Search This Blog

Friday 9 December 2016

॥ टक्के पे टक्का ॥


॥ टक्के पे टक्का ॥



," तर नाना...त्याचं काय आहे बघा... ...," माझे स्नेही श्री. रमणिकलाल शहा समोरच्या बशीतल्या बिस्किटांचा तोबरा भरीत म्हणाले," की आम्हां मारवाडी लोकांच्या बाबतीत दोन गोष्टी लोकांना माहीत नसतात..."
दोन हजार दहा सालातल्या उन्हाळ्याचे दिवस सुरूं होते...तारीख होती १९ मे...म्हणजे माझ्या वाढदिवसाची तारीख. आणि तें च निमित्त साधून हे रमणिकलालजी दुपारी चार च्या सुमाराला मला अभीष्टचिंतन देण्यासाठी घरीं दाखल झालेले होते. दुपारची वेळ असल्यानं आणि त्यांच्या सुवर्णपेढीला सांभाळायला त्यांचे चिरंजीव गेलेले असल्यामुळं ते तसे निवांत होते, अन्‌ माझाही कार्यालयीन कामकाजांचा गदाडा सकाळी बर्‍यापैकी उरकलेला असल्यामुळं मी पण निवांत होतो... ...
म्हणूनच सौ. इंदिराजी नी समोर ठेंवलेल्या खाद्य-चहा चा समाचार घेत आमच्या गप्पा रंगलेल्या होत्या. 
हे रमणिकलालजी ज्ञाति नं मारवाडी समाजातले असूनही मारवाडी समाजा नं जणूं कांही वाळीत टाकलेलं असल्यासारखा दिलदार खाक्या होता... ... अतिशय अनुभवसमृद्ध व्यवहारज्ञानी, अन्‌ विलक्षण गप्पिष्ट असल्यानं आमच्या तारा कुठंतरी जुळलेल्या असाव्यात. 
सराफी सारख्या, स्वतःच्या बायकोच्या मंगळसूत्राच्या गांठवणीतही घस-तूट कांढणार्‍या व्यवसायात असून देखील अतिशय सचोटीनं व्यवसाय करून पेढी नावारूपाला आणलेले गृहस्थ.
आमची ओंळखही तशी अपघातानं झाली होती असं म्हणावं लागेल. 
मी टाटा मोटर्स मध्ये नोकरी करीत असतांना, त्या वेळीं या रमणिकलालजी नां सुमो खरेदी करायची होती, तेव्हां ते एका मध्यस्थाच्या ओंळखीनं माझ्याकडं सुमो संबंधी माहिती घ्यायला आले होते. त्या वेळीं मी त्यांना, 'गाडी नुकती एक महिन्यापूर्वीच बाजारांत दाखल झालेली आहे...तशी घडण मजबूत आहे, तरीपण चारसहा महिने वाट बघा, ती वापरणार्‍या लोकांचे अनुभव ऐका, आणि मगच काय ते ठंरवा' असा प्रामाणिक सल्ला त्यांना दिलेला होता. त्यांनी सुमो घेतल्यानंतर तिच्या गीअर बॉक्स् मध्ये कांही दोष निघाला, तेव्हां ती सनदशीर मार्गानं सम्नानानं बदलून मिळवायलाही त्यांना थोडीफार मदत केलेली होती. 
खरं तर यात मी विशेष असं कांहीच केलेलं नव्हतं, पण रमणिकलालजी ना अशी कामं आत्मसन्मान सांभाळून आपल्या भारतात होऊं शकतात, याचंच इतकं नवल वाटलं, की नंतर ते माझ्या निकटवर्ती वर्तुळांत कसे नी केव्हां शिरले, ते मलाही कळलं नाही. साहजिकच असं नातं जुळल्यावर मग त्यांच्या सौ. पद्माबेन पण घरीं यायला लागल्या, अन्‌ ओंळखीचं रूपांतर घरोब्यात झालं... ...
मी," मला नीटसं कळलं नाही रमणिकजी तुम्हांला काय म्हणायचंय्‌ ते... ..."
रमणिकजी," म्हणजे असं बघा नाना...की 'मारवाडी' म्हटलं की सगळ्या लोकांच्या डोंळ्यापुढं 'मख्खीचूस' येतो... ...खरं की नाही?"
मी,"होय... ...खरं आहे ते."
रमणिकजी,"खरी गोष्ट अशी आहे नाना, की 'जहॉं नही जाती बैलगाडी, वहॉं जाता है मारवाडी'...!!"
मी हंसत कपाळाला हात लावला !!
रमणिकजी,"...आमच्या मारवाडी समाजातली ही चिवट उद्योगप्रियता दुसरीकडं क्वचितच बघायला मिळते... ...हे ही खरंय्‌ ना?"
