Search This Blog

Saturday 16 December 2017

॥ प्लास्टरायन ॥

वाचकहो... ...

या लघुकथेची खर्‍या अर्थानं जर कुणी नायिका असेल, तर ती म्हणजे माझी दिवंगत आज्जी... ... कै. सीताबाई बाळकृष्ण नानिवडेकर.
'विद्यावन्त कर्तृत्त्वाचा लौकिक शिक्षणाशी अर्थाअर्थी कांही संबंध असतोच असं नाही' या उक्ती चा भक्कम पुरावा, म्हणजे ही माझी आज्जी.
आजच्या काळांत जन्मली असती, तर डझनभर कंपन्यांचं अध्यक्षा पद तिनं नक्की च भूषवलं असतं, असली धमक, पोलादी कणखरपणा,परिस्थितीचं अचूक मूल्यमापन करण्याची अजोड क्षमता, क्षणांत निर्णय घेऊन ते अंमलात आणायची विलक्षण तडफ, हिटलर ची शिस्त, डोंक्यावर अवघं आभाळ कोंसळायची वेंळ आली तरी तसूंभरही न डगमणारा फील्ड मार्शल रोमेल चा निधडा बेडरपणा, आणि आजच्या जमान्यातल्या मॅनेजमेंट कोर्सेस् च्या भाषेत जिला'स्पीअरहेडिंग् पर्सनॅलिटी' असं म्हणतात, असे अफाट नेतृत्त्वगुण अंगीं असलेली ही बाई उभ्या हयातीत प्राथमिक शाळेच्याही पायर्‍या कधी चढलेली नव्हती, हे विशेष... ...


तिच्यासमोर उभे राहून बोलतांना साठी च्या जमान्यातल्या वर्दीधारी हवालदार-जमादारांचे ही पाय लटपटलेले मी स्वतः पाहिलेले आहेत...
आजच्या आय्. टी. छाप शो बिझिनेस वाल्या पॉलिशमारू कॉपी-पेस्ट् च्या जमान्यात बघाल तिकडं, एक खोंचक प्रश्न विचारतांच बोबडी वळणारे 'पदवीधर पोपट' कां दिसायला लागलेत, याचं उत्तरही तें शोंधणार्‍याला या कथेत मिळावं...  
आज माझ्या परी नं मी जो कांही आहे, जे कांही करतो आहे, आणि जे कांही इतरांना निरपेक्ष बुद्धी नं देऊं शकतोय्‌ , त्याचं सारं श्रेय निर्विवादपणे, लिव्हिंग एक्सलन्स् चं शिखर विशीतच सर केलेल्या ह्या माझ्या कर्तृत्त्वसंपन्न निरक्षर आज्जी कडं जातं... ...
तिची आंठवण माझ्या ब्लॉगवर अखण्ड तेंवत रहावी, यासाठी हा कथाप्रपंच... ...

'प्लास्टरायन'


*****************************************************************************************
-- रविशंकर.
    डिसेंबर १६ २०१७




॥ प्लास्टरायन ॥



" हांऽऽऽऽऽऽऽऽश्शी....झालं बरं का इटोबा...आतां थांबला ना हात दुखायचा?" डॉ. गद्रे विठोबां च्या हाताला घातलेल्या प्लास्टरवर अखेरचा हात फिरवत म्हणाले
" थांबलं बगा आत्ताशी डागदरसायेब...अवो बोंबलून श्यान् जीव र्‍हातोया का जातोया, आस्ली येळ आलीवती बगा..." इटोबा शस्त्रक्रियेच्या मेजावर उठून बसत उत्तरले.
"आतां हे असंच ठेवायचं बरं का महिनाभर...अजिबात बोटसुद्धां लावायचं नाही प्लास्टरला...काय?" डॉक्टर विठोबां ना दम भरीत म्हणाले...," नाहीतर कांहीतरी नवीन उचापती करून बसलात, आणि परत हात वेडावाकडा करून घेतलात तर इकडं फिरकायचं नाही अजिबात...!!... ... आलं ना ध्यानांत?"
इटोबा नी आपल्या कपाळाला हात लावत नुस्ती होकारार्थी मुण्डी डोलवली, अन्‌ मेजावरून खाली पायउतार झाले...
आणि काकां [माझे वडील] सकट भोवती जमलेल्या सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला.

एकोणीसशे एकसष्ट सालातला डिसेंबर महिना...देवदिवाळी संपून खेडोपाडीं ऊस तोडणी चालू झालेली अन्‌ शेताभातांवर गुर्‍हाळांच्या भट्ट्या पण धडाडून पेटलेल्या होत्या.
पीकपाणी भरघोंस आलेलं होतं...त्यामुळं शेतकरी वर्ग जाम खुषीत येऊन कामाला लागलेला होता.
कोल्हापूर जवळच राधानगरी रस्त्याला लागून असलेल्या आमच्या राशिवडे गावांत आमच्या उसाच्या शेतातलं गुर्‍हाळही ह्या 'इटोबां'च्या शुभहस्ते मुर्हूताचा नारळ फोंडून धंडाक्यात सुरूं झालेलं होतं.
तीस चाळीस एकर शेतांतला ऊस तोडणी करून गाळून उकळून गुळाच्या तयार झालेल्या भेल्या [ज्यांना शहरी भाषेत ढेपा असं म्हणतात], पुढील पंधरवड्यात मार्केट यार्डात पोंहोचायला हव्या होत्या, म्हणून इटोबा सकट शेतावरचे तोडकरी, काहिल्ये, गुळवे, इ. एकजात चाळीस पन्नास कामकरी बाह्या सरसावून कामाला लागलेले होते...
आणि पहिल्या रात्रीच्या गाळपातच ह्या इटोबांचा डावा हात मोटर च्या पट्ट्यात अडकून उसाबरोबर चंरकात जाऊन पिरगळला गेला...डाव्या हाताची दोन्ही हाडं उसाचं कांडकं मोडावं तशी काड्काड् आवाज करत मोडलेली होती...!!
झाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽलं....गाळप राहिलं बाजूलाच, अन्‌ गुर्‍हाळावर नुस्ता हलकल्लोळ उडाला...!!!
,"आगायायायायाया....म्येलो म्येलो रं पांडुरंगा" करत जीव खाऊन किंचाळाणार्‍या विठोबाचा मोडलेला हात घाण्याच्या पोलादी लाटांतनं उपसून बाहेर काढेस्तंवर सगळ्यांना दरदरून घाम फुटला...
कुणीतरी जवळच्या 'पोष्ट हापिसात' जाऊन आमच्या घरीं कोल्हापूरला काकां ना फोन लावला...वेळ होती पहाटे तीन ची.
,"इट्या भोसडीच्चा कुठंतरी धडपडलाय्...राशिवड्याला जाऊन येतो", एव्हढंच आईला सांगून काका अंगातल्या कपड्यानिशीच बुलेट दामटत राशिवड्याला धांवले होते.
आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी हा ' प्लास्टरायना ' चा अध्याय उरकूनच घरीं परतले, तेव्हां सगळ्यांना कळलं काय झालं होतं ते.

