Search This Blog

Monday 13 August 2018

॥ साध्य-साधन ॥



" मराठे काका...मला एक तात्त्वज्ञानिक कूटप्रश्न पडलाय्‌...आणि बरीच डोकेफोड केली मी तो सोडवण्यासाठी, पण नेमकं उत्तर कांही सापडत नाहीय्‌..." मी समोर मेजावर काकांनी आणून ठेंवलेला चहाचा कप उचलीत प्रस्तावना केली.
दोन हजार बारा सालातले हिंवाळ्याचे दिवस होते, आणि रविवार दुपारची निवान्त वेळ नेमकी पकडून मी मराठे काकांचं डोंकं पिकवायला त्यांच्या घरीं टंपकलेलो होतो... ...

हे मराठे काका - म्हणजे श्री. अजित मराठे म्हणजे माझे ठाणेस्थित बन्धू श्री. सदय यांचे कौटुंबिक स्नेही...त्यांच्या शेंजारच्या 'वसन्त विहार' सोसायटीत राहणारे.
माझ्यापेक्षां फारतर आठदहा वर्षांनी ज्येष्ठ असतील...त्यांची ओंळखही तशी अपघातानंच झाली होती...
अन्‌ तीतूनच आमच्यातला समान बन्ध - म्हणजे तत्त्वज्ञानाची आवड - ही तोण्डओंळखीचं रूपान्तर घनदाट स्नेहात करायला कारणीभूत ठंरलेली होती.
दुसरा समान दुवा म्हणजे आम्हां दोघांनाही दुपारीं जेवण झाल्यावर दोनचार तास तांणून द्यायची संवय अजिबात नाही. 
त्यामुळं आम्हांला एकमेकांच्या घरीं केव्हांही ( अगदी अपरात्री सुद्धां ) डोंकवायची मुक्त मुभा प्राप्त झालेली होती, जिचं पर्यवसान पोंटभर तात्त्वज्ञानिक वादावादीत अगदी हटकून व्हायचं.
कारण मराठे काकांची अफाट तात्त्वज्ञानिक उमज...डोकं पिकवणार्‍या व्यावहारिक जगातल्या समस्याही ते तत्त्वज्ञानाच्या सारीपाटावर चुटकीसरशी सफाचट उलगडून दाखवायचे.
म्हणूनच ठाण्याला जेव्हां जेव्हां मी बन्धूंच्या घरीं जात असे, तेव्हां माझा वेळ बन्धूंच्या घरातल्या इतकाच - कदाचित थोडा ज्यास्तच - ह्या मराठे काकांच्या सोंबत व्यतीत होत असे.

(या मराठे काकांची ओंळख करून घ्यायची असेल, तर या च ब्लॉगवरची ' मिडास आणि पायपर ' ही कथा वाचकांनी आधी वांचून मग या कथेचा आस्वाद घ्यावा.) 

"आधी चहा तर पोंटांत रिचवूं या रविशंकरजी...त्याशिवाय तत्त्वज्ञान कसं काय सुचणार आपल्याला...ऑं?" मराठे काका खोः खोः हंसत म्हणाले.
"अहो चहा पण गोड लागेनासा झाला, म्हणून तर छळायला आलोय् तुम्हांला..." मी पण त्यांचा चेण्डू टोंलवीत म्हटलं.
" वाहव्वा... बहोत खूब... " मराठे काका चहाचा कप तोंडाला लावीत म्हणाले," घ्या...चहा घ्या आधी... ...नाहीतर थण्ड होईल तो... ...आणि थण्ड झाल्यावर आसामी चहाची लज्जत जिभेला काय डोंबल कळणाराय्?... ... हं... ...सांगा...कसला काय कूटप्रश्न पडलाय् तुम्हांला?"
मी," कूट प्रश्न असा आहे की, एकाच कुटुंबात जन्मलेल्या; एकाच घरातल्या वातावरण-संस्कारांत - घडलेल्या अन्‌ वाढलेल्या दोन भावंडांच्या शैक्षणिक कर्तृत्त्वात इतका नजरेत भंरण्यासारखा फरक पडूं शकेल काय? आणि फरक पडत असेल, तर त्याचं कारण काय असूं शकतं?"
मराठे काका," 'इतका' फरक म्हणजे कितीसा फरक म्हणताय्?"
