Search This Blog

Friday 10 April 2015

॥ अस्तित्वाचा दाखला ॥

॥ अस्तित्वाचा दाखला ॥



आपल्या महान भारत देशात कागदोपत्रीं कांहीही घडूं शकतं... ... ...कांहीही म्हणजे अगदी काय वाट्टेल ते... ... ...
वस्तूं गडप होतात... ... नकाशे गडप होतात... ... फायली गडप होतात... ...खिसाफाडूं बिलं तयार होतात... ...
इमारतीच्या इमारती एकीकडून दुसरीकडं स्थलान्तरित होतात... ... भलत्या लोकांना नोटिसा जातात... ...
अस्तित्त्वात नसलेल्या तारणावर कर्जं दिली जातात... अन्‌ बुडविलीही जातात... ...
चोरांच्या  जागी सन्याशी फांसावर चंढतात... ...!! आणि त्यांना खुद्द चोरच फांसावर लटकवतात...!!!
नानाविध ओंळखपत्रावर पुरुषांचं स्त्रीत अन्‌ स्त्रीचं पुरुषांत शस्त्रक्रियेविनाच परिवर्तनही होतं... ...!!
निवडणुकांच्या मतदार याद्यातनं अस्तित्त्वात असलेली माणसं गडप होतात... ...!!!
आणि अस्तित्त्वात नसलेली माणसं जिवन्त होऊन मतदान पण करतात... ...  ...!!!!
तात्पर्य, आपल्या भारत देशात इतर कुठल्याही गोष्टीपेक्षां कागदाचं महत्त्व निर्विवादपणे श्रेष्ठ आहे... ... अगदी राष्ट्रपतींपेक्षाही.
असले भन्नाट चमत्कार त्याच देशात घडूं शकतात, ज्या देशाच्या सरकारचा ’तैमूरलंग’ झालेला असतो, आणि जनतेचा ’शेख महंमद.’
अगदी अलीकडंच श्री. अण्णा हजारेनाही जाहीरपणे जनतेला खडे बोल सुनवावे लागले होते, की नुस्तं माझं नांव छापलेल्या टोप्या घालून अन्‌ आरोळ्या ठोंकून कुणी अण्णा हजारे होत नसतो.!!! 
ह्यापेक्षा वाईट लाथा अजून कसल्या आणि कुणाच्या खायच्या असतात?
अण्णा हजारेंनी हाणलेल्या त्या चंपराकीची पण कुणाला कसली लाजलज्जा वाटल्याचं आजतागायत माझ्या ऐकिवात नाही... ...वाचण्यात तर सोडाच. 
देशप्रेमाचा गंध नसलेल्या, परदेशांच्या कच्छपी लागलेल्या, स्वत्त्वाचा कणा गायब झालेल्या, नैतिकतेचं दिवाळं काढलेल्या, आणि सारासार विवेक गहाण टाकलेल्या, विधिनेषेधशून्य जनतेच्या नशिबीं तिच्या स्वतःच्या लायकीचंच जिणं लिहिलेलं असतं... ... ... दुसरं काय होणार?  

