Search This Blog

Sunday 16 October 2016

॥ काडीमोड ॥

॥ काडीमोड ॥



," हं... ...आतां ह्या गीतेवर हात ठेंवून म्हणा बाई, की ' मी आतां न्यायालयासमोर जे कांही सांगेन ते खरं सांगेन... ...खर्‍याशिवाय इतर कांहीही बोलणार नाही, आणि खोटं मुळीच बोलणार नाही... ... ..." न्यायालयाच्या बेलदारानं आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या जरा छानछोकी नी छचोर च दिसणार्‍या बाईंपुढं भगवद्गीतेची लाल वेष्टणात गुण्डाळलेली पोथी धरीत म्हटलं.

बाई जराश्या चांचरायला लागल्या...अंमळ घुटमळत म्हणाल्या," सायेब... ...म्या तर पैल्यापास्नं खरं काय त्ये च सांगतोय् न्हवं... ...मंग ह्या बाडावर हात ठिऊनश्यान्‌ शप्पत कश्यापायी घ्याया पायजेलाय्?"
"हे बघा बाई... ...आतां कोर्टाच्या बेलदारानं जरा वैतागतच बाई उभ्या असलेल्या पिंजर्‍याकडं बोंट दाखवत म्हटलं ," हे कायद्याचं काम आहे, आणि इथं न्यायालयात उलट तपासणीला उभं राहिलं की ह्या पोथीवर हात ठेंवून शपथ घ्यावीच लागते... ...कळलं?... ...हं म्हणा आतां तुम्हांला काय सांगितलं ते."
मराठमोळ्या थाटाच्या अशिक्षित दिसणार्‍या त्या तिशीतल्या बाईनं मग नाइलाजानं गीतेवर हात ठेंवून एकदाची शपथ घेतली, आणि खटल्याची सुनावणी पुढं सुरूं झाली... ... ... 

