Search This Blog

Saturday 7 September 2019

॥ द लास्ट नॅनो ॥

॥ द लास्ट नॅनो ॥



आमच्या ' नानिवडेकर ' नामे लांबलचक आडनांवाची एक महागोची आहे.
ती म्हणजे मला 'नानिवडेकर' अशी अचूक हांक मारणारे महाभाग आजतागायत अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच भेंटलेले आहेत.
नानिवडेकर या एकही जोडाक्षर नसलेल्या सरळसोट आडनावाचे नानावडीकर, नावडीकर, नेवडीकर , नानाकर , नाणेकर , वाडेकर, वडेकर, नेवाळकर, नावरकर, असले महाभयंकर अपभ्रंश करीत हाका मारणारेच बहुतांशी.
फार काय, मला 'नानावटी' अशी हांक मारून एका झंटक्यात माझा पारशी बाबा करून ठेंवणारे जादूगार देखील भेंटलेले आहेत.
अश्या हाकांना न त्रासतां ओ देत वयाची पंचवीस एक वर्षं जगल्यानंतर कदाचित नव्या तरूण पिढ्यांना माझी दया आली असावी...
कारण त्यानंतर तहहयात सगळीकडं 'टी ४ यू' वाल्या आचरट 'मोबी लिंगो' च्या तालावर मला 'नाना', आणि आमच्या सौ.इंदिराजी नां ' नानी ' अशी सुटसुटीत संबोधनं तमाम सगळ्या ठिकाणी कायमची चिकटली, आणि नातवण्डांचा पत्ता नसून देखील तिशीतच आम्हां दोघांची 'आज्जी-आजोबा' त रवानगी झाली...!!
असो...उपनामाच्या द्रौपदी वस्त्रहरणापेक्षा हे परवडलं... ...!!

," घे नाना...पेढे घे...आणि हा पहिला नारळ गाडी ची पूजा करून तूच फोंडायचा बरं का... ..." माझा मित्र उदय तळवलकर टमटमीत केशरी पेढ्यांचं खोकं माझ्या पुढ्यात धंरीत म्हणाला.
मी दोन टंबू तोंडात टाकीत शो रूम चे मॅनेजर श्री. ओकांच्या सह उदय च्या नव्या कोर्‍या 'टाटा टायगो' कडं मोर्चा वळवला.
गाडीला हळद कुंकू वाहिलं, उदबत्ती पेंटवून ओंवाळली आणि पहिल्याच रट्ट्यात फाड्‌दिशी असा कांही नारळ फुटला, की खोबर्‍याची भकलं दाही दिशांत उडाली... ...
उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला... ...
तारीख होती ११ जुलै २०१९... ...स्थळ होतं पुण्यातली टाटा मोटर्स ची शो रूम.

पेढे-खोबर्‍याचे चंविष्ट तोंबरे भंरत सारे उपस्थित 'ऑदय्‌जी...ऑभिनॉन्दॉन बॉरॉ कॉ ' म्हणत उदय ला शुभेच्छा द्यायला लागले...
आणि शो रूम चे व्यवस्थापक श्री. ओक यांनी माझी दाण्डी उडवली... ...
ओक," काय नानासाहेब... ...आतां तुमच्या नव्या गाडीचा नारळ कधी फोंडायचा?"
उपस्थितातल्या चारदोन टवाळ मित्रांनी ओकांच्या प्रस्तावाला तडका मारला," हूं... ... नाना...चला होऊन जाऊं द्या."
आणि मी भर शो रूममध्ये कपाळावर हात मारून घेतला...!!


मी,"काय होऊन जाऊं द्या लेको... ...ऑं?"
झालं होतं असं,की माझ्या व्यावसायिक कारकीर्दीतली शेवटची तीसएक वर्षं टाटा मोटर्स मध्येच गेलेली असल्यानं ऑटोमोबाइल्स्‌ च्या क्षेत्रात माझा मित्रपरिवार अस्ताव्यस्त पसरलेला होता...
आणि त्यातलेच कांही जवळचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते... ...सगळे घरचेच म्हणावेत असे संबंध...त्यामुळं फिरक्या ताणणं ओघानं आलंच... ...
आणि आतां तें च नेमकं सुरूं झालेलं होतं... ...!!
माझ्या इंडिकाची देखभाल तहहयात सांभाळणारा चारू म्हणाला,"म्हणजे नाना... ... त्याचं काय आहे की..."
मी घोंघावायला लागलेल्या 'कल्ल्या' ला तत्क्षणीं बूच मारलं,"त्याचं कांहीही नाही... ...समजलात?... ...आहे ही इंडिका झकास चाललीय् माझी... ..."
प्रदीप,"अहो असं काय करताय् नाना?... ...जरा आजूबाजूला बघा युरो ६ मानकांत बसणार्‍या, अत्याधुनिक सोयी असलेल्या गाड्या फक्त तुमच्या होकाराची वाट बघताय्‌त......."
मी,"अरे बाबांनो...मला त्या युरो ६ मानकाचा अन्‌ अद्ययावत सुखसोयींचा कसला काय उपयोग आहे ?... ...उगीच आपलं हरभर्‍याच्या झाडावर चंढवायला बघूं नकां मला... ...कांही उपयोग होणार नाही... ...माझी व्ही २ आहे ती माझ्या गरजा भागवायला पुरेशीही आहे आणि ठणठणीत पण आहे अगदी... ..कळलं?"
पण माघार घेतील ते यार दोस्त कसले? आणि श्री.ओक देखील मला घोड्यावर बसवायची अशी आयती चालून आलेली संधी थोंडीच सोडणार होते?
चारू,"नानासाहेब... ...अहो आतांपावेतों तुम्ही व्ही २ अगदी पोंटभर वापरलीत नां? तब्बल सतरा वर्षं वापरलीत... ...आतां अजून तिला किती चिकटून बसायचं...काय? ह्या नवीन आलेल्या टायगो, ने़क्सा, हॅरिअर गाड्या नुस्त्या बघां तरी... ...तुमच्याच कंपनीच्या आहेत... ...अगदी नेव्हिगेशन सिस्टिम, ब्ल्यू टूथ, एअर बॅग्ज काय म्हणाल ते सगळं आहे या गाड्यात... ...नुस्त्या बघा तरी..."
मी,"कांही नको बघायला... ...माझी इण्डिका व्ही २ बस्स आहे मला..."
आतां श्री.ओकांनी बाह्याच सरसावल्या," नानासाहेब...समजा...म्हणजे फक्त समजा, की नवीन गाडी घ्यायचा विचार आहे तुमचा, आणि त्यासाठी तुम्ही इथं आलाय्... ...तर आत्तांच या चारू साहेबांनी ज्या कांही सुखसोयी सांगितल्या, त्या तुम्ही नव्या गाडीत अपेक्षिणार नाही?"
मी,"अजिबात नाही... ...माझा अजून तरी शिराळशेठ झालेला नाही... ...!!"
श्री.ओक," नाही? अहो मग नवीन गाडीत काय काय सोयी असाव्यात अशी अपेक्षा असेल तुमची?"
मी ओकां ना टांग मारली,"गाडी पुढं जाणारा गिअर टाकला की पुढं जावी...मागं जाणारा गिअर टाकला की मागं जावी, आणि ब्रेक लावला की थांबावी... ..."
सगळे माझ्याकडं आं वांसून बघायला लागले...
मग खोः खोः हंसायला लागले... ...
अन्‌ दस्तुरखुद्द श्रीं ओंकांनी च स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!,"नानासाहेब... ...तुमच्याबरोबर या विषयावर बोलण्यात कांही अर्थ नाही..."