मी," ' इतका ' म्हणजे अगदी उत्तर - दक्षिण ध्रुवां इतका."
" नवलच सांगतां आहात की... ...आणि ' एकाच घरांत जन्मलेल्या ' म्हणजे... ...", मराठे काका हनुवटी खांजवीत विचारते झाले, " सख्खी भावंडं असं म्हणायचं आहे काय तुम्हांला?... ...
मी,"गोष्ट अशी आहे की हे दोघे भाऊ एकमेकांचे सख्खे नाहीत, पण चुलत भाऊ लागतात. आपण त्यांना यशवंत आणि जयवन्त असं संबोधूं या... ...
एकत्र कुटुंब असल्यामुळं दोघेही एकाच घरांत जन्मलेले, एकाच वातावरणांत - म्हणजे आर्थिक, सामाजिक, सांस्कारिक वगैरे - वाढलेले आणि घडलेले पण... ..."
मराठे काका,"तरीही फरक पडूं शकेल की...अगदी सख्ख्या भावंडांचं कर्तृत्त्व तरी तुलनेनं सारखं कुठं असत?...किंबहुना बर्‍याच कुटुंबांत ते कमीज्यास्त असलेलं आपण पाहतोच की... ...मग तुम्हांला प्रश्न कसला पडलाय्?
मी," झालं असं, की दोघेही दहावी-बारावी च्या परीक्षा अगदी उत्कृष्ठ म्हणतां येणार नाही, पण बर्‍यापैकी ७०-८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले... ...म्हणजे बुद्धी-आकलनाचा आवाका सुद्धां दोघांचा साधारणपणे समसमान आहे असा ढोबळ मानानं निष्कर्ष निघेल... ...बरोबर?"  
मराठे काका," बरोबर...आलं लक्ष्यांत... ...पुढचं काय?"
मी,"दोघांनाही अभियांत्रिकी शिकायची हौस होती...पण  सध्याच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जमान्यात पदवीच्या अभियांत्रिकी ला स्वार्हतेवर प्रवेश मिळणं दोघांनाही शक्य नव्हतं..."
मराठे काका,"मग पुढं काय झालं?"
मी," सांगतो... ...तर दोघांपैकी धाकटा जयवन्त...त्याला मुंबईला सोमय्या संस्थेत विद्युत् अभियांत्रिकी च्या पदविकेच्या अभ्यासक्रमाला स्वार्हतेवर प्रवेश मिळाला, आणि तो तिथं रुजूं पण झाला..."
मराठे काका,"आणि यशवन्ताचं काय झालं पुढं?"
मी," तो माझ्याकडं सल्ला मागायला आला होता, ' पुढं काय करूं?' असा प्रश्न घेऊन..."
मराठे काका,"मग? काय सल्ला दिलात तुम्ही त्याला?"
मी," त्याच्या बोलण्यातनं असं समोर आलं की त्याला ' प्रगत प्रतिमा तंत्रशास्त्र' - म्हणजे ज्याला आपण ' हाय् टेक् इमेजिंग् टेक्नॉलॉजी ' म्हणतो, त्यात प्रगति करायची होती, आणि त्यासाठी अमेरिकेला जायचं त्याच्या डोंक्यात शिरलेलं होतं. पण बारावी च्या गुणपत्रिकेवर तर इथं भारतातल्या कुठल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत पण प्रवेश मिळणं कठीणच होतं.... ...आणि म्हणून पुढं काय करावं, हा सल्ला विचारायला तो माझ्याकडं आलेला होता. बरं, प्रतिमा तंत्रशास्त्राबाबतीत बोलायचं, तर त्याला त्या विषयासंबन्धी कसली प्राथमिक जुजबी माहितीही नव्हती, हे विशेष.... ... "
मराठे काका," म्हणजे त्या वयात त्याला ' गुलाबी स्वप्नं ' म्हणजेच इंग्रजीत ज्याला ' रोझी ड्रीम्स् ' म्हणतात, ती पडत होती तर..."
मी," अगदी बरोबर... ...आणि हे त्याच्याबरोबर झालेल्या संवादांतनं माझ्या ध्यानांत आलं..."
मराठे काका,"मग?... ...काय सल्ला दिलात त्याला तुम्ही?"