मी," होय...खरंय्‌ तुम्ही म्हणताय् ते...धंदा आमच्या मराठी माणसांना अपवादानंच धडपणे करतां येतो..."
रमणिकजी,"तेव्हां ही इतर लोकांना मारवाड्यां बद्दल माहीत नसलेली पहिली गोष्ट."
मी,"आणि दुसरी गोष्ट कुठली?"
रमणिकजी मिश्किलपणे डोंळे मिचकांवत म्हणाले," दुसरी गोष्ट म्हणजे, 'जहॉं लोग उडाते है 'टक्का', वहॉं मारवाडी गिनता है 'टक्के पे टक्का' !!!"




आतां दुसर्‍यांदा चहा वाढायला आलेल्या सौ. इंदिराजी पण हंसायला लागल्या...कपाळाला हात लावून...!!
सौ. इंदिराजी,"म्हणजे कसं काय हो रमणिकजी?"
रमणिकजी,"म्हणजे असं बघा भाभीजी... ...नाना २००६ सालीं सेवानिवृत्त झाले...बरोबर?"
सौ. इंदिराजी,"हो... ...पण त्याचा इथं काय संबंध... ...'टक्के पे टक्का' शी?"
रमणिकजी,"सांगतो... ...जरा आडवळणाचंच आहे...पण बघा लक्ष्यांत येतंय् काय ते... ..."
मग माझ्याकडं मोहरा फिरवत विचारते झाले,"नाना... ...सेवानिवृत्त झाल्यानंतर लगेच पुढच्याच आठवड्यात तुम्ही मला पाचारण केलं होतं... ...बरोबर?"
मी उत्तरलो,"होय, बरोबर आहे... ...त्या वेळीं मला गांठीशी जमा झालेल्या पुंजी चं आर्थिक व्यवस्थापन पार पाडायचं होतं, आणि तेव्हां मी बोलावलं होतं तुम्हांला...तुमचा सल्ला घ्यायला..."
हे रमणिकलालजी सराफी चं दुकान जरी चालवत असले, तरी त्यांची शेअर बाजारात उलाढाल ही बर्‍यापैकी भक्कम होती...ती ही लाखांच्या घरांत...आणि तीवर ते कमाई पण बक्कळ करीत असत हे मला माहीत होतं. हाताशी असलेला सगळाच पैसा नुस्ता बॅंकांत मुदतबंद ठेवी त गुंतवून ठेवणं, म्हणजे त्यावर लागणारे कर पाहतां त्या पैश्याचं अवमूल्यन करून घेण्यापैकी होतं, हे मला अर्थशास्त्राची थोडीफार जाण असल्यामुळं माहीत होतं. तात्पर्य, गंगाजळी चं अवमूल्यन टाळायचं असेल तर तिचा कांही ठंराविक भाग तरी शेअर च्या माध्यमातनं उद्योगांत गुंतवणं भाग होतं. आणि म्हणूनच त्यावेळी मी रमणिकलालजीं शी सल्लामसलत केलेली होती. कारण शेअर बाजारातला त्यांचा व्यासंग आणि अनुभव, माझ्या मानानं दाण्डगाच म्हणायला हवा. त्यावेळी ह्या रमणिकलालजी नी अगदी तत्त्परतेनं सख्ख्या भावासारखी बहुमोल मदत मला केलेली होती. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार केलेली गुंतवणूक आत्तांपावेतों उत्तम परतावाही देत माझ्या गंगाजळी चं दरमहा वाढणार्‍या महागाई निर्देशांकाच्या कंचाट्यातनं व्यवस्थित संरक्षण पण करीत होती.
रमणिकजी,"नाना...तुमचा इतका विस्तृत मित्रपरिवार असून देखील त्यावेळीं मलाच कां पाचारण केलंत?... ...कांही खास कारण?"
मी रमणिकजीं ची फिरकी तांणली,"अहो 'टक्का' तुमच्याइतका दुसर्‍या कुणाला समजणार?... ...म्हणून !"
आतां सौ. इंदिराजी फिदीफिदी हंसायला लागल्या, आणि खुद्द रमणिकजी नी च स्वतःच्या कपाळाला हांत लावला...!!
रमणिकजी,"हे बरं आहे नाना तुमचं... ...सांगणार्‍याच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात घालायच्या... ...
पण ते खरंच आहे...आमच्या लोकांना टक्क्याचं बाळकडू जन्मतःच पंचलेलं असतं असं लोक म्हणतात... ... ...
पण खरं तर मारवाड्यांनी जन्मतःच 'टक्के पे टक्का' पंचवलेला असतो, ही आमच्याबद्दल लोकांना माहीत नसलेली दुसरी गोष्ट."
आतां मी ही बुचकळ्यात पडून रमणिकजीं च्या तोण्डाकडं बघायला लागलो... ...
मी,"हे 'टक्के पे टक्का' म्हणजे काय भानगड आहे बुवा ?"
