Search This Blog

Saturday 1 April 2017

॥ जामातस्याचलस्थानम् ॥

॥ जामातस्याचलस्थानम् ॥



,"हे बघ नाना"...माझा लंगोटियार शरद रामचन्द्र दातार उपाख्य शर्‍या, चहाचा कप तोण्डाला लावीत म्हणाला,"जावयानं सासुरवाडीला आपला आब-वजन राखून च रहायचं असतं... ...नव्हे, तें च सगळ्यांच्या भल्याचं असतं... ..."
मी," म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला?"
,"म्हणजे असं की जावयानं सासुरवाडीच्या मंडळींच्या बरोबर जेव्हढ्यास तेव्हढं असावं... ...उगीच गळ्यात पडायला, अथवा अनाठायीं लघळपणा करायला जाऊं नये... ...जे असं करीत बसतात, त्या जावयांची सासुरवाडीला किंमत कमी होते, अन् जावई म्हणून जे एक कौतुकाचं अचल-अढळ स्थान त्यांना मिळालेलं असतं, तें च गायब व्हायचा धोका संभवतो...तेव्हां 'हितं च मितभाषणे' हे नीटपणे समजणं अत्यावश्यक असतं...आणि हे व्यावहारिक तत्त्व आजकालच्या, सासू ला 'ममी' म्हणणार्‍या अल्ट्रामॉडर्न जावयांच्या गांवीही नसतं... ..." शरदराव उपदेशाचा समारोप करीत म्हणाले.
शरदरावांचा उपरोक्त उपदेश सौ. इंदिराजींच्या कांही पचनी पडला नाही,"म्हणजे काय हो शरद भावजी?...सासुरवाडीच्या माणसांबरोबर तुटकपणे च वागायला हवं, असं सुचवायचं आहे की काय तुम्हांला?... ...ऑं?"
शरद,"तसं नव्हे हो सुमा वहिनी... ... ..."
,"तसं नव्हे?... ...मग कसं आहे?"सौ. इंदिराजी नी आतां त्यांचा वकिली पवित्रा घेत शर्‍याला आव्हान दिलं.
"सुमे... ...ते कसं आहे ते मी सांगते... ..." आतां सौ. वृन्दावहिनी कनवटीच्या रुमालाला हात पुसत आखाड्यात उतरल्या........

दोन हजार चार सालातल्या दिवाळीचे दिवस सुरूं होते. शर्‍या चे परदेशस्थित चिरंजीव चि. गौरमोहन ऊर्फ गोरा हे वार्षिक सुटी घेऊन महिनाभराच्या मुक्कामासाठी घरीं पुण्याला आलेले होते. सौ. वृन्दावहिनीनी सद्य मोसमांत चिरञ्जीवांचे दोनाचे चार हात करायचं पक्कं ठरवलेलं होतं, आणि त्यासाठी त्यांनी दोनतीन महिने आधीपासूनच शर्‍यासकट आम्हां दोघांनाही वधूसंशोधन-परीक्षणाच्या कामाला जुंपलेलं होतं. गेल्या दोनतीन महिन्यांत आम्ही पुष्कळ स्थळं बघून त्यातल्या चारपांच मुली चि. गोराला दाखवण्यासाठी निवडूनही ठेंवलेल्या होत्या. 

