Search This Blog

Friday 13 September 2019

॥ उदरभरणदुःखे... ...॥

॥ उदरभरणदुःखे... ...॥




मी,"सर... ...एक सामाजिक समस्येवरचा प्रश्न विचायचा आहे आपल्याला... ...विचारूं कां?"
पुण्यातल्या साहित्य परिषदेच्या सभागृहात साहित्य, तसेच इतर क्षेत्रातले मोजके पांच पंचवीस मान्यवर अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला जमलेले होते.
परिषदेचा आजीव सभासद असल्यामुळं मी ही 'गाड्याबरोबर नळ्याची यात्रा' च्या न्यायानं त्या बैठकीला उपस्थित होतो. साधारण २०१२ सालातला हिंवाळा सुरूं असावा.........
श्री. अण्णा हजारे यांनी दिल्ली च्या रामलीला मैदानावर तत्कालीन सरकारशी एकहाती लढा देत जे 'लोकपाल' आंदोलनाचं शिंग फुंकलेलं होतं त्या आंदोलनाचा मुळात जनतेनं, आणि मग तेव्हांच्या सरकार नं यथास्थित विचका करून ठेंवलेला होता... ...इतका, की 'उभ्या आयुष्यात परत रामलीला मैदानाचं तोण्ड देखील बघणार नाही' अशी खुद्द अण्णा हजारेनी च विषादा नं भीष्मप्रतिज्ञा तर केलीच, शिवाय 'नुस्ती 'मी अण्णा हजारे' असं छापलेली टोपी घालून कुणी अण्णा हजारे होत नसतो' अशी खणखणीत चंपराकही त्या टोप्या घालून आरोळ्या ठोंकत घसे कोंरडे करणार्‍या आचरट जनतेला लगावलेली होती... ...
त्या थंपडेचीही कुणाला कसली लाजलज्जा वाटल्याचं आजतागायत माझ्या ऐकिवात नाही... ...तेव्हां नेहमीप्रमाणंच मला एक प्रश्न पडलेला होता, जो मी त्या मान्यवरांना विचारूं इच्छित होतो......
साहित्य परिषदेत जेव्हां ज्वेव्हां कुणी मान्यवर व्यक्ति भेंट देणार असतील, तेव्हां 'पण्डित मैत्री सभेत संचार' या उक्तीला अनुसरून मी शक्यतों परिषदेत हजेरी लावीत असतो... ...
असल्या कार्यक्रमांत विचारवन्तांबरोबरच्या संवादातनं मला जितकं शिकायला मिळालं, तितकं क्वचितच इतर कुठं शिकायला मिळालं असेल... ...
समोर चहाचा रसिकतेनं आस्वाद घेंत
सलेल्या त्या ज्ञानपीठ पुरस्कृत साहित्यिकांनी दिलखुलासपणे,"अवश्य... ...विचारा की"म्हणत मान डोंलावली.
तेव्हां मी जरा धीर करून विचारलं," सर... ...आपल्या, इतक्या समृद्ध सांस्कृतिक वारसा असणार्‍या देंशात, कुठल्याही चळवळीचं - मग ते लोकपाल आंदोलन असो, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा असो, कोळसा खाणीतला घोटाळा असो, पूरग्रस्त आणीबाणी चं नियोजन असो, निवडणुका असोत, बोफोर्स प्रकरण असो, बॅंक घोटाळे असोत, संरक्षण साहित्य खरेदीतले भरष्टाचार असोत, मुंबईवरचा अजमल कसाब चा अतिरेकी हल्ला असो, नाहीतर निर्भया बलात्कार प्रकरण असो - शेंवटी कडबोळं अन्‌ खरकटं कां होतं? कुठल्याही चळवळीची समाधानाकारक तड कां लागत नाही?... ...इस्रो चं काम, हळदी च्या पेटंट बाबतचा अभिमानास्पद लढा, भारतीय सैन्यदलांची अतुलनीय शौर्यगाथा, असे कांही मोजकेच सन्मान्य अपवाद वगळतां, इतर बहुतेक सामाजिक कार्य-समस्यांचं शेंवटी असं भदं कां होतं?"
समोर बसलेले सडेतोड विचारवन्त एक क्षणभरच विचारमग्न झाले, नी दुसर्‍या क्षणीं म्हणाले,"ज्या देशाच्या सरकार चा तैमूरलंग, नी जनतेचा शेख महंमद झा
लेला असतो, त्या देशाच्या जनतेच्या कपाळीं हें च विधिलिखित लिहिलेलं असतं, असं मला वाटतं... ..."
इतकं चपखल-हजरजबाबी-मर्मग्राही उत्तर ऐकून त्या वेळी मी च आवाक् होत भंर बैठकीत कपाळाला हात लावलेला होता...!!!



उपरोक्त प्रसंगानंतर आजतागायत जेव्हां जेव्हां मी रोजचं वर्तमानपत्र वांचायला उघडतो, तेव्हां तेव्हां त्यातल्या प्रत्येक बातमीखाली मला ही च अमुद्रित तळटीप वांचायला मिळते...!!
ती स्वच्छपणे वांचायची दृष्टी फक्त त्या एका वाक्यानं मला प्राप्त करून दिलेली होती... ...
ही प्रचण्ड व्यक्तिमत्त्वाची माणसं कुठल्याही गहन प्रश्नाचं इतकं चपखल,मर्मभेदी,नी बिनतोड विश्लेषण एका क्षणांत कसं काय करूं शकतात?
असा जेव्हां मी थोडाफार विचार केला, तेव्हां मला जाणवलं, की या अचाट कुवतीच्या मुळाशी तत्त्वज्ञानावरची हुकूमत आणि चिंतन या दोनच गोष्टी असाव्यात... ... 

