Search This Blog

Saturday 8 February 2014

॥ शृंगापत्ति ॥

॥ शृंगापत्ति ॥




" अहो जरा इकडं या लवकर.", सौ. नं स्वयंपाकघरातनं खणखणीत आवाजांत हांक मारली.
१९८२ सालांतल्या एका गुरुवारची ती प्रसन्न सकाळ होती.
गुरुवार हा आमच्या कंपनीचा-म्हणजे त्यावेंळच्या ’टेल्को’ चा साप्ताहिक सुटीचा दिवस.
तरीही मी सकाळी स्नान वगैरे लवकर आटोपून नाष्ट्याची वाट बघत ताजं वर्तमानपत्र उघडून जरा आरामखुर्चीत लुढकलेलो होतो.

नाष्टा उरकून बाहेर पडायची गडबड होती. आठवडाभराची तुंबलेली घरची कामं कशी कशी उरकायची ह्याची आंखणीही डोंक्यात चाललेली होती.
पोंटात कावळे कोंकलायला सुरुवात झाली होती.
आणि तेंव्हढ्यात बायकोची ती तांतडीची हांक कानावर पडली.
" काय झालं गं? काय हंवंय्‌ ?", म्हणत मी वर्तमानपत्र बाजूल ठेंवलं, अन्‌ स्वयंपाकघरांत गेलो.
बघितलं तर सौभाग्यवतींची ’मिनि गॅस’ बरोबर झटापट चाललेली होती............
सौ. दांत ओंठ खात गॅस च्या बर्नर ला फरांफरां काड्या पेंटवून लावीत होत्या....व्हाल्व्ह्‌ची गुण्डी उलटसुलट फिरवीत होत्या.....
पण बर्नर कांही पेंटायला जाम तयार नव्हता. !!
मी विचारलं," काय झालं गं......गॅस सिलिंडर संपला बिंपला की काय?
सौ. म्हणाल्या," तेंच तर झालंय्‌....आणि हा ’मिनि गॅस’ मेला पेंटायलाच तयार नाही....जरा बघा काय झालंय्‌ ते.
मला उशीर होतोय्‌ ऑफिसला निघायला.....
आतां नवा सिलिंडर येईतोंवर नाष्ट्यापासून सगळं ह्यावरच करावं लागणार आहे......
तेव्हां लगेच चालूं करून द्या ही ’मिनि गॅस हण्डी’..... तोंवर मी केंर फरश्या आंवरून घेते."
मी गडबडलो," केंर-फरश्या आंवरून घेते....म्हणजे? रत्नाबाई येणार नाहीत की काय आज?"
सौ. नं दुसरा बॉम्ब टाकला," रत्नाबाई आजपासून येणार नाही. ! मी कालच तिला कामावरनं काढून टाकलीय्‌‌. !!"
मी," अरे बाप रे............कां बरं?"
सौ.," डोंक्यावर बसायला लागली माझ्या....समजलं? गेल्या आठवड्यात तीन दाण्ड्या झाल्या.......
मालकिणीचं आपल्याशिवाय अडतंय्‌ असं वाटायचाच अवकाश......मेल्यांच्या अंगात यायला लागतं लगेच."
मी," म....ग..........आतां काय करायचं?"
"काय करायचं म्हणजे?", सौ. फिस्कारल्या," आपले हातपाय काय केळी खायला गेलेत की काय घरची कामं न व्हायला?
’मिनि गॅस’ चालूं करा पटकन्‌......आणि दुसरं एक......"
माझ्या पोंटांत खड्डा पडला," दुसरं आणखी काय अजून?"
सौ.," कांही विशेष नाही.....नवी बाई हजर होईपर्यंत धुणं तुम्ही सांभाळायचं......मशीन आहेच......काय?"
मी हतबुद्ध होत कपाळाला हांत लावला. !!
सौ. चं डोकं आधीच ’मिनि गॅस हण्डी’ नं फिरवलेलं होतं....... रत्नाबाईनं त्यांत झकासपैकी बारही ठांसलेला होता.....
आतां स्वतःच्या हातानंच वातीला बत्ती लावून ’मुल्क-ई-मैदान’ च्या तोंडी ’शहीद’ व्हायची माझी मुळीच तयारी नव्हती.!!!
मी ’मिनि गॅस’ शी झटापट करीत विचारलं," अगं पण ही पेंटत नाही कशी काय? परवांच तर नवीन आणलीय्‌ ना?"
