Search This Blog

Friday 19 August 2016

॥ ' घाण्या ' चं आय्‌. सी. इंजिन ॥







," आतां अभियांत्रिकी चं उच्च शिक्षण घ्यायला पुण्याला जातोय्‌स, तेव्हां एक सुभाषित कायम ध्यानांत ठेंव ' ऍरिस्टॉटल '....", माझे गुरू - म्हणजे आमचे टिकेकर् मास्तर - तेव्हां पांठीवर थोंपटत म्हणाले होते...

," पाण्डित्यं तारतम्यं वा, किं वरं मतिभूषणम् ?
   तारतम्यविहीनत्त्वाद्वरा विद्याविहीनता 
   तारतम्ययुतामत्यार्विद्या कल्याणकारिणी
   तस्माद्विच्छेदसंप्राप्तो पण्डितोsपि विदूषकः !! "

मी गडबडलो," म्हणजे काय सर? "

मास्तर मग आयुष्यभराची शिदोरी माझ्या झोंळीत घालत म्हणाले," म्हणजे असं की, विद्या...मग ती अभियांत्रिकी ची असो, वा इतर कुठलीही असो, तिचा कल्याणकारी वापर जर व्यवहारात करून घ्यायचा असेल, तर माणसाच्या बुद्धीला तारतम्याची कवच कुण्डलं चंढवावी लागतात... ...नाहीतर तारतम्याला घटस्फोट दिलेल्या  पुस्तक पण्डिताचा व्यवहारी जगांत विदूषक व्हायला वेंळ लागत नाही... ...!!!
म्हणून तारतम्यहीन पाण्डित्यापेक्षा व्यवहारसूज्ञ अडाणीपण सुद्धां माणसाच्या भल्याचं असतं, असं सुभाषितकार सांगताय्‌त ... ...समजलं ? "

मास्तरांनी शिकवलेलं ते कळीचं व्यवहारज्ञान मला आयुष्यभर पुरून उरलं... ...
पुढील वाटचालीत मी ह्या सुभाषिताचे अक्षरशः शेंकड्यांनी जिवन्त अनुभव घेतले. !!!
त्यातलाच हा एक मासला...............


" नानिवडेकर आतां एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर द्या...", आमचे ' अभियांत्रिकी ' तले ' टिकेकर मास्तर ' -   म्हणजे श्री. डोळे सर - डोंळ्यावरचा खडूच्या फक्की नं धुरकटलेला चष्मा कांढून रुमालानं स्वच्छ करीत विचारते झाले," इमारती, कालवे, धरणं, बोगदे, रेल्वेमार्ग, रस्ते, इत्यादी बांधायला स्थापत्य अभियन्ता लागतो का? "
मी डोकं खाजवायला लागलो... ...कारण डोळे सरांचा कुठलाच प्रश्न विनाखोंच नसायचा.
आतां या गोष्टी निर्माण करणं हीच तर स्थापत्य अभियांत्रिकीची विद्या... ...मग डोळे सर असा प्रश्न कां बरं विचारताहेत?

हे आमचे डोळे सर म्हणजे विद्यादानाशी एकदम एकनिष्ठ वल्ली. स्थापत्य अभियांत्रिकी च्या द्वितीय वर्षाच्या पहिल्या सत्रात आम्हांला ' सांगाड्यांचं यंत्रशास्त्र ' म्हणजे इंग्रजीत ज्याला ' स्ट्रक्चरल् मेकॅनिक्स्‌ ' म्हणतात त्याचा पहिला भाग अभ्यासायला होता. हा विषय म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीचा जणूं प्राणच. तो ज्याला धडपणे समजलेला नसेल, असा मनुष्य यशस्वी स्थापत्य अभियंता कदापि होऊं शकणार नाही, इतका कळीचा हा विषय. आणि तो शिकवायला डोळे सरांच्यासारखा चतुरस्र निष्ठावन्त गुरू लाभणं हे आमचं खरंच भाग्य म्हणायला हवं. या पहिल्या भागासाठी नेमलेल्या अभ्यासक्रमातनं पहिलं ' वक्रताकारक प्रेरणा ' किंवा ' बेण्डिंग् मोमेण्ट्स्‌ ' आणि दुसरं ' विच्छेदक प्रेरणा ' अथवा ' शीअर फोर्सेस् ' - ही पायाभूत संकल्पनांची अति महत्त्वाची अशी दोन प्रकरणंच विद्यापीठानं सफाचट वगळलेली होती !!
डोळे सरांच्यासारख्या कसलेल्या प्राध्यापकाच्या चाणाक्ष नजरेतनं ती कशी सुटतील? तेव्हां मग ह्या डोळे सरांनी सलग आठ व्याख्यानसत्रं खर्ची घालून ह्या मूलभूत संकल्पना आमच्या टाळक्यांत अक्षरशः घणाचे घांव घालून कायमच्या पक्क्या बसवल्या... ...सत्र परीक्षांसाठी त्याचा कांहीही उपयोग नसतानांही... ...!!
हे असं अनमोल योगदान देणार्‍या डोळे सरांची मला आजही अगदी प्रकर्षानं आठवण होते... ...