हे डॉ. गद्रे म्हणजे काकां चे शाळेपासूनचे लंगोटियार...त्या काळांत इंग्लंड ला जऊन एफ्. आर. सी. एस्. करून आलेले कोल्हापुरातले नामांकित शल्यविशारद...त्यांच्यावर काकांचा ठाम विश्वास...म्हणून ह्या विठोबांचं 'प्लास्टरायन ' त्यांच्याच दवाख्यानात पार पडलेलं होतं. 
हे ' इटोबा ' ऊर्फ श्री. विठ्ठल सयाजी टोपेकर हे गेल्या तीन पिढ्यांपासूनचे आमच्या शेतावरचे कुळकरी, आणि चार आण्याचे वाटेकरी पण. त्यामुळं अडाणी-अशिक्षित असले तरी आमच्या घरांत त्यांच्याबद्दल घरच्यासारखा जिव्हाळा होता...सबंध शेतीवाडीचा राशिवाड्यातला गदाडा एकहाती सांभाळणारा, बसल्या बैठकीला आठदहा भाकर्‍या,आणि तपेलीभर भाताचा चुटकीसरशी फन्ना उडवणारा, दिवसाला सोळा-अठरा तास घरदार विसरून शेतीवर राबणारा दमदार रगेल गडी. असला पठ्ठ्या हाताशी असल्यामुळंच वडील राशिवड्याचा कारभार ह्या इटोबावर सोंपवून निर्धास्तपणे नानिवड्यातला जमीन-जुमला सांभाळूं शकत होते. राशिवड्यातला गुर्‍हाळाचा व्याप तर ऐन तोंडावर आलेला...
आतां हा च असा जायबंदी झाल्यावर काय करायचं?
तेव्हां मग," ह्या इट्या ची महिनाभर काळजी घ्या...राशिवड्याहून मी रखमा [ इटोबांच्या सौभाग्यवती ] ला इकडं पाठवून देतो...म्हणजे ती ह्याच्यकडं पण बघेल, आणि घरांतल्या कामाधामांना पण तुम्हांला हातभार लावील. पण मी परत येऊन ह्या च्या हाताचं प्लास्टर काढेतोंवर ह्या ला बाहेर कुठंही सोडायचा नाही...गुर्‍हाळाकडं आतां मला स्वतःलाच बघायल हवं..." इतकं आई ला बजावून काका दुसर्‍या दिवशी रशिवड्याला निघून गेले. पुढं एकदोन दिवसांत रखमा इटोबांच्या सात-आठ वर्षाच्या महादेव ऊर्फ म्हाद्या ला बोंटाला धंरून घरीं दाखल झाली... ...
आणि माझी एकूणच चंगळ झाली.
एकतर गांवभर हुंदडायला म्हाद्या बरोबर मिळाला, आणि उरलेल्या वेळात गोष्टीवेल्हाळ इटोबांच्या तोंडातनं खेंड्यातल्या नानाविध अफलातून गोष्टी ऐकायच्या...बस्स् आणखी काय हवं होतं त्या वयात?
दुसरं म्हणजे ह्या इटोबांचा एक विलक्षण वीक पॉइंट् होता...तो म्हणजे सिनेमा... ...बाकी सुपारीच्या खांडाचा पण नाद नाही... ...अगदी अवाक्षरही समजणार नाही असले विंग्रजी चित्रपट असले, तरी ह्या इटोबांचं कांहीएक बिघडायचं नाही... ... ...'चित्रं बगूनश्यान् समदं कळतंया की वो... ...त्वांडं काय चाटायचीत व्हंय्?' हे त्यांचं तत्त्वज्ञान. त्यामुळं अगदी 'केला इशारा जातां जातां' पासून ते फ्रॅंक सिनात्राच्या 'फोर फॉर टेक्सास' पर्यंत कुठ्ल्याही चित्रपटाला ह्या इटोबांची हजेरी असायची. त्यातल्या त्यात साधना - शम्मी कपूर ही त्यांची आवडती जोडी. त्या सिनेमातल्या गोष्टींचा खजिनाही त्यांच्याजवळ भरपूर असायचा. त्यामुळं गल्लीतली सगळी पोरंटारं जाम खूष होती.

