Search This Blog

Sunday 8 January 2017

॥ कुरुक्षेत्र ॥

॥ कुरुक्षेत्र ॥



 ," हे बघ आई... ...", बापू-म्हणजे आमची कन्या चि. सौ. मुग्धा-तावातावानं सौ. इंदिराजी ना भिडत म्हणाले," हे तुझं म्हणणं न पटणारं आहे...काय वाट्टेल ते झालं, तरी 'मिली'-म्हणजे धाकटे चिरञ्जीव चि. मीलन - च्या शिक्षिका बाई नी त्याच्यावर चक्क अन्याय करून त्यानं बरोबर सोडवलेल्या ह्या प्रश्नाला शून्य गुण दिलेले आहेत...ह्या ची वासलात लावायला तुला शाळेत जाऊन त्याच्या बाईं ना खंडसावायला हवं खरं तर, पण तूं मात्र शेंपूट घालून उगीच वाद नको म्हणून शाळेत जायचं टाळते आहेस..."

एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालातला फेब्रुवारी महिना चालूं होता. नुकतेच मुलांच्या [मोठी चि. मुग्धा इ. ८ वी, आणि धांकटे चिरंजीव चि. मीलन इ. ५वी], शाळेतल्या सत्रपूर्व परीक्षांचे निकाल लागलेले होते, आणि त्यावरूनच चि. बापू अन्‌ सौ. इंदिराजीं मध्ये वादाला तोंड फुटलेलं होतं.
झालं होतं असं की चिरंजीवांना सामान्यविज्ञान विषयात 'शर्करायुक्त तीन फळांची नांवे लिहा' या प्रश्नाचं उत्तर 'बीट, पेरू, आणि केळे' असं शाळेतल्या बाई नी शिकवलेलं होतं. प्रश्नपत्रिकेत नेमका तोच प्रश्न त्यांनी घातलेला होता.
तथापि आमच्या उपद्व्यापी चिरंजीवांनी त्याचं उत्तर 'आंबा, सफरचंद, आणि अननस' असं लिहिलेलं होतं, ह्या उत्तरालाच चिरंजीवांना बाई नी शून्य गुण दिले होते, आणि ह्यावरूनच आमच्या जेवणाच्या मेजावरच्या आखाड्यात नाष्टा करतांना 'बापू विरुद्ध इंदिराजी' अशी जुंपलेली होती...!!!"
सौ. इंदिराजी ना 'शेंपूट घातलं' असं म्हणणारे बापू हेच जन्मांत पहिले भेंटले असावेत...!!
त्यामुळं त्या उसळल्या," हे बघ मुग्धा, इथं शेंपूट घालायचा प्रश्न कुठं येतोय्?...ऑं? वर्गांत बाई नी शर्करायुक्त तीन फळांची नावं 'बीट, पेरू, आणि केळे' अशी शिकवली आहेत ना? मग चिरञ्जीवाकडं बोंट रोंखत सौ. इंदिराजी कडाडाल्या," मग ह्या ला नस्ता शहाणपणा करून भलतीच तीन नावं लिहायला सांगितलं कुणी?...म्हणूनच बाई नी चिडून शून्य गुण दिलेले असणार."
आतां जन्मजात तत्त्वनिष्ठ असलेले बापू ही उसळले," भलतीच नावं म्हणजे काय गं आई...ऑ? शर्करायुक्त फळांची नावंच लिहिलेली आहेत ना त्यानं? मग बाई ह्या ला शून्य गुण कसे काय देताय्‌त? आणि मुळात बाई नी च मुलांना कांहीतरी चुकीचं शिकवलेलं आहे... ...बीट ही फळभाजी आहे...फळ नव्हे... ...उलट 'शर्करायुक्त फळं' म्हणजे काय हे त्याला नीटपणे समजलेलं आहे म्हणून चार गुण ज्यास्तीचे द्यायला हवे होते बाई नी...!! ते राहिलं बाजूलाच... ...खार खाऊन शून्य गुण दिलेत ह्या ला... ...
शाळेत पढवलेलंच उत्तर लिहिलं पाहिजे असा काय कायदा आहे की काय कुठं?... ...की ह्या चा नुस्ता पोपट व्हायला हवाय् की काय त्याच्या बाई ना?"
सौ. इंदिराजींच्या जिवणी ला आतां त्यांची खास मुरड पडली," ज्यास्त तोंड वाजवूं नकोस ताई... ...तुझ्यापेक्षां छप्पन्न पावसाळे ज्यास्त पाहिलेले आहेत मी...कुठं रग दाखवायची असते, नी कुठं नाही हे तुझ्यापेक्षां चांगलं समजतं मला... ...कळलं? आज आपण भांडलो शाळेत जाऊन, अन्‌ ह्या बाई नी तो डूख मनांत ठेंवून मिली ला दहावी-बारावी च्या परीक्षेत रगडला, तर ते परवडणार नाहीय् मला... ...ह्या प्रश्नांच्या दोन गुणांपेक्षां मला त्याची काळजी ज्यास्त करायला हवी... ...समजलं?"
"ह्यालाच 'शेंपूट घातली' असं म्हणतात आई...!!," बापू ही मागं हटेनात... ... ...
वाद चांगलाच पेंटलेला होता...
जेवणाच्या मेजाचं चक्क 'कुरुक्षेत्र' व्हायला लागलेलं होतं... ...