रमणिकजी,"सांगतो...पण हे आपल्यातच राहूं द्यायचं बरं कां नाना..."
मी,"ठीकाय् रमणिकजी... ...बोला."
रमणिकजी नी मग गौप्यस्फोट करायला सुरुवात केली,"नाना, त्या वेळीं तुम्हांला जशी तुमच्या गंगाजळी ची व्यवस्था लावायची होती, तशी मलाही माझ्याजवळ असलेल्या अतिरिक्त गंगाजळीची व्यवस्था लावायची होती... ...आठवतंय्‌?"
मी,"होय तर... ...त्यावेळीं आपण बराच खल केला होता कुठल्या उद्योगांत पैसा गुंतवावा यावर..."
रमणिकजी,"आणि उद्योगांत गुंतवणूक करायची एव्हढं जरी आपणा दोघांना पटलेलं होतं, तरी कुठल्या उद्योगांत पैसा गुंतवावा यावर मात्र आपल्यात एकमत होत नव्हतं... ...हो की नाही?"
मी,"बरोबर... ...तुम्ही 'हिंदुस्तान लीव्हर', 'लॅक्मे', 'रॅंग्लर जीन्स्', 'मॅग्गी', 'कोका कोला','पिझ्झा हट्' 'रीबॉक्' अश्या अनेक कंपन्या सुचवीत होता, पण मला ते पटत नव्हतं."
रमणिकजी,"बरोबर... ...तुम्ही अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि समर्थक...तेव्हां आमची 'टक्के पे टक्का' थिअरी तुम्हांला कशी पटणार? मग काय केलंत तुम्ही नाना? कुठल्या उद्योगांत पैसे गुंतवलेत त्यावेळी?"
मी,"त्यावेळी मी 'टाटा स्टील', 'एक्साईड','कार्बोरंडम् युनिव्हर्सल्', 'भारत हेवी इलेक्ट्रिकल्स्' अश्या स्वरूपाच्या पायाभूत उद्योगांत गुंतवणूक केली...तुम्ही सुचवलेल्यापैकी फक्त 'रॅंग्लर जीन्स्' मध्ये पण कांही गुंतवणूक केलेली होती... ...काय होतं ते बघूं या म्हणून."
रमणिकजी,"मग?.... ...गेल्या चार वर्षांत काय कामगिरी केली तुमच्या गुंतवणुकी नं?... ...म्हणजे किती 'टक्के' कमावलेत?"
मी,"अहो तेंच तर आश्चर्य वाटतंय्‌ मला... ...ह्या सगळ्या कंपन्यांचे ताळेबंद वगैरे अभ्यासून मगच मी गुंतवणूक केलेली होती...केवळ 'रॅंग्लर जीन्स्' वगळतां... ...आतां झालंय्‌ असं की बाकी सार्‍या नामांकित भक्कम उद्योगांनी सरासरी चौदा ते सोळा टक्के परतावा दिलाय्‌ करपश्चात... ...पण ह्या 'रॅंग्लर जीन्स्' चं आश्चर्य च वाटतंय्‌ बघा मला... ...गेल्या चार वर्षांत सरासरी छत्तीस टक्के करपश्चात परतावा...!!... ...विश्वासच बसेना झालाय्..‌."
रमणिकजी,"अहो नवल कसलं आलंय्‌ त्यात नाना...ऑं?"
आमच्या सौ. इंदिराजीं चा पदवी अभ्यासक्रमात अर्थशास्त्र हा ज्यास्तीचा विषय असल्यानं आतां त्या पण भंरलेला चहाच कप समोर घेऊन आखाड्यात उतरल्या...,"नवल नाहीतर काय भावजी? इतक्या नामांकित मातब्बर औद्योगिक कंपन्या चौदा ते सोळा टक्के च परतावा देऊं शकताय्‌त, आणि कुठली कोण भारतात पाळंमुळंही नसलेली ही उपटसुंभ 'रॅंग्लर जीन्स्' मात्र छत्तीस टक्के परतावा देतेय्‌ ... ... म्हणजे आश्चर्य च नाही काय?"




आतां रमणिकजी सरसावून सांगूं लागले,"त्यांत आश्चर्य वाटण्यासारखं कांहीच नाही नाना-भाभीजी...इतर कंपन्यांचे परतावे ऐका... ...
'हिंदुस्तान लीव्हर'-२८ टक्के, 'लॅक्मे'-४४ टक्के, 'मॅग्गी'-६३ टक्के, 'कोका कोला'-७२ टक्के,'पिझ्झा हट्'-५७ टक्के 'रीबॉक्'-६८ टक्के...!!"
मी आतां दुसर्‍यांदा कपाळाला हात लावला...!!!
रमणिकजीं चं प्रवचन ऐकतांना आतां आमची डोकीं गरगरायला लागली... ...