सरांची शोंधक नजर चष्म्याच्या कांचांआडून माझ्यावर रोंखलेली होती... ... ...
मी उत्तरलो," होय सर... ...ह्या गोष्टी उभारण्यासाठी स्थापत्य अभियंता लागणारच... ...त्याच्याशिवाय दुसरं कोण त्या उभ्या करूं शकेल? "
डोळे सरांनी मग मला टांग मारली," मला सांगा नानिवडेकर... ...हजार दोन हजार वर्षांपूर्वी, किंवा त्याच्याही आधी माणसं घरं, कालवे, रस्ते वगैरे बांधत होतीच की नाही? "
मी," होय सर... ...बांधत होती ... ..."
डोळे सर," त्यावेळी स्थापत्य अभियंते कुठं अस्तित्त्वात होते... ऑं?... ...फार कश्याला, स्थापत्य अभियांत्रिकी तरी कुठं अस्तित्त्वात होती त्या काळीं? "
सरांची फिरकी टांग खात मी साफ चितपट झालो... ...!!!
नी मग त्यांना कपाळाला हात लावत विचारलं," मग स्थापत्य म्हणा, किंवा इतर कुठलीही असो, अभियांत्रिकी कश्यासाठी शिकायची सर? "

डोळे सरांनी मग आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी मला शिकवली," नानिवडेकर... ...असं बघा... ... ...घरं,कालवे, धरणं, पूल इत्यादी बांधायला स्थापत्य अभियन्ता मुळीच लागत नाही... ...या गोष्टी उभ्या करायला गवण्डी, सुतार, वडारी, रंगारी, प्लंबर ही माणसं पुरेशी असतात... ... ...
पण तेंच घर, धरण, पूल, अथवा रस्ता इत्यादी, जेव्हां कमीतकमी वेळेत, कमीतकमी मनुष्यबळांत, कमीतकमी खर्चात, कमीतकमी श्रमांत, आणि तरीही जागतिक दर्जाचं निर्माण करायचं असेल, तर ते काम स्थापत्य अभियंत्याशिवाय दुसरा कुणीच करूं शकत नाही. व्यावहारिक तारतम्य म्हणजे ' कॉमन सेन्स ' आणि ' संतुलन ' म्हणजे इंग्रजीत ज्याला ' ऑप्टिमायझेशन्‌ ' असं म्हणतात... ...तो कुठल्याही शाखेच्या अभियांत्रिकीचा प्राण आहे हे कायम लक्ष्यांत ठेंवा.
थोंडक्यात म्हणजे

॥ तुष्यन्ति शुद्धशास्त्राणि निर्दोषोत्तरसंभवात्
   तारतम्योत्तरात्तुष्टा सा विद्या अभियान्त्रिकी ॥

