा ठंराव मांडल्याबद्दल सौ. करंदीकर बाईं चं मी मनःपूर्वक अभिनन्दन करते... ..."
मी हंळूच मागं वळून पाहिलं... ...ढालगज भंटणीच्या चेंहर्‍यावरचं कुत्सित गोड हंसूं विस्तारायला लागलेलं होतं...
सौ. इंदिराजी,"सौ.करंदीकर बाई ना सोसायटीच्या विकासाबाबत असलेली तळमळ आणि आत्मीयता जगजाहीर आहे...त्याबाबत मी अधिक काय बोलणार?..."
मी हंळूच मागं वळून पाहिलं... ...भंटणीच्या गोर्‍यागोमट्या तोंडावरचं सूचक गोड हंसूं आतां गायब झालेलं होतं, अन्‌ त्याची जागा कपाळावरच्या सूक्ष्म आंठ्यांच्या जाळ्यानं घेंतलेली होती... ... 
सौ. इंदिराजी,"सोसायटीच्या ताळेबंदानुसार खजिन्यातली नक्त शिल्लक ७४२८३ रुपये ८० पैसे इतकी आहे... ...काय, बरोबर आहे ना सौ. करंदीकर?...कृपया जरा उभ्या राहून उत्तर द्या... "
ढालगज भटणी नं उभी रहात हातातला वार्षिक ताळेबंद उलटा सुलटा चांळून बघितला, आणि गडबडून 'बरोबर आहे' म्हणून उत्तर ठोकून दिलं... ...
सौ. इंदिराजी,"त्यात आमचे प्रस्तावित देणगीचे २२८६७ भंरीला घातले, तरी सुमारे एक लाखाचा निधीसुद्धां सोसायटीच्या विकास कामांसाठी जमा होणार नाही...

सव्वाशे सदनिकांच्या सोसायटीच्या विकासकार्यासाठी लाखभर रुपये, म्हणजे हत्तीला पोंटभर भंरवायला त्याच्या सोंडेत गाजर दिल्यासारखं कांहीतरी होईल ते... ...काय बरोबर ना सौ. करंदीकर?"




मी हंळूच मागं वळून पाहिलं... ...ढालगज भटीण एरंडेल प्यायल्यागत चेंहरा करून चिरक्या आवाजात 'बरोबर आहे' असं म्हटली... ...
तिच्या गोटातल्या शेंजारी बसलेल्या चारसहा साळकाया माळकाया आतां चुळबुळायला लागलेल्या होत्या... ...
सभेतल्या पांठीमागच्या दोनतीन रांगांतल्या खुर्च्या एव्हांना रिकाम्या झालेल्या होत्या... ...!!
सौ. इंदिराजी,"म्हणून व्यासपीठावरील पदाधिकार्‍यांच्या परवानगीनं मी आतां सोसायटीच्या सर्वंकष विकासाचा प्रस्ताव ठेंवते... ...शिंदेसाहेब...परवानगी आहे आपली?"
श्री. शिंदे,"अवश्य बोला की... ...आपल्या प्रस्तावाचं इथं स्वागतच आहे... ...उत्तम असेल, तर ताबडतोब मतदानालाही टांकूं या... ...चंद्रचूड साहेब, सेक्रेटरी म्हणून तुमचं काय मत आहे?"
श्री. चंद्रचूड,"उत्तम... ...माझी कांहीही हरकत नाही... ...हं माण्डा आपला प्रस्ताव सौ. नानिवडेकर मॅडम... ..."
पांठोपाठ सौ. इंदिरांजीं चा धारदार आवाज घुमला,"आपण सहमत आहांत ना सौ. करंदीकर?"
भटणी
चं पांढरंफटक पडलेलं थोबाड आतां काळवण्डायला लागलेलं होतं... ...ती रुमालानं तोंड पुसत फक्त 'होय' म्हणाली... ...!!
अन्‌ माझी ट्यूब तत्क्षणीं भंक्क्‌दिशी पेंटली... ...
सौ. इंदिराजी नी भंरसभेत त्या लांडगी च्या श्राद्धकर्माचा चा उद्योग आरंभलेला होता... ...!!!
मी आपोआपच खाली वांकून कपाळाला हात लावत खीः खीः खीः करायला लागलो... ...
कांही केल्या त्या उचक्या कांही आंवरेचनात... ...     

