Search This Blog

Monday, 4 May 2015

॥ वडाप ॥

॥ वडाप ॥प्रिय वाचकहो :  

देववाणी संस्कृत ला ’भाषाजननी’ म्हणून जगभरातल्या भाषापण्डितांनी यथार्थपणे गौरवलेलं आहे.
आपल्या भारतातल्या बहुतेक सर्व लेखी-बोली भाषा ह्या संस्कृत भाषेपासूनच उगम पावलेल्या आहेत, आणि त्यामुळंच अत्यंत समृद्ध आहेत... ...किती समृद्ध असतील?
एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर कुठल्याही भाषेतल्या मूळ शब्दांना ( संस्कृतांत अश्या शब्दांना ’धातु’ अशी संज्ञा आहे), ज्यांना इंग्रजी भाषेत ’रूट वर्ड्‌स्‌’ असं म्हणतात, ते इंग्रजी भाषेत सुमारे साडे दहा हजार आहेत, मराठीत अदमासे सत्तावन्न हजार आहेत, आणि संस्कृत भाषेत तब्बल एक लाख अडुसष्ट हजार आहेत.!!
ह्या मूळ शब्दांची विविध रूपं आणखी किती असतील, याची नुस्ती कल्पनाच केलेली बरी.
एव्हढंच सांगितलं, तरी मराठी भाषेच्या अफाट समृद्धीची यथार्थ कल्पना यायला कांही हरकत नाही.
म्हणून तर आजकालची मोबाईलवेडी तरूण पिढी ’एस्‌. एम्‌. एस्‌.’ करतांना उत्तम इंग्रजी भाषेचं जसं यथेच्छ ’खरकटं’ करूं शकते, तसं ते मराठी चं करायचा उपद्व्याप त्यांनी अवश्य करून बघावा, आणि कोण उताणं पडतंय्‌ तेही स्वतःच अनुभवावं...ही पोरं सात जन्म जरी कुंथली ना, तरी ते साध्य व्हायची शक्यता शून्यवत्‌ आहे, एव्हढंच मी ठामपणे सांगूं शकेन.
कारण मराठी भाषेला संस्कृत कडून वारसाहक्कानं मिळालेलं पाणिनी च्या सुस्पष्ट व्याकरणाचं अभेद्य कवच... ज्याला अवघ्या जगांत तोड नाही.

’वडाप’ आणि ’खिळसाण्ड’ हे असेच व्यावहारिक अनुभवातनं मराठीत रूढ झालेले शब्द.
असल्या शब्दांचे अर्थ कुठल्याही शब्दकोषांत तुम्हांला सापडणार नाहीत, कारण ते इथल्या मातीतनं जन्मलेले असतात, आणि भाषेला एक वेगळाच रुबाब प्रदान करून तिच्या सौंदर्यांत मोलाची भर घालीत असतात.
पैकी ’खिळसाण्ड’ वर मी त्याच शीर्षकाची कथा आधीच लिहिलेली आहे, आणि ’वडाप’ ह्या शब्दाची गम्मत विशद करणारी ही दुसरी कथा. 
ह्या कथेतही ’खिळसाण्ड’ हा शब्द आलेला असल्यामुळं, त्याचा अर्थ ज्या वाचकांना परिचित नसेल, त्यांनी ’खिळसाण्ड’ या शीर्षकाची कथा आधी वांचून त्यानंतर ही कथा वांचावी, म्हणजे ह्या कथेतली बोली भाषेची चंव त्यांना यथार्थपणे चांखतां येईल.

प्रस्तुत कथा ही कोल्हापूर च्या रांगड्या मातीत घडलेली असल्यामुळं, ह्या कथेत मी कुठंही ग्राम्य शब्द वगळून, अथवा त्यांच्या जागीं फुल्या वगैरे वांपरून, ह्या झंणझंणीत कोल्हापुरी मिसळीत दही कांलवून तिचं आळवाचं बामणी फतफतं करायचा मोह मी टाळलेला आहे, ह्याला कारण एकच...
ते असं, की अस्सल कोल्हापुरी मिसळीचा झंणका जर चांखायचा असेल, तर कांदा- लसूण- लवंगी मिरची असल्या पदार्थांचं वावडं असून चालत नाही.

धन्यवाद. 

----- रविशंकर.
२८ एप्रिल २०१५.

********************************************************************************************
     
॥ वडाप ॥

पों पों भोंगा वाजवत, ’पुणे-कोल्हापूर’ बस च्या चालकानं कोल्हापूर स्थानकाच्या फाटकाजवळ असलेल्या गदाड्यातनं गाडी रेंमटत एकदाची कोल्हापूर स्थानकावरच्या फलाटाला लावली, अन्‌ मी आणि सौ. इंदिराजी आमचा बाडबिस्तरा उचलून स्थानकावर उतरलो... ...
१९८५ सालातल्या जानेवारी महिन्याचे ते दिवस होते, वेळ होती सकाळी साडेदहाची...

कोल्हापूर हे माझं जन्मगांव... मॅट्रिक्‌ पर्यन्तचं शिक्षण पण तिथंच झालेलं... ... त्यामुळं शाळा-  गल्ल्यातले बालपणीचे लंगोटियार तिथं अमाप. मॅट्रिक्‌ नंतर मी पुढं शिकायला पुण्याला मुक्काम हलवला, आणि शिक्षण- पदवी- नोकरी- विवाह- संसार असं पुढचं सगळं पुण्यातच झालं, पण कोल्हापूरची माझी ओढ मात्र कायमच टंवटंवीत राहिली... आई- वडील तिथंच असायचे... ... सौ. इंदिराजींचं माहेर हैद्राबादचं... ... त्यांचा तिकडचा सगळा बेदम खाक्या हा पक्का तेलंगणी- कामाठी... ... त्यामुळं आमच्या घरांतल्या कोल्हापुरी- कानडी खाक्यात त्या अगदी नकळत विरघळून गेल्या. त्या जरी पुण्यात जन्मलेल्या- नांदलेल्या असल्या, तरी मूळ पिण्ड हैद्राबादचाच... त्यामुळं त्या पण कोल्हापूरला यायला सदैव एका पायावर तयार असायच्या, पण कांहीतरी लचाण्ड उपटून ते आतांपावेतों जमलेलंच नव्हतं.  

