Search This Blog

Saturday 7 December 2013

॥ मॅकेन्नाज्‌ गोल्ड ॥

॥ मॅकेन्नाज्‌ गोल्ड ॥



वाहतूक पोलिसानं कर्कश्य शिट्टी वाजवली, तशी मी 'बुलेट' रस्त्याच्या कडेला घेऊन ब्रेक लावला, नी थांबलो.
आधीच गाडी नवी कोरी करकरीत.....गाडीची डिलिव्हरी मिळायलाच दुपारचा एक वाजला होता.....
त्यांत भर म्हणजे डीलर नं गाडी ताब्यांत देताना ’दादू पेंटर’ चा पत्ता, अन्‌ नंबर च्या पाट्या रंगवून घ्यायचे पैसे दिले.
आणि ’घरी जातां जातां नंबर टाकून घ्या’ असं सांगितलं.
१९७२ सालातल्या कडकडीत एप्रिल महिन्यातली ती एक ऊष्ण दुपार होती.......... 
’दादू पेंटर’ कडं दहा पंधरा गिर्‍हाइकांची आधीच रांग लागलेली............
पण दहा वर्षांचं जुनं गिर्‍हाईक ओंळखून, ’दादू पेंटर’ नं हातातलं काम बाजूला सारलं....
अन्‌ स्वतःच माझी गाडी करायला घेंतली. 
अखेर नंबर पाट्या रंगवून होईस्तंवर दुपारचे दोन वाजले.
सकाळी नवी गाडी आणायला लंवकर निघायची घाई असल्यानं नाष्टा पण जेमतेमच केलेला होता, 
आणि आतां तर पोंटांत कावळॆ चांगलेच कोंकलायला लागले होते.....त्यामुळं घर गाठायची मला घाई झालेली होती.....
अन्‌ नव्या गाडी च्या पहिल्या स्वारीतच असा नाट लागल्यानं मी चांगलाच वैतागलो होतो.

मागोमाग ’सखाराम’ भाऊ डुलत डुलत गळाचा मासा ओंढायला आलेच.
सखाराम," नमस्कार साहेब.......गाडी नवीकोरी दिसतीय्‌.......मस्त आहे अगदी.....
अरे वा वा....’ह्या’ वयांत ’बुलेट्‌’ चालवतां साहेब?"
बहुधा नवी गाडी बघून ह्या ’सखाराम’ च्या तोंडाला पाणी सुटलेलं असावं......
पण मी बिल्कुल दाद द्यायला तयार नव्हतो.
मी," काय झालंय्‌ मास्तर?........गाडी कां थांबवलीत....अं?"
सखाराम," साहेब ’आरशी बुक’ दाखवा जरा"....सखाराम नं गाडी मागून पुढून न्याहाळत म्हटलं.
मी चंडफडत ’आर. सी. बुक’ काढून दाखवलं...
सखाराम नं ते उघडून बघितलं......... अन्‌ बॉंब च टाकला," साहेब गाडी चा नंबर चुकीचा आहे." !!
मी उडालोच," ऑं ? असं कसं काय होईल हो?..... अहो गाडी आत्तां तासापूर्वीच तर ताब्यात घेतलेली आहे."
सखाराम," साहेब, नंबर बघूनच मी ओंळखलं....अन्‌ शिट्टी मारली....
सध्या ’पुणे आर. टी. ओ.’ त ’एम्‌. एच्‌. १२ जे. ई.’ सीरीज चालूं आहे....’ एम्‌. एच्‌. १२ जे. एफ्‌.‌’ अजून सुरूं झालेली नाही....
अन्‌ तुमच्या गाडीचा नंबर आहे ’एम्‌. एच्‌. १२ जे. एफ्‌‌. ६३८९’ !! "
मी गाडी स्टॅंडवर चंढवून दोन्ही पाट्या बघितल्या.....’सखाराम’ बरोबर होते....!
’दादू पेंटर’ सोमरसाच्या अर्धजागृतीत ’ई’ ची तळातली आडवी दांडी च रंगवायला विसरलेला होता. !!
सखाराम," काय साहेब.....नंबर ’दादू पेंटर’ नं टाकलाय्‌ काय ?"
मी चाटच पडलो," होय....पण तुम्हांला कसं काय कळलं ते?"
सखाराम," अहो साहेब....जातिवंत ’पेताड तळीराम’ आहे ते....काय पण करून ठेंवतंय्‌......!
’पावशेर’ लावून टाकला असेल नंबर....दुस्ररं काय?!!
आतां असं करा.........."
मी सावध झालो,"..........काय करूं म्हणताय्‌ आतां?........अं?"
सखाराम," नाही....म्हणजे ’तंसलं’ कांही नाही साहेब....आपण ’बुलेट्‌’ वाल्यांना मानतो बघा.....
ही गाडी अशीच फिरवूं नका साहेब......नाहीतर प्रत्येक चौकातला हवालदार हटकणार तुम्हाला.......
नंबर आत्तांच टाकलाय्‌ ना? मग असेच जा परत ’दादू पेंटर’ कडं अन्‌ नंबर दुरुस्त करून घ्या लगेच....काय?"
असा प्रेमळ सल्ला देऊन ’सखाराम’ नं माझ्याशी चक्क हस्तांदोलनसुद्धां केलं.......
आणि मी कपाळाला हात लावून ’दादू पेंटर’ च्या सात पिढ्यांचा उद्धार करत गाडी परत माघारी वळवली. !!

हा ’दादू पेंटर’ म्हणजे कोल्हापूर च्या पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेली एक वेंचक वल्ली होती.
त्या काळीं आजच्यासारखे नंबर च्या पाट्या क्षणांत तयार करणारे कॉंप्युटर नव्हते.....
तो ’दादू पेंटर’ सारख्या कारागिरांचा काळ होता.
वाहनांच्या नंबरच्या पाट्या देखील हातानंच रंगवायचा तो काळ..........
आणि रंगकलेत ह्या ’दादू’ चा हात धंरील असा पेंटर त्या काळीं आख्ख्या कोल्हापूरच्या पंचक्रोशीत तरी नव्हता.
हा दादू बोडके कसा काय पाट्या रंगवत बसला याचं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं.....
खरं तर तो चांगला ’रंगकर्मी’ च व्हायचा.....त्या तोडीची कला त्याच्या हातात जन्मतःच होती.
कसल्याही पाट्या रंगवणं......म्हणजे अगदी हॉटेलातल्या दरपत्रकापासून ते सिनेमाच्या पोस्टरपर्यंत.....
हा ’दादू पेंटर’ चा उदरभरणाचा धंदा.
आणि हातात कला तर अशी फक्कड, की ’दादू पेंटर’ नं रंगवलेली पाटी अगदी कुणालाही ओंळखता यायलाच हवी.
फक्त ह्या ’दादू पेंटर’ ला दोन खोडी अगदी जबरदस्त चिकटलेल्या होत्या....
पहिली ’दारू’....अन्‌ दुसरी ’सिनेमा’.
क्वचित्‌ कधीकधी भल्या सकाळीसुद्धां त्याच्या तोंडाला सोमरसाचा वास मारायचा.!!
पण हातात एकदा ब्रश घेंतला, की पूर्ण शुध्दीत असलेल्या पेंटरच्याही तोंडात मारील, अश्या देंखण्या पाट्या बघतां बघतां आकाराला यायच्या.!!
सिनेमाच्या बाबतीत त्याला देशी चित्रपट अजिबात चालायचे नाहीत......फक्त इंग्रजी चित्रपटांचा तो दर्दी षौकीन. !!
मॅट्रिक नापास असल्यानं त्याला इंग्रजी चित्रपटातले संवाद ओ की ठो देखील कळायचे नाहीत....
पण त्यासाठी ’दादू पेंटर’ चं कधीच कांहीही अडलं नाही. !!
नुस्ती चित्रफीत बघूनच त्याला सगळा चित्रपट समजायचा.!!
गंमत म्हणजे ह्या चित्रपटांच्या षौकानंच त्याला धों धों धंदा मिळवून दिलेला होता.!