एकोणीसशे सत्तर च्या दशकातल्या मे महिन्यातल्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरूं होते. उकाडा अगदी अंगांग भाजून अन्‌ भिजवूनही काढीत होता, तरी हत्तरगी या कोल्हापूर - बेळगांवच्या सीमेवरच्या त्या फौजदारी न्यायालयांत खटला ऐकायला खंचाखंच गर्दी उसळलेली होती. कारण खटला घटस्फोटाच्या नाजुक दाव्याचा चाललेला होता...आणि त्या काळांत घटस्फोट आजच्या सारखे उठसूट पैश्यापासरीनं व्हायचे नाहीत. न्यायालयच काय, न्यायालयाच्या आवारांतसुद्धां मुंगी रिघायला जागा उरली नव्हती, इतकी तोबा गर्दी तो खटला ऐकायला उसळलेली होती... ... ...
ह्याची चारपांच ठोस कारणं होती.
पहिलं म्हणजे घटस्फोटाचा खटला म्हणजे चव्हाट्यावर आलेली घरगुती बाब...त्यामुळं त्यात चंघळण्यासारखं भरपूर कांहीतरी असणार, म्हणून गर्दी.
दुसरं कारण म्हणजे घटस्फोटाचा खटला हे प्रकरण खरं तर दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीतलं... ...पण बाई नी नवर्‍यावर मारहाणी चे बेदम आरोप करून नवर्‍याला गजांआड खडी फोंडायला पाठवायचा चंग बांधलेला होता, अन्‌ नवरोजी सिद्दप्पा नं बायको शेवन्ताम्मा वर बदफैली वागणुकी चा आरोप करीत तिला पोटगी द्यायला नकार तर दिलेला होताच, वर आणखी तिला महिला सुधारगृहाच्या कैदखान्यांत डांबायची मागणी केलेली होती. त्यामुळं खटला फौजदारी न्यायालयांत वर्ग झालेला होता. साक्षात नवरा-बायको च असे कौरव - पांडवांसारखे घटस्फोटाच्या कुरुक्षेत्रावर दांत-ओंठ खात एकमेकांना भिडल्यावर त्या खटल्याला महाभारताची चंरचंरीत फोडणी बसलेली होती, म्हणून तो ऐकायला खंच्चून गर्दी उसळलेली होती.
तिसरं कारण म्हणजे, हा सिद्दप्पा म्हणजे हत्तरगी तलं बडं प्रस्थ होतं. त्या काळांत मिरच्यांच्या ठोंक व्यापारांत दरसाल लाखभराची तरी उलाढाल करणारी तालेवार आसामी. आतां त्या काळांतल्या समाजाच्या मानसिकतेनुसार असल्या मातब्बर गड्यांच्या घराबाहेर चारदोन तरी भानगडी असायच्याच...त्यांत नवल कांहीच नसायचं, आणि कुणाला त्यांत कांही वावगं वाटायचंही नाही. सिद्दप्पा च्या बाबतीत मात्र असं कांही नव्हतं...त्याचं हे पहिलंच कायदेशीर लग्न. शेवन्ताम्माला त्यानं तशी ऐषोआरामांतही ठेंवलेली होती. पण ही शेवन्ताम्मा मात्र चांगलीच नखरेल निघाली, अन्‌ छचोरपणाबद्दल पंचक्रोशीत ज्ञातही झाली... ... दिसायला गोरीगोमटी, अन्‌ वागण्यांत ठंसकेबाज असल्यानं ' ह्या  शिद्दप्पानं ' ब्याडगी - संकेश्वरी ' चा व्यापार सोडून ही लवंगी मिरची कुठून पैदा केली कोण जाणे ' असं गांववाले आपांपसांत फिसफिसत बोलायचे पण.
... ...म्हणून खटला ऐकायला रीघ लागलेली.
खरी गोष्ट म्हणजे बाईं ची ' कीर्ति ' जशी गांवभर पसरायला लागली, तसा त्याचा सिद्दप्पा ला मनस्ताप व्हायला लागला...
त्यानं मग शेवन्ताम्मा ला चार चौघांसारखं समजावून पाहिलं, पण पालथ्या घड्यावर पाणी.
मग त्यानं तिला ' तुझी सगळी निर्वाहाची व्यवस्था लावून देतो...आणि मी दुसरं लग्न करतो ' अशी लालूच पण दाखवून बघितली... ...त्याचाही कांही उपयोग झाला नाही. असली रोज सोन्याची अंडी देणारी कोंबडी शेवन्ताम्मा सारखी नखरेल बाई थोडीच दंवडणार होती ?
अखेर बाईं च्या बद्दल कांही भलतं सलतं कानांवर आल्यावर सिद्दप्पानं तिला दोनचार वेळा चांगली ठोंकूनही काढली... ...त्याचा तात्कालिक परिणाम झाला, पण कांही दिवसच...मग पुनश्च हरि ॐ !!!
अखेर वैतागून त्यानं चारचौघांचा सल्ला घेऊन त्याकाळचे पंचक्रोशीत गाजलेले निष्णात वकील माधवरावांना गांठलं होतं, आणि बाईंच्या वर घटस्फोटाचा दावा ठोंकलेला होता, ज्याची अखेरची सुनावणी आतां चालूं होती.  
आणि चौथं कारण म्हणजे आरोपी चं म्हणजे शिद्दप्पा चं वकीलपत्र घेऊन माझे चुलत बंधू श्री. माधवराव  स्वतःच खटला चालवायला उभे राहिलेले होते. हे माधवराव म्हणजे त्या काळांतले मुंबई उच्च न्यायालयांपर्यन्त तुफान गाजलेले नामांकित वकील. प्रतिपक्षाच्या साक्षीदारांची बघतां बघतां तिरपीट उडवीत चुटकीसरशी खटल्याचं पारडं फिरवण्यांत ह्या माधवरावांचा हात धंरणारा वकील त्या काळांत तरी तमाम जिल्ह्यात दुसरा कुणी नव्हता. [ ह्या माधवरावांचे न्यायालयातले ध्वनिमुद्रित केलेले युक्तिवाद कायद्याच्या विध्यार्थ्यांना अभ्यासायला आजही वापरले जातात. ] 
बाईं नी पण कर्नाटकांतले गाजलेले काळकुन्द्री वकील कोर्टात त्यांच्या बाजूनं उभे केलेले असल्यानं ह्या दोन मातब्बरांची वकिली कुस्तीही बरीच गाजत होती, त्यामुळं पण खटला ऐकायला अशी बेदम गर्दी उसळलेली. 
त्या काळांत पुढं फौजदारी वकील व्हायचं डोंक्यात वारं भंरलेलं असल्यामुळं मी ही त्या खटल्याला अगदी सुरुवातीपासून न चुकतां हजेरी लावीत असे, तसा त्या दिवशीही माधवरावांच्या पांठीमागच्या खुर्चीवर हातातल्या रुमालानं घाम पुसत अन्‌ वारा घेत मी न्यायालयात हजर राहिलेलो होतो. आज आरोपीची उलट तपासणी होणार असल्यामुळं, माधवरांची करामत पण याचि देहीं याचि डोळां बघायला मिळणार होती... ... ...
आतांपावेतों खटल्यात न्यायाधीशांचा दृष्टिकोण बाईं च्या बाजूनं अनुकूल बनवण्यांत काळकुन्द्री वकिलांनी चांगल्यापैकी बाजी मारलेली होती, त्यामुळं माधवरावांची आज खरंच सत्त्वपरीक्षा होणार असाच एकूण रागरंग दिसत होता.