सौ. इंदिराजी,"तर मला असं म्हणायचंय्‌ की सोसायटीतली निधीच्या कमतरतेपायीं दीर्घकाळ रखडलेली विकासकामे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या साठी बसायला बाक, वाचनालय, रस्त्यांचं डांबरीकरण, नवीन मुख्य जलवाहिनी टांकायचं काम, टाक्या-गळत्यांच्या दुरुस्तीची कामं, हिरवळीकरणाची कामं, सोसायटीच्या कार्यालयातलं जुनं फर्निचर बदलणे,
कार्यालयातले लेखनिक आणि रखवालदारांच्या प्रलंबित पगारवाढी, महापालिकेचे वाढीव कर, वृक्षारोपण इ. इ. सर्व कामं निपटण्यासाठी माझा ढोबळ अंदाज म्हणजे सुमारे दहा-बारा लाखांची तरी तजवीज सोसायटीला करावी लागेल... शिंदेसाहेब ...माझा अंदाज रास्त आहे ना?"
मी हंळूच मागं वळून पाहिलं... ...आतांपावेतों पाठीमागच्या जवळपास सगळ्या खुर्च्या ओंस पडलेल्या होत्या... ...
लांडगी च्या गोटातल्या तमाम साळकाया माळकाया पण गायब झालेल्या होत्या... ...
सौ. इंदिराजी ना चितपट मारल्याच्या मिजाशीत धुंदावलेल्या त्या ढालगज भटणी ला समोर उभ्या ठांकलेल्या 'द्रौपदी वस्त्रहरणा' तनं तारायला कुणी भगवन्तही शिल्लक उरलेला नव्हता... ...
अन्‌ निराधार एकाकी झालेल्या त्या लांडगीच्या नकळत तिच्या मानेभोंवती सौ. इंदिराजीनी सफाचट गळफांस संरकवलेला होता... ...!!
फक्त दांतओंठ खात तो कंरकंचून आंवळायचंच काय ते बाकीं राहिलेलं होतं... ...
आणि आतां तो थरार बघायला केवळ पांचपन्नास सभासदच शिल्लक राहिलेले होते... ...
श्री. शिंदे,"आम्हांला नक्की अचूक असं कांही नाही सांगतां येणार बाई... ...पण आपले यजमान स्वतःच स्थापत्य अभियन्ते आहेत...ते कांहीतरी सांगूं शकतील... ...
सौ. इंदिराजी,"श्री. नानिवडेकर... ...जरा हात वर करा नी सांगा... ... माझा अंदाज बरोबर आहे का?"
मी महत्प्रयासानं खीः खीः खीः गिळून उठलो, अन्‌ तोंफेच्या बत्ती ला बेधंडक मशाल लावली,"अगदी बरोबर आहे आपला अंदाज मॅडम... ...अंदाजे बाराएक लाख तरी लागतील..."
सौ. इंदिराजींच्या आवाजाला आतां विलक्षण धार चंढली,"तेव्हां मी सौ. करंदीकर बाईंच्या मूळ प्रस्तावाला अशी उपसूचना माण्डते की...
आमचे परताव्याचे तेवीस हजार रुपये सोसायटी कडं रोंख जमा आहेतच, जे आम्हांला परत मिळायचे आहेत...
प्रत्येक सभासदानं आपापला खारीचा वाटा म्हणून आमच्या रकमेच्या अर्धे म्हणजे साडे अकरा हजार रुपये ताबडतोब सोसायटीला देणगीदाखल द्यावेत... ...सौ. करंदीकर...तुम्हांला पटतंय् ना माझं
म्हणणं? ... ...नाही...म्हणजे हा देणग्या द्यायचा मूळ प्रस्ताव खुद्द तुम्हीच माण्डलेला आहे, म्हणून विचारतेय्‌... ...न्याय्य आहे ना माझं म्हणणं?... ...बोला  बोला..."
आतांपांवेतों खुर्चीत बसकण मारलेल्या त्या गोर्‍याधप्प लांडगी नं बसल्या जागीच लुळी पडायला लागलेली मुण्डी होकारार्थी डोलावली... ...!!
अन्‌ दुसर्‍या क्षणीं सौ. इंदिराजी नी लांडगी च्या मानेभोंवतीचा फांस दांत ओंठ खात कंरकंचून आंवळला... ...
,"आणि या प्रस्तावाच्या खंद्या प्रवर्तक म्हणून सौ. करंदीकर बाई नी आमच्या रकमेच्या दुप्पट म्हणजे सेहेचाळीस हजार रुपये उदार मनानं  इथल्या इथं सोसायटीला रोखीनं देणगी म्हणून द्यावेत... ...!!!
बोला सौ. करंदीकर बाई... ...देताय् ना देणगी?... ...चिंता करूं नकां...पावती आपल्याला ताबडतोब इथल्या इथं च दिली जाईल... ...!!!"
मी हंळूच मागं वळून पाहिलं... ...भंर सभेत सफाचट वस्त्रहरण झालेली ती ढालगज द्रौपदी आपलं काळंठिक्कर पडलेलं थोबाड उरल्यासुरल्या लक्तरांत लपवीत खुर्चीत निश्चेष्ट बसून आपली निस्त्राण मानगूट नकारार्थी हलवीत होती ... ...!!!
सौ. इंदिराजी नी मग फांशीतख्तावरची लांडगी च्या बुडाखालची खुर्ची फाड्‌दिशी एक लाथ घालून ठोंकरून लावली,"सौ. करंदीकर बाई नां सेहेचाळीस हजारांची देणगी ही फारच ज्यास्त वाटत असेल, तर त्यांनी आमच्या इतकीच म्हणजे तेवीस हजारांची देणगी दिली, तरी आम्हांला ती चालेल... ...बोला सौ. करंदीकर... ...न्याय्य आहे हा आमचा प्रस्ताव... ...काय?... ...बोला चटकन्‌ करंदीकर बाई... ...सोसायटी आपल्या उदार दानती ची उत्सुकतेनं वाट बघतेय् ... ...!!"