तर एकदां काय झालं, की मी दर महिन्याच्या पांच तारखेच्या माझ्या परिपाठाप्रमाणं इंटरनेटवर माझं पगार खातं, ज्याला इंग्रजीत आपण ’सॅलरी अकाउण्ट’ असं संबोधतो, ते तपासून पहात होतो. ठिकठिकाणाहून खात्यात इंटरनेटद्वारे जमा होणार्‍या निवृत्तिवेतनाच्या रकमा जमा झाल्याय्‌त की नाही ते ही बघत होतो.
तारीख होती ५ एप्रिल २००७.
अचानक माझ्या लक्ष्यांत आलं की एका निमसरकारी खात्याकडून दरमहा जमा होणारी निवृत्तिवेतनाची रक्कम खात्यात जमा झालेली नाही... ... ... साधारणपणे दरमहा दोन तारखेपर्यन्त ती जमा होत असे.
आतां मध्येच एखाददुसरा रविवार अथवा सार्वजनिक सुटीचा दिवस जरी उपटला, तरी पांच तारखेपावेतों तरी वेतन खात्यात जमा व्हायला हवं होतं.
कांहीतरी बल्ल्या झालेला आहे एव्हढं माझ्या लक्ष्यात आलं... ... ...
चला... ... ... आतां द्या सोडून हातातली कामंधामं वार्‍य़ावर, अन्‌ धांवा ' सरकारी कर्मचारी '  नामे नारायणाचा ’धांवा’ करायला. !!!
हे ही आपल्या महान देशाचं एक वैशिष्ट्य आंहे... ... कुठल्या वेळी कसलं लचाण्ड मागं लागेल, हे परमेश्वरही सांगूं शकत नाही...!!!!
ह्या निवृत्तिवेतन वितरणाचंही एक वैशिष्ट्य आहे... ... ...
निवृत्तिवेतन ज्या कार्यालयातनं चुकतं होतं, त्या कार्यालयाकडं न चुकतां दरवर्षीं ’ अमुक तारखेला ही व्यक्ति जिवन्त होती, आणि तिनं माझ्या समक्ष ह्या दाखल्यावर सही केलेली आहे’, अश्या मजकुराचा कुणीतरी राजपत्रित अधिकार्‍यानं प्रमाणित केलेला एक कागद पांठवावा लागतो. 
आणि तो पाठवायच्या तारखाही कार्यालयानुरूप भिन्नभिन्न असतात. कुणाची १ एप्रिल, तर कुणाची ३० जून, कुणाची १५ नोव्हेंबर तर कुणाची १० जानेवारी.
थोडक्यात, एकदां कां निवृत्ति चा शिक्का कपाळीं बसला, की त्या माणसाला दरवर्षी पांचसहा वेळातरी आपल्या मायबाप सरकारला कागदोपत्रीं असं सिद्ध करून द्यावं लागतं की  ’ मायबाप... ... ...मी अजून जिवन्त आहे... !!... ... कळावे, लोभ असावा, ही विनन्ति.’ !!! 
ह्या कागदाला आपल्या देशांत ’अस्तित्त्वाचा दाखला’ असं म्हणतात... ... ...
आणि ह्या कागदाचं महत्त्व, प्रत्यक्ष त्या जिवन्त व्यक्तिपेक्षाही निर्णायकपणे श्रेष्ठ असतं.
कारण हा कागद जर केलेला नसेल तर त्या माणसाची तत्क्षणीं मृतांत जमा होते...!!...तो अथवा ती वास्तवात जिवन्त असले तरी. !!! 

आतां माझ्या बाबतीत तसला कांही प्रश्न नव्हता म्हणा... ...
कारण सालाबादच्या प्रथेनुसार मी तो कागद ई-मेल द्वारे दोन तारखेलाच मायबाप सरकारला पांठवलेला होता.
मग निवृत्तिवेतन कुठं गडप झालं?
असले कूटप्रश्न ’न्यूटन-आईन्‌स्टाईन्‌’ सारख्या भल्याभल्यानांही सोडवतां येत नसतात. !!
त्यासाठी ’ मेर्‍या महान भारता ’ त च जन्माला यावं लागतं... ...!!!!   
अब आयी बात समझमे?

सुदैवानं सदर प्रश्नाशी संलग्न असलेलं कार्यालय माझ्या घरापासून मैलभर अंतरावरच होतं.
म्हणून मग मी स्वतःच जाऊन काय झालंय्‌ ते बघावं, म्हणून कपडे-बिपडे चंढवायला सुरुवात केली.
तेव्हढ्यात सौ. इंदिराजी उपस्थित झाल्याच... ...
सौ. इंदिराजी," कुठं निघालाय्‌ असे घाईघाईनं?"
मी," एक निवृत्तिवेतन गडप झालंय़्... ..."
सौ. इंदिराजी," छान... ...म्हणजे पेशवे पानिपतावर निघालेत तर... ...!!"
मी," का s s s s s s य ?"
सौ. इंदिराजी," नाही... ... म्हणजे नवीन चढाईची तयारी चाललीय्‌ वाटतं... ... ..."
मी," मग निवृत्तिवेतन गडप झाल्यावर काय एकतारी वाजवत बसूं?... ... ...ऑं?"
सौ. इंदिराजी," बरं झालं... ...नाहीतरी तुम्हांला हौस आहेच भांडणं नी हाणामार्‍या करायची... ... ...तेव्हढाच नवा उद्योग...!!"
मी तंडकलो," मला अजून तरी कुत्रं चांवलेलं नाही !!! ... ...काय?"
सौ. इंदिराजी," कुत्रं चांवलेले पण इतकी भांडणं करीत नाहीत जिथंतिथं जाऊन !!"
मी," अहो आपल्या मायदेशांत हल्ली सगळेच असे साप चांवल्यासारखे डंसायला लागलेत... ... त्याला मी काय करूं?"
सौ. इंदिराजी," खुद्द राष्ट्रपतीबरोबरच वाजायचं काय ते अजून शिल्लक राह्यलंय्‌... ...तेव्हढं एकदां उरकून टाका!!!... ... समजलं?"
मला असं चितपट मारून सौ. इंदिराजी मख्खपणे स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या... ... ...
आणि मी त्यांच्यावरचा राग स्कूटरवर काढत तिला एक सणसणीत लाथ घातली, अन्‌ मायबाप सरकारकडं मार्गस्थ झालो. !!