रिवाजाप्रमाणं काळकुन्द्री वकीलांनी बाईं ची परत सरतपासणी घेतली, आणि प्रारंभापासून त्यांची सगळी ' करूण कहाणी ' - सिद्दप्पा वारंवार करीत असलेल्या तथाकथित मारझोडीसकट - त्यांच्या तोंडातनं व्यवस्थित वदवून घेतली, अन्‌ मग माधवरांच्याकडं वळत समारोप करीत म्हणाले," युवर विटनेस सर.. "

माधवराव सावकाश पुढ्यातले कागदपत्रांचे - जाबजबाबांचे ढीग बंद करून डोंळ्यावरचा चष्मा घडी करून कोटाच्या खिश्यात ठेंवीत बाईंच्या पिंजर्‍यासमोर जाऊन उभे राहिले, अन्‌ पुरी दोन मिनिटं त्यांच्यावर करडी नजर रोंखून न्याहाळत राहिले. बाई जरा वरमल्याच, पण धीर एकवटून पदर सांवरून डोंक्यावर घेत उभ्या राहिल्या.

," म्हणजे शेवन्ताम्मा बाई... ..." माधवरावांनी सुरुवात करतांच बाई उसळल्या," बाई म्हनूं नकासा मला वकीलसायेब... ..."
माधवराव," मग काय ' बाबा ' म्हणायचं तुम्हांला ?... ...ऑं? "
कोर्टात हंश्याचं कारंजं उसळलं... ...
काळकुन्द्री वकीलांनी कपाळाला हात लावला...!! लोक खीः खीः करायला लागले... ...!!
न्यायाधीशां नी मेजावर हातोडा बडवत ' ऑर्डर... ...ऑर्डर ' म्हणून गलका शांत केला... ...
शेवन्ताम्मा चा चेहरा काळवण्डला, पण बाई परत सांवरून उलट तपासणीला तोण्ड द्यायला उभ्या राहिल्या.
बाई मुरकत म्हणाल्या," बाई म्हनाया काय पन्नाशी उलाटलीय्‌ का काय माजी ?... ...ऑं?... ... ... 
आवो गेल्या म्हैन्यालाच इसावर चार वर्सं झाली मला...!! ... ...तंवा निस्तं ' श्येवन्ता ' च म्हना तुमी... ... ...' बाई ' म्हनलासा न्हवं, की कायतरीच वाटतंया बगा !! "
न्यायालयात परत खसखस पिकली...
," हे बघा शेवन्ताम्मा बाई, हे न्यायालय आहे... ...तेव्हां इथं फक्त मी विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं द्यायची... ...समजलं? ", माधवराव किंचित करड्या आवाजात म्हणाले...
काळकुन्द्री वकिलांनी पण आडमार्गानं," बाई... ...जरा बेतानं बोला " म्हणत बाई नां ताळ्यावर आणायचा प्रयत्न केला.