ह्या माझ्या जन्मगांवाची नानाविध वैशिष्ठ्यांसाठी जगभर ख्याती आहे...
तिथल्या कमावलेल्या चामड्याच्या कोल्हापुरी-अथणी वहाणा, झंणझंणीत मिस्सळ-पाव, तर्री मारलेला मांसाहारी तांबडा पांढरा रस्सा, मराठमोळी नऊवारी लुगडी, सायीसारखं मलईचं मुलायम आईस्क्रीम, अस्सल कानडी हेल असलेली शिवराळ भाषा... आणि आरपार बघून घ्यावीत अशी रगेल प्रेमळ माणसं... ... काय काय म्हणून सांगावं? ह्या सगळ्यावरच सौ. इंदिराजींचं बेदम प्रेम. (आणि माझंही)... ...
या कानडी धांटणीच्या कोल्हापुरी बोली भाषेची तीन प्रमुख वैशिष्ठ्यं आहेत.
ती अशी...
पहिलं म्हणजे सर्व चराचर पुल्लिंगी वस्तूं नंपुसकांत जमा होतात...!
दुसरं म्हणजे रीति भूतकाळ हा साध्या भविष्यकाळांत परिवर्तित होतो...!!
आणि तिसरं म्हणजे संवादातल्या समेच्या सर्व क्रिया आवाजांसकट सजीव होतात. !!!
एक नमुनाच दांखवतो, म्हणजे नीट समजेल... ...

पुणेरी---
,"अरे चन्दू, हा विलास आहे ना, पुढच्या रांगेत बसलेला, तो शाळेत असतांना खूप दंगामस्ती करायचा बघ आमच्या दामले सरांच्या वर्गांत.
सर फळ्यावर लिहायला पांठमोरे वळले ना, की हा विलास तोण्डात बोटं घालून जाम शिट्ट्या मारायचा.
कधीकधी काय गम्मत व्हायची, की मास्तर फळ्यावर लिहीत असतांना ह्या विलासनं शिट्टी मारायला बोटं तोंडात घातली रे घातली, की तेंव्हढ्यात मास्तर पाठीमागं वळायचे... आणि विलास बरोबर त्यांच्या तांवडीत सापडायचा.
मग सर जसे धंरायला यायचे, तसा हा विलास कबड्डी केल्यासारखा वर्गांत पळायला लागायचा.
अखेर दामले मास्तर त्याला पकडायचेच, आणि खंरपूस चोप द्यायचे... !!"

कोल्हापुरी >
,"ये चन्द्या... आरं ह्ये ’इल्या’ हाय न्हवं... तुज्या फुडच्या रांगत बसल्यालं रं... लई धुडगूस घालनार बग ह्ये ब्येनं दामल्ये मास्तराच्या वर्गामंदी... ...  
मास्तर आसं फळ्यावर ल्ह्याला लागलं कां न्हाय्‌, की ह्ये इल्या राण्डंचं ब्वाटं घालनार त्वाण्डात पाक्क्‌दिशी, आन्‌ हाननार शिट्ट्या बग झमा s s s झम्‌... ...
पर कंदीमंदी काय येळकोट व्हनार बग, मास्तर फळ्यावरती ल्हीत आस्तांना इल्या नं चार ब्वाटं कोंबली न्हवं काय्‌ त्वाण्डांत शिट्टी हानाया, की मास्तर झंटक्यात आस्लं गार्रर्रर्रर्र दिशी पाटीमागं फिरनार न्‌ काय इच्च्यारतूंस... ... ह्ये इल्या घावनार सप्पाचट्‌ मास्तराच्या खंचक्यात... हीः ही: ही: !!!
मा्स्तर धराया येनार न्हवं, तसं ह्ये इल्या लागनार की रं पळाया गार्‌ गार्‌ गार्‌ गार्‌ फुगडी घातल्यागत वर्गामन्दी. पर दामल्ये मास्तर कस्लं खनक्या बग, त्ये बी सुटनार इल्या च्या मागं बुंगाट्‌...
ही आश्शी गचाण्डी धंरनार बग त्येची, फास्स्‌दिशी हिसडून आडवं घालत... ...
आन्‌ आस्ल्या पक्काका लाता घालनार कां न्हाय्‌ ह्या राण्डंच्याला ... " 

काय... ...अंग तिंबल्यासारखं वाटतंय्‌ ना?

’दहीकाला मिसळ’ आणि ’अस्सल कोल्हापुरी मिस्सळ’ ह्यातला फरक आहे हा...न झेंपणारा !!!... ...काय?