मी," दुसरा काय आणि कसला सल्ला देणार? मी त्याला एव्हढंच सांगितलं, की काय करतांना - म्हणजे कुठल्या विषयाचा अभ्यास करतांना - तुला तहान-भूक विसरायला होतं, ते आधी शोंधून काढ, आणि त्याच क्षेत्रातल्या अभ्यासक्रमाच्या मागे लाग... ...मग ती कुठलीही शाखा असो. 
तुला नेमकं काय अभ्यासायला-करायला जिवापाड आवडतं, हे दुसरं कुणीही तुला सांगूं शकणार नाही... ...ते तुझं तुलाच शोंधून काढायला हवं... ..."
मराठे काका," अगदी योग्य सल्ला दिलात रविशंकरजी... ...मग काय केलं त्यानं पुढं?"
मी," इथंच सगळी गोची आहे मराठे काका... ...जयवन्त त्यानं स्वतः निवडलेली विद्युत् अभियांत्रिकी शिकत असतांना ह्या यशवंत नं बारावीच्या पुढचं एक वर्ष अभियांत्रिकी ला फाटा देऊन 'जी. आर्. ई.' च्या परीक्षेचा ध्यास घेतला... ... अगदी रात्रंदिवस तो 'जी. आर्. ई.' च्या खटपटीत व्यग्र असायचा... ..."
मराठे काका,"छान छान... ...म्हणजे कांहीतरी आवडीचं सापडलं तर त्याला... ...मग समस्या शिल्लक कुठं राहते?"
मी," ऐका तर...झालं असं, की पहिल्या प्रयत्नांत हा यशवन्त 'जी. आर्. ई.' तनं कांही पार पडूं शकला नाही... ...म्हणून त्यानं पुढं सहासात महिने दुसरं कांहीच न करतां परत 'जी. आर्. ई.' साठी परत जोर लावला... ...तिथं पण तो तंरून गेला...पण नामवन्त अमेरिकन विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांत मात्र जेमतेम अगदी कांठावरच उत्तीर्ण झाला. परिणामी त्याला अमेरिकेतल्या महागड्या पदवी शिक्षणासाठी ना कुठली शिष्यवृत्ती मिळाली, ना इतर व्यवस्था पत्करणारा कुणी जोखीमदार प्रवर्तक ऊर्फ स्पॉन्सरर् मिळाला..."
मराठे काका," मग काय झालं? सोडून दिला नाद त्यानं अमेरिकेला जायचा?"
मी," छे छे छे... ...उलट त्याचा अमेरिका गमनाचा हट्ट ज्यास्तच बळावला... ...इतका, की अखेर घरच्यांना एकूणएक खर्चवेंच पत्करून, थोडीफार मालमत्ता विकून, आणि वर आणखी कर्ज काढून, चाळीस पन्नास लाख रुपये ओंतावे लागले, तेव्हां कुठं हा यशवन्त अमेरिकेला रवाना झाला. बिचार्‍यांनी हे सगळं एकाच आशेवर केलेलं असावं...म्हणजे अमेरिकेला जाऊन तरी हा नेटानं उच्च शिक्षण प्राप्त करील, मग बक्कळ कमाई करून सगळं कर्ज-व्याजही फेंडील, आणि यथाशक्ति इकडं कुटुंबाला आर्थिक हातभारही लावील, अशी आशा त्यांनी बाळगलेली असणार."
मराठे काका," मग पुढं प्रगत प्रतिमा तंत्रशास्त्रांत कांही केलं काय त्यानं?"
मी," अहो, तेंच तर सगळं कोडं आहे... ..."
मराठे काका," म्हणजे?"
मी," अहो कसली प्रतिमा अन्‌ कसलं त्यांचं उच्च तंत्रज्ञान... ...सगळा बट्ट्याबोळ झालाय् त्याचा... ...गेल्या वर्षीच इथं भारतात आलेला असतांना भेंटून गेला मला, तेव्हां सगळी रामकहाणी सांगत होता... ...