माधवराव," तर मग बाई, तुमचा दावा असा आहे की आमच्या अशिलानं म्हणजे सिद्दप्पानं, अर्थात तुमच्या नवर्‍यानं तुम्हांला मारहाण केली...बरोबर ? "
बाई," आन्‌ शिव्या बी दिल्याती पासरीभर मेल्यानं... ..."
माधवराव," मग तुम्ही नवर्‍याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केलीय्‌ काय... ...मारहाण केल्याबद्दल? "
बाई," न्हवर्‍याची तक्रार सांगाया कुनी बाई पोलीसात जाती व्हंय्‌ वकीलसायेब? "
माधवराव," विचारलंय् तेव्हढंच बोला फक्त शेवन्ताबाई...माधवरांचा आवाज आतां चढला... ... पोलीसांत रीतसर फिर्याद दिलीय्‌ काय तुम्ही? "
काळकुन्द्री वकील उठले," ऑब्जेक्शन् माय् लॉर्ड... ...फिर्यादीचे वकील माझ्या अशीलावर दबाव आणताय्‌त..."
न्यायाधीशांनी हातोडा आपटला," ऑब्जेक्शन् ओव्हररूल्ड्... ...यू मे प्रोसीड मि. नानिवडेकर..."
माधवरावांच्या आवाजाला आतां धार आली," बोला बाई...मारहाणीची रीतसर फिर्याद पोलिसांत दिलीय्‌ काय तुम्ही? "
बाई," न्हाई दिली... ..."
माधवराव," धिस् पॉइन्ट् शुड् बी नोटेड् मिलॉर्ड्... ...फिर्यादीवर आरोपी नं मारहाण केल्याची कुठलीही रीतसर तक्रार पोलिसांत अजतागायत नोंदवलेली नाही. " 
मग त्यांनी बाईं कडं मोर्चा वळवला," कां नाही दिलीत फिर्याद तुम्ही पोलीसांत? "
बाई घुटमळायला लागल्या, अन्‌ काळकुन्द्री वकील उभे राहिले," ऑब्जेक्शन् माय् लॉर्ड... ...सरतपासणीत बाई नी इथं आत्तांसुद्धां नवर्‍यानं मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे, तेव्हां हा प्रश्न गैरलागू ठंरतो..."
न्यायाधीशांनी परत हातोडा आपटला," ऑब्जेक्शन् ओव्हररूल्ड्... ...यू मे प्रोसीड मि. नानिवडेकर..."
माधवराव," हं सांगा बाई न्यायालयाला... ...कां नाही गेलात तुम्ही पोलीसांत मारहाणीची तक्रार द्यायला? "
बाई आतां चुळबुळायला लागल्या... ...
अन्‌ माधवराव कडाडले ," नाही सांगतां येत तुम्हांला ?... ... मग मी सांगूं ? "
बाई गप्पच... ... ...
माधवरावांनी मग आपल्या कागदपत्रांच्या ढिगातनं एक कागद काढून न्यायाधीशांच्या कारकुनाकडं सरकवीत विधान केलं," मिलॉर्ड् हा सिव्हिल सर्जन नी बाईं च्या केलेल्या तपासणी चा लेखी पुरावा दाखल करून घ्यावा...ह्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की मारहाण केल्याच्या कोणत्याही खाणाखुणा बाईं च्या शरीरावर तपासणीत सापडलेल्या नाहीत... ...याची न्यायालयानं नोंद घावी."
मग माधवराव परत बाईंच्याकडं वळले, अन्‌ विलक्षण मृदु आवाजांत त्यांनी विचारलं," मला एक सांगा बाई... ...या सिद्दप्पा नं - म्हणजे तुमच्या दादल्या नं - कालच्या मंगळवारी तुम्हांला मारझोड केली, असं म्हणणं आहे ना तुमचं ?"
बाई," व्हंय्‌... ...लई बदाडलं मेल्यानं फुकाच बगा. "
माधवराव," कां बदाडलं बरं ह्या नं तुम्हांला?... ...तुम्ही कांही गैर वागला होतात की काय? "
काळकुन्द्री वकील आतां ताड्कन्‌ उभे राहिले," ऑब्जेक्शन् माय् लॉर्ड... ...हा माझ्या अशीलाच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न असून फिर्यादीच्या वकील महाशयांनी न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय आरंभलेला आहे... ..."
" ऑब्जेक्शन् सस्टेनड्... ...मि. नानिवडेकर...खटल्याशी संबंधितच बोला... ..."
माधवरावांनी आतां अचानक पवित्रा बदलला," हे बघा बाई... ...कुणीही घरंदाज गृहिणी असल्या मारझोड करणार्‍या नवर्‍याबरोबर नांदायला राजी होणार नाही... ...होय की नाही? "
बाई आतां गडबडल्या...!! नी गप्पच उभ्या राहिल्या.
मग माधवरावांनी त्यांना दुसरी वकिली टांग मारली," मग असल्या नवर्‍याला काडीमोड देऊन तुम्ही एकदाच्या मोकळ्या कां बरं होत नाही?... ...आणि काडीमोड तर तोच मागतोय्‌ ना?... ...मग?... ... ...झंटक्यात काडीमोड देऊन टाकायचा अन् व्हायचं मोकळं...मग मारझोडीचाही प्रश्नही आपोआपच निकालात निघेल !!!... ...काय? "
आतां मात्र बाई पुरत्या गळफटल्या... ... ... 
आणि काळकुंद्री वकील ओंरडलेच," ऑब्जेक्शन् माय् लॉर्ड... ...हा माझ्या अशीलाचा बुद्धिभेद करण्याचा सवंग प्रयत्न आहे...!!! "
न्यायाधीशानी हातोडा आपटला," ऑब्जेक्शन् सस्टेनड्... ...!! "