मी आजतागायत सात अष्टमांश भारत आणि एक तृतियांश जग फिरून बघितलंय्‌...पण असली झमझमीत ’पायत्तानं’ आणि झणझणीत ’मिस्सळ-पाव’ कुठंच बघितलेले नाहीत. !!
माझ्या वापरात चार तळीं, कमावलेल्या चामड्याच्या, चामड्याच्याच वादीची संपूर्ण हातशिलाई केलेल्या, एकही खिळा न मारलेल्या, एकेक किलो वजनाच्या, करांकरां वाजणार्‍या अस्सल अथणी बांधणीच्या वहाणा आजही आहेत... गेलीं नऊ वर्षं मी त्या अखण्ड वापरतोय्‌. पुण्यातल्या यच्चयावत चर्मकारांच्या दुकानांत चंवकशी करून झाली... ... आजतागायत तसला ऐवज बनवायला इथला कुणीही चर्मकार धंजावलेला नाही. !!!  
ह्या अस्सल कोल्हापुरी ’पायत्तानां’ची आणि ’मिस्सळ-पावा’ ची नक्कल करायचा उद्योग पुणेरी 'पेशव्यांनी' अहोरात्र करून बघितला... अगदी आजही तो यथेच्छ चाललाय्‌... ...
हॉटेलांवर ’अस्सल कोल्हापुरी’, ’पुरेपूर कोल्हापुरी’, ’कोल्हापुरी चंटका’ असल्या पाट्या लंटकवून झाल्या...
अगदी वांग्याच्या रश्श्यापासून यच्चयावत बामणी भाज्यांचे रस्से त्या मिसळींवर ओंतून झाले...
बंचक बंचकभर लाल भडक पण गुळमट ब्याडगी मिरच्यांचं तिखट पण कांलवून बघितलं... ...
पण ब्याडगी ला अस्सल लवंगी वा संकेश्वरी मिरची चा झंणका कुठून येणार हो?
आणि ब्याडगी पण सोंसत नाही अशी खात्री पटल्यावर, शेंवटी बाहेर ’कोल्हापुरी’ ची पाटी, अन्‌ मेनूकार्डावर ’दही मिसळ’ असं छापून त्या मूळच्या चंविष्ट पदार्थांत दही कांलवून तो गोपाळकाला पण खायला सुरुवात केली... !!!
आतां असल्या जहाल नादांना न लागतां, गुढीपाडव्याला आपल्या गांवातलं वैशिष्ट्यपूर्ण ’चितळ्यांचं श्रीखण्ड’ ओंरपून गप्प बसावं की नाही? ... पण कळत असलं तरी वळत नाही, त्याला काय करायचं? 
छत्रपतींचे उद्योग करायच्या भरीला पेशव्यांनी पडायचं नसतं... तसं करायला गेलं, की ’पानिपत’ अटळ असतं... ... असं इतिहास पण कोंकलून सांगतोय्‌ ना?
पण मग ’जेनूं काम तेनूं थाय, दुजा करे सो गोता खाय’ हे जर पाळलं, तर मग दही कांलवून केलेलं तथाकथित कोल्हापुरी मिसळीचं गरगट ओंरपून, ’आम्ही कोल्हापुरी मिसळ खातो’ असा डांगोरा पिटत गांवभंर फिरतां कसं येईल?... ... त्यासाठी हे सगळे उपद्व्याप चाललेले असतात... !!! 
असो. 

तर तब्बल साडेपांच तास एकाच जागी अवघडून बसल्यामुळं अंग चांगलंच आंबून गेलेलं होतं...
लग्न झाल्यास सौ. इंदिराजी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या घरीं येत होत्या.
एकतर सकाळी पांच वाजतांची गाडी गांठलेली असल्यामुळं आदल्या रात्री झोंपही धड पुरी झालेली नव्हती, शिवाय बिनथांब्याची थेट गाडी असल्यानं, चालक-वाहकांनी सातार्‍याच्या पुढं रस्त्यालगतच्या कुठल्यातरी उपाहारगृहांत जेमतेम दहा मिनिटंच गाडी थांबवून पुढं पिटाळलेली होती. त्यामुळं नाष्टा असा झालेलाच नव्हता... ...
तेव्हां आम्ही ठंरवलं की समोरच दिसणार्‍या एखाद्या हॉटेलात थोडंफार खाऊन चहा वगैरे घ्यावा, अन्‌ मग काय मिळेल ती सवारी पकडून घराकडं सुटावं. 
म्हणून सौ. इंदिराजी अन्‌ मी आपापलं सामानसुमान उचलून समोरच दिसणार्‍या मिसळ स्पेशल उपाहारगृहाच्या दिशेनं चालायला लागलो... आणि कांही कळायच्या आंत बसस्थानकाच्या फाटकाबाहेरच ’वडाप’ वाल्यांच्या टोंळक्यानं आम्हांला घेराव घातला... ... ...
हे ’वडाप’ ही पण कोल्हापूर ची एक जगावेगळी खासियत आहे...
पुण्यातल्या शुद्ध मराठीत आपण ’ओंढणे’ हे क्रियापद वापरतो ना, त्याला कोल्हापुरी भाषेत म्हणतात ’वडणं’, आणि आज्ञार्थी ’ओंढा’ ला म्हणतात ’वडा’.
पुण्यात जश्या सहा-आठ आसनी टमटम रिक्षा असतात ना, तश्या तिथंही आहेत... त्या कोल्हापूर स्थानकापासून वाट्टेलतिकडं ये जा करीत असतात. शहरी वाहतुकीच्या बसथांब्यावर बससाठी तांटकळत उभे असलेले प्रवासी, हे टमटम वाले ’वडा... वडा’ असा कलकलाट करीत अक्षरशः ओढून पळवून नेतात ...प्रसंगी बसच्याच तिकिट भाड्यातही ते प्रवाश्यांना ठीकठिकाणी पोंचवतात... ...!!
कधीकधी तर ह्या टमटम वाल्यांतही आपापसांत ’ वडा... वडा’ करत हमरीतुमरी जुंपते, आणि मग वेंळप्रसंगीं ते परस्परांशी पहिलवानी स्पर्धा करीत, बसपेक्ष्याही कमी भाड्यात एकमेकांची गिर्‍हाईकं ओंढायला सुद्धां कमी करीत नाहीत.!! 
अतएव ह्या ’ वडा... वडा’ च्या नामजगरामुळं ह्या टमटम रिक्षांना रंगेल कोल्हापूरवासीयांनी ’वडाप’ असं मस्त नांव बहाल केलेलं आहे.!!! 