तर विद्यार्थी दशेत असतांना माझे आद्यगुरु श्री.टिकेकर मास्तरांनी मला तत्त्वज्ञानाची गोडी लावलेली होतीच... ...
चिंतन-मंथनाची संवय मात्र मला स्वतःलाच लावून घ्यावी लागली... ...अगदी प्रयत्नपूर्वक.
(ह्या माझ्या आद्य गुरुं ची ओंळख करून घ्यायची असेल, तर इथली 'आचार्य देवो भंव' ही कथा वांचावी)
मास्तर नेहमी मला सांगायचे," हे बघ... ...श्रीमन्त होणं हे तुलनेनं फार सोपं असतं... ...समृद्ध होणं हे महाकर्मकठीण काम... ...
तेव्हां माणसाला जर समृद्ध व्हायचं असेल, तर त्याला पांच शास्त्रांवर प्रभुत्त्व मिळवणं गरजेचं असतं... ...
पहिलं आरोग्य-शरीर-औषधि शास्त्र... ...म्हणजे 'सर सलामत तो पगडी पचास'... ...आलं ध्यानांत?"
मी,"होय मास्तर...आलं ध्यानांत."
मास्तर,"दुसरं शास्त्र म्हणजे मनुष्य जे चरितार्थ चालवण्यासाठी शिकतो ते, मग ते कुठलंही शास्त्र असो... ...
ते अवगत झालं, की पोंटापाण्याची अन्‌ संसाराची व्यवस्था नीट लावतां येते... ...बरोबर?"
मी,"होय मास्तर... ...बरोबर."
मास्तर,"तिसरं म्हणजे अर्थशास्त्र अवगत असायला हवं... ...पैसा मिळवणं हे सोपं आहे, पण मिळवलेला पैसा नीटपणे सांभाळणं आणि वाढवणं हे महाकठीण काम... ...
आणि त्यासाठी अर्थशास्त्राची जाण अत्यावश्यक असते... ..."
मी," कळलं मास्तर..."
मास्तर," चौथं शास्त्र म्हणजे साहित्य-कला-संगीत वगैरे... ...
विख्यात तत्त्वज्ञ भर्तृहरि चं एक मजेशीर वचन नेहमी लक्ष्यांत ठेंव... ...


तो म्हणतो,      " साहित्य-संगीत-कला न, ज्यातें
                           लांगूल-शृंगाविण कीं पशू तें
                           तृणे न खातांच कि राहती हें
                           चतुष्पदांचे बहुभाग्य आहे "... !!


तात्पर्य, नुस्त्या चौदा विद्या शिकून मनुष्य कधीच परिपूर्ण नी समृद्ध होत नसतो... ...
तें होण्यासाठी कोणतं ना कोणतं कलाकौशल्य त्याला हस्तगत करावंच लागतं... ...जगणं - विशेषतः उत्तरायुष्यातलं - सुखी समाधानी आणि आनंदी ठेंवायचं असेल तर... ...काय?"
मी नुस्ती मान डोंलावली... ... ...
मास्तर समारोप करीत म्हणाले,"हे कायम ध्यानांत ठेंव, की सुखी-समृद्ध होण्यासाठी माणसाला काय करायचं, हे समजलेलं नसलं तरी फारसं कांही बिघडत नाही...ते अनुभवातनं यथावकाश समजतं...

पण कटाक्षपूर्वक काय करायचं नाही, हे मात्र स्वच्छपणे समजलेलं असावंच लागतं.
आणि वरील चार गोष्टी कुणासाठी- कश्यासाठी करायच्या असतात, हे स्वच्छ समजण्यासाठी माणसाला तत्त्वज्ञान हे पांचवं निर्णायक शास्त्र अवगत असावं लागतं... ... काय?
 ते जसजसं समजायला लागेल
, तसातसा ईश्वरानं आपल्याला जन्मतःच दिलेला ३२ अंशांचा दृष्टिकोण, बघतां बघतां २७० अंशापर्यंत विस्तृत होत जातो... ...
आणि मग अनेकविध असंबद्ध-अनाकलनीय घटनांमागची कार्यकारणमीमांसा माणसाला आपोआप समजायला लागते... ...
पण त्यासाठी नुस्तं विस्तृत वाचन पुरेसं नाही, तर त्यावर चिंतन- मंथन करायची संवयही असावी लागते, आणि ती ज्याची त्यालाच विकसित करून स्वतःला लावून घ्यावी लागते ... ...सगळं नीट लक्ष्यांत आलं ?"
मी,"होय मास्तर... ..."
तेव्हां त्यावेंळीं मास्तरांनी मला 'समृद्धो भंव' असा तोण्ड भरून आशीर्वाद दिलेला होता... ... ...
आतां मी मुळात समृद्ध झालो काय, अन्‌ असलो
, तर कितीसा? हे मलाही ठाऊक नाही... ...ते फक्त मास्तरच सांगूं शकतील... ...
पण ते समजायची शक्यताही आतां शिल्लक उरलेली नाही... ...कारण माझे मास्तरच आतां हयात नाहीत.

पण मास्तरांच्याच भाषेत सांगयचं झालं, तर उपरोक्त ३२ अंश ते २७० अंश या माझ्या दृष्टिकोणाच्या प्रवासाची सुरुवात मात्र तेराशे वर्षांपूर्वी ग्रथित झालेल्या एका तात्त्वज्ञानिक सुभाषितामुळं झाली... ...
मग अखिल प्राणीजगतांत माणसाच्याच बाबतीत सगळ्या गोष्टींची अशी कडबोळी कां होतात?... ...
श्री.अण्णा हजारे सरकार ला एकहाती कसे काय वांकवूं शकतात?... ...आणि एकशे चाळीस कोटी जनता पन्नास वर्षं ते एकत्रितपणेही कां करूं शकत नाही?
स्वतः पाश्चात्यांचं अंधानुकरण करीत अर्धवस्त्र पेहरावात फिरणार्‍या
भारतीय ललना बलात्कार विरोधी मोर्च्यात अग्रभागी कां कोंकलत असतात?
इथनं अमेरिकेसारख्या प्रगत देशात गेलेले तथाकथित बुद्धिवन्त तरूण, तिथल्या प्रगत तंत्रज्ञानावर कांहीतरी भाष्य करण्याऐवजी, 'आम्ही तिथं कसे चैन-चंगळबाजीत राहतोय्' याचंच सवंग ओंगळवाणं प्रदर्शन माण्डणारे सेल्फी च फेसबुक्‌ वर प्रत्यही कां टाकत बसतात?
असले प्रश्न पडणं तर थांबलंच, पण आजूबाजूच्या जगांत प्रत्यही घडणार्‍या गंमती-जंमती डोंळसपणे बघतांना, माझं मनोरंजनांसाठी मल्टिप्लेक्स ला जाणं ही बन्द झालं... ...!!
त्यामुळं प्रत्येकवेळी वांचलेल्या हजारभर रुपयांचा मी हल्ली सुकामेवा आणून घरांत भंरतो, अन्‌ मनमुराद खातो... ...
तब्येत ही छान राहते, ते वेगळंच...!!!