तरी पण, सांप्रत मंदीच्या विळख्यात सापडलेल्या ऑटोमोबाईल्स क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर श्री. ओकांची चिकाटी वाखाणण्याजोगी होती... ...
,"नानासाहेब...तुमची इण्डिका, ही व्ही२ जेव्हां बाजारात उतरवली, तेव्हांच्या दुसर्‍या तिसर्‍या बॅचमधली... ... बरोबर ना?"
मी,"बरोबर."
श्री. ओक,"म्हणजे साधराण २००२ किंवा २००३ सालची असावी... ...बरोबर?"
मी,"होय... ...२००२ साली ती मी घेतली..."
उदय,"म्हणजे नाना...पंधरा वर्षांची पहिली इनिंग संपून तुझी इण्डिका आतां दुसरी पांच वर्षांची इनिंग खेळतीय्... ...होय ना?"
मी,"अर्थातच... ...आणि अजूनही ती अगदी खणखणीत आहे... ...आणखी तीनचार इनिंग्ज्‌ तरी अगदी आरामात खेळेल ती... ...तेव्हां..."
श्री. ओक,"काय हे नानासाहेब... ...अहो तुम्ही निर्मातेच असं करायला लागलात, तर आम्ही डीलर्स नी मग कुणाच्या तोंडाकडं बघायचं... ...ऑं?"
मी,"आय्.टी. वाल्यांकडं मोर्चा फिरवा तुमच्या तोफेचा... ...पैसा उडवण्यात त्यांचा हात कुणी धंरीत नाहीत...बक्कळ धंदा कराल...!! ...काय?"
आतां मात्र सार्‍यानी च आपापल्या कपाळां ना हात लावले...!!!
सगळे खोः खोः हंसायला लागले...अन्‌ पांच दहा निमिटांत उदयजीं चं परत अभिनन्दन करून आपापल्या वाटांनी पांगले...
आतांपावेतों शो रूम मधले कर्मचारी दुपारच्या जेवणाच्या सुटीसाठी निघून गेलेले होते. तिथे उरलो होतो आम्ही चौघेच...स्वतः मी, श्री. ओक, उदय, अन्‌ त्याची नवी कोरी टायगो.
तेव्हां उदय म्हणाला,"हे बघ नाना...आतां झालीय् भोजनाची वेळ. तेहां गाडी इथंच राहूं दे.
मग ओकांच्याकडं निर्देश करीत म्हणाला,"यांना जरा वेळ असेल, तर आपण तिघंजण इथं जवळच कुठंतरी जेवून घेऊंया... ...ही माझी पार्टी समजा हवं तर."
पुढं अर्ध्या-पाऊण तासांत आम्ही जवळच असलेल्या थ्री कॉइन्स्‌ मध्ये उदयची पार्टी खाऊन शो रूम ला परत आलो, आणि निघायची वेळ झाली, तेव्हां ओक म्हणाले,"नानासाहेब...यांना गडबड असेल तर निघूं द्या... ...पण तुम्ही जरा थांबा...बर्‍याच काळानं भेंटतो आहोत, तेहां जरा गप्पा मारूं, आणि तासाभरांनं तुम्हांला घरी सोडायची मी व्यवस्था करतो... ...चालेल?"

उदय आम्हां दोघांबरोबर हस्तांदोलन करून नवी गाडी घेऊन त्याच्या घरी गेला, अन् ओक म्हणाले," चला नानासाहेब... ...माझ्या कक्षांतच बसून बोलूं या."
त्यांच्या कक्षात स्थानपन्न झाल्यावर मग आमच्या मनमोकळ्या गप्पा सुरूं झाल्या... ...
मी,"बोला ओकसाहेब... ...धंदापाणी कसं काय सध्या?... ...मंदीचा काळ आलाय् म्हणून विचारतोय्... ..."
श्री. ओक,"अहो कसला धन्दा अन्‌ कसलं पाणी आलंय्... ...तोण्डचं पाणी नाही पळालं, म्हणजे मिळवलं... ...
 तसं इतर स्पर्धकांच्या मानानं जरा बरं चाललंय्‌ म्हणायचं इतकंच...पण मी तुम्हांला दुसर्‍याच कारणासाठी थांबा म्हटलं... ..."
मी,"बोला... ..."
श्री. ओक,"म्हणजे नवी गाडी गळ्यात मारण्यासाठी तुम्हाला थांबवून घेतलं असं समजूं नका बरं का... ..."
मी,"अहो मी तसं कसं समजेन?...दहा वर्षं झाली, आपण चांगले ओंळखतो एकमेकांना..."
श्री. ओक,"मी तुम्हांला थांबवून घेतलं कारण एक गोची माझ्या ध्यानात आली म्हणून... ...तुमच्या इण्डिकाबद्दल... ..."
मी," मग बोला की... ...काय झालीय् गोची...?"
श्री. ओक,"असं बघा नानासाहेब... ...तुमचा या इण्डिकावर किती जीव आहे ते मी चांगलं जाणतो...