झालं होतं असं, की परदेशात राहिलेला गोरा पहिली वधू बघायला गेलेला असतांना वधू च्या आईवडिलांबरोबर जरा ज्यास्तच मोकळेपणानं बोललेला होता, आणि म्हणून श्री. शरदरावांनी सांप्रतचं प्रवचन सुरूं केलेलं होतं... ... ...
"म्हणजे काय गं वृन्दे?", सौ. इंदिराजी.
वृन्दावहिनी शर्‍याकडं बोंट दाखवत ठंसक्यात म्हणाल्या," म्हणजे असं, की हे स्वतः जसे माझ्या आई-दादां च्या बरोबर उभ्या आयुष्यांत दोनचार शब्दच बोलले असतील-नसतील, तसंच लेकानं पण मुखस्तंभ व्हावं असा हा हितोपदेश आहे...!!!... ...कळलं?"
शर्‍या आतां उसळला,"उगीच काय वाट्टेल ते ऐकून घेणार नाही मी वृन्दे...हां..............."
सौ. वृन्दावहिनी नी आतां उट्टं काढलंच,"सुमे...आतां सांगणार कुणाला 'ऐकून घेणार नाही' म्हणून?... ...अगं रुजवात घालायला आई-दादा आतां हयात कुठं आहेत?" 
"आणि काय हो... ...", 'मुल्क-ई-मैदान' तोफे चं तोंड आतां सरळ शर्‍याकडंच वळलं,"सासू-सासर्‍यां बरोबर जरा मनमोकळेपणानं बोललं,तर जावईबुवां चं काय अधःपतन होतं की काय?... ...ऑं? उलट तसं झालं ना, तर  जावई गळ्यातला ताईत होतो त्यांच्या... ...तुमच्यासारख्या फटकळ लोकांचं काम नव्हे ते !!... ...काय?"
आतां मी व सौ. इंदिराजी कपाळांना हात लावून हंसायला लागलो...!!
शरदरावांच्या नाकाला आतां चांगल्याच मिरच्या झोंबल्या... ...,"तर तर... ...म्हणजे चारसहा महिन्यांत घरजावयाच्या हातांत भाजीबाजाराच्या पिशव्या कोंबायला सासरचे लोक मोकळे...!!... ...काय?"
सौ. वृन्दावहिनी शर्‍यासमोर दोन्ही हात ओंवाळत गरजल्या," छान... ...छान... ...सुमे... अगं बघ तरी...माझ्या माहेरची ओझी वाहून वाहून तुझे भावजी कसे बलदंड झालेय्‌त ते...!!!"
आतां कपाळाला हात लावायची पाळी शर्‍या वर आली...!! 