   अमेरिकेतल्या कुठल्यातरी तृतीय चतुर्थ दर्जाच्या विद्यापीठात त्याला कसाबसा ' दळण वळण अभियांत्रिकी ' ला प्रवेश मिळाला. तिथं त्यानं कसेबसे पांचसात महिने काढले, पण ते कांही जमेना त्याला, मग 
   पडेल ती कामं - अगदी वाढप्याची सुद्धां - करीत कसाबसा तो पनामा ला गेला ... ...तिथं अश्याच कुठल्यातरी गल्लीबोळातल्या विद्यापीठात वार्‍या करीत कशीबशी त्यानं द्रव अभियांत्रिकीची पदविका       मिळविली... ...पण पुढं पदवी, पदव्युत्तर शिक्षणाचं कांही नांव घेतलं नाही त्यानं... ..."
मराठे काका,"अरे बापरे... ...मग सद्ध्या कुठं असतो तो? आणि काय करतो?"
मी," सद्ध्या तो ऍरिझोनातल्या कुठल्यातरी आय्. टी. कंपनीमध्ये डाटा मॅमेजर म्हणून काम करतो... ...मला म्हणत होता की ' नाइदर मनी इज् देअर, नॉर् डू आय् फ़ील् हॅपी नाऊ.' 
    सांगा... ...आतां काय करायचं पालकांनी त्याच्या?"
मराठे काका नी आतां कपाळाला हात लावला," समस्या आहे खरी ज्वलन्त... ...अमेरिका वेडानं झपाटलेल्या बर्‍याच तरूण मुलांचं असंच कांहीतरी कडबोळं झालेलं मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे खरं... ...
   बरं त्या जयवन्ता चं काय झालं पुढं?... ...अभियान्त्रिकी झाली त्याची?"
मी," होय तर... ...अगदी उच्च श्रेणीत नाही तरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला तो. यशवन्त आधीच अमेरिकेत असल्यामुळं त्यानंही थोडाफार मदतीचा हात दिला असेल त्याला, पण स्वार्हतेच्या जोरावर सान    फ्रान्सिस्को विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्यानं शिष्यवृत्ती, अन् प्रायोजनही मिळवलं, आणि चारएक वर्षांपूर्वी तो पण अमेरिकेला गेला... ..."
मराठे काका," काय केलं त्यानं पुढं अमेरिकेत जाऊन?"
मी," त्यानं मात्र उत्तम प्रकारे उच्च श्रेणीत ऊर्जा जनन अभियांत्रिकी - म्हणजे 'पॉवर् जनरेशन् इंजिनिअरिंग्' विषयात पदवी प्राप्त केली, त्यानंतर स्वार्हतेवर 'पर्यायी ऊर्जा स्रोतांचं तंत्रज्ञान' म्हणजे ' अल्टर्नेटिव्ह्     एनर्जी रीसोअर्सेस् टेक्नॉलॉजी' च्या क्षेत्रांत पदव्युत्तर पदवीही मिळविली, आणि तो सद्ध्या ' मात्सुशिता इलेक्ट्रिक् ' या जगप्रसिद्ध जपानी कंपनीत सौर ऊर्जा संशोधनाच्या प्रकल्पांत भरघोंस योगदानही     देतोय्‌... ..."
मराठे काका," वा वा वा... ...बहोत खूब... ...म्हणजे दोघांपैकी एकाला तरी यशप्राप्ति झाली म्हणायची... ...उत्तम... ...मग आतां यात तुम्हांला कूट प्रश्न काय पडलाय्?"
मी," तर मला आतां असं सांगा, की थोड्या वेळापूर्वीच मी म्हटल्याप्रमाणं हे दोघे चुलत भाऊ एकाच कुटुंबांत जन्मलेले आहेत... ...बरोबर?"
मराठे काका," बरोबर."
मी," दोघांच्या वयांत फारतर तीनेक वर्षांचाच फरक असेल नसेल... ...यशवन्त हा जयवन्तापेक्षा थोडासा वयानं ज्येष्ठ... ..."
मराठे काका," हूं... ...हूं...ठीक."
मी," दोघे लहानपणापासून एकाच घरांत, एकाच संस्कारांत वाढलेले... ...बरोबर?"
मराठे काका,"अगदी खरं... ...पुढं?"
मी," दोघांची बौद्धिक कुवत - किंवा इंग्रजीत आपण जिला 'आय् क्यू.' असं म्हणतो, ती पण जवळपास तुल्यबळ म्हणतां येईल... ...शाळेतल्या प्रगतीवरून... ...ठीक?"
मराठे काका,"अगदी योग्य."