तरी मी शंका काढलीच,"बरं झालं रमणिकजी 'रॅंग्लर् जीन्स्' चा विषय काढलात ते...या कंपनीचा लाभांश गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षी चांगलाच घंसरलाय् बघा... ...तेव्हां तिथली गुंतवणूक ठेंवावी, की दुसरीकडं वळवावी असं तुम्ही सुचवाल?"
रमणिकलालजी उत्तरले,"ताबडतोब खांदेपालट करून 'स्क्रॅच् गार्ड्' मलम विकणार्‍या कंपनीकडं वळवा ती गुंतवणूक नाना... ...मी गेल्या वर्षी तेंच केलंय्, आणि भरघोस नफा पण मिळालाय्‌ मला..."
रमणिकजीं चं प्रवचन मग उकल करीत पुढं चालूं झालं... ... ...,"तर खरी गोष्ट अशी आहे नाना...की तुम्ही लोक शुद्ध अर्थशास्त्र प्रमाण मानून गुंतवणुकीचे निर्णय घेतां...आणि आम्ही समाजाची मानसिकता पारखून ते घेत असतो... ...म्हणून हा असा फरक पडतो इतकंच काय ते...आणि यालाच मी 'टक्के पे टक्का' असं म्हणतो."
सौ. इंदिराजी,"जरा सविस्तर सांगा फोड करून भावजी...लक्ष्यांत नाही आलं नीटसं."
रमणिकजी,"जरा लांबलचक आहे ते...तेव्हां थोडा संयम - म्हणजेच पेशन्स् - ठेंवून ऐकाल तर सांगतो."
,"हरकत नाही रमणिकजी... ...सांगा." म्हणत आम्ही कान टंवकारून संरसावून बसलो.
आणि रमणिकजी नी त्यांचं अफलातून अर्थशास्त्र विशद करायला सुरुवात केली...
,"म्हणजे असं बघा नाना-भाभी... ...की साधारण नव्वद सालापर्यंत आपली अर्थव्यवस्था जशी होती, तशी नीटपणे चालत होती... ...म्हणजे असं, की अभियंते अभियांत्रिकी करायचे...वैद्य लोक वैद्यकी करायचे...वकील वकिली करायचे...सुतार सुतारकी करायचे...लोहार लोहारकी करायचे...शेतकरी शेती करायचे ...थोडक्यात सांगायचं तर अशिक्षित  मोलमजुरी करणारा वर्ग वगळतां सगळे बारा बलुतेदार आपापले उद्योग करीत असत...त्यामुळं एकूण समाजाच्या सगळ्या गरजा पण नीटपणे भागत होत्या, आणि वेगळेवेगळे व्यवसायही चांगले चाललेले होते...हो की नाही?"
आम्ही,"खरं आहे... ...बरं पुढं?"
रमणिकजी,"पुढं नव्वद-ब्याण्णव सालीं त्यावेळच्या सरकार नं आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण - म्हणजेच ग्लोबलायझेशन् ज्याला म्हणतात - ते करून टाकलं, पण त्यांत एक गोची होती. ती म्हणजे आपली अर्थव्यवस्था अन्‌ पर्यायानं नागरिकांचं जीवनमान हे आतां जागतिक दर्जाचं होणार अशी गाजरं त्यावेळी जनतेला खायला घालून, इथं आणले गेले ते फक्त 'आय्. टी.' च्या गोंडस नावाखाली हमाली कामाचे उद्योग, आणि चंगीभंगी चंगळवाद पसरवणारी कपडे-बूट-हॉटेलं-सौंदर्यप्रसाधनं-क्लब-गाड्याघोडे-ब्यूटी पार्लर अश्या प्रकारची दुकानं अन्‌ ती थाटणार्‍या परदेशी कंपन्या.
पण जरा बारकाईनं बघितलंत तर गेल्या पंधराएक वर्षांत उच्च तंत्रज्ञान इथं आणून रुजवणारा एकही उद्योग ह्या जागितिकीकरण नामे उघडलेल्या दरवाज्यातनं आपल्या देशांत आलेला नाही... ...आणि त्याचं कारणही अगदी सरळ आहे...की कुठलाही देश आपल्याजवळचं तंत्रज्ञान दुसर्‍यांना सुखासुखीं फुकट देत नसतो...त्याची पुरेपूर किंमत वसूल केल्याशिवाय.
खरं सांगायचं तर 'आय्‌. टी.' चा अर्थ आपल्याकडं तरी 'इन्फ़र्मेशन् विदाउट् टेक्नॉलॉजी' असाच कारावा लागेल...