आतां तिथं शर्‍या-वहिनींच्यात 'कुरुक्षेत्र' सुरूं होणार असा रागरंग दिसायला लागला, अन्‌ सौ. इंदिराजी नी मला नजरेनंच हस्तक्षेप करायची खूण केली... ...
तसं मी तोंड उघडलं,"असं बघा वृन्दावहिनी... ..."
सौ.वृन्दावहिनी फणकारल्या,"काय बघायचं शिल्लक राह्यलंय्‌ आतां आणखी नाना?"
तसं सौ. इंदिराजी नी सूत्रं स्वतःच्या हातांत घेत एकदाचं 'कलहनिरूपण' सुरूं केलं,"उगीच कांहीतरी बोलूं नकोस वृन्दे... ...भावोजी म्हणताय्‌त तें च बरोबर ठंरतं जगाच्या व्यवहारांत... ...कितीही म्हटलं, तरी सासुरवाडी बरोबर थोडंसं अंतर ठेंवून आपला आब राखून राहणंच जावयाच्या भल्याचं असतं."
सौ. इंदिराजीं च्या भलामणीनं शरदरावांना आतां चेंव चंढला,"ऐकलंत.......?....सासुरवाडीला आपला आब राखणं हे आचरटांचं काम नव्हे... ...!!...तेथे पाहिजे जातीचे...!!!.......समजलात?"
मग छाती फुगलेले शरदराव सौ. इंदिराजींकडं वळून म्हणाले,"तुम्हांला माहीताय्‌ वहिनी?... ...सासूबाई आपल्याशी कायम चांचरतच बोलायच्या...!!!... ... ...काय?"
सौ. वृन्दावहिनी आतां उसळल्याच,"भडक डोक्याचा जावई पदरात पडला ना, की तसं च होतं सुमे !!... ...कळलं?... ...आणि उंदराला मांजरानं साक्षी रहायचं इथं कांही एक कारण नाही बरं... ...तुमचं नेहमीचंच आहे हे...!!!... ...काय हो नाना?"
तसं सौ. इंदिराजी नी सौ. वृन्दावहिनी नां आपल्या वकिली कंचाट्यात धंरलं,"...'काय हो नाना?' कश्याला हवंय्‌ गं वृन्दे तुला?...ही तूं पण मांजराची साक्षच काढतीय्‌स ना आतां... ...ऑं?"
सौ. वृन्दावहिनी लालेलाल होत गप्प झालेल्या बघून मग सौ. इंदिराजी नी मग प्रवचन पुढं रेंटायला सुरुवात केली,"त्याचं काय आहे वृन्दे... ...अगं सासुरवाडीशी संबंध कितीही जिव्हाळ्याचे असले ना, तरी तिथं जावयाला अघळपघळ राहून कसं चालेल? सासुरवाडीला जावयाचं अचल-अढळ स्थान जे असतं, ते मग कसं काय अभंग राहील सांग मला?"
सौ. वृन्दावहिनीनी आतां सौ. इंदिराजी वरच थेट हल्ला चंढवला,"असं होय?... ...वा...वा...वा...सुमे... ... ...तुझी आई च ह्या नानांच्या बरोबर कशी आणि किती अघळपघळ बोलायची, ते याचि देहीं याचि डोळा बघितलंय्‌ मी !!!... ... ...काय?"
सौ. इंदिराजी वर डाव उलटायला लागला, तसे शरदराव त्यांच्या मदतीला धांवले,"वृन्दे... ...या नानाबरोबर त्याच्या सासूबाई चांगल्याच अघळपघळ बोलायच्या हे मीही बघितलंय् कित्येकदा... ...पण मला एक सांग..."
सौ. वृन्दावहिनी तंडकल्या,"काय?... ...काय सांगूं?"
अन्‌ श्री. शरदरावांनी क्षणार्धांत त्यांची हुकुमी धोबीपछाड मारली,"मला सांग...ह्या नाना ला त्याच्या सासूबाईं बरोबर अघळपघळ बोलतांना कधी बघितलाय्‌स काय तू?... ...ऑं?"
आतां मात्र सौ. वृन्दावहिनी नी सफाचट निरुत्तर होत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!, आणि त्या माझ्याकडं मदतीच्या याचनेनं बघायला लागल्या... ...
आतां आमच्यातल्या अलिखित करारानुसार मला सौ. वृन्दावहिनींची बाजू लढवणं क्रमप्रप्त होतं... ...
मी तोंड उघडलं,"त्याचं काय आहे मण्डळी, की संस्कृतात एक सुंदर सुभाषित आहे..."
मी 'सुभाषित' म्हटल्याबरोबर, सौ. वृन्दावहिनीं चा संताप निवळला, अन्‌ त्या चट्‌कन्‌ उठून,"जरा थांबा हं नाना...चहा करून आणते पांच मिनिटांत... ...मग बोलूं या." असं म्हणून स्वयंपाकघराकडं पळाल्या.
बरोबर पांचएक मिनिटांतच त्या बिस्लिटं, अन्‌ गरमागरम चहाचे कप भरलेला ट्रे घेऊन परत आल्या...
सौ. इंदिराजीं च्या पुढ्यात त्यांनी चहाचा कप ठेंवला... 
शर्‍याच्या पुढ्यात चहाचा कप आदळला... ...
मग माझ्या हातात चहाचा कप अलगद देऊन स्वतःचा चहा कप उचलीत शेंजारी बसत म्हणाल्या,"हं... ...बोला आतां नाना, त्या सुभाषिताचं काय ते..."
मी चहा पीत तोंड उघडलं,"तर वहिनी, संस्कृतात या विषयावर एक छान उद्बोधक सुभाषित आहे...ते असं की... 

॥ युक्तं श्वशुरसंबंधे स्वत्त्वं च मितभाषणम्

  जामातस्याचलस्थामं स्खलितं न लभेत्पुनः ॥

म्हणजे असं की 'सासुरवाडीबरोबरच्या नातेसंबंधांत स्वत्त्व जपणं आणि मोजकं स्पष्ट बोलणं हे अतिमहत्त्वाचं असतं, कारण ह्यात जर एखादा मनुष्य गळफटला, तर जावई म्हणून त्याचं सासुरवाडीला असलेलं अचल-अढळ स्थान तो कायमचं गमावून बसतो... एकदां कां गायब झालं, की ते कधीही परत मिळवतां येत नाही' असं सुभाषितकार सांगताय्‌त."