नेहमीच्या थाटानुसार सरकारी कार्यालयात ’अडल्या नारायणां’ चा कुंभमेळा भंरलेला होता... ... ... अन्‌ त्यांच्या सेवेला वेगवेगळ्या मेजावर मख्ख चेहर्‍याचे सरकारी ’शिराळशेट’ स्थानापन्न झालेले होते.!!
मी विचारपूस करत करत निवृत्तिवेतनवाल्या ’छत्रपति’ पर्यंत पोंचलो. कुणीतरी दहीभाते आडनांवाचे गृहस्थ सिंहासनीं बसलेले होते.
त्यांनी स्वतःच्या खिश्यातनंच जणूं कांही निवृत्तिवेतन जनतेला देत असल्याच्या थाटात मला विचारलं," हं... ...काय आहे?"
मी सरळपणे सगळं सांगितलं... ... 
छत्रपति नी शांतपणे खिश्यातनं एक काड्यापेटी काढली ... ...
आणि तिच्यातनं एक काडी काढून मख्खपणे कान टोंकरत मला विचारलं," अस्तित्त्वाचा दाखला आणलाय्‌ काय?"
मी," दोन तारखेलाच ई-मेलवर पाठवलाय्‌ मी."
छत्रपति," अर्ध्या तासानं या... ...मग बघूं."
मी," अहो मग आत्तांच बघा की... ... माझा अर्धा तास कश्याला फुकट घालवताय्‌?"
छत्रपति," माझं ट्रेनिंग अजून व्हायचंय्‌..."
मी," कसलं ट्रेनिंग व्हायचंय्‌ तुमचं अजून?"
छत्रपति संगणकाकडं बोंट दाखवत उत्तरले," ह्या चं !!"
मी आतां चिडलो," असं होय?... वा वा... मग तुम्ही इथं बसून काय करताय्‌?"
छत्रपति मखखपणे उत्तरले," कान खाजत होता म्हणून काडी घ्यायला आलो होतो इथं... ... ...!!!"
मी," मग इथले गृहस्थ कधी येणाराय्‌त?"
"येतील धा मिण्टात", असं सांगून छत्रपति पसार झाले.!!

जवळ जवळ पाऊण एक तासानं अंगाचा तिळपापड व्हायची वेळ आल्यावर दुसरेच एक गृहस्थ येऊन सिंहासनावर बसले," हं... ... काय आहे?"
मी," तुम्हीच काम करतां काय ह्या टेबलवर?"
गृहस्थ," मग काय उद्योग नाही म्हणून आलोय्‌ इथं?...हं बोला."
मी," असं होय?.. ...मला वाटलं की तुम्हीपण काडी शोधायला आलात की काय इथं ... ..."
गृहस्थ," काडी कश्याला?"
मी," अहो कान टोंकरायला... ...मघाशी एक गृहस्थ इथं तेच करत बसले होते... ...!!
तेव्हां मला वाटलं की हे कान टोंकरायचं टेबल आहे की काय? म्हणून विचारलं... ...आपलं नांव?"
गृहस्थ," मी मानकापे... ... ...बोला.!!"
मी परत सगळं महाभारत सांगितलं... ...
मानकापे नी मग तर्जनीनं एकेक बटण सावकाश दाबत संगणक सुरूं करत विचारलं," दाखला पाठवलाय्‌ काय?"
मी," अहो दोन तारखेलाच पाठवलाय... ...आत्तां पांच तारखेला काय विचारताय्‌ ’पाठवलाय्‌ काय?’ म्हणून?... ...ऑ?"
मानकापे नी माझं खातं उघडून बघितलं आणि बॉम्ब टाकला," दाखला चुकीचा आहे साहेब... ...चालणार नाही. !!"
मी," कां चालणार नाही?"
मानकापे," दाखला दोन तारखेचा आहे... ... एक तारखेचा लागतो... ...!!"
मी चंवताळ्लो," अहो मी दोन तारखेला जिवन्त आहे असं हा दाखला म्हणतोय्‌... ... म्हणजे मी एक तारखेला पण जिवन्त होतो ना? 
आणि आज पांच तारखेला पण तुमच्यासमोर जिवन्त उभा आहे ना ?... ... ...काय?"
मानकापे," तसं चालत नाही साहेब... ...तुम्ही जिवन्त आहांत असा एक एप्रिलचा दाखला लागतो.!!!"
असं म्हणून मानकापे नी समोरच्या भिंतीवरच्या पाटीकडं बोट दाखवलं... ...
पाटीवर लिहिलेलं होतं... ...

**************************************************************************************
सर्व निवृत्तिवेतनधारकांस नम्र सूचना... ...
वेतनधारकांच्या अस्तित्त्वाचा दाखला दरवर्षी एक एप्रिलपर्यंत संबंधित दप्तरीं दाखल 
करणेचा आहे.    
अन्यथा, वेतन थांबविले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

                                             ---- हुकुमावरून
**************************************************************************************
असल्या विनम्र भाषेतल्या धमकीवजा सूचना कश्या द्याव्यात हे भारत सरकारकडूनच शिकावं.
असल्या पाट्या कुठंही दिसतात... ...अगदी कुंपणाच्या भिंतीवरसुद्धां... ... ...
आतांपावेतो मला लघुशंकेची जाणीव झाली... 
प्रथम ते कार्य उरकावं आणि मग ह्या मानकापे ला बघून घ्यावा, म्हणून विचारपूस करीत मी आवारातलं स्वच्छतागृह गांठलं... ...
स्वच्छतागृहाच्या भिंतीवरही खास सरकारी तंबी भरणारी पाटी लावलेली होती... ...


’येथे घाण करणेस सक्त मनाई आहे.

                      ----- हुकुमावरून  !!!

आतां घाण करण्यासाठीच खास बांधलेल्या त्या इमारतीवरचा तो अस्सल सरकारी हुकूमनामा बघून मी खो खो हंसत कपाळाला हात लावला. !!!!

जागोजाग लटकणारे हे असले हुकूम कोण देतं... कुणाला देतं... केव्हां देतं... ... कुठं देतं... ... ... आणि कश्यासाठी देतं? 
ते फक्त भारत सरकारलाच ठाऊक असतं... ... ...
खुद्द परमेश्वरालाही त्याचा थांगपत्ता नसतो. !!
जागोजागीं लागलेल्या ह्या असल्या पाट्या बघून आपला भारत हा लोकशाही देश नसून हुकूमशाही देश आहे अशी माझी जन्मतःच खात्री पटलेली आहे. !!!
असो....
मी तंरकटून मानकापे ना विचारलं,"पाटीवर ' एक एप्रिल तारखेचा दाखला लागतो ' असं कुठं लिहिलंय्‌?"
मानकापे," आम्हांला ते माहीत असतं... ...तसा हुकूम आहे...!! 
तुम्हांला एक एप्रिलचा दाखला आणावा लागेल साहेब... ...दाखला आणलात की वेतन सुरूं होईल... ..."
असं म्हणून त्यांनी दोन तारखेला पाठवलेला अस्तित्त्वाचा दाखला माझ्या हातांत कोंबला.!!!"