," कुटं जायाचं हाये ताई-सायेब?... ... रंकाळा?... चला बसा, मानशी तीन रुप्पय्‌ फकस्त द्या सायेब." एक ’वडाप’ वाला आमच्या सामानाच्या बॅगा घ्यायला लागला, तसा दुसरा एक ’वडाप’ वाला त्याला ढंकलत पुढं सरसावला," तूं मागं व्हं रं गुमान...’आक्का’ नी मलाच हात दावलाय्‌...व्हंय्‌ कां न्हाई वो आक्का?... चल सराक मागं तूं... या या... बसा आक्का गाडीत... ... मानशी दोन रुप्पय्‌...चला चला."
आतां मात्र ’वडा वडा’ करत तिथं सगळाच कल्ला उडाला... त्या रिक्षाथांब्याला अक्षरशः कुरुक्षेत्राचं स्वरूप आलं... ... !!
आणि खास ’आक्कां’ साठी बघतां बघतां ’वडाप चं भाडं माणशी आंठ आण्यावर येऊन ठेपलं... !!
ते बघून आम्ही च आतां कपाळांना हांत लावले...!!!
एक पिळदार कल्लेमिश्या रांखलेले पैलवान आतांपावेतों आपल्या ’वडाप’ ला रेंलून शांतपणे ही झुंबड बघत होते...
त्यांनी आतां ’वडाप’ सोडून एका झंटक्यात थेट ’आक्कां’ पर्यन्त त्या गदाड्यातनं मुसण्डीच मारली ... ...
मग ’आक्कां’ च्या हातातली बॅग घेत कल्ला करायला लागलेल्या बाकीच्या ’वडाप’ वाल्यांवर ’वस्ताद’ गरजले," कुनाची घिराईकं वडताय्‌सा रं भडव्यानूं?... ... ऑं?"
एक ’वडाप’ वाला पुढं आला," मी ठंरीवलंया ह्ये घिराईक... ... अधेलीच्या भाड्यात... ... हां..."
पैलवान," फुकाट्‌ न्ह्येतंय्‌स काय रं ह्येन्‌ला?... ऑं?"
वडापवाला," मंग तूं तरी फुकाट न्ह्येनाराय्‌स काय रं?"
पैलवान मिशी पिळत गंरजले," म्हनूनच इच्यारतोय्‌ मी...!!... ...काय?...बोल की रं..., न्ह्येतंय्‌स काय फुक्काट्‌?"
आतां एकजात सगळ्या ’वडाप’ वाल्यांची बोलती च बन्द झाली... !! आणि खुद्द सौ. इंदिराजीनी च पुनश्च आपल्या कपाळाला हात लावला... !!!
आम्ही आं वांसून आतां त्या गदाड्याकडं बघायला लागलो... ... न्‌ बघतच बसलो.
तो दुसरा वडाप वाला आतांपावेतो जरा सांवरला होता ...तो छाती पुढं काढून म्हणाला," व्हंय्‌ न्ह्येतो की फुकटांत... ... काय म्हननं हाय तुजं आतां?"
पैलवानानी मग त्याच्याकडं तुछ्चतेनं बघत चितपट कुस्ती मारली," मी ह्येन्‌ला आत्तां च्या पाजूनश्यान्‌ वर फुकटात न्ह्येनार हाय... !!!... ... हाय काय कुनी तयार?"
आतां मात्र सगळ्याच ’वडाप’ वाल्यांच्या अक्षरशः चड्ड्या सुटल्या... !!!
आणि आम्ही दोघे आं वांसून त्या ’हिन्दकेसरी’ कडं आतां बघायला लागलो...
आम्ही ’कोल्हापूर’ नगरीत आहोत, की ’अयोध्या’ नगरीत आहोत ते आमचं आम्हांला च कळे ना. !!
मग पैलवान दादा आमच्या बॅगा उचलीत समस्त ’वडाप’वाल्यांवर गरजले," दांतखीळ बसली न्हवं?...  आतां फुटायचं बगा झंटक्यात... ’आक्का’ म्होरनं...  !!!...काय?"
सगळे ’वडाप’वाले आतां मुक्काट पांगले...आम्ही अजून थिजूनच उभे होतो...