तरी सौ. वृन्दावहिनी नी उपटशंका काढलीच,"म्हणजे सासुरवाडीशी तुटक वागायचं... ...असंच ना?"
मी,"तसंच नाही कांही वहिनी...पण वाहवत जाऊं नये असा त्याचा व्यावहारिक अर्थ घ्यायचा... ... पण तुम्हांला माहीत आहे काय की अजिबात तुटकपणा न दाखवतांही सासुरवाडी ची माणसं कधीकधी जावयाशी वंचकून-दबकून वागायला लागतात ते?"
,"म्हणजे काय नाना?... ...आचरटपणाच झाला हा" शर्‍या-वृन्दा आतां त्यांच्यातला वाद विसरून माझ्यावरच तुटून पडले... ...
अन्‌ सौ. इंदिराजी नी सूत्रं हातात घेतली,"अगदी खरं आहे भावजी नाना म्हणताय्‌त ते... ...त्यांच्या सख्ख्या मावशी च्या यजमानांच्याच बाबतीत असं घडलं होतं... ... ...मघांशी भावजी म्हणाले ना, तसं या मावशी च्या यजमानांच्या बरोबर सासुरवाडीचे लोक हयातभर अगदी आदबीनं, हातभर अंतर राखूनच बोलायचे...अगदी सासरे सुद्धां... ...मी स्वतः पाह्यलंय्‌ हे."
सौ. वृन्दावहिनी आतां चीत्कारल्याच,"अय्या.... ....खरंच की काय सुमे?...आणि झालं काय हे असं व्हायला?"
सौ. इंदिराजी चहाचा कप रिकामा करून समोरच्या मेजावर ठेंवत म्हणाल्या," सांगते... ...
नानां ची ही सगळ्यात धांकटी सख्खी मावशी...सध्या कोल्हापूरला असते ती... ...तिचं नांव इंदू... ...गम्मत म्हणजे ही मावशी माझ्यापेक्षाही चारएक वर्षांनी लहान आहे...!!"
शर्‍या-वृन्दा जोडी नं आतां कान टंवकारले,"बापरे... ...बरं मग?"
सौ. इंदिराजी,"तर काय सांगता होते... ...त्या भावण्डांत नानांच्या आई - म्हणजे माझ्या सासूबाई - सगळ्यात मोठ्या, तर ह्या इंदुमावशी सगळ्यात लहान. सत्तर साली त्या मॅट्रिक् झाल्या, अन्‌ सासूबाई नी त्यांच्यासाठी स्थळं शोंधायला सुरुवात केली. सासूबाईं चे वडील हयात नसल्यामुळं, आणि नानां चे दोन्ही मामा ही वयानं तसे लहानच असल्यामुळं ही जबाबदारी सासूबाई नी स्वतःकडंच घेतलेली होती... ... ...
माझ्या आजेसासूबाई - म्हणजे सासूबाईं च्या आई - कोल्हापुरातच रहायच्या. घरीं सगळी मुलं या सख्ख्या आई ला 'वहिनी' म्हणून हांक मारायची...ही आणखी एक जगावेगळी गम्मत. तर ही इंदू सत्तरीतल्या समाजप्रथांच्या मानानं 'मॅट्रिक' झालेली म्हणजे चांगलीच शिकलेली होती...जरा फॅशनेबल् पण होती...स्वभावानं चांगलीच फटकळ...आणि त्यामुळंच असेल कदाचित... ...नानां च्या आई नां ह्या आमच्या आजेसासूबाई नी बजावून ठेंवलेलं होतं, की 'हे बघ सुधे...ह्या 'इंदी' साठी चांगलं तडाखेबन्द स्थळ च बघायलं हवं, तरच ही धडपणे सासरीं नांदेल...नाहीतर नवर्‍याची फरपट काढायलाही ही बया कमी करायची नाही.'
शर्‍या,"छान...म्हणजे तुमची च कॉपी होती म्हणा की सुमावहिनी... ...हीः..हीः...हीः..."
सौ. वृन्दावहिनी,"तुम्ही गप्प बसायला काय घ्याल आता?... ...हं बोल गं सुमे...मग पुढं काय झालं?"
"काय होणार दुसरं?",सग्या-सोयर्‍यांनी चांगली पांच-पंचवीस स्थळं सुचवली... ...बघायचे कार्यक्रमही झाले... ...पण मावशी राह्यल्या बाजूलाच...आमच्या आजेसासूबाईनी एकजात सगळीच्या सगळी स्थळं नापसंत केली...!!! त्यांचं आपलं एकच पालुपद,' जावई 'तडाखेबन्द' हवा...नाहीतर त्याचं कांही खरं नाही'... ...!!!
शर्‍या,"आयला... ...म्हणजे कुणी 'संताजी-धनाजी' हवा होता की काय त्यांना लेकीसाठी?"
सौ. इंदिराजी,"तसंच म्हणायला हवं... ...अखेरीस नानांच्या आईं नी कोल्हापूरजवळ पन्हाळा गांवी असलेलं एक स्थळ हेरलं... ...