सौ.," कशी काय पेंटत नाही ते तुम्हीच बघा.........इंजिनियर तुम्ही आहांत की मी?"
आमच्या सौ. बहुतेक सुप्रीम कोर्ट वकिलातीची सनद मिळवूनच जन्माला आलेल्या असाव्यात.
वादविवादात समोरच्याला चितपट मारण्यांत त्यांचा हात जगात कुणी धंरील असं मला तरी वाटत नाही.
म्हणून गंमतीनं मी त्यांना ’इंदिराजी’ म्हणतो. !!
सौ.इंदिराजीनी रत्नाबाई आणि ’मिनि गॅस’ चा एकत्रित राग आतां माझ्यावर काढायला सुरुवात केली.......
," तरी तुम्हांला सांगत असते नेहमी....असल्या फालतू अडगळी विकत आणत जाऊं नकां म्हणून........पण पटेल तर ना?
बसवली असेल काउंटरवर एखादी 'घारी-गोरी' दुकानदारानं......आले खरेदी करून ’मिनि गॅस हण्डी’ !!
चालतेय्‌ की नाही धड, ते बघणार कोण?"
आतां माझ्यातही बाजीप्रभू संचारला," अहो नवीकोरी ’गॅस हण्डी’ आहे ही....भंगारातली नाही.........समजलात?
आणि 'घारी-गोरी' पुरतंच बोलायचं झालं, तर जोडीदारीण पसंत करतांनाही मी नाकीडोळीं बघून पत्करलेली आहे....'घारी-गोरी' बघून नव्हे.!!"
सौ. इंदिराजी स्वतः श्यामवर्णी असल्यानं हा टोला अगदी वर्मीं बसला.....
अन्‌ सौ. इंदिराजी उसळल्या," असेल की.......पण सप्तपदी घालतांना   ’ 'घारी-गोरी' कडं बघणार नाही ’ असं वदवून घेंत नाहीत....समजलं?"
मी हतबुद्ध होत दुसर्‍यांदा कपाळाला हात लावला.!!!
म्हटलं," हा ’मिनि गॅस’ कांही चालूं होत नाहीय्‌....बहुधा गॅस निपलमध्ये दोष असावा.....काय करायचं?"
सौ. इंदिराजी,"वॉरण्टी दिली असेल ना ’मिनि गॅस हण्डी’ ची दुकानदारानं?"
मी," चांगली खणखणीत एक वर्षाची वॉरण्टी आहे......रिप्लेसमेण्ट्‌ ची."
सौ. इंदिराजी," मग आतां असं करा......मला रॉकेलचा स्टोव्ह माळ्यावरनं काढून पेंटवून द्या लगेच....म्हणजे मी नाष्टा बनवते......
आणि नाष्टा झाला की ही ’मिनि गॅस हण्डी’ त्या दुकानदाराच्या च्या डोंक्यावर मारा नेऊन.......आणि पैसे परत घेऊन या....कळलं?."
मी," पैसे परतीचं कांही सांगतां येत नाही.....पण बदलून तरी नक्कीच देईल....बघतो काय होतंय्‌ ते."
सौ. इंदिराजी," दोन वेळां आणलीय्‌ ना बदलून आधीच? वेगळं काय होणाराय्‌ आतां तिसर्‍यांदा?
त्याला म्हणावं ’आतां बदलून बिदलून कांही नको.....सरळ पैसे परत दे '....आणि तुम्हाला जमणार नसलं, तर मी च जाते."
आतां सौ.इंदिराजी आणि दुकानदार अश्या शृंगापत्तीत मी बरोबर सापडलो.............
दुकानदारालाही दोष देतां येणार नव्हता....कारण की बिचार्‍यानं आधिच दोन वेळां सदोष ’गॅस हण्डी’ बदलून दिलेली होती....
कसलीही खळखळ न करतां.....
आणि सौं. इंदिराजींपुढं तर तोंड उघडायचा प्रश्नच नव्हता......
तोंड उघडलं रे उघडलं, की माझं ’पानिपत’ ठंरलेलं होतं. !!!
नाष्टा झाल्यावर कपाळाला हात लावत मी तंणतंणतच बाहेर पडलो ’मिनि गॅस हण्डी’ घेऊन.
गडबडीत बाहेर पडतांना रोजच्या संवयीप्रमाणं मी कंपनीचा गणवेषच अंगावर चंढवून बाहेर पडलो, हे मला कळलंदेखील नाही.
आणि तो गणवेषच माझं ’पानिपत’ करेल, हे विधिलिखितही मला माहीत नव्हतं.