मला कुठंतरी शंका यायला लागली, की ह्या ’हिन्दकेसरी’ नां आपण पूर्वी कुठंतरी भेंटलोय्‌... चेंहरा तर ओंळखीचा वाटायला लागला... आवाजही कानांत कधीतरी सांठलेला असावा... पण स्मृति तांणतांणून पण त्यांचं नांवगांव, ठावठिकाणा कांही कांही आंठवेना... ... ...  
पहिलवान दादा नी मग आमच्या चारही बॅगा, दोन्ही कांखोट्यांत पैलवानांच्या मानगुटी आंवळल्यागत एका झंटक्यात उचलल्या, आणि म्हणाले," चला ’आक्का’... चला ’सायेब’... ... ’वडापा’त बसून घ्या."
आतां मी भानावर येत तोण्ड उघडलं," थांबा थांबा जरा पैलवान... अहो हे... हे तुमचं... ...’फुकट’ आणि वर ’च्यापाणी’... ही सगळी काय भानगड आहे?... आम्हांला हे असलं कांही नकोय्‌ फुकटातलं ’वडाप’ ... अहो काय चाललाय काय हा सगळा तमाशा...ऑं?... कोण लागतोय्‌ आम्ही तुमचे?"
आतां पैलवान दादा नी कांखोट्यात उचललेल्या चार गच्च भरलेल्या बॅगा धंबाक्‌दिशी जमिनीवर आदळल्या... ...
आणि माझ्याकडं वळून हात पसरत त्यांनी पहिलवानी आरोळी ठोंकली," नारबा राण्डंच्या !! ... ... ... वळाकलं न्हाईस व्हंय्‌ रं मला?"
ती हांक ऐकतांच मी त्या ’हिन्दकेसरी’ कडं डोंळे फांडफांडून बघायलाच लागलो... !
माझ्या डोंक्यात आत्तांपावेतों पक्‌पक्‌णारी ट्यूब आत्तां भक्क्‌दिशी पेंटली... !! 
मला ’नारबा’ म्हणून हांक मारूं शकणारा जगातला एकमेव माणूस... 
हा तर माझा पहिली यत्तेपासूनचा शाळासोबती सद्या पावले... शाळेत मी त्याला ’बोक्या’ म्हणायचो...!!!
मग अवतीभंवतीचं चराचर जग एका क्षणार्धात वितळलं...
पोंटातलं अस्सल ’कोल्हापूर’ आतां उसळून ओंठावर आलं...  ... 
आणि मी ," बोक्या... भोसडीच्च्या... ... तुज्या आयला तुज्या...", करत पैलवान दादा नां घट्ट मिठी च मारली. !! 
आणि शेंजारी उभ्या असलेल्या सौ. इंदिराजी नी आभाळाकडं डोंळे फिरवत आपल्या कपाळावर हात मारून घेतला. !!!! 

मी सौ. इंदिराजींची मग सदा बरोबर ओंळख करून दिली. सदा नं ’रामराम आक्का’ म्हणत सौ. इंदिराजी नां नमस्कार केला. 
मी," सद्या, साल्या ’वयनी’ला ’आक्का’ म्हंत्यात व्हंय रं तुज्या घरामन्दी"?
सद्या," ती च भानगाड झाली बग समदी नारबा...आरं म्या पयलेझूट वळाकलाच न्हाय बग तुला... ...मातुर ह्या ’आक्कां’ ची वळाक लागली बग...तूं जवा त्वाण्ड उचकाटलंस न्हवं, तंवा वळाकला बग तुला गड्या."
मी चंमकलोच...ह्या सद्या नं सौ. इंदिराजी ना तर उभ्या हयातीत आत्तांच काय ते पहिल्यांदा बघितलं होतं... मग हा कसली फिरकी तांणतोय्‌ आतां? मी त्याच्याकडं बघतच बसलो...
मग सद्या सामान उचायला वांकला तसं मी सौ. इंदिराजी नां त्यांच्या बॅगा उचलायची खूण केली अन्‌ माझी बॅग उचलायला लागलो, तसा सद्या म्हणाला," आसूं द्ये रं नारबा... ... इतक्या वर्सांनी घांवलाय्‌स मला... र्‍हाऊं द्ये...सोड बगूं हात... ... सोडा ब्यागा ’आक्का’ तुमी बी", असं म्हणत त्यानं सगळं सामान त्याच्या ’वडाप’ मध्ये रंचून ठेंवलं... मग शेजारी उभ्या असलेल्या एका ’वडाप’ वाल्या दोस्ताला त्यावर लक्ष्य ठेंवायला सांगून म्हणाला," चल नारबा... जरा च्यापानी घिऊं, आन्‌ मंग पोंचिवतो तुमास्नी घराकडं आरामात... चला ’आक्का’."

मग चालतां चालतां थोंड्क्यात एकमेकांचं क्षेमकुशल विचारून झालं, अन्‌ आम्ही त्या मिसळपाववाल्या हॉटेलात जाऊन स्थानापन्न झालो.
मी पोंर्‍याला हांक मारायला तोंड उघडायच्या आतच सदा नं गल्ल्यावर बसलेल्याला तीन बोटं वर करून खूण केली.
मी," हे बघ सद्या..."
सदा," आरं गप रं तूं... .. गप्‌ म्हन्तोया न्हवं तुला?... ’आक्का’ स्नी पैल्यान्दांच भ्येटतोय्‌ बाबा... र्‍हाऊं द्ये", म्हणत सदा नं ’आक्का’ नां दोन्ही हात जोडून आदरानं नमस्कार केला," रामराम ’आक्का’... मी ह्या ’नारबा’ चा साळा मैतर...’सदा पावले’... ... बर्‍या हायसा न्हवं?"
’आक्का’ नी पण मग नमस्कार चमत्कार करत सदाची विचारपूस केली.
तेंव्हढ्यात मिसळ हजर झाली," अन्‌ तिच्यावर तांव मारत मी सदा ला पुन्हां विचारलं," सद्या... ... मगांपास्नं बगतुया म्या... ... ह्ये ’आक्का’ ’आक्का’ काय लावलंयास रं तूं... ... ऑं?"

सदा नं मग त्याची कहाणी सांगितली... ...
सातवीत असतांना सदा चे वडील गेले, तेव्हां ह्या सदानं शाळा सोडून दिली, आणि तो नंतर मलकापूरला असलेल्या त्याच्या थोरल्या बहिणीकडं कायमचा रहायला गेला होता, एव्हढंच मला माहीत होतं. 
पुढं वर्षभरांतच सदाची आई पण गेली, आणि मग त्याचा सांभाळ ह्या बहिणीनंच केलेला होता... मॅट्रिकपर्यन्त त्याला शिकवून मग स्वतःचे चारदोन दागिने गहाण ठेंवून त्याला रिक्षा विकत घ्यायला तर मदत केली होतीच, पण सदाचं लग्नकार्यही तिनंच पार पाडलेलं होतं...
आणि आतां हा सदा पुन्हां कोल्हापुरात संसार थाटून रहात होता, आणि ’वडाप’ ही चांलवत होता.