आतां तिला सतरा वर्षं झालीत... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर..."
श्री. ओक,"तात्पर्य, गाडीच्या नोंदणीचं नूतनीकरण पुढील पांच वर्षांसाठी... ...म्हणजे २०१७ ते २०२२ कालावधीसाठी तुम्ही दोन वर्षांपूर्वीच करून घेतलं असणार...सध्या २०१९ साल सुरूं आहे. म्हणजे वाढीव नोंदणीकरणातली पण दोन वर्षं तुम्ही गाडी वापरलीत... ...आणि आतां तीन वर्षांचा कालावधी शिल्लक राह्यलाय्... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर..."
श्री. ओक,"आतां तुम्ही याच क्षेत्रातले... ...तेव्हां तुम्हांला ठाऊक असेलच, की सरकार नं आतां पर्यावरणपूरक अश्या विजेर्‍यावर चालणार्‍या गाड्यांच्या उत्पादनाला चालना द्यायचं ठंरवलंय्... ...आणि पेट्रोल-डिझेल इंजिनावर चालणार्‍या गाड्यांवर युरो ४ ऐवजी युरो ६ ची मानकं बन्धनकारक केली आहेत... ...आणि तुमची इण्डिका ही युरो २ मानकांतच बसणारी आहे...होय ना?
मी,"बरोबर...मला माहीत आहे ते..."
श्री.ओक,"तात्पर्य, तुम्ही अजून तीन वर्षं इण्डिका वापरलीत आणि २०२२ मध्ये
नोंदणीचं नूतनीकरण करायला गेलात, तर ते होण्याची शक्यता अगदी नगण्य धूसर आहे... ...!!!
 सरकारचा कुणी भंरवसा द्यावा?... ...'आले देवाजी च्या मना करूं काय नारायणा?'...काय?
 आणि तसं झालं, तर मग इण्डिका कदाचित भंगाराच्या भावातही विकायची वेळ येईल तुमच्यावर नानासाहेब... ...शिवाय पूर्ण पैसा ओंतून नवी गाडी घ्यावी लागेल ते वेगळंच... ..."
आतां मात्र मी चंमकलोच, आणि कपाळाला हात लावत म्हटलं,"खरंय् तुमचं ओकसाहेब... ...हे लक्ष्यांतच आलं नव्हतं माझ्या... ...काय करावं म्हणताय् आतां?"
श्री.ओक,"नानासाहेब, असं बघा... ...गाड्यातले मुरब्बी लोक तुम्हीच, पण मार्केटशी आमचाच रोजचा संबन्ध येतो, आणि वारे कुठल्या दिशेनं वाहताय्‌त ते आम्हांलाच लगेच समजतं... ...तेव्हां..."
मी," तेव्हां... ...काय?"
श्री.ओक,"तेव्हां कधीतरी गाडी बदलायचा विचार असेल तुमचा, तर आत्तांच...म्हणजे हे वित्तीय वर्ष संपायच्या आतच ती कार्यवाही उरकून तुम्ही मोकळं व्हावं असं मला वाटतं... ...यात दुसरेही दोन फायदे   आहेत... ..."
मी," ते कोणते?"
श्री.ओक,"एकदां तुम्ही या वर्षांत नवी गाडी घेतलीत, की तिची नोंदणी पुढच्या पंधरा वर्षांसाठी वैध असणारच... अगदी पेट्रोल-डिझेल च्या गाड्यांवर बंदी आली तरी... ...
 म्हणजे पुढच्या पंधरा वर्षांची चिंता तुमच्यापुरती मिटलीच...मग सरकारचे निर्णय कांहीही होवोत... ....होय की नाही?"

मी,"होय...खरंय् तुमचं म्हणणं... ...आणि दुसरा फायदा कोणता?"
श्री.ओक,"ही तुमची इण्डिका डिझेल वर चालणारी गाडी आहे... ...डीझेलच्या गाड्या व्यावसायिक वर्गच ज्यास्त वापरतो...
 आतां तुमची इण्डिका  कोण विकत घेईल? तर ज्याला तिची नोंदणी व्यापारी स्वरूपाची करून तिचा टॅक्सीसारखा वापर करून उर्वरीत तीनएक वर्षांत दोनचार लाख कमवायचे आहेत असाच         कुणीतरी... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर..."
श्री. ओक," आणि ते साध्य करून द्यायची क्षमता, आणि का
लावधी तुमच्या गाडीत फक्त या वर्षीच आहे... ...आलं लक्ष्यांत?"
मी,"हं... ...आलं लक्ष्यात सगळं आतां माझ्या... ...पण एक समस्या आहे...ती कशी सोडवणार?"
श्री.ओक,"काय समस्या आहे तुमच्या पुढ्यात?"
मी," असं बघा ओकसाहेब... ...आतांपावेतो मारुती ८०० पासून मर्सिडीझ ई क्लास पर्यन्त सगळ्या गाड्या प्रसंगोपात वापरून आतां माझी गाड्यांची सारी हौस फिटल्यात जमा आहे...
 आतां पूर्वीसारखी प्रचण्ड धांवपळही मागं उरलेली नाही, आणि गाड्या शेकडो किलोमीटर्स पळवायची रग पण शिल्लक उरलेली नाही... ...आतां माझा गाडीचा शेकडा ८०-९०टक्के वापर हा शहरांतर्गतच   असतो... ...
 तेव्हां शहरातल्या 'रॅम्बो सर्कस' वाहतुकीत गाडी वापरायची म्हणजे तिच्यात ए. एम्. टी. म्हणजे ऑटोमेटेड मॅन्युअल् ट्रान्स्मिशन असणं अत्यावश्यक... ...बरोबर ना?"
श्री.ओक," अगदी बरोबर बोललात नाना... ...पुढं."
मी," हल्ली तर शहरात वापरायला मला इण्डिका पण जराशी बोजडच वाटायला लागलीय्... ...तात्पर्य म्हणजे नवी गाडी जी कोणती असेल ती बोजड नसून सुटसुटीतच असायला हवी... ...आणि तिच्यात    ए.सी., हीटर, आणि पॉवर स्टिअरिंग पण अत्यावश्यक... ...खरं की नाही?"