झालं.....’मिनि गॅस हण्डी’ स्कूटरवर घालून मी एक सणसणीत किक्‌ मारली, अन्‌ लक्ष्मी रोड वरच्या ’आर्या गॅस’ च्या दुकानाकडं गाडी दामटली.
रस्त्यांत शर्‍या दातार भेंटला, अन्‌ त्यानं खंवचटपणानं विचारलं देखील," काय नाना.....सुमावहिनीनीं घरातनं हांकलून दिलाय्‌ की काय तुला.....ऑं?
गुरुवारीदेखील कंपनी गणवेंषात ? "
तेव्हां कुठं माझ्या डोंक्यात प्रकाश पडला, की अंगावर कंपनी गणवेषच चंढवलेला आहे म्हणून.

 पंधरा मिनिटांनी लक्ष्मी रोड वरच्या ’आर्या गॅस’ च्या दुकानात मी दाखल झालो.

काउंटरवर एक तिशीची बाई बसलेली होती.....
अन्‌ नवल म्हणजे 'घारी-गोरी' देखील होती. !!........
बहोत खूब इंदिराजी....क्या बात है !!!
दुकानात दुसरी दोनचार गिर्‍हाइकं गॅस शेंगड्या, गॅसहण्ड्या वगैरे बघत होती....मालक श्री. कटारिया त्यांच्यातच गुंतलेले होते.
श्री. कटारिया हे मला थोडंफार ओंळखायचे.....
कारण आमची ’टाटा सुमो’ बाजारात येऊन सहाच महिने झालेले होते, अन्‌ त्यांना ती खरेदी करण्यात रस होता.
मी ’टेल्को’ मध्येच नोकरीला असल्यानं ते सुमो संबंधी कांही माहिती विचारायला एका मित्राच्या ओंळखीनं महिनाभरापूर्वी मला भेंटलेले होते.
त्यांना हवी असलेली माहिती आणि माझं मत, एक मित्र या नात्यानं मी त्यांना कांही आडपडदा न ठेंवतां सांगितलेलं होतं.
’गाडी उत्तम आहे...... पण एकदम घाई करूं नकां..........,
चारसहा महिने थांबून प्रत्यक्ष वापरणार्‍यांचेही अनुभव ऐका, आणि मग काय ते ठंरवा’ असंही सांगितलेलं होतं.
श्री. कटारियांना माझा सरळसोट स्वभाव आवडला असावा कदाचित....जातांना त्यांनी मला धन्यवाद तर दिलेच,
शिवाय ’असा प्रामाणिक सल्ला देणारी माणसं हल्ली कुठं मिळताय्‌त हो?’ म्हणत एक प्रकारची पावतीही दिली होती.
यथावकाश तो प्रसंग माझ्या विस्मरणात जमा झालेला होता.

काउंटरवरच्या ’घारी-गोरी’ समोर मी ’मिनिगॅस’ ठेंवला.....खरेदीची पावतीही दिली, आणि ’पैसे परत द्या’ म्हणून सांगितलं.

