Search This Blog

Saturday 20 June 2015

॥ आंधळ्याच्या गाई ॥

॥ आंधळ्याच्या गाई ॥




ट्रिंग्‌...ट्रिंग्‌...ट्रिंग्‌...ट्रिंग्‌...
दूरध्वनीची घण्टा सकाळी सकाळीच खंणखंणली, अन्‌ मी अंघोळीला जायला हातात घेतलेला टॉवेल शेंजारच्या चौपाईवर ठेवत श्रावक उचलला... ... ... तारीख होती २४ सप्टेंबर २०१०.
," नमस्कार...नानिवडेकर बोलतोय्‌..."
पलीकडून आमच्या इंग्लण्डस्थित सूनबाई सौ. क्षितिबाईंचा उत्साहानं संळसंळलेला आवाज कानांत शिरला," बाबा...एक मस्त बातमी आहे...काय असेल ओंळखा बघूं..."
ह्या पोरींना दुसर्‍याना उखाणे घालायला लहानपणापासून त्यांच्या आयांनी पढवलेलं असतं बहुतेक...
मी," अरे बातमी काय आहे ते तरी सांगशील?" [ आमच्या कानडी-कोल्हापुरी खाक्यात घरातल्या बायका-पोरींनाही ’अरे, बाबा’ असली पुरुषी सर्वनामंच बोलण्यात वापरली जातात... ...]
सौ. क्षितिबाई," नाही बाबा... ...ओंळखा बघूं काय असेल ते?"
मी पांढरं निशाण फंडकवलं," नाही बुवा कांही सांगता येत...काय बातमी आहे?"
सौ. क्षितिबाई,"बाबा...अहो ’कुक्के’ ची आरक्षणं झालीसुद्धां...नुस्ती आगगाडीच्या प्रवसाचीच नव्हेत, तर तिथल्या निवासाची पण... ...आहांत कुठं?"
मी उडालोच... ...," अरे पण अशी कशी काय मिळाली प्रवासाची आरक्षणं तुला...ऑं?... ...आम्ही गेले तीन दिवस बघतोय्‌ इंटरनेटवर, तर सगळ्या जागा भरलेल्या होत्या...चारपांच जणांची नावं प्रतीक्षा यादीत पण होती की रे... ..."
सौ. क्षितिबाई," कसं न्‌ काय ते नाही माहीत बाबा...पण मिळाली मला पहिल्या झंटक्यात... ... आणि तुम्ही न्‌ आईंसाठी तळातल्या बर्थ्स पण मिळाल्याय्‌त ...जातांयेतांनाच्या दोन्ही प्रवासात... ...!!!"
मी कपाळाला हात लावत सौ. क्षितिबाईंची पाठ थोपटली.!!
मी," अरे पण हे तुझं कुक्के नावाचं गांव आहे तरी कुठं... ...ऑं? मी जवळपास सगळा भारत फिरलोय्‌ आजतागायत, पण ह्या गावाचं नावही कधी ऐकलेलं नाही, म्हणून विचारतो."
सौ. क्षितिबाई," ते मलाही माहीत नाही बाबा...!!
पण कुठंतरी मी वाचलेलं मला आठवतंय्‌... ...अगदी नक्की... ...जरा तुम्हीच बघा ना बाबा नकाश्यांत शोधून... ... ...कुक्के हे थण्ड हवेचं ठिकाण असून, ते मंगलोर च्या जवळपास कर्नाटकात कुठंतरी आहे एव्हढंच मला माहीत आहे... ...आणि पुण्याहून मंगलोरला जायला फक्त कोंकण एक्सप्रेस्स ही एकमेव गाडी सोयीची असल्यामुळं मी त्या गाडीची आरक्षणं केलीय्‌त...!! "
मी चाटच पडलो," अरे पण कोकण एक्सप्रेस पुण्याला कुठं येते रे?"
सौ. क्षितिबाई," बाबा, म्हणूनच मला ’कणकवली ते मंगलोर’ अशी प्रस्थानाच्या प्रवासाची, आणि ’मंगलोर ते पनवेल’ अशी परतीच्या प्रवासाची आरक्षणं करावी लागली... ...!!
जातांना ’पुणे ते पडेल’ [पडेल हे सौ. क्षितिबाईं चं माहेर]...आणि येतांना ’पनवेल ते पुणे’ हे प्रवास आपल्याला बस अथवा टॅक्सी नं करावे लागतील... ...तेव्हां ह्या आरक्षणांची व्यवस्था फक्त तुम्ही बघा...बाकीचं सगळं झालंय्‌."
मी," कसं काय सगळं झालंय्‌ म्हणतोय्‌स तूं?...’पडेल ते कणकवली’ चं काय करायचं?"
सौ. क्षितिबाई," त्याची काळजी करूं नकां बाबा... माझे बाबा पोंचवतील आपल्याला स्कॉर्पिओ तनं... ...मी सांगून ठेवते त्यांना लगेच... ...ठेंवूं फोन मी?"
मी कपाळाला हात लावत ,"ठीकाय्‌, बघतो... ...बराय्‌ तर" म्हणून फोन ठेवला. !!!
आणि देवदर्शनाबरोबर माहेरदर्शनही जुळवून आणायच्या त्यांच्या चातुर्याची दाद देत कपाटातनं भारताचा रस्तेनकाशा काढून पुढ्यात टेबलावर पसरत सौ. इंदिराजी नां हांक मारली...  