तर झालं असं, की आमच्या मास्तरांनी मला तत्त्वज्ञानाच्या गोडीसोबतच वांचनवेड ही लावलेलं होतं... ...
परिणामीं, दररोज शंभर- सव्वाशे
तरी पानं वांचायची संवयच लागली मला... ...ते झाल्याशिवाय हल्ली झोंपही नीट येत नाही.
या वांचनांत उपनिषदांपासून चांदोबापर्यन्त, आणि पाकशास्त्रापासून कोकशास्त्रापर्यन्त मी काय वाट्टेल ते वांचतो... ...मला कुठलंही वाचन वर्ज्य नाही.
तर बर्‍याच वर्षांपूर्वीं एकदां साहित्यपरिषदेच्या ग्रंथालयात गेलो असतांना तिथं मला 'भर्तृहरि ची शतकत्रयी' अश्या शीर्षकाचं एक संस्कृतात लिहिलेलं पुस्तक हाताला लागलं...
जरासं चांळून बघितलं, तर तत्त्वज्ञानावर लिहिलेलं असावं असं वाटलं, म्हणून ते वांचायला मी घरीं घेऊन आलो... ...
गंमत अशी झाली, की तेव्हां ते मी जे वांचायला सुरुवात केली, ते आजतागायत वांचतोच आहे... अगदी दररोज... ... !!!
आतांपावेतों त्याची कित्येक आवर्तनंही झाली असतील, पण प्रत्येकवेळी त्यातल्या हरएक सुभाषिताचा मला नवीनच अर्थ कळायला लागतो... ...
पण ग्रंथालयाचं पुस्तक असं किती काळ घरीं ठेंवून घेणार?
म्हणून मग अखेर जुन्या पुस्तकांच्या दुकानांत शोंधाशोंध करून मी तें विकतच घेऊन माझ्या संग्रहांत ठेंवलं...
आपण रोजच्या व्यवहारात 'येन केन प्रकारेण' असा वाक्प्रचार वापरतो ना, त्याचाही जनक हा भर्तृहरिच....
तो म्हणतो,             "घटं भिंद्यात्पटं छिंद्यादथवा रासभरोहणम्
                                    येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत् "
तात्पर्य, भर्तृहरि सांगतोय् की मनुष्य हा इतका विचित्र प्राणि आहे, की प्रसिद्धीच्या हव्यासापायीं तो कुठल्याही थंराला जाईल... ...भर रस्त्यांत कपडे फांडून घेईल, घरांतली भाण्डी-कुण्डी फोंडून तमाशा करील, अगदी गाढवावर उलटा बसून स्वतःची धिंडही काढून घेईल... ...पण प्रसिद्धी ची हांव कांही सोडणार नाही. !!
आजकाल फेसबुकवर दिवसागणिक शे पन्नास 'सेल्फी' छापणारे, किंवा सेल्फी काढण्याच्या हव्यासापायीं धंबधब्यात पडून, अथवा धांवत्या वाहनंकाली सापडून प्राण गमावलेले आचरट दबंग पाहिले, की मला भर्तृहरि चं हे वचन नेहमीच आंठवतं... ...
माणूस या द्विपाद प्राण्याची इतकी सर्वांगीण, अचूक आणि बिनतोड पारख करणारा भर्तृहरि हा कदाचित् एकमेव तत्त्वज्ञ असावा....... 
हा भर्तृहरि त्याच्या काळांतला एक चक्रवर्ति सम्राट होता... ...
आजच्या जमान्यातल्या चंगळवादी तरूण पिढ्यांनी गेल्या छप्पन्न पिढ्यात कल्पिलेही नसतील,असले तमाम स्वर्गीय सुखोपभोग भर्तृहरि च्या पायांशी लोळण घेत होते... ...
गम्मत अशी झाली, की हा भर्तृहरि त्या चंगळबाज सुखोपभोगानांच अखेरीस विटला, आणि स्वतःच्या पुतण्याला राज्याभिषेक करून तो चक्क हिमालयात चालता झाला... ...कफनी धारण करून... ...
तिथं त्यानं स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवर जे कांही चिंतन-मंथन केलं, त्या तत्त्वज्ञानाचं सारसर्वस्व त्यानं फक्त तीनशे श्लोकांत ग्रथित करून ठेंवलं... ...
त्याचं तोपर्यंतचं आयुष्य ज्या क्रमानं तीन कालखण्डांत गेलं, त्यानुसार हे श्लोक तीन शतकांत विभागलेले आहेत... ...
पहिलं शतक हे नीति शतक म्हणून प्रसिद्ध पावलं...
दुसरं शतक हे शृंगार शतक नांवानं अजरामर झालं... ...
आणि तिसरं शतक हे वैराग्य शतक म्हणून विद्वानांनी डोंक्यावर घेतलं... ... ...
त्यानं रचलेला हा महान ग्रंथराज 'भर्तृहरि ची शतकत्रयी' या नांवानं जगप्रसिद्ध आहे... ...
(जिज्ञासूनां जर कुठं मिळाला, तर अवश्य संग्रहीं ठेंवावा अन्‌ रोंज वांचावा, इतका उत्कृष्ठ आहे.)