मुलगा एकुलता एक...नांव रामभाऊ सरदेसाई...मातोश्री हयात...वडील हयात नाहीत...पण पन्हाळ्यात चांगलं सात आठ एकर जागेत वीस पंचवीस खणांचं दणदणीत घर...शेतीवाडी मजबूत...घरीं दूधदुभतं,गाईगुरं भरपूर,...घरांत पैश्याअडक्याची-धनधान्याची बेदम सुबत्ता...मुलगा पांच जिल्ह्यातला नामांकित फौजदारी वकील...सहा फूट उंच, धिप्पाड वाटावा असा पहिलवानी थाटाचा...घरांत दोन घोडे, चार शिकारी कुत्रीं, पोपट, पांचसात मांजरं असा पाळीव प्राण्यांचा षौक...तर असलं मातब्बर स्थळ आमच्या सासूबाई नी अचूक हेरलं. त्या सांगायच्या की हे मावशीचे यजमान भल्या पहाटे तालमीत घुमायचे...त्यानंतर घोड्याबरोबर पन्हाळ्याची रपेट - म्हणजे पांठीवर स्वार होऊन नव्हे, तर हातात लगाम धंरून घोड्याबरोबर पळत आठ दहा मैलाची पन्हाळ्याची वेढा रपेट मारायची...मग घरी आल्यावर स्वतः म्हैस आंचवून धार काढलेलं कासंडीभर दूध पिऊन स्नान-संध्या-पूजा. नी मग थेट न्यायालयाकडं मोर्चा. असलं वजनदार प्रकरण होतं एकूण.
तालीमबाज शर्‍यानं हे ऐकूनच कपाळावर हात मारून घेतला,"अचाटच आहे नाना हे सगळं... ...मग पुढं काय झालं सुमावहिनी?"
सौ. इंदिराजी,"मग सासूबाई स्वतः पन्हाळ्याला जाऊन प्रत्यक्ष मुलाच्या मातोश्री ना भेंटून आल्या... ...मुलगी 'म्याट्रिक्' झालेली, चांगली धीट, दिसायलाही बरी, आणि सुशिक्षित घराण्यातली आहे म्हणतांच फोटो बघून मुलाच्या मातोश्रीनां पहिल्या झंटक्यात पसंत पडली, आणि 'इंदुमावशीं' चं नशीब फळफळलं.
पुढच्या आठवड्यात मुलगी बघायचा कार्यक्रम झाला अन्‌ दोन्ही पक्षांकडून शिक्कामोर्तब होऊन लग्न ठंरलं.  
सौ. वृन्दावहिनी,"चांगलंच नशीब काढलं की गं सुमे ह्या मावशीनी... ...मग पुढं?"
सौ. इंदिराजी,"मग रिवाजाप्रमाणं 'व्याहीभोजन' कार्यक्रम करायचं सूतोवाचं आमच्या आजेसासूबाई नी केलं, तर एक विचित्र अशी अडचण उभी राहिली. नवरदेव फौजदारी खटले चालवत सहा जिल्ह्यात सदा फिरतीवर... ...मातोश्री घरांत एकट्याच...अर्थात गडीमाणसं जरी ढीगभर असली हाताशी, तरी व्याहीभोजनाचा कार्यक्रम त्या एकट्या बाई कश्या काय पार पाडणार? तेव्हां मग आमच्या सासूबाई नी सुचवलं की,'तुमची हरकत नसेल तर व्याहीभोजन आमच्या कोल्हापुरातल्या घरीं करूं'.
झालं... ...दसर्‍याचा मुहूर्त ठंरला, अन्‌ व्याहीभोजनाच्या तयारीची घरांत नुस्ती धांवपळ उडाली... ...
आतां वृन्दे...आपल्या लहानपणी घडीव दगडी बांधणीची, लाकडी कडीपाटाची छतं, आणि मातीच्या चोंपलेल्या अन्‌ शेणानं सारवलेल्या जमिनी असलेली घरं असायची... ...आजच्यासारख्या फरश्यांच्या जमिनीं नसायच्या त्या काळांत...आठवतंय्‌ तुला?"
सौ. वृन्दावहिनी,"होय तर... ...आमचं ग्वाल्हेरचं घर तर आजही अगदी तसंच आहे... ...बरं मग पुढं काय झालं.?"
सौ. इंदिराजी,"तर जावयाचा यथास्थित मानपान राखून व्याहीभोजन अगदी थाटामाटात पार पडलं... ...जावयाचा 'तडाखेबन्दपणा' बघून आमच्या आजेसासूबाई अगदी भंरून पावल्या... ...
स्वच्छ शेणानं सारवलेल्या जमिनीवर दमदार रांगोळ्या-बिंगोळ्या काढून, चांदीच्या ताटांत, नव्याकोर्‍या पाटावर बसवून जावईबुवांचं भोजन आमच्या आजेसासूबाई नी अगदी दणक्यात पार पाडलं... ...