भंर सभेत सफाचट वस्त्रहरण होऊन खुर्चीत निश्चेष्ट पडलेली ती कलियुगातली द्रौपदी सगळ्यांनी मनसोक्त डोंळे भंरून बघितली... ...!!
आणि मग भटणीच्या टाळक्यात अखेरची निर्णायक '
आधी लोहारकी' हाणून तिच्या कुजक्या मेंदू चं श्राद्ध घालीत सौ. इंदिराजी गंरजल्या,"आणि नसेल जमत आपल्याला इतकंही मन मोठं करायला, तर इतउप्पर दुसर्‍यांच्या घरांवर परस्पर तुळशीपत्र ठेंवायचे आपले ढालगज उद्योग आपण कायमचे बंद करावेत हे उत्तम... ..."

इतकं बोलून सौ. इंदिराजी नी शांतपणे माईक स्वतः चेअरमन श्री. शिंद्यांच्याच हातात 'धन्यवाद शिंदे साहेब' म्हणत दिला... ...
आणि खुद्द चेअरमन श्री. शिंदे साहेबांनीच स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!
दुसर्‍या क्षणीं व्यासपीठावरच, खजिनदारांसह स्वतःचेही सह्या शिक्के ठोंकून, स्वहस्तेच रु. २२८६७/- रकमेचा चेक सन्मानानं सौ. इंदिराजीं च्या स्वाधीन केला... ...!!!

सौ. इंदिराजीं चा स्मरणिकेतला फोटो क्षणभरच निरखून माझ्या आज्जी नं नेमकं काय पारखून घेतलेलं होतं, तें तब्बल तेवीस वर्षं उलटल्यानंतर मला लख्खपणे समजलं... ...!!!
तेव्हांपासून आमच्या 'सौ. सुमीताजीं' चं 'सौ. इंदिराजी' असं आजन्म नामकरण झालं... ...
आणि रोम मधल्या कलोझियमच्या रिंगणातलं तें थंरारनाट्य बघितल्यानंतर तहहयात सौ. इंदिराजीं पुढं माझंही तोंड दहा वेळा विचार केल्यानंतरच उघडायला लागलं... ...!!!

***********************************************************************************************
-- रविशंकर.
१४ नोव्हेंबर २०१९   

No comments:

Post a Comment