श्री.ओक,"आतां आम्ही लोक तुमच्यासारख्यांना यातलं काय सांगणार हो?... ...पण खरंय् तुम्ही म्हणताय् ते... ..."
मी," आतां असं बघा... ...असे गुणविशेष असलेली
, सध्याच्या अगदी निम्न स्तरातली जरी गाडी घ्यायची म्हटलं, तरी कमीतकमी सात-आठ लाख ओंतावे लागतील मला...माझ्या मर्यादित गरजांचा विचार   करतां हा खर्च अतीच होईल... ...दुसर्‍या शब्दांत सांगायचं तर पांढरा हत्ती विकत घेऊन पोंसत बसण्यासारखं होईल ते... ... हे एक झालं... ...आणि सुटसुटीत गाड्यांच्या स्तरांत अशी कुठलीच गाडी  सध्या बाजारात नाही... ...आहे ना कठीण समस्या?"
श्री. ओक क्षणभर विचारात पडले, मग म्हणाले,"आहे खरी समस्या नाना... ...तुम्ही म्हणताय् तशी कुठल्याच कंपनीची गाडी सध्या बाजारात नाही... ...ज्या कांही आहेत
, ते एकजात सगळे पांढरे हत्ती च म्हणावे लागतील... ...पण तुम्हांला अगदी हवी तशी एकच गाडी होती बाजारात, पण तिचंही उत्पादन आठ-दहा महिन्यापूर्वीच थण्ड झालंय्... ...पण खटपट करून बघितली तर अजूनही एखादी मिळायची धूसर कां होई ना, शक्यता नाकारतां येणार नाही... ...एक काम करूं या... ..."
मी,"अहो काम तर करूं च... ...पण कुठली गाडी म्हणताय् तुम्ही?"
श्री.ओकां नी आतां बॉंबगोळाच टाकला,"काय हे नानासाहेब... ...अहो तुमचीच गाडी... ...नॅनो...!!!"
आतां मात्र मी च कपाळाला हात लावला... ...!!
श्री. ओक म्हणत होते ते खरंच होतं...हे म्हणजे दिव्याखाली अंधार म्हणतात, त्यातलीच गत माझी झालेली होती...
आजच्या कुठलेच नियम न पाळणार्‍या महाबेशिस्त वाहतुकीत नॅनो ही च एकमेव गाडी माझ्या गरजांत, आणि सुटसुटीतपणाच्या कल्पनेत चपखल बसली असती... ...
दिसायला छोटीशी...अगदी खेळण्यातल्या गाडीसारखी, पण इण्डिकापेक्षाही प्रशस्त अन्‌ आरामशीर...केवळ चार मीटरची वळणत्रिज्या...चोंदटलेल्या पार्किंग मध्येही सहज ढकलतां येईल अशी...म्हटलं तर दोन, अन् गरज पडली तर चार माणसं आणि थोडंफार सामान वाहून न्यायची क्षमता... ...आंतर नगरी प्रवासालाही वापरतां येण्यासारखी...इंजिन तमाम गाड्यांत सर्वात छोटं - ६२५ सी. सी. चं - म्हणजे इंधनाच्या दृष्टीनं पण किफायतशीर... ...
खरोखरच दिव्याखाली ठार मिट्ट काळोख झालेला होता... ...!!!


पण आतां दिवा पेंटवून उपयोग तरी काय होणार? गाडी बाजारात कुठंच उपलब्ध नव्हती... ...
मी,"तुमचं म्हणणं अगदी शंभर नंबरी सोनं आहे ओकसाहेब... ...पण आतां काय उपयोग? आणि नॅनो त ही एक डावा भाग आहेच माझ्या माहितीनुसार... ..."
श्री.ओक,"कसला डावा भाग म्हणताय् तुम्ही?"
मी,"नॅनो ला इंजिन पाठीमागच्या बाजूला असल्यामुळं तिला पाठीमागच्या बाजूला सामान ठेंवण्यासाठी - अगदी भाजीच्या चारदोन पिशव्यासुद्धां - बिल्कुल जागाच नाही... ...फार कश्याला, तिला मागच्या    बाजूला उघडझांप करतां येणारा दरवाजा, ज्याला हॅचबॅक म्हणतात, तो ही नाही... ...माझ्या मते नॅनो लोकांच्या नापसंतीला उतरण्याचं बहुधा हे च एकमेव कारण असावं...इतर सगळ्या बाबतीत अगदी    झकास गाडी होती ती... ...अहो नॅनो गाडी च्या विकासाचं त्या वेळी जे काम कंपनीत चाललेलं होतं ते मी अगदी जवळून पाहिलेलें होतं... ..."
श्री.ओक,"नानासाहेब, इण्डिका व्ही २ नं जेव्हां मार्केट खिश्यात घातलं, त्यासुमारास तुम्ही सेवानिवृत्त झालात... ...आणि पुढं दोनएक वर्षांनी नॅनो चं प्रत्यक्ष उत्पादन सुरूं झालं... ...बरोबर?"
मी," अगदी बरोबर... ...२००६ साली मी निवृत्त झालो, आणि २००८-२००९ च्या आसपास नॅनो चं उत्पादन सुरूं झालं असावं."
शी. ओक,"बरोबर आहे तुमचं... ...२०११ च्या आसपास नॅनो बाजारात उतरली, आणि २०१८ मध्ये कंपनीनं तिचं उत्पादन थांबवलं. साहजीकच निवृत्तीनंतर या काळात नॅनो त काय काय सुधारणा    झाल्या, याच्याशी तुमचा तितकासा संपर्क आला नसणार... ...होय ही नाही?...निवृत्ति नंतर तसं होणं साहजिकच होतं... ..."
मी,"म्हणजे अगदी ठार अनभिज्ञ नाही राहिलो मी... ...पण बारकावे माहीत असण्याइतका संपर्क मात्र राहिला नाही हे खरं..."
श्री.ओक,"आतां ऐका...एकूण आठएक वर्षांच्या हयातीत, नॅनो चे पांच सुधारित अवतार बाजारात आले... ...सुरुवातीची तुमच्या आठवणीतली पाठीमागं बन्द असलेली नॅनो...तीनंतर पाठीमागं सामान ठेंवायची सोय असलेली हॅचबॅक प्रथम आली...नंतर सी. एन्‌. जी. वर चालणारं इंजिन आलं...त्यानंतर ए. सी. आला...पुढं हीटर पण आला... कांही काळानं पॉवर स्टीरिंग पण आलं... ...यथावकाश पॉवर विंडोज् , आणि सगळ्यात शेंवटी ए. एम्. टी., असलेली नॅनो पण बाजारात उतरली... ...नॅनो
एक्स. टी. ए. "