मी," मग कूटप्रश्न असा आहे की बारावी नंतरच्या दोघांच्या शैक्षणिक-व्यावसायिक कर्तृत्त्वांत इतका अगदी उत्तर-दक्षिण ध्रुवां इतका ठंशठंशीत फरक कश्यामुळं पडला? 
मराठे काका आतां मात्र विचारात पडले... ...पुढची दोनचार मिनिटं ते अगदी विचारचक्रात गढून स्तब्ध बसलेले होते... ...
मी पण धीर धंरून गप्प बसून राहिलो... ...म्हटलं, कश्याला उगीच त्यांच्या चिंतनात व्यत्यय आणा फुकाच?
मग अचानक त्यांनी मला विचारलं," मला असं सांगा रविशंकरजी, हा यशस्वी झालेला उच्चशिक्षित भाऊ म्हणजे धांकटा जयवन्त च ना?"
मी," होय...तो च."
मराठे काका," अमेरिकेला गेल्यानंतर तो कधी तरी भारतात येऊन गेला असेलच... ...हो ना?"
मी उत्तरलो," येऊन गेला तर... ...गेल्या वर्षीच आला होता, आणि मला पुण्यात घरीं भेंटून पण गेला... ..."
मराठे काका," मग गप्पा-गोष्टी अगदी दिलखुलास झाल्याच असतील तुमच्या... ..."
मी," झाल्या की... ... एक रात्रभर तो माझ्या घरीच मुक्कामाला होता... ..."
मराठे काका," मग?... ...काय काय सांगितलं त्यानं तुम्हांला... ...अमेरिकेतल्या वास्तव्य-अनुभवांबद्दल?"
मी," विशेष असं कांही नाही... ...खुषीत होता अगदी... ...म्हणाला..."
मराठे काका," काय म्हणाला तो तुम्हांला?... ...शक्यतों त्याच्याच शब्दांत सांगा... ...अगदी अवाक्षराचाही फरक न करतां... ...जमेल?"
मी," बघतो प्रयत्न करून... ...हूं ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ काय बरं म्हणाला तोऽऽऽऽऽऽऽ?... ... ...हांऽऽऽऽऽस्सं
    तो म्हणाला की ' इथं भारतात प्रथम वर्ष विद्युत अभियांत्रिकी शिकायला सुरुवात केली, ती गुणवत्तेनुसार मिळालेला अभ्यासक्रम करायचा म्हणून... ...दुसरा कांही पर्यायच नव्हता माझ्यासमोर.
    मग हळूं हळूं विद्युत् अभियांत्रिकी जशी समजायला लागली, तसा तीतला रस वाढायला लागला... ...दुसर्‍या वर्षीं तर ते सगळं मनापासून आवडायला लागलं.
    तितक्यात मग अचानक यशवन्त चा दूरध्वनी आला एक दिवस, की 'सध्याच्या पात्रतेवर एखाद्या अमेरिकेतल्या विद्यापीठाची प्रवेश परीक्षा कां देत नाहीस?' म्हणून.
    मग म्हटलं बघूं या तरी प्रयत्न करून... ...तसं बघितलं तर मुळात कुठलाही अभ्यासक्रम इथं भारतात केला काय, अमेरिकेत केला काय, किंवा अगदी उत्तर ध्रुवावर जाऊन केला काय, मूलभूत ज्ञान तर तेंच     असतं ना? अमेरिकेसारख्या देशात डोंक्यात असलेल्या ज्ञानाला कदाचित व्यावसायिक क्षेत्रात विस्तृत प्रमाणावर वाव असूं शकेल इतकाच काय तो फरक...कदाचित् पुढं संशोधन क्षेत्रातही तिथं इथल्यापेक्षा       अधिक चांगल्या संधी असूं शकतील असं वाटलं, अन्‌ दिली परीक्षा. आणि गंमत म्हणजे काका, पहिल्याच फटक्यात चक्क उत्तम श्रेणीत उत्तीर्णही झालो, अन्‌‍ मान्यवर अश्या सान फ्रान्सिस्को विद्यापीठाची       शिष्यवृत्ती पण मिळाली. प्रायोजक मिळवायला यशवन्तची मदत झाली, नी तो ही प्रश्न मिटला. पुढं पुष्कळ शिकायची इच्छा तर होतीच आधीपासून. मग इतकं सगळं जुळून आल्यावर गेलो शेंवटी         अमेरिकेला... ...