ह्या आय्‌. टी, चे हब्ज् अन्‌ तिथं परदेशातल्या कंपन्यांची, कसलंही शिक्षण न देतां शुद्ध मोलमजुरी च्या लायकीच्या नोकर्‍यांना जुंपणारी 'बी.पी.ओ.-आय्.पी.ओ.' नांवाची दुकानं थेट पानपट्ट्यांच्या टपर्‍यासारखी गल्लोगल्लीं फोंफावायला लागली.त्यावेळच्या सरकार नं मग 'आय्‌. टी. क्षेत्राची चौफेर घोडदौड' अशी चंलाख जाहिरात करीत स्वतःच स्वतःची पाठही यथेच्छ थोंपटून घेतली.
गंमत अशी झाली की, मग इथल्या जनतेला-विशेषतः तरूण वर्गाला-उच्च शिक्षण न घेतांच विनात्रास पैसा मिळवायचा एक बिनडोक राजमार्ग मोकळा झाला.
या आय्‌. टी. टपर्‍यांची एक मख्खी असते. परदेशातले यांचे आश्रयदाते यांच्याकडं बहुतांशी मजकूर भरणे, माहिती गोळा करणे, अथवा त्यांनी बनवलेलं सॉफ़्ट्वेअर चालवून बघणे-ज्याला 'सॉफ़्ट्वेअर टेस्टिंग्' असं गोंडस भाषेत म्हणतात-अश्या प्रकारची केवळ काबाडकष्टांची कामं पाठवीत असतात...असल्या कामांत आयुष्यभर कांहीही शिकायला मिळत नसतं... ...केवळ धुणी बडवण्यासारखी ही कामं.
तिकडं परदेशांत ही कामं स्थानिक लोकांकडून करून घेण्यासाठी त्यांच्या देशांत जेव्हढा पैसा ओंतावा लागेल, त्याच्या एक दशांश पैश्यातच ही कामं आपल्याकडून करून घेतली जातात. अर्थात त्यांच्या-आपल्या चलनाच्या विनिमय दरात चाळीस ते साठ पटीचा फरक असल्यामुळं आपल्या कंपन्यांना इथल्या मानानं चार ते सहापट त्याचा मोबदला मिळतो.
त्यामुळं झालं असं की आपल्याकडं ह्या आय्‌. टी. कंपन्यात काम करणार्‍यांना त्यांच्या पात्रतेच्या विषम प्रमाणात दीडपट-दुप्पट पगार मिळायला लागले... ...
सौ. इंदिराजी," खरं आहे भावजी तुम्ही म्हणताय्‌ ते...आमच्या एल्. आय्. सी. त काम करणार्‍या पदवीधरांपेक्षा या आय्. टी. कंपन्यात काम करणार्‍या दहावी-बारावी पास माणसाला ज्यास्त वेतन मिळायला लागलंय्‌ हल्ली."
"म्हणजे झालं असं की",रमणिकलालजी पुढं म्हणाले,"एखाद्या मोठ्या रुग्णालयात काम करणार्‍या वैद्याचा, अथवा शल्यविशारदाचा मेहनताना दहा पंधरा हजार, तर कुठल्यातरी बी.पी.ओ.-आय्.पी.ओ. त केवळ धुणी बडवणार्‍या अर्धशिक्षित कर्मचार्‍या ला वीस पंचवीस हजारांचं वेतन मिळायला लागलं. या आर्थिक विषमतेचे आपल्या समाजावर दोन वाईट परिणाम झाले.
पहिला परिणाम म्हणजे ज्यांच्यात उच्च शिक्षण घ्यायची बौद्धिक कुवत होती अशी, आणि कांही प्रमाणात प्रत्यक्ष्यात उच्च शिक्षण घेतलेली मुलं पण यथावकाश या 'आय्‌. टी.' तल्या हमाली उद्योगांकडं हळूंहळूं वळायला लागली...केवळ पैसा मिळतोय्‌ म्हणून... ...
मग नंतर 'जमेल तेव्हढं दहावी-बारावी पर्यंतचं शिक्षण करायचं, मग कुठल्यातरी गल्ली बोळातल्या स्वघोषित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'फाड् फाड् स्पोकन् इंग्लिश्' चा पंधरवड्याचा कोर्स करायचा, नी आय्‌. टी. दाखल व्हायचं... ...की झालं...मग पैसाच पैसा' असलं एक चमत्कारिक अन्‌ बिनडोक अव्यावहारिक गणिती सूत्र इथल्या तरूण पिढ्यांच्या डोंक्यात पक्कं रुजलं, अन्‌ हे 'आय्‌.टी.' चे अर्धशिक्षित मोलमजूर अड्डे मग बघतां बघतां भरभराटीला यायला लागले.
दुसरा निर्णायक घातक परिणाम असा झाला, की लायकीच्या व्यस्त प्रमाणात हातांत पडलेल्या पैश्याचा योग्य विनियोग कसा न्‌ कुठं करायचा, हा विवेक मात्र या पिढ्यांच्या खिजगणतीतही नव्हता. तुम्ही दोघेही अर्थशास्त्र जाणता नाना-भाभीजी... ...पैसा कमावणं विशेष कठीण नसतं, पण मिळवलेला पैसा सांभाळणं अन्‌ वाढवणं हे भल्याभल्यांना न जमलेलं महाकर्मकठीण काम...होय की नाही?"