झालं काय, की पहिले तीन-चार दिवस पटकुरावर बसून शिराळशेटासारखे घालवल्यावर मग हे इटोबा कंटाळले... ...सतरा-अठरा तास शेतीवाडीवर राबणार्‍या त्या गड्याचा त्या पटकुरावर नुस्तं बसून कांही केल्या वेळ जातां जाई ना. भरीला नेमका पद्मा चित्रपटगृहात त्या काळी साधना चा गाजलेला ' वह कौन थी ' हा चित्रपट झळकला... ...त्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात, अन् गल्लोगल्लीं घरांच्या भिंताडांवर झंळकल्या, अन् इटोबां ची चुळबुळ सुरूं झाली... ...
," वयनी... ... आवो वयनी..."
आई," काय रे विठोबा...?"
विठोबा," काय न्हाई... ...जावं म्हन्तो आतां राशिवड्याला..."
आई," काय नडलंय तिथं तुझं आतां?... ...ह्यां नी जातांना काय सांगितलंय् ते माहीताय् ना? की पायताणं खायची हौस आलीय् तुला तिथं जाऊन... ... ऑं?"
इटोबा,"समदी कामं वाट बगत आसत्याल तितं वयनी माजी... ...आनि करूं काय हितं मी बसून नुस्ताच तुकडे मोडत?...येळ जाई ना झालाय्... ...पार आंबून श्यान् गेलाय् बगा जीव हितं...काय करूं मी तरी?"
आई,"हे बघ विठू... ...ह्यां ना विचारल्याशिवाय मी कांही तुला इथनं सोडणार नाही...आणि काय रे, रखमा पण आहे ना इथं तुझं हवं नको बघायला? मग कसला कंटाळा आलाय् तुला आतां?"
तरी विठोबा हेका कांही सोडेनात,"पर येळ तरी कसा घालिवनार वो म्या हितं मढ्यागत निस्तं बसून?... ...राशिवड्याला ग्येलो तर कामं तरी वडतां येत्याल का न्हाय सांगा मला?"
इटोबांचा युक्तिवाद बिनतोड होता, पण सोडतां तर येत नव्हतं अश्या पेंचात मग आई अडकली... ...
आणि सल्ला विचारायला थेट माझ्या आज्जीकडं [ काकां च्या मातोश्री ] गेली.
आमची आज्जी म्हणजे बारा पिंपळावरचे सतराशेसाठ मुंजे कनवटीला लावलेली तडाखेबन्द बाई...तिला इटोबांचे 'वीक पॉइंट्स्' नेमके माहीत होते...!!
आईल तिनं सांगितलं आठ पंधरा दिवसातनं विठ्या च्या हातावर पोरांना घेऊन सिनेमा ला जायला पांचदहा रुपये ठेंवा... ...भुणभुण मिटेल...!!!
आणि अहो आश्चर्यम्... ...आज्जीचा होरा अगदी अचूक निघाला.
," वेळ जाई ना झालाय् ना तुझा विठू? मग एखाद्या सिनेमाला जा रवि-उदय-म्हाद्या ना बरोबर घेऊन...हे ठेंव जवळ" म्हणत आई नं इटोबां च्या हातावर करकरीत दहा रुपयांची नोट ठेंवली, अन्‌ इटोबां चा कंटाळा कुठल्या कुठं पळाला...!!! आणि त्यांच्या कारणे आमची पोरांची पण चंगळ झाली. त्याकाळीं सिनेमा चा तिकिट दर होता पन्नास पैसे...वर मधल्या सुट्टीत कांहीबाही खादीसाठी दहा पैसे धंरले, तरी माणशी साठ नवे पैसे एकूण खर्च. तेव्हां दहा रुपयांचा गडगंज गल्ला म्हणजे इटोबांची दोनतीन महिन्यांची बेगमी झाली.
आणि त्याच दिवशी आम्हां पोरांना सोबत घेऊन इटोबांची स्वारी ' वह कौन थी ' बघायला खुषीत घराबाहेर पडली.... ...
सिनेमातलं आम्हां पोरां ना कांही कळलं नाही फारसं, पण साधनाबाई ना भेंटल्यावर इटोबां ची ' राशिवड्याला जातो ' ची टकळी मात्र बूच मारल्यागत बंद पडली... ...
यथावकाश एक दिवस करकरीत फेटा बांधून इटोबा, रखुमाई सोबत शम्मी कपूर चा 'प्रोफेसर' [ त्यांच्या भाषेत ' पोपेश्वर ' ] पण बघायला गेले... ...!!!
आणि इथं च सगळा घोटाळा झाला... ...
विठ्ठल-रखुमाई चा जोडा शाहू चित्रपटगृहांत 'पोपेश्वरां' ना भेंटून आल्याच्या तिसर्‍याच दिवशी अपरात्री दोन अडीच वाजतां इटोबा ' अगायायायायायाय्...' करून किंचाळत अंथरुणांत उठून बसले, अन्‌ पिसाटल्यागत नखांनी हातावरचं प्लास्टर बाहेरून खांजवत घरभर धिंगाणा घालायला लागले... ...!!
शाहू हे त्याकाळी दुय्यम-तिय्यम सुमार दर्जाचं अस्वच्छतेबद्दल जगजाहीर असलेलं चित्रपटगृह, ढेंकणांसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. तिथं 'पोपेश्वरां' बरोबरच्या भेंटीगांठी त दंडावरच्या फटीतनं इटोबांच्या हाताच्या प्लास्टरखाली ढेंकूण शिरलेले असावेत, आणि आतां ते इतस्ततः चांवत सुटलेले असावेत...!!!
सगळं घर उठून इटोबां भोंवती गोळा झालं. इटोबांची अवस्था म्हणजे अंगांत आलेलं उतरावायला गाणगापूर च्या दत्त मंदिरांत धंरून आणलेले पिसाट बरे म्हणावेत, इतकी वाईट झालेली होती... ...
प्लास्टर वर बाहेरनं खांजवून प्रश्न थोडाच सुटणार होता?
भरीला, 'गुळाच्या ढेपांचा पहिला ट्रक मार्केट यार्डात दाखल करायला काका सकाळी दहा वाजेपावेतों घरीं पोंचतील' असा निरोप घेंऊन राशिवड्यातला गजा माळी आदल्या रात्रीच घरी आलेला होता... ...!!!
झाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽलं... ...बघतां बघतां घराला कुरुक्षेत्राचं स्वरूप आलं...
इटोबांचा आक्रोश कांही थांबे ना...
मग कुणीकुणी स्वयंपाकघरातले झारे उलथनी घेंऊन आले, आणि ते दंडावरच्या फटीतनं प्लास्टरमध्ये सरकवून हात खांजवायच्या खटपटी पण करून झाल्या.
पण प्लास्टर हाताच्या अंगठ्यापासून कोपरापर्यंत आणि तिथनं पुढं काटकोनांत पांचसहा इंच वर अर्ध्या दंडापर्यंत घातलेलं असल्यामुळं ती झारे-उलथनी वगैरे कांही केल्या त्याखाली सरकवतां येईनात... ...
इकडं इटोबांचा आतां रोंबा-सोंबा सुरूं व्हायचाच काय तो शिल्लक राहिलेला होता...!!
शेंवटी सगळ्यांनी हात टेंकले, आणि आई नं वरच्या मजल्यावर झोंपेत असलेल्या आज्जी ला उठवून खाली आणलं.

