Search This Blog

Saturday 28 December 2013

॥ वाटाघाटीकौशल्य ॥

॥ वाटाघाटीकौशल्य ॥



"समजली तुमची अक्कल !!", बायको माझ्या व्यवहारी सूज्ञपणाचा पंचनामा करीत माझ्या हातांत कॉर्डलेस्‌ फोन कोंबत म्हटली,

" त्या रूपेश ला फोन करा, नी सांगा...... मी संध्याकाळीं स्वतः जाऊन काय ते नक्की ठंरवीन....
तोपर्यंत पुढं कांही करायचं नाही म्हणून."

मी चंडफडत म्हटलं," अगं असं कसं सांगतां येईल आतां? सगळा सौदा पक्का ठंरवूनच तर मी नुकता आलोय्‌.....
आणि आतां त्याला सांगूं ऑर्डर रद्द कर म्हणून?.....ऑ? तुला तरी समजतंय्‌ कां काय बोलते आहेस तें? हसं होईल माझं !"
"होऊं दे झालं तर....", सौ. सुमीता," नगद नुकसान होण्यापेक्षां ते परवडलं." !!
"नुकसान कसलं आलंय्‌ ह्यात?", मी तंडकलो," चांगला आठ टक्के डिस्काउंट्‌ सुद्धां दिलाय्‌ त्यानं मला".
सौ. सुमीता,"आठ टक्के सोडायला जातंय्‌ काय मेल्याचं?....
चांगला चाळीस-पन्नास टक्के नफा कमावणाराय्‌ तो लाखभराच्या खरेदीवर.....
ऍडव्हान्स्‌ दिलाय काय कांही?"
"ऍडव्हान्स्‌ नाही कांही दिलेला", मी म्हणालो," पण सौदा ठंरवून तर आलोय्‌ ना?"
" असूं दे....मी बघते काय करायचं ते......सांगा त्याला मी स्वतःच संध्याकाळीं येतेय्‌....
तोपर्यंत कांही करायचं नाही म्हणून", सौ. सुमीता नं वटहुकूम सोडला...,
मी म्हणालो," हे बघ बाई....तुला त्या रूपेश ला जो काही पिदडायचा आहे ना, तो खुशाल पिदड...
पण हे बघ...तुला माहीतच आहे....ही ऑर्डर आहे ’शर्‍या दातार’ ची....सौ. वृंदावहिनीनां किती तांतडी आहे ते मला माहीत नाही....
शर्‍या नं मला गळ घातली की ’नाना, बर्‍याच वस्तूं एकगठ्ठा घ्यायच्या आहेत....आणि ’यदुवीर’ वाला तुला खूप मानतो....
तेव्हां हा सौदा तूं च जाऊन ठंरव’....म्हणून मी आपला गेलो ठंरवायला....तेव्हां..."
"आलं लक्ष्यांत....", मला मध्येच तोंडत सौभाग्यवती म्हणाल्या,"मी वृंदेशी घेते बोलून, अन्‌ काय ते करते...तुम्ही निघा आतां...
आणि हो....लेक्चर आंटोपलं की थेंट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर या....तिथं प्रदर्शन भंरलंय्‌ घरगुती वस्तूं चं....
मी ’यदुवीर’ कडचं काम आटोपून थेंट तिथंच जाणार आहे."
"तिथं काय करायचं आहे जाऊन?", मी.
सौ.," अहो आपली गॅसची शेगडी पार खराब झालीय्‌...तिथं प्रदर्शनांत कुठं चांगल्या शेंगड्या दिसल्या, तर बदलावी म्हणतेय्‌....
तेव्हां लेक्चर आटोपलं की थेंट तिथंच या....मी वाट पाहते....आतां लावा फोन रूपेश ला, अन्‌ सांगून ठेंवा लगेच."

मी रूपेश ला ’यदुवीर अप्लायन्सेस्‌’ मध्ये फोन लावला......