झालं....बाई गडबडल्या.........!!
म्हणाल्या," साहेब....हण्डी हवी तर बदलून देते मी, पण पैसे परतीचं मालकच सांगूं शकतील.....मी कांही करूं शकत नाही."
सकाळभर झालेल्या तमाशानं वैतागल्यामुळं असेल कदाचित.....माझा आवाज जरा चंढला असावा......
म्हणालो," अहो दोन वेळा झालंय हे नाटक आधीच....
आणि ही हण्डीपण चालेना झाली तर काय रोंज उठून तुमच्याकडं आणूं ती पेंटवायला......ऑं?
तेव्हां ही हण्डी घ्या ताब्यात, आणि पैसे परत द्या... बस्स.....बाकी कांही सांगूं नकां मला."

श्री. कटारियानीं तेंव्हढ्या गलक्यातही चंमकून वर बघितलं......अन्‌ मला बघितल्यावर ते समोरच्या गिर्‍हाइकाला

’जरा थांबा, आलोच एक मिनिटांत’ असं सांगून काउंटरवर हजर झाले.
आतां ते पण वादावादी सुरूं करणार असं वाटून मी जरा संरसावूनच थांबलो.....
अन्‌ आश्चर्य म्हणजे श्री. कटारियानी सुहास्यमुद्रेनं तोंडभंरून स्वागत करत मला नमस्कार केला. !!
मी सरळ सरळ मुद्यालाच हात घालत सुरुवात केली," हे बघा कटारियाजी......."
श्री. कटारिया," सगळं ध्यानांत आलंय्‌ माझ्या साहेब.....कांही काळजी करूं नकां....मी आहे ना?
मी," अहो पण....."
मला मध्येच तोंडत कटारिया म्हणाले," कांही सांगायची जरूर नाही मला....फक्त दहाच मिनिटं थांबा.....
मी दुकानात असतांना पहिल्यांदाच आलाय्‌ तुम्ही........म्हणून म्हणतो.......
ह्या आलेल्या गिर्‍हाइकाचं आटोपलं की मी आलोच....तोंवर कॉफी तरी घ्या.....कॉफी चालेल ना? की चहा सांगूं?"
मला ह्या दुकानदाराचं जरा नवलच वाटलं............
डॅंबीसपणाचा पवित्रा नाही..........
उडवाउडवी नाही...........
अविश्वास दाखवणं नाही..........
टोलवाटोलवी नाही............
वेंळकाढूपणा नाही............. 
कांखां झंटकणं तर मुळीच नाही..........!! 
त्यांचा प्रसन्न निर्व्याज चेंहराच स्पष्ट सांगत होता.
कटारिया म्हणाले," साहेब कॉफी घ्या......गार होईल.....आलोच मी."

मी बुचकळ्यात पडून आतां काय करायचं ह्याचा विचार करत कॉफी प्यायला सुरुवात केली.