मी हस्तक्षेप करायची वेळ आलेली होती, नाहीतर 'महाभारत' सुरूं व्हायला वेंळ लागला नसता...!!!
आणि एकाएकी मला एक मस्त कल्पना सुचली... ... ...
महाभारत हा आमच्या घरात सगळ्यांच्याच आवडीचा विषय...भंरीला दूरदर्शनवर बी. आर्. चोप्रां चं महाभारत त्यावेळी तुफान लोकप्रिय झालेलं होतं...इतकं, की त्याकाळीं सकाळी नऊ वाजतां दूरदर्शनवर महाभारताचा शंख वाजला रे वाजला, की पुण्यातल्या मंडईतले तमाम भाजीविक्रेतेही आपापली दुकानं झांकून आजूबाजूच्या दुकानांत ते बघायला गायब व्हायचे, अन्‌ एक तासभर आख्खी मंडई चक्क ओस पडायची...हा न भूतो न भविष्यति असा चमत्कार आम्ही दररोज बघत होतोच... ...मग ती मजा वाग्युद्धांत कां होईना, अनुभवायला काय हरकत आहे? असा विचार डोंक्यात आला,
अन्‌ मी तोंड उघडलं,"हे बघा इंदिराजी, अन्‌ मिली-बापू , तुम्हीपण ऐका नीट कान उघडे ठेंवून... ..."
पोरं,"काय बाबा?"
मी,"आजपासून मी ह्या भोजनाच्या मेजाचं 'कुरुक्षेत्र' असं नांव ठेंवतोय्... ...कळलं?"
पोरं आतां फिसफिसायला लागली,"कांहीतरीच काय बाबा... ...ते महाभारतलं कुरुक्षेत्र?"
मी,"होय...ते च... ..."
पोरं,"म्हणजे काय लढाया करायच्या ह्या मेजावर?"
मी,"अर्थात्...फक्त ह्या लढाया शुद्ध तर्कवादांच्याच असतील... ...मात्र कसलेही वितंडवाद ह्या कुरुक्षेत्रावर कुणालाही घालतां येणार नाहीत..."
पोरं आतां आमच्याकडं चंमकून बघायला लागली,"आयला...मजाच आहे बाबा...म्हणजे तुम्हांला आणि आई ला पण?"
मी,"अर्थातच... ...धर्मयुद्धाचे नियम इथं सगळ्यांनाच लागूं होतील...आमच्यासकट...!!"
पोरांची तोंडं आतां उजळली,"हे मस्त आहे बाबा...म्हणजे इथं आई ला उगीचच 'गप्प बसा मुकाट' म्हणून आमच्यावर डांफरतां येणार नाही...!!"
चिरञ्ज्वीव पंचकले,"आणि बाबांना पण...!!!"
सौ. इंदिराजी वंतवंतल्या,"कांहीतरी आचरटपणा करूं नकां उगीच... ...विषय काय चाललाय् , आणि त्याला हे असले फांटे काय फोंडताय् हो तुम्ही?... ...पोरं शेफारतील... ...त्याचं काय?"
आतां बापू च मैदानात उतरले,"उगीच कांहीही बोलूं नकोस आई... ...शेफारून जायला आम्ही कांही खुळे नाही आहोत...माझं म्हणणं बरोबरच आहे पण तूं ते पटवून घेत नाहीय्‌स... ...होय की नाही हो बाबा?"
मी मग सगळ्यांनाच कुरुक्षेत्रावर ओंढलं,"असं बघा इंदिराजी...ताई चं म्हणणं बरोबर वाटतंय्‌ मला... ...ह्या अन्यायाची सफाचट वासलात लावणं हे आपल्याच भल्याचं आहे...पण हरकत नाही बापू... ...कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध लढायला तयार आहांत काय तुम्ही इथले कडक नियम पाळून?"
सौ. इंदिराजी शांतपणे ऐकत होत्या... ... ...
बापू ,"काय नियम पाळायचें?"
मी,"हे बघ, आपलं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे अशी तुझी खात्री असेल, तर नियमांची चिंता कश्याला करायची?"
पोरं,"आमचं बरोबरच आहे."
मी,"स्वतःचं म्हणणं बरोबरच आहे अशी प्रत्येकाचीच बालंबाल खात्री असते... ...पण ते प्रतिपक्षाला सफाचट पटवतां आलं पाहिजे, त्याचं काय?... ...तशी खात्री असेल तरच कुरुक्षेत्रावर निभाव लागतो... नाहीतर चितपट लोळून प्रतिपक्षाचं म्हणणं झक्‌ मारत मान्य करावं लागतं... ...समजलं?
...तेव्हां बोला, तयार आहांत आई बरोबर दोन हात करायला 'कुरुक्षेत्रा' वर?"
पोरं,"तयार आहोत आम्ही बाबा... ...आईलाच विचारा...!!"
पोरं च
'तयार आहोत' असं म्हणायला लागल्यावर मग सौ. इंदिराजी ना ही कांही पर्याय उरला नाही,"ठीकाय्‌...हरकत नाही."
मी,"तर...इथल्या धर्मयुद्धाचे कडक नियम असे असतील... ... 