आतां ह्या मानकाप्याची जन्माची खोड तोडल्याशिवाय हे सगळं सरळ होणार नाही, एव्हढं माझ्या लक्ष्यांत आलं... ... 
नुस्ता वाद घालून कांही उपयोग नव्हता... ... ...
दाखला घेऊन मी बाहेरच्या आवारात निघालो, डोंक्यात विचारचक्र फिरायला लागलं... ... काय करावं? 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोंचलो, अन्‌ पांठीमागून माझ्या पाठीवर धप्प्‌कन्‌ थांप पडली.
बघतो तर काय... माझा महाविद्यालयातला जुना वर्गमित्र शिवाजी थोरात समोर उभा. !!!
हा शिवाजी थोरात माझ्या बरोबर एफ्‌. वाय्‌. बी. एस्सी. ला होता.मी अभियांत्रिकी निवडली, आणि हा शिवाजी एम्‌.एस्स.सी. एल. एल. बी. करून यू. पी. एस. सी. च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला होता.
आणि कायमचा भारत सरकारच्या सेवेत विविध मानाच्या पदांवर काम करीत होता.
अतिशय बहुश्रुत, अन्‌ हजरजबाबी गडी म्हणून कॉलेजभर प्रसिद्ध पण होता.

शिवाजी,"काय नाना... ... ...कसं काय चाललंय?"
मी,"साल्या शिवज्या... ...इथं कसा तूं ?... ... औरंगाबादला होतास ना जिल्हाधिकारी म्हणून? इथं काय करतोय्‌स मग?... ...ऑं?"
शिवाजी,"साल्या माझ्याच कार्यालयाच्या आवारात उभा राहून मलाच विचारतोय्‌स... ...’ इथं कसा’ म्हणून? 
अरे गेल्या महिन्यातच इथं बदलून आलोय आयुक्त म्हणून... ... तुझा दूरध्वनी क्रमांकच माझ्या मोबाईलमधनं गडप झाला बघ‌...
त्यामुळ फोन पण करतां येईना तुला... बरं झालं गांठ पडलास ते.
चल नाना... ...माझ्या ऑफिसात बसूनच बोलूं या जरा... ...बर्‍याच वर्षांनी भेंटतोय्‌ आपण."
असं बोलून शिवाजी नं मलाही त्याच्या गाडीत कोंबला, आणि आमची वरात आयुक्त कार्यालयाच्या दमदार इमारतीसमोर जाऊन उभी राहिली.
शिवज्याच्या दरवानानं कडक सलाम ठोंकत त्याच्या कक्षाचं दार अदबीनं उघडलं, अन्‌ आम्ही आंत जाऊन स्थानापन्न झालो.
शिपायाला चहा आणायला सांगून शिवाजी माझ्याकडं वळला... ...
," हं बोल नाना... ... तूं इथं कसा काय?... ... ...कसं काय चाललंय्‌?"
हा प्रश्न ऐकतांच माझ्या डोंक्यात चाललेलं मानकापे भिरभिरं एकदम थांबलं, अन्‌ मला एक मस्त कल्पना सुचली त्याची खोड तोडायची.
मी," एक दाखला प्रमाणित करून हवा होता शिवज्या... ...त्यासाठी आलो होतो... ..."
शिवाजी," मग?... ... ...झालं काम?"
मी," साले हो, तुमचा हा दरबार म्हणजे काय अकबर बादशहाचा दरबार समजताय्‌ काय रे लेको तुम्ही... ... झटपट कामं व्हायला?... ... ...ऑं?"
शिवाजी," कां?... ...काय झालं?"
मी," निवृत्तिवेतन गडप झालंय्‌ ... ... ..."
शिवाजी," कां बरं ? "
मी," मी जिवन्त समोर उभा असून ’हा जिवन्त आहे’ असा दाखला मागतंय्‌ आपलं मायबाप सरकार... ... समजलं?"
शिवाजी," एव्ह्ढंच ना साल्या?... मग त्यात काय झालंय्‌ रे एव्हढं आदळ आपट करायला? अस्तित्त्वाचा दाखला द्यावा लागतोच... ... आणलाय्‌स काय तयार करून? 
आण इकडं... ...देतो सहीशिक्के मारून... ...मग तर झालं ना?"
मी," आणलाय्‌ मी... ...पण तुझ्या कार्यालयातल्या छत्रपतीनं तो दुरुस्त करून परत प्रमाणित करून आणायला सांगितलंय्‌... ...!!"
शिवाजी," कोण हे छत्रपति?"
मी," मानकापे नांवाचे गृहस्थ आहेत... ..."
शिवाजी," निबंधकांच्या कक्षाशेजारच्या टेबलावर बसताता तेच ना?... ...पानाचा तोंबरा कायम चंघळणारे ?"
मी," बरोबर... ...तेच."
शिवज्यानं मेजावरच्या घण्टीचं बटण दाबून शिपायाला बोलावला, अन्‌ म्हणाला," फुटाणे... ...जरा निवृत्तिवेतन विभागातल्या मानकापेना बोलावून आणा लगेच."
शिपाई निघून गेला, अन्‌ शिवाजी म्हणाला," चल आण तुझा दाखला इकडं... ... ..."
मी मानकापेनी परत दिलेला दाखला बॅगमधनं बाहेर काढला... 
त्यावर माझ्या सहीच्या वरतीच जरूर ती दुरुस्ती करणारी एकच ओळ हातानं लिहिली... ... 
आणि तो शांतपणे शिवाजीकडं सरकवला... ... ...
शिवाजी नां चष्मा चंढवून दाखल्यावर नजर टाकली, अन्‌ आं वांसत स्वतःच्या कपाळावर फाड्‌दिशी हात मारून घेतला.. !!
दाखल्याचा मजकूर आतां असा झालेला होता... 

