Search This Blog

Saturday 2 May 2015

॥ विजेरीचे झंटके ॥

॥ विजेरीचे झंटके ॥


    [ भाग - १ ] 





" पेढे घ्या मास्तर", म्हणत मी मास्तरांच्या हातात पेढ्यांचा भरगच्च पुडा दिला, अन्‌ वांकून माझ्या आद्यगुरूंचे श्रद्धेनं पाय धंरले... ...
" समृद्धो भंव !!" टिकेकर मास्तरांनी तोण्डभंरून आशीर्वाद दिला...
मग स्वयंपाकघराकडं वळून माई नां ( मास्तरांच्या सौ.), म्हणाले," ऐकलंत कां?... ...जरा चहा घेऊन बाहेर या लगेच... ...आपल्या ’ऍरिस्टॉटल’ चं कौतुक करायला... ..."
मग मोठ्या मायेनं मला शेंजारी बसवीत विचारते झाले," हं बोला छळवादी... ...पेढे कश्याचे?"
हे माझे गुरू आमच्या दोघांतल्या संवादात मला कायम ’छळवादी’ म्हणूनच संबोधायचे... ...
मी सदा न्‌ कदा त्यांना नाना प्रश्न विचारून भण्डावत असल्यानं त्यांनी मोठ्या प्रेमानं ही पदवी मला बहाल केलेली असावी बहुतेक. !!
मी," दोन कारणांसाठी पेढे आणलेत मास्तर... एक म्हणजे प्रथम वर्ष बी. एस्सी. ला शहात्तर टक्के गुण मिळाले."
मास्तर," छान... ...आणि दुसरी पताका कुठली फडकवलीस?"
मी," पुण्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वार्हतेवर प्रवेश मिळालाय्‌, अन्‌ शिष्यवृत्तीही मिळालीय्‌... ..."
मास्तरांचा चेहरा विलक्षण खुलला, अन्‌ आपल्या पहिलवानी पंज्यानं माझी पांठ धंपाधंप्‌ थोंपटत म्हणाले," अरे वा उत्तम...धन्य वाटेल अशी गुरुदक्षिणा दिलीस बघ मला... ...", मग माई नीं पुढ्यात ठेंवलेल्या कपाकडं निर्देश करीत म्हणाले," घ्या... ...चहा घ्या... ...थंड होईल..."
मी चहाचा कप तोंडाला लावत म्हणालो," मास्तर... ...एक विचारूं?"
मास्तर हंसत उत्तरले," मला छळल्याशिवाय कसा राहशील तूं?... ...विचार.!!!"
मी," मास्तर, तुम्ही एकटेच असे आहांत जे मला ’समृद्धो भंव’ असा आशीर्वाद नेहमी देतां. बाकी इतर सगळ्यांकडून ’आयुष्मान्‌ भंव’, ’यशस्वी भंव’, ’सुखी भंव’ असंच ऐकायला मिळतं... ... ...’समृद्धो भंव’ म्हणजे नेमकं काय भंव?"
मास्तरांनी नेहमीच्या खाक्यानुसार मला प्रतिप्रश्नाची धोबीपछाड मारली," हयातभर अखण्ड शिकत राहिलास, तर समजेल की नाही?"
मी कपाळाला हात लावला. !!
मास्तर," हे बघ ऍरिस्टॉटल, आतां परगांवी निघालाय्‌स...इथून पुढं स्वतःच्या धंमकीवर शिकायचं आहे तुला... ...समजलं?"
मास्तरांनी शिकवलेलं कांही समजलेलं नाही अशी सुतराम शक्यता नव्हती...!! तेव्हां मी मान डोलावली, " हो...समजलं मास्तर."
मास्तर पांठीवर मायेनं हात ठेंवत म्हणाले," इतकं सोपं नसतं ते... ... आतां परगांवी निघालाच आहेस, तर बरोबर कांही शिदोरी द्यायला हवी ना तुझ्या?"
मी," मास्तर, अहो हयातभर पुरून उरेल इतकी शिदोरी तुम्ही अगोदरच दिलेली आहे की... ...अजून काय राह्यलंय्‌?"
मास्तर," ती पुस्तकी शिदोरी... ...आतां तीन गोष्टी सांगतो त्या कायमच्या लक्ष्यांत ठेंव... हवंतर वहीत टिपून ठेंव घरीं गेलास की... ...काय?"
मला कांहीतरी वेगळं जाणवलं... ...आतांपर्यंत फक्त प्रतिप्रश्नांचा भडिमार करून मला सतत पिदडणारे गुरू, प्रथमच कांहीतरी सरळ सांगत होते...
मी कान टंवकारले... ...
मास्तर," पहिली गोष्ट म्हणजे आयुष्याचं जर सार्थक करायचं असेल, तर श्रीमन्ती आणि समृद्धी ह्या दोन्हीतला फरक ओंळखायला शीक..."
