Search This Blog

Monday 25 November 2013

॥’पाना’ चं लग्न ॥

॥’पाना’ चं लग्न ॥




"नानासहेब भाटवडेकर इथं च राहतात काय हो ?"
पांठीमागून कुणाचातरी आदबशीर आवाज आला, तसं पार्थ नं हातांतली झाडं छाटायची कात्री बाजूला ठेंवली...............अन्‌ पांठीमागं वळून बघितलं.


पुण्यातली वैशाख ‌ऋतूंतली एक टंळटळीत उन्हाची दुपार......
पार्थ रविवार चा दिवस असल्यानं घरीं च होता. आई-नाना आज एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 
संकाळच्या गाडीनं नाशिक ला गेलेले होते, अन्‌ त्यामुळं पार्थ एकटाच घरीं होता. एक तर सुट्टी चा दिवस....आणि आई-नाना पण घरीं नव्हते.
त्या संधीचं सोनं करीत, पार्थराव उन्हं वर येईपर्यंत निवांत लोळले होते....नंतर तासभर वर्तमानपत्राचं वाचन.....
आणि आत्तां जेवणखाण आटोपून नुकतेच बागकामालाची हौस भागवत होते....आणि त्यातच हा व्यत्यय आला होता.    
" हो. हो. इथंच राहतात........आपण?", पार्थ नं विचारलं
समोर एक पन्नाशी गांठलेले गृहस्थ उभे होते......आर्जवी चेंहरा.....डोंक्याला गोल काळी टोंपी......
अंगावर कोट आणि धोंतर असा जुन्या काळांतला वेष......एका हातांत मिटवलेली छत्री, 
अन्‌ दुसर्‍या हातांत कापडी पिशवी......बहुधा ’घरी’ च शिवलेली असावी.
" मी सदाशिव रामतीर्थकर.......नारायण पेठेंत राहतो.....जरा चौकशी करायला आलो होतो.......
कुठलं घर म्हणे नानासाहेबांचं? "......अभ्यागतांनी तो वाडा असल्याकारणानं हा प्रश्न विचारलेला असावा."
" या या असे माझ्यामागून या वर", म्हणत पार्थानं चौकातला जिना चंढायला सुरुवात केली.....
अन्‌ अभ्यागत पाहुणे पण मागोमाग जिना चढूं लागले.

पार्थ नारायण भाटवडेकर ऊर्फ ’पाना’ हा माझा सख्खा आतेभाऊ.......इंदुआत्या चं एकुलतं एक अपत्य.

वडील नानासाहेब भाटवडेकर हे त्याकाळचे प्रख्यात वकील. त्यामुळं इंदुआत्याची घरची परिस्थिती चांगली सधन, 
म्हणजे चारचांकी वगैरे बाळगण्याइतकी चांगली होती. त्यात हा पार्थ एकुलता, त्यामुळं लाडाकोडात वाढलेला. 
माझ्यापेक्षा चारएक वर्षांनी मोठा.....म्हणजे साधारण तिशी चा तरी असेल.
अतिशय बुद्धिमान, हंजरजबाबी, हौशी, अन्‌ नुकताच ’एम्‌. बी. बी. एस्‌’. प्रथम क्रामांकानं उत्तीर्ण झालेला......
सध्या एका बाजूला बी. जे. वैद्यक महाविद्यालयात व्याख्यात्याची नोकरी करत,’एम्‌. एस्‌’ ही करत होता. 
थोंडक्यात त्याकाळांतलं तालेवार स्थळ होतं...... त्यामुळं लग्नाळू मुलीवाल्यांचा राबता पण सध्या घरीं बराच वाढलेला होता.

पण सगळं गरगरीत असलं तरी सध्या ह्या पार्थानं च इंदुआत्याची झोंप उडवलेली होती..... कारण त्याच्या दोन गोच्या होत्या.