मी आ वांसला,"काय सांगताय् काय ओक साहेब?"
श्री.ओक,"अहो खरं तेंच सांगतोय् ... ...म्हणून तर मघांशी म्हटलं ना तुम्हांला, की खटपट करून बघायला हरकत नाही एखादी उपलब्ध आहे काय ते... ...कारण की जर एखादी हाताला लागलीच, तर ती   शेंवटच्या उत्पादनातलीच असणार... ...फार फार तर गेल्या आठदहा महिन्यातलीच ... ...म्हणजे आत्तांच तुम्हांला सांगितलेल्या सगळ्या सोयी असलेली... ...तुमच्या सगळ्या अपेक्षात चपखल         बसणारी... ... ...दुसर्‍या शब्दांत तुमच्या कल्पनेत जी कांही आहे, अगदी ती च....!!
 
तेव्हां ठंरवा काय करायचं ते...पण एक पुन्हां सांगतो... ...इण्डिका त आतां फार गुंतून पडूं नकां नानासाहेब... ... ...बाकी निर्णय काय तो तुमचाच."
आतां मात्र माझी ट्यूबलाईट् भक्क्‌दिशी पेंटली...!
ओक म्हणत होते त्यातला शब्द न् शब्द वास्तव होता... वेंळ दंवडून चालणार नव्हतं...!!
पण एकदां परिस्थितीचं स्वच्छ आकलन झालं, की व्यर्थ वेंळ काढत बसणं माझ्या स्वभावात बसणारं नव्हतं... ...
मी,"खरंय् तुमचं...पटलं मला...बोला, आहे काय तुमच्या साठ्यात एखादी शिल्लक?...इथल्या इथं बुक् करून टाकूं... ...इण्डिका चं काय करायचं ते नंतर बघतां येईल."
श्री.ओक,"इथं मात्र माफी असावी नानासाहेब... ...पुण्यातल्या आमच्या कुठल्याच शो रूम च्या साठ्यात 'नॅनो एक्स.टी. ए.' नाही... ...गेल्या चारएक महिन्यांपासून...
 एक काम करूं या... ... इथंच थांबा दहा पंधरा मिनिटं... ...आमच्या महाराष्ट्र राज्यभरातल्या कुठल्या शोरूमला एखादी शिल्लक आहे काय ते बघूं या... ...समजा असली, तर लगेच अडकवून        ठेंवायची ना?"
मी,"लगेच अडकवून ठेंवायला माझी कांही हरकत नाही... ...पण गाडी प्रत्यक्ष चालवून बघितल्याशिवाय मी अंतिम निर्णय घेऊं शकत नाही."
श्री. ओक,"हरकत नाही नानासाहेब... ...शिल्लक असलीच, तर इथं गाडी मागवून घेतो...तुम्ही स्वतः ती चालवून बघा नी मग काय ते ठंरवा... ...कसलीही अट बीट नाही...मग तर झालं ना? थांबा हं जरा   दोन मिनिटं... ..."
मी वाट बघत शांत बसलो... ...
श्री.ओकां ची पुढ्यातल्या संगणकाबरोबर कांहीतरी झटापट चाललेली होती... ...
त्यांनी कुठं
कुठं दोनचार फोन पण केले... ... ...
आणि अखेर हंताशपणे माझ्याकडं बघत म्हणाले,"माफी असवी नानासाहेब... ...महाराष्ट्रातल्या आमच्या एकजात सगळ्या शो रूम तपासल्या... ...कुठंही 'नॅनो
एक्स. टी. ए.' उपलब्ध नाही... ...सॉरी. आतां काय करणार?"
मी,"काय करणार? आमच्या 'मातोश्रीं' च्या मनांत काय असेल तें च होणार शेंवटी... ...माझे हयातभरचे अनुभव आहेत..."
शी. ओक,"मी समजलो नाही नानासाहेब... ...तुमच्या मातोश्री...म्हणजे?... ..."
मी,"अहो जन्मदात्या मातोश्री म्हणत नाही मी... ...आमच्या कर्मस्वामिनी ज्या आहेत ना, त्या... ...साडेतीन शक्तिपीठातल्या करवीरनिवासिनी... ..."
श्री. ओक,"काय सांगताय् काय नानासाहेब?"
मी,"अहो त्या आमच्या कुलस्वामिनी तर आहेतच, पण तहहयात माझं व्यक्तिगत उपास्यदैवतही आहेत त्या... ...गेली चाळीस वर्षं शेंकड्यांनी अनुभव घेतलेत मी ह्या मातोश्रींच्या अफाट सामर्थ्याचे... ...डझनावारी पण नव्हेत."
श्री.ओक,"कमाल आहे नानासाहेब... ...जरा खुलासा करतां काय?"
मी," अवश्य... ...आतां असं बघा... ...की श्री. उदय तळवलकर नवी टियागो घेतात काय...आम्ही सगळे मित्र तिची पूजा करायला आज इथं येतो काय... ...
 ओघओघानं त्यातनं हा नॅनो चा विषय निघतो काय... ... ...ह्या सगळ्या घटना म्हणजे एक दैवनियोजित घटनांच्या साखळीतले कांही दुवे असावेत असं मला आतां जाणवायला लागलंय... ..."
श्री. ओक,"असेलही तुम्ही म्हणताय्‌ तसं... ...पण आमच्या आख्ख्या महाराष्ट्रभरातल्या तमाम शो रूम्स पैकी एकाही शो रूम मध्ये आपल्याला हवी असलेली नॅनो
एक्स. टी. ए. उपलब्ध नाही... ... ...याचा खुलासा कसा काय करणार?"
आतां कांही नीटसं आठवत नाही...पण कुठल्यातरी अंतःप्रेरणेनं मी उत्तरलो,"हे सगळं कसं काय आहे, ते थोंडक्यात सांगतो तुम्हांला... ...
या करवीर निवासिनी ऊर्फ मातोश्री म्हणतो ना मी, ते आदिशक्ती च्या अनेकविध रूपांपैकी ऊग्रतम रूप आहे...अत्यन्त तापट, संतापी, कठोर, निग्रही, अफाट सामर्थ्यसंपन्न, पण अंतर्बाह्य निर्मलतेचं अन्‌ शाश्वत स्वत्त्वा चं मूर्तिरूप च म्हणा ना.
पण बहुतेक लोकांचा एक असा गैरसमज असतो, की या मातोश्री म्हणजे धनधान्य, श्रीमंती, पैसा अडका, सोनं नाणं, दागदागिने, जडजवाहीर, गाड्या बंगले इत्यादी इत्यादी-म्हणजे सध्याच्या कलियुगात माणसं ज्या गोष्टींच्या  मागं हात धुवून लागलेली असतात, आणि त्यांच्या प्राप्तिसाठी कुठल्याही थंराला जायलाही एका पायावर तयार असतात - अश्या समस्त ऐहिक ऐश्वर्यद्योतक गोष्टी प्रदान करणारं दैवत... ...