आम्ही गेल्या चार दिवसांपासून भगीरथ प्रयत्न करून जवळजवळ निराश अवस्थेला पोंचलेलो असतांना, ह्या पोरीला कसलंही विघ्न न उपटतां ती आरक्षणं बसल्या जागेवरून - ती पण इंग्लण्ड - हातोहात मिळालेली होती.!!!

कांही कांही माणसं ही अशी जन्मतःच त्या महालक्ष्मीचा वरदहस्त डोंक्यावर घेऊनच जन्माला येत असावीत... ...
ही माणसं जेव्हां जेव्हां कुठलीही बस पकडायला थांब्याकडं जातात ना, तेव्हां बसथांब्यावर पोंचतां पोंचतां त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी नेणार्‍या बसेस अगदी धो धो येतांना दिसतात...!!
आणि उरलेली आमच्यासारखी माणसं...ज्यांना बसथांब्यावर पोंचतां पोंचतां धों धों गाड्या फक्त सुटलेल्याच बघायला मिळत असतात... ...!!!
ह्या असल्या योगांना मी ’प्रारब्धयोग’ असं म्हणतो...
अश्या माणसांची पूर्वजन्मांतली पुण्याई कदाचित दाण्डगी असणार, त्यामुळं हे असं होत असावं हे आपलं माझं वैयक्तिक मत.आमच्या सौ. इंदिराजींचंही अगदी असंच होतं नेहमी...आणि माझं मात्र अगदी उलट... ...बसगाड्या कायम निघून जातानांच हताशपणे बघणं हे आमच्यासारख्यांचं विधिलिखित असावं... ...दुसरं काय म्हणणार?
मराठीत एक म्हण आहे की ’ आंधळ्याच्या गाई देव राखी ’ अशी.
ही म्हण बहुधा अश्या आमच्यासारख्याच कुणीतरी महाभागानं हजारो बसगाड्या जातांना बघून झाल्यावर शेंवटी कपाळाला हात लावत लिहिलेली असणार यात मला तिळभरही शंका नाही...!!!

झालं होतं असं, की हा आमचा गब्बू [ म्हणजेच सौ. क्षितिबाई ], हा खरं तर कोंकणातला कडक सोंवळा ब्राह्मणच म्हणायचा... ...कुठंही सफरीला गेलं की ह्या गब्बूजवळ त्या पंचक्रोशीतल्या देवस्थानांची यादी आधीच तयार असते, आणि सफरीबरोबर देवदर्शनयात्राही सौ. क्षितिबाई यथासांग पार पाडतात ... ...!!