ही शतकत्रयी पहिल्यांदा वांचत असतांना त्यातल्या नीतिशतकांतल्या एका सुभाषिता नं माझी नजर वेंधून घेंतली.
भर्तृहरि चा तो मूळ श्लोक संस्कृतात आहे, त्याचं भाषांतर असं आहे... ...
 


                              "अशन तृण पशूं ला, भक्ष्य वायू फणी ला
                                 अति सुलभ, विधी ने जीवनोपाय केला
                                 इह-पर गतिवेत्ता, झोंप ज्याची उडाली
                                 उदरभरणदुःखे सर्व विद्या बुडाली "... ...!!!

पहिल्या वाचनांत त्यातला फक्त विनोदच समजला... ...
गर्भितार्थ बहुतेक डोंक्यावरून गेला असावा...!!!
पण त्यावर जसजसं चिंतन- मंथन सुरूं झालं, तसतसा त्याचा सर्वव्यापी आवाका ध्यानांत यायला लागला... ...
विस्तारणारी दृष्टीही जाणवायला लागली, अन्‌ खात्रीच पटली, की केंवळ तेवीस शब्दांत गुंफलेलं, इतकं अचाट मूलगामी-सर्वव्यापी-त्रिकालाबाधित तत्त्वज्ञान मी तोंपावेतों कुठंच वांचलेलं नव्हतं...!!!

संस्कृतात 'अशन' याचा अर्थ खाद्य...यावरूनच हिन्दी भाषेत उपवासाला 'अनशन' हा विरुद्धार्थी शब्द रूढ झाला...
'फणी' याचा अर्थ साप...साप हा हवेवर जगतो अशी एक अंधश्रद्धा आहे.
आणि 'इह-पर गतिवेत्ता' याचा अर्थ ज्याला इहलोक-परलोक या संकल्पना जाणायची बुद्धी परमेश्वरानं दिलेली आहे, असा प्राणी - म्हणजे माणूस... ...
तर भर्तृहरि या सुभाषितात असं म्हणतोय् की,
विधात्यानं हे जग जेव्हां निर्मिलं, तेव्हां साहजिकच त्यातल्या प्रत्येक सजीवाच्या पोटापाण्याचीही त्यानं सोय करून ठेंवली.
पशू-पक्ष्यांसाठी त्यानं गवत निर्माण केलं,त्यामुळं ते सुखी झाले...
सापासारख्या प्राण्यासाठी त्यानं हवा निर्माण केली... ...ती भक्षून ते ही सुखी झाले... ...
अश्या तर्‍हेनं एक एक करीत जवळपास सर्व सजीव आपापल्या परीनं खाऊन पिऊन सुखी झाले... ... ...
पण इहलोक-परलोक कल्पिण्याइतकी बुद्धी मिळालेल्या माणसाची मात्र गोची झाली...
तो उदरभरणाच्या वेडात उपजत विवेकबुद्धी बुडवून मोकळा झाला, आणि म्हणून त्याच्याच वाट्याला सारे कृतकर्मभोग आले...यांत नवल तें काय?"

भर्तृहरि च्या उपरोक्त वचनांत 'विद्या' आणि 'उदरभंरण' हे दोन शब्द चंकवा देणारे आहेत... ...
या दोन शब्दांवर जेव्हां मी चिंतन केंद्रित केलं, तेव्हां मला असं लक्ष्यांत आलं की 'विद्या' हा शब्द त्यानं 'विवेक', 'सारासार विचार', 'सूज्ञपणा', 'शहाणपण', किंवा साध्या भाषेत आपण ज्याला 'अक्कल' म्हणतो, अश्या अनेकविध अर्थांनी योजलेला असावा... ...'पुस्तकी विद्या' या अर्थानं नव्हे.
आणि 'उदरभरण' हा शब्द तर सर्वव्यापी अर्थानं वापरलेला आहे... ... ...
प्रचण्ड डोंकेफोंड केल्यावर त्याचा 'वासनापूर्ति' असाही सर्वव्यापी अर्थ ध्यानांत आला... ...
नी मग साक्षात्कार झाला, की पोंट फुटेतों दररोज पैसा खात भ्रष्टाचाराच्या नांवानं शंखनाद करणं हे आद्य उदरभरण, चंगळबाजी हे ही उदरभरण, प्रसिद्धीलोलुपता हे पण उदरभरण, सौंदर्यप्राप्तीच्या आशेला लागून प्रसाधनांवर भरमसाठ पैसा उधळणं हे पण उदरभरण, कॉपी करून पास होणं हे पण उदरभरण, खालून ये जा करणार्‍यांच्या डोंक्यावर मातकट पाण्याचा अभिषेक होईस्तंवर आपल्या गॅलरीतल्या फुलाझाडांच्या कुंड्यांत बदांबदां पाणी ओंतणं हे ही उदरभरण, पाश्चात्यांचं ठार बिनडोक अंधानुकरण करणं हे पण उदरभरण, उठसूट सेल्फी काढून फेसबुकवर छापणं हे सुद्धां उदरभरण, न कळत्या पोरासोरांच्या हातांत गाड्या-मोबाईल देणं हे ही उदरभरण, 'मी अण्णा हजारे' असं छापलेली टोपी घालून घसा फुटेतों किंचाळणं हे ही उदरभरण, संरक्षण शस्त्रास्त्रसामुग्री च्या करारांत कमिशन खाणं हे ही उदरभरण, स्वतः अर्धवस्त्र पेहरावात फिरत बलात्कारविरोधी आंदोलनांत किंचाळत सामील होणं हे सुद्धां उदरभरण, एका रात्रीत 'फिल्म स्टार' व्हायच्या नादानं कर्ज काढून टी. व्ही. वाहिन्यांच्या चांचण्यांना हजेरी लावणं हे ही उदरभरण, बॅंकेकडून कर्ज घेऊन ते बुडवणं हे पण उदरभरण, पोरांच्या शाळा-कॉलेजच्या न्‌ सतराशे साठ क्लासेस च्या नुस्त्या फीज् भंरल्या, की तीं गुणवत्ता यादीत चंमकणारच असली गाजरं खाणं, हे पण उदरभरण, सोन्याच्या जाडजूड साखळ्या गळ्यात मिरवायला नगरसेवक होणं हे पण उदरभरण, भंरदिवसा असहाय्य 'निर्भया' वर झंडप घालणं हे ही चतुष्पादी उदरभरण, खोटी जात प्रमाणपत्रं मिळवणं हे ही उदरभरण, आरक्षणं मागून लायक उमेदवारांना देशोधंडीला लावणं हे
पण उदरभरण, परवाने, दस्तावेज इ. साठी लांच मागणं हे ही उदरभरण, नदीपात्राची पूररेषा बदलणं हे पण उदरभरण, पूरप्रवण नदीपात्रांत अतिक्रमण करून बांधलेल्या बेकायदेशीर वस्त्यांत घरं घेऊन रहायला जाणं, आणि घरादारांत पुराचं पाणी घुसलं की सरकारच्या नांवानं गळे काढणं हे सुद्धां उदरभरण, वाहतुकीचे कायदे धाब्यावर बसवत गाड्या उडवणं हे पण उदरभरण, आपल्यातल्या माणूसघाणेपणाला 'एकांतप्रियता' म्हणणं हे सुद्धां उदरभरण, उपवर मुलगा अमेरिकेत आहे एव्हढ्याच भांडवलावर कसलीही चौकशी न करतां त्याला वरणं हे पण उदरभरण, तिथं गेल्यागेल्याच विवाहित जोडीदाराला घटस्फोटाची नोटीस बजावणं हे ही उदरभरण, लिव्ह इन रिलेशनशिप हे सुद्धां उदरभरण, आणि मायदेशातल्या बेवारशी जन्मदात्यांची वृद्धाश्रमांत रवानगी करून परदेशात चालतं होणं, हे देखील उदरभरणच...फक्त त्याला 'पाशवी उदरभरण' असं म्हणता येईल... ...
असल्या सवंग उदरभरणांपायीं विवेकी शहाणपणाला जलसमाधी देऊन मोकळा झालेला मनुष्य त्या क्षणींच दोन ऐवजी चार पायांवर कधी चालायला 
लागले
ला असतो, हे त्याचं त्याला  देखील समजलेलं नसतं... ... कृतकर्मभोग मागं लागले की मग तें समजतं, पण तोपावेतों फार फार उशीर झालेला असतो, आणि कर्मप्राप्त भोगातनं त्याची कधीच सुटका होत नाही, असं तत्त्वज्ञान सांगतं .............

तेराशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका द्रष्ट्या माणसानं सांगितलेलं मर्मभेदी तत्त्वज्ञान कसं सर्वव्यापी अन् कालातीत असतं, तें शतकत्रयी वांचल्यावर मला समजलं... ...
अन्‌ ३२ अंश ते २७० अंशाचा दृष्टीचा प्रवास बराच सुखकर झाला. 
कशी गम्मत आहे बघा... ...
वर मी म्हटल्याप्रमाणं एकदां कां तत्त्वज्ञान समजायला सुरुवात झाली, आणि माणसाचा जन्मजात दृष्टिकोण बघतां बघतां विस्तारत गेला,
की मग वरकरणी एकमेकांशी सर्वथा असंबंधित अन्‌ अनाकलनीय वांटणार्‍या घटनांच्या मुळाशी सर्वव्यापी मानवी वृत्तिच कश्या कारणीभूत असतात, तेही लख्खपणे समजायला लागतं... ... ...

गेल्या चारपांच वर्षांपासूनच रोजच्या वर्तमानपत्रांत अपवादानं कां होई ना,पण चांगल्या, देशाबद्दल अभिमान वाटावा, अश्या बातम्या वांचनात येताय्‌त... ... ...
त्याआधीची तीसचाळीस वर्षं, वर्तमानपत्रांत येणार्‍या बहुतांशी बातम्यांच्या तळाशी माझ्या नजरेला हीच तळटीप दिसायची...
'उदरभरणदुःखे सर्व विद्या बुडाली'...!!!
एकदां कां विद्या - म्हणजे अक्कल
- बुडवली, की बाकी सगळंच बुडायला लागलेलं असतं... ... ...सगळं स्वाहा केव्हां होणार? एव्हढाच काय तो प्रश्न शिल्लक उरलेला असतो.
हे विद्या बुडवणं अजाणतां कां होई ना, टोंकाला गेलं, की जे कांही बघायला मिळतं, तेव्हां मला एक मूलभूत प्रश्न नेहमीच पडतो...
तो हा, की सुबुद्ध माणसं अशी विचित्र वागून व्यवहारी जगांत स्वतःचा विदूषक कां करून घेतात?
जन्माला आल्यास आजतागायत, कुठलीतरी प्रसिद्ध टूथपेस्ट वापरून एखाद्याचे किंवा एखादीचे नांगरफाळ म्हणावेत, अश्या वेड्यावांकड्या दातांच्या कुन्दकळ्या झालेल्या मला तरी माहीत नाहीत... ...
'फेअर ऍण्ड लव्हली'
दररोज तोंडाला फांसून कुणा शूर्पणखेची पद्मिनी झाल्याचंही माझ्या पाहण्या-ऐकण्यात नाही... ...
उलटपक्षी ब्युटी पार्लर मध्ये केल्या जाणार्‍या फेशियल च्या जबर नादी लागून स्वतःच्या गोमट्या चेहर्‍याचं भदं करून घेतलेल्या बायकाच मी ज्यास्त पाहिलेल्या आहेत... ...
एका बाईंच्या बाबतीत तर चेंहर्‍यावर फांसल्या जाणार्‍या त्या रोगणांनी, त्यांना दृष्टीमांद्य नी पुढं रातांधळेपण आलेलं उदाहरणही मी  पाहिलेलं आहे... ...
महागडे डी. ओ. फंवारून कुणा
ला वास मारणार्‍या घामाऐवजी सुगंधी घाम फुटायला लागल्याचं एकही उदाहरण मला ज्ञात नाही... ...
तरी असली चंगळबाज उत्पादनं आपल्याकडं दणकून खपत असतात... ...देशाची अर्थव्यवस्था महामन्दीच्या विळख्यात सापडलेली असली तरीही...
इतकी, की लक्षावधी रुपयांचा चुराडा करून क्षणांक्षणांला दूरदर्शनवर त्यांच्या जाहिराती करणंही निर्मात्यांना अगदी सहज परवडतं... ... ...
मला आंठवतंय्‌ ... ...सत्तरीच्या दशकांत सुती वस्त्रं-साड्या बनविणार्‍या
भारतातल्या एका सुप्रसिद्ध कंपनीच्या साठ्यात हजारों साड्या पडून राहिलेल्या होत्या.
निर्मात्यांना ती चिंता भेंडसावत असणारच...तर त्यांनी त्यावर एक नामी उपाय शोंधून काढला... ...
साठ्यात पडलेल्या साड्या या कोणतीही नक्षीबिक्षी नसलेल्या, साध्या नितळ अभिरुचीच्या काढलेल्या होत्या... ...
कंपनीनं त्या साड्या पुनश्च कारखान्यात मागवल्या, आणि विविध रंगांत त्यांवर निरनिराळ्या प्रकारच्या फुलाफुलांचं नक्षीकाम छापून घेंतलं...
आणि त्या साड्यांचं 'अपहरण साडी ' असं भावनिक नामकरण करून
तमाम वर्तमानपत्रांतनं दे दणादण जाहिराती झंळकवायला सुरुवात केली...
जाहिरातीत नौदलाच्या कडक पोषाखातला एक देखणा तगडा अधिकारी अपहरण साडी नेसलेल्या एका सिंहकटी सुंदरीच्या कमरेला हाताचा विळखा घालून उभा असलेला दाखवलेला असायचा... ...
बघतां बघतां त्या अपहरण साडी ज्वराची साथ दशदिशांत वणव्यासारखी पसरली...!!
इतकी, की एकच साडी अपघातानं निवडलेल्या दोन बायांची पुण्यातल्या एका साडी भांडारात अक्षरशः सुन्दोपसुन्दी जुंपलेलीही मला याचि देहीं याचि डोळां बघायला मिळाली... ...!!!
कंपनी अवघ्या तीनएक महिन्यांत गोदामांत पडून राहिलेल्या तमाम साड्यांची तडाखेबन्द विक्री करून  मोकळी झाली... ...तीही करोडों चा नफा खिश्यात घालून.
गंमत म्हणजे अपहरण साडी नेसल्यामुळं खरोखरच कुणा 'भाग्यवन्त सुंदरी' चं अपहरण झाल्याची एकही बातमी - अफवासुद्धां - आजतागायत प्रसारित झालेली नाही...!!
ना वर्तमानपत्रांत...ना आकाशवाणीवर...ना दूरदर्शनवर...ना ऐकण्या-बोंलण्यात... ...!!!
 

तात्पर्य, उदरभंरणदुःखे सर्व विद्या बुडाली ... ... !!!
 