पहिली म्हणजे ह्या ’पाना’ चा लग्नाच्या बाबतीतला ’विश्वामित्री’ पवित्रा. वय साधारण तिशी ला आलेलं....
पण हा ’पाना’ लग्नाची गोष्ट काढली की कश्यालाही दाद देत नसे. 
त्याचं एक च उत्तर असायचं," एव्हढी काय घाई आहे त्याची? शिक्षण पुरं झालं की बघूं सावकाश". 
रीतीप्रमाणं आमची इतर भावंडांची लग्नकार्यं उरकून ही दोनएक वर्षं उलटत आलेली.....
भरीला हा ’पाना’ तिशीला टेंकलेला.....अन्‌ लग्नाचं नाव पण नाही......मुली बघणं तर दूरच.
बिचार्‍या इंदुआत्यानं च परस्पर दहाबारा मुली बघितल्या पण होत्या.....
अन्‌ ह्या ’पाना’ चा रंग अजून हिरवा कसा होत नाहीय्‌, ह्या चिंतेनं ती बेंजार झालेली होती. 
एकदां आमच्या घरी आलेली असतांना माझ्या आईला म्हणाली पण होती," सुधे......ह्या विश्वामित्रा चं लक्षण मला तर कांही ठीक दिसत नाहीय्‌ बघ......एकदां कानउघडणी कर जरा......
तुझ्या शब्दाबाहेर तरी तो जाणार नाही ..... आणि ह्या ’विश्वामित्रा’ ला जर घोंड्यावर बसवलास ना......
तर लग्नांत वरमाई चा मान तुझाच आहे म्हणून समज. 
एकदा ह्याचे दोनाचे चार केले ना, की मी मोकळी झाले बघ.....खुशाल चार धाम यात्रेला जायला."

दुसरी गोची म्हणजे हा ’पाना’ जितका हंजरजबाबी, तितकाच फंटकळ पण होता. 