    तिथं गेल्यावर असं लक्ष्यांत आलं की विषय तें च असले, तरी ते शिकवायच्या तिथल्या पद्धती खूपच प्रगत आणि विकसित आहेत. आणि तिथले अध्यापकही त्या त्या विषयातले किडे म्हणावेत इतके
    पट्टीचे निष्णात तज्ञ असतात. मुळात विद्युत् अभियांत्रिकी ही कल्पकतेची कसोटी बघणारी शाखा, तिला प्रगत शिकवण्याची फोडणी बसल्यावर मग आणखी काय हवं होतं? मलाही कळलं नाही कधी
    पदव्युत्तर पदवी धारक झालो ते. आतां सध्या ' मात्सुशित इलेक्ट्रिक् ' नांवाच्या कंपनीत संशोधक म्हणून नोकरी करतोय्, आणि लवकरच सौर ऊर्जा अभियांत्रिकी त पी. एच्. डी. करायची खटपटही चालूं
    आहे... ...
    खूप खूप समाधान मिळतंय्‌ काका... ...अमेरिकेला जायचं धाडस केल्याचं चीज झाल्याबद्दल... ...' 
    इतकं उद्धृत करून मी मराठे काकांना म्हणालो " अगदी खडा न् खडा हें च शब्द नसतील कदाचित... ...पण त्याच्या एकंदर बोलण्याचा मथितार्थ असाच होता... ..."
मराठे काकांचा चेहरा एका क्षणांत उजळला," दॅऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽटस् इट् रविशंकरजी... ...मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर?"
मी उडालोच," कसलं उत्तर म्हणताय् तुम्ही?... ...चेष्टा करताय् काय माझी... ...ऑं?"
मराठे काका आतां हंसायला लागले," अहो आत्तां तुम्ही जयवन्त च्या बोलण्याचं जे थोंडक्यात विवेचन केलंत ना, त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे... ...!!! फक्त ते तुम्हांला जाणवलेलं नाहीय्     इतकंच..."
आतां मात्र हतबुद्ध होत मी च कपाळाला हात लावला," ते कसं काय?... ...आतां तुमचं आख्यान सुरूं करा बघूं... ...त्याशिवाय हा गुंता कांही सुटेल असं वाटत नाही..."
मराठे काकांनी मग डोळे मिचकांवत मला विचारल," मग काय रविशंकरजी... ...वन् फॉर् द रोड...आपल्या आसामी चहाचा... ...काय म्हणताय्?"
मी त्यांनी पुढं केलेल्या हातावर मनमुराद हंसत फाड्दिशी टाळी दिली," चला होऊन जाऊं द्या... ...पुण्डलीक वरदा हाऽऽऽऽऽऽऽरि विठ्ठल...!!!"
मराठे काकांनी किटलीतल्या चहानं आमचे कप परत गच्च भंरले आणि माझ्यापुढं बाकरवडी ची ( चितळ्यांच्या ) बशी संरकवीत प्रवचनाला प्रारंभ केला," त्याचं काय आहे रविशंकरजी... ..."
मी पहिली वडी तोंडात टाकीत संरसावून बसलो," हं बोला...ऐकतोय् मी."
मराठे काका," जरा विस्तारानं सांगतो म्हणजे नीट लक्ष्यात येईल तुम्च्या... ...तर मामला असा आहे की, कुठल्याही मनुष्याला आपलं आयुष्य यशस्वी रीत्या सुखासमाधानानं जगायचं असेल, तर त्याला मुळात कांही गोष्टी नीटपणे समजलेल्या असाव्या लागतात, असं तत्त्वज्ञान सांगतं... ...बरोबर?
मी," अगदी खरं"
मराठे काका," पहिली गोष्ट म्हणजे त्याला त्याच्या व्यावसायिक कार्यक्षेत्रातलं ज्ञान नीटपणे समजलेलं असावं लागतं... नाहीतर त्याचा 'आय्. टी. यन्' होतो...बरोबर?"
मी हंसायला लागलो,"शंभर टक्के बरोबर."
