Search This Blog

Sunday 17 May 2015

॥ विजेरीचे झंटके ॥

॥ विजेरीचे झंटके ॥


    [अंतिम भाग ३]




संदीप नं ठंरल्यानुसार दाखल्याची प्रत मला आणून दिली, आणि दुसर्‍या दिवशी विजेरी कंपनीकडं परत पांठवून नवीन विजेरीचा दावा पण दाखल केला... ...
आणि मोजून अठ्ठेचाळीस तासांनी माझ्या मोबाईलवर एक्साईड चा एस्‌. एम्‌. एस्‌. आला...

सन्माननीय ग्राहक,
आपला वॉरंटीतला नवीन बदली विजेरीचा दावा क्रमांक ७८९४२ आम्ही मान्य केलेला असून, नवीन विजेरी डीलरकडे पांठवीत आहोत... ...कृपया आजपासून पांच दिवसांनंतर ती डीलरकडून ताब्यांत घ्यावी ही विनन्ति.
आमच्या उत्पादनांवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपणांस मनःपूर्वक धन्यवाद.
--एक्साईड इण्डस्ट्रीज लि.
   
आतां मी स्वतःवरच बेहद्द खूष झाल्यामुळं कपाळाला हात लावला... ...!!
मास्तरांच्याच भाषेत सांगायचं, तर ’रुस्तम-ए-हिन्द’नी खडाखडी सुरूं व्हायच्या आधीच मैदान सोडलेलं होतं.!!!

**************************************************************************************

मी दुसर्‍या क्षणीं संदीपचा नंबर फिरवला
"हॅलो", पलीकडून आवाज आला.
आवाज संदीपचा वाटत नव्हता... ...मी विचारलं," संदीप...तूंच बोलतोय्‌स ना?"
"नाही सर, मी संदीपचा भाऊ कुशल बोलतोय्‌", पलीकडची व्यक्ति म्हणाली,"संदीप परगांवीं गेलाय्‌ त्यामुळं तुमचा कॉल माझ्या नंबरकडं पुनर्प्रक्षेपित झालाय्‌ सर... ...बोला...काय काम होतं आपलं?"
मी तसा कुशलजी नां व्यक्तिगत ओंळखत नव्हतो, म्हणून त्यांना थोंडक्यात दावा मान्य केल्याचा ’एक्साईड’ चा एस्‌. एम्‌. एस्‌. आल्याचं सांगितलं, आणि ’नवी विजेरी आल्याआल्या लगेच पांठवून द्यायला संदीपला निरोप द्या’ असं सांगून ठेंवलं.
नंतर आर्थिक वर्ष अखेरीच्या गदाड्यात ती घटनाच मी पार विसरून गेलो... 
पण माहेरी पाठवलेल्या दिवंगत विजेरीबाई मला अजून कांही झंटके देणार होत्या, हे मात्र मला त्या वेळीं माहीत नव्हतं.!!
.........................................................................
.........................................................................

या घटनेनंतर साधारण पंधराएक दिवसांनी एका रविवारीं सकाळी सकाळीच माझा मोबाईल वाजला...
तो नेमका सौ. इंदिराजी नी घेतला," हॅलो...हो आहेत ना घरीं...काय काम आहे तुमचं?... ...थांबा हं एक मिनिट"
सौ. इंदिराजींच्या कपाळावर सूक्ष्मशी आंठी उमटली... ...," हं घ्या...तुमचाच फोन आहे..."
मी फोन घेत भाषकावर ( माउथपीस) हांत झांकीत विचारलं,"कुणाचा फोन आहे?"
सौ. इंदिराजी मला चितपट मारीत त्यांच्या नेहमीच्या कामाठी खंचक्यात म्हणाल्या," कुणीतरी तरुणी आहे...तिला तुमच्याशीच मधाळ आवाजात बोलायचं आहे!!...समजलं?"
मी कपाळाला हात लावत सुरुवात केली,"नमस्कार...मी नानिवडेकर बोलतोय्‌...आपण कोण?"
पलीकडून खरोखरीच एक मधाळ गोड बायकी आवाज कानावर आदळला...!!! ...धन्य हो इंदिराजी !!  
,"नमस्कार सर...मी अर्चना बोलतेय्‌...एक्साईड बॅटरीज्‌ कंपनीच्या ऑफिसमधनं... ...’आर्य’ सरांना जरा तुमच्याशी बोलायचं आहे...जरा थांबा हं सर एक मिनिट...मी फोन देते त्यांना"
," नमस्कार नानिवडेकर सर...आपली ओंळखपाळख नाही यापूर्वीची...मी विशाल आर्य बोलतोय्‌...एक्साईड मध्ये मी प्रभागीय ग्राहक सेवा आणि तांत्रिक खात्याचा प्रमुख (रीजनल मॅनेजर - कस्टमर सर्व्हिस ऍण्ड टेक्नॉलॉजी) म्हणून काम करतो."
आवाज चांगलाच तरूण अन्‌ खिलाडूही वाटत होता... ...
मी," नमस्कार...बोला, काय काम होतं आपलं माझ्याकडं?"
विशाल," सर...आपली हरकत नसेल तर आपल्याला भेंटायचं होतं जरा...चालेल ना?"
मी," अहो चालेल ना? म्हणून काय विचारताय्‌?...चालेल की...बरं काम तरी काय होतं आपलं?"
विशाल," तसं काम कांही नाही... ...पण भेंटावंसं वाटतंय्‌ म्हणून फोन केला...कुठं भेटूं शकतो आपण? आणि आज जमेल कां सर?...आज रविवार आहे ना, म्हणून विचारलं... ..."
मी," आर्यजी...आपण खेळाडू आहांत काय?... ...क्रीडा मैदानं गाजवलेले दिसताय् आपण..."
विशाल," माय गॉड!!!...मी फुटबॉल खेंळतो सर... ...पण तुम्हांला कसं काय माहीत ते?"
मी," मला कसं ते माहीत असेल?...तुमच्या आवाजावरून वाटलं तसं म्हणून म्हणालो आपला, इतकंच काय ते..." 
मी मग विशालजी ना घरीच यायला सांगितलं... दुपारची चारची वेंळही ठंरवली, अन्‌ फोन ठेंवला.
सौ. इंदिराजी शेंजारी उभ्या होत्याच," काय म्हणत होती ’जपानी बाहुली’?" !!
आतां मी पण उट्टं काढायची संधी सोडली नाही," कुठं भेंटायला जमेल?, असं विचारत होती !!... समजलं?"
पण हार मानतील तर त्या आमच्या इंदिराजी कसल्या?
म्हणाल्या," इथंच बोलावलंय्‌ ना तिला?...बरं झालं"
मी,"म्हणजे?"
सौ. इंदिराजी," म्हणजे बोलणं इतकं मधाळ, तर गांठभेंट कशी गुळाच्या चिक्कीसारखी ’चिकट-गोड’ होतेय्‌ ते मलाही बघायला मिळेल...!!!...समजलात?"
मी कपाळावर हात मारून घेत तत्परतेनं अंघोळीला मोरीकडं पळालो.!!!

ठंरल्याप्रमाणं बरोबर चारच्या आसपास घराची घण्टी खंणखंणली...
दार उघडलं, तर एक चाळिशीची, कमावलेल्या देहाची, खिलाडू पेहरवातली हंसतमुख व्यक्ति दरात उभी होती...!!!
मी," या या मि. आर्य...बसा बसा... ...म्हणजे..."
मला मध्येच तोंडत विशालजी म्हणाले," नुस्तं ’विशाल’ च म्हणा सर...बरं वाटेल मला... ...पण खरंच तुमची कमाल आहे सर... ...तुम्हांला कसं काय कळलं की मी खेळाडू असेन म्हणून?"
मी," अहो माणसाचा आवाज बरंच कांही सांगून जात असतो...त्यात विशेष काय एव्हढं?"
विशाल,"विशेष नाही कसं सर?...अहो जन्मांत प्रथमच भेंटतोय्‌ आपण...पण त्याचं काय आहे सर, की माझी ही भेंट वाया जाणार नाही, असा अंदाज होता माझा... ...आतां खात्रीच पटली बघा"
मी," म्हणजे?...हं सांगा आतां... ...काय काम होतं तुमचं?"
विशाल नं एका झंटक्यात माझाच त्रिफळा उडवला,"त्याचं काय आहे सर...खरं सांगायचं तर... ..."
मी," अहो अगदी मोकळेपणानं बोला...माझ्या घरींच बसलाय्‌ तुम्ही"
विशाल,"सर...प्रत्यक्ष उत्पादक कंपनीच्याच चांचणी अहवालालाला एकहातीं आव्हान देऊन तो सफाचट लोळवणारी व्यक्ति प्रत्यक्ष्यात कशी आहे, ते बघायचं होतं, म्हणून फोन केला तुम्हांला..."!! 
मी कपाळाला हात लावला !!!," धन्य आहे...अहो नुस्तं मला बघायलाच आलांत की काय तुम्ही इथं?...ऑं?"
विशाल," नुस्तं बघायलाच नाही सर... ...शंकाही आहेत. !!"
मी," म्हणजे?"
विशाल," आपण काय करतां सर?... ...म्हणजे...असं की"
मी," समजलं मला...मी ’टाटा मोटर्स’ मध्ये नोकरीला होतो गेली तीसएक वर्षं... ...आतां सेवनिवृत्तीनंतर मी ’नियंत्रित कॉंक्रीट सल्लागार’ ( कंट्रोल्ड्‌ कॉंक्रीट कन्सल्टंट ) म्हणून सध्या स्वतःचा व्यवसाय करतो."
विशाल," म्हणजे आपण ’स्थापत्य अभियांत्रिकी’ वाले आहांत?"
मी," होय."
विशाल,"म्हणजे आतां घोळ आणखी वाढलाच...सर मग जर असं आहे, तर आपल्याला कसं काय समजलं की ती विजेरी संपलेली होती म्हणून? माझ्या आख्ख्या कारकीर्दीत ही अशी पहिलीच घटना मी पाहिलीय्‌...अहो आमच्या प्रयोगशाळेतले तज्ञही सुन्न झाले ती खंपलेली विजेरी बघून... ...म्हणून विचारतो...आतां समजलं कां मी भेंटायला यायचं कारण?"
मी," अहो त्यात काय एव्हढं? मी इलेक्ट्रॉनिक्स्‌ आणि सॉफ्टवेअर या शाखांचा पण पदवीधर आहे... ...एव्हढंच काय ते कारण आहे त्याला"
विशाल नं आतां कपाळाला हात लावला," असं कसं काय सर?"
मी," म्हणजे काय?"
विशाल," म्हणजे असं बघा सर...स्थापत्य...आणि हे इलेक्ट्रॉनिक्स्‌ आणि सॉफ्टवेअर वगैरे... ...असं कसं काय होईल सर...ऑ?"
आतां मात्र मी च कपाळाला हात लावला," अहो ते ’तसं’ च आहे...मी स्वतःच सांगतोय्‌ ना तुम्हांला?"
विशाल,"तुम्ही सांगताय्‌ म्हणजे कदाचित असेलही तसं... तसं बघितलं तर मला जवळपास खात्री होतीच, की आपली भेंट वाया जाणार नाही म्हणून...पण माफ करा सर...खरं वाटत नाही हे...अहो हे असं कसं काय आहे तुमचं सगळं?
मी," अहो टाटा मोटर्स मध्ये मी स्थापत्य अभियांत्रिकी भले केली असेल आयुष्यभर, पण मला सांगा, इतर अभियांत्रिकीतलं शिक्षण घ्यायला तर कांही अडचण नव्हती ना मला?... ...होती हौस, म्हणून तेही केलं...आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात एव्हढं? तेही ज्ञान हे असं कधीतरी कुठंतरी उपयोगी पडलंच की...ज्ञान कधी वाया जातं कां सांगा मला?" 
विशाल,"आतां तुम्ही स्वतःच सांगताय्‌ त्यामुळं अविश्वास तर दांखवता येत नाहीय्‌ मला... ...पण अजूनही मला हे अविश्वसनीयच वाटतंय्‌ बघा सर... ... अहो एखाद्यावेळी इलेक्ट्रॉनिक्स्‌ आणि कॉम्प्युटर म्हटलं तर कांहीतरी जुळण्या-पटण्यासारखं आहे असं मानतां येईल कदाचित...तेही अगदी अपवाद म्हणून...पण स्थापत्य आणि हे सगळं?... ...अहो कसं काय होईल हे असं?"

आतां ह्या खेळाडूची सफाचट खात्री पटवायची मला एक नामी शक्कल सुचली...
मी मग विशालजी ना ," आलोच हं...बसा एक मिनिटभर" असं सांगून माझ्या अभ्यासिकेच्या कपाटात जतन करून ठेंवलेल्या तिन्ही अभियांत्रिकी शाखांच्या पदवी प्रमाणपत्रांच्या तसबिरींच बाहेर आणून त्याच्या हातात देत गंमतीनं म्हटलं,"हे पुरावे बघा विशालजी... ...पटली खात्री आतां?"
विशालजी नी आतां मात्र खरोखरीच स्वतःच्या कपाळाला हात लावला," सर... पण असं कसं काय केलंत तुम्ही?... ...अहो विद्युत्‌ अभियांत्रिकीच्या पदवीची एक बायको मिळवतां मिळवतां पुरे झालं आम्हांला !!!...
आतां तसं म्हणायला ’एम. बी. ए.’पण केली नंतर मी...पण तसं बरेच जण करतात...पण हे मात्र तुमचं सगळं विचित्रच आहे सर..."
मला मग त्या मनमोकळ्या हाडाच्या खेळाडूला मस्त टांग मारायची एक कल्पना सुचली...
मी," विशालजी...हे स्थापत्य अभियांत्रिकीचं प्रमाणपत्र नीट बघा जरा...काय लिहिलंय्‌ त्यात?"
विशालजी नां कांही कळेना. ते प्रमाणपत्र बघत म्हणाले," सर तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी चे पदवीधर आहांत असं लिहिलेलं आहे ह्यात नेहमीसारखंच"
मी," म्हणजेच दुसर्‍या भाषेत सांगायचं तर ह्यावर असं लिहिलंय्‌ की,’ह्या गृहस्थाला स्थापत्य अभियांत्रिकीतलं कांहीतरी समजतं’...होय की नाही?
विशाल," बरोबर आहे सर तुमचं"
मी मग टांग मारली," आतां मला असं सांगा की ह्यावर असं कुठं कांही लिहिलंय्‌ कां, की ’ह्या गृहस्थाला स्थापत्य अभियांत्रिकी व्यतिरिक्त इतर कश्यातलंच कांहीही समजत नाही’ म्हणून?...ऑ?"

आतां मात्र विशालजी मधला अस्सल खेंळाडू बाहेर आला...
आणि ते मला कडाकून टांळी देत पोंट धंरून खदांखदां हंसायला पण लागले...!!!
अन्‌ आतां तर ते चक्क त्यांच्या मातृभाषेत-म्हणजे हिंदी- तही बोलायला लागले.
," क्या बात है सर...जवाब नही आपका... ...बहोत खूब...बहोत खूब!!...ही: ही: ही: ही:..." 
मग डोंळ्यातलं पाणी टिपत हंळूच सौ. इंदिराजीं कडं बघत म्हणाले," चाचीजी...अगर आप बुरा ना माने, तो एक सवाल पूछ सकता हूं आपको?"
सौ. इंदिराजी ना कांही कळेना...," हं विचारा..."
अन्‌ कधींकाळीं मैदानं गाजवलेल्या त्या जातिवन्त खेळाडू नं माझ्या तिन्ही पदव्यांचा प्रमाणपत्रांकडं बोंट दाखवत सौ. इंदिराजीनां च बेदम टांग मारली," गुस्सा मत कीजिये चाचीजी, हमारे मजाक पर... ...
लेकिन मैने अभी अभी कहा था ना चाचीजी...की ’इलेक्ट्रिकल इंजिनियरी’ की एक बीबी पटाते पटाते पसीना पसीना गो गये थे हम... ...
लेकिन आपको, आपके ये साहब को पसंदी अदा करते वख्त ये पता कैसे नही चला, की साब पहलेसे ही ये तीन तीन बीबियां कर बैठे है? !!!"
आतां मात्र मी पण विशालजींतल्या जातिवन्त खेळाडूला फाड्‌दिशी टाळी देत खदांखदां हंसायला लागलो...!!!!
आणि खुद्द सौ. इंदिराजी नी च त्याच्याकडं ’खाऊं की गिळूं’ नजरेनं बघत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला...!!!!!

निघतांना विशालजी नीं सौ. इंदिराजी नां आदरानं नमस्कार केला, अन्‌ आम्हां उभयतांना म्हणाले," अच्छा सर...अब रजामन्दी की आग्या चाहता हूं...
मग सौ. इंदिराजीं कदं निर्देश करीत मला म्हणाले," सर...इन्हे ’चाचीजी’ बनाया है हमने...आशा करता हूं की ये दिलचस्प दोस्ती का रिश्ता हमेशा पक्का बनकर रहेगा..."
मी," अजी क्यूं नही रहेगा भय्या?...आप खुद भी तो बेहतरीन दिलचस्प हस्ती है ना..."
विशालजी," अच्छा सर...गुडनाईट...आपकी नयी बॅटरी ठीक तो चल रही है ना?...अगर कुछ तकलीफ हो तो मुझे फर्माइयेगा जरूर" असं म्हणत त्यानं त्याचं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात ठेंवलं... ...
आणि तेव्हां माझी ट्यूब भक्क्‌दिशी पेंटली... ...नवी विजेरी अजून आलेलीच नव्हती...!!!
आतां ते रामायण बाहेर काढून झालेल्या उत्तम भेंटीगांठीचा मला विचका करायचा नव्हता...
बोलायला तोंड उघडत असलेल्या सौ. इंदिराजी नां गप्प रहायची खूण करीत मी विशालजी नां म्हटलं," बॅटरी तो अभीतक हाजिर नही हुई है विशालजी...तो कैसे चल रही है ये कैसे बता सकता हूं मै आपको?"
आतां विशालजी नी च आपल्या कपाळाला हात लावला," क्या बात करते है आप सर?...ये कैसे हो सकता है?... ...
हम तो कभीकी नयी बॅटरी भेज चुके है डीलर के पास... ...कल सुबह मै ही उसको फोन करके सब पता लगाकर कल ही बॅटरी आपके पास भिजवाने का इंतजाम करता हूं सर... बेफिक्र रहिये आप...अच्छा सर, चलता हूं मै"

विशालजी नीं उंबर्‍याबाहेर पाऊल टांकून दार लोटून घेतांक्षणींच सौ. इंदिराजीं चा दाण्डपट्टा सुटला," आत्तां च्या आत्तां फोन लावा त्या संदीप ला, अन्‌ चांगली बिनपाण्यानं हजामत करून ठेवा मेल्याची... ...जहागिरी वाया चालल्यायत्‌ ह्यांच्या.."!!!
पण एव्हांना साडेसहा होत आलेले होते...
मी म्हटलं," हे बघा...आतां साडेसहा होत आलेले आहेत...आणि संदीप आतापावेतों दुकान बंद करून घरीं निघून गेला असणार... ...तेव्हां आतां उद्या सकाळीच जाऊन काय तो निकाल लावून येतो... ...चालेल?
सौ. इंदिराजी," चांगला फोंडून काढा मेल्याला...इथं एक्साईड कंपनीचा रीजनल मॅनेजर घरी येऊन चौकशी करतोय्‌ आपली, अन्‌ हे छत्रपती बसले असतील दुकानात सिंहासन उबवत...चांगली मस्ती उतरवून ठेवा त्याची... ...आणि हे नसेल जमणार तुम्हांला, तर मी च येते बरोबर...समजलं?"
मी कळ काढायची संधी सोडली नाही," समजलं मला सगळं...कांही काळजी करूं नका तुम्ही... ...संदीप ला फांसावर लंटकवायचा असेल, तेव्हां तुम्हालाच बरोबर घेऊन जातो मी !!!... ...ठीक?"
आणि सौ. इंदिराजी नी हातातली तस्बीर टाळक्यात हाणायच्या आतच, मी चपळाईनं पायांत चपला संरकवून माझ्या सायंफेरीला बाहेर पडलो...!!

चालतां चालतां डोंक्यात विचार चालूं झाले...
"उद्या सकाळी, आधी फोन करून आगाऊ वर्दी न देतांच ह्या संदीप ला घेरायला हवा...नाहीतर आपण येतोय्‌ असा वास जर कां लागला, तर तो टांग मारून, दुकानात एखादं पोरगं बसवून पसार व्हायला वेंळ लागणार नाही... ..."

दुसर्‍या दिवशी सकाळची सगळी कामं भराभरा आंवरून, आणि सौ. इंदिराजी नी वाढलेला ताटभर नाष्टा हांदडून, मी नवालाच संदीप चं ’गुडविल बॅटरी सर्व्हिसेस’ गांठलं... ...
बघतो तर संदीपचा पत्ताच नव्हता, अन्‌ दुसरीच कुणीतरी एक रुबाबदार चेहर्‍याची व्यक्ति त्याच्या फिरत्या खुर्चीत बसलेली होती...!!
अन्‌ गम्मत म्हणजे ही व्यक्तीपण देहबोलीवरनं जातिवन्त खेळाडू च वाटत होती...!!
बहुधा श्रीमहालक्ष्मीनं च माझ्या जन्मपत्रिकेत ’खेळाडू मेलन योग’ लिहून ठेंवलेले असावेत !!!
मी," नमस्कार...मी नानिवडेकर... ..."
रुबाबदार," नमस्कार  नमस्कार साहेब...या या बसा... ...बोला, काय काम होतं आपलं?"
मी," संदीप कुठं आहे?...त्याला भेंटायचं होतं जरा... ..."
रुबाबदार,"अहो मग मला भेंटा की साहेब...चालतंय्‌"!!!
मी हंसलो," आपण?"
रुबाबदार,"मी संदीपचा थोरला भाऊ साहेब... ...कुशल...संदीप चार दिवस परगांवी गेला आहे, म्हणून दुकान मी च बघतोय्‌ सध्या... ...काय काम होतं आपलं?"
आतां माझी ट्यूब भंक्क्‌दिशी पेंटली... ...म्हणजे मी पंधरादिवसांपूर्वी नवी बॅटरी आली की ती लगेच पांठवून द्यायला सांगायला केलेला फोन घेणारा कुशल हाच तर... ...!!
आणि आतां पंधरा दिवसांनी मलाच साळसूदपणे विचारतोय्‌ लेकाचा ’काय काम आहे’ म्हणून...!!!
आतां मात्र माझं टाळकंच सटकलं," त्याचं काय आहे कुशलजी, की खुद्द ’एक्साईड’ कंपनीपेक्षां मोठ्ठा छत्रपति झालेला हा डीलर कोण आहे ते बघायला आलो होतो !!!... ...समजलं?"
कुशलजी नी आतां आं वांसत कपाळावर हात मारून घेतला...!!!," क्‌...काय झालं साहेब?"
मी तंडकलो," काय झालं म्हणून मलाच विचारताय्‌ तुम्ही...ऑं?... ...पंधरा दिवसांपूर्वीं तुम्हीच घेतलात ना माझा फोन ?... ...आणि मी दावा केलेली नवी बॅटरी आली रे आली, की ती लगेच पांठवायला सांगतो संदीप ला, असंही म्हणाला होतात ना मला?... ...काय झालं त्याचं?"
कुशल," त्याचं काय झालं साहेब... ..."
," हे बघा कुशलजी...हे ’त्याचं काय झालं’ चं कीर्तन दुसर्‍या भोंट गिर्‍हाइकांना ऐकवा...समजलं?!!!
  काय झालं दावा क्रमांक ७८९४२ चं पुढं?"
रुबाबदार कुशल आतां चांचरायला लागला," अहो साहेब...तुमचा निरोप दुसर्‍या क्षणीं मी दिला संदीप ला फोन करून... ...मला ह्या दुकानातलं कांहीही माहीत नाही...संदीपच बघतो हे सगळं...तो परगांवी गेलाय्‌ म्हणून रजा कांढून मी हा असा नोकरीवाला माणूस हे सांभाळतोय्‌ बघा फक्त सध्या... ..."
मी," ह्या तुमच्या फोनवर तोण्डभर आश्वासनं देऊन, फोन संपला, की त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या उद्योगाला ’दुकान सांभाळणं’ म्हणतात काय कुणी?"
कुशल," साहेब... ... अहो माझं ऐकून तरी घ्या थोडं... ..."
मी,"तुमचं थोडं काय ते मी पंधरा दिवसांपूर्वीच फोनवर ऐकून घेतलंय्‌... ...काय?...आतां आणखी कणभरही ऐकायची तयारी नाही माझी... ...समजलांत?... दाव्याचं काय झालं तेव्हढं बोला फक्त..."
कुशल,"हो...हो...हो...बघतो साहेब... ...आत्तां च्या आत्तां बघतो...झालं ना?...पण तुमच्या हातातलं दांडकं तेंव्हढं खाली ठेवतां काय  जरा?... ...काय झालंय्‌ की अंग फारच दुखायला लागलंय्‌ आतां, म्हणून म्हटलं... ...!!!"
हा गडी पक्का खेळाडू आहे अशी आतां माझी खात्रीच पटली, अन्‌ मी निरुत्तर होत त्याच्याकडं नुस्ताच बघत बसलो...
आपण ह्याला उगीचच झोंडपला की काय असंही जरासं वाटायला लागलं... ...
कुशल," साहेब चहा घेणार काय थोडा?... ...की कांहीतरी थण्ड चालेल?"
मी," हे बघा कुशलजी... ... ...मी ’ह्या खुर्चीत बसलेल्या कुशल’ ना बोलतोय्‌... ...नुस्त्या ’कुशल ढोणे’ ना नव्हे...!!...नुस्त्या ’कुशल ढोणे’ बरोबर माझं कसलंही भाण्डण नाही...काय?... ...
आणि नुस्ती गरम-थण्ड पेयं टाळक्यावर ओंतून घेऊन थण्ड होणारा माणूसही मी नव्हे !!... ...समजलं?... ...चहाबिहाचं राहूं द्या...बॅटरी चं काय झालं तेंव्हढं बोला फक्त..."
आतां मात्र कुशल हंसायलाच लागला... ...म्हणाला," साहेब...कठीणच दिसतंय्‌ सगळं तुमच्या ऑफिसातल्या माणसांचं...!!!
अहो, बॅटरी कुठं पळून जातीय्‌ काय सांगा मला? आतां तरी ते हातातलं दांडकं जरा ठेंवाल की नाही बाजूला?... ...
अहो थोडा चहातरी घ्याल की नाही माझ्याबरोबर, इतका मार खाऊनही म्हणतोय्‌ म्हणून तरी?... ...ऑं?"
आतां मात्र माझी मलाच लाज वाटायला लागली... ...हा गडी खरंच मनानं दिलदार दिसत होता.!!!
मी मग हातातला सोटा फेंकून देत म्हटलं,"सॉरी कुशलजी... ...मला गलथनपणा अजिबात खपत नाही, म्हणून बोललो इतका... ...राग मानूं नकां...चालेल...मागवा चहा...घेऊं या बरोबर."
कुशल नं मग दोन ’पेश्श्यल’ आणायला पोर्‍याला पिटाळला.
आणि भराभर रजिस्टरं चांळून दावा क्रमांक ७८९४२ ची बॅटरी बारा दिवसांपूर्वीच आलेली आहे असंही सांगितलं...
मग समोर आलेला चहा पीत मी त्याला म्हणालो," आतां मला सांगा कुशलजी, मी तुम्हांला जर असं विचारलं की ’स्पष्ट निरोप दिलेला असूनही गेले पंधरा दिवस संदीप काय करत होता?’ म्हणून, तर मला काय उत्तर देणार आतां तुम्ही?"

तेंव्हढ्यात टेबलावरचा दूरभाष वाजला, आणि कुशलजी नी तो उचलला...," हॅलो...कधी पोंचलास घरीं?... ...जेवण बिवण ठेंव बाजूला, आणि दुकानांत ये झंटकन्‌‍... ...एका मेजवानीला जायचं आहे आपल्याला...काय?...ठीकाय्‌...ये लगेच...मी थांबलोय्‌ खोळंबून वाट बघत तुझी..."

मी," संदीप आला की काय गावाहून परत कुशलजी?...आणि पार्टीचा बेंत आखलाय्‌त की काय भावाभावानीं मिळून?"
विशाल मग दिलखुलास हंसत म्हणाला," पार्टी?...आतां कसली ’जंगी पार्टी’ खायला घालतो ह्या भडव्याला ... ते बघाच साहेब तुम्हीपण !!!...काय?"
मी आतां हेलपाटलोच," म्हणजे काय?"
कुशल," अहो आत्तांच ’मिनी पार्टी’ दिलीत नां तुम्ही मला? आणि त्यादिवशी जसा तुमचा निरोप मी तत्क्षणीं त्याच्यापर्यन्त पोंचवला, तशी ही ’पार्टी’ पण नको काय त्याच्यापर्यंत पोंचवायला?
आतां बघाच साहेब कसली ’जंगी पार्टी’ खिलवतो ह्या बेण्याला ते ... ...साधा दिलेला शब्द पाळतां येत नाही, आणि बॅटरीचं दुकान थांटून बसलेत छत्रपति..."
कुशलजीं च्या आवाजाला आतां एकप्रकारची ’पोलिसी धार’ चंढलेली मला जाणवली, आणि पुढचं सगलं महाभारत डोंळ्यापुढं स्वच्छ दिसायला लागलं...!!!