जावईबापूं चं 'तडाखेबन्द' भोजन पार पडेतोंवर मसालेभाताचं ज्यास्तीचं एक पातेलं चुलाणावर चंढवावं लागलं...!
त्यांना ढेंकर येईतोंवर वांकवांकून वाढतांना आजेसासूबाईंसकट घरातल्या एकूणएक बायकांची कंबरडी ढिली झाली...!!
आणि जावईबुवा ढेंकर देऊन आंचवून एकदाचे पानावरनं उठल्यावर घरातल्या सगळ्या बायकांनी सुटकेचा सुस्कारा टाकला... ...!!!
आणि आजेसासूबाई नी आमच्या सासूबाईं ची कडकडून पांठ थोंपटली,"सुधे... ...तुलाच समजलं बघ फक्त मला काय अपेक्षित होतं ते."
झालं... ...जेवणंखाणं उरकल्यावर मण्डळी बाहेरच्या दिवाणखान्यात बैठकीवर बसली...
पानसुपार्‍यांच्या चंच्या सुटल्या, अन्‌ गांवगप्पांना चांगलाच रंग चंढला... ...
आमच्या आजेसासूबाईही तिकडच्या बायकांचं हवं नको बघायला बैठकीतच थांबल्या होत्या... ... ...
आणि त्यावेळीच एक विलक्षण घोळ झाला... ... ...
शर्‍या-वृन्दा ची उत्सुकता आतां अगदी टिपेला पोंहोचलेली,"काय घोळ झाला गं सुमे?."
"सांगते...", सौ. इंदिराजी,"इकडं बैठकीत विडे बांधायला सुरुवात झाली, अन्‌ आंत स्वयंपाकघरांत बायकांनी उष्टी-खरकटी आंवरायला सुरुवात केलेली...कारण बायकामंडळींची पंगत जेवायला बसायची होती... ...
सगळी ताटं वाट्या आंवरून झाल्या... ...
पाट उचलून, जमीन जरा साफ करून बायका परत माण्डामाण्ड करायला लागल्या... ... ...
आणि अचानक आमच्या सासूबाई नी पांठच्या बहिणीला दिवाणखान्यात बैठकीत बसलेल्या आमच्या आजेसासूबाई ना बोलावून आणायला पिटाळलं,"प्रभे... ...अगं पळ लवकर बाहेर आणि वहिनीला बोलावून आण लवकर..."
प्रभामावशी,"अगं पण झालंय् काय?"
सासूबाई,"नंतर सांगते... ...जा आणि वहिनीला घेऊन ये ताबडतोब..."
सौ. प्रभामावशी बाहेर येऊन आजेसासूबाईं च्या कानाशी लागली, तश्या लगबगीनं,'आलेच हं मी आंत जाऊन... ...बसा तुम्ही' असं बायकामण्डळीनां सांगत प्रभामावशीसह आजेसासूबाई स्वयंपाकघरांत दाखल झाल्या...
बघतात तर उष्टी-खंरकटी आंवरायची तशीच पडलेली... ...
आं वांसलेल्या समस्त बायकांचा घोळका एके ठिकाणी जमलेला... ... ...
दोनचार जणी हातात झारे-उलथनी अशी अवजारं घेऊन कलकलाट करताय्‌त.......
एक,"अगं नीट खुपस की ते खाली, अन् उचला वर कटवून..."
दुसरी,"खुपसतीय्‌स काय डोंबल?... ...उलथनं झालंय्‌ वाकडं...तूं च बघ जरा जोर लावून"
तिसरी,"अगं बायानो...एकटी-दुकटीचं काम आहे काय हे?... ...'वहिनी' ला बोलावून आण लगेच..."
आजेसासूबाईंच्या काळजाच ठोंकाच चुकला, अन्‌ त्या तरांतरां चालत त्या बायकांच्या कोंडाळ्यात घुसल्या... ... ...
मधोमध आमच्या सासूबाई हातात दांडा वाकडा झालेलं घणसर उलथनं घेऊन उभ्या होत्या... चेहरा घामानं थंबथंबलेला... ...
आजेसासूबाई,"अगोबाई माझ्या... ....काय झालं गं सुधे?... ...ऑं?"
तसं सासूबाई नी शांतपणे खाली जमिनीकडं बोंट दाखवलं... ... ...
'तडाखेबन्द' जावईबुवा ज्यावर बसून जेवलेले होते तो पाट गळ्यापर्यंत जमिनीत रुतून बसलेला होता...!!
दोन्ही बाजूंचे खूर आख्खे जमिनीत गडप झालेले...अन्‌ आसनाची फळीसुद्धां केंसभर जमिनीत रुतलेली होती... ...!!!
त्या फळीखालीच झारे-उलथनी खुपसून पाट वर काढायची खटपट करीत बायकांना घाम फुटलेला होता... ... ...!!!!
जोर लावून वेडीवाकडी झालेली पांचसात उलथनी नी झारे आजूबाजूला विखरून लोंळत होते... ... ...
पाट मात्र जागच्या जागी ढिम्म...!!!