आम्ही,"बरोबर आहे तुमचं... ...बरं पुढं?"
मग झालं असं की या 'आय्‌.टी.' कंपन्यांचे आश्रयदाते परदेशी असल्यानं साहजिकच परदेशी वातावरण तिथं रुजायला लागलं, अन्‌ बघतां बघतां परदेशी चंगळवाद पण मागच्या दारानं या 'आय्‌. टी.' वाल्यांच्या डोंक्यात शिरला. परिणामी खिश्यात खुळखुळणार्‍या अतिरिक्त पैश्याचं नेमकं करायचं काय याची समज-किंवा अक्कल म्हणा हवंतर- नसल्यामुळं या लोकांनी तो बेदम उधळायला सुरुवात केली... ...




ही पैश्यांची बिनडोक उधळपट्टी मग हळूं-हळूं इतरांच्या डोंळ्यावर यायला लागली, आणि मग नव्वदीत इथं केवळ पन्नास पैश्यात मिळणारा 'कटिंग चहा' शतक उलटायच्या आंतच तब्बल दहा रुपयांवर जाऊन ठेंपला... ...!!! 
'आय्‌. टी.' वाल्यांचे हे परदेशी चोंचले यथासांग पुरवायला परदेशी चंगळवादी वस्तूंच्या कंपन्या तयार होत्याच. मग बघतां बघतां आपल्याकडच्या बाजारपेठा जीवनावश्यक वस्तूंऐवजी, या कपडे-बूट-सुगंध-सौंदर्यप्रसाधनं-मोबाईल-खाद्यपदार्थ, असल्या चंगीभंगी वस्तूं बनवणार्‍या परदेशी कंपन्यांनी पार व्यापून टाकल्या. आज इथल्या लक्ष्मी रस्त्यावर सत्तर ऐंशी टक्के दुकानं असल्या चंगळवादी वस्तूंनी च खंचाखंच भंरलेली आहेत...बघताय्‌ ना आजकाल?
सौ. इंदिराजी,"होय तर... ...हरघडी अनुभवतो आहोत आम्ही."
रमणिकजी,"गंमत अशी आहे नाना, की आपल्या तमाम जनतेची मानसिकता ही मेंढरांच्या कळपागत आहे...
कुणी एकानं कांहीतरी नवीन खूळ काढलं रे काढलं, की चारदोन दिवसांत ते सगळीकडं एखाद्या संसर्गजन्य रोगासारखं पसरतं, आणि मग प्रत्येकजण तें च करीत सुटतो...कसलाही साधक बाधक विचार न करतां... ...
मुळात ज्यानं हे खूळ काढलं तो तसं कां करतो आहे, याच साधा विचारही कुणी करीत नाही. इथल्या परदेशवेड्या जनतेत प्रत्येकजण हे च म्हणायला लागतो की 'सगळे करताय्‌त म्हणून मी पण तें च करतोय्‌.'
तेव्हां नाना-भाभीजी, मघांशी ज्याला मी आपल्या 'समाजाची मानसिकता' म्हटलं होतं ना, ती ही अशी बिनडोक अंधानुकरणी आहे...
आणि ही नस ज्याला बरोबर समजली, त्याला गुंतवणूक कशी,कुठं,अन्‌ कधी करायची, हे जाणायला कंपन्यांचे ताळेबंद अभ्यासायची गरजही उरत नाही...तर जनतेचं मानसशास्त्र-ज्याला इंग्रजीत 'मास सायकॉलॉजी' असं म्हणतात-तेव्हढं समजलं तरी पुरेसं असतं, आणि तें च निर्णायक असतं... ... ...जेव्हढी नवनवीन खुळं फोंफावणार, तेव्हढा आपला फायदाच फायदा.
म्हणूनच नाना, तुम्ही ताळेबंद अभ्यासून केलेल्या भक्कम कंपन्यांपेक्षां मी वारं कुठल्या दिशेनं घोंघावतंय्‌ हे बघून केलेल्या गुंतवणुकी नी ज्यास्त परतावे दिलेले दिसताय्‌त तुम्हांला... ...आतां आलं लक्ष्यात सगळं?"
मी,"आलं लक्ष्यांत माझ्या... ...पण तुमच्या 'टक्के पे टक्का' सिद्धान्ताचा या सगळ्याशी संबंध कुठं अन्‌ कसा येतो?"
,"सांगतो...",म्हणत रमणिकजी नी मग प्रवचनाची सांगता करायला सुरुवात केली... ... ...
,"नाना-भाभीजी, साधं जीन्स् चं च उदाहरण घ्या... ...