"आमच्या ’आक्का’ च्या आशीर्वादानं आतां सगळं ब्येस चाललंय्‌ बरं का नारबा...", सदा बोलत होता , "ही माजी ’आक्का’ मंजी शिस्तीला आक्शी ’हिटलार’ च व्हता बग... ... ’आय’ सारकं लाडक्वाड न्हाय काय क्येलं माजं, पन बाकी समदं आगदी आयसारकं क्येलंन्‌ बाबा माजं ’आक्का’ नं... आय्‌पक्षी मायन्दाळ जीव व्हता बग तिचा माज्यावर ... ... ’पदवीदर तरी व्हो रं बाबा’ म्हनूनश्यान्‌ मागं लागलीवती माज्या... पन टाळक्यात न्हाय शिरलं बग तंवा... आरं आजून फकस्त चार यत्ता शिकलो आस्तो न्हवं, तर तुमच्यावानी कुटंतरी ’यस्‌ फस्‌’ करत नुकरीला नस्तो काय रं लागलो, सांग मला? 
आतां खरं सांगायचं तुला नारबा, तर तुमच्यासारक्यांच्या संगट ऊटबस कराया, खायाला-प्याला लाज वाटतीया बग... शिक्षान्‌ न्हाई न्हवं झालं आपलं?... ... म्हून.
बिचारी ’आक्का’ माजं लगीन लावूनश्यान फुडं सा म्हैन्यातच ग्येली बग नारबा... ...
आनि आज वैनीस्नी बघटलं न्हवं म्या, तंवा ’आक्का’ ची आटवान झाली बग मला पुन्यांदा... ...  आरं वयनी म्हंजी आ s s s गदी माज्या ’आक्का’ ची सप्पाचट्‌ झ्येराक्स कापी च म्हन की रं. !! 
आरं म्या तुला बी अदुगर वळाकलाच न्हवता पयलेझूट... ... पन ह्या ’आक्कां’ ची वळाक पटली बग येका झंटक्यात", सदा सौ. इंदिराजीं कडं बोंट दाखवत म्हणाला," आतां मला सांग नारबा... ह्या  माज्या ’आक्कां’ ना दिऊं घालवूनश्यान्‌ दुसर्‍याच्या ’वडापा’ तनं?...आन्‌ घ्येतो मंग पायत्त्त्त्तान्‌ हानून माजं म्याच सोताच्या टाळक्यात !!... ...काय?" 

आमच्या सौ. इंदिराजी पण तश्या ’हिटलर’ च... ... फक्त काळजात मेण भंरलेला ... ...!!!
त्यांनी नजर दुसरीकडं वळवली ’डोळ्यात कांहीतरी गेलंय्‌’ म्हणत...
हॉटेलाचं बिल ही सदा नं च भागवलं... ... आम्ही नको नको म्हणत असतांना... ... कांही ऐकलं नाही त्यानं. मग त्याच्या ’वडापा’ तनं आम्हाला घराच्या दरवाज्यापर्यंत नेऊन उभं केलं... ...
,"नारबा जरा हितंच थांब तूं ’आक्का’ संगं", म्हणत सगळं च्या सगळं सामान स्वतः घरांत नेऊन ठेंवलं ... ...आम्हाला हात पण लावूं दिला नाही त्यानं सामानाला.

सगळं झाल्यावर बुशकोटाला हात पुसत सदा म्हणाला," यिऊं मग नारबा मी?"
मी म्हणालो," सद्या साल्या, आरं ज्येवल्याबिगर कुटं जातंय्‌स रं तूं... ...ऑं?"
सदा आतां अवघडायला लागला," आसूं द्या ’आक्का’... पुन्यान्दां यीन कदितरी... ..."
’आक्का’ नं पण सदाला बरंच समजावलं, पण जेवायला आंत यायला तो कांही तयार होईना... !!
त्याचं आपलं एक च पालुपद," पुन्यान्दां यीन कदितरी ’आक्का’... ... आवो हाटिलातलं येगळं आस्तंया... ...हितं आंत यिऊन ज्येवान करायचं म्हंजी आवगाडाय्‌ झालंया बगा... ..."

सौ. इंदिराजी नी मग शांतपणे त्यांची पर्स उघडली...
मग तीतनं वीस रुपयांची एक करकरीत नोट बाहेर काढली... ...
आणि सदा च्या तोण्डापुढं ती नाचवत म्हणाल्या," हं... ... हे घ्या."
सदा हेलपाटलाच," ह्ये...ह्ये काय वो ’आक्का’... ...ऑं ?"
अन्‌ काय होतंय्‌ कळायच्या आंतच सौ. इंदिराजीं ची अस्सल कामाठी ’घनगर्ज’ तोंफ धंडाडली," ’आक्का’ ’आक्का’ म्हन्तायसां न्हवं मला तुमी?...आनि सोताच्या ’आक्का’ च्या घरामंदी चार घास खायाला लाज वाटाय्‌ लागलीया व्हंय्‌ तुमास्नी... ... ऑं?
मंग ह्ये घ्याचं‍... ... आन्‌ सुटायचं हितनं पाटीला पाय लावूनश्यान्‌... ... ... !!
आनि नसंल, तर ह्ये टुरटुरं तुमचं गप्‌गुमान बंद करायचं, आन्‌ पानावर यिऊन बसायचं झंटक्यात  !!!... ... काय?" 