मी मनांत नोंद केली... ...मास्तरांच्या बोलण्यांत व्यत्यय आणण्यात अर्थ नव्हता... ... ...
मास्तर," दुसरं असं की आतां जी पहिली गोष्ट सांगितली ना तुला, तिचा पूर्णांशानं उलगडा व्हायचा असेल, तर हयातभर अखण्ड शिकत रहा... ...
नेहमी लक्ष्यांत ठेंव ’नॉलेज इज पॉवर, ऍण्ड्‌ ऍब्सोल्यूट नॉलेज इज ऍब्सोल्यूट पॉवर’... ...समजलं नीट?"
मी," होय मास्तर...समजलं."
मास्तर," आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट... ...प्रत्येक माणसाच्या आयुष्यांत त्याचा कस पणाला लावणारे प्रसंग येतातच...त्यांना सत्त्वपरीक्षा असं आपण म्हणतो... ...
कांहीकांही प्रसंग तर असेही असतात, की होत्याचं नव्हतं व्हायची वेंळ येते... ...अश्या प्रसंगात एक गोष्ट पक्की लक्ष्यात ठेंव... ... ..."
मी," ती काय मास्तर?"
मास्तर," निष्कलंक विशुद्ध चारित्र्याची ढाल, अन्‌ स्वत्त्वाची पाजळलेली तलवार परजत किडमिड्या जरी मैदानात उतरला, तरी भल्या भल्या हिन्दकेसरीवरही बघतां बघतां मैदान सोडून पळ काढायची वेंळ येते... ...अक्षरशः पांठीला पाय लावून... ... ...समजलं नीट?"
मी," समजलं थोडंसं, पण नीटसं नाही मास्तर... ... समजावून सांगा जरा विस्तारानं... ..."
मास्तर हंसले," मास्तर काय जन्माला पुरणार आहेत काय छळवादी?"
माझे डोंळे पाणावले," असं कां म्हणताय्‌ मास्तर?... ...तुमचा केव्हढा आधार वाटतो मला... ...अगदी डोंगराएव्हढा...!!!"
मास्तर पांठीवर मायेनं हांत फिरवत म्हणाले," हे बघा छळवादी...डोंगरसुद्धां जन्माला पुरत नसतो...!!! ... ...काय? जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला कधी ना कधी स्वतःच्या दंडातलं वा पंखातलं बळ अजमावून बघावंच लागतं... ...समजलं?
... ...मी सांगितलेली ही तीन जीवनमूल्यं आयुष्यभर जर जिवापाड जपलीस ना,... ...तर तुला कधीच अपयश किंवा पराभव पत्करावा लागणार नाही... ... नामुष्कीचं तर नांवच सोड... ...माझे आशीर्वाद आहेत तुला."
मी," मास्तर, हे एव्हढं नितान्तसुंदर तत्त्वज्ञान विस्तारानं कुठं वाचायला मिळेल हो?"
मास्तर," जीवनदान मागायला समोर उभ्या असलेल्या जिवन्त असणार्‍या शेवटच्या पोटच्या पोराला, ’यतो धर्मस्ततो जयः’ असं ठंणकावून बजावत जीवनदान द्यायला ठामपणे नकार देणार्‍या, शाश्वत सद्धर्माची अधिष्ठात्री असलेल्या, प्रत्यक्ष भगवन्ताच्या आठव्या अवताराचाही ललाटलेख लिहायचं आणि त्याला तो मुकाटपणे पत्करायला लावायचं दुर्धर्ष सामर्थ्य अंगीं असलेल्या, शक्तिस्वरूपा आभाळमयी गान्धारीचं सर्वोच्च तत्त्वज्ञान सांगतोय्‌ तुला... ...समजलं?"
मी," मास्तर पण महाभारताची अठरा पर्व मीही अथपासून इतिपर्यंत वाचलेली आहेत... ...पण हे असं त्यांत कुठंच वांचल्याचं आंठवत नाही मला."
मास्तर हंसले," महाभारत तूं मुद्रित ओळीबरहुकूम वाचलंस ऍरिस्टॉटल,,, ,,,दोन दोन ओंळींच्या मधल्या जागेत काय लिहिलंय्‌ ते वाचलंस काय?"
मी स्तिमित होत कपाळाला हात लावला.!!...
पुढचे सात जन्म पुरून उरेल एव्हढी शिदोरी मास्तरांनी एका वाक्यात माझ्या पदरांत टाकलेली होती... ...!!!
आणि ’पुनश्च हरि ॐ’ करणं आतां मानगुटीला बसलेलं होतं. !!!  
मी निघतांना परत वांकून मास्तर-माई नां नमस्कार केला... ...माई म्हणाल्या," शतायुषी भंव.", मास्तर मात्र म्हणाले," समृद्धो भंव.!!!"

आज वयाची त्रेसष्ट वर्षं पूर्ण होत आलेली असतांना देखील शक्तिस्वरूपा गान्धारीची ती तीन जीवनमूल्यं मोझेस च्या शिलालेखाइतकी स्पष्टपणे आजही माझ्या मनावर कोंरलेली आहेत...मास्तरांच्या त्या भेटीनंतरच्या उणापुर्‍या चाळीस वर्षांच्या कालखण्डात मी ती जिवापाड जपली... ...आणि त्यांची खणखणीत प्रचीती देणारे शेकडो अनुभवही एकविसाव्या शतकांत घेतले...डझनावारी पण नव्हेत... ...शेंकडो अनुभव घेतले... ... ...!!
ह्या गान्धारीच्या पोंटींच जर जन्म मिळाला असता, तर काय बहार आली असती, असं आज मनापासून वाटतं...
अगदी सरकारी सनदी अधिकार्‍यांपासून ते थेट बलाढ्य संस्थां-उद्योगांपर्यंत नानाविध प्रतिपक्षांविरुद्ध तत्त्वं आणि न्याय्य हक्कांसाठी प्रसंगी एकट्यानं मैदानात उतरून दण्डही थोंपटले... ...
बहुतेक सगळ्याच लढायांत, मास्तरांच्याच शब्दांत सांगायचं, तर ’ हिन्दकेसरीलाही मैदान सोडून कसा पळ कांढावा लागतो’, तेही मी यथेच्छ बघितलं... ...
गम्मत म्हणजे एखाददुसरा अपवाद वगळतां, एकाही लढाईत मला पराभवाचं तोण्ड बघावं लागलं नाही... ...आणि अपवादही जमेला धंरून, एकाही लढाईत नामुष्कीचं तोण्ड तर मुळीच बघावं लागलं नाही.!!!!
आमच्या सौ. इंदिराजी कधीकधी संतापल्या, की मला कुजकट टोलाही लगावतात की ,"आतां तुमचे खुद्द राष्ट्रपतीबरोबरच काय ते चार हात करायचे राहिलेले आहेत...!!!... ...तेव्हढे एकदाचे उरकून घ्या...म्हणजे मी सुटले.!!!"

विशुद्ध चारित्र्य, स्वस्त्त्व, आणि ज्ञान ही तीन शस्त्रं जर व्यवस्थित पांजळलेली असतील, तर भल्याभल्यांनाही किती सहज पाणी पाजतां येतं, ते प्रत्यक्ष अनुभवलं ना की आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटायला लागतं... ...गंमत म्हणून करून बघा कधितरी... ... एक वेगळाच थरार अन्‌ मजाही असते त्यात.
फक्त हे सगळं करतांना दोन कडक पथ्य मात्र मी कटाक्षानं पाळली... ... 
पहिलं म्हणजे मैदानात उतरण्यापूर्वी शंभर टक्के खातरजमा करून घेतली, की नैतिकतेच्या कसावर आपली बाजू पूर्णपणे न्याय्य आहे...
आणि दुसरं म्हणजे हे कायम लक्ष्यात ठेंवलं, की समोरचा प्रतिपक्षी हा त्या मैदानापुरतांच आपला प्रतिपक्षी असतो... ...व्यक्तिगत शत्रू नव्हे.
त्यामुळं झालं असं की एकाही लढाई-झगड्याला नळ कोंडाळ्यावरच्या भाण्डणाचं स्वरूप कधीच आलं नाही... ...
एकजात सगळ्या लढाया धर्मयुद्धांत जमा झाल्या.
एका दृष्टीनं नळ कोण्डाळ्यावरची भाण्डणं म्हणजे एक प्रकारच्या लढायाच असतात, पण ती धर्मयुद्धं कधीच होऊं शकत नाहीत.
कारण धर्मयुद्धांचा अंतिम निकाल कसाही लागला, तरी जेत्यांचं आणि जितांचंही स्वत्त्व शाश्वतपणे टिकून राहतं... ...नळकोण्डाळ्यावरच्या रणांगणावर मात्र ते इतिहासजमा होत असतं... ...पराभव झाला तरी, अथवा जय मिळाला तरी... ... इतकाच काय तो फरक. 
परिणामस्वरूप, कधीकाळीं बाह्या सरसांवून मला भिडलेल्या माणसांतले अनेक महाभाग आज माझे उत्तम विश्वासू मित्र आहेत... ...बरेच घनिष्ठ वर्तुळांतलेही आहेत. !!! 
हा अनुभव मला पुनश्च देणारी, अगदी अलीकडंच... ... म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वीच घडलेली ही मजेशीर कथा... ... ...

त्याचं काय झालं, की एका शनिवारीं सकाळी सकाळीच घरातला दूरध्वनी खंणाणला... ...
सौ. इंदिराजी झोंपेत असल्यानं तो मी उचलला... ...," हॅलो..."
पलीकडून बाळबोलीत आवाज आला," आजो... ए आजो..."
अस्सं... ...म्हणजे खुद्द गुण्डाप्पानंच नंबर फिरवला होता तर............
गुण्डाप्पा म्हणजे आमची चार वर्षांची उपद्व्यापी नात...चि. दीक्षा.
(ह्या गुण्डाप्पाची ओंळख करून घ्यायची असेल, तर ’कृत्तिकात्मक गुण्डाप्पा ’ शीर्षकाची कथा वाचावी.)
मी," काय रे गुण्ड्या?"
गुण्डाप्पा," गुड्‌ मॉर्निंग...!!... तूं काय करतोय्‌स आजो?"
मी," गुड्‌ मॉर्निंग... ...मी चहा पितोय्‌ गुण्डाप्पा"
गुण्डाप्पा," इकडं कधी येणार आजो? आज सॅटर्डे आहे ना?"
मी," आज कसं जमेल रे गुण्डा?"
गुण्डाप्पा," कां ?"
मी," गुण्डा, अरे तुझ्यासाठी ते बोट लावलं की वाजणारं खेळणं बनवतोय्‌ ना?... ... ते झालं नाही ना अजून तयार ...म्हणून."
पलीकडून रडवेला आवाज आला," मला खेळणं नको आजो... ...तूं च पाहिजे खेळायला.!!!"
मी कसलाही मागचा पुढचा विचार न करतां सांगून टाकलं," येतो हं गुण्डाप्पा... ...रडायचं नाही... ... काय ?"
गुण्डाप्पा," किती वाजतां येणार आजो?" 
मी ’तासाभरात येतो, आणि येतांना आंबावडी पण घेऊन येतो’ असं त्याला सांगितलं... ... अन्‌ फोन ठेंवला.
घरांत ढीगभर कामं पडलेली होती... ...
तरी सौ. इंदिराजी नां उठवलं, अर्ध्या तासांत आंवरून निघायचं आहे म्हणून सांगितलं, अन्‌ सुसाट अंघोळीला पळालो. !!
नातवण्डांच्या बाबतीतच आपलं असं कां होत असावं बरं?
एकदां मानसशास्त्रात डोकं घालून बघायलाच हवं... ...

झालं... ...पटापट सगळी आंवराआवर करून, गुण्डाप्पाची आंबावडी खिश्यात टांकली आणि आम्ही एकदाचे गाडीत बसलो... ... 
मी स्टार्टर ची चांवी फिरवली, अन्‌ धाड्‌दिशी मला विजेरीचा पहिला झटका बसला... विजेरीनं मान टांकलेली होती...!!!
स्टार्टर अडकला असेल कदाचित, अशी शंका येऊन मी गाडी जरा पुढंमागं ढंकलून दोनतीन वेळा प्रयत्न करून पाहिला, पण चारचाकीबाई ढिम्मच...
’भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः?’ हा चार्वाकानं समाजाला विचारलेला खडा सवाल मला आंठवला... ...आणि विजेरीबाईं स्वर्गवासी झाल्याचं लक्ष्यात आलं. !!!
सगळीच पंचाईत झाली... ...तिकडं गुण्डाप्पा ’आजो’ च्या वाटेकडं डोळे लावून बसला असणार...मनांत कालवाकालव व्हायला लागली... ...काय करावं कांही समजेना.
मी हंताशपणे सौ. इंदिराजींकडं बघितलं... ...
तेंव्हढ्यात सौ. इंदिराजी म्हणाल्या,"अहो आपल्या इन्व्हर्टर ची बॅटरी लावून बघा की जरा... ...काय बिघडतंय?...गाडी चालूं झाल्याशी कारण... ...काय?"
सौ. इंदिराजींच्या समयसूचकतेची दाद देत मी च आं वांसत कपाळाला हात लावला...!! 
गोंधळून गेल्यामुळं हे मला सुचलंच नव्हतं... ...
गोष्ट अशी होती, की सहा एक महिन्यापूर्वीच जेव्हां इन्व्हर्टर ची विजेरी बदललेली होती, तेव्हां मी अशी कल्पना सौ. इंदिराजींना सांगितली होती, की गाडी ला ज्या प्रकारची विजेरी बसवतात, तसलीच विजेरी आपण इन्व्हर्टरला पण बसवून घेऊं, म्हणजे जेव्हां गाडी ची विजेरी खराब होईल तेव्हां तांतडीचा उपाय म्हणून इन्व्हर्टर ची विजेरी गाडीला बसवतां येईल. यथावकाश मला त्याचं विस्मरण झालेलं होतं, पण सौ. इंदिराजींच्या ती गोष्ट बरोबर स्मरणांत होती. 

पुरुषांनी ह्या एकाच कारणासाठी खुशाल संसारात पडावं...!!!

मी कपाळाला हात लावत परीटघडीचे कपडे उतरवले, अन्‌ पुढील अर्धातास सगळा उद्योग निस्तरला.
आणि सुमारे एक तास उशीरानं आम्ही चि. गुण्डाप्पा कडं जायला निघालो... ... ...
"गाडीची काढलेली विजेरी बहुधा बदलावी लागणार आतां", मी गाडी चांलवत सौ. इंदिराजीं ना म्हटलं.
सौ. इंदिराजी," संदीप ला ( संदीप ढोणे म्हणजे आमचा एक्साईड बॅटरीवाला डीलर), नवीन विजेरी बसवायला सांगायच्या आधी, ह्या जुन्या विजेरीचं बिल शोधून काढा, अन्‌ वॉरण्टी संपली आहे की कसं ते तपासून बघा पहिलं... ...काय?... ...नाहीतर वॉरण्टीतली विजेरी घालवून बसाल..."
मी,"घरीं परत आल्यावर करूं काय ते", म्हणून विषय तिथंच संपवला... ...

चि. गुण्डाप्पाबरोबर हुंदडी घालण्यात आख्खी सकाळ कशी सरली ते कळलं देखील नाही.
लेकीकडं दुपारचं जेवण उरकून आम्ही दुपारी सुमारे चार वाजतां घरीं पोंचलो.
"विजेरी चे कागद बघायचे आहेत", सौ. इंदिराजीनी घरातला रामरगाडा उपसायला पदर खोंचत मला आंठवण केली.
मी वाहनांच्या देखभालीच्या कागदपत्रांची फाईल काढून उलट क्रमानं एकेक कागद बघत गेलो, अन्‌ विजेरी चं बिल हस्तगत होतांच आनंदानं उडीच मारली... ...
विजेरीबाईनी मला दुसरा झंटका दिलेला होता...!! त्या स्वतः जरी स्वर्गवासी झालेल्या असल्या, तरी वॉरण्टी अजून हयात होती...!! वॉरंटी संपायला फक्त अठरा दिवसांचाच काय तो अवधी शिल्लक राहिलेला होता... ... आणि हयात असलेल्या वॉरण्टीमध्ये नवी कोरी विजेरी बदलून मिळायची तरतूद देखील स्पष्टपणे नमूद होती. !!!
बहोत खूब इंदिराजी... ... ...क्या बात है...!!
संसारात मी उगीच पडलो नाही... ...अब आयी बात समझमे?

मी ताबडतोब संदीप ढोणे चा मोबाईल क्रमांक फिरवला... ...
मी," हॅलो संदीप... ...मी नानिवडेकर बोलतोय्‌..."
संदीप," नमस्कार साहेब...कशी काय आंठवण कांढलीत?"
मी," तुझी मुलगी सासरी नांदायला तयार नाही...! तिची माहेरी रवानगी करायचीय्‌...!! केव्हां येतोय्‌स घेऊन जायला?"
संदीप तसा हुषार...," विजेरी झोंपली की काय साहेब?... ...ऑं?"
मी," मग मी काय हवापाण्याच्या गप्पा मारायला फोन केलाय्‌ ?... ...वॉरण्टी अजून जिवन्त आहे...काय ? तेव्हां विजेरी ताबडतोब घेऊन जायला तात्पुरती बदली विजेरी घेऊन कुणाला तरी पांठव लगेच... ...मी घरीच आहे आज."
संदीप," साहेब, अहो विजेरी ला अजून दीड वर्ष पण झालेलं नाही... ...एव्हढ्यात अंगात आलं तिच्या?"
मी," ते काय ते सगळं पोरीच्या बापाला विचारायचं !!... ...ते पण तिची ताबडतोब माहेरी रवानगी केल्यानंतर...!!!... ...कळलं?"
संदीप सटपटला," आज शनिवार आहे साहेब... ..."
मी," मी माझ्या घरीं कॅलेण्डर नाही म्हणून वार विचारायला फोन केलाय्‌ काय तुला?"
संदीप," तसं नाही साहेब...उद्या रविवार असल्यानं दोन पोरं गांवाला गेलेली आहेत, आत्तां दुकानात कुणीच नाही माझ्याशिवाय, अन्‌ तात्पुरती द्यायला बदली विजेरी पण शिल्लक नाही बघा..." 
मी," म s s s s s s s ग?"
संदीप," साहेब, उद्याचा दिवस थांबा फक्त...सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत बदली विजेरी देऊन पोरगा पांठवितो, अन्‌ तुमची बाद झालेली घेऊन जातो... ...चालेल?"
मी," हे बघ संदीप...माझा सरळसोट खाक्या तुला माहीत आहे... ...वॉरण्टी संपायला फक्त अठरा दिवस शिल्लक आहेत, आणि मी ती संपायच्या आत ह्या फोनवर तुझ्याकडं नवीन विजेरीचा दावा दाखल केलेला आहे... ...समजलं?"
संदीप," साहेब कांही काळजी करूं नकां... अहो मी आहे ना?... ...सोमवारी विजेरी इथं आणली की कंपनीच्या नियमाप्रमाणं ती मला इथं एक दिवस चार्ज करून तंपासावी लागते, आणि ती खराब आहे असं दिसलं, तर मग ती कंपनीकडं पांठवून नवीन विजेरीची मागणी करतां येईल... तेव्हां हे एकदोन दिवस मध्ये जाणारच... ...त्याला माझा काय इलाज आहे सांगा? तेव्हढा वेळ द्या फक्त मला... ..."
मी,"कंपनीच्या नियमाप्रमाणं जे काय करायचं असतं ते तूं खुशाल कर...त्याला माझी कांही हरकत नाही. पण ह्यात कांही गोंधळ झाला, वॉरण्टीची तारीख उलटली, आणि कंपनी जर उद्यां कांखा वर करायला लागली, तर मग मला तुझी गचाण्डी धंरावी लागेल... !!! काय?... ...तेव्हां ठंरल्याप्रमाणं सोमवारी सकळीच विजेरी घेऊन जा...समजलं नीट?"
संदीप," होय साहेब... ...कांही काळजी करूं नकां."
"ठीकाय्‌ मग", म्हणून मी फोन ठेंवला.
आपल्या भारतात कुठल्याही सेवादात्याला असंच पिदडावं लागतं... ...त्याखेरीज हे लोक वठणीवर रहात नाहीत... कारण ते जन्मजात छत्रपति असतात. !!
तसंच झालं...सोमवार उजाडला... ...सकाळ गेली... दुपार टंळली... ...संध्याकाळचे साडेचार वाजत आले, तरी विजेरीवाल्याचा पत्ता नव्हता... ...
अखेर पांच वाजतां संदीपला फोन करून पुन्हां एकदां यथेच्छ ठोंकून काढल्यावर सहा वाजतां एक पोरगा तात्पुरती विजेरी घेऊन आला, आणि खराब झालेली विजेरी घेऊन गेला एकदाचा.

मध्ये एक दिवस गेला, आणि तिसर्‍या दिवशीं सकाळी सकाळी संदीपचा फोन... ...
संदीप," नानिवडेकर साहेब नमस्कार... ...घरीं आहांत काय?"
मला शंका आलीच... ...आतां कांहीतरी लचाण्ड मागं लागणार... ... ...
आपल्या भारतीय लोकांची ही एक जन्मजात खोड आहे...कांहीतरी साधायचं असलं की सगळ्यांची तत्परता अगदी कांठोकांठ उचंबळून येते... ... आणि कांही लभ्यांश दिसत नसेल, तर कंठशोष केल्याखेरीज ढुंकूनही बघणार नाहीत.!!
मी," काय रे...इतक्या तांतडीनं कसा काय केलास फोन?"
संदीप," साहेब, इथं मी कालच विजेरी पूर्ण चार्ज करून तिची चांचणी करून बघितली... ...बारा व्होल्ट्स चं व्होल्टेज व्यवस्थित आलेलं आहे विजेरीला,,,विजेरी अगदी ठणठणीत आहे...तेव्हां कंपनीकडं आपल्याला बदलीचा दावा करतां येणार नाही...!!... ...तुम्ही घरीं असलात तर विजेरी परत पाठवावी म्हणून फोन केला.!!!"
संदीपला फक्त एव्हढंच माहीत नव्हतं की एक्साईड कंपनी कडून दररोज सातआठशे विजेर्‍या खरेदी करणार्‍या टाटा मोटर्स्‌ मध्ये नोकरीत माझी हयात गेलेली होती.
शिवाय स्थापत्य अभियांत्रिकीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स्‌ आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी अश्या इतर दोन अभियांत्रिकीच्या शाखांचाही मी पदवीधर आहे, त्यामुळं मलाही विजेर्‍यांसंबंधी पुरेसं ज्ञान आहे... ...तो जे कांही करून मला सांगत होता, की ’विजेरी ठणठणीत आहे’, ते सगळं मी त्याच्याकडं विजेरी पांठवण्याआधीच घरीं करून बघितलेलं होतं, आणि मगच ’विजेरी चं आयुष्य संपलंय्’ असा निष्कर्ष कांढलेला होता.!!!
मी," हे बघ संदीप, विजेरीला व्होल्टेज आलंय ना? दे पांठवून लगेच... ...आपण ती गाडीला बसवून बघूं काय होतंय्‌ ते... ...एक आठवडाभर जर ती व्यवस्थित चालली, तरच मी मान्य करीन की ती ठणठणीत आहे म्हणून, आणि बदलीचा दावा मागं घेईन... ... नाहीतर तुला ती पुन्हां परत न्यावी लागेल...समजलं? तेव्हां तुला काय करायचं आहे तेव्हढं बोल फक्त."   
संदीप," चालेल साहेब... ...एक आठवडाच हंवाय्‌ ना तुम्हाला?... कांही हरकत नाही माझी... ...मग देऊं पांठ्वून विजेरी लगेच?" 
मी, "चालेल" म्हणून फोन ठेवला.
अर्ध्या तासात दुसरा एक पोरगा ती विजेरी घेऊन आला... ...आणि आम्ही ती गाडीला बसवली.
दोन वेळां स्टार्टर फिरवून बघितला, तर गाडी चालूं झाली...!!!
मला चंकवा लागला... ...विजेर्‍यांचं इतकं सखोल ज्ञान आपल्याला असतांना हे असं कसं काय होतंय्‌?"
मी परत तिसर्‍यांदा स्टार्टर ची चांवी फिरवली, आणि अगदी निश्चिन्त झालो...गाडी चालूं झाली खरी, पण ते होतांना बॅटरीतला जीव अर्ध्यावर आलेला आहे एव्हढं स्टार्टरचा आवाज ऐकतांच मला तत्क्षणीं जाणवलं... ...!! 
मी त्या पोराला एव्हढंच म्हणालो," ठीकाय्‌...राहूं दे बॅटरी गाडीलाच. संदीपला सांग की गाडी पुढचा एक आठवडाभर जाग्यावरच उभी असेल. आणि बरोबर एक आठवड्यानं साहेब काय ते फोन करून सांगतील."