" म्हणजे नेमकं काय सर? "...मी कपाळाला हात लावत विचारलं.
डोळे सरांनी फोड करीत सांगितलं," म्हणजे असं की ज्यांना आपण ' विशुद्ध शास्त्रं ' अथवा ' प्युअर सायन्सेस्‌ ' असं म्हणतो, त्यांत फक्त वैज्ञानिक अथवा संशोधकांनाच रस असतो... ...
एखादा माण्डलेला सिद्धान्त सप्रयोग अथवा सप्रमाण किंवा गणिती तर्कानं निःसंशय पणे सिद्ध केला, की वैज्ञानिक-संशोधकांचं कार्य तिथंच संपलेलं असतं...ते मग नव्या सिद्धान्तांकडं वळायला मोकळे असतात... ...
आणि जिथं वैज्ञानिक-संशोधकांचं कार्य संपतं, नेमकं तिथूनच पुढं अभियन्त्यांचं कार्यक्षेत्र सुरूं होतं हे ही विसरूं नका...
वैज्ञानिकांनी माण्डलेले सिद्धान्त प्रत्यक्ष्य व्यवहारात कामाला जुंपून कांहीतरी व्यवहारोपयोगी निर्मिती करणं म्हणजे अभियांत्रिकी... ...
म्हणूनच 'शुद्ध शास्त्रं ' म्हणजे ' प्युअर सायसेस् ' हे वैज्ञानिकांचं कार्यक्षेत्र, तर ' व्यवहारोपयोगी शास्त्रं ' ऊर्फ ' अप्लाईड सायन्सेस् ' हा अभियान्त्रिकी चा प्रान्त असतो... ... ...आतां आलं लक्ष्यांत? "
डोळे सरांचं अस्सल विवेचन ऐकून थक्क होत मी म्हणालो," होय सर... ...कायमचं आठवणीत राहील हे आतां. "
डोळे सर पुढं बारकावा समजावत म्हणाले," म्हणूनच अभियान्त्रिकी करतांना व्यावहारिक-आनुभविक तारतम्याला निर्विवाद महत्त्व असतं हे लक्ष्यांत ठेंवा नेहमी... ...म्हणजे असं, की अभियांत्रिकीतल्या गणिती सिद्धांतांनी काढलेली उत्तरं जर आनुभविक व्यावहारिक मर्यादांत बसत नसतील तर मनाशी कायम खूणगांठ बांधायची, की गणिती प्रक्रिया कुठंतरी सफाचट चुकलेली आहे...ती पुन्हां पुन्हां तपासून दुरुस्त करायला हवी...व्यावहारिक मर्यादांत बसणारी उत्तरं मिळेपर्यंत... ...
थोंडक्यात असं की २ गुणिले २ चं वैज्ञानिकाला ४ या व्यक्तिरिक्त इतर कुठलंही उत्तर ग्राह्य असत नाही...
अभियंत्याला  मात्र ३.९९ ते ४.०१ या मर्यादेतलं कुठलंही उत्तर चालतं... ...ते व्यावहारिक मर्यादेत बसणारं असलं की झालं... ... ...ते वापरून निर्मिती कशी करायची हा अभियान्त्याच्या जिव्हाळ्याचा विषय...
पण अश्या मर्यादांबाहेरचं कांहीही अचाट-बेसुमार उत्तर जर माण्डलेलं गणित दाखवत असेल, तर तत्क्षणीं अभियन्त्याला सावध व्हावं लागतं... ...
थोडक्यांत म्हणजे संशोधक - वैज्ञानिक हा गणितानं मिळणार्‍या अचूक उत्तराच्या शोंधात असतो...मग ते उत्तर  शून्यापासून अनंतापर्यन्त कांहीही आलं तरी त्याला चालतं...पण अभियांत्रिकीत असली उत्तरं व्यावहारिक उपयुक्ततेच्या दृष्टीनं कुचकामाची असतात... ...कळलं नीट सगळं आतां ? "

डोळे सरांनी शिकवलेलं हे अनमोल पायाभूत तत्त्वज्ञान पुढं हयातभर माझ्या स्मरणांत राहिलं, आणि अनुभवायलाही मिळालं यथेच्छ. 

पुढं नोकरीत शिरल्यावर नारायणराव कुलकर्णी नांवाचे दुसरे एक व्यावहारिक गुरू भेंटले. सातार्‍यातल्या आमच्या ' महाराष्ट्र स्कूटर्स ' च्या प्रकल्पावर ते कंत्राटदाराचे मुख्य अभियंता होते. खरं तर हे नारायणराव रूढार्थानं स्थापत्य अभियांत्रिकी वगैरे कांही शिकलेले नव्हते, तथापि भल्या भल्या स्थापत्य विशारदांनी आवर्जून त्यांच्याकडून धडे घावेत अशी त्यांची ख्याति अन्‌ आनुभविक योग्यता होती.
ह्या नारायणरावांनी माझ्या डोंक्यातल्या पुस्तकी अभियन्त्याचं खर्‍या अर्थानं अनुभव समृद्ध अभियन्त्यात परिवर्तन केलं... ... ...
अगदी डोंक्याला फडकं बांधून बांबूच्या पहाडावर चाळीस पन्नास फूट उंचीवर मला उभा करून प्लास्टर करायला लावण्यापासून, ते प्लंबिंग, फॅब्रिकशन्-इरेक्शन् , वायरिंग, गवण्डीकाम, फरश्या बसवणं, सळ्या बांधणं, खोदाई करणं, डोझर चालवणं, रंगारी काम, अगदी झाडून सारी च्या सारी कामं त्यांनी मला प्रत्यक्ष्य स्वतःच्या हातांनी करायला लावली... ...!!!
ते नेहमी सांगायचे," अरे बाबांनों, जी कामं कारागिरांच्या मानांवर जूं ठेंवून त्यांच्याकडून करून घ्यायची असतात, ती सगळी च्या सगळी अभियंत्याला आत्मसात असायला नकोत? नसतील, तर तो कसला आलाय्‌ डोंबलाचा अभियंता? त्यालाच जर कुठली कामं स्वतः करायला जमत नसेल, तर मिस्त्री-कारागीर त्याच्या डोंक्यावर बसायला असा कितीसा वेंळ लागणाराय्‌... ...ऑं? "
असे प्रशिक्षक लाभले, हे माझं सुदैवच म्हणायचं... ...
नारायणरावांच्या तालमीचा मी पुढं हयातभर अखण्डपणे अनुभव घेतला... ...पुढं कांही वर्षांतच हाताखालच्या कारागीरांना जसं कळून चुकलं की ' साहेब ' प्रत्येक काम स्वतः हातानं करूं शकतो, तसं प्रकल्पावरचे कारागीर आपोआपच आपापली कामं काळजीपूर्वक दक्षतेनं करायला लागले, आणि त्यापुढं मग कामाचा दर्जा सांभाळण्याची मला कधीच चिंता करावी लागली नाही... 
कालांतरानं तर भल्या भल्या कंत्राटदारांचे महाव्यवस्थापक सुद्धां आमने सामने आल्यावर आधी दहा वेळा विचार करून मगच तोंड उघडायला लागले... ...!!!
नारायणरावांच्या तालमीचे अनुभव मी प्रत्यक्ष्य नोकरी व्यवसायाच्या कालखण्डांत घेतले खरे, पण डोळे सरांच्या तालमीचा रोंकडा अनुभव मात्र महाविद्यालयीन कालखण्डातच मला मिळायचा योग होता... ...!!!

झालं असं की अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या दुसर्‍या सत्रांत माझा वसतिगृहातला निवास सहकारी बदलला, आणि विजय घाणेकर नांवाची वल्ली एक दिवस माझ्या खोंलीवर उपस्थित झाली... ... ...
उंचीनं मध्यम, बारकुळ्या अंगकांठीचा, डोंळ्याला जाड भिंगांचा चष्मा, कपडे अजागळ, नजर कायम ऊर्ध्व दिशेंत लागलेली, खांद्याला वह्या-पुस्तकांचं शिप्तर, अशी एकूण वल्ली होती ती... ...
' पुस्तकी किडा ' प्रत्यक्ष्यांत माझा निवास सहकारी म्हणून हजर झालेला होता...!!!
तसा मी रेक्टरांना शिव्या देत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला...!!!!
आणि या ' घाण्या ' बरोबर पुढचे सहा महिने ब्रह्मचार्‍याचा संसार ही केला... ...!!
बघावं तेव्हां सदैव हा ' घाण्या ' एकतर पुस्तकांत डोकं खुपसून बसलेला तरी असायचा, नाहीतर यांत्रिकी च्या प्रयोगशाळेतल्या अंतर्ज्वलनयंत्रां [ आय. सी. इंजिन्स्‌ ] भोंवती घुटमळतांना दिसायचा... ...
महाविद्यालयांतल्या पोरींबाळीं भोंवती घिरट्या घालत जंगली महाराज रस्ता झिजवायच्या त्या वयात ह्याला आय. सी. इंजिन्स्‌ भोंवती पिंगा घालायला कसं काय सुचायचं ते खुद्द ' घाण्या ' लाच ठाऊक...!!! ते परमेश्वरालाही कोडंच पडलेलं असावं कदाचित.
बाकी कांही असो, हा ' घाण्या ' अंतर्ज्वलनयांत्रिकी ' च्या कां होईना, प्रेमात पडलेला होता, हे ही नसे थोडके... ... ...!!!
आमच्या कंपूत ह्या शास्त्रातला तो दादा समजला जायचा. 
केव्हांही कुठंही बघावं तर ' घाण्या ' च्या कांखोटीत ह्या विषयाचं एखादं तरी बाड अगदी हटकून दिसायचंच.
तथापि त्याचं दुर्दैव मात्र चारचौघांसारखंच निघालं... ...
सामान्य जनांची प्रेमपात्रं जशी त्यांची सफाचट वाताहत करतात, तसंच ' घाण्या ' च्याही बाबतीत घडलं...!!
त्याच्या या ' प्रेमपात्रानंच ' त्याचा सत्र परीक्षेत त्रिफळा उडवला...!!!
कारण एकच...
' घाण्या ' च्या बाबतीत डोळे सरांनी शिकवलेलं ' तारतम्य ' च सफाचट गायब होतं...!!!

बघतां बघतां द्वितीय वर्ष अभियांत्रिकी चं द्वितीय सत्र संपत आलं, आणि माझी ' घाण्या ' बरोबरच्या पुस्तकी संसारातनं सुटका व्हायची घटिका जवळ येऊन ठेंपली...
महाविद्यालयातल्या फलकावर सत्र परीक्षेचं वेळापत्रक झंळकलं... ...
आणि ' घाण्या ' तल्या पुस्तकी किड्याला ऊत आला... ...चोवीस तास त्याचं डोंकं पुस्तकांत खुपसलेलं, आणि पुस्तकांतल्या सूत्रं-सिद्धान्तांबरोबर त्याची अहोरात्र झटापट चाललेली... ... ...
अखेर ' अंतरज्वलन यांत्रिकी ' च्या पेपर चा दिवस उजाडला.
' घाण्या ' वगळतां आम्हां सगळ्यांची जमेल तितकीच तयारी झालेली होती... ...
त्यात तृतीय वर्षापासून आम्हां स्थापत्य अभियांत्रिकी वाल्यांची ' अंतर्ज्वलन यांत्रिकी ' पासून कायमची फारकत होणार असल्यानं आमचं स्वारस्य तो विषय कांठावर कां असेना, तंरून जाण्यापुरतंच मर्यादित होतं... ...
' घाण्या ' मात्र ' यांत्रिकी ' शाखेला जाणार असल्यानं त्या दिवशीं त्याचा अक्षरशः ' जेम्स्‌ वॉट् ' झालेला होता... ...!!
' कधी एकदां पेपर हातात पडतोय्‌, अन्‌ त्याचा खातमा करतोय्‌ ' अशी ' घाण्या ' ची अवस्था झालेली... ... ...
झालं...दुपारी दोन वाजतां परीक्षा सुरूं झाली.
आमचं नशीब म्हणजे आमच्या कक्षावर पर्यवेक्षक म्हणून डोळे सरांचीच नियुक्ति झालेली होती... ... ...
पेपर हातात पडला...पोरांच्या माना खाली वांकल्या... ...अन्‌ डोळे सर पांठीमागं हात बांधून कक्षांत बाकड्यांमधल्या पायवाटांत येरझारे घालायला लागले...
गंमत म्हणजे माझ्या पुढच्याच बाकड्यावर ' घाण्या ' बसलेला होता... ...
पेपर हातात पडल्याबरोबर मी पटकन्‌ त्यांतल्या त्यांत सोपे वाटणारे पांच प्रश्न निवडले, अन्‌ प्रत्येक प्रश्नातला सैद्धान्तिक ' अ ' भाग प्रथम हांती घेऊन एकापाठोपाठ सगळ्यांची वासलात लावली... ...तोपावेतों तीन तासांपैकी एक तासभर उलटलेला होता.
चला...चाळीस मार्कांच्या गल्ल्याचा फडशा पडून, गेला बाजार विषय सुटायची तर निश्चिती झाली... ...
तसा मनावरचा ताणही सैल पडला, आणि मग ' ब ' भागांतल्या एकेका गणिताशी माझी झटापट सुरूं झाली.
त्यातल्या त्यात सोपी दिसणारी तीन गणितं तर सुटली एकदाची... ...म्हणजे सत्तर गुणांची बेरीज पूर्ण झाली होती.
उरलेली दोन गणितं मात्र एकदम फाडू होती...तरी एकही सोडायचं नाही, असं ठंरवून चौथं गणित हातांत घेतलं...
त्या गणितात एका ' अंतर्ज्वलन यंत्राची अपेक्षित अश्वशक्ति, दर मिनिटाचे फेरे, दट्ट्याच्या रपेटीचं माप [ स्ट्रोक लेंग्थ् ] वगैरे मजकूर दिलेला होता, आणि दट्ट्याचा व्यास, म्हणजे ज्याला ' पिस्टन डायमीटर ' म्हणतात, तो मिलिमीटर मध्ये काढायला सांगितलेला होता... ...
त्याची दोन सूत्रं कांही मला नीटपणे आंठवेनात... ...
म्हणून मी हंळूच मान उंच करून ' घाण्या ' च्या खांद्यावरनं त्याच्या उत्तरपत्रिकेत डोकांवून बघितलं... ...
अन्‌ कपाळावर हात मारून घेतला...!!!
' घाण्या ' नेमकं तेंच उदाहरण सोंडवत होता...
त्याच्या उत्तरपत्रिकेला तिसरी पुरवणी आतांपावेतों जोडली गेलेली होती... ...