मी,"नमस्कार रूपेश....मी नानिवडेकर.....".
रूपेश,"हं...बोला नानासाहेब....काय हुकूम?"
मी," अरे विशेष कांही नाही....आपलं ते एल्‌. सी. डी. टी. व्ही., फ्रीज, आणि डी. व्ही. डी. प्लेअर इत्यादीसंबंधी ठंरलं होतं नां सकाळी?"
रूपेश," होय तर...काळजी करूं नकां....संध्याकाळपर्यंत ओर्डर बुक्‌ करतो....पैसे नंतर दिलेत तरी चालतंय्‌ की....कुठं जाणाराय्‌त?"
मी," हे बघ रूपेश....सायंकाळीं ’मॅडम’ स्वतःच येऊन नक्की काय ते ठंरवतील...तोंवर कांही करायचं नाही....कळलं नां?"
रूपेश," काय झालं साहेब?....कश्याला ’मॅडम’ नां इकडं यायचा त्रास देताय?....तुम्हीच या की.....
हवं तर आणखी थोडंफार इकडंतिकडं करून ठंरवूनच टाकूं....काय?....दुकान तुमचंच आहे."
मी," हे बघ बाबा...हा ’मॅडम’ चा फतवा आहे.!! आणि मला संध्याकाळीं ’एन.आय.बी.एम.’ मध्ये लेक्चर घ्यायचं आहे.....
तेव्हां तूं आणि ’मॅडम’ च काय ते ठंरवून टाका."
रूपेश," ठीकाय्‌ नानासाहेब....नाइलाज आहे!!...तरीपण बघा....जमलं तर तुम्ही पण याच...जरा सोपं होईल....काय?"
मी," सोपं होईल म्हणजे काय रे....अं?"
रूपेश," नानासाहेब....अहो ’इंदिराजी मॅडम’ पुढं कुणाचं काय चालतंय्‌?..... म्हणून म्हटलं.!!"
मी," बाबा रे......आख्ख्या हिंदुस्तानांत ’इंदिराजी मॅडम’ पुढं कुणाचं कांही तरी चालल्याचं ऐकिवात आहे काय तुझ्या?....ऑं?"
रूपेश फिसफिसला," नानासाहेब....... कपाळाला हात लावलाय्‌ मी !!...
म्हणजे तुमचं पण आमच्यासारखंच होतंय्‌ म्हणा की......हीः हीः हीः हीः....!!" 
"बराय्‌ तर", म्हणून मी पण कपाळाला हात लावत फोन ठेंवला.!!!
"काय म्हणाला रूपेश?", सौ. सुमीता
" ’जमलं तर ’तुम्ही’ पण या च’ म्हणाला", मी.
"बघितलंत....कसा टग्या आहे तें? तुम्ही जा खुशाल ’एन.आय.बी.एम.’ ला....
मी बघते काय ते.", ’इंदिराजी मॅडम’ म्हणाल्या.
मला रूपेश ची दया आली.!!

आमच्या कॉलनीतल्या समस्त दुकानदारांनी सौ. सुमीता चे झंटके कधी ना कधी खाऊन

तिचं बारसं ’इंदिराजी मॅडम’ असं करून ठेंवलेलं होतं. !!
सौभाग्यवतीं ची ह्या दुकानदारांना इतकी जबरदस्त दहशत बसली असेल असं मात्र मला कधी वाटलं नव्हतं.!!!
विषय तिथंच संपला, अन्‌ दुपारी दोन वाजतां मी ’एन.आय.बी.एम.’ ला निघून गेलो.

रिटायर झाल्यानंतर मी स्वतःचा ’ कंट्रोल्ड कॉंक्रीट कन्सल्टन्सी’ चा व्यवसाय सुरूं केला होता.

विद्यादानाची मुळात आवड असल्यानं पुण्यातल्या चारदोन अभियांत्रिकी महाविद्यालयांत मी ’बाह्य अधिव्याख्याता’
या नात्यानं अभियांत्रिकी चे विषय शिकवायला पण जात असे.
शिवाय व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित असे तीन विषय....म्हणजे ’सृजन’[क्रिएटिव्हिटी],’औपचारिक वक्तृत्त्व’ [फॉर्मल स्पीकिंग], आणि ’वाटाघाटी कौशल्य’[निगोशिएशन स्किल्स्‌] हे तीन विषय पण मी कांही महाविद्यालयांत शिकवायला जात असे.
त्यापैकीच आज ’वाटाघाटीं चं कौशल्य’ या विषयाचं ’एन.आय.बी.एम.’ मध्ये व्याख्यान होतं......

व्याख्यान अगदी छान पार पडलं......

श्रोत्यांना वाटाघाटीं च्या कलेतलं ’विन्‌-विन्‌ सिच्युएशन्‌’ म्हणजे कुठ्ल्याही वाटाघाटींचं तारूं हे द्विपक्षीय नफाकारक 
अश्या सौद्यापर्यंत कसं हांकारलं जातं ते मी प्रत्यक्ष व्यवहारातलीच उदाहरणं देऊन समजावून सांगितलं.
विद्यार्थीही खूष झाले, अन्‌ तिथल्या प्राध्यापकांनीही व्याख्यानाची प्रंशंसा केली....मी अगदी मस्त होतो.
पण ह्या विषयातला ’महागुरू’ च त्या दिवशी मला भेंटायचा योग होता, हे विधिलिखित मात्र मला माहीत नव्हतं. !!

ठंरल्याप्रमाणं व्याख्यान झाल्यावर मी गाडी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाकडं वळवली, आणि साडेसहा वाजतां तिथं पोंहोचलो.

बाहेर प्रवेशद्वाराशेंजारीच ’सौ. इंदिराजी मॅडम’ माझी वाट पहात थांबलेल्या होत्या..... हातात एक भलंमोठ्ठं खोकं घेऊन.
मी विचारलं," किती वेंळ झाला तुला येऊन? खरेदी झाली की काय मी यायच्याआधीच?"
"खरेदी कुठली होतीय्‌......आत्तांच आले....पांचदहा मिनिटं झाली असतील.", सौ. इंदिराजी
" मग हे खोकं कसलं हातांत?", मी म्हणालो," मला वाटलं खरेदी झाली हे बघून......काय आहे हे?"
सौ. इंदिराजी," ’येरा’ चा कांचेचा लेमनसेट्‌!...बघा तरी कसा मस्त आहे...."
मी," अगं लेमनसेट्‌ कश्याला घेंतलास परत नवीन? आपल्या घरी दोन आहेत ना आधीचे?"
सौ. इंदिराजी,"घेंतला नाही कांही......रूपेश कडून आणला."!!
मी चंमकुन विचारलं," मला नाही समजलं.....रूपेश कडून आणला...... म्हणजे?"
सौ. इंदिराजी," भोट आहांत तुम्ही अगदी....अहो,ती शरदभावजींची ऑर्डर निश्चित करायची होती ना?
ती केली म्हणून त्यानं हे दिलं.!!"
मी चाट च पडलो," अगं ऑर्डर शर्‍याची.....अन्‌ ही भेंटवस्तूं तूं लाटलीस होय?....कमाल आहे तुझी."
सौ. इंदिराजी,"लाटली नाही कांही....त्यानं दिली....आणि वृंदेलाही असाच एक सेट्‌ दिलाय्‌ भेंट म्हणून.....कळलं?"
मी," काय ठंरवलंय्‌स मग रूपेशबरोबर?"
सौ. इंदिराजी," अहो....मी वृंदेला फोन करून सोंबतच घेंऊन गेले....
मुलुखाचा चेंगट मेला......चांगला तासभर खाल्लान्‌ आमचा.....
शेंवटी साडेसतरा हजारांचा डिस्काउंट, आणि जुन्या वस्तूंचे सव्वातीन हजार दिलेन्‌....
आणि हे दोन लेमनसेट....सप्रेम भेंट." !!
मी कपाळाला दुसर्‍यांदा हांत लावला.!!
म्हणालो," अगं आठ हजारांचा डिस्काउंट कबूल होईस्तोंवर माझा घाम काढणारा हा रूपेश....
तुम्हांला एव्हढं कबूल झाला?....ऑ?
अगं तुम्हां बायकांना हे...हे...असं पिदडायला लाजलज्जा कशी वाटत नाही गं?
अगं त्यालाही पोरंबाळं आहेत....उदरनिर्वाह चालवायचा आहे...... ह्याचा कांहीतरी विचार कराल की नाही?
हा कांही ’विन्‌-विन्‌’ सौदा नव्हे......ही चक्क लूटमार आहे!!....
तरीच बिचारा म्हणत होता मला ’तुम्ही शक्यतों या च’ म्हणून "
सौ. इंदिराजी," लूटमार वगैरे मुळीच नाही बरं.....आणि हा रूपेश पण कांही धर्मराजा चा अवतार लागून गेलेला नाही....
तुम्ही पुरुषच सगळे भोंट असतां एकजात....!!
सौदा ठंरवल्यावर वृंदी च म्हणाली की ’ह्या’ नी...[म्हणजे मी], गिर्‍हाईक आणलं....
तेव्हां ह्यां ना पण लेमनसेट्‌ मिळायला हवा."
मी,"........मग?"
सौ. इंदिराजी,"मग काय?.....मेला कांचकुच करायला लागला....अगदी गळ्याशी आलंय्‌...परवडत नाही....वगैरे......
मग वृंदी नं च तंडकावलं की ’ जमतंय्‌? की समोर ’मेमॉयर्स्‌‌’ मध्ये जाऊं खरेदीला?’ म्हणून.....
तसा झक्कत दोन मिनिटांत हा लेमनसेट्‌ हजर केलान्‌ मेल्यानं....
वर आणखी तोंडभर हंसून म्हणाला सुद्धां ’खरेदीला आमच्याकडं च येत जा....दुकान तुमचंच आहे’.....कळलं?"
मी सौ. इंदिराजी नां साष्टांग नमस्कार घालत तिसर्‍यांदा कपाळाला हात लावला.!!!

"चला आतां आंत.....आधीच थोडा उशीर झालाय्‌......",

सौ. इंदिराजी मला पुढं घालीत म्हणाल्या," आणि हे बघा.....गॅस शेगडी चा तुम्ही फक्त दर्जा पारखून घ्या.....
बाकीचं मी बघून घेते सगळं......मध्ये अजिबात बोलायचं नाही.......समजलं?"
सौ. इंदिराजीं च्या पाठोपाठ, गाड्याबरोबरच्या नळ्यासारखी माझी प्रदर्शन यात्रा सुरूं झाली......

प्रदर्शन मोठं होतं......साधारण शंभरएक तरी दुकानं असावीत....

अगदी टी. व्ही. फ्रीज. कॉंप्युटरपासून तें नारळ खिसायच्या खंवणीपर्यंत सार्‍या घरगुती वस्तूंचा मायाबाजार सभोंवती पसरलेला होता.
फिरतां फिरतां एक गॅस शेंगड्यांचं दुकान सौ. इंदिराजी ना दिसलं....अन्‌ आम्ही आंत शिरलो.....
एक बर्नर च्या शेंगडीपासून ते पूर्ण कुकिंग रेंज पर्यंत तर्‍हेतर्‍हेच्या चंकचंकीत आकर्षक शेंगड्या ओंळीनं मांडलेल्या होत्या.
बघत बघत इंदिराजी एका चार बर्नर च्या शेंगडीजंवळ रेंगाळल्या........
अन्‌ गल्ल्यावर बसलेल्या स्टॉलवाल्यानं ते अचूक हेरलं.....तसा लगबगीनं तो काउंटर सोडून हजर झाला.
दुकानदार चांगलाच तरूण अन्‌ तिशीतला चुणचुणीत पोरगा वाटत होता.
दुकानदार," या ताई.....या या....काय हवंय्‌?.....काय दाखवूं आपल्याला?"
सौ. इंदिराजी," गॅस च्या शेंगड्या बघतेय्‌ जरा.............."
दुकानदार," बघा की ताई....अहो तुमच्यासाठीच तर मांडलंय्‌ दुकान.......
आणि बरं कां ताई....ह्या शेंगड्या आम्ही स्वतःच बनवतो.....दुसरीकडून आणून नुस्त्या विकत नाही.....
’आय. एस. ओ. ८०००’ प्रमाणित शेंगड्या आहेत आमच्या....ह्या दर्जाच्या शेंगड्या तुम्हांला दुसरीकडं कुठंच मिळायच्या नाहीत."
सौ. इंदिराजी," आणि गॅरंटी चं काय?"
दुकानदार,"गॅरंटी आहे ना ताई.....चांगली दोन वर्षांची लेखी ’रिप्लेसमेंट गॅरंटी’ देतो आम्ही.........
सौ. इंदिराजीं,"किंमतीं चं बोला..........."
दुकानदार," अहो किंमतीची काय घाई आहे ताई? तुम्ही फक्त शेंगडी पसंत करा.....
बाकीचं मी अन्‌ साहेब बघून घेतो.....काय?"
सौ. इंदिराजीं," साहेब फक्त दर्जा बघून घेतील....बाकीचं माझ्याबरोबर बोलायचं.....!!"
दुकानदार जरा चंपापला," ठीकाय्‌ ताई....तुम्ही म्हणाल तसं.....आधी शेगडी तर पसंत कराल?"
सौ. इंदिराजीं," ती च तर मेली पसंत पडेना झालीय्‌.....ही एक जरा बरी दिसतीय्‌.....
पण ही बटणं कसली गचाळ लावलीय्‌त हो अगदी?"
दकानदार,"ताई...बटणांचं काय एव्हढं?....शेंगडी तर उत्तम आहे ना?"
सौ. इंदिराजीं,"शेंगडी ठीक वाटतीय्‌".....मग मला म्हणाली," अहो ही शेंगडी बघा जरा....दर्जा कसा वाटतोय्‌ तो?"
मी," पत्राबित्रा अन्‌ बर्नर तर उत्तम दिसताय्‌त....घ्यायला हरकत नाही हवीतर‌...."
सौ. इंदिराजीं,"उत्तम काय?....बटणं नाहीत मला आवडली.....गचाळ च दिसताय्‌त अगदी."
दुकानदार,"ताई, तुम्ही शेंगडी पसंत करा फक्त....बटणांचं काय एव्हढं?....दुसर्‍या शेंगडीची देतो की बदलून हवी तर."
सौ. इंदिराजीं,"ठीकाय्‌....त्या....त्या कोंपर्‍यातल्या शेंगडीची बटणं आहेत नां....लाल ठिपकेवाली....
ती छान दिसतील ह्या शेंगडीला"
दुकानदार,"ती हवीत काय ताई?......ए पक्या....जरा इकडं ये पटकन्‌‍......
हे बघ....ती कोंपर्‍यातली शेंगडी आहे ना लाल बटणंवाली? तिची बटणं काढून ह्या शेंगडीला बसवून दाखव ताई नां"
पक्या नं पटापट बटणं बदलली.....अन्‌ सौदा पुढं सुरूं झाला.....
दुकानदार," अरे वा....ताई तुमची निवड अगदी चोंखंदळ आहे बरं का.......झालं ना ताई तुमच्या मनासारखं?"
सौ. इंदिराजीं," बरी दिसताय्‌त ना हो ही बटणं?"
मी," होय....छान दिसताय्‌त."
दुकानदार,"ए पक्या......बिलबुक आण इकडं चटकन्‌"
सौ. इंदिराजीं," बिलबुक ठेंवा बाजूला....आधी किंमत सांगा."
दुकानदार,"चिंता करूं नकां ताई....तुमच्याकडून एक पैसाही ज्यास्त घेणार नाही मी....बोहनी चं गिर्‍हाईक आहांत तुम्ही आजचं."
सौ. इंदिराजीं,"ते राहूं द्या.....किंमत बोला आधी."
दुकानदार," त्याचं काय आहे ताई, ही शेगडी बाहेर आम्ही ४४०० रुपयांना विकतो.....
इथली किंमत लावलीय्‌ ४०००, पण खास तुमच्यासाठी रु. ३८०० फक्त.....बोहनी चं गिर्‍हाईक म्हणून."
सौ. इंदिराजीं," चला हो....अजून दोनतीन स्टॉल लागलेत....तिथंपण बघून येऊं जरा."
दुकानदार जरा सावध झाला,"काय झालं ताईं?"
सौ. इंदिराजीं,"किंमत फार ज्यास्त होतीय्‌....माझ्या मैत्रिणीनं परवांच घेंतलीय्‌ असली शेंगडी....."
दुकानदार,"अहो ताई....मालामालाच्या दर्जात खूप फरक असतो.......
अशी शेंगडी तुम्हाला ह्या किंमतीत दुसरीकडं कुठंच मिळायची नाही."
सौ. इंदिराजीं,"ठीकाय्‌....चला हो....बघून तरी येऊं."
दुकानदार,"कश्याला त्रास घेताय ताई आता? शेंगडी तर पसंत आहे ना?
अजून थोडंफार कमीज्यास्त करूं की तुमच्यासाठी........मग तर झालं?"
सौ. इंदिराजीं,"डिस्काउंट किती देणार?"
दुकानदार," ताई...तसं म्हणाल तर परवडत नाही बघा...पण तुम्ही म्हणताय म्हणून केंवळ, अजून ३०० रुपये कमी करतो...
३५०० रुपये..........काय म्हणताय्‌ मग?......करायचं बिल?"
सौ. इंदिराजीं,"माझ्या मैत्रिणीला साध्या शेंगडीवर चांगला बाराशे रुपये डिस्काउंट मिळालाय्‌....
ह्या शेंगडीवर १५०० तरी द्यायला हवा....३००० रुपये किंमत ठीक आहे."
दुकानदार," ताई तुमचंही राहूं द्या अन्‌ आमचंही सोडा....३२०० रुपये लावतो.....
परवडत नाही बघा आम्हाला....फक्त तुम्ही म्हणताय्‌ म्हणून."
सौ. इंदिराजीं,"ठीकाय्‌......फ्री होम डिलिव्हरी देणार ना?....नाहीतर नंतर खेंकटीं काढाल....."
दुकानदार,"असं कसं करूं आम्ही ताई? शहराच्या हद्दीत देऊं की फ्री होम डिलिव्हरी.....मग.....फाडायची पावती?"
सौ. इंदिराजीं,"इतक्यांत नको.....भेंटवस्तूं काय आहे शेंगडीवर?"
दुकानदार,"ताई....अहो भेंटवस्तूं कांही नसते या शेंगडीवर.....तरीपण डिस्काउंट दिलाय्‌ ना इतका घंसघंशीत...."
सौ. इंदिराजीं,"भेंटवस्तूं कांहीच नाही? इथं तर सगळेच देताय्‌त....नको.....राहूं द्या."
दुकानदार,"असं जाऊं नकां ताई....बोहनी करायची आहे....
ए पक्या...जरा बघ रे कांही छोटीशी भेंटवस्तूं शिल्लक आहे काय देण्यासारखी?"
सौ. इंदिराजीं,"फालतूं कांही तरी नको......मला बघूं द्या.....मी निवडते."
इंदिराजीनीं एक पसरट तंवा निवडला नॉन्‌ स्टिक्‌वेअर चा...दुकानदाराचा चेंहरा चिंताग्रस्त. !!
दुकानदार,"झालं ताई आतां?........करूं बिल?"
सौ. इंदिराजीं," नको."
दुकानदार,"नको?.....आतां काय बाकी राह्यलंय्‌ ताई?"
सौ. इंदिराजीं,"जुन्या शेंगडीचे किती देणार?"
दुकानदाराचा चेंहरा पिळवटला......,"जुन्या शेंगडीचं काय ताई?"
सौ. इंदिराजीं,"किती देणार?"
दुकानदार आतां गयावया करायला लागला,"जुन्या शेगडीचं काय देणार ताई....आम्हांलाच कांही मिळत नाही तर? "
सौ. इंदिराजीं,"कांही मिळत नाही कसं? भंगारवालासुद्धां पंधराशे द्यायला तयार आहे....!!
चांगली ओंतीव बिडाची जोडशेंगडी आहे वापरातली."
दुकानदार," जाऊं द्या वहिनी.....आठशे कमी करूं अजून....आतां कांहीच बोलूं नकां."
सौ. इंदिराजीं," आठशेत बिडाची ओंतीव शेंगडी द्यायला परवडलं पाहिजे ना आम्हांला?