आतां माधवरावांनी कोटाच्या खिश्यातनं एक छायाचित्र काढलं, अन्‌ बाईंच्या तोंडापुढं नाचवीत विचारते झाले," बरं ते राहूं द्या बाई... ...मला सांगा, ह्या फोटोतल्या बाई ना तुम्ही ओंळखता? "
बाई नी कांखा वर केल्या," न्हाई बा... ..."
माधवरावांच्या आवाजाला आतां एक वेगळीच धार चंढली," परत एकदां नीट फोटो बघून सांगा बाई... ...ह्या फोटोतल्या बाई नां तुम्ही ओंळखता की नाही ? "
बाई नी आतां चक्क कानांवर हात ठेंवले," येकडाव सांगटलं न्हवं, न्हाई वळकत म्हून? "
माधवरावांचा आवाज आतां चंढला," पण ह्या बाई मात्र तुम्हांला चांगल्या ओंळखतात... ...!! दोन वर्षांपूर्वी या बाईंबरोबर तुमची हत्तरगीच्या भर बाजारांत बाचाबाची झालेली होती... ...बोला झाली होती की नाही? "
बाई नां आतां मात्र घाम फुटायची वेंळ आली... ...नी त्या स्तब्धच झाल्या... ...तसे माधवराव कडाडले," बोला बाई... ...काय कारण होतं बाचाबाची व्हायचं ? तीही भर बाजारात अर्वाच्य शिव्या देत ? "
बाई कांही बोलेनात, तसे माधवरावांनी कोटाच्या खिश्यातनं कांही कागद काढून न्यायाधीशांच्या कारकुनाकडं सरकवले... ... ...," माय् लॉर्ड, ही दोन वर्षांपूर्वी ह्या छायाचित्रातल्या बाई नी - त्यांच नांव यमनम्मा बेटगिरी - हत्तरगी च्या पोलीसांत ह्या बाईंच्या वर गुदरलेली फिर्याद आहे...तीत स्वच्छ म्हटलेलं आहे, की या  शेवन्ताम्मा बाईं ची चाल-चलणूक सैल असून यांनी त्या बाईंच्या यजमानांशी संधान बांधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे...!!! हत्तरगीच्या भर बाजारातल्या त्या अद्वातद्वा भांडणाचं मूळ कारण म्हणजे या शेवन्तम्मा बाईंचं संशयास्पद चारित्र्य आहे...!!!... ...या पुराव्याची न्यायालयानं नोंद घ्यावी ".
काळकुन्द्री वकील आतां परत उभे रहात किंचाळले," ऑब्जेक्शन् माय् लॉर्ड... ...त्या खटल्याचा अजून निकाल लागायचा असल्यानं ही बाब निःसंशयपणे सिद्ध झालेली नाही, तेव्हां सदर कागदपत्रं नोंदीतनं काढली जावीत... ... !!! "
न्यायमूर्तीनीं न्यायालयाच्या कारकुनाला त्या खटल्याच्या सद्यस्थितीचा अहवाल मागवायला सांगितला, अन्‌ माधवरावांना म्हणाले," यू मे प्रोसीड् ... ..."
माधवराव आतां अचानक पवित्रा बदलत सावकाश शेवन्ताबाईंच्या पिंजर्‍याजवळ गेले, अन्‌ विलक्षण मृदु आवाजात म्हणाले," आतां असं बघा बाई... ...या सगळ्याचा अर्थ शेंवटी एकच शिल्लक उरतो... ...तो हाच की तुम्ही माझ्या अशीलाला घटस्फोट द्यायला राजी नाही...बरोबर? "
बाई," बरूबर हाय... ...न्हाईच द्येनार ह्या मुडद्याला काडीमोड [ गांवठी मराठीत घटस्फोटाला काडीमोड म्हणतात ]. "
माधवराव आतां त्यांचा हुकुमी हंळवा आवाज कांढीत म्हणाले," अहो पण नुस्तंच काडीमोड देणार नाही असं म्हणत बसून भागेल काय बाई?... ... मला एक सांगा... ... ..."
बाई हंळव्या आवाजाला हातोहात फंसल्या," म्हंजी काय म्हन्ताय्‌सा तुमी वकील सायेब ? "
कसलेल्या माधवरावांनी मग गळ टाकला," हे बघा बाई... ... ... मारझोड करणारा नादान नवरा जसा कुठल्याही घरंदाज बाई ला चालत नाही, तसंच सैल वागणुकीची चवचाल बायको पण कुठल्याही घरंदाज नवर्‍याला चालणार नाही... ...होय की नाही ? "
बाई आतां बारीक नजरेनं माधवरावांच्याकडं संशयानं बघायला लागल्या... वारं कुठल्या दिशेनं वाहतंय्‌ त्याचा कांहीच अंदाज येईना त्यांना... ...त्या कांहीच बोलेनात.
काळकुन्द्री वकील उठून उभे राहिले, अन्‌ तसेच परत खाली बसले... ...माधवरावांच्या प्रश्नाला त्यांना कांही आक्षेपही घेतां येईना ... ...!!
माधवराव पुन्हां विचारते झाले," बोला बाई... ...बरोबर आहे ना मी म्हणतोय्‌ ते ?... ...काय? "
बाई मनाचा हिय्या करीत उत्तरल्या... ...," व्हंय्‌...बरूबर हाय तुमी म्हन्ताय्‌सा त्ये... ..."
आणि क्षणार्धात माधवरावांनी शेवन्ताम्मा बाई नां कात्रीत पकडत चितपट धोबीपछाड मारली," आणि माझ्या अशीलानं - म्हणजे तुमच्या दादल्यानं - काडीमोड मागायचं नेमकं हेच कारण दिलेलं आहे...आणि काडीमोड न देतां त्याच्याबरोबर नांदायचं पण तुमच्या मनांत आहे... ...तेव्हां ' इतउप्पर चवचालपणा न करतां घरंदाज बाईसारखा संसार करीन ' अशी लेखी हमी त्याला द्यायला तयार आहांत ना तुम्ही? "