ही उदरभंरणाची हाताबाहेर गेलेली उबळ जर नको त्या वेंळीच उपटली, तर काय होतं, हे मी शाळकरी वयात सहावी यत्तेत शिकत असतांना सत्तरी च्या दशकात स्वतःच अनुभवलेलं आहे... ...
आमच्या कोल्हापूर या जन्मगांवी ताम्हनकर नांवाचे एक नामवन्त लोकप्रिय डॉक्टर होते...
अत्यंत नेकी-निष्ठे नं व्यवसाय करणारे... ...गोरगरीबांवर तर मोफत उपचार करायचे.
आमच्या मंगळवार पेठेच्या कोंपर्‍यावरच दवाखाना होता त्यांचा...
१९६४ सालीं, एक दिवस ते स्वतः च हृदयविकाराच्या झंटक्यानं परलोकवासी झाले... ...वेंळ होती पहांटे पांच-साडेपांचची... ...
साहजिकच डॉक्टरांच्या अंत्यदर्शनाला अवघं गांव गोळा झालं... ...
त्यांना मूलबाळ कांहीच नसल्यामुळं त्यांच्या अंत्यकर्माची जबाबदारीही जमलेल्या गांवकर्‍यांनी हातोंहात उचलली... ...
कुणी सग्या-सोंयर्‍यांना निरोप पांठवायच्या कामाला लागले, आयाबायांनी डॉक्टरांच्या पत्नि, नी घर सांभाळायचा पत्कर घेंतला... ...
कुणी नगरपालिकेत 'परवाना' कांढायला धांवले ...
मग जमलेल्या वडीलधार्‍यांनी आम्हां दहाबारा पोरासोरांच्या चमूवर
, कापड आळी-बुरूड आळी-फुलबाजार-मंडई इ.ठिकाणं पालथी घालून अंत्ययात्रेचं सामानसुमान आणायचा हुकूम सोंडला... ...
त्या काळीं 'एसेमेस्‌' केला, की शववाहिनी हजर' असलं कांही अस्तित्त्वात नव्हतंच... ...सगळ्या अंत्ययात्रा तिरडी बांधूनच पंचगंगेच्या घाटावर नेल्या जायच्या.
झालं...हुकूम सुटतांच आम्ही पोरं दिलेले पैसे खिश्यात कोंबून सामान आणायला धांवत निघालो... ...तोंवर सकाळचे सहा वाजलेले होते.
कापड, बांबू च्या कामट्या, मडकं, उदबत्त्या, हार-फुलं वगैरे सगळं सामान खरेदी करून परत फिरेतोंवर सकाळचे आठ वाजायला आले होते... ...
आम्ही पोरं आपापल्या अंगाखांद्यावर ते सामान
वांगवत परत निघालो... ...वाटेत गावांतलं गंगावेस बस स्थानक ओलांडून माघारी यायचं होतं... ...
या बसस्थानकाच्या चौकातच आण्णाप्पा पैलवानाचं कोल्हापुरी मिसळ-पावा चं हॉटेल
-जे अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं-तें नुकतंच उघडलेलं होतं... ...
मिसळीच्या तर्री मारलेल्या मटकीच्या रटरटणार्‍या खमंग रश्श्या चा दरवळ दशदिशांत फैलावलेला होता... ...
तो नाकांत शिरतांच एकजात आम्हां सगळ्यांच्या पोंटात भुके नं कावळे कोंकलायला लागले.
भल्या पहांटे उठून डॉक्टरांच्या घरीं धांवतांना उठल्यापासून कुणाच्याच पोंटात घोंटभर चहा-दूध पण गेलेलं नव्हतं... ...!!!
जो तो इतरांच्या तोंडांकडं केविलवाण्या चेंहर्‍यानं बघायला लागला... ...
अन् मोहित्यांच्या
'पब्या' च्या डोंक्यात एक भन्नाट कल्पना आली...
ब्या,"ह्ये बगा रव्या-किन्या-जया आन् समद्यानूं... ...मला काय वाटतंया... ..."
सगळे,"काय वाटाय् लागलंया
रं तुला पब्या?"
पब्या,"आसं बगा... ...आतां ह्ये सामान पोंचवून
श्यान्‌ मर्तिक घरातनं निगायाच दीड-दोन तास जात्याल... ...त्याफुडं तिरडी घाटापत्तोर पोंचाया आजून तासभर म्हना... ...