साहजिकच त्यांच्या दर्शनाला येणारे भाविक भक्त असल्या
कांहीतरी कामनापूर्तीचं साकडं त्यांना घालण्यासाठीच त्यांच्या महाद्वारात मैलभर लांब रांगा लावायला येतात.
पण खरी गोम अशी आहे की हे दैवत अंतर्बाह्य शुचिते चं, विशुद्ध कर्माचं, कर्तृत्त्वसंपन्नतेचं,
अफाट सामर्थ्याचं, अन्‌ प्रखर स्वत्त्वा चं प्रतीक आहे, अन्‌ याच गुणांचं भुकेलंही आहे... ...
ज्या भाविकाच्या गांठीला या गोष्टीपैकी कांहीही मुळातच नसेल, त्यानं कितीही नवस बोलले, अनुष्ठानं घातली, महापूजा बांधल्या, अन्‌ व्रतं वैकल्यं केली, तरी त्याला ह्या मातोश्री कधीच प्रसन्न होत नाहीत... ...
ज्यांच्या जवळ यातलं कांही तरी आहे, त्यांच्याही पदरात त्या बसल्या खाटल्यावर कांहीही आयतं टाकत नसतात... ...
अश्या भक्तांचीही त्या प्रथम पुरे पुरे होईस्तंवर सत्त्वपरीक्षा घेत असतात... ...वेळप्रसंगीं अगदी जीव नकोसा होईस्तंवर सुद्धां... ... ...
भौतिक जगातल्या कुरुक्षेत्रावर उतरून ज्याचं त्या भक्तालाच लढावं लागतं... ... ...मातोश्री त्याला फक्त लढायचं सामर्थ्य प्रदान करीत असतात... ... ...
पण एकदां कां भाविक परीक्षेला बावन्न कसांनी खरा उतरला, अन्‌ या मातोश्री नीं जर कां 'तथास्तु' म्हणत त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेंवला ना, तर त्याच्या कल्पनेतही बसणार नाही असलं कांहीतरी उपासकाच्या झोंळीत धोः धोः कोसळत राहतं... ... ...झोळी तळातनं फांटली कधी, याचा भाविकालाही पत्ता लागत नाही... ... ...आतां समजलं हे दैवत कसं आहे ते?"
श्री.ओक,"होय होय... ...समजलं आतां...पण पुढं काय?"
मी,"सांगतो...आतां ह्या नॅनो चा च चाललेला विषय घ्या... ...
 तर गाडं इथवर आलेलं आहे, की माझ्या बहुतांशी सगळ्या अपेक्षां पूर्ण करील अशी सध्या ही एकच गाडी... ...नॅनो
एक्स. टी. ए. ... ...बरोबर?"
श्री. ओक," अगदी बरोबर... ..."
मी,"आणि तुमच्या पडताळणीनुसार तुमच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या शो रूम्स पैकी एकाही शो रूम कडं ती उपलब्ध नाही... ...म्हणजे प्रश्नच निकालात निघाला... ...होय की नाही?"
श्री. ओक,"हो हो... ...बरोबर आहे तुमचं."
मी,"मला वाटत नाही तसं ओकसाहेब... ..."
श्री. ओक आतां चंमकलेच,"म्हणजे नानासाहेब?... ...काय म्हणायचं आहे तुम्हांला?"
मी,"सांगतो... ...मला असं आतनं जाणवतंय़् की मातोश्री माझी सत्त्वपरीक्षा बघताय्‌त... ...तुम्ही तुमची लढाई लढलात खरे, पण मी कुठं अजून मैदानात उतरलोय्?
 ते यथासांग झाल्याशिवाय मातोश्री थोड्याच तथास्तु म्हणणार आहेत? त्या सांगताहेत मला मैदानात उतरून लढायला... ...
 शेंवटी करतील काय ते त्यानांच माहीत...पण मला काय जाणवतंय् ते सांगतो... ...
 आतां असं बघा...की एखादी नॅनो कांहीतरी चमत्कार घडून सापडलीच, तरी ती चालवून बघितल्यावर ठाक ठीक निघणं हा पहिला अडथळा... ...
 समजा तसंही झालं, तरी मनपसंत रंगाचा प्रश्न शेंवटी उरतोच..."
श्री. ओक,"हं...हं...पुढं"
मी,"तर नॅनो च्या बाबतीत कंपनीनं जे रंग काढलेले होते, ते म्हणजे हळदी रंग, टोमॅटो लाल, वांगी जांभळा, चंदेरी, आणि दुधी पांढरा... ...
 पैकी दुधी पांढरा हा एकमेव रंग वगळतां बाकी सगळे रंग भडक बटबटीत म्हणावे असेच आहेत... ...बरोबर?"
श्री. ओक,"होय...बरोबर."
मी,"आतां समजा पसंत पडण्यासारखी एखादी नॅनो हाताला लागलीच, तर ती दुधी पांढर्‍या रंगाचीच असेल, असं कोण सांगूं शकतंय्‌? ती दुसर्‍या कोणत्याही रंगाची असली, तरी कारभार आटोपल्यातच जमा...     कारण मला काय नाहीतर विशेषतः आमच्या सौ. इंदिराजी नां काय, दुधी पांढर्‍या रंगाव्यतिरिक्त दुसरा कोणताच रंग पसंतीला उतरणार नाही... ...काय?"
श्री. ओक,"खरंय्‌ तुमचं नानासाहेब... ...हे नॅनो प्रकरण तडीला जाणं अशक्य कोटीतलंच वाटायला लागलंय् मला आतां."
मी,"आतां मला काय जाणवतंय् ते सांगतो... ...या आमच्या मातोश्रींच्या मनांत मला मैदानात उतरवायचं आहे असं दिसतंय् मला एकूण... ...तुम्ही शक्य ते सगळे प्रयत्न केलेत... ...आतां मी पण माझ्यापरीनं जमेल ते प्रयत्न करून बघतो... ...
 आतां आईसाहेबांच्या मनांत काय आहे, ते ठाऊक नाही मला... ...
 पण त्या जर कां तथास्तु म्हणाल्या, तर माझ्या पसंतीला उतरेल अशीच नॅनो चालत येईल इथं... ...आणि तीही दुधी पांढर्‍या रंगाचीच असेल... ...बघाल तुम्ही."
श्री.ओक,"धन्य आहांत नानासाहेब... ...इतका ठाम विश्वास?"
मी,"स्वतःवर नाही... ...पण आईसाहेबांच्यावर नक्कीच आहे... ...मघांशी सांगितलं ना तुम्हांला, की शेंकड्यांनी अनुभव घेतलेत म्हणून? आतां बघूं या
काय होतंय् ते... ...बराय्... ...निघतो मी आतां... ...उशीर पण झालाय्...भेंटू पुन्हां..."
श्री. ओक,"नक्की भेंटूं सर... ...ऑल द बेस्ट्."