त्यांनीच कुठूनतरी माहिती काढलेली होती, की कर्नाटकात मंगलोरपासून शंभरएक मैलावर कुक्के नावाचं गांव असून तिथं सुब्रम्हण्याचं प्रसिद्ध देऊळ आहे म्हणून...आणि मग सगळ्यांच्याच पायांना भिंगरी लागली... ...
मी आणि सौ. इंदिराजी नी चार चार वेळा समोरचा भारताचा नकाशा पिंजून काढला, पण  त्यावर आख्ख्या कर्नटकात कुठंच कुक्के नांवाचं गाव  दिसेना .!!!... ...आतां आली कां पंचाईत?
तसं मग मी इंटरनेट ची पाठ धंरली, अन्‌ सौ. इंदिराजी नी प्रवासी कंपन्याकडं चकरा मारायला सुरुवात केली...!!
अखेर एका कर्नाटकी प्रवासकंपनीवाल्यानं सांगितलं, की कुक्के नावाचं गांव बंगळुरु-मंगलोर लोहमार्गावर मंगलोरपासून जवळपास सव्वाशे कि. मी. अंतरावर असून मंगलोरला उतरून तिथनं बस अथवा टॅक्सी करून तिथं जावं लागतं.
इंटरनेटवर बरीच शोधाशोध केल्यावर अखेर आम्हांला ’कुक्के सुब्रह्मण्य’ नांवाची वेबसाइट्‌ एकदाची सापडली...कदाचित त्या सुब्रह्मण्यालाच आमची दया आली असावी... ...!!!

पण अजून दशावतार पूर्णपणे संपलेले नव्हते...

त्या वेबसाइट् वर सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर कुणी नागराज नांवाच्या गृहस्थांचा संपर्क झाला...परंतु आम्ही पूजापाठांची चौकशी करतांच त्या बहाद्दरानं फोनवर सांगितलं," वन्दु कन्नडाप्पा...मराठी,हिन्दी, इंग्लिश इल्ले... ...!!!"
झाऽऽऽऽऽऽऽऽऽऽलं !! ... ...आतां काय करायचं? 
आम्हांला कानडीचा ओ की ठो अवगत नाही, आणि त्या ’नागराजा’ ला कन्नड वगळता इतर कुठल्याही भाषेचा सुतराम गन्ध नव्हता... ...!!!
तथापि ह्या आंधंळ्या गब्बू च्या गाई तो सुब्रम्हण्य स्वतः जातीनंच राखीत असावा... ...गब्बू च्या आईकडच्या आज्जीं चं माहेर कर्नाटकातलं...आणि त्यांना कानडी भाषा अवगत होती... ...म्हणून शेवटी ही माळ त्यांच्याच गळ्यात घालावी लागली, आणि त्यांनी त्या ’नागराजा’ बरोबर संधान बांधून अखेर देवदर्शन आणि पूजेचा सगळा कार्यक्रम २७ डिसेंबर या तारखेला मुहूर्त-बिहूर्त बघून नक्की केला एकदाचा, आणि आम्ही सुटलो.

पण तात्पुरतेच सुटलो होतो...

सगळं नक्की झाल्यावर मग आम्ही गब्बू ला इंग्लण्ड ला दूरध्वनी लावला... ...
सौ. इंदिराजी," रसिका...[ हे सौ. क्षितिबाईं चं माहेरचं नांव ]...झालं बाई सगळं नक्की एकदाचं..."
सौ. क्षितिबाई," थॅंक्यू आई... ..खूप मज्जा येईल नाही सगळ्यांच्या बरोबर मंगलोर-कुक्के फिरायला... ..."
सौ. इंदिराजी,"अगं पण आतां पडेल ते कणकवली च्या प्रवासाची व्यवस्था लावायला हवी ना... ...त्याचं काय करायचं?"
सौ. क्षितिबाई," आई, त्याची तुम्ही मुळीच काळजी करूं नकां... ...माझे बाबा करतील ती सगळी व्यवस्था...मी सांगते त्यांना फोन करून आजच... ..."
सौ. इंदिराजीं चा कांटेकोर स्वभाव आतां वर आला," हे बघ रसिका... ...प्रवासाला आपण जाणार...आणि खस्ता तुझ्या बाबांना कश्यासाठी उपसायला लावायच्या?"
सौ. क्षितिबाई," आई...तुम्ही काळजी करणं सोडा बघूं पहिलं... ...बाबा एव्हढं करणार नाहीत काय आपल्यासाठी?"
सौ. इंदिराजी," अगं पण गाडी ची कणकवलीहून सुटायची वेळ तरी काय आहे?"
सौ. क्षितिबाई," पहाटे चार चाळीस...आणि मंगलोरला ती दुपारी तीन पन्नास ला पोंचते... ..."
सौ. इंदिराजी,"आणि पडेल ते कणकवली अंतर किती आहे?... ...म्हणजे तेव्हढा वेळ मध्ये ठेंवून पडेलहून किती वाजतां निघायचं ते बघायला हवं ना?"
सौ. क्षितिबाई," आई...पडेलहून कणकवली अंदाजे सव्वाशे कि. मी. अंतरावर आहे. !!!"
सौ. इंदिराजी," अगं म्हणजे पडेलवरून आपल्याला  अपरात्री अडीच-तीन वाजतांच निघायला लागेल ना?... ...मग तुझ्या घरच्या मण्डळीनां असला त्रास कश्याला द्यायचा उगीच म्हणते मी?... ...पडेलवरून एखादी टॅक्सी बिक्सी मिळेल काय ते बघून ठेंवा म्हणून सांग तुझ्या बाबांना... ...काय?"
सौ. क्षितिबाई," आई... ...अहो तुम्ही अतीच चिंता करताय्‌... ...बाबांना कसला आलाय्‌ त्रास त्यात?...मी करते काय ती व्यवस्था... ...तुम्ही डोंक्यातनं काढून टाका बघूं हे सगळं."
तरी सौ. इंदिराजींचं कांही केल्या समाधान होईना... ...त्यांचे घरांतच येरझारे सुरूं झाले, अन्‌ मी स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!! 

पण म्हणतात ना ’आंधळ्याच्या गाई देव राखी’... ...

हे सगळं संभाषण सकाळी झालं, अन्‌ दुपारी चार वाजतां सौ. क्षितिबाईंचे वडील श्री. दिलीपरावांचा फोन... ...
," नानिवडेकर साहेब, कुक्के संबंधी रसिका चा मला सकाळीच फोन आला होता... ..."
मी," दिलीपराव असं बघा... ..."
दिलीपराव मला मध्येच तोंडत म्हणाले,"तुमचं ते ’असं बघा, न्‌ तसं बघा’ राहूं दे बाजूला... ...ते काय बघायचं ते आम्ही बघून घेतो...!! तुम्ही फक्त पडेलपर्यन्त या बस नं... ...त्यापुढं तुम्हांला कणकवलीला पोंचवायची जबाबदारी आमच्याकडं लागली... ...त्याचा विचार तुम्ही करायचा नाही...!!!"
मी," अहो पण मी काय म्हणतो..."
दिलीपराव," कांही म्हणूं नकां... ...लेक-जावयासाठीच चाललंय्‌ ना हे सगळं...ऑं?... ...मग फाटे फोंडून कसं काय चालेल?... ...आणि समजा, मी फाटे फोडायला लागलोच, तर तुमच्या विहीणबाई घरांत राहूं देतील काय मला?... अहो कणकवली चं काय घेऊन बसलाय्‌...गाडी जर चुकलीच समजा, तर स्कॉर्पिओ आहेच ना आपली?... ...मंगलोरला पण पोंचवतो तशीच वेंळ आली तर...!!!... ...तेव्हां हा विषय संपलाय्‌ असं समजा... ...काय?"
मी निरुत्तर होत," ठीकाय्‌ दिलीपराव...धन्यवाद" म्हणत दूरध्वनी खाली ठेंवला.
हा आमचा गब्बू म्हणजे त्याच्या बाबां चा इतका ’वीक पॉइंट्‌’ असेल, असं तोंपावेतों तरी आम्हांला ठाऊक नव्हतं.!!!"

सगळं असं व्यवस्थित पार पडल्यानंतर सौ. इंदिराजी एकदाच्या शांत होऊन रोजच्या रामरगाड्याच्या मागं लागल्या... ...

होतां होतां दसरा-दिवाळीही उलटली, आणि डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात ९ तारखेलाच सौ. क्षितिबाईं चा दूरधनी आला...
सौ. क्षितिबाई," बाबा... ...लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...आज काय कार्यक्रम ठंरवलाय्‌त?"
मी," अरे कसला कार्यक्रम न्‌ काय... ...आम्ही आतां पंचविशीचे कां आहोत कार्यक्रम वगैरे आंखायला?"
सौ. क्षितिबाई,"असं कसं काय चालेल बाबा?... ...चाळीसाव्वा वाढदिवस ना हा तुमच्या लग्नाचा?... ...मग जंगीच व्हायला नको?"
मी," अरे बाबा, बापूं [ आमची कन्या सौ. मुग्धा ] चा सकाळीच दूरध्वनी आला होता की गुण्डाप्पा [ नात चि. दीक्षा ] ला तुमच्या लग्नाचा वाढदिवस जोरात साजरा करायचा आहे...तेव्हां दुपारपर्यंत इकडंच या म्हणून... ...तेव्हां आतां बघायचं तो काय काय करतोय्‌ ते... ..."
सौ. क्षितिबाई," अगदी तडाखेबन्द साजरा करा बाबा वाढदिवस... ...बेस्ट्‌ लक्‌... दुसरं म्हणजे... ..."
मी," दुसरं काय अजून?"
सौ. क्षितिबाई," बाबा...कुक्के प्रवासाची आरक्षणं करतांना तुम्ही म्हणाला होतां ना की ’आपण वीस तारखेला पुण्याहून निघून पडेल ला पोहोचूं, म्हणजे तिथं चारदोन दिवस तुझं माहेरपणही होईल, आणि एखादा भाकड दिवस जमेला धंरून पंचवीस तारखेलाच पडेलहून निघून दुपारी मंगलोर अन्‌ त्याच सायंकाळीं आठ वाजेपर्यंत कुक्के ला पोंहोचूं’ म्हणून?...तेंच फळाला आलं... ..."
मी चमकलोच," का?... ...काय झालं रे आतां?" 
सौ. क्षितिबाई नी बॉम्बगोळा टाकला," अहो काल आम्ही कुक्के ला नागराज ला फोन केला होता, सत्तावीस तारखेच्या पूजेचं सगळं ठंरवायला, तर त्यानं सांगितलं की सत्तावीस तारखेला सालाबाद च्या सुब्रह्मण्याच्या उत्सवाची सांगता असल्यामुळं त्या दिवशी पूजा होऊं शकणार नाही म्हणून...!!!"
मी आतां वैतागलोच, आणि माझ्या शेंजारीच उभ्या असलेल्या सौ. इंदिराजी नी दूरध्वनी यंत्र माझ्या हातातनं हिसकावून घेतलं," काय झालं गं क्षिति?"
क्षिति चं कथन दूरधनीवर ऐकतां ऐकतां च सौ. इंदिराजींच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरत गेलं, अन्‌ भुवयाही वक्र झाल्या," अगं मग त्या गधड्या नागराज ला हे सगळं सप्टेंबरमध्ये जेव्हां आपण रेल्वे ची आरक्षणं केली, तेव्हां ठाऊक नव्हतं काय?...ऑं?... ...तेव्हां काय धाड भरली होती काय त्याला तोंड उचकटायला?... ...अगं हजारांनी पैसा खर्च करून तुम्ही इंग्लण्ड वरून कुक्के ला दर्शन अन्‌ पूजेसाठी येणार आहांत हे माहीत होतं ना त्याला?... ...गाढव लेकाचा.!!!... ...तरी बरं...बाबांनी सांगितल्याप्रमाणं सव्वीस तारीख हातात मोकळी ठेवून आपण पंचवीस तारखेलाच कुक्के ला पोंहोचतोय्‌ म्हणून... ...आतां त्या नागराज ला फोन करून तंबी भर चांगली की कुठल्याही परिस्थितीत हा दर्शन-पूजे चा कार्यक्रम सव्वीस तारखेला पार पाडायची जबाबदारी त्याचीच असेल म्हणून... ...नाहीतर त्याचा दूरध्वनी क्रमांक दे मला."
सौ. इंदिराजीं च्या फुललेल्या नाकपुड्या बघून मी दूरध्वनीयंत्र त्यांच्या हातातनं काढून घेत सौ. क्षितिबाई ना विचारलं," मग पुढं काय केलंस तूं?"
सौ. क्षितिबाई," बाबा...आई नां कांही करायची गरज नाही... ...मी च सरळ केलाय्‌ त्या नागराज ला... ...!!!’सव्वीस तारखेला कुठल्याही परिस्थीत सगळं यथासांग पार पाडतो’ असं म्हणालाय्‌ तो मला..."
सौ. इंदिराजी," काय म्हणाली रसिका?"
मी," रसिका म्हणाली की नागराज ला तुम्ही फांसावर चंढवण्याऐवजी तिनंच त्याला सुळीं दिलेला आहे... ...!!!...तेव्हां लेकाचा संसार कसा काय होईल याची काळजी करणं आतां कायमचं सोडून द्या तुम्ही !!!... ...काय?"
सौ. इंदिराजी नी माझ्याकडं बश्याएव्हढे मोठ्ठाले डोळे करून बघत स्वतःच्या कपाळाला हात लावला... ...!!!

ठंरल्याप्रमाणं सौ. क्षितिबाई बारा डिसेंबरलाच इंग्लण्डहून पुण्यनगरीत घरीं दाखल झाल्या...चि. मीलन ला रजा जरा उशीरा मिळालेली असल्यानं चिरंजीव अठरा डिसेंबरला पुण्याला घरीं परतले, आणि घरीं दोन दिवस राहून आम्ही वीस तारखेला दिवसभर बस चा प्रवास करून सायंकाळीं सात वाजतां एकदाचे सौ. क्षितिबाई च्या माहेरीं म्हणजे पडेल ला पोंचलो. 

पुढचे चार दिवस व्याह्यांच्या घरच्या मण्डळींच्या गांठीभेंटीत छान गेले... ...

आणि पंचवीस तारखेला अपरात्रीं तीन वांजतांच आम्ही कणकवली ला निघायची आवराआवर करायला उठलो...अन्‌ बघतो तर काय, घरातल्या आज्जीं सकट सगळ्या लेकीसुना रात्रीं एक वाजतांच उठून स्वयंपाकाला लागलेल्या होत्या...!! प्रवासातल्या आमच्या सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीपर्यंतच्या भोजनाची सर्व व्यवस्था डबाबंद झालेली होती... ...आमच्या व्याह्यांच्या घरच्या लोकांचं ते अगत्य बघून आतां सौ. इंदिराजीनींच आं वांसत स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!! 

दिलीपरावांच्या बरोबर आमच्या विहीणबाई सौ. माधुरीबाईही आम्हांला निरोप द्यायला कणकवलीपर्यंत जातीनं सोबत आल्या... ...शे-सव्वाशे कि. मी. चा प्रवास करून आमची वरात पहाटे चार वाजतां कणकवली रेल्वे स्थानकावर पोंहोचली.
डिसेंबर महिन्यातल्या कडक थण्डीचे दिवस असल्यानं कुडकुडायला होत होतं... ...
बिचार्‍या व्याही-विहीणबाई नां तसल्या थण्डीत झोंपेचं खोबरं होईतोंवर परत सवाशे कि. मी. चा प्रवास करून घरीं परतावं लागणार होतं... ...माझा चेहरा जरासा चिंतातुर झालाच...
ह्या बायका जन्मतःच मनकवड्या असतात की काय देव जाणे... ...
सौ. माधुरीबाई म्हणाल्या," हे बघा बाबा...तुम्ही उगीच मनाला लावून घेऊं नकां... ...अहो आपल्या माणसांसाठी झिजायचं नसेल, तर कुणासाठी झिजायचं असतं?... ...आमची चिंता करूं नकां... ...हे सगळं करण्यातच समाधान आहे आम्हांला... ...कळलं?"
भल्याभल्या पण्डितांना न उमजलेलं जगायचं तत्त्वज्ञान साध्यासुध्या माधुरीबाईनां पंचलेलं बघून मी च आवाक्‌ झालो.

स्थानकावर त्या तसल्या अवेळी गाडी पकडायला आलेले पांचसातच प्रवासीच केवळ तांटकळत गाडीची वाट पहात बसलेले होते... ...बाकी सारा सन्नाटा, अन्‌ साथीला रातकिड्यांची किर्र् किर्र्... ...बस्स्‌.
हळूं हळूं ओंळखी-पाळखी झाल्यावर त्यातले एक गृहस्थ म्हणाले, की गाडी वेळेवर आहे की कसं ते बघायला हवं... ...
म्हणून मग चि. मीलन नं त्याच्या मोबाईलवर आगगाडी चं वेळापत्रक काढून पाहिलं अन्‌ सांगितलं की ’गाडी अगदी वेळेवर असून आत्तां कुडाळ स्थानकावर उभी आहे...तिथून ती पांचएक मिनिटात सुटेल.’
तेंव्हढ्यात दिलीपराव कुठूनतरी एका कटिंग चहावाल्याला धंरून घेऊन आले, आणि भल्या पहांटेच्या बर्फाळ थण्डीत आम्ही सगळे ते रेल्वे स्थानकावरचं चहा नामे कोमट पाणी जिभल्या  चाटत प्यालो...!!!
चहा होतोय्‌ न होतोय्‌ तोंवर फलाटाच्या टोंकाला आगगाडीच्या इंजिनाचं धूड दिसायला लागलं...
मी घड्याळात बघितलं... ...बरोब्बर चार चाळीस झालेले होते...!!!
घड्याळ दाखवत मी चि. मीलन ला म्हटलं," बघितलंस?... ...नेहमी किमान चारपांच तास तरी उशीर करणार्‍या ह्या रेल्वेगाड्या...आज बरोब्बर सेकंदावर हजर... ...मी नेहमी सांगतो ना तुला ’आंधळ्याच्या गाई देव राखी’ म्हणून? ते हे असं असतं... ...हा गब्बू अन्‌ इंदिराजी आहेत ना बरोबर? तेव्हां गाडी वेळेवरच उगवणार... ...काय?"
आमच्या बुद्धिप्रामाण्यवादी तर्कनिष्ठ चिरंजीवांना ’योगायोग’ ’नियति’ ’कर्मभोग’ असले तात्त्वज्ञानिक पराशास्त्रीय शब्दप्रयोग पचनी पडत नाहीत," तुमचं कांहीतरीच तर्कट असतं बाबा...ह्या दोघी आज येणाराय्‌त हे काय रेल्वेच्या चालकाला माहीत होतं काय, म्हणून त्यानं गाडी अगदी वेळेवर पिटाळली?...कांही अर्थ नाही ह्या तुमच्या म्हणण्यात... ..."
तोंवर गाडी फलाटाला लागली, आणि आम्ही सामानसुमानासकट एकदाचे गाडीत चंढून स्थानापन्न झालो... ...
तीनचार मिनिटांतच गाडीची शिट्टी वाजली...दिलीपराव आणि माधुरीबाईनीं हात हलवून आम्हांला निरोप दिला... ...’कुक्के’ ला पोंचलात की फोन करा’ म्हणून आवर्जून सांगितलं, आणि गाडी मंगलोरच्या दिशेनं मार्गस्थ झाली.

रात्रीच्या जाग्रणानं एखादा तासभरच सगळ्याना डुलकी लागली, अन्‌ सकाळी सात वाजतांच सगळे पुन्हां जागे झाले.