आमच्या हैद्राबादी ’इन्दव्वा’ च्या त्या ’कोल्हापुरी’ अवताराकडं मी च आं वांसून बघत बसलो...
सद्या च्या पीळ मारलेल्या मिश्यांची टोंकं क्षणार्धांत खाली लोंबायला लागली... ...!!
पुढ्यात उभ्या ठांकलेल्या ह्या अस्सल तेलंगणी ’इन्दव्वा आक्का’ चा तो कोल्हापुरी हिसका बघून डोंळे आभाळाकडं फिरवत आतां ’पैलवान दादां’ नी च स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... !!!
मग ’आक्का’ नं पायात चंढवलेलं करकरीत अस्सल कोल्हापुरी ’पायत्त्त्तान्‌’ पण त्याला दिसलं... ...
 आणि पायात शेपटी घालून आपल्या ’आक्का’ च्या मागोमाग ’हिन्दकेसरी’ सदोबा आमच्या घराच्या पायर्‍या मुकाट चंढायला लागले... ... ... !!!!

सद्याचं न्‌ माझं जेवणंखाण उरकलं... ...
मग दिवाणखान्यात पानसुपारी लावून सदोबा नी मला एक विडा बनवून दिला... मग दुसरा स्वतःच्या तोण्डांत कोंबला... ... अन्‌ स्वयंपाकघराकडं डोंळ्यानं निर्देश करीत मला हंळूच म्हणाले," नारबा... ... आवगाड हाय रं बाबा तुजं सगळं आतां. !!"
सद्याच्या वात्रट डोंळ्यात आतां ती च लहानपणची ’बोक्या’ ची चंमक क्षणभर लंकाकली... पण माझ्या सावध नजरेतनं मात्र ती सुटली नाही... ...
मला लक्ष्यांत यायला लागलं, की सद्या आतां आमच्या शाळकरी वयांतल्या ’जंगी हुसेन’ तालमीच्या आखाड्यात उतरून दण्ड थोंपटायला लागला होता.‌ !!
मी सांवध झालो... ...
मी," का रं बाबा... ...काय झालंय्‌ माजं आवगाड व्हायला"?
सद्या डोंळे मिचकावत हंळूच म्हणाला," आरं खाऊन खाऊनश्यान्‌ आतां स्वास बी घितां यीना झालाया मला, राण्डंच्या... ... आरं ’वयनी’ चं रोज्चं बोलनं-  करनं- सवारनं ह्ये... ह्ये आसलंच मायन्दाळ हाय का काय रं नारबा?... ... ऑं?"
मी," व्हंय्‌ बोक्या...ह्या कामाटी लोकांचं समदंच आसलं मायन्दाळ आसतंया बग."
सद्या नं मग मला कांही कळायच्या आंतच पहिली टांग मारली," आरारारारारा... म्हंजी रात्‌च्याला आक्शी ’येळकोट’ च व्हंत आसंल की रं तुजा नारबा  !!!... ... हीः ही: हीः"
तसा मी बोक्या कडं बघत कपाळावर हात मारून घेतला. !!
सद्या स्वतःवरच जाम खूष होत आतां गंदगंदायला लागला... अन्‌ बेसांवधही झाला लेकाचा...
आणि मग मी पण आमच्या दिवाणखान्यात आपसूकच भरलेल्या त्या आखाड्यात उतरलो शड्डू ठोंकत... ...
मी," सद्या मला येक सांग बगूं... ..."
सदोबा," काय रं नारबा?"
मी," लई मज्जा वाटत आसंल न्हवं रं तुला रिक्षातनं आसं दीसभर गांवांत हुंदडाया?... ... आनि वर पैका बी मिळत आसंल की बक्कळ... ... कंदीमंदी प्याट्रोल भंरूनश्यान्‌ ह्ये तुजं ’वडाप’ घराम्होरं दीसभर हुबं करून बी ठिवत आसशील की बेन्या... ...मस्त फक्या मारत गांवभर... ... काय?"
सद्या," कसलं काय आलंय्‌ रं बाबा?... आरं सक्काळी साडे सा पास्नं आसली जंगी हुंदडी लागतीया न्हवं काय मागं, रातच्याला धा तरी वाजत्यात बग घराचं त्वाण्ड बगाया... ... आनि साळा कालेज्यांच्या सुट्ट्यांच्या हंगामात तर कंदीकंदी दोन दोन येळां बी प्याट्रोल भंराया लागतंय्‌ टाकी गचागच्‌ भंरंस्तंवर... ... आन्‌ रातीला बारा बारा वाजंपत्तूर ’वडापा’ चं पार खिळसाण्ड व्हतंय्‌ बग हुन्दडी  घालूनश्यान्‌... ... काय सांगूं बाबा तुला?"
मी मग सद्याला हुलकावणी दिली," तुज्या ह्या ’हाय्‌द्राबादी आक्का’ चं बी आगदी आस्संच हाय बग सद्या... ..."
सद्या," म्हंजी रं नारबा?"
तशी गुडघे जरा सैलावलेल्या त्या हिन्दकेसरी ला मी बेदम फिरकी टांग हाणली," खिळसाण्ड व्हतंया न्हवं तुज्या ’वडापा’ चं हुन्दडी घालूनश्यान्?‌... ... ह्या तुज्या ’आक्का’ चं बी आगदी तस्संच हाय बग... ...  ’खादडी’ कशी घालतीया बगटलंस न्हवं बेन्या, प्वाट फुटंस्तंवर?... ऑं?
’फुगडी’ बी तसलीच आसतिया तिची राण्डंच्या... ’खिळसाण्ड पेश्श्यल’.  !!!!... ... काय?
शिरलं का न्हाय्‌ आतां टाळक्यांत तुज्या... सप्पाचट्‌ ? " 
सदोबा नां माझी फिरकी टांग कांही सोंसवली नाही... ...
उभा आडवा हांत मारून पोंट तंटतंटलेलं असल्यामुळं त्यांना धंड खदांखदां हंसतांही येईना...!!
तसे मग चितपट कुस्ती हंरलेले बोकोबा कपाळावर हांत बडवून फी: फी: फी: फी: करत  चक्क दिवाणखान्यातल्या जमिनिवरच उताणे पडून गडाबडा लोंळायला लागले...!!!
आणि काय गडबड झालीय्‌ ते बघायला हातांत पुर्‍या तंळायचा झारा घेऊन तश्याच धांवत बाहेर आलेल्या ’आक्का’ नी आख्याड्यात लोंळणारा तो ’हिन्दकेंसरी’ बघून आं वांसत स्वतःच्या कपाळाला हांत लावला. !!!!
  