आणि पहिल्या पानांपासून तिसर्‍या पुरवणीच्या शेंवटच्या पानांपर्यन्त त्या एकाच गणिताची सोडवणूक त्याच्या उत्तरपत्रिकेभर मारुतीच्या शेंपटासारखी पसरलेली होती... ...!!!
' अंतर्ज्वलन यांत्रिकी ' तली यच्चयावत सूत्रं पानोपानीं विखुरलेली दिसत होती... ...त्यांतनं मला हवी असलेली सूत्रं नेमकी टिपणं म्हणजे एक दिव्य च होतं... ... ...
आणि तरीही ' घाण्या ' चं गणित कांही सोडवून झालेलं दिसत नव्हतं...त्याची दांत ओंठ खात, टराटरा डोकं खांजवत गणिती झटापट चाललेलीच होती... ...!!!
आतां माझ्या लक्ष्यांत आलं की ज्याअर्थीं ' घाण्या ' च इतका पिदडला गेलाय्‌ त्याअर्थीं हे गणित फारच फाडूं असणार........
म्हणून मग मी त्या गणिताचा अर्ध्यावरच नाद सोडून देऊन उरलेलं शेंवटचं गणित कसंबसं जमेल तसं सोडवलं, अन्‌ ' घाण्या ' चं गणित सोडवून व्हायची वाट बघत बसलो...
अखेर वेळ संपायला पाऊण तास शिल्लक असतांना, ' घाण्या ' ची झटापट संपली एकदाची.
त्यानं मग हातातल्या घड्याळांत वेंळ बघितली, अन्‌ आं वांसून डोंळे विस्फारत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला... ...!!
पहिल्या सव्वादोन तासांत ' घाण्या ' चं फक्त एकच गणित सोंडवून झालेलं होतं...
त्याव्यतिरिक्त आख्खा पेपर सोंडवायचा अजूनही बाकी राहिलेला होता... ...!!!
झालं... ...' घाण्या ' चा बघतां बघतां साक्षात् ' ब्रूस ली ' झाला...!!
नवी पुरवणी पुढं ओंढून अक्षरशः पिसाळलेलं कुत्रं मागं लागल्यागत ' घाण्याची लेखणी ' उत्तरपत्रिकेवर सैरावैरा धांवत सुटली...!!!
त्याचा कसाबसा अडतीस गुणांचा भाग सोंडवून पुरा झाला... ...
आणि शेंवटची दहा मिनिटं राहिल्याची सूचना देणारी घंटा वाजली... ...
मी आतां त्या गणिताचा नाद सोडून दिला, अन्‌ लिहिलेली उत्तरपत्रिका परत तपासायला सुरुवात केली... ...
इतक्यात डोंळे सरांची कुजबूज माझ्या कानांवर पडली... ...
," घाणेकर... ..."
खाली मान घालून पिसाटल्यासारखा ' घाण्या ' लिहीतच होता...
अखेर डोळे सर माझ्या जवळ रेंगाळले," नानिवडेकर..."
मी वर बघितलं, अन्‌ सरांनी माझ्या पुढ्यातल्या कच्च्या कागदावर लिहिलं," घाणेकरांना पहिलं गणित परत तपासायला सांगा... ...सफाचट चुकलेलं आहे...!!!! "
डोळे सर कांही न बोलतां शांतपणे पुढं सरकले, अन्‌ मी ' घाण्या ' ला पायानं बाकड्याखालनं ढोंसून तो कागद त्याच्याकडं सरकवला... ...
' घाण्या ' नं डोळे सरां चा इशारा वाचला... ...
अन्‌ आश्चर्य म्हणजे ते चिटोरं खिश्यात घालून परत त्याची ' मॅरेथॉन ' सुरूं केली... ...!!!
पेपर संपल्याची घण्टा वाजली... ...अन्‌ डोळे सर उत्तरपत्रिका गोळा करीत फिरायला लागले... ...' घाण्या ' ला ओलाण्डून पुढं जात त्यांनी बाकी सगळ्यांच्या उत्तरपत्रिका गोळा केल्या, बिचार्‍या ला तेव्हढा वेळ तरी ज्यास्त मिळावा असाच त्यांचा उद्देश असावा.
ते घाण्याजवळ आले, तरी ' घाण्या ' ची ' मॅरेथॉन ' सुरूं च होती... ...
अखेर सरांनी घाण्याचं लेखन थांबवून उत्तरपत्रिका ताब्यात घेतली...!!!

उत्तरपत्रिका गोळा करून त्या महाविद्यालयाच्या शिपायाकरवी कार्यालयात धांडून दिल्यावर डोंळे सर आतां आमच्याशी दिलखुलास बोलायला मोकळे झाले...," मि. घाणेकर... ...' अंतर्ज्वलन यांत्रिकी ' हा तुमचा हातखण्डा विषय ना?...मग तुमची अशी तिरपीट कां झालेली होती...ऑं? "
' घाण्या ' रुमालानं चेहरा टिपत उत्तरला," सर त्याचं काय झालं, की मी पहिला गणितालाच हात घातला...म्हटलं पहिल्यांदा गणितांचा फडशा पाडून मग सैद्धान्तिक भाग लिहावा आरामात म्हणून... ...
पण पहिल्याच गणितानं बराच वेळ खाल्ला माझा, अन्‌ मग घड्याळ बघितलं तर फक्त पाऊण तासच उरलेला होता पेपर संपायला...
म्हणून सगळी गडबड झाली सर."
डोळे सर," मग किती गुणांचा भाग लिहून झाला तुमचा एकूण...? "
घाण्या, " सर पंचेचाळीस गुणांचाच भाग पुरा झाला लिहून... ...पण लिहिलेलं सगळं व्यवस्थित सोडवलेलं आहे, त्यामुळं आवडीच्या विषयात सिक्सर नाही मारतां आली, तरी पास नक्की होईन... ... ..."
डोळे सर हंसले," पहिलं गणित तपासलंत परत तुम्ही? "
घाण्या," नाही सर...एक तर ते परत तपासायला वेंळच नव्हता हातात, आणि दुसरं म्हणजे ते बरोबर सुटलेलं होतंच... ...
मग कश्याला त्यात वेंळ घालवायचा अजून?...म्हणून नाही तपासलं. "
डोळे सर," छान...काय उत्तर आलं तुमचं त्या गणिताचं?... ...किती मिलिमीटर व्यास आलाय्‌ दट्ट्याचा? "
घाण्या," ८४२ मिलिमीटर सर... ..." !!
डोळे सर ' घाण्या ' कडं बघतच बसले... ...," का s s  s s s s s य? "
घाण्या," ८४२ मिलिमीटर सर... ...!!!! "
आतां सरांच्याभोंवती जमलेले सगळेच घाण्याकडं आं वांसून बघायला लागले...
अन्‌ खुद्द डोंळे सरांनीच स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!!
डोळे सर," आतां समजलं काय घाणेकर, मी इशारा कां दिला होता ते? "
घाण्या चा आतां तानाजी मालुसरे झाला," नाही सर... ...माझं उत्तर बरोबर आहे..." !!!
डोळे सर," घाणेकर...प्रश्नांत ह्या यंत्राची अश्वशक्ति किती दिलेली आहे? "
घाण्या," पन्नास अश्वशक्ति सर. "
डोळे सर," तुम्ही कायमच प्रयोगशाळेतल्या ' अंतर्ज्वलन यंत्रां ' भोंवती घुटमळत असतां ना?... ... 
आतां मला सांगा, की तिथं पाणबुडीचं काढून ठेंवलेलं जे यंत्र आहे...ते बघितलेलं आहे ना तुम्ही? "
घाण्या," होय सर. "
डोळे सर," किती अश्वशक्तीचं यंत्र आहे ते ? "
घाण्या," दोन हजार अश्वशक्ति सर..."