तेंव्हढ्यात ’छत्रपति संदीप’ ची स्वारी दाखल झालीच... ...
आणि दुसर्‍या क्षणीं हे कुशलजी त्याच्यावर असे कांही तुटून पडलेत म्हणतां, की पिसाळलेला वाघ पण परवडला...!!!!
बिचार्‍या संदीपचा त्यांनी अक्षरशः चेन्दामेन्दा कंरून ठेंवला, आणि हातांत झाडू देऊन त्याला सगळं दुकान पण झाडायला लावलं...!!!... ...शेंवटी मी च मध्ये पडून ते महाभारत थांबवलं एकदाचं...

मी मग कुशलजी बरोबर हस्तांदोलन करीत त्यांचा ( आणि संदीपचा ही) निरोप घेतला, अन्‌ जायला निघालो, तेंव्हढ्यांत टेबलाशेंजारच्या तिपाईवर ठेंवलेल्या ’महाराष्ट्र पोलीस’ असं मानचिन्ह मिरवत असलेल्या शिरस्त्राणाकडं माझं लक्ष गेलं, अन्‌ मग सगळ्या महाभारताचा मला क्षणांत उलगडा झाला... ...हे कुशलजी बहुतेक पोलीस खात्यातच नोकरीला असावेत.
मी त्यांना विचारलं," कुशलजी, आपण पोलीस दलात नोकरी करतां काय?...म्हणजे...हे शिरस्त्राण दिसलं म्हणून विचारतो"
आणि क्षणार्धात माझा सफाचट त्रिफळा उडवत कुशलजी उत्तरले," होय साहेब... ...मी औरंगाबादला गुन्हे अन्वेषण विभागाचा सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतो !!!!"
अन्‌ मी दुसर्‍याक्षणीं, माझ्याकडं दिलखुलास हंसून बघणार्‍या कुशलजीं कडं सुन्न होऊन आं वांसून बघत स्वतःच्या कपाळावर फाड्‌दिशी हांत मारून घेतला... !!!!!
पुढं तासाभरातच आमच्या नवीन स्नुषा ’विजेरीबाई’ घरीं पोंचल्या, आणि स्थानापन्न ही झाल्या एका झंटक्यात...!!!
ही हमाली पण दस्तुरखुद्द ’छत्रपति संदीप’ नां च जातीनं करावी लागली...हे सांगणे नलगे.

तेव्हांपासून ही ’विशाल-कुशल’ ची दुक्कल माझ्या अगदी जंवळच्या मित्रातली...नव्हे आमच्या घरांतलीच झालेली आहे असं म्हटलंत तरी चालेल. कारण हे दोघेही जेव्हां पुण्यात मुक्कामाला असतात, तेव्हां आवर्जून घरीं भेंट देऊन जातात.
आमच्या सौ. इंदिराजी नां सख्खा भाऊ नाही... ...तें स्थान पण हे कुशलजी आतां बळकावून बसलेले आहेत... ...
भाऊबीजेला आंठवणीनं घरीं जेवायला येतात, अन्‌ नारळीपौर्णिमेला राखीही बांधून घ्यायला येतात अगदी हक्कानं... ...
मी म्हटलं नव्हतं तुम्हांला पहिल्या भागांत, की धर्मयुद्धं लढणारे जिंकले अथवा हरले, तरी जिता-जेत्यांचं स्वत्त्व शाश्वतपणे अबाधित राहतं म्हणून? 
ते हे असं असतं सगळं... ...
धर्मयुद्धांचा निकाल कुणाच्याही बाजूनं लागो...
तीं लढणारे, ही युद्धं जिंकोत अथवा हरोत... ...
ते माणसं मात्र कायमची जिंकून घेत असतात... ...अगदी बघतां बघतां.!!!

*****************************************************************************************
--रविशंकर.
१९ मे २०१५.

No comments:

Post a Comment