’आक्का’ मग पुर्‍या तंळायला पुन्हां स्वयंपाकघरांत गेल्या, अन्‌ मी सदाला निरोप द्यायला त्याच्या ’वडापा’ पर्यन्त गेलो.
मग मी सौ. इंदिराजी नी रिक्षातनं उतरतांना माझ्या खिश्यात कोंबलेली वीस रुपयांची नोट बाहेर काढली, अन्‌ ती सदाच्या पुढं करत म्हटलं," ह्ये ठ्येव बोक्या... ...’आक्का’ नं दिल्याती तुला..."
सद्या उसळला," रिक्षाभाडं द्याला लागलाय्‌स व्हंय्‌ रं मला?... ...ऑं?"
मी शांतपणे म्हणालो," रिक्षाभाडं घ्ये, आसं म्हनालो काय रं मी तुला बोक्या?... ...’आक्का’ नं दिल्याती ... ठ्येव ह्ये... आनि घरला जातांना पोरांच्यासाटी कायतरी घिऊन जा ."
तरी सदा पैसे घ्यायला हात पुढं करीना... 
मग मला एक फर्मास धोबीपछाड सुचली... ... 
मी," ह्ये बग बोक्या... ह्ये पैसं घेन्यासाटी आतां आवतान हावंय्‌ काय तुला?... ...’आक्का’ ला बलिवतो तुज्या पायजेल तर आवतान द्यायला... पन ह्ये बग बाबा... ... आत्तां घरामंदी येतांना ज्ये आवतान मिळालंवतं न्हवं तुला, त्ये ’कोल्लापुरी’ व्हतं... ज्येवान करतांनाचं आवतान ’पेशवाई’ व्हतं... ... तुला आत्तां मारल्याली टांग सादिक पैलवानाची हुती... ... ... आतां ही नोट घ्याचं आवतान मातुर ’हाय्‌द्राबादी पायत्तान’ आसंल बेन्या... ... ... चालंल तुला"?
दुसर्‍याक्षणीं सद्या नं जातिवन्त ’बोक्या’ सारखी माझ्या हातातल्या नोटेवर झडप घालून ती शर्टाच्या खिश्यात कोंबली... ... !!!
आणि कपाळाला हात लावून स्टार्टर ची चांवी फिरवत मला म्हणाला," येतो बरं म्या... ... 'आक्का’ स्नी  माजा रामराम त्येवडा सांग नारबा... ...
पर आतां ’आक्का’स्नी घिऊनश्यान्‌ माज्या घरला नक्की याचं बरं काय रं रस्सा वंरपाया... ...तुला येळ आसंल न्हवं, तंवा फोन कर मला...म्हंजी ’वडाप’ घिऊनश्यान च येतो तुमास्नी न्ह्याला मी... बरं का."
मी," येतो रं बाबा आमी सद्या...चल." म्हणत त्याच्या पांठीवर थांप मारली... ...
अन्‌ सद्यानं गिअर टांकत मला अचानक विचारलं,"नारबा... आरं थण्डाई मिळती काय रं पुन्यांत तुज्या?"
मी," पुन्यांत कुटली थण्डाई आलीया बाबा... ... आपलं कोकम सरबत, न्हाई तर मसाला ताक च  पिऊनश्यान्‌ दण्ड थोंपटायचं... ... !!"
सद्या," मंग घरामंदीच झ्याक्‌पैकी मस्साला रगडूनश्यान्‌, रोजच्याला येकांदा गलासभर तरी थण्डाई पीत जा रं माज्या बाबा..."
मला कांही कळलं नाही," आसं कां म्हन्तोय्‌स रं... ...ऑ?"
अन्‌ सदोबा नी जातांजातां मला टांग मारलीच," म्हंजी त्येचं काय हाय नारबा... ...माज्या ’हुन्दडी’ गत तुजी बी ’फुगडी’ चाल्तीया म्हनलास न्हवं रातभर ?... ... आरं मंग रोजच्याला येकांदा गलासभर तरी थण्डाई ढोंसाया नगं व्हंय रं? ... ...
न्हायतर तुजं बी माज्या ’वडापा’ गत खिळसाण्ड व्हईल की रं राण्डंच्या, सा म्हैन्यात. !!!... ...काय?"


आणि मी पांठीत रट्टा हाणायच्या आधीच कुत्रं मागं लागल्यागत, ’इन्दव्वा आक्का’ च्या मघाचच्या  ’पाटी ला पाय लावूनश्यान्‌’ च्या हुकुमाची खडी तामिली करीत, सदोबा नी त्यांचं ’वडाप’ उडवत धूम ठोंकली. !!!!

********************************************************************************************
    ----- रविशंकर.
 २७ एप्रिल २०१५. 

1 comment: