Search This Blog

Friday 1 May 2015

॥ विजेरीचे झंटके ॥

॥ विजेरीचे झंटके ॥
[ भाग २ ]




संदीप चा सकाळीच घरीं फोन आला," साहेब कंपनीनं चांचण्या करून विजेरी निर्दोष आढळल्यामुळं परत पांठविलेली आहे... ...!!! केव्हां पांठवू?"
म्हणजे आतां प्रत्यक्ष उत्पादक कंपनीच चांचण्या करून म्हणत हो्ती की विजेरीबाई निर्दोष आहेत म्हणून... ...!!
**************************************************************************************
मी," कंपनीनं चांचण्यांचा लेखी अहवाल पांठवलाय्‌ काय विजेरी सोंबत?"
संदीप," तोही आलाय्‌ साहेब... ...दोन पानीं भरगच्च अहवाल आहे...!! ... ... तोही पांठवून देतो बघयाला हवा तर."
म्हणजे पंचावन्न हजार कोटींची अफाट ताकद असलेल्या, लक्षावधींची रक्कम संशोधनावर दरवर्षीं वेंचणार्‍या महाबलाढ्य एक्साईड कंपनीनं माझा दावा सफाचट मोडीत काढलेला दिसत होता... ...!!
मातरांच्या भाषेतला ’हिन्दकेसरी’ राहिला बाजूलाच‌, इथं तर प्रत्यक्ष ’रुस्तुम-ए-हिन्द’ च मैदानात उतरून माझ्या इवल्याश्या ज्ञान-अनुभवाला आव्हान देत, दण्ड थोंपटत समोर उभे ठाकलेले होते...!!!
’किडमिड्या विरुद्ध दारासिंग’...!!!!
असलं रणकन्दन आतां माझ्या बोकाण्डीं बसलेलं होतं... ...
मी हतबुद्ध होत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ...!!!
धंसकलो होतो खरा... डोकंही चक्करलं होतं जरासं... ...पण अजून शेंपूट कांही पायात गेलेली नव्हती... ...
माझा स्वतःच्या अनुभव अन्‌ निरीक्षणावर, त्याही अवस्थेत ठाम विश्वास होता.
आतां ही लढाई जर पहिल्याच तडाख्यात सफाचट मारायची असेल, तर प्रतिपक्ष्याचं मर्मस्थान अचूक हेरणं निर्णायक अगत्याचं होतं... ... ...

मी," अहवाल आलाय्‌ ना संदीप, तेंव्हढाच फक्त दे पांठवून मला अभ्यासायला... विजेरी पांठवायची इतक्यात घाई करायची नाही...कळलं?

फक्त एक लक्ष्यांत ठेंव...वॉरण्टी संपायला अजून दहा दिवस घट्ट शिल्लक आहेत...
आतां प्रत्यक्ष उत्पादक कंपनीच विजेरीची तंदुरुस्ती प्रमाणित करते आहे, आणि एक्साईड म्हणजे कांही कुठली गल्लीबोळातली किंवा रस्त्यावर पडलेली कंपनी नव्हे... ...
तेव्हां त्यांच्या अहवालावर मी आतांच कांही मत माण्डणं चुकीचं ठरेल.
तेव्हां आधी मला अहवाल बघूं दे काय आलाय्‌ तो, मग पुढं काय करायचं ते सांगतो तुला... ...ठीक?"
संदीप," ठीकाय्‌ साहेब...तुम्ही म्हणाल तसं."
पंधरावीस मिनिटांनी संदीपच्या दुकानातला पोर्‍या एक्साईड कंपनीची मुद्रा असलेला एक जाडजूड लखोटा माझ्या हातात ठेंवून गेला.
मी शांतपणे सकाळचा दुसरा चहा तयार करून घेतला, अन्‌ लखोटा उघडून अहवाल बाहेर काढला...
आणि तो वांचल्यावर परत स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!
माझा अंदाज चुकीचा नव्हता... ...
भारतीय मानक संस्थेच्या विद्युत्‌ अभियांत्रिकीच्या मापदण्डांबरहुकूम यच्चयावत्‌ चांचण्या करून कंपनीनं
अहवाल बनवलेला होता, अन्‌ तळाशी विजेरीबाईंची तन्दुरुस्ती प्रमाणित केलेली होती.!!
आतां आपली एकही क्षुल्लक चूक अथवा चाल, ह्या रणांगणांत आपल्याला धारातीर्थीं लोंळवायला पुरेशी ठंरणार हे तत्क्षणीं मला कळून चुकलं.!!
परत एकदां अहवाल शांत डोंक्यानं तपासून, ’दारासिंग’ चं मर्मस्थान (सापडलंच तर) शोधून काढावं लागणार होतं.
मी अहवाल सरळ मेजाच्या खणात ठेंवून दिला, अन्‌ माझ्या इतर व्यावसायिक व्यापांकडं वळलो.
दुसर्‍या दिवशीही मला त्यासाठी अवसर मिळाला नाही...
वॉरण्टी संपायला आतां फक्त आठ दिवसच उरलेले होते... ...
अखेर तिसर्‍या दिवशीं सकाळी स्नान झाल्यावर मी सगळीच कामं बाजूला सारून तो अहवाल परत पुढं ओंढला, अन्‌ संदर्भासाठी संग्रहातली संबंधित विषयावरची दोनतीन पुस्तकंही काढली.
आणि दाखला पुढं ओंढून चष्मा डोंळ्यावर चंढवला.
एकेक चांचणीचा मजकूर तपासत मी दाखल्याच्या जवळजवळ तळापर्यंत पोंचलो, अन्‌ स्वास्थ्य प्रमाणित करणार्‍या शेर्‍याच्या वरच्याच एका ओंळीनं माझं लक्ष्य वेंधून घेंतलं...त्या ओंळीत सर्व चांचण्या झाल्यानंतर विजेरी पूर्ण चार्ज करून डीलरकडं परत पांठवल्याचा उल्लेख होता... ...
मी ताबडतोब संदीपचा नंबर फिरवला...
संदीप," नमस्कार साहेब, झालं काय काम तुमचं?... ... काय करायचं आतां पुढं?"
मी," संदीप, विजेरी कंपनीकडून केव्हां परत आलेली आहे ते सांगतोस काय जरा मला?"
संदीप," साधारण चारएक दिवस तरी झाले असावेत... ...जरा थांबा साहेब, रजिस्टर बघूनच सांगतो."
दोनचार मिनिटांनी तो परत फोनवर आला," साहेब बरोब्बर चार दिवस झालेत...आज पांचवा दिवस आहे."
मी," ठीकाय्‌ संदीप... ...विजेरी दे पांठवून लगेच, आपण बघूं या ती गाडीवर बसवून काय होतंय्‌ ते."
संदीप," आत्तां लगेचच ती कशी काय पाठवतां येईल साहेब?"
मी," कां?...काय अडचण आहे तुझी?"
संदीप," साहेब एकतर सगळीच पोरं बाहेर गेलेली आहेत, आणखी... ..."
मी," आणखी काय?"
संदीप," आणखी असं की विजेरी चार दिवस पडलेली आहे ना इथं...ती आज चार्ज करून घेतो आणि उद्यां सकाळीच तिची भार चांचणी [ लोड टेस्ट्‌ ] करून पांठवतो पोर्‍याला... ...चालेल?"
मी," संदीप... ...मी आतां काय सांगतोय्‌ ते कान उघडे ठेंवून नीट ऐक... ...विजेरी कंपनीनं पूर्ण तपासून परत पांठवलेली आहे... ...बरोबर?
संदीप," बरोबर साहेब."
मी," तेव्हां ती जशीच्या तशीच माझ्याकडं पांठवून द्यायची लगेच... ...
विजेरीला आतां तूं बोंट सुद्धां लावलेलं मला अजिबात चालणार नाही...जर तसं झालं, तर मी  विजेरीचा दावा अजिबात मागं घेणार नाही...समजलं नीट?"
संदीप," समजलं साहेब...काळजी करूं नकां...अहो विजेर्‍या पांठवण्यापूर्वीं आम्ही नेहमीच तसं करतो         म्हणून मी म्हटलं तसं..."
मी," आणि एक भन्नाट जादू बघायची असेल, तर स्वतःच विजेरी घेऊन ये ताबडतोब... ...काय?"

पंधरा वीस मिनिटांतच संदीप स्कूटरवर विजेरीबाईनां घेऊन हजर झाला.

मी म्हटलं," हे बघ संदीप, आपण ही बॅटरी आतां परत गाडीवर बसवूं आणि गाडी चालूं करून बघूं... ...त्यानंतर चारएक दिवस गाडी जाग्यावरच उभी राहील... ...
आणि त्यानंतर काय होतंय्‌ ते बघूं या, आणि मग पुढं काय करायचं तेही ठंरवूं आपण... ... ठीक?
माझा बदलीचा दावा मी अजूनही मागं घेतलेला नाही एव्हढंच लक्ष्यांत ठेंव... ...कळलं ना?"
संदीप," चालेल साहेब... ... तुम्ही म्हणाल तसं."

संदीपनं मग विजेरी गाडीवर बसवली... ...

मग म्हणाला," हं आतां बघा साहेब स्टार्टर फिरवून."
मी चांवी कुलुपात सरकवून फिरवली, आणि गाडी व्यवस्थित सुरूं झाली...!! माझा चेहर काळवण्डला... ...
संदीप," साहेब, आतां इंजिन बंद करून परत स्टार्टर फिरवून बघा बरं"
मी इंजिन करून परत चांवी फिरवली... ...
आणि अहो आश्चर्यम्‌... ...
फक्त चांवी च काय ती फिरली...
स्टार्टर ही ढिम्म होता, अन्‌ इंजिनही ढिम्म होतं... ...!
विजेरीबाई एका ओंझ्याखालीच सफाचट गतप्राण झालेल्या होत्या. ! ...हिप्‌ हिप्‌ हुर्रे...!!
आतां खुद्द संदीपनंच आं वांसत स्वतःच्या कपाळावर फाडकन्‌ हात मारून घेतला... ...
अन्‌ त्याच्या पांठोपांठ कपाळाला हात लावायची पाळी खुद्द ’रुस्तम-ए-हिन्द’ वर ओंढवलेली होती...!!!

संदीप," साहेब... ...अहो काय भुताटकी व्हायाला लागलीय्‌ की काय इथं?... ...ऑं?"

मी फक्त हंसलो... ...स्वतःशीच.
संदीप," साहेब... ...पायात पायताण आहे काय तुमच्या?"
मी," कां रे बाबा?"
संदीप," त्याचं काय आहे साहेब... असलं ना पायात, तर तेव्हढं काढून हाणा आतां आमच्या  टाळक्यात...  ... म्हणजे जातो एकदाचा ही नवरी परत घेऊन!!!... ...अहो आठ वर्षं झालीत... ...रोज पांच सात विजेर्‍या विकतोय्‌ मी... ...पण खरंच साहेब...ही असली भन्नाट जादू कधीच  बघितली नव्हती बघा आपण...तुम्हांला आधीच कसं काय कळलं साहेब, की विजेरी झोंपलीय      म्हणून?... ...ऑं?"
मी," माझा फक्त रास्त अंदाज होतां असंच कांहीतरी होणार म्हणून..."
संदीप," मग आतां पुढं काय करायचं साहेब?"
मी," आतां एक काम करूं या...ही विजेरी खलास झालेली आहे, अशी खात्री पटली ना तुझी आतां?"
संदीप," पटली साहेब... ...अगदी सफाचट पटली."
मी," आतां घरातली इन्व्हर्टर ची विजेरी कांढून आण, ती गाडीला बसवून बघूं या आतां काय होतंय्‌     ते... ..."
संदीपनं मग स्वर्गवासी विजेरीबाई गाडीवरून काढल्या, आणि घरातल्या इन्व्हर्टर ची विजेरी गाडीला बसवून चांगली पांचदहा वेळा गाडी चालूं करून पाहिली.
गाडी प्रत्येकवेळीं अगदी व्यवस्थित चालूं झाली... ...!!!
मी," आतां हे पण पटलं ना तुला, की गाडीच्या स्टार्टर किंवा वायरिंग मध्ये कांहीही दोष नाही        म्हणून?"
संदीप नं नुस्तीच होकारार्थी मान हंलवली... ...
मी," तेव्हां गाडीत कांहीही दोष नसून ह्या विजेरीचंच आयुष्य संपलेलं आहे, ही पण खात्री पटली ना         तुझी आतां?"
संदीप," काय बोलणार साहेब मी आतां?...तुम्ही बोलतीच बन्द केलीत बघा माझी... ...पण मी अजून        चक्करलोय्‌ साहेब... ...हे असं कसं काय झालंय्‌?... ...आणि तुम्हांला आधीच कसं काय कळलं  ते?... ...अहो तुम्ही पहिलेच भेंटलाय्‌ मला एक्साईड विरुद्ध दण्ड थोंपटणारे..."
मी," अरे बाबा, मला एक सांग... ...असली इदरकल्याणी विजेरी तरी कधी भेंटली होती काय तुला?"
संदीपनं आतां खरोखरच सुन्नबधिर होत कपाळाला हात लावला...!!!
मी," तेव्हां आतां लेकीची माहेरी रवानगी करायची... कायमची, आणि बदलीचा दावा ठोंकून मोकळं           व्हायचं!!!... ...काय?
संदीप कांहीच बोलला नाही... ...
मी मग त्याला घरांत घेऊन गेलो.
आणि कंपनीनं पाठवलेल्या अहवालावर तळाशीच चारपांच ओंळीत आमचा चांचणी अहवाल थोंडक्यात पण मुद्देसूदपणे तारीखवारासकट नमूद केला... ...
त्यात गाडीला दुसरी विजेरी बसवल्यावर ती व्यवस्थित चालूं होते, अतएव, गाडीच्या स्टार्टर अथवा वायरिंग मध्ये कुठलाही दोष नाही, अशीही नोंद केली, आणि सदर चांचणी डीलर च्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत केल्याचं पण ठंळकपणे नोंदवलं... ...
त्याखाली मग स्वतः सही केली, आणि संदीपच्या हातात लेखणी देत म्हटलं," हं...ठोंक सही तूं पण..."
आतां मात्र संदीपचं धाबं दणाणलं...
तो गप्पही झाला, अन्‌ सही करायला कंचरायला पण लागला... ...
मी," काय झालं रे संदीप?"
संदीप," माझी सही कश्याला हंवी साहेब?... ...तुम्ही केलीय्‌त ना? मग बस्स झालं की..."
मी,  " कसं काय बस्स झालं? सगळी चांचणी तूं आणि मी प्रत्यक्ष स्वतःच केलीय्‌ ना?... ...मग?... ...तसं ह्या अहवालावर नमूदही केलंय्‌ मी... ...मग तुझी सही नसून कसं काय चालेल?"
संदीप,"साहेब... खरं काय ते सांगूं काय?"
मी," हं बोल..."
संदीप," अहो तुमच्या ह्या लठ्ठालठ्ठीत उद्यां कंपनीनं माझं खाटलं उभं केलं, तर काय करूं मी मग?"
मी," हे बघ संदीप...एक्साईड म्हणजे कुठली गल्लीबोळातली कंपनी नव्हे तसं कांही करायला... ... पंचावन्न हजार कोटींची ताकद असलेली सन्माननीय प्रतिष्ठित कंपनी आहे ती...तेव्हां ही भीति      काढून टांक डोंक्यातनं तुझ्या, आणि कर सही बेशक... ...मी खात्री देतो तुला, की तसं कांही  होणार नाही..."
संदीप," साहेब तुम्ही टाटा मोटर्समध्ये होतां ना अनेक वर्षं... ..."
मी,  " त्याचा इथं काय संबंध?"
संदीप," जरा ऐकून तर घ्या साहेब माझं... ...टाटा मोटर्स मध्ये असल्यामुळं एक्साईड कंपनीत पण  ओंळखीचे लोक असतील ना तुमच्या?"
मी," हो...भरपूर आहेत की... ...त्याचं काय?"
संदीप," मी काय म्हणतो साहेब, की बॅटरी मी परत घेऊन जातो... ...ती कंपनीकडं परत पण पांठवतो,      अन्‌ बदलीचा दावाही दाखल करतो...पण उद्यां तुम्ही फक्त पांचदहा मिनिटांसाठी दुकानांत  या...तिथूनच आपण तुमच्या ओंळखीतल्या एखाद्या साहेबांना फोन करूं...आणि तुम्ही त्यांच्याशी   नुस्तं बोंलून घ्या जरा ... ...एव्हढं फक्त करा माझ्यासाठी...म्हणजे कांही लचाण्ड उभं न करतां     कंपनी विजेरी  पण बदलून देईल की."
मी," अच्छा... ...म्हणजे ’तुम लडो, और मैं कपडा सम्हालता हूं’...लेकाच्या, मग तुला कंपनीनं फक्त       मधल्यामध्ये कमिशन खायला नेमलाय्‌ काय रे?... ... ऑं?"
संदीप," तसं नाही हो म्हणत मी साहेब..."
मी," तसं नाही?...मग कसं आहे?
हे बघ संदीप...हातातला अहवाल त्याच्यासमोर फंडकवत माझा आवाज आतां चंढला,"हे जे काय       कंपनीनं मला पांठवलेलं आहे ना? ह्याला ’शरणगतीचा खलिता’ असं म्हणतात... ...तहाचा  नव्हे!!!... तेव्हां मीही कंपनीला आतां शरणागतीचाच उलट खलिता धाडणार आहे... तो पण  तुझ्या-माझ्या सहीसकट... ... कंपनीकडं मी आतां तहाची आर्जवंही करणार नाही, अन्‌ ’भिक्षां देहि’  तर मुळीच करणार नाही... ...तुझे हातपाय जरी गळाठले असले, तरी माझे अजून तरी गळाठलेले      नाहीत !!!... ...समजलास?"
संदीप नं कपाळाला हात लावत दुसर्‍या क्षणीं अहवालावर सही ठोंकली... ...
मग माझ्याकडं वळून म्हणाला," साहेब फक्त एकच करा... ...माझ्यासाठी म्हणून..."
मी," हे बघ संदीप...तुझं-माझं कांही वैर आहे काय, म्हणून मी हा दावा लावतोय्‌ कंपनीकडं?"
संदीप," सगळं पटतंय्‌ हो साहेब... ...पण मला सांगा, समजा कंपनी जर मला खरंच उद्या त्रास द्यायला       लागली, तर काय करूं मी सांगा मला? तुम्हांला काय हवी ती सगळी सेवा देतो की मी, ...
उद्या कंपनीनं जरी विजेरी चा दावा नाकारला, तरी मी माझ्या पदरची विजेरी देतो तुम्हांला...मग तर झालं ना? पण ह्या झेंगटांत तेव्हढं मला ओंढूं नकां...एव्हढीच हात जोडून विनंति आहे."
   
माझ्या गांठीला असल्या हाणामार्‍यांचे जरी शेंकड्यानी अनुभव असले, तरी त्याचं तसं असण्याची शक्यता नव्हती...
मी म्हणालो," ठीकाय्‌ संदीप...विजेरीची जबाबदारी तूं आतां घेतलेली आहेसच...तेव्हढं पुरेसं आहे मला... ... समज हे प्रकरण जर उद्यां चिघळलंच, तर मी काढतो तुला रिंगणाबाहेर...आणि त्यासाठी जर गरज भासली, तर मीच एक्साईड कंपनीतल्या माझ्या ओंळखीपाळखींचा वापर  करून तुला रिंगणाबाहेर ठेंवीन ...अगदी सुरक्षित... ...मग एक्साईड आणि मी बघून घेऊं काय होईल ते... ...हेंच हंवंय्‌ ना तुला?"
संदीप," एव्हढंच साहेब...बांकी कांही म्हणणं नाही माझं..."
मी," पण माझी एक अट आहे... ..."
संदीप," बोला साहेब...अट मान्य आहे मला."
मी," नीट ऐक आधी माझी अट...इतउप्पर कधीही सेवा देतांना तांटकळत ठेंवलेलं चालणार नाही मला, आणि जर कां तसं झालंच, तर तुझ्या डोंक्यावर बसून दर प्रसंगापायीं रोंख शंभर रुपयांचा दण्ड वाजवून वसून करीन मी!!... ...चालेल तुला?"
संदीपनं सुटकेचा श्वास सोडला," एव्हढंच ना साहेब? शंभर टक्के मान्य... ...तशी वेंळच येऊं देणार नाही मी... ...मग तर झालं?"
मी," ठीकाय्‌... ...आतां एकच कर...कोंपर्‍यावरच्या झेरॉक्सवाल्याकडं जा, आणि ह्या अहवालाची एक प्रत     तेव्हढी आणून दे मला, आणि मूळ अहवालासकट उद्याच्या उद्या विजेरीची माहेरी रवानगी  करायची... कळलं...? मग बघूं पुढं काय होतंय्‌ ते."