चि. सौ. कां इंदुमावशीला तें आक्रीत बघून जागच्या जागी घेंरीच आली...
अन्‌ खुद्द आजेसासूबाई नी च आं वांसत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला... ...!!!
,"हे असं कसं गं झालं सुधे?"
आमच्या सासूबाई घाम टिपत आईच्या हातांत पुरता वांकडा झालेला झारा देत म्हणाल्या,"तडाखेबन्द जावई हवा होता ना तुला वहिनी?... ...मग जावयाचे तडाखे निस्तरायला नकोत?... ...हा झारा घे, अन्‌ काढ हा पाट उचकंटून बाहेर आतां ... ...!!!!...काय?"
घोळक्यातल्या बायका आतां फिसफिसायला लागल्या... ...
न्‌ हातातला पिरगळलेला झारा कपाळाला लावून आजेसासूबाई जावयाच्या त्या जमालगोटा तडाख्याकडं सुन्न होऊन बघत बसल्या...!!!"
सौ. इंदिराजींचं प्रवचन ऐकून आतां 'शर्‍या-वृन्दा' नी जोडीनं कपाळांना हात लावले,"आई शप्पथ...!!!... ...सुमावहिनी...खरंच सांगताय्‌ हे, की लोणकढी दिलीय्‌ ठोंकून?"
सौ. इंदिराजी नी शांतपणे समारोप केला," खोटं कश्याला बोलूं मी भावजी?...पिरगळून वेडावांकडा झालेला तो झारा आजेसासूबाईं ची आंठवण म्हणून मी आजही स्वयंपकघरांत जपून ठेंवलाय्... ...आतां घरीं याल तेव्हां आंठवण करा मला, मग प्रत्यक्षच दाखवते... ...काय?
त्यानंतर उभ्या हयातीत ह्या माझ्या आजेसासूबाई जावयाशी बोलतांना कधी खाली देखील बसल्या नाहीत...उभ्या राहूनच बोलायच्या जावयाबरोबर... ...आणि इतक्या धडाकेबाज असून देखील जराश्या चांचरत च बोलायच्या... ... ... ...
आतां कळलं काय वृन्दे, 'जामातस्याचलस्थानम्' काय चीज असते ती?"
सौ. वृन्दावहिनींनी टेबलावरचा चहाचा सारा पसारा आंवरला... ...
मग शर्‍या बसलेल्या खुर्चीकडं तिरकस बघत हातातला ट्रे सांभाळून धरत त्या आंत जायला लागल्या... ...
तश्या सौ. इंदिराजी म्हणाल्या,"काय गं वृन्दे...काय बघत्येयस एव्हढं भावजींकडं टक लावून... ...ऑं?"
आणि सौ. वृन्दावहिनीनी शर्‍याला निर्णायक टांग मारली,"कांही नाही गं सुमे... ...सोफ्याचे खूर फरशीत रुतलेय्‌त काय ते बघत होते...!!!...ही:...ही:...ही:...ही: "
आतां आम्ही दोघे कपाळांना हात लावून खदांखदां हंसायला लागलो... ... ...
आणि शर्‍या नं हतबुद्ध होत स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!

****************************************************************************************

--रविशंकर.
१ एप्रिल २०१७.
             


No comments:

Post a Comment