       १>तुम्हां पोरांना इथं हटवादीपणाच्या ढाली वापरायला     
           मिळणार नाहीत...म्हणजे असं की,'आम्ही नाही जा'
           असं म्हणतां येणार नाही, किंवा रड्डी खाऊन 
           कुरुक्षेत्र सोडतांही येणार नाही... ...लढाई चा 
           निकाल लागेपर्यंत.   
      २>तसंच आई ला, मला स्वतःला, अथवा इतर मोठ्यांना 
           ,'गप्प बस...कांही कळत नाही तुला... ...तुमच्यापेक्षा 
           छप्पन्न पावसाळे ज्यास्त पाहिलेत आम्ही' असं म्हणत
           वयोज्येष्ठतेची चिलखतं आम्हांलाही वापरतां येणार
           नाहीत.
       ३> एकदां कां 'कुरुक्षेत्रा' वर तलवारी परजत उतरलं,
            की लढाई चा साफ निकाल लागेपर्यंत कुठल्याही 
            पक्षाला रड्डी खात रणमैदान सोडून पळ काढतां 
            येणार नाही...एकतर प्रतिपक्षी ला निरुत्तर करून
            चारी मुण्ड्या लोळवायचा, नाहीतर स्वतः निरुत्तर 
            होऊन सफाचट लोळायचं आणि प्रतिपक्षाचं म्हणणं 
            मुकाट मान्य करायचं... ...याव्यतिरिक्त तिसरा
            कुठलाही पर्याय मैदानात उतरणार्‍याला असणार

            नाही... ... ...समजलं?


दुसर्‍या शब्दांत सांगायचं, तर इथं कुरुक्षेत्रावर उतरण्यापूर्वीच प्रत्येकाला पन्नास वेळां विचार करावा लागेल...कारण रणांगणाचा कायदा हा जंगल चा कायदा असतो...एक तर आपलं म्हणणं तर्कशुद्ध वादविवादानं पटवून प्रतिस्पर्ध्याला चारीमुण्ड्या लोळवायचा, नाहीतर त्याचं म्हणणं बिनतक्रार झक्‌ मारत मान्य करून चितपट हार पत्करायची...ह्याशिवाय तिसरं कांहीही रणांगणावर होत नसतं, आणि ह्या 'कुरुक्षेत्रा'वर ही हाच कायदा सगळ्यांना लागूं होईल...!!!...बोला...तयारी आहे तुमची?"