संदीप नं ठंरल्यानुसार दाखल्याची प्रत मला आणून दिली, आणि दुसर्‍या दिवशी विजेरी कंपनीकडं परत पांठवून नवीन विजेरीचा दावा पण दाखल केला... ...

आणि मोजून अठ्ठेचाळीस तासांनी माझ्या मोबाईलवर एक्साईड चा एस्‌. एम्‌. एस्‌. आला...

सन्माननीय ग्राहक,

आपला वॉरंटीतला नवीन बदली विजेरीचा दावा क्रमांक ७८९४२ आम्ही मान्य केलेला असून, नवीन विजेरी डीलरकडे पांठवीत आहोत... ...कृपया आजपासून पांच दिवसांनंतर ती डीलरकडून ताब्यांत घ्यावी ही विनन्ति.
आमच्या उत्पादनांवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपणांस मनःपूर्वक धन्यवाद.
--एक्साईड इण्डस्ट्रीज लि.
 
आतां मी स्वतःवरच बेहद्द खूष झाल्यामुळं कपाळाला हात लावला... ...!!
मास्तरांच्याच भाषेत सांगायचं, तर ’रुस्तम-ए-हिन्द’नी खडाखडी सुरूं व्हायच्या आधीच मैदान सोडलेलं होतं.!!!

**************************************************************************************

वाचकहो,
तुम्हांला वाटलं असेल ना, की आतां संपली कथा म्हणून?
अहो असा अर्धवटच कुठंतरी संपायला तो काय हिन्दी सिनेमा आहे की काय?
आणि आमच्या विजेरीबाई तरी इतक्या सहजासहजी कश्या काय माहेरी परत जातील?
ह्या ’रुस्तम-ए-हिन्द’ बरोबर चार हात करून माझा बांक पण निघालाय्‌ चांगलाच... ...
तेव्हां थोडीशी विश्रांति झाली, की तिसर्‍या भागांत बघूं या शेंवट काय झाला तो...चालेल ना?

**************************************************************************************


-- रविशंकर.

२० एप्रिल २०१५.

No comments:

Post a Comment