......जाऊं द्या....बाराशे करा....अन्‌ मिटवून टाका एकदाचं.....तुम्ही फारच तांणून धंरताय्‌ !!!"
दुकानदार," काय बोलणार आतां ताई तुमच्यापुढं?.....चला....तुमच्या मनासारखं होऊं द्या....
ए पक्या......बिलबुक आणि पेन आण लवकर......जा पळ."
सौ. इंदिराजीं," हं आतां पटकन्‌ करा बिल....आधीच वेंळ फार मोडलाय्‌......
दुकानदार," हं...... हे बघा ताई....मूळ किंमत ४४०० रुपये, वजा बाराशे डिस्काउंट....
म्हणजे ३२०० रुपये झाले....त्यातनं जुन्या शेंगडीचे बाराशे गेले..... राहिले दोन हजार.....बरोबर ना?
सौ. इंदिराजीं," जुन्या शेंगड्या दोन आहेत..... !!"
दुकानदारानं अक्षरशः आं वासत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!
अन्‌ आश्चर्य म्हणजे खो खो हंसायला पण लागला.....
सौ. इंदिराजीं," काय झालं हो......पावती करताय्‌ ना?"
दुकानदार," काय झालंय्‌ ताई ते सांगतो.....त्याचं काय आहे की........"
सौ. इंदिराजीं," काय आहे?"
दुकानदार," असं बघा ताई....तुम्ही जर अजून एक तिसरी जुनी शेंगडी आणलीत ना.....
तर ही नवी शेंगडी देऊन वर आणखी मलाच तुम्हाला चारशे रुपये द्यावे लागतील बघा....!!!"
आतां मी च स्वतःच्या कपाळाला चवथ्यांदा हात लावला.!!!!
दुकानदार," असलं कांही होत नसतं व्यवहारांत ताई.....तेव्हां बघा कांही जमत असलं तर....नसेल जमत तर राहूं द्या."
सौ. इंदिराजीं," ठीकाय्‌....राहूं द्या दुसर्‍या शेंगडीचं...." अन्‌ मला म्हणाल्या," दोन हजार द्या काढून."
सौदा अखेर जमला....अन्‌ दुकानदारानं खुषीत दोन हजारांची पावती पण करून दिली.
सौ. इंदिराजीं," शेंगडी कधी पाठंवताय्‌?"
सुकानदार,"आतां बराच उशीर झालाय्‌ ताई....उद्यां सकाळीच पाठवून देतो...चालेल?"
सौ. इंदिराजीं,"चालेल की....."
दुकानदार," धन्यवाद ताई....बोहनी फुकट नाही घालवलीत म्हणून....
ए पक्या....तीन कॉफी आण जरा लंवकर....कॉफी चालेल ना ताई?"
सौ. इंदिराजीं,"कश्याला उगीच त्रास तुम्हाला?"
"अहो त्रास कसला त्यात ताई?......पण एक खरं सांगूं काय तुम्हाला?"
" बोला की", मी म्हणालो.
दुकानदार सौ. इंदिराजीं कडं निर्देश करत म्हणाला," असं बघा साहेब....
गेली दहा वर्षं दुकानदारी करतोय्‌ मी....’एम्‌. बी. ए.’ सुद्धां झालोय्‌.....
ह्या व्यवहारांत तसं फारसं कांही सुटलं नाही म्हणा मला......
पण धंदा कसा करायचा, ते मात्र ह्यांच्याकडून शिकलो. !!!"