'अशक्य' हा शब्द शब्दकोषांत नसलेली माझ्या माहितीत आजमितीस दोन च बेडर माणसं होऊन गेली असावीत... ...पहिला फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट् , आणि दुसरी ही माझी आज्जी.
पंचवीस एक माणसांचं एकत्र कुटुंब आणि दोन गावांत पसरलेला शेतीभातीचा रामरगाडा काका जाणते होईपर्यंत तब्बल पस्तीस वर्षं एकहाती रेंटणारी ही माझी आज्जी, कसल्याही आणीबाणीच्या परिस्थीत केंसभरही डगमगलेली मी कधीच पाहिलेली नाही. त्यामुळं तिचा दराराही आख्ख्या कोल्हापूरभर पसरलेला होता. आज्जी पांठीशी आहेत म्हटल्यावर भल्याभल्यांना धीर आलेला मी पाहिलेला आहे...
आज्जी खाली उतरलेली बघितल्यावर मात्र इटोबांचा धीर खंचला, आणि ते," मी काय बी न्हाय क्येलं आज्जी..." म्हणत गयावया करायला लागले...
," काय झालंय ह्याला?" आज्जी नं जांभई देंत विचारलं...
मग सगळ्यांनी काय झालं ते तिला सांगितलं... ...
आतांपावेतों पहाटेचे चार वाजायला आले होते. काका घरी पोंहोचायला जेमतेम पांचएक तासच बाकी होते.
आतां मात्र आई चा ही धीर सुटायला लागला, अन्‌ ती पण चिंतातुर नजेरेनं आज्जीकडं बघायला लागली... ...
आश्चर्य हे की आज्जी चा पोलादी चेंहरा बघतां बघतां वितळला," अगं ढेंकूण प्लास्टरखाली शिरून चांवत सुटले असले, तर काय करील गं हा, घर डोंक्यावर घेईल नाहीतर?...इटोबा... ...पार भडका उडालाय् काय रे बाबा?"
इटोबा कळवळत उत्तरले," व्हय वो आज्जी... ...मायंदाळ डंसत सुटलीत भोंसडीच्ची हाताला... ...काय करूं आतां?... ...खांजवाया पण जमंना झालंय वो...अगायायायाया... ..."
इटोबांचा पिंगा परत सुरूं झाला... ...
आज्जी च्या कपाळावर एक क्षणभर मधोंमध उभी आंठी पडली... ...
सगळं घर चिडीचूप झालं... ...
आणी पहिल्या झंटक्यात तिनं इटोबां ना धीर दिला," घाबरूं नको इटोबा... ...मी आहे ना?... ...करतो सगळी व्यवस्था काय ती." [ त्या काळच्या कर्त्या बायका ' येतो,जातो,करतो ' असं पुरुषी थाटांतच बोलायच्या.]
दुसर्‍या क्षणी आज्जी नं गजा माळ्याकडं बोंट दाखवत उदय [ माझे मोठे बंधू ] ला फर्मान सोडलं..."जा पळ... ...ह्या गजा ला घेंऊन कोपर्‍यावरच्या माई दिवाणांच्याकडं...त्यांना उठव, आणि त्यांची झाडं छाटायची कात्री घेऊन ये लगेच... ...मी मागितलीय् म्हणावं."
उदय नं गजाकाका ला सोंबत घेऊन माईं चं घर गांठलं...भल्या पहांटे त्यांना हाका मारून उठवलं, आणि कात्री घेऊन आला माघारी एकदाचा.
आज्जी वाट च बघत होती...गजा माळ्याकडं बघत तिनं दुसरं फर्मान सोडलं," ती कात्री उचल, आणि हे प्लास्टर असं उभं च्या उभं मनगटापास्नं पार दुसर्‍या टोकापर्यंत कातरून काढ... ...लगेच."
गजा माळी सटपटला," आज्जी...म्या माळी... ...झाडं कापल्याती मायंदाळ... ...पन ह्ये आस्लं डागदराचं काम... ..."
,"तुझा डागदर गेला खड्ड्यात...!!!", आज्जी कडाडली,"मी सांगतोय्‌ ना तुला कापायला ते?... ...ऐकायला नाही आलं तुला?"
गजा माळ्याची पुढं ब्र काढायचीही शामत नव्हती...बिचार्‍यानं कात्रीचं एक धारदार फाळ मनगटाच्या बाजूनं प्लास्टरखाली सरकवलं, अन्‌ सपासप् कात्री चालवत अवघ्या चार मिनिटांत इटोबांच्या हाताला घातलेलं प्लास्टर आरपार कातरून काढलं...!!
प्लास्टर निघतांक्षणीच इटोबां चा हर्ष अनावर झाला... ...
कातरलेल्या प्लास्टरमधनं इटोबां चं रक्त पिऊन माजलेले डझनभर तरी ढेंकूण टपाटप् बाहेर पडले, आणि इटोबा पायातलं कोल्हापुरी पायताण काढून अर्वाच्च्य लाखोली वाहत त्या मत्कूण समूहावर थेट मुरारबाजी च्या तेव्षांत अक्षरशः तुटून पडले... ...!!!
ढेकणांचा पार लगदा होऊन जमीन बरबटली, तरी इटोबांची लाखोली अन्‌ पायताणाचे तडाखे कितीतरी वेळ फडाफडा वाजत राहिले.
इटोबांची सुटका झाली एकदाची... ...पण आतां नवीनच समस्या आ वांसून समोर उभी ठाकली...काकां नी हे कातरलेलं प्लास्टर बघितलं तर.......?
आतां आईनं च कपाळाला हात लावला, अन्‌ त्या जमिनीवर लोळणार्‍या प्लास्टरकडं बोंट दाखवून आज्जीकडं बघत विचारलं,"ह्या चं काय करायचं आतां?... ...'हे' घरीं यायच्या आत सगळं निस्तरायला हवं...आज रविवार... ...सगळे दवाखाने बंद असणार... ...आतां?"
आजच्या काळातल्या भल्या भल्या कॉर्पोरेट्स् नी धडा घ्यावा असलं विलक्षण धैर्य दाखवत आज्जी हंसली... ...म्हणाली," मी आहे ना काय ते बघून घ्यायला?... ...तूं रोजचे व्याप सांभाळायच्या मागं लाग..."
मग तिनं मोहरा माझ्याकडं वळवला," काय रे... ...सदूकाका चांभाराचा पोरगा तुझ्याच वर्गात आहे ना?"
मी," ते 'चर्मकार कलावैभव' वाले? होय की...ओंळखतात ते मला... ...त्यांचा मुलगा माझ्याच वर्गात आहे... ...जया नांव आहे त्याचं..."
आज्जी," तो नव्हे रे... ...सदूकाकाला ओंळखतोस ना तूं? तर सायकल घे भाड्याची, अन्‌ सदूकाकाला जाऊन उठव, आणि पुढं घालून इकडं घेऊन ये लगेच... ...मी बोलावलंय् म्हणावं त्याला.", आज्जी नं चार आण्यांचं नाणं माझ्या हातावर ठेंवलं.
सायकल फिरवायची म्हटल्यावर मी पळत निघालो, तोंच आज्जी नं परत हांक मारली," आणि हे बघ...सदू काका ला म्हणावं, येतांना पायाताणं शिवायचं सगळं सामान बरोबर घेऊनच बोलावलंय्...काय?"
," ठीकाय् आज्जी आत्तां आणतो बोलावून", म्हणत तिनं पुन्हां हांक मारायच्या आत मी 'नाळे सायकल मार्ट' कडं पळत निघालो.