मंग त्ये सरान-बिरान रचूनश्यान्‌ बाकीचं समदं उरकंस्तवर वाजत्याल दोनपारचं तीन-चार... ..."
सगळे,"बरं मंग?... ...म्हननं काय हाय तुजं?"
पब्या मग आपल्या कळवळलेल्या पोंटावर हात थांपटत म्हणाला,"आनि येवडं सगळं उरकंपात्तोर प्वाट उपाशीच की रं... ...ऑं?...
सक्काळच्यान् पान्याचा घ्वाट बी न्हाय प्वाटांत, आनि दम तरी कसा काडनार रं बाबानो इतका येळ आपुन?
प्वाटांत आत्तांच कावळं बोंबलाय् लागल्यात... ...कांव्-कांव्-कांव्‌ करूनश्यान्... ..."
सगळ्यांची अवस्था अगदी ती च झालेली होती... ...पब्या फक्त उघड बोलत होता इतकंच काय ते...
महाबळांचा बंड्या म्हणाला,"मंग... ...काय करूंया म्हनतोयास तूं?"
पब्या,"माजं आसं म्हननं हाय, की हातात येळ हाय तंवर आपुन समदेच आण्णाप्पाच्या हाटिलात मिस्सळ-पाव आन्‌ च्या घिऊनश्यान मंग परत जाऊं या... ...काय?"
पक्या शेळके,"आरं याड-बीड लागलंया काय रं तुला पब्या?... ...तकडं तिरडी बांदाया समदी मानसं सामानाची वाट बगत आसत्याल... ...लाता खायचा धंदा हाय ह्यो तुजा..."
चारदोन अंत्ययात्रां निभावलेला अनुभवी पब्या मग म्हणाला,"आतां गपगुमान माजं आयका राण्डंच्यानूं... ...
डागदरांच्या घरला येनारं पावनं-रावनं समदं गोळा व्हाया आजून येक तास तरी लागतूंया बगा...
तंवर सामानाची कुनाला आटवान बी हुयाची न्हाय... ...
आतां येकदां तिरडी उचालली कां न्हाय, की मंग खायाला-प्याला कंदी मिळंल... ...त्ये काय बी सांगतां येनार न्हाय बगा... ...मंग बसा बोंबलत दीसभर प्वाट चोंळत... ...नसंल, तर चला झंटक्यात माज्यासंगट आन्नाप्पाच्या हाटिलात ... ...

आन्‌ धा मिण्टांत खादडूनश्यान् फुडं सटकायचं... ...काय?"
हो ना करतां करतां अखेर तर्री च्या घमघमाटाचीच सरशी झाली... ...
सगळ्यांनी आपापल्या अवघडलेल्या अंगांखांद्यांवरचं सामान उतरवून हॉटेल च्या दरवाज्याजवळ दोन्ही बाजूं ना नीट लावून ठेंवलं... ...
अन्‌ सगळेच हॉटेलात शिरलो...
दरवाज्यालगतच्या गल्ल्यावरची बलदण्ड खुर्ची रिकामीच दिसत होती...बहुधा भली सकाळ असल्यामुळं आण्णाप्पा तालीम उरकून अजून गल्ल्यावर बसायला हॉटेलात दाखल झालेला नसावा... ...
मग पब्या म्हणाला,"चला रं
आत...पेशल रूममंदी बसूं या... ...चला चला"
पब्याच्या मागनं आम्ही सगळी पोरं हॉटेलची दर्शनी खोंली ओलांडून आंतल्या 'पेशल रूम' मध्ये घुसलो... ...
तिथं हॉटेल चा मॅनेजर संभा इंगवले टेबलं-खुर्च्यांची मांडामांड करीत होता...
आणि पाठीमागचा दरवाजा सताड उघडा ठेंवून आचारी चुलाणावरच्या भल्यामोठ्या पातेल्यात रटरटणारा मिसळीचा रस्सा ढंवळत बसलेला होता.
पांठीमागच्या उघड्या दरवाज्यातनंच रश्श्याचा खमंग वास चहूंबाजूला फैलावत होता... ...  
संभाजी नं 'काय पायजेलाय् रं पोरानूं तुमास्नी?' असं विचारल्यावर पब्या नं आंठ बोटं दांखवून 'पेश्शल मिस्सळपाव' अशी ऑर्डर सोडली.
चंमचंमीत 'पेश्शल मिस्सळ-पाव' पुढ्यात आल्या आल्या सगळेच आपापल्या थाळ्यांवर बांगलादेशी निर्वासिताच्या थाटात तुटून पडले... ...!!