त्याचं असं आहे की, ही तुमची-आमची पोरं ज्या जीन्स् वापरतात ना, त्यांची जन्मकथा ठाऊक आहे तुम्हांला?"
सौ. इंदिराजी,"नाही बुवा... ..."
मी म्हणालो,"सगळी कूळकथा कांही आंठवत नाही आतां, पण या जीन्स् चा जन्म सोळाव्या-सतराव्या शतकांत अमेरिकेत जो प्रसिद्ध 'गोल्ड् रश्' झाला होता, त्यावेळीं झाला. त्यावेळी नेवाडा-मेक्सिको च्या रणरणत्या वाळवंटांत सोन्याच्या शोधांत भटकणारे वेडे पीर- जे 'काऊ बॉईज्' म्हणून इतिहासात गाजले- ते चामड्याच्या जीन्स् वापरीत असत, एव्हढंच आंठवतंय्‌ आता."
,"अगदी बरोबर...रमणिकजी खुषीत येऊन म्हणाले,"तर कालांतरानं चामडं जसं दुर्मिळ व्हायला लागलं, तसं मग तिथं खेड्यापाड्यातल्या शेतकरी लोकांनी भरड कापडाच्या पाटलोणी वापरायला सुरुवात केली... ...त्या पाटलोणी म्हणजे आजच्या जीन्स् चे पूर्वज म्हणतां येतील. तर वस्तुथिती अशी होती, की काऊ बॉईज् चामड्याच्या जीन्स् वापरीत असत, कारण त्या धूळ माती नं बरबटल्या, तरी नुस्त्या झंटकून टाकल्या की काम भागत असे...त्या धुवायबिवायची गरज भासत नसे. अहो वाळवंटी प्रदेशांत जिथं चूळ भंरायला देखील पाणी मिळायची मारामार, तसल्या ओंसाड वैराण प्रदेशात त्या जीन्स् धुवायच्या कश्या? तेव्हां त्यांच्या दृष्टीनं त्यांनी प्रश्न असा सोडवलेला होता. पुढं शेतकरी लोक जेव्हां त्या वापरायला लागले, त्याचं कारणही तेंच होतं... ...शेतीभाती-शेणगोठ्याच्या कामांत अंगावर भरड कपडाच हवा...नाजुक वस्त्राचा तिथं कसा काय टिकाव लागणार? तेव्हां शेतकर्‍यांच्या दृष्टीनंही कामं करतांना जीन्स् वापरणं सोयीचं होतं. पण शहरी भागातल्या वातावरणांत त्यांचा काय उपयोग?
आतां शीत कटिबंधाच्या प्रदेशांत, जिथं बर्फवृष्टी होते, तिथंही जीन्स् सारखे भरड कपडे वापरणं एकवेळ गरजेचं अन्‌ योग्यही होतं.
पण मला सांगा, भारतासारख्या ऊष्ण कटिबंधातल्या प्रदेशात, जिथं उन्हाळ्यात घामानं अंग थंबथंबतं, आणि अंगावरचे कपडे सैल हवेशीर असायला हवेत, तिथं 'इंग्लंड-अमेरिकेतले लोक जीन्स् वापरतात म्हणून आम्ही पण इथं त्या वापरणार' असल्या खुळचट अट्टाहासाचं काय होणार?... ...ते पण अंगावरच्या कातडीसारख्या तंग शिवलेल्या जीन्स् वापरीत बसलं तर?
मी,"हा खरंच ठार वेडेपणा आहे रमणिकजी...तुमच्या भाषेत सांगायचं, तर 'मास मॅनिया' म्हणावं लागेल त्याला."
रमणिकजी,"होय की नाही? अहो उत्तरध्रुवावरचा माणूस अस्वलाच्या कातड्याचा फरकोट वापरतो, म्हणून तो आफ्रिकेतल्या माणसांनीही  वापरत सुटण्याइतकं बिनडोकपणाचं आहे हे... ...
आणि यावर कडी म्हणजे ही पोरं त्या जीन्स् चार चार महिने धुवतसुद्धां नाहीत...कारण परदेशांत त्या धूत नाहीत म्हणून... ...
भंरीला यांचं अंघोळीला फांटा देऊन डी.ओ. फंवारून वेळ मारून नेण्याचं दुसरं वेड... ...
परिणामीं ह्या पोरांटोरांना अंगावर आतां खरूज-नायटे उगवायला लागलेत... ...!!

आतां तिखट जिभेच्या सौ. पद्माबेन पण आखाड्यात उतरल्या,"बरोबरच आहे जे होतंय्‌ ते... ...अहो असले वेडपट चाळे करीत बसल्यावर ह्या पोरट्यांच्या अंगांखांद्यांवर खरूज नायटे नाही तर काय चाफे गुलाब उगवतील?... ...ऑं?"