डोळे सर," घाणेकर अहो त्या तरी यंत्राचा दट्ट्या एव्हढा दांडगा आहे काय... ...ऑं? "
आतां घाण्या पेंटलाच," कसा असेल सर? ते यंत्र बहुदण्डगोलीय [ मल्टिपल् सिलिंडर्ड् ] आहे... ...त्याला दहाबारा दट्टे असल्यामुळं ते लहान आकाराचेच असणार... ...!!! "
आतां बघ्यापैकी कांहीजणांनी आपापल्या कपाळांना हात लावले... ...!!!
ह्या ' घाण्या ' ची समजूत कशी पटवावी ते डोळे सरांनाही समजेना क्षणभर... ...
पण डोळे सरच ते...दुसर्‍या क्षणीं चटाक् दिशी चुटकी वांजवत त्यांनी ' घाण्या ' कडं मोर्चा वळवला... ...
," ठीकाय्‌ घाणेकर... ...तुमचं उत्तर बरोबर आहे असं आपण क्षणभर गृहीत धंरूंया...ठीक?... ...आतां मला असं सांगा... ..."
घाण्या," काय सर? "
डोळे सर," ह्या तुमच्या ८४२ मि. मि. व्यासाच्या दट्ट्याचं वजन अंदाजे चाळीस एक किलो तरी भंरेल...होय ना? "
घाण्या नं मनातल्या मनांत सूत्रं तपासली," होय सर...तितकं भरेल कदाचित. "
डोळे सर," म्हणजे दंडगोलात कोंडलेल्या हवेच्या दाबाविरुद्ध हा दट्ट्या दंडगोलात रेंटायला त्या तुमच्या यंत्राला अंदाजे तीन साडेतीन मीटर - म्हणजेच दहाबारा फूट - व्यासाचं तरी गतिचक्र [ फ्लाय् व्हील ] लागेल... ...होय की नाही? "
घाण्या आतां बॅक् फूटवर खेंळायला लागला............," कदाचित लागेल सर..."
डोळे सर," आणि ते एक-दीड टन वजनाचं गतिचक्र फिरवून हे तुमचं यंत्र चालूं करायला तितक्याच भल्या दांडग्या आकारचा एखादातरी हत्ती लागणारच !!!... ...नाही? "
घाण्या ची आतां वाचा बसली !!!... ...तो गप्पच उभा...................
आणि मग डोळे सरांनी त्यांची हुकुमी धोंबीपछाड मारून ' घाण्या ' ला चितपट लोंळवला," आतां असं बघा घाणेकर... ...
असा एखादा भलामोठ्ठा हत्ती जर हाताशी असेल, तर मग हे तुमचं ८४२ मि. मि. व्यासाच्या दट्ट्याचं अगडबंब महाकाय यंत्र बनवायचंच कश्याला?...तो हत्ती च कामाला लावून लोक मोकळे होतील... ...!!!...काय? "
इतकं बोलून डोळे सर घाण्याकडं रोंखून बघायला लागले...!!
गराड्यातले शिकाऊ अभियंते आतां फिसफिसायला लागले... ...!!!
अन्‌ भर परीक्षागृहांत आमच्या ' जेम्स् वॉट् घाण्या ' नं छताकडं डोंळे फिरवत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेंतला... ...!!!!

******************************************************************************
-- रविशंकर.
१७ ऑगस्ट २०१६.   

No comments:

Post a Comment