सदाकाकां चं बिंदू चौकातलं घरही गाढ झोंपेत होतं... ...दरवाज्यावर धंपाधंपा थापा मारल्या, तेव्हां शांताक्का नी डोंळे चोंळत दार उघडलं...,"काय रं पाखं कां वाजिवतंय्‌स सक्काळच्या पारी?...काय झालंया?"
मी," सदू काकां ना बोलावलंय्‌ आज्जी नं... ..."
शांताक्का,"आजुन उटल्यालं न्हाईती... ...च्या पानी झालं की द्येते धाडूनश्यान् म्हनावं आज्जी नां... ..."
मी," शांताक्का... ...आत्ताच्या आत्तां बोलावलंय्‌ सदामामा ना आज्जी नं... ...पुढं घालून घेऊनच ये म्हणून सांगितलंय्‌ मला..."
," आत्ता गं बया..." म्हणून तोंडाचा चंबू करीत शांताक्का मागं वळून घरांत गेली, अन्‌ दोनचार मिनिटांत तोंडावर पाणी मारून ते पंचा नं पुसत सदाकाका बाहेर आला... ...
," काय झालंया रं बाबा?... ...कां बलिवलंया आज्जी नी?"
मी," मला काय माहीत नाही सदामामा...पण तुम्हांला पुढं घालून ताबडतोब घेऊन यायला सांगितलंय मला... ...चला पटकन्‌."
बरं येतो बाबा... येतो... ...जरा बंडी घालूनश्यान येतंय्... ...थांब हतं वाईच"... ...म्हणत सदाकाका आत जायला निघाला, तसं मी त्याला पायताणं शिवायचं सगळं सामान बरोबर घ्यायला सांगितलं...
," सदाकाका नं त्याची पोतडी भरून खांद्याला लटकवत विचारलं," ह्ये आनि कश्यापायी?... ... तूं व्हो म्होरं...म्या येतंय्‌ मागोमाग"
मी,"नको नको सदाकाका... ...मी सायकल आणलीय,  तिच्यावरच बसून जाऊं या लगेच."
," काय लचाण्ड झालंया, त्ये पांडुरंगालाच ठावं... ...बरं चल बाबा" म्हणत सदाकाका नं मला मागच्या कॅरिअर वर बसवला, अवजारांची झोळी हॅंडलला लटकवली, आणि डेक्कन क्वीन च्या थाटात जीव खाऊन सायकल आमच्या घराच्या दिशेनं हाणली... ...

दिवाणखान्यात आज्जी पलंगावर बसलेली होती, आणि समोरच इटोबा हात खाजवत पटकुरावर निमूट बसलेले होते... ...
आज्जी," ये ये सदा... ...बस असा समोर... ...चहा झालाय्‌ की नाही सकाळचा अजून?"
सदा," न्हाई जी... ...ल्येकरूं सांगावा घिऊनश्यान्‌ आलं तुमचं, आन्‌ तसाच आलोया बगा बिगिबिगी... ..."
आज्जी नं मग आई ला सदामामा ला चहा द्यायला सांगितलं, अन्‌ विचारलं," कसं काय चाललंय तुझं एकूण...?"
सदाकाका,"समदं झ्याक् चाल्लंया बगा आज्जी तुमच्या आशीर्वादानं... ...पर आस्ल्या रामपारी ल्येकराला कश्यापायी पाटिवलंसा वो? निस्ता सांगावा धाडला आस्तात तरी आलो आस्तो की म्या... ..."
आज्जी," तसंच तातडीचं काम निघालंय म्हणून पाठवलं ह्याला तुला पुढं घालून आणायला... ..."
,"आस्लं काय काम काडलंया आज्जी?", सदा काका.
,"चहा गार होतोय् सदा... ...तो घे आधी मग सांगतो तुला सगळं..."
सदा काका नं चहाचा कप बशीत ओंतून फुर्र् - फुर्र् आवाज काढत संपवला, अन्‌ आज्जी नं विचारलं, "कोल्हापुरी पायताणं बांधतोस ना अजून...हातशिवणीची?"
सदा काका," व्हय जी... ...त्येच्याबिगर प्वाट कसं भरायचं आमचं? कुनाच्या पायाचं माप घ्याया बलिवलंसा?"
आज्जी,"पायताण शिवायला नाही बोलावलं तुला सदा... ..."
सदा काका," मंग वो आज्जी?"
आज्जी मग इटोबांच्या शेंजारी पडलेल्या कातरलेल्या प्लास्टर कडं बोंट दाखवत म्हणाली," हे शिवून हातावर परत बसवायला बोलावलंय्‌ तुला... ...चामड्याची वादी आणलीय्‌स ना बरोबर ?"
ते तसलं काम बघून सदा काका ची दांतखीळच बसली," ह्ये... ...ह्ये...आस्लं काम आज्जी... ...मला कसं काय जमायचं वो?... ...छ्या छ्या छ्या... ..."
आज्जी आतां तंडलकीच," काय झालंय न जमायला तुला... ...ऑं?...रेड्याचं चामडं रगडून पायताणं शिवण्यात जन्म गेलाय ना तुझा? आतां हे प्लास्टर शीव म्हटल्यावर शेंपटी तंगड्यात गेली की काय तुझी?"
सदा काका गडबडला,"न्हाई जी... ...तसं काय बी न्हाई..."
आज्जी," मग कसं काय हाय?.... ...अं?... ...जमणाराय तुला, की दुसरा चांभार बोलावून आणू?"
सदा काका,"बगतो काय तरी जमतंया काय त्ये... ...पर न्हाई कंदी केल्यालं म्या आस्लं काम बगा... ...आनि शिवन मारतानी टोच्या हातामंदी घुसला बिसला तर मंग काय करायचं वो आज्जी?"
आज्जी,"कांही होणार नाही... ...मी बसलोय ना काय होतंय ते बघून घ्यायला?...तूं कश्याला काळजी करतोयस? जमणाराय की नाही तेव्हढं बोल फक्त...बाकी वटवट नकोय मला तुझी..."
सदा काका,"तुमी हायसा पाटी म्हनल्यावर जमत नाय आसं कसं व्हईल वो आज्जी? आत्तां द्येतो की शिवूनश्यान् झंटक्यात... ..."
आज्जी," पैका किती द्यायचा तेव्हढं सांग... ..."
सदा काका," आतां पैक्याचं तुमच्याम्होरं म्या काय बोलनार आज्जी? कंदी बोल्लोय काय आजपत्तूर?... ...द्या काय द्याचं आसंल त्ये...म्या काय न्हाय मागायचा..."
आज्जी,"पण फुकट काम नकोय्‌ मला तुझं... ...नव्या पायताणाचे किती घेतोस तूं?"
सदा काका,"खरं सांगतो आज्जी... ...सात रुप्पय म्हंजी बक्कळ झालं नव्या पायतानाचं"
आज्जी मग आई कडं वळून म्हणाली,"काम झालं की ह्या च्या हातावर दहा रुपये ठेवा..."
सदा काका आतां आज्जी कडं कपाळाला हात लावून बघतच बसला... ...
आज्जी म्हणाली," बघतोयस काय असा माझ्याकडं?... ...चल आरी-टोच्या उचल तुझा आणि लाग कामाला... ...आणि एक सांगून ठेवतोय् तुला आत्ताच... ..."
सदा काका सटपटला,"... ...क क क काय म्हन्तायसा आज्जी?"
अन् आज्जी कडाडली," ह्यातलं अवाक्षरही तिसर्‍या कुणाला कळलेलं मला खपणार नाही... ...समजलं? जर उद्या माझ्या कानांवर तसली कांही कुणकुण आली, तर तुझ्या दुकानात येऊन तूच शिवलेल्या पायताणानं तुला सडकून काढावा लागेल मला... ...समजलं सगळं नीट?"
सदा काका दोन्ही कान पकडत कळवळला," आईच्यान् सांगतो आज्जी... ...जीव ग्येला तरी ह्यातलं काय बी ह्या कानाचं त्या कानापत्तूर जानार न्हाय बगा... ...पांडुरंगाची शप्पत...!!"
आज्जी,"आऽऽऽऽऽऽऽऽऽऽस्सं...चल लाग आतां कामाला... ...गद्रे डॉक्टरानं घातलंवतं ते प्लास्टर... ...त्याला पण कळता कामा नये अजिबात, की हे कुणीतरी शिवलंय्‌ म्हणून... ...काय? मलाही जरा बघूं दे तुझ्या बोटांत कांही कसब शिल्लक राह्यलंय की गायब झालंय ते... ...शिवण घालतांना हे प्लास्टर कुठं-कसं दाबून धंरायचं तेव्हढं फक्त दाखव मला... ...ऊठ रे विठ्या... ...तुझा हात ठेंव इथं ह्या मेजावर... ... ...चल ऊऽऽऽऽठ."
इटोबांच्या खरं तर पोंटात गोळाच आला होता, पण ते मुकाट्यानं उठले आणि त्यांनी जायबंदी हात समोरच्या मेजावर सफाचट पालथा ठेंवला... ...पांडुरंगाचं नांव घेत.
मग सदा काका नं आई कडून सहाण मागून घेतली, तीवर घांसून आरी अन्‌ टोंच्याला चंरचंरीत धार लावली...मग आज्जी ला विचारलं," आज्जी...तुमी सोताच दाबूनश्यान धंरनार ह्ये?"
आज्जी,"मग? दुसर्‍या कुणी करायला हवं?... ...आख्खी शेतीवाडी सांभाळतोय हा विठ्या माझी... ...मी नाहीतर दुसरं कोण बघील त्याच्याकडं?" 
सदाकाका नं मग पाजळलेली आरी सपासप् चालवत कात्रीनं वेड्यादिद्र्या कापल्या गेलेल्या प्लास्टरच्या कडा रेंखीवपणे सरळ रेघेत कापून घेतल्या...
मग इटोबा ना त्यावर हात ठेंवायला सांगितलं.
मग दोन्ही बाजूनी वर खेंचून ते नीटसपणे हाताभोंवती आंवळलं, अन्‌ आज्जी ला म्हणाला," या आज्जी फुडं आतां...आनि ह्ये गच् दाबूनश्यान आसं धंरा, की कापल्याली धार भाईरनं दिसाया नगं... ...काय?
आनि जसं म्या शिवान हानत फुडं फुडं सरकल कां न्हाय, तसं तुमी बी ह्ये भगदाड बुजवत हात फुडं फुडं सरकवायचं... ...बाकीचं म्या बगूनश्यान् घ्येतंय्‌ काय त्ये...चला"
असं म्हणत सदा काका नं पक्क्या चामड्याची सहा फूट वादी अन्‌ पाजळलेली आरी सरसावली...
आज्जीनं दाबून धंरलेल्या कोंपराकडच्या दोन्ही तोंडातनं भस्स्‌कन् टोच्या खुपसत आधी दोन अडीच फूट लांबीचा कुलुपी धागा [ लॉकिंग् थ्रेड् ] ओंवून तें तोंड गच्च आंवळून जुळवून बंद केलं... ...
आणि मग एफ्. आर्. सी. एस्. झालेल्या शल्यविशारदालाही लाजवील अश्या कौशल्यानं प्लास्टरला आंतल्या बाजूनं भराभर वर्तुळाकार टांके घालत, त्यातनं कुलुपी धाग ओंवून घेत घेत अवघ्या पंचवीसएक मिनिटांत ते प्लास्टर सफाचट शिवून टाकलं...
आणि मग बोंटांकडच्या तोंडाचा शेंवटचा वर्तुळाकार टाका घातल्यावर त्याला पक्की सरगांठ मारून तीतून सबंध शिवणीतनं आरपार गेलेला कुलुपी धागा सदा मा नं अश्या कांही सफाईनं बाहेर ओंढून काढून टाकला, की प्रत्यक्ष विठ्ठला सकट भोंवती जमलेले सगळे च्या सगळे लोक अक्षरशः आं वांसत कपाळाला हात लावून बघतच बसले... ...!!!
इटोबांच्या हातावरचं प्लास्टर शिवलेलं असल्याची कुठलीही दृष्य खूण बाहेरून दिसत नव्हती... ...अगदी संशय येण्याइतपत सुद्धां...!!!
आज्जी नं सदा काका ची कडकडून पांठ थोंपटत त्याच्या हातावर दहा रुपयांची नवी कोरी नोट ठेंवली,"शाब्बास रे सद्या... ...आहेस खरा बहाद्दर गडी... ..."
सदा काका आपलं सामान सुमान गोळा करून आज्जी ला रामराम ठोंकून निघून गेला...