 'उदरभंरण' यथेच्छ झाल्यावर मग पब्या नं सगळ्यांसाठी 'पेश्शल च्या' ची ऑर्डर सोंडली... ... ...
चहा फुंकून पितांपितां हॉटेल
च्या बाहेरनं माणसांचा गजबजाट कानांवर पडायला लागला... ...!!
कुणीतरी म्हणत होतं,"आरारारारारा... ...लई वंगाळ झालं वो ...आन्नाप्पा मंजी आगदी लाकांत योक मानूस व्हता बगा... ... ..."
दुसरं कुणी म्हणत होतं,"आवो, आकाड्यात शड्डू हानत ह्यो गडी येकदां उतारला कां न्हाय, तर फुड्यात कुनी बी पैलवान ठंरत न्हव
ता बगा... ...
खडाखडीतच दोन मिण्टांत पार चितपाट्... ...काय?"
तिसरं कुणीतरी कुजबुजलं," न्हायतर काय वो?... ...शेजारा-पाजाराला आगदी योक नंबरी मानूस वो... ...आतां वरचं आवतान काय सांगूनश्यान् येतंया व्हंय कुनाला? आक्षी वंगाळ वंगाळ झालं बगा...

पर कश्यानं ग्येलं म्हनं आन्नाप्पा ?"
तेंव्हढ्यांत खुद्द आण्णाप्पाचा च गडगडाटी आवाज हॉटेल च्या दरवाज्याबाहेर घुमला,"संभ्या... ...जरा भाईर ये वाईच भडव्या... ..."
संभाजी,'आलूं आलूं आन्नाप्पा दादा' असं केंकाटत हॉटेल बाहेर धांवला... ...
बाहेर अडीचशे पाउण्डी धिप्पाड आण्णाप्पा गरागरा डोंळे फिरवत जमलेल्या गर्दीच्या केंद्रभागीं उभा होता... ...
संभानी नं,"कश्यापायीं हांकारलंसा दादा?" असं म्हणायचा अवकाश,
आण्णाप्पा नं पांपणी झंपकायच्या आंत पायातली दोन किलो वजनाची अथणी वहाण काढून फाड्‌दिशी संभाजी च्या कानफटांत भडकावली... ...!!!
नशीब...संभाजीरावही आखाड्यांत कधीमधी घुमायचे म्हणून निभावलं, नाहीतर दारात ठेंवलेलं सामान त्यांच्याचसाठी वापरायची वेंळ जमलेल्यांच्यावर ओंढवली असती...!!!
,"काय रं संभ्या... ...द्येवाघरला डागदरसायेब गेल्यात...आजच्याला फाटंच... ...ठावं हाय न्हवं तुला?"
संभ्या चांचरला,"ठावं हाय मला आन्नाप्पादादा... ..."
अन्‌ दरवाज्यालगत आम्ही रचून ठेंवलेल्या मर्तिकाच्या सामानाकडं बोंट रोंखून आण्णाप्पा कडाडला
,"ठावं हाय न्हवं तुला? मंग माजी तिरडी बांदाया ह्ये सामान घिऊनश्यान् कोन राण्डंचा आडमाडलाय् हंतं?... ...ऑं?... कुटं हाय त्यो?"

हातांतले चहाचे कप  टांकून कपाळांना हात लावत आम्ही सगळे आतां पब्या कडं आ वांसून बघायला लागलो... ...!!
अन्‌ दुसर्‍याक्षणीं कपाळ बडवून घेंत बाळ्या रेवडेकर खुसफुसला,"पळां भोसडीच्च्यानूं...पळां आतां  बुरूडगल्लीकडं... ...ह्ये पब्या रांडंचं आ
तां आन्नाप्पाच्या लाता खातंय् बगा मरंस्तंवर... ...
पळा पळा बुंगाट...गाण्डीला पायत्तानं लावूनश्यान् ... ..."
दुसर्‍या क्षणीं भटारखान्यात पसरलेली भांडीकुंडी तुडवत पब्या सकट सगळ्या पोरांनी पाठीमागच्या दारातनं जीव खाऊन बुरुड गल्लीकडं धूम ठोंकली... ...!!!
पुनश्च सगळं सामानसुमान खरेदी करून डॉक्टरांच्या घरीं पोंचेस्तंवर दहा वाजत आलेले होते... ...
म्हणून घरच्यांच्या लाथा-शिव्या खाव्या लागल्या त्या वेगळ्याच...
पण आण्णाप्पा च्या लाथाबुक्क्या खाण्यापेक्ष्या तें परवडलं... ...!!!
तात्पर्य, 'निसर्गदत्त उदरभरण' करतांना
ही अक्कल जर केळी खात घालवली, तरी असले जिवावरचे प्रसंग सुद्धां नशिबाला येऊं शकतात..........

मग मूलभूत प्रश्न असा उपटतो, की देवानं बुद्धीचं वरदान दिलेला मनुष्यच इतका बिनडोकपणे कसा काय, आणि कां वागतो?
आणि विचार करतां करतां मी फिरून फिरून परत भर्तृहरि च्या त्याच सिद्धान्तापाशी येऊन थंबकतो... ...
 

'उदरभरणदुःखे सर्व विद्या बुडाली'!!!
 

एकदां कां सगळी 'विद्या' च बुडवून मोकळं झालं, की मग सगळंच सरळसोप्पं... ...!!!
मग त्याची जी काही फलनिष्पत्ती होते, तिचं आश्चर्य वाटायचंही कांही कारण उरत नाही... ...
शिल्लक उरतं ते फक्त 'लॉरेल-हार्डी' चा तुफान विनोदी सिनेमा बघणं...
अणि त्यासाठी पांच-सातशे रुपयांचा चुराडा करून कुठल्या
ल्टिप्लेक्स ला पण जावं लागत नाही... ...
सगळं अगदी चकट फू... ... ...!!!
काय...? 
  
*********************
**************************************************************************
-- रविशंकर.
१० सप्टेंबर २०१९.

No comments:

Post a Comment