एक आठवडा कसला जातोय्‌,,,दुसर्‍या दिवशी सकाळी नित्याच्या परिपाठाप्रमाणं गाडी साफसूफ केल्यावर मी सहजच स्टार्टरची चांवी फिरवून बघितली... ...
तर कसलं काय न्‌ कसलं काय्‌... ...विजेरीबाईनी मला पुनश्च झंटका दिला...!!...फक्त तो सुखद होता इतकंच काय ते... ...विजेरीबाई केवळ चोवीस तासांतच पुनश्च स्वर्गवासी झालेल्या होत्या. !!! 
टाटा मोटर्स्‌ मधली माझी तीन तपांची तपश्चर्या फुकट गेलेली नव्हती तर.!!! 
मी तत्क्षणीं संदीपला फोन लावून विजेरी परत न्यायला सांगितली...आणि हेही बजावलं की ’ ’विजेरीबाई’ ची आतां ताबडतोब माहेरी रवानगी झाली पाहिजे.’ 
संदीप पण चक्रावला, तथापि मेलेला ’जयद्रथ’ बघून त्याचीही बोलती बन्द झाली असावी.!!

दुसर्‍या दिवशी त्याचा मला फोन आला, की विजेरीबाईंची पांठवणी केलेली आहे, एक आठवड्यात काय ते समजेल... ...
मी," काय ते समजेल म्हणजे काय?"
संदीप," साहेब, दावा दाखल झाला की, बॅटरी कंपनीच्या कारखान्यात परत जाते. तिथं तिची संपूर्ण चांचणी कंपनीच्या संशोधन विभागातले अभियंते करतात. आणि त्यांची खात्री पटली तरच विजेरी बदलून नवीन मिळते, नाहीतर ठीकठाक असलेली आपली जुनी विजेरी कंपनी परत पांठवून देते."
मी जरा धास्तावलो... ...म्हणजे आतां एक्साईड सारख्या बलाढ्य कंपनीबरोबर दोन हात करायची वेंळ येणार तर... ...
पण मी जे कांही शिकलेलो होतो, त्या ज्ञानावर मात्र माझा ठाम विश्वास होता...नुस्तं ’नेट सर्च’ मारून ’कॉपी-पेस्ट्‌’ केलेलं नव्हतं ते... ...एक्साईड समोर उभी ठांकली की भेंदरून जायला.
मी," हे बघ संदीप... ...हे कंपनीचे नियम असतील...ते आपल्यालाही पाळले पाहिजेत...आपल्याला कुठलाही खोटा दावा दाखल करून कंपनीची फंसवणूक करायची नाही... ...पण मला कंपनीचं तोण्डी उत्तर मात्र चालणार नाही एव्हढंच लक्ष्यांत ठेंव... ...जे काय उत्तर त्यांना द्यायचं असेल ते मला लेखी मिळालं पाहिजे, त्यांच्या तपासण्यांच्या प्रतीसकट... ... समजलं? तेव्हां बघूं या कंपनी काय म्हणतेय्‌ ते... ...ठीक? "

गम्मत म्हणजे विजेरीबाई माहेरी गेल्यानंतर मोजून तिसर्‍या दिवशी विजेरीबाई नी मला चंवथा झंटका दिला.!!
संदीप चा सकाळीच घरीं फोन आला," साहेब कंपनीनं चांचण्या करून विजेरी निर्दोष आढळल्यामुळं परत पांठविलेली आहे... ...!!! केव्हां पांठवू?"
म्हणजे आतां प्रत्यक्ष उत्पादक कंपनीच चांचण्या करून म्हणत हो्ती की विजेरीबाई निर्दोष आहेत म्हणून... ...!!
मी हतबुद्ध होत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ...!!!
******************************************************************************** वाचकहो, त्यानंतर काय काय गंमती घडल्या त्या पुढील भागांत बघूं या... ... ...
त्याचं काय झालंय्‌, की विजेरीबाई कडून आतांपावेतो बरेच झंटके खाल्ले आहेत ना, त्यातनं थोडासा सांवरलो, की सांगतो पुढचं महाभारत!!... ... ...काय?

********************************************************************************
----- रविशंकर.
१८ एप्रिल २०१५.

No comments:

Post a Comment