पुढं पंधराएक दिवसांनी काका इटोबां ना डॉ. गद्र्यांच्या दवाखान्यात घेऊन गेले, आणि त्यांच्या हातावरचं प्लास्टर काढतांना डॉ. गद्र्यांच्या सगला प्रकार लक्ष्यांत आला.
त्यांनी इटोबां ना जरा दमात घेतांच इटोबा नी आज्जी अन्‌ सदा चांभाराची नावं सांगून टाकत स्वतःची सुटका करून घेतली... ...
आणि ते प्लास्टर सदा चांभारानं शिवून जसं होतं तसं परत बसवलं होतं हे ऐकल्यावर डॉ. गद्र्यांनीच भर दवाखान्यात स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
त्यांनी नंतर कधीतरी गाडी पाठवून सदा चांभाराला दवाखान्यात बोलावून घेंतल्याचं आमच्या कानांवर उडत उडत आलं, पण त्याचं पुढं काय झालं ते कांही कळलं नाही, आणि सदा काका पण त्यानंतर कधी कह्णत कुंथत आज्जीकडं कांही सांगायला फिरकला नाही... ... ...

सात आठ वर्षं उलटली, आणि माझ्या आई ला थायरॉइड ग्रंथीच्या विकारानं ग्रासलं... ...
हळूंहळूं ती थायरॉइड चांगली सफरचंदाइतकी टमटमीत फुगली आणि शस्त्रक्रिया करून ती काढून टाकण्याशिवाय कांही पर्याय नसल्याचं डॉ. गद्र्यां नी निदान केलं...
झालं...त्या काळीं थायरॉइड् ची शस्त्रक्रिया म्हणजे जिवावरची शस्त्रक्रिया होती.
माझी आई तशी जातिवंत रूपवती म्हणावी इतकी रेखीव अन्‌ देखणी... ...
तश्यात कण्ठावर शस्त्रक्रियेचा पांच सहा इंच लांब व्रण कायमचा राहणार म्हटल्यावर तर तिनं हायच खाल्ली...ही शस्त्रक्रिया मला करून घ्यायचीच नाही...काय वाट्टेल ते होऊं दे... ...या हट्टाला ती पेंटली.
शेंवटी डॉ. गद्र्यांनी स्वतः जातीनं घरी येऊन तिची कशीबशी समजूत पटवली, की ,"वहिनी...माझं ऐका जरा... ...ही शस्त्रक्रिया करून घेण्यांत कसलीही चालढकल किंवा टाळाटाळ करूं नका, नाहीतर कधीतरी हे जिवावरचं दुखणं होऊन बसेल, आणि मग सगळंच हाताबाहेर जाईल..."
तरीही आई ची समजूत पटेना...तिचा आपला एकच हेका," मला गळ्यावर व्रण वागवत नाही जगायचं... ..."
शेंवटी डॉक्टरांनी तिला स्वच्छ शब्दांत खात्री दिली,"वहिनी सगळी चिंता माझ्यावर सोडून अगदी निर्धास्त व्हा... ...शस्त्रक्रिया मी स्वतःच करणार आहे, आणि त्यानंतर तुमच्या गळ्यावर औषधालाही व्रणाची नामोनिशाणी राहणार नाही, ही जबाबदारी माझी, आणि तसं कांही जर झालंच, तर मी व्यवसाय सोडून देईन."
इतक्या थराला गेल्यावर मग मात्र आई नं शस्त्रक्रियेला होकार दिला.
यथावकाश शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पार पडली... ...
आणि आश्चर्य म्हणजे डॉ. गद्र्यांनी आई ला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला... ...!!
आई च्या गळ्यावर डाव्या बाजूच्या टोंकाजवळ टांचणी च्या अग्राएव्ह्हढ्या लहान ठिपक्याव्यतिरिक्त शस्त्रक्रियेची कसलीही निशाणी डॉक्टरांनी शिल्लक ठेंवलेली नव्हती...!!!
तिची थायरॉइड् ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढून टाकलेली आहे असं सांगून देखील कुणाचा त्यावर विश्वास बसत नसे, असला निष्णात शल्यचमत्कार डॉ. गद्र्यांनी 'वहिनी' साठी करून दाखवलेला होता...!!