मराठे काका," दुसरी गोष्ट म्हणजे व्यावहारिक शहाणपण... ...जेणेकरून मिळवलेल्या कमाई चा- मग ती आर्थिक असो वा इतर कुठल्या प्रकारची... ...सुयोग्य विनियोग कसा, कधी, अन् कुठं किती करायचा,          आणि महत्त्वाचं म्हणजे कुठं कसा नी किती करायचा नाही, हे ही नीटपणे समजलेलं असावं लागतं... ...त्याशिवाय तो अंगावर पडणार्‍या जबाबदार्‍या निभावून धडपणे चरितार्थ चालवूं शकणार          नाही... ...खरं की नाही?"
मी," बरोबर... ...ते ज्यांना धडपणे समजलेलं नसतं, त्यांचाही शेंवटी ' आय्. टी. यन् ' च होतो... ...!!"
आतां मात्र मराठे काकां नी च आपल्या कपाळाला हात लावला," हे ही खरंच आहे... ...दररोजच पाहतो आहोत की आपण... ...अहो वीतभर कमाई, अन्‌ हातभर खर्च असला चंगळबाज खाक्या असेल तर       डोंक्यावर मणभर कर्ज व्हायला असा कितीसा वेंळ लागणार? अहो ह्या आय्. टी. वाल्यांमध्ये पुढच्या चार चार-पांच पांच वर्षांचे आख्खे पगार कर्जांच्या हप्त्यांत बुडवून बसलेले बक्कळ महाभाग बघितलेत       मी... ...
     जाऊं द्या तो विषय... ...तर उत्तम जगायला माणसाला अवगत असावी लागणारी तिसरी गोष्ट म्हणजे आरोग्यशास्त्र आणि कला क्रीडां चं ज्ञान... ...त्याशिवाय जगणं कसं काय  फुलणार-फळणार?"
मी," अगदी बरोबर... ...बरं पुढ?...या सगळ्याचा माझ्या कूटप्रश्नाशी कसा काय संबंध पोंचतो?"
मराठे काका," ऐका तर पुढं... ...उत्तम जगण्यासाठी प्राप्त असावी लागणारी चंवथी आवश्यक गोष्ट म्हणजे त्याच्या चरितार्थाशी निगडित असलेलं गणिताचं आवश्यक ज्ञान - मग त्यात तोण्डी आंकडेमोडीपासून ते      प्रगत कॅलक्युलस् पर्यन्त सगळे भाग आले... ...कारण गणित हे सर्वव्यापी आद्यशास्त्र... ...खरं ना?"
मी," अगदी बरोबर... ...अगदी रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्यापासून ते उच्चशिक्षित संशोधकांपर्यन्त प्रत्येकाला गणित हे लागतंच... ...बरं पुढं... ..."
मराठे काका,"तर गंमत अशी आहे, की या चार पांच मूलभूत गोष्टी अवगत असल्या की कुठल्याही माणसाला त्याचं आयुष्य सन्मानानं - समाधानानं जगतां येतं... ...म्हणजे माणसाला तितकी कुवत प्राप्त होते      असं तत्त्वज्ञान म्हणतं... ...होय की नाही?"
मी," बरोबर... ...पण कूटप्रश्नाचं उत्तर?"
मराठे काका,"सांगतो...तर गंमत अशी आहे की आत्तां सांगितलेल्या गोष्टी माणसाला जितक्या कमी-अधिक प्रमाणात अवगत असतील, तितक्या प्रमाणात तो यशस्वी आणि सधन होत जातो, आणि या गोष्टी जर      प्रकर्षानं अवगत असतील तर तो प्रसिद्धही होईल आणि श्रीमन्त ही होईल...पण समृद्धही होईल असं मात्र म्हणतां येणार नाही... ...त्यासाठी त्याला त्याच्या परीनं तत्त्वज्ञान समजलेलं असणं आवश्यक      असतं असं मला वाटतं.... ...सहमत आहांत?"
मी," अगदी शंभर टक्के... ...कारण तत्त्वज्ञानाची जाण असल्याशिवाय एकतर आयुष्यात घडणार्‍या घटनांची कार्य कारण मीमांसा करतां येत नाही, आणि येणार्‍या अनुभवांचे अन्वयार्थही नीटपणे समजूं शकत     नाहीत... ...मग प्रत्येक बाबतीतला नीर-क्षीर विवेक कसा काय करतां येईल? तेव्हां श्रीमन्त होणं जर कठीण मानलं, तर समृद्ध होणं हे महाकर्मकठीण मानावं लागेल... ...होय की नाही?"