चिरंजीव जरा विचारांत पडले, पण बापू ताड्कन्‌ म्हणाले ," मिल्या... ...होय म्हण लगेच...अरे आतां आई-बाबा ना पण उगीचच्या उगीच ओंरडतां येणार नाही आपल्यावर !!... ...काय?"
झालं..................दोन्ही पोरं खिदळायला लागली,"चालेल बाबा आम्हांला...पण तुम्ही किंवा आई नं पण रड्डी खायची नाही...!!!"
मी आतां सौ. इंदिराजीं कडं मोर्चा वळवला,"बोला...तुमचं काय म्हणणं आहे?"
पोरं च अशी बाह्या संरसावून कुरुक्षेत्रावर उतरल्यावर सौ. इंदिराजींची पंचाईत झाली, अन्‌ त्यांनी पण शेंवटी मान डोंलवत,'चालेल' म्हणून मान्यता दिली... ...
आणि मी वादाचा समारोप करीत उठलो,"तेव्हां इतउप्पर घरांत कसलेही वाद-भांडणं उपस्थित व्हायला लागली, की 'कुरुक्षेत्रावर चला, मग बघून घेतो' असं म्हणायचा प्रत्येकाला अधिकार असेल, आणि एकदां का वाद कुरुक्षेत्रावर गेला, की मग तिथल्या मघांशी सांगितलेल्या नियमानुसारच त्याचा काय तो सोक्षमोक्ष लावला जाईल... ...समजलं सगळ्यांना नीट?
सगळ्यांनी माना डोलवल्यावर, मग मी 'आत्तांच्या वादाचा निकालही कुरुक्षेत्रावरच लावून टाका मी ऑफिसातनं परत यायच्या आत' असं सगळ्यांना बजावून मी कारखान्यात कामावर निघून गेलो... ... ...
घरीं परतलो, तेव्हां सौ. इंदिराजीं सकट सगळ्यांचेच चेहरे प्रफुल्लित झालेले... ... ...
ठंरल्याप्रमाणं आत्ताच्या वादाचंही आमच्या 'कुरुक्षेत्रा' वर  चांगला तासभर यथेच्छ महाभारत रंगलेलं होतं, आणि अखेर सौ. इंदिरजी ती ऐतिहासिक लढाई चितपट हरल्या होत्या...!!!
मग मुलांच्या सोंबत शाळेत जाऊन त्यांनी उरला सुरला तांव त्या शिक्षिकेवर काढून चिरंजीवांच्या त्या प्रश्नाचे पैकी च्या पैकी गुणही वसूल केलेले होते...!!
वर आणखी,'असल्या कारणांसाठी मला परत इथं यावं लागणार नाही याची काळजी घ्या' असा दम पण त्या शाळेला भंरून आलेल्या होत्या...!!!
ह्या पहिल्याच लढाई चे घरातल्या सगळ्यानांच अपार फायदे झाले...
'शिक्षिका बाई निष्कारण डूख धंरून चिरंजीवांचं कांही नुकसान करतील', ही आपली चिंता बिनबुडाची होती हे सौ. इंदिराजी ना कळून चुकलं... ...
इंदिराजींच्या पोरांच्या बाबतीत कांही भलतं सलतं केलेलं चालणार नाही हे शाळेतल्या लोकांनाही कळून चुकलं ... मुलानांही हे कळून चुकलं, की आपली बाजू जर न्याय्य असेल, तर आपले आई-बाप कुठल्याही परिस्थितीत आपल्या मागं खंबीरपणे उभे असतील... ...
आणि मला स्वतःलाही कळून चुकलं, की डोंकेफोड करूनही कदाचित जे साधलं नसतं, ते मी माझ्या हातांनी सुतारकी करून बनवलेल्या आमच्या निर्जीव ,'भोजन मेजा' नं म्हणजेच 'कुरुक्षेत्रा' नं बिनबोभाट साध्य करून दाखवलेलं होतं... ...!!!
'कुरुक्षेत्र' हे इतकं रामबाण ठंरलेलं बघून मग स्तिमित होत मी च कपाळाला हात लावला...!!!
पुढं मुलं जाणती होईतोंवर त्यांना यथासांग घडवायचं कामही ह्या 'कुरुक्षेत्र' नामे भोजन मेजा नं च पार पाडलं...
कधीही कसलेही वाद उद्भवले की केवळ 'कुरुक्षेत्रावर चला, मग बघून घेतो' असं कुणी म्हणायचा अवकाश, की बरेच वितण्डवाद आपोआपच निकालात निघायला लागले...!!