यथावकाश चौर्‍याहत्तर सालीं अभियांत्रिकीतली पहिली वहिली पदवी मानांकनासह उत्तीर्ण झाल्यानंतर मी डॉक्टर काकां ना पेढे देण्यासाठी त्यांच्या घरीं गेलो होतो, तेव्हां हा विषय अचानकपणे माझ्या डोंक्यात आला, आणि मी डॉक्टरांना छेडलं," काका...एक कोडं बरेच दिवस मला पडलेलं आहे... ...विचारूं?"
डॉक्टर हंसले," विचार की खुशाल...अडलंय कश्यांसाठी?"
मी," नाही... ...म्हणजे आई ची थायरॉइडची शस्त्रक्रिया जी तुम्ही केली होती ना, त्यासंबंधी एक प्रश्न घोंळतोय् डोंक्यात... ..."
डॉक्टर हंसले,"मग विचार की...त्यात कसला परकेपणा वाटतोय् तुला इथं माझ्या घरीं?"
मी," त्या काळी थायरॉइड काढायची म्हणजे...जवळपास चार-पाच इंच लांबीचा तरी छेद घ्यावा लागला असेल ना तुम्हाला गळ्यावर?"
डॉक्टर,"आतां नीटसं नाही आठवत....पण जवळपास साडे पाच इंच लांबीचा छेद असावा तो..."
मी," मग...इतका मोठा छेद असून देखील... ..." 
डॉक्टर तसे मनकवडे,"...आत्तां आलं लक्ष्यांत... ...ती जखम बाहेरून दिसत कशी नाही, हेंच कोडं पडलंय् ना तुला?"
मी," होय होय...तें च विचारायचं होतं...अहो, लोकांचा विश्वास बसत नसे तिची थायरॉइड काढलेली आहे असं सांगितलं तरी... ...ही करामत कशी काय साध्य झाली? कारण त्या काळी तरी शल्यतंत्र आजच्या सारखं विकसित झालेलं नसावं... ...मग?" 
डॉक्टर आतां खो खो हंसायला लागले," अरे तुलाच काय, त्यावेळच्या कोल्हापुरातल्या इतर शल्यविशारदांनाही तें च कोडं पडलेलं होतं... ...पण आतां तूं घरातलाच...तेव्हां तुला सांगायला कांही हरकत नाही."
मी कान टंवकारले... ...
डॉक्टर," तुला त्या विठ्ठल टोपेकराची केस आठवतेय्?...उसाच्या चरकात सापडून त्याचा हात मोडला होता बघ... ...मी च प्लास्टर घातलं होतं..."
मी," हो तर... ...चांगलंच रामायण-महाभारत झालं होतं तेव्हां घरांत... ...सगळं स्वच्छ आठवतंय् अजून."
डॉक्टर," तर झालं काय, की त्याचं प्लास्टर काढायला जेव्हां काका त्याला घेऊन आले होते ना दवाखान्यात, तेव्हां ते कातरून काढतांना माझ्या लक्ष्यात आलं की ते कुणीतरी आधीच कातरून मग परत शिवून पुन्हां जागच्या जागीं चपखल बसवलेलं होतं. बाहेरून अजिबात न दिसणारी ती आतल्या बाजूनं घातलेली शिवण बघून खरं सांगायचं तर मी ही चाट पडलेलो होतो... ...कारण असलं अफलातून शल्यकर्म करणारा कुणी शल्यविशारद मी एफ. आर. सी. एस. करत असतांना इंग्लंड मध्ये ही पाहिलेला नव्हता...!!!
हा निष्णात कलाकार कोण आहे ते विठोबाला जरा दमात घेतल्यावर बाहेर आलं... ...मग मी काय केलं असेल सांग बघूं?"
मी,"कांही अंदाज नाही करतं येणार मला... ...तुम्हीच करा ना शेरलॉक होम्स चा रहस्यभेद..."
डॉक्टर," मी त्यावेळी कुणालाच कांही बोललो नाही. दुसर्‍या दिवशी ह्या माझ्या डाव्या हाताला कांहीही झालेलं नसतांना माझ्या सहाय्यकाला हाताला प्लास्टर घालायला सांगितलं...बिचार्‍याला वेड लागायचंच काय ते बाकी राहिलेलं होतं."
मी," मग पुढं?"
डॉक्टर,"मग तिसर्‍या दिवशी दुसर्‍याच सहाय्यक डॉक्टाराला ते प्लास्टर उभं च्या उभं आर पार कातरून काढायला सांगितलं... ...तो पण वेड्यासारखा माझ्याकडं बघायला लागला... ...होः होः होः... ...
इतकं सगळं झाल्यावर मग गाडी पाठवून सदा चांभाराला दुकानातनं उचलून इथं दवाखान्यात आणवला, आणि ते कातरलेलं प्लास्टर माझ्याच हातावर परत शिवून बसवायला सांगितलं... ...बिचार्‍याला हृदयविकाराचा झटका यायचाच काय तो शिल्लक राहिलेला होता... ..."
मी आतां पुढं सरकून खुर्चीच्या कडेवर बसलो," मग?... ...काय झालं पुढं?"
डॉक्टर," काय होणार? मला माझ्या शल्यकौशल्याची लाज वाटावी अश्या थाटात सदा चांभार केवळ दहा मिनिटांत माझी शस्त्रक्रिया माझ्याच दवाखान्यातल्या मेजावर करून मोकळा झाला... ...!!!"
असलं अफलातून कसब मी उभ्या हयातीत बघितलेलं नव्हतं...
सगळ्या दवाखान्यादेंखत सदा ची पाठ कडकडून थोंपटत मी एकशे एक रुपयांची गुरुदक्षिणा देऊन हार घालून त्याचा सत्कार पण केला होता तेव्हां... ...अरे हातशिलाईतला गुरू होता ना तो माझा?... ...काय?
आतां अभियंता झाला आहेस... ...प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर पाऊल टाकशील... ...तेव्हां एक गोष्ट कधीही विसरूं नकोस... ..."
मी," ती काय काका?"
डॉक्टर मंदसे हंसले,"बर्‍याच माणसांचा असा गैरसमज असतो, की उच्च कोटीची विद्या ही भल्या भल्या महागड्या शिक्षणसंस्थातच मिळत असते.
खरी गोष्ट अशी आहे की सरस्वती चा वरदहस्त हा लौकिकार्थानं निरक्षर फाटक्या असलेल्या माणसालाही लाभलेला असूं शकतो... 
आणि त्याच्या कार्यक्षेत्रापुरता तो भल्या भल्या प्रस्थापितांचाही गुरु व्हायच्या लायकी चा असूं शकतो... ... हे कायम ध्यानांत ठेंव.
विद्यादेवी ही कुठल्या स्वरूपात आपल्याला कधी कुठं कशी भेंटेल, कांही सांगतां येत नाही... ...
ती चाणाक्ष नजरेनं हेंरणं, ओंळखणं, आणि मिळवणं ही खायची गोष्ट नव्हे...
आणि असा विद्यावंत जर कुठं भेंटलाच, तर विद्याप्राप्तीसाठी माझ्यासारख्या निष्णात शल्यविशारदालाही मग निरक्षर सदा चांभाराच्या कुटीचा दरवाजा ठोंठवावा लागतो... ...!!!
यतो गुरुस्ततो विद्या... ...काय?"
प्रखर अस्सल विद्यावन्त व्हायचं असेल, तर् माणसाच्या मनात कर्णाची जाज्वल्य दुर्दम्य निष्ठा सतत तेंवत ठेंवलेली असावी लागते... ...आयतोबा अर्जुनां चं ते काम नव्हे... ...समजलं?
पाठीशी कुणीतरी तारून नेणारा आयता भगवन्त जर नसेल, तर असल्या आयतोबांच्या कपाळीं, फक्त 'सीदन्ति मम गात्राणि ' एव्हढाच ललाटलेख त्या विध्यात्यानं लिहून ठेंवलेला असतो... ...
आणि कपाळावर हात मारून घेत तो निमूटपणे पत्करण्या-भोगण्याखेरीज, असले आचरट अर्जुन उभ्या आयुष्यात दुसरं कांहीही करून दाखवूं शकत नसतात... ...
असला 'आयतोबा अर्जुन' व्हायच्या मोहाला कधीही बळी पडायचं नसतं... ...चुकूनसुद्धां...एव्हढंच आयुष्यभर लक्ष्यांत ठेंव... ...
विद्यावन्त भंव...यशस्वी भंव... ..." 

असा तोंडभर आशीर्वाद देऊन, डॉक्टर काका माझ्याकडं चष्म्याच्या जाडजूड भिंगांआडून मिश्किलपणे बघायला लागले... ...
आणि फाटक्या सदा काका च्या त्या 'फॉरेन् रिटर्न्ड्' शिष्याकडं आं वांसून बघत मी च कपाळाला हात लावला...!!!

*******************************************************************
-- रविशंकर.
   १६ डिसेंबर २०१७ 

No comments:

Post a Comment