आम्ही कॉफी संपवून घरी निघालो.

गाडीत बसल्यावर सौ. इंदिराजीं म्हणाल्या," बघितलंत ना हे दुकानदार कसे डॅंबीस असतात ते?
चांगल्या दोन जुन्या शेंगड्या अन्‌ वर आणखी आठशे रुपये मोजायला तयार होते.....तर नको झाले मेल्याला....
ते तुमचं ’विन्‌-विन् वाटाघाटी‌’ फक्त पुस्तकांपुरतंच ठीक असतं व्याख्यानं झोंडायला....
व्यवहारांत तसलं कांही चालत नाही....समजलं?"
मी म्हणालो," तसं नाही कांही....फक्त तुमची ’विन्‌-विन् वाटाघाटीं‌’ ची पद्धत जरा वेगळी आहे... इतकंच काय ते...... 
आणि ते त्याला बरोबर समजलं....म्हणून त्यांनं अखेर पांढरं निशाण फडकवलं."
" म्हणजे?.....काय म्हणायचं काय आहे तुम्हांला?", सौ. इंदिराजीं फिस्कारल्या.
मी,"सांगतो.....एक शिकारी होता.....ध्रुव प्रदेशांत राहणारा."
सौ. इंदिराजीं," बरं पुढं?"
मी," ऐका जरा...तो शिकारी अस्वलांची शिकार करून त्यांची केंसाळ कातडी विकून उदरनिर्वाह करीत असे.
    एकदां काय झालं....आख्खा आठवडाभर त्याला शिकार च मिळाली नाही....
    बिचार्‍यानं अंगावरचा अस्वलाच्या कांतड्याचा फरकोट विकून कशीबशी आठवडाभर पोंटोबा ची सोंय लावली खरी......
    पण झालं भलतंच.......तो आतां थंडीनं मरेमरेतों कुडकुडायला लागला.!!
    झालं.....मग एका रात्री शिकार केल्याशिवाय परतायचंच नाही असा निश्चय करून तो घराबाहेर पडला....
सौ. इंदिराजीं," मग पुढं काय झालं?"
मी," दिवसभर शिकार शोंधून तो दमला....अन्‌ अंधारायच्या वेंळेला एका खडकाच्या आडोश्याला लवंडला....
    तेंव्हढ्यांत वरच्या खडकावर झोंपलेलं एक भलंमोठ्ठं अस्वल धंप्पदिशी उडी मारून याच्या पुढ्यात उभं राहिलं....
    शिकार्‍याला बंदूक उचलायचीही संधी त्यानं दिली नाही....
    मरण समोर उभं ठांकलेलं बघून शिकारी गंळाठला......
    तेंव्हढ्यात एक गम्मत झाली....ते सवल साधं नव्हतं....ते शिकार्‍याशी बोलायला लागलं.....
सौ. इंदिराजीं," अय्या....गम्मतच आहे की....बरं मग पुढं काय झालं?"
मी," शिकारी अन्‌ अस्वलानं एकमेकांशी बोलून परस्परांच्या गरजा समजावून घेंतल्या.....
    शिकार्‍याला अस्वलाच्या कांतड्याचा फरकोट हवा होता........
    अन्‌ अस्वलाला भुकेनं व्याकूळ झाल्यामुळं पोंटभर भोजन हवं होतं......
सौ. इंदिराजीं," मज्जा च आहे सगळी....मग काय झालं पुढं?"
मी," मग त्या दोघांनी वाटाघाटी करून दोघांच्याही गरजा भागवील, असा सौदा करायचं ठंरवलं....
     ’विन्‌-विन्‌’ पद्धतीनं....आणि एकमेकांसमोर बसून त्यांनी रात्रभर वाटाघाटी केल्या."
सौ. इंदिराजीं," मग काय झालं शेंवटी सकाळी ?"
मी," सकाळी दोघांचं एकमत होऊन सौदा ठंरला....दोघांच्याही गंरजा न्याय्य आहेत आणि त्या भागल्या पाहिजेत म्हणून.
सौ. इंदिराजीं," मग.......... काय झालं पुढं?"
मी," काय होणार दुसरं? सौदा ठंरतांक्षणींच अस्वलानं झंडप घालून शिकार्‍याला फस्त केला. !!
    आणि अश्या रीतीनं अस्वलाचं पोंटही भरलं......, 
    अन्‌ शिकार्‍यानंही आपोआप अस्वलाच्या कांतड्याचा फरकोट अंगभर पांघरला.!!
    तेव्हां ’इंदिराजी’.....तुमचं ’विन्‌-विन्‌ वाटाघाटीकौशल्य’ हे असं आहे.!!!"
आतां मात्र दस्तुरखुद्द ’सौ. इंदिराजीं मॅडम’ नी च स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!
त्या आतां माझ्याकडं बश्याएव्हढे भलेमोठ्ठे डोंळे करून बघायला लागल्या.....
आणि घरी गेंल्यावर उपाशीपोंटी झोंपायची तंयारी ठेंवून मी ऍक्सिलरेटरवर पाय दाबला. !!!!!

*************************************

रविशंकर.
२८ डिसेंबर २०१३.

No comments:

Post a Comment