'पोरकटपणानं रड्डी खायची जन्मप्राप्त ढाल' कांढून घेतली, की आपली कशी भंबेरी उडते, ते पोरं यथेच्छ शिकलीं...
आणि 'वडीलकी' ची कवच-कुंडलं गायब झाली, की पोरंटोरं देखील चुटकीसरशी आपले कसे तीन तेरा वाजवूं शकतात, ते ज्येष्ठांनीही पोंटभर अनुभवलं...


त्यानंतर आजतागायत गेल्या अठ्ठावीस वर्षांत ह्या आमच्या 'कुरुक्षेत्रा' वर अगणित निर्णायक धर्मयुद्धं झाली...
या 'कुरुक्षेत्रा' वर घरातले सगळेच निखळ निर्विवाद तार्किक युक्तिवाद करायला शिकले...
वितण्डवाद टाळायलाही शिकले...
एकजात सगळ्यांच्या युक्तिवाद अन्‌ वक्तृत्त्व कलेला चंरचंरीत धार चंढली... ...
आव्हानं द्यायला-घ्यायला शिकले...
लढाया चितपट मारायला शिकले...
अन्‌ चारी मुण्ड्या लोंळून पराभव पंचवायला पण शिकले...
पोरांना जी तालीम द्यायला आम्हांला घसे कोंरडे करीत घाम गाळावा लागला असता, ती ह्या निर्जीव 'कुरुक्षेत्रा' नं आश्चर्यकारकरीत्या बघतां बघतां अगदी विनाकष्ट न्‌ विनामूल्य दिली. !!!
यथावकाश चि. बापूं चं शुभमंगल होऊन ते सासरीं गेले...
पुढं दोनएक वर्षांतच चि. गुण्डाप्पा [म्हणजे नात चि. दीक्षा] अवतीर्ण झाला... ...
जरा कळता झाल्यावर मग हा गुण्डाप्पा पण 'कुरुक्षेत्रावर चला, मग बघून घेतो' अशी आव्हानं द्यायला शिकला, अन्‌ आमचं 'भोजन मेज' धन्य झालं...!!!




होतां होतां चिरंजीव बेंगलोर मध्ये नोकरीला लागले, आणि त्यांच्यासाठी घरातले वधूसंशोधनाच्या उद्योगाला लागले... ...
घरांतला खाक्या हा कोल्हापुरी-कर्नाटकी [माझ्याकडून] आणि कामाठी[सौ. इंदिराजीं कडून] असल्यामुळं असल्या गदाड्यात स्वखुषीनं चपखल बसणारी अन्‌ तो यथावकाश कनवटीला लावायची धमक असणारी वधू च सगळ्यानां अपेक्षित होती... ... ...
पुण्या-मुंबई तली बरीच स्थळं चालूनही आली, पण कुठं कांही जुळेना-जमेना.
मग आम्ही इतर ठिकाणी-म्हणजे आंध्र,कर्नाटक,मध्य प्रदेश वगैरे-मोर्चा वळवला, आणि चारपांच सुयोग्य वधू बघण्यांत आल्या...त्यांना बघायचे कार्यक्रमही झाले.
सगळ्याच मुली तश्या उत्तम शिकल्यासंवरलेल्या आणि नोकरी करणार्‍या. त्यातल्या त्यात बेंगलोर चं एक स्थळ मला स्वतःला विशेष करून पसंत होतं...वधू वर्णानं सांवळीच होती, पण चांगलीच रेंखीव-ताशीव आणि करारी बाण्याचं पाणी दिसत होतं.
बापूं चं म्हणणं पडलं की ही मुलगी जरा ज्यास्तच कारारी दिसतेय्‌...तेव्हां ही दुसरी कोल्हापूर ची पत्करायला हरकत नाही... ...[अखेर शेंवटी बापूं चं म्हणणं च प्रत्यक्ष्यांत उतरलं हा भाग अलाहिदा]
सौ. इंदिराजी ना तिसरीच वधू योग्य वाटत होती...त्यांच्या जातीतली.
चिरंजीव सांप्रत बेंगलोरलाच होते...
गम्मत म्हणजे चिरंजीवांचं मात्र कुठलंच ठाम मत अथवा पसंती होत नव्हती... ...
झालं मात्र असं, की तिघांची चार मतं पडली...आणि निर्णय कांही होई ना.
इकडं मुलीवाल्यांचे पसंतीची विचारणा करणारे दूरध्वनी यायला सुरुवात झाली... ...
अखेर बापू गरजले,"हा मामला असा तुटायचा नाही बाबा... ...कुरुक्षेत्रावर चला...!!!
झालं दुसर्‍या दिवशी बापू माहेरी दाखल झाले, आणि कुरुक्षेत्रावर रणांगण सुरूं झालं.
मी,"हे बघा इंदिराजी-बापू आपल्या घरांतल्या गेल्या तीन पिढ्यातल्या बायका कश्या तडाखेबंद होत्या ते तुम्ही बघितलेलं आहेच... ...संसार तेव्हांच धडपणे होतो, जेव्हां घरातली बाई नवर्‍यासकट आख्खं घरदार कनवटीला लावायच्या धमकीची असावी लागते...काय?"