कोल्हापुरांत त्या काळीं ’उमा’ हे एकमेव चित्रपटगृह फक्त इंग्रजी चित्रपटांसाठीच प्रसिद्ध होतं.
’दादू पेंटर’ च्या चित्रपटषौकामुळं ’उमा’ चे मालक श्रीं. दादासाहेब चाफळकर 
आणि मॅनेजर श्रीं.बाबुराव गिजवणेकर हे दोघेही ’दादू पेंटर’ ला चांगले ओंळखायचे.
त्या काळांत इंग्रजी चित्रपटांतल्या ’फराक्‌’ वाल्या गोर्‍याधंप्प ’बाया’ अन्‌ पहिलवानी थाटाचे पाटलोणीतले ’बाप्ये’ बघायला 
हुक्केरी,हत्तरगी,सौंदत्ती, इचलकरंजी, कुरुंदवाड, राशिवडे, असल्या कोल्हापूरच्या पंचक्रोशीतल्या ’बुद्रुक’ खेंड्यापाड्यातले 
पटकेवाले निरक्षर शेंतकरी बेदम गर्दी करायचे.....
त्यांची अडचण फक्त एकच असायची.....इंग्रजी भाषा.
ह्या षौकिनांच्या सोयीसाठी श्री. गिजवणेकरांनी मग एक नामी शक्कल लढवलेली होती............
त्यांनी ’दादू पेंटर’ ला हाताशी धंरला, आणि ’उमा थिएटर’ च्या दर्शनी आवारांत एक भलामोठ्ठा फलक उभा केला.
ह्या फलकावर चालू चित्रपटाची पांचसहा रंगीत पोस्टर्स वरच्या भागात लावलेली असायची.......
आणि खालच्या दहा फूट गुणिले सहा फूट मोकळ्या जागेत संपूर्ण चित्रपटाची कथा 
मुद्देसूदपणे थोंडक्यात, पण चक्क मराठीत लिहिलेली असायची.!
रसिकांनीं फक्त एक च करायचं......आधी कथा वाचायची....
अन्‌ आवडली, तर मग तिकिट काढून आंत जाऊन फक्त चित्रफीत बघायची.!!
असली भन्नाट कल्पना श्री. गिजवणेकरांना ह्या ’दादू पेंटर’ नं च प्रथम १९६० सालीं सुचवली....
आणि त्यावेंळी ’बेनहर’ चित्रपटाचा ’दादू पेंटर’ नं रंगवलेला फलक ’उमा’ चित्रपटगृहाच्या आवारांत प्रथम झळकला...........
’दादू पेंटर’ ची ही कल्पना इतकी बेदम यशस्वी झाली, 
की ’उमा’ चित्रपटगृहांत ’बेनहर’ तब्बल बावन्न आंठवडे तुफान गर्दी खेंचत चालला.!!!
श्री. चाफळकरांनी हे फलक रंगवायचं काम मग तहहयात ’दादू पेंटर’ ला च बहाल केलं....मागेल ती मजुरी देऊन.
वर आणखी फुकट चित्रपट बघायचा बोनस वेंगळाच !!......’दादू पेंटर’ ला तरी आणखी काय हवं होतं?
’भाषांतरकार गिजवणेकर’ आणि ’रंगकर्मी दादू पेंटर’, ह्या दुक्कलीनं तो फलक पुढची वीस वर्षं अक्षरशः गाजवला.!!
हे गिजवणेकर चित्रपटाची नुस्ती कथा च लिहायचे नाहीत, 
तर शीर्षकांची भाषांतरंही मराठी रसिकांनां भावतील अशीच चपखल करायचे.
उदाहरणार्थ........ ’सायको’ चं भाषांतर ’पिसाटलेला’, 
’टु हेल्‌ ऍंड्‌ बॅक्‌’ चं भाषांतर ’नरकवारी’, 
’द ग्रेट एस्केप्‌’ चं भाषांतर ’आग्र्याहून सुटका’
’वेट अंटिल्‌ डार्क’ चं भाषांतर ’आंधळी कोशिंबीर’
’गन्स्‌ ऑफ़ नॅव्हरॉन’ चं भाषांतर ’नवराण्याच्या मुलुखमैदान’,.......
आणि ’मॅग्निफिशंट्‌ सेव्हन्‌’ चं भाषांतर तर त्यांनी अचाट च केलेलं होतं.......’वेंगात दौडले सात’ !!
दादू-गिजवणेकरांच्या दुक्कली नं उभ्या केलेल्या त्या भव्य फलकापुढं 
दिवसाआड पांचपन्नास तरी पटकेवाल्यांचा जथ्था उभा असायचाच.
त्यांतला वाचतां येणारा कुणीतरी म्होरक्या एकेक अक्षरं लावत सावकाश कथा वाचायचा...........
अन्‌ म्होरक्या नं फक्त म्हणायचा अवकाश.......," लई भारीतलं काम हाय......चला !!", 
की शे-पन्नास तिकिटं एकगठ्ठा हातोहात खंपायची. !!
असली ’भन्नाट जादू’ च ह्या ’दादू-गिजवणेकर’  दुक्कली नं करून दाखवलेली होती.....
आणि मालक दादासाहेब चाफळकर तर ह्या करामतीवर बेहद्द खूष होते.
आणि बघतां बघतां ’दादू पेंटर’ नं स्वतःच्या दुकानाची जागा घेंतली...अन्‌ हाताखाली दोन शिकाऊ पोरं पण ठेंवली.
आतां ’दादू पेंटर’ स्वतः फक्त हे चित्रपटांचे फलकच रंगवायचा....अन्‌ शिकाऊ पोरं इतर पाट्या रंगवायची.

मी चंडफडत ’दादू पेंटर’ च्या दुकानासमोर गाडी लावली.....अन्‌ घुश्श्यातच आंत गेलो.....
पुढच्या दर्शनी भागात एका पेट्रोल पंपाच्या पाटी चं रंगकाम दोन शिकाऊ पोरं करत होती.....
मजकूर असा होता....
’ गाड्यामंदी प्याट्रोल भरतांनी मीटर बघूण घेने. णंतर कसलीबी तक्रार अजाबात ऐकूण घेतली जानार न्हाई ’
----- हुक्मावरूण
पाटी वांचून मी कपाळाला हात लावला. !!
त्यातल्या एका ’शिकाऊ रंगकर्मी’ ला मी विचारलं," अरे बाळू......काय चाललंय्‌ हे...... कुणी बनवली रे ही असली पाटी?"
त्यातलं एक पोरगं दुसर्‍याकडं बोंट दाखवत म्हणालं," ह्या ’अंद्या’ नं साहेब.....ह्यो मला ’शिनियर’ हाय." !!
मी ’अंद्या पेंटर’ ला विचारलं," ही पाटी तुला लिहून कुणी दिली रे बाळ?"
पेंटर म्हणाले," लिवुनशान न्हाई काय दिली.......... मामा नीं तोंडी च सांगितली...."
मी म्हटलं," असं होय?....बरं बरं....नांव काय रे तुझं?"
पेंटर," आंद्या"
मी," तसं नाही बाळ......नीट सबंध नांव सांगावं कुणी विचारलं की."
पेंटर," आणंद बानेकर" !
मी," अच्छा अच्छा......आनंद बाणेकर होय?"
पेंटर," तसं न्हवं वो साहेब......’आणंद बानेकर’....! ’बाना’ तला ’ण’ " !!
’आणंदा’ चं अगाध मराठी बघूण मी पन दुसर्‍यांदा कपाळाला हात लावला. !!!

तेंव्हढ्यात माझ्या मागोमाग दस्तुरखुद्द ’भाषांतरकार गिजवणेकर’ च दुकानांत दाखल झाले.
गिजवणेकर," नमस्कार नाना, कसे काय इकडं इतक्या दुपारी?....वा वा वा.......
गाडी नवीन घेतली वाटतं?.....अभिनंदन....’दादू’ कुठाय्‌?"
मी," नमस्कार....मी पण त्यालाच शोंधतोय्‌.......आत्तां च आंत आलोय्‌‍ बघा....."
गिजवणेकरांनी मग एका पाटी रंगवणार्‍या मुलाला विचारलं," काय रे बाळू....’दादू’ कुठाय्‌ ?"
बाळू," मामा आतल्या खोलीत हायती.....तुमच्या बोर्डाचं च काम चाल्लंय्‌ बघा....जावा जावा आत....
म्हणत बाळू नं हाळी दिली ," वो मामा....गिजवणेकर सायेब आल्यात....आनि नानासायेब बी हाईत संगट........"
मी," काय बाबुराव....कसली पाटी करतोय्‌ ’दादू’.......नवीन चित्रपट लागलाय्‌ काय्‌?"
बाबुराव," होय होय...अहो त्या ’मॅकेन्नाज्‌ गोल्ड’ बद्दल ऐकलंय्‌त ना? तो सुरूं होतोय्‌ उद्यापासून....म्हणून सगळी गडबड बघा......
अहो मुंबई त ’इरॉस’ ला अठरा आठवडे हाउसफुल्ल झाले....तरी गर्दी खेंचतोच आहे अजून....
तेव्हां म्हटलं जरा ’स्पेशल’ च फलक बनवावा.....तर ह्या ’दादू’ चे नखरे सुरूं झाले.....
तेव्हां रटटे घालून काल संध्याकाळापास्नंच कामाला जुंपलाय्‌ त्याला.....पण काय झालं की.......
त्याला कथा लिहून दिली.....पण घाईघाईत शीर्षक च लिहून द्यायला विसरलो बघा..........
आतापावेतों बहुधा फलक पुरा झाला असणार.....म्हणून धांवतच आलोय्‌......
चला चला तुम्हीपण....... जरा बघूंया तरी फलक कसा झालाय्‌ ते."