मराठे काका," कसं बोललात...तेव्हां इतका कुटाणा झाल्यावर आतां तुमच्या कूटप्रश्नाचं निरूपण करूं या... ...ठीक?"
मी कान टंवकरले," हं... ...हं...बोला की..."
मराठे काका,"तेव्हां रविशंकरजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका तत्त्वज्ञानी माणसानं तेराशे वर्षांपूर्वीच दिलेलं आहे...!!! ते सुभाषित असं आहे... ...


         ॥ साधनेनाप्नुतं साध्यं साध्येन न साधनम्‌
           साध्यसाधनव्यत्यासाद्दु:खमाप्नोति मानवः ॥

तात्त्पर्य यशवन्त-जयवन्त या दोन भावांना या सुभाषिताचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे जाणवला होता... ...!!"
मला ती ग्यानबाची मेख कांही आकळेना,"म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हांला?"
मराठे काका,"मला असं म्हणायचं आहे की, ' साधनेनाप्नुतं साध्यं ' - म्हणजेच साधनाचा वापर करून ईप्सित साध्य करायचं असतं, हे जयवन्ता ला जाणवलेलं होतं... ...म्हणून तो शिकण्यासाठी अमेरिकेला गेला, आणि भवितव्याचं त्यानं सोनं केलं... ..."
मी," मग यशवन्ता चं काय?... ...त्यानं पण 'जी. आर्. ई.' तनं पार पडतांना रक्त आटवलेलं होतंच की... ...नाही?"
मराठे काका," इथंच तुमची गफलत झाली... ...यशवन्ता च्या बाबतीत झालं असं की त्याला साध्य-साधन यातला फरक धडपणे जाणवलेला नव्हताच, आणि ' साध्येन न साधनम् ' - म्हणजेच ईप्सित हे               साधन मिळवण्यासाठी वापरायचं नसतं... ...हे शहाणपण ही कळलेलं नव्हतं... ..."
मी गडबडलो,"फोड करून सांगा... ...नीटसं नाही कळलं... ..."
मराठे काका," तात्त्पर्य, जयवन्त हा शिकण्यासाठी अमेरिकेला गेला, तर यशवन्त हा अमेरिलेला जाण्यासाठी शिकत होता... ...!! आतां आलं लक्ष्यांत सगळं?"
मराठे काकांचं अचूक निरूपण ऐकून थक्क होत आतां मी चा कपाळाला हात लावला... ...!!
मराठे काका," त्यामुळंच यशवन्त च्या बाबतीत 'अमेरिका गमन' हे त्याचं साध्य म्हणजे ईप्सित असल्यामुळं, त्यासाठी शिकणं हे त्याचं साधन होऊन बसलं...  ...
           परिणामी, अमेरिकेला जाण्याचं स्वप्न साध्य झाल्यावर त्याची साधनाची गरज संपलेली होती... ... ...!!!
           पुढं त्याचं पर्यवसान कश्यात झालं, ते तुम्हीच सांगितलंत मला थोड्याच वेळापूर्वी... ...हो की नाही?
           अमेरिका वेडानं पछाडलेल्या इथल्या पोरांचं पुढं जे कांही होतं, तें च त्याचंही झालं... ...फक्त ते तो अमेरिकेला गेल्यानंतर झालं...इतकाच काय तो फरक.
           त्याच्या डोंक्यात साध्य-साधनाचा व्यत्यास झालेला असल्यानं त्याचं जे कांही झालं, त्यापेक्षा वेगळं कांही होणं शक्य तरी होतं काय सांगा मला रविशंकरजी?"
निरूपण उरकून आतां मराठे काकां नी रम् चा प्याला उचलल्याच्या थाटात पुढ्यातला चहाचा कप उचलीत मला शुभेच्छा दिल्या," नाऊ अवर् वन् फॉर् द रोड... ...चीअर्स् रविशंकरजी... ..."
आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या व्यासंगानं थक्क होत मी पण पुढ्यातला आसामी चहाचा कप उचलून त्यांच्या कपावर आदळीत दाद दिली," चीअर्स् काका... ...ऍण्ड् थॅंक् यू.... ..."

---------------------------------------------------------------------------------------------------
-- रविशंकर.
ऑगस्ट १२ २०१८.

No comments:

Post a Comment