"तेव्हां", रमणिकजी म्हणाले," असल्या त्वचाविकारांवरची 'सी-टेक्स्', 'स्क्रॅच् गार्ड्' असली मलमं बनवणार्‍या कंपन्यांचा धंदा आतां तुफान तेजीत चाललेला आहे... ...!!!
दूरदर्शनवर क्षणाक्षणाला झंळकणार्‍या ह्या मलमांच्या जाहिराती बघताय्‌ ना दररोज?
खरं सांगायचं नाना, तर तुमच्याबरोबरच मी पण त्या वेळीं 'रॅंग्लर जीन्स्' मध्ये गुंतवणूक केलेली होती... ...तीन एक वर्षं चांगला 'टक्का' पण मिळाला त्यात... ...पण गेल्या वर्षीं कंपनीचा लाभांश जेव्हां उतरला, तेव्हांच मी तिथलं भांडवल काढून घेतलं, अन्‌ ह्या 'स्क्रॅच् गार्ड्' बनवणार्‍या कंपनी कडं ते फिरवलं... ...
गेल्या वर्षी ४० टक्के, अन्‌ या वर्षीं ५५ टक्के लाभांश पण मिळालाय्‌ मला त्यावर... ...शिवाय समभागांचा बाजारभाव पस्तीस टक्क्यांनी वधारलाय्‌ तो फायदा अलाहिदाच... ...
तात्पर्य, हे चंगळबाज लोक जिथं जिथं 'टक्क्या' चा अपव्यय करीत राहणार, तिथं तिथं आपला 'टक्का' लागलेला असला पाहिजे नाना... ..."
मी,"असं केलं की काय होतं?" 
रमणिकलाल मग निर्णायक समारोप करीत म्हणाले,"मग असं होतं, की हे चंगळबाज लोक गाड्या घेत सुटले, तरी आपला 'टक्का' लागूं...कारण गाड्यावाल्या कंपन्यांत आपली गुंतवणूक... ...उद्यां हे गाड्या बेफाम उडवून जायबंदी व्हायला लागले, तरी तिथंही आपला 'टक्का' लागूंच...कारण इस्पितळांतही आपली गुंतवणूक... ...!!
हे दिवसरात्र पिझ्झा-बर्गर हादडत सुटले, तरी आपला 'टक्का' सुरूंच...कारण 'पिझ्झा हट्' मध्ये घातलेला पैसा... ...
आणि ते खाऊन खाऊन ह्यांना मुळव्याधी व्हायला लागल्या, तरी आपला लाभांश सुरूं च...कारण हडेन्सा मलम विकणार्‍या कंपनीतही आपली गुंतवणूक... ...!!!
हे रात्रंदिवस मोबाईल ची बटणं चिवडत बसले, तरी आपलाच फायदा, अन्‌ ते करून करून शेवटी मानसोपचारासाठी वेड्यांच्या इस्पितळांत दाखल झाले, तरी आपलाच गल्ला फुगत राहणार... ...!!!




आतां समजलं काय नाना-भाभीजी, ही 'टक्के पे टक्का' म्हणजे काय भानगड आहे ती? म्हणून म्हणतो... ...
माझ्या मते 'रॅंग्लर जीन्स्' मधली गुंतवणूक 'स्क्रॅच् गार्ड्' कडं फिरवा, अन्‌ तुम्ही स्वतःच बघा आमच्या 'टक्के पे टक्का' ची करामत.!!!"
असा प्रवचनाचा समारोप करून रमणिकलालजी पायांत जोडे चंढवून निघाले,अन्‌ मला एक गम्मत सुचली,"रमणिकलालजी...एक मिनिट... ..."
रमणिकलालजी,"कां हो नाना?... ...काय झालं?"
मी त्यांना टांग मारीत म्हटलं,"नाही म्हणजे... ...तुम्ही स्वतःच एखादी गुंतवणूक कंपनी काढून तिचे समभाग बाजारात कां आणत नाही?"
रमणिकलालजीं ची सफाचट् दांडी उडाली,"हा उपद्व्याप कश्याला करूं मी?"
मी,"म्हणजे त्याचं काय आहे, की मग तुमच्या त्या एकाच कंपनीच्या समभागांत मी सगळीकडची गुंतवणूक वळवून मोकळा होईन म्हणतो... ...बाकी 'टक्के पे टक्का' सांभाळायला तुम्ही आहांतच की...!!!!... ...काय?"
आतां मात्र आमच्या इंदिराजी आणि सौ. पद्माबेन दोघीही कपाळांना हात लावून खो खो हंसायला लागल्या... ...!!!!
आणि खुद्द रमणिकलालजीनीच माझ्याकडं आं वांसून बघत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!!!



*****************************************************************
-- रविशंकर.
९ डिसेंबर २०१६.












No comments:

Post a Comment