श्री. ओकांचा निरोप घेंऊन मी घरी आलो...
चहा घेतां घेतां सौ. इंदिराजी नां समस्या तपशीलवार सांगितली... ...
त्यानांही पेंचात पडल्यासारखं झालं असावं... ...कांही बोलल्या नाहीत.

संध्याकाळी रोजच्याप्रमाणं स्नान करून मातोश्रीं च्या पुढ्यात गायत्री केला, आणि नंतर मला आंठवलं, की कंपनीतले एकदोन अत्युच्चपदस्थ अधिकारी परिचयातले आहेत... ...
सौ. इंदिराजी ना तसं सांगितलं, तर त्या म्हणाल्या 'बघा तरी फोन करून... ...फार फार तर काय होईल... ...शिल्लकच नसेल एकही गाडी, तर ते तरी काय करतील? पण विचारून तर बघायला काय हरकत आहे?
'
तेव्हां मग विचार करून सायंकाळी पण जरा उशीरा त्यातल्या एका सरां ना फोन लावला...गाडीत मला स्वतःलाच रस असल्याचंही सांगितलं... ...
त्यांनी एव्हढंच सांगितलं, की उत्पादन बंद होऊन देखील आतां एक वर्षं होत आलेलं आहे...तरी काय जमेल ते बघतो... ...पुढच्या चारदोन दिवसात डीलरचा काय तो फोन येईल तुम्हांला... ..."

मी मग तो विषय डोंक्यातनं काढून टाकला,  आणि रोजच्या कामांधामांत बुडून गेलो... ...
तिसर्‍या दिवशी सकाळीच घरच्या फोनची घंटा घंणघणली... ...
सौ. इंदिराजीनी च फोन उचलला... ...मी अंघोळीला न्हाणीघरांत गेलो होतो...
सौ. इंदिराजी नी दारावर टकटक केली," अहो... ...ओक साहेबांचा फोन आहे... ...तुमच्याबरोबर तांतडीनं बोलायचं आहे म्हणताय्‌त... ..."
मी पुनश्च टॉवेल गुंडाळत बाहेर येऊन फोन घेतला,"नमस्कार ओक साहेब... ...बोला"

श्री. ओक,"गुड् मॉर्निंग नानासाहेब... ...अहो काय लचाण्ड करून ठेंवलंय्‌त तुम्ही?"
मी,"कसलं लचाण्ड?... ...काय झालंय्‌ काय?"

श्री. ओक,"धन्य आहे नानासाहेब तुमची... ...'नाना-नानीं ची नॅनो' आत्तां सकाळीच हजर झलेली आहे...!!!... ... सपत्निक बघायला या शो रूमला... ..."  
मी,"मग लचाण्ड कसलं म्हणत होतात?... ...आणि... ...
तेंव्हढ्यात सौ. इंदिराजी नी मला थांबायची खूण केली...
मी," जरा थांबा हं एक मिनिट ओकसाहेब... ..." आणि सौ. इंदिराजींकडं पाहत प्रश्नार्थक भिवया उंचावल्या.
सौ. इंदिराजी," अहो, रंग कुठला आहे ते विचारून घ्या आधी... ...नाहीतर सगळंच ओम्‌फस्स् व्हायचं..."
मी फोनवर श्री.ओंकांना 'तासाभरात गाडी बघायला येतो' म्हणून सांगितलं, आणि फोन ठेंवला... ...
सौ. इंदिराजी," अहो  रंग कां नाही विचारलात कोणता आहे तो? तरी सांगत होते... ..."
मी त्यांना मध्येच तोंडलं,"दुधी पांढरा रंग आहे गाडीचा... ..."
सौ. इंदिराजी फिस्कारल्या,"तुम्हांला कुणी सांगितलं? विचारा म्हणत होते, तर फोन ठेंवलात खाली... ..."
मी त्यांना इतकंच म्हणालो,"आईसाहेबांनी मला कामाला लावल्यानंतरच, माझ्या नांवाची पट्टी लावून ही गाडी राखून ठेंवलेली असणार...तेव्हां दुधी पांढर्‍या रंगाव्यतिरिक्त दुसर्‍या कुठल्या रंगाची असूंच शकत नाही ही गाडी... ...बघाल तुम्ही प्रत्यक्षच आतां..."
इतकं बोलून डोंळे वटारून माझ्याकडं बघणार्‍या सौ. इंदिराजीं कडे पाठ फिरवत मी अंघोळीला चालता झालो... ...