असं म्हणत बाबुरावांनी मला पुढं घालूनच आतल्या खोलीत प्रवेश केला.......
अन्‌ सोमरसा चा ऊग्र भंपकारा भस्स्‌कन्‌ आमच्या नाकांत शिरला. !!
आतल्या अंगणांत रात्रभर जागून तारवटलेले ’दादू पेंटर’ रंगाचे कुंचले अन्‌ पॅलेट्‌ साफसूफ करीत होते.......
सगळ्या अंगणभर रंगसाहित्य अन्‌ फडक्यांचे बोळे इतस्ततः पसरलेले........
आणि ह्या पसर्‍यातच तो दहा बाय दहा फुटांचा भव्य फलक वर्तमानपत्रांनी झांकून ठेंवलेला होता.......
बाबुराव," झालं काय रे ’दादू’....? अरे तुला कथा लिहून दिली काल....
अन्‌ आत्तां सकाळी आठवलं की ’हेडिंग’ द्यायलाच विसरलो....!!
म्हणून अंघोळ आवरायच्या आधी ’असा’ च आलो बघ."
’दादू पेंटर’ शांतपणे उत्तरले," त्यानं कांही अडलं नाही बाबुराव....’म्याट्रिक नापास’ हाय आपण....काय? !!
काम पुरं करायची घाई होती ना तुम्हाला?.........म्हणून ’हेडिंग’ मी च देउन टाकलं.......!!!
बघा तरी फलक कसा भारीतला झालाय्‌ ते."
असं म्हणत ’दादू पेंटर’ नं फलकाचं अनावरण केलं..........
अन्‌ मी आणि बाबुराव आ वांसून बघतच बसलो.......
फलकावर ’दादू’ च्या देंखण्या वळणदार अक्षरांत ’ मॅकेन्नाज्‌ गोल्ड’ ची कथा लिहिलेली होती.......

’ एकोणिसाव्या शतकांत ’नेवाडा’ च्या रखरखीत वाळवंटातल्या दुर्गम दरीत ’अपॅची रेड इंडिअन’ जमातीनं प्राणपणानं गुप्त ठेंवलेली सोन्याची खाण हुडकून काढायला जिवाची बाजी लावणारे जिगरबाज साहसवीर...
पहा.....नजरेत न मावणारं नेवाडा चं विशाल वाळवंट अन्‌ नजर न ठंरणार्‍या वायुवेंगी घोडदौडी.......
पहा.....कानठंळ्या बसवणारे बंदुकांचे दंणदंणाट ....अन्‌ काळीज कांपवणारे तलवारींचे खणखणाट.....!!
पहा...देखणा मर्दानी ’ग्रेगरी पेक’ अन्‌ तारुण्यानं मुसमुसलेल्या ’अना बर्गर’ चा धंगधंगत्या वाळवंटातला गारेगार प्रणय...!!
एकदा पहाल तर सुस्तावाल.....चुकवाल तर पस्तावाल.....!!
युनिव्हर्सल’ चा तीन तास खुर्चीला खिळवून ठेंवणारा दिलखेंचक भव्य सप्तरंगी तुफानी चित्रपट........'
 
** ’ मकण्णा चं सोनं ’ **  !!!!! 

’दादू पेंटर’ नवटांक रिचंवून, कुंचल्याच्या कांही फंटकार्‍यांतच, हॉलिवुड च्या त्या अभिनय सम्राटाची रवानगी थेंट ’हत्तरगी बुद्रुक’ च्या ठोंक धान्यबाजारांत करून मोकळे झालेले होते. !!!
’दादू’ ची ती तुफानी कलाकृती बघून मी माझं उपाशी पोंट धंरून खदांखदां हंसायला लागलो......!!!
आणि खुद्द भाषांतरकार गिजवणेकरांनीच धन्य धन्य होत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!

*********************
रविशंकर.
६ डिसेंबर २०१३.

No comments:

Post a Comment