मग कोकण रेल्वे चा तो निसर्गसुंदर मार्ग बघण्यात आम्ही सगळेच हरवून गेलो... ...
विशेषतः मंगलोरच्या खाडीपुलावरून गाडी धांवतांना दुतर्फा दिसणारी अथांग समुद्राची शोभा डोंळ्यांचं पारणं फेंडणारी होती खरीच. कोंकणावर निसर्गानं मुक्तहस्तानं उधळलेलं सृष्टिसौंदर्य बघत बघत दुपारचे तीन कधी वाजले ते समजलं देखील नाही. मंगलोरच्या आधीचं स्थानक मागे पडलं आणि सहप्रवाश्यांची सामानसुमान आंवरायची गडबड सुरूं झाली...
सौ. इंदिराजी घडाळ्यात बघत मला म्हणाल्या," बरं झालं बाई...देव पावला म्हणायचा... ...गाडी बरोबर तीन पन्नास ला निर्धारित वेळेत मंगलोरला पोंचेल बहुतेक...म्हणजे कुक्के ला जाणारी चार वाजताची एकमेव बस कशीबशी मिळेल आपल्याला... ..."
इतक्यात आमच्या समोरच्या बर्थवर बसलेले मंगलोरचेच एक गृहस्थ चमत्कारिक नजरेनं सौ. इंदिराजीं कडं बघायला लागले, अन्‌ सौ. इंदिराजी त्यांना म्हाणाल्या," कां हो... ...काय झालं?"
ते गृहस्थ हंसले, अन्‌ त्यांनी विचारलं,"मॅडम, तुम्ही या गाडीची आरक्षणं केव्हां केली होती?"
सौ. क्षितिबाई उत्तरल्या," काका, अहो सप्टेंबर महिन्यातच केली होती आरक्षणं... ...नाहीतर आगगाडीच्या इतक्या लांबच्या प्रवासात ऐनवेळी बर्थ कश्या मिळतील हो?"
गृहस्थ," तरीच..."
सौ. इंदिराजी," तरीच...म्हणजे काय?"
गृहस्थ,"मॅडम, दरवर्षीं १ नोव्हेंबर ला आगगाड्यांची वेळापत्रकं सुधारित होत असतात, आणि बर्‍याच गाड्यांची वेळापत्रकं पुढंमागं होतात... ...तुम्ही आरक्षणं झाल्यानंतर १ नोव्हेंबरनंतर ह्या गाडीचं वेळापत्रक परत तपासून बघितलं होतं काय?"
सौ. क्षितिबाई,"नाही काका... ...अहो पुढच्या सगळ्या धामधुमीत ते राहूनच गेलं बघायचं... ...कां काय झालं?"
गृहस्थ," तुम्ही ही गाडी कुठल्या स्थानकावर पकडलीत?"
सौ. क्षितिबाई," कणकवलीला काका..."
गृहस्थ," आणि किती वाजतां गाडी पोंचली कणकवलीला?"
सौ. इंदिराजी," म्हणजे काय?... ...अगदी सेकंदाबरहुकूम गाडी आली कणकवली स्थानकावर...पहांटे चार चाळीसला... कां बरं?"
गृहस्थ मग मिश्किल नजरेनं सौ. क्षितिबाईंकडं बघत म्हणाले," भाग्यवान आहेस बेटी... ... सुब्रह्मण्याच्या दर्शनाला चालली आहेस ना?... त्यालाच तुझी काळजी असणार...!!!...दुसरं काय?...आमच्या कारवारी भाषेत एक म्हण आहे बघ ’आंधळ्याच्या गाई देव राखी’ अशी... ...तिचाच प्रत्यय आलाय्‌ तुम्हांला... ..."
सौ. क्षितिबाई," म्हणजे?... ...मी नाही समजले काका... ..."
गृहस्थांनी मग अखेरचा अणुबॉम्बस्फोट घडवला," खरी गोष्ट अशी आहे बेटी, की गेल्या एक नोव्हेंबरपासून ह्या गाडीचं वेळापत्रक बदललेलं आहे, आणि ते दीडतास अलीकडं आलेलं आहे...!! 
काल ही गाडी मुंबई स्थानकावरून सुटतांनाच नेमकी दीडतास उशीरा सुटलेली होती, आणि चालकाला तो उशीर मधल्या प्रवासात भंरून कांढतां आला नाही, म्हणून ती आधीच्या वेळापत्रकानुसार बरोब्बर चार चाळीसला कणकवली स्थानकावर पोंचली... ...!!
ती जर निर्धारित वेळेनुसार धांवली असती, तर पहाटे तीन दहालाच कणकवली स्थानकावरून सुटली असती... ...!!! आतां समजलं काय झालंय्‌ ते?"
सौ. क्षिति आतां मात्र थक्क होऊन खो खो हंसायलाच लागली...!
सौ. इंदिराजी नी डोंळे छताकडं फिरवले... ...!!
मी आं वांसून त्या सद्‌गृहस्थांच्याकडं बघायला लागलो, अन्‌ बघतच बसलो... ...!!!
अन्‌ आमच्या बुद्धिप्रामाण्यवादी तर्कनिष्ठ चिरंजीवानीच हतबुद्ध होत स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला... ... ...!!!!

मी मग भानावर येत त्या गृहस्थांना म्हटलं,"सर...तुम्ही आतां जी म्हण सांगितलीत ना, ती आमच्या मराठीत पण रूढ आहे बघा... आणि ती अगदी आनुभविकही आहे... ...अहो कणकवलीला आमची ही गाडी जरी चुकली असती ना, तरी कांहीही बिघडलं नसतं..."

आतां मात्र खुद्द गृहस्थच आश्चर्यचकित झाले," ते कसं काय हो?"
मी मग आमच्या गब्बू-इंदिराजीं कडं नजरेनंच निर्देश करीत त्यांना म्हटलं," अहो ह्या मण्डळींचा पूर्वपुण्यसंचयच इतका जबरदस्त असतो ना, की आमची कुक्के यात्रा जर हुकली असती, तर त्या बिचार्‍या सुब्रह्मण्यानं पहांटे उठून कुणाला नकळत स्वतःच स्वतःची पूजा अन्‌ काकड आरतीही करून घेतली असती...ह्यांच्या वतीनं...!!!...काय?"
आतां मात्र ते सद्गृहस्थ मला फाड्‌दिशी टाळी देत खदांखदां हंसायला लागले... ... ...!!
आणि सौ. क्षिति-इंदिराजी जोडीनं निरुत्तर होत आपापल्या कपाळांना हात लावले.!!!! 

*****************************************************************************************


-- रविशंकर.

१६ जून २०१५.

No comments:

Post a Comment