सौ. इंदिराजी,"खरंय्‌ तुमचं म्हणणं, पण हे बेंगलोरवालं काम जरा ज्यास्तच तडाखेबंद वातंय्‌ मला...मिली ला झेंपायला हवं ना ते?...नाहीतर नंतर हाच तिच्या कनवटीला लोंबकळायला लागला, तर काय करणार आहांत मग?"
बापू ,"बाबा...बरोबर आहे आई काय म्हणतीय्‌ ते...मिली स्वभावानं जरा हंळवा आहे. तेव्हां त्याला अनुरूप म्हणजेच कॉंम्पॅटिबल्‌ मुलगी बघायला हवी...त्यादृष्टीनं ही कोल्हापूरवाली रसिका च बरी वाटतीय्‌ मला...फोटोवरनं तरी गरीब-सालस वाटतेय्‌...नव्हे, माझी खात्री आहे तशी."
मी,"हे बघा बापू-इंदिराजी...नुस्ती सालस असून कसं काय निभावणार तिचं? आणि वादाकरतां समजा अतिच सालस आणि गरीब निघाली, अणि मग आपल्या गदाड्यात तिचं भरीत होऊन बसलं तर काय करणार आपण मग?...ऑं? 
सौ. इंदिराजी,"मग आमच्या जातीतली बघूं या की...मस्त खमक्या पोरी मिळतील हव्यातितक्या... ..."
मी संधी साधली,"हे तोंडानं कश्याला सांगायला हवंय्‌?"
सौ. इंदिराजी ना कोंपरखळी बरोबर बसली... ...त्या स्वतः जन्मतः सर्वोच्च न्यायालयाची वकिलीची सनद घेऊनच जन्मलेल्या...,"अनुभवानंही डोळे उघडेनासे झाले, की मग कान उघडणी करावी लागतेच...!!!... ...काय?"
मी उसळलो,"म्हणजे 'झांशीवाली' च शोंधायची ना कुणीतरी?...मग हा बेंगलोरचा खमक्या काय वाईट आहे?"
सौ. इंदिराजी,"तो अतिच खमक्या वाटतोय्‌ म्हणून पसंत नाही मला."
मी ही आतां इरेला पडलो,"हे बघा इंदिराजी-बापू... ..., संसार सुखी व्हायला वधू पूरक अथवा कॉंप्लिमेंटरी असावी लागते...अनुरूप अथवा कॉंम्पॅटिबल्‌ नव्हे... ...तेव्हां 'ही बेंगलोरवालीच आम्हांला योग्य वाटते आहे' असं मिली ला कळवूं या आपण...अंतिम निर्णय काय तो त्याचा त्यालाच घेऊं दे... ..."
बापूं च्या कपाळावर आतां मधोमध उभी खोंल आंठी पडली...एक क्षणभंरच... ...
अन्‌ कांही कळायच्या आत अचानक त्यांनी मलाच धोबीपछाड मारली,"बाबा... ...मला एक सांगा... ..."
मी,"आतां काय सांगायचं शिल्लक राह्यलंय अजून?"
बापू,"मला सांगा...मिली साठी तुम्ही 'बायको' शोंधताय्‌ की 'रिंगमास्टर'? !!!"
बापू माझ्याकडं रोंखून बघायला लागले... ... 
सौ. इंदिराजी बेहद्द खूष होऊन आतां खीः खीः खीः करत खिदळायला लागल्या...!!
आणि कुरुक्षेत्रावर चितपट लोंळत मी च स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!!!





*****************************************************************************************

--रविशंकर.
४ जानेवारी २०१७.

No comments:

Post a Comment