**************************************************************************************
अस्तित्त्वाचा दाखला
पुणे दि. ५ एप्रिल २००७

मी. खाली सही  करणार श्री. ......................असं प्रमाणित करतो की
श्री. रविशंकर वय वर्षे ६३ रा. मयूर कॉलनी पुणे ३८, हे गृहस्थ आज रोजीं हयात असून मी त्यांना ओंळखतो.
त्यांनी माझ्या समक्ष सदर दाखल्यावर सही केलेली आहे.

सदरहू गृहस्थ श्री. रविशंकर हे दि. १ एप्रिल २००७ रोजी सुद्धां जिवन्त होते. !!!!


े                                                                         ----- हुकुमावरून. 


निवृत्तिवेतनधारकाची सही
श्री. रविशंकर.


प्रमाणित करणार्‍या राजपत्रित अधिकार्‍याची स्वाक्षरी

हुद्दा आणि मोहोर

**************************************************************************************
शिवज्या," धन्य आहेस नाना... ...काय चेष्टा आरंभलीय्‌स काय साल्या माझी?... ...ऑं?... ...काय लिहून आणलंय्‌स हे?"
मी," चेष्टा तुझ्या कार्यालयातल्या मानकापे छत्रपतीनं आरंभलेली आहे शिवज्या... ...समजलं?... बरं झालं तूं भेटलास इथं म्हणून... ... ...
ह्या मानकापे नं अश्याच आणखी किती जणांच्या माना कांपून ठेवल्याय्‌त त्याची शिरगणती कर जरा... ... ... काय?"

शिवाजी नं मानकापे ना पाचारण केलेलंच होतं... ...तो कांही न बोलतां समोरच्या कागदांचा फडश्या पाडायला लागला... ...
कागद बघतां बघतां तो एकदम हंसला, मग माझ्याकडं वळून म्हणाला," नाना मानकापे येत आहेतच... ...
आतां तूंच बघ तुझ्या केस चा कसा कायमचा निकाल लावतो ते... ... ... 
इतउप्पर हा मानकापे तुझ्याकडं मान वर करून देखील बघणार नाही...!!!... ...काय?"

इतक्यात शिपायानं पुढं घालून आणलेले श्री. मानकापे सावकाश दालनात आले... ... ...
मघाशी तांठ असलेल्या छत्रपतीनीं पाठीचा कणा गायब झाल्यागत शिवरायांना लवून मुजरा केला... ...!!
अन्‌ मला समोर बसलेला बघितल्यावर छत्रपतीनां फेफरं यायचंच काय ते बाकी राहिलं...!!!
शिवाजी समोरचे कागद बघतच होता... ... ...
मानकापे हंळूच मला म्हणाले," नमस्कार साहेब... साहेबांच्याकडं काम काढलं होतं काय?"
मी," होय... ...अहो ते तुमच्या दाखल्याचंच काम... ...
म्हटलं कश्याला हेलपाटे घालत बसायाचं?... ... तुमच्या खापरपणजोबांचीच सही घ्यावी अन्‌ मोकळं व्हावं !!!
म्हणून आलोय् इथं ‌... ...सही शिक्के झाले की येतोच दाखला घेऊन... ... ...काय?"
मानकापे कांही बोलले नाहीत... ...त्यांनी खिश्यातनं रुमाल कांढून चेंहर्‍यावर फुटलेला घाम पुसला... ...
अन्‌ शिवाजीनं वर बघत मी समोर ठेंवलेला दाखला मानकापेंच्या हातात देत विचारलं," मानकापे, तुम्ही मागितलाय्‌ काय हा असा दाखला?"
मानकापे नी दाखल्यावर नजर फिरवली... 
मग तो नीट वांचला... ...
आणि डोंळे छताकडं फिरवत कपाळावर हात मारून घेतला. !!!!
मानकापे," स्स्साहेब... ... ..."
शिवाजी," काय?"
मानकापे," साहेब... ... दाखल्यावर ’हुकुमावरून’ असं लिहिलंय्‌ ह्यांनी... ...!!!
शिवाजी माझ्याकडं वळला," काय हो....... काय म्हणताय्‌त हे?"
मी," साहेब... ...ह्यांनीच मला सांगितलं मघाशी... ...तसा हुकूम आहे म्हणून." !!!!
शिवाजी," मानकापे... ...ह्या असल्या कागदावर तुम्ही सही कराल काय सांगा मला?"
मानकापेंची दांतखीळ बसायला लागली, "... ...न.. न ... नाही साहेब."
शिवाजी," बरं झालं ह्यांचं निवृत्तिवेतन थांबवलंत ते... ...आतां असं करा... ..."
मानकापे आनंदले," काय साहेब?"
शिवाजी माझ्याकडं बोंट दाखवत म्हणाला," ह्यांचा हयातीचा दाखला आपल्याला जसा हवा आहे ना, तसा टंकलिखित करून आणा लगेच... ... मी प्रमाणित करून देतो तो... ...कळलं?"
मानकापे जायला निघाले," होय साहेब... ..."
शिवाजी," मानकापे... ...किती वर्षं झाली तुम्हांला ह्या टेबलावर?"
मानकापे चांचरायला लागले," अं... ...सोळा साहेब... ... ...क...क...काय झालं साहेब?"
शिवाजी," घाबरूं नकां मानकापे... ...तुमचं बरोबर आहे ... ...अगदी जबाबदारीनं काम करताय् तुम्ही... ...
अहो हल्ली माणसं वाट्टेल तसले दाखले हजर करून सरकारला लुबाडताय्‌त... ...काय?"
मानकापे जरासे सैलावले," अगदी बरोबर आहे साहेब आपलं..."
शिवाजी," आणि तिकडं गडचिरोली जिल्ह्यात अश्या केसेस वाढायला लागल्याय्‌त हल्ली... ..."
मानकापे सावध झाले," होय काय साहेब?."
शिवाजी," त्यामुळंच काळजीपूर्वक नी जबाबदारीनं कामं करणार्‍या तुमच्यासारख्या माणसांची फार आवश्यकता आहे तिथं... ... आलं लक्ष्यांत?"
मानकापेनी आवण्ढा गिळला," हो... ...होय साहेब."
शिवाजी," तेव्हां चारएक दिवसात गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ’आदिवासी कल्याण’ विभागात रुजूं व्हायच्या तयारीला लागा... ...
मी तश्या सूचना दोन्ही जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत... ...समजलं?"
मानकापे नां आतां घाम फुटला,"... ...ह ह ह ...होय साहेब."
शिवाजी," आणि ह्यां चा दाखला तेव्हढा टंकलिखित करून आणा लगेच... ...या तुम्ही."
इतकं बोलून शिवाजी नं समोरच्या फायलीत पुनश्च डोकं घातलं...!! 
मानकापेनी शिवरायांना अखेरचा मुजरा केला... ...!!!
स्वतःच्या कपाळाला हात लावून ते पांठ फिरवून चालायला लागले... ... ...!!!! 
आणि शेपूट पायात गेलेले एकविसाव्या शतकातले ते पाठमोरे सरकारी छत्रपति बघून आं वांसत मी च कपाळाला हात लावला... !!!!!

*****************************************************************************************

----- रविशंकर.
९ एप्रिल २०१५.   

No comments:

Post a Comment