स्नान उरकून, मातोश्रीं चा गायत्री करून, नाष्टा बिष्टा आंवरून सौ. इंदिराजीं सह मी श्री. ओंकांच्या शो रूम ला गेलो... ...
आणि दोघेही डोंळे फांडफांडून बघतच बसलो... ...
समोर घांसूनपुसून चंकचकीत केलेली शुभ्र दुधी पांढर्‍या रंगाची 'नॅनो
एक्स. टी. ए.' शो रूम मध्ये आम्हांला भेंटायला दिमाखात उभी होती... ... ...!!!



तितक्यात श्री. ओक लगबगीनं भेंटायला आलेच... ...
श्री. ओक,"मग काय नानासाहेब... ...ट्रायल घ्यायची ना?"
मी,"कांही गरज नाही त्याची... ...बुकिंग पेमेण्ट घेऊन मोकळे व्हा... ...काय?"
श्री.ओकांनी भराभर सहाय्यकांना कामाला लावलं, गाडीच्या किंमतीवर आपण होऊन छानपैकी वजावटही दिली... ...तीही न मागतां, अन् पांचएक मिनिटांत सगळा व्यवहार पूर्ण झाला... ...
बाकी रक्कम येणार्‍या मंगळवारी भंरून गाडी नोंदणीला पांठवायचंही ठंरलं... ...
सौ.इंदिराजी पण खूष झाल्या... ...हवा तो च रंग मिळाला म्हणून... ...
मग मी श्री. ओकांना विचारलं,"अहो, सकाळी फोनवर ते लचाण्डाचं काय म्हणत होतां तुम्ही?"
श्री. ओकांनी कपाळाला हात लावला,"ते तुम्ही मातोश्रीं च्या 'तथास्तु' चं कायसं सांगितलंत ना परवांदिवशीं... ...ते अनुभवलं बघा...अगदी पोंटभर... ...
अहो काल सकाळी कंपनीतनं धंडाधड फोन वर फोन... ...'गाडी तयार आहे... ...औरंगाबाद ला लोकेट केलेली आहे... ...ताबडतोब चलन करून शो रूम ला घेऊन जा...'
मी,"मग?"
श्री. ओक,"अहो त्या दिवशी होता शनिवार... ...सगळे ड्रायव्हर लोक आधीच दहा दिशांना कामासाठी पांगलेले... ...दुसर्‍या दिवशी रविवार...म्हणजे शो रूम बन्द... ...
आणि कंपनीचे लोक कांही
ही ऐकायला तयार नव्हते... ...तेव्हां ध्यानात आलं की तुम्हीच कांहीतरी लचाण्ड करून ठेंवलेलं असणार... ..."
मी,"अहो मी कांहीच लचाण्ड बिचाण्ड केलेलं नाही... ...एका स्नेह्यांना फोन केला होता फक्त...मग काय झालं पुढं?"
श्री. ओक,"नानासाहेब... ...आलं ध्यानात आतां सगळं... ...करणार काय मग? काल रातोरात ड्रायव्हर पाठवला औरंगाबादला रक्कम घेऊन, आणि आज सकाळी चलन करून गाडी इथं आणवली... म्हणून म्हटलं... ...धन्य आहांत."   
मी,"चुकताय् तुम्ही ओकसाहेब... ...धन्य आमच्या मातोश्री आहेत... ...मी नव्हे... ...मी सांगितलं होतं तुम्हांला... त्यांनी तथास्तु म्हणायचं ठंरवलं की काय होतं ते... ..."
श्री. ओक,"नानासाहेब...अहो ते तर बघितलंच...पण दुसरी एक भन्नाट मजा झालीय्... ...माहीताय् तुम्हांला?... ...ते तुम्ही 'झोंळी फांटते' असं कांहीतरी म्हणाला होतात ना?... ...अगदी तशीच...
मी,"काय सांगताय् काय?... ...कसली मजा झालीय् म्हणताय्?"
श्री.ओक,"नानासाहेब... ...कंपनीनं जितक्या कांही नॅनो बनवून कारखान्याबाहेर काढल्या ना...त्यातली ही सगळ्यात शेंवटची बाहेर पडलेली गाडी...नोव्हेंबर २०१८ महिन्यातली... ...

द लास्ट् नॅनो... ...!! 
कदाचित तुमच्या नांवाची पट्टी लावून मातोश्रीनी च ही तुमच्यासाठी रांखून ठेंवलेली असावी... ...!!! तुम्हांला अपेक्षित असलेले सगळे गुणविशेष गाडीत आहेतच, शिवाय सामानासाठी छोटीशी डिकी, सेन्ट्रल लॉकिंग, फॉग लॅम्प्स, अन्‌ साउण्ड सिस्टिमही गाडीबरोबरच आलेली आहे... ...!!! ....दरवाजा उघडून स्वतःच खात्री करून घ्या..." 
इतकं सांगून श्री. ओक आमच्याकडं डोंळे विस्फारत बघायला लागले...




मी सौ.इंदिराजीं कडं फक्त मन्दसं हंसून पाहिलं... ...
आणि तो तसला मातोश्रीं चा अचाट वरदहस्त बघून आवाक् होत सौ. इंदिराजीनी पण स्वतःच्या कपाळाला हात लावला... ... ...!!!
श्री. ओक,"पण नानासाहेब... ..."
मी,"बोला बोला....."
श्री. ओक,"झालंय् असं की मातोश्री नी वरदहस्त  ठेंवला
तुमच्या डोंक्यावर... ...मात्र फंरपट आमचीच काढली... ... ...तेव्हां"
मी,"तेव्हां काय?"
श्री. ओक,"तेव्हां पार्टी देणं तुम्हांला अनिवार्य आहे नानासाहेब... ... ...डिलिव्हरी घ्यायच्या आंत...काय?"
मी चकार शब्द न कांढतां श्री. ओकांची बखोटी धंरून त्यांना इण्डिकातल्या क्लीनर सीट वर बसवलं...
सौ. इंदिराजी धोरणीपणा दांखवत चपळाईनं पाठीमागच्या सिंहासनावर विराजमान झाल्या... ...
आणि
मुकाट स्टार्टर मारून मी गाडी मॉडर्न कॅफे च्या दिशेनं पिटाळली... ... ...!!



***********************************************************************************************
रविशंकर.
५ सप्टेंबर २०१९.

No comments:

Post a Comment