गोड बोलून आपल्या तोंडाला हे पानं तर पुसणार नाहीत ना? अशी एक दुष्ट शंकाही मनाला चांटून गेलीच.
पण माझा अंतर्नाद तर मला स्वच्छपणे सांगत होता, की असं होणार नाही.....अशक्य आहे ते.
त्या दुसर्‍या गिर्‍हाइकाची खरेदीपावती करून श्री. कटारिया परत माझ्याकडं आले.
श्री. कटारिया," काय झालंय्‌ साहेब? गॅसहण्डीची कांही तक्रार?"
मला माझा कडकपणा सांभाळतां येईना......
मी," कटारियाजी.....दोनदां तुम्ही ही गॅसहण्डी बदलून दिलीत कांही आढेवेढे न घेता.....मान्य आहे मला.
पण ह्या हण्डीची बनावटच सदोष असावी....दिसतंच आहे ते......
आतां ही पण तुम्ही द्यालही बदलून.....पण हे असं कितीकाळ करत बसणार मला सांगा?"
श्री. कटारिया आतां काउंटरवरच्या ’घारी-गोरी’ कडं वळले," मग...... काय म्हणणं आहे साहेबांचं?"
घारी-गोरी," ते म्हणताय्‌त, की ’हण्डी परत घ्या अन्‌ पैसे परत द्या’ म्हणून....मग काय करायचं?"
श्री. कटारिया," काय हवंय्‌ तुम्हांला साहेब? बदलून देऊं की पैसे परत देऊं? "
माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना....’पैसे परत द्या’ असं म्हणणं माझ्या जिवावर आलं....
श्री. कटारियांच्याच तें लक्ष्यांत आलं असावं.........
ते ’घारी-गोरी’ ला म्हणाले," गॅसहण्डी अन्‌ पावती घ्या जमा करून, अन्‌ पैसे परत करा साहेबांना............!! "
’घारी-गोरी’ पण क्षणभर चंपापलीच....पण तिनं कांही न बोलतां गॅसहण्डी ताब्यांत घेंतली,
पावतीच्या मागंच माझी ’पैसे परत मिळाले’ म्हणून पोंच घेंतली,
आणि नगद मोजून माझ्या हातांत ठेंवली......
मी पैसे खिश्यांत ठेंवूं लागलो.......
तेंव्हढ्यांत श्री. कटारिया म्हणाले," पैसे मोजून घ्या साहेब."
मलाच अपराध्यासारखं वाटायला लागलं......,म्हटलं," अहो काय मोजायचं त्यांत कटारियाजी....तुम्ही कां कमी देणार आहांत मला?"
श्री. कटारिया," तसं नाही साहेब....पैश्याचा व्यवहार  आहे.....
नजरचुकीनं चूकभूलही होते कधीकधी......आतां असं बघा......"
मी," बोला....काय?"
श्री. कटारिया," काय आहे साहेब.....चूकभूल हा एक अपघातच असतो......होय की नाही?
पण तो ’अपघात’ च होता, हे दुसर्‍याला नंतर कसं पटणार, कितीही डोकं फोडून सांगितलं तरी?......काय?
म्हणून म्हटलं रक्कम मोजून घ्या.....गैरसमज नसावा."
मी पैसे न मोजतांच खिश्यात ठेंवत म्हटलं," कटारियाजी, कुठं रक्कम मोजून घ्यायची अणि कुठं नाही, हे मलाही समजतं....
पैसे मला पोंचले.....झालं ना समाधान?"
श्री. कटारिया," धन्यवाद साहेब......... विश्वास दांखवलात  म्हणून......
पण एक प्रश्न विचारूं?......... खरं खरं उत्तर द्याल?"
मी," विचारा की......... अगदी बेशक."
श्री. कटारिया," तुम्ही इथं आत्तां आलात, तें वादावादी होणार.......
ह्या समस्येचं निवारण इतक्या सहजासहजी नी सरळपणानं होणार नाही....... असं गृहीत धंरूनच....होय ना?"
मी," खरं संगायचं तर होय. सध्याच्या दुकानदारांची प्रवृत्ति पाहिली की तसं गृहित धंरण्याशिवाय दुसरा पर्याय तरी कुठं उरतो कटारियाजी?"
श्री. कटारिया," खरं म्हणजे साहेब, हे असं व्हायला आजकालची गिर्‍हाइकं पण तेंव्हढीच जबाबदार आहेत....