बाई नीं आतां हतबुद्ध होऊन माधवरावांच्या कडं बघत भर न्यायालयात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ...!!
' हमी देते ' म्हणावं तरी पंचाईत, अन्‌ ' नाही देत ' म्हणावं तरी पंचाईत... ... ...!!!
खुद्द न्यायाधीशांनीही अंमळ पुढं सरकत बाई काय म्हणताय्‌त ते ऐकायला आपले कान टंवकारले...!!!
काळकुन्द्री वकीलांनीही ' खटला हातचा गेला ' हे उमगून स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!! 
आणि माधवराव पवित्रा बदलत खास ठेंवणीतल्या आवाजात कडाडले," बोला बाई... ...तयार आहांत ना लेखी हमी द्यायला ? "

बघतां बघतां आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या शेवन्ताम्मा चा चेहरा काळवण्डला... ...क्षणार्धात माधवरावांनी तिच्या यच्चयावत सुखस्वप्नांचा तिच्याच डोंळ्यादेंखत पार चुराडा करून ठेंवलेला होता...!!!
मग संतापानं लालबुन्द होत त्या सिद्दप्पा कडं बघत फिस्कारल्या, " मडं बश्शिवलं मेल्याचं... ...!!!
सोता च गावतलं हुंबरं हुंगतोया दुसरा पाट लावाया म्या जित्ती आस्तांना... ...आन्‌ माज्याकडंच हामी मागतोया भडवा... ...!!! "
न्यायाधीशांनी मेजावर हातोडा आपटत बाई नां सुनावलं," ऑर्डर... ऑर्डर... ...बाई, हे न्यायालय आहे...समजलात? इथं शिवीगाळ करतां येणार नाही तुम्हांला... ...जरा सभ्य भाषेत नीट सांगा...हे ' पाट लावणं ' म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हांला ? "