स्वतःचा गलथानपणा दुकानदाराच्या डोक्यावर थापायला येणारी गिर्‍हाइकं पण कांही कमी नाहीत.....फुकटी गिर्हाइकं तर उदण्ड आहेत.....
बरं ते जाऊं द्या सगळं....पण तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं हे इतक्या सरळपणानं निस्तरलं गेलं म्हणून?"
मी," जरूर वाटलं.....अजूनही मी तोंच विचार करतोय्‌ की हे कसं काय झालं इतक्या सहजीं म्हणून."
श्री. कटारिया," त्याला तुम्ही स्वतःच कारणीभूत आहांत साहेब.!!"
मी उडालोच," म्हणजे? मी नाही समजलो...."
श्री. कटारिया," साहेब, तुम्ही ’टेल्को’ कंपनीतच असतां ना?.....ह्या युनिफॉर्म मध्ये तुम्हाला बघितलं, म्हणून विचारतो.
मी," होय.....’टेल्को’ मध्येच असतो मी कामाला."
श्री. कटारिया,"तुम्हांला आठवतंय्‌ कां साहेब, की मी दातार साहेबांच्या ओंळखीनं एकदां तुमच्याकडं आलो होतो बघा.....’सुमो’ संबंधी माहिती विचारायला?"
मी," नक्की असं स्मरत नाहीय्‌ आत्तां......पण तुम्हीच म्हणताय तर असेलही."
श्री. कटारिया," खरी गोष्ट अशी आहे साहेब, की त्यावेळी मी ’टेल्को’ मधल्या चारएक लोकांना हीच माहिती विचारली होती.......तुम्ही चंवथे."
मी," बरं......मग?"
श्री. कटारिया," साहेब, बाकीच्या तिघांनी मला अगदी छातीठोंकपणे सांगितलं की गाडी अगदी खणखणीत आहे....डोंळे झांकून घ्या म्हणून.
तुम्हीही तसंच सांगितलंत....पण त्यांत एक फरक होता.....तो तुमच्याही लक्ष्यांत आला नसावा."
मी," काय फरक होता बुवा....मलाही न जाणवलेला?"
श्री. कटारिया," साहेब, तुम्ही मला असंही सांगितलं होतं की ’गाडी उत्तम आहे कटारियाजी, पण घाई करूं नका...जरा थांबा....अजून सहा महिने तरी....
आणि ती प्रत्यक्ष वापरणार्‍यांचेही अनुभव ऐकून नंतर मग काय करायचं तें ठंरवा’.....बरोबर.?"
मी," अहो मग त्यांत विशेष काय केलं मी? मी स्वतः जे केलं असतं तेंच तुम्हांला करायला सांगितलं........ इतकंच."
श्री. कटारिया," इथंच हे वेगळेपण होतं साहेब....ते तुम्हाला जाणवलं नाही, पण मला अचूक समजलं.
स्वतःच्या कंपनीची उत्पादित वस्तूं चांगली नाही असं कोण कुणाला सांगेल? आणि त्यात चूकही कांही नाही......
तसं बघितलं तर ’सुमो’ चे अनुभव पण लोकांना चांगले आलेत.......
पण मला सल्ला देतांना स्वतःच्या कंपनीबरोबर तुम्ही माझ्या भल्याचाही विचार करत होता......होय ना?
तर ही अशी निष्पक्षपाती माणसंच दुर्मिळ असतात साहेब.......
आजच्या युगांत तर फारच दुर्मिळ.........
इथं ’गॅसहण्डी’ घेंऊन परत येतांना तुम्हाला काय वाटत असेल, हे मला नेमकं समजलेलं होतं......
आतां मला असं सांगा, की अश्या माणसाच्या तोंडाला पानं पुसून त्याला वाटेला लावणं मला कधीतरी शक्य झालं असतं काय? "
मी स्तिमित झालो......हा माणूस कुठल्या मातीचा घडलेला आहे, कांही अंदाज येईना.
मला जरा अवघडल्यासरखंही झालं......
 मी सहज विचारलं," मग काय केलंत पुढं तुम्ही?"
श्री. कटारिया," या साहेब असे माझ्यामागं.......पुढं काय झालं तें प्रत्यक्षच दाखवतो तुम्हाला."
श्री. कटारियानीं मागोमाग मला दुकानाच्या गॅरेज मध्ये नेलं......त्यांची स्वच्छ पांढर्‍या रंगाची नवीकोरी ’सुमो’ समोरच उभी होती. !!
मला बरं वाटलं....म्हटलं," वा वा छान कटारियाजी.....अभिनंदन.....!!
कधी आली ही गाडी? अन्‌ कशी काय चाललीय्‌?"
श्री. कटारिया," तीन महिने झाले साहेब गाडी आल्याला......पोराचा तगादा मागं लागलेला.....थांबायला तो तयार नव्हता....
म्हणून घेंतली गाडी त्याच्या हट्टासाठी शेंवटी.......पण कशी चाललीय्‌ तें मात्र सांगतां येणार नाही....!! "
मी चंमकलोच," कां हो....कां बरं?"
श्री. कटारिया," झालंय्‌ असं की गाडी जर चाललेलीच नाही......तर ’कशी चाललीय्‌’ हे कसं काय सांगणार मी तुम्हाला?
गियरबॉक्स सदोष आहे.....पहिला गिअर च पडत नाहीय्‌....मग ही चालणार कशी साहेब?"
मी," अहो मग डीलर ला कळवायचं.....वॉरण्टीतली गाडी आहे ना?"
श्री. कटारिया," डीलर नं कांखा झंटकल्याय्‌त साहेब....तो कंपनीकडं बोंट दाखवतोय्‌‍....
कंपनीला अर्जविनंत्या करून झाल्या.... हे एकोणिसावं पत्र.....    
कालच पाठवलंय्......
दहाबारा हेलपाटेही मारून झालेत......पण गाडी अजून जाग्यावरच उभी आहे....नुस्त्या मोघम आश्वासनांखेंरीज पदरांत कांहीही पडलेलं नाही.!!!
आतां मला असं सांगा......’ही गाडी परत घ्या अन्‌ पैसे परत द्या ’ असं सांगायला मी कंपनीकडं जाऊं?
आणि समजा गेलोच, तर तुमची ही कोट्यवधीची कंपनी देईल मला पैसे परत?"
मी निरुत्तर होंत कपाळाला हांत लावला. !!
धारातीर्थीं पडतांना सैनिकाला कसं वाटत असेल, तें मला बरोबर समजलं. !!!
मी विचारांत पडून गप्पच उभा.....
श्री. कटारिया च पुढं म्हणाले," चिंता करूं नकां साहेब....’कुठंतरी वशिला लावून, नाहीतर रदबदली करून माझं काम करून द्या’
अशी गळ घालण्यासाठी  तुम्हांला हे नाही  दाखवलं मी........पण शक्य असलं तर एक सल्ला अवश्य द्या."
मी म्हटलं," कसला सल्ला हंवाय तुम्हाला?"
श्री. कटारिया," अर्जविनंत्या,अन्‌ हेलपाटे पोंटभर झालेत साहेब....
आतां हे तांठ मानेनं कसं निस्तरतां येईल एव्हढं सुचवा फक्त....
हा धंदा सुरूं केला ना साहेब, त्यावेळीं माझ्या निरक्षर आई नं मला एक सांगितलेलं होतं....
’चांगली माणसं जोडायला शीक फक्त....बाकी सगळं आपोआप चालत येतं मागोमाग.’
तुमच्यासारखी माणसं चुकीचं कांही सांगत नसतात एव्हढी खात्री आहे मला."
मी म्हणालो," कटारियाजी प्रश्न बिकट आहे खरा...फार मोठा विश्वास टांकताय्‌ माझ्यावर....
इतका मी कुणी असामान्य मोठा वगैरे माणूस मुळीच नाही....
पण मला काय वाटतं तेंव्हढंच सांगतो....बघा तुम्हाला पटतंय्‌ का ते....
कांही कर्मचारी असे वागले असतीलही....पण उत्पादक कंपनी तशी नसते, हे लक्ष्यांत ठेंवा.....
कारण कंपनी ही कर्मचार्‍यापेंक्षाही तिच्या ग्राहकांवरच चाललेली असते, हे विसरूं नका.
कुठल्याही कंपनीला ग्राहकाकडं दुर्लक्ष करणं कधीच परवडत नसतं.......भले ती किती का मोठी असेना."
एव्हढं बोलून मग त्यांना थोंडक्यात ’यतो धर्मस्ततो जयः’ हे महाभारतातलं त्रिकालाबाधित सत्य, अन्‌ त्याचे मी स्वतः घेतेलेले कांही मोजके विलक्षण अनुभवही विदित केले.
श्री. कटारियाना धन्यवाद देंऊन मी घरी परतलो, आणि नंतर हा प्रसंग विसरूनही गेलो.

साधरण महिनाभर उलटला असेल नसेल....

मी बोहरी आळीत कांही सामान खरेदी करून लक्ष्मी रोडवरून घरी परत येत होतो.
चित्रशाळा प्रेस चा चौक ओलांडून मी गाडी पुढं काढली, अन्‌ एका दुचाकीस्वारानं ओव्हरटेक करत मला सांगितलं, की ’पांठीमागनं एक गृहस्थ तुम्हाला हांका मारताय्‌त.’
मी स्कूटर कडेला घेंत थांबवली, तोंच श्री. कटारिया हांका मारत, जवळजवळ धांपा टांकतच आले.
मला म्हणाले," चला साहेब दुकानांकडं......जरा बोलायचं आहे......फक्त दहाच मिनिटं."
मी," अहो मी येईन की दुकानांत परत केव्हांतरी.....कसली घाई आहे एव्हढी?"
श्री. कटारिया," आत्तां कांही बोलूं नकां साहेब.....दुकानाकडं चला आधी...... मग काय तें सांगतो."
मी श्री. कटारिया ना पाठीमागं बसवून गाडी दुकानाकडं वळवली.
श्री. कटारिया नी दुकानातल्या पोराला कॉफी आणायाला पिटाळला.......
अन्‌ माझ्याकडं वळून म्हणाले," माफ करा साहेब.....अहो कधी एकदां तुम्हाला भेंटतोय्‌ असं झालं होतं.....
तुमचं घर मला माहीत नाही, म्हणून दातार साहेबांना पत्ता विचारायला गेलो....तर ते परगावीं गेलेत म्हणून समजलं.
म्हणून जरा चिंतेतच पडलो होतो....... तेंव्हढ्यात तुम्हीच जातांना दिसलात...... म्हणून हांक मारली.
मला सगळी ’सुमो’ स्टोरी आंठवली, अन्‌ मी विचारलं," मग तुमच्या ’सुमो’ चं काय झालं पुढं? "
श्री. कटारिया," अरे वा..... बरं लक्ष्यांत राहिलंय्‌ की तुमच्या....
घ्या, कॉफी घ्या....सांगतो सगळं."
मी," मग काय झालं पुढं?"
श्री. कटारिया," अहो काय होणार होतं दुसरं? "
मी," म्हणजे?"
श्री. कटारिया," कांही नाही.......नीयत न सोडतां  दंड थोंपटून पुन्हां उतरलो मैदानात.......... तांठ मानेनं.
आणि केवळ पंधरा दिवसांत  कंपनीनं माणसं घरी पांठवून आख्खी गियरबॉक्सच बदलून दिली.!! 
मला दुकानाबाहेर पाऊलदेंखील टांकावं लागलं नाही...!!!
वर आणखी माझ्या तक्रारीचं समाधानकारक लेखी उत्तरही दिलं..... .....आहांत कुठं ? "
मी म्हटलं," धन्य आहे तुमची कटारियाजी.....एव्हढं बळ आणलंत तरी कुठून ?"
श्री. कटारिया," अगदी सरळ आहे साहेब.....
ते तुमचं ’यतो धर्मस्ततो जयः’...............कळलं ना?"
मी चाट च पडलो," अहो ते माझं नाही कांही......महाभारतातल्या आभाळमयी गांधारी चं तत्त्वज्ञान आहे ते."
श्री. कटारिया," ते ठीकाय्‌ हो सगळं....अहो पण ते सांगितलं कुणी मला?
मी बोललो नव्हतो तुम्हाला त्या वेंळी माझ्या आई चं वचन....
’चांगली माणसं जोडायला शीक फक्त....बाकी सगळं आपोआप चालत येतं मागोमाग.’  म्हणून? 
किती मौलिक आहेत ना  एका निरक्षर बाईचे हे  बोल ?"
इतकं बोलून श्री. कटारिया अलेक्झांडर च्या थाटांत माझ्याकडं बघायला लागले.....!!
आणि ’यतो धर्मस्ततो जयः’ चा तो एकविसाव्या शतकातला खणखणीत पुरावा बघून थक्क होत, मी च  स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!

*************************************

                                                    ----- रविशंकर.
                                                 ८ फेब्रुवारी २०१४.

No comments:

Post a Comment