बेरकी शेवन्ताम्माच्या गोर्‍यागोमट्या चेंहर्‍य़ावरची लाली उतरून आतां मूळच्या अस्सल चवचाल बाई चा चेहरा तिथं अवतरला... ... ...
अन्‌ पुढ्यात उभ्या असलेल्या विजयी माधवरावांकडंच बोंट रोंखत ती पंचकली,"
, " म्हंज्ये आसं कां न्यायाधीशम्हाराज... ...
की समजा उद्या तुमी म्येलासा... ...
तर मंग तुमच्या बायलीनं जर काय ह्या वकीलसायबास्नी लगटत ह्येंच्यासंगट लगीन लावलं का न्हाय, तर त्येला म्हंत्यात ' पाट लावला '... ... ... " !!!!
आतां सारं न्यायालयच स्तब्ध झालं... ... ...
खुद्द माधवराव अन्‌ काळकुन्द्री वकील पण आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या असलेल्या त्या ' गाळीव रत्ना ' कडं आं वांसून बघायला लागले... ...!!
मग दस्तुरखुद्द न्यायाधीश महाराजांनीच भर न्यायालयात स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
आणि दुसर्‍या क्षणीं सिद्दप्पाचा काडीमोडाचा दावा मंजूर करीत निकालपत्रावर सही ठोंकून ते मोकळे झाले. !!!!

*****************************************************************************************

-- रविशंकर.
१५ ऑक्टोबर २०१६. 

No comments:

Post a Comment