हा वडिलांच्यासारखा वकिलीला च जायचा खंरंतर.....कसा काय डॉक्टरी ला गेला हे एक आश्चर्य च होतं 
लहानपणी शाळेत असतांना एकदां गोरे मास्तर शरीरविज्ञाचा तास घेंत असतांना 
ह्या ’पाना’ च्या, खिडकीतनं बाहेर बघत टिवल्याबावल्या चालल्या होत्या.
झालं.............. मास्तर संतापले.
गोरे मास्तर," पाना, बाकावर उभे रहा ताबडतोब.!"
पार्थ सांवकाश बाकावर उभा राहिला.
"आतां सांगा सगळ्यानां", गोरे मास्तर," ’लंबमज्जा’ म्हणजे काय? "
’पाना’ चांचरला," सर.....’लंबमज्जा’ म्हणजे.....म्हणजे........"
" हं बोला लौकर..........", गोरे मास्तर.
पाना," सर ’लंबमज्जा’.............. म्हणजे ’लांबून दिसणारी मजा’ !!"
सगळा वर्ग फिदीफिदी हंसायला लागला.....!!
गोरे मास्तरांनी स्वतःच्या कपाळाला हांत लावला..............!!
आणि गंरजले," असं होय? छान...छान....आतां जरा जवळ या असे इकडं"
’पाना’ मास्तरांच्या समोर जाऊन उभा राहिला," काय सर?"
गोरे मास्तर म्हणाले," कांही नाही......आतां तुम्हाला जरा ’जंवळची मजा’ चांगली दांखवतो. !!"
असं म्हणत ’पाना’ ला मास्तरांनी वेंताच्या छडी नं सपासप्‌ फोंडून काढला.!!
हे घरी कळल्यावर वर आणखी नानां नी त्यांच्या काठी चा बोनस प्रसाद पण यथेच्छ दिला. !!!
गंमत म्हणजे हा ’पाना’ पण गोरे मास्तरांच्यासारखाच ’बी. जे. मेडिकल कॉलेज’ मध्ये प्रसिद्ध झालेला होता. 
त्याला कारण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ति.
हा ’पाना’ स्वतःच एकदां शरीरविद्न्याना चं लेक्चर देंत असतांना, एक विद्यार्थी त्याला खिडकीतनं बाहेर बघत बसलेला सांपडला. !!
झालं.............’पाना’ नं आरोळी ठोंकली," यू.....लास्ट बेंचर.....मिस्टर फर्नांडिस......उभे रहा".
फर्नांडिस नामक तो नग चांचरत उभा राहिला," काय सर ?"
पाना," बोला....मी इथं कोंकलून शिकवतोय्‌.....अन्‌ तुमचं काय चाललंय्‌ खिडकितनं बाहेर बघत ?...... अं?"
फर्नांडिस," सर............सर मी ’पानां’ चं निरीक्षण करत होतो सर........!!"
सगळा वर्ग हंसायला लागला........!!
’पाना’ पन जरा बांवचळलेच....पण क्षणभरच.
दुसर्‍या क्षणीं त्यांच्यातले ’पाना’ गंरजले," छान....छान......अतिउत्तम...! 
पण त्याची ’फळं’ फार वाईट आहेत.......... हे माहीत आहे ना?....ऑं?"
आतां सगळा वर्ग खदांखदां हंसायला लागला........!!
अन्‌ फर्नांडिस नं कपाळाला हांत लावत वर्गातनं सूं बाल्या केला. !!!
तर असा हा आमचा वात्रट पार्थ ऊर्फ ’पाना’..........
आई-नाना नाशिक ला जातांना तंबी भंरून गेलेले होते....
’कुणी अभ्यागत आले तर जरा नीट आगतस्वागत कर’ म्हणून.
तेव्हां अंगावर जबाबदारी मोठीच पडलेली होती.....
’पाना’ पाहुण्यांना वाट दांखवत जिना चंढून गेला....अन्‌ घरा चं दार उघडत म्हणाला," या..... बसा बसा " .
आलेले पाहुणे चोंहीकडं दिसणार्‍या चोखंदळ समृद्धीकडं बघत सोफ्यावर स्थानापन्न झाले......
पार्था नं आंत जाऊन चंटकन्‌ दोन ग्लास सरबत करून आणलं.
एक ग्लास पाहुण्यांच्या समोर ठेंवीत दुसरा स्वतः घेंऊन समोरच्या सोंफ्यावर बसला,"बोला.....काय काम होतं आपलं?"
अभ्यागत," वा...वा....वा....सरबत तर अगदी छानच झालं आहे.!....तहान शमली बघा अगदी.... आपण कोण?"
’पाना’ ला गंमतच वाटली....आपल्याच घरांत बसून आपल्यालाच विचारताय्‌त ’आपण कोण?’ म्हणून...!!
’पाना’," मी पार्थ.....नानासाहेबांचा मुलगा.....हं सांगा काय काम होतं आपलं त्यांच्याकडं?"
पाहुणे जरा कुचमले.....क्षणभर बोलावं की नको अश्या विचारात पडले असावेत....
मग अचानक त्यांचा चेहरा उजळला," आपण नानासाहेबांचे चिरंजीव होय?...छान....म्हणजे अलभ्य लाभ च म्हणायचा."
’पाना’ ला कांही अंदाज येईना.....परत विचारलं," काय काम होतं आपलं ?"
पाहुणे," नानासाहेब नाहीत काय घरी?....त्यांच्याबरोबरच बोललो असतो....."
’पाना’," नाहीत......ते नाशिक ला गेलेत आज सकाळीच."
पाहुणे," बरं बरं....केव्हांसे येतील नानासाहेब?....म्हणजे मी परत चक्कर मारीन ते असतांना."
’पाना’ जरा वैतागलाच. तरी त्यानं घोडं पुढं रेंटलं," ...म्हणजे काय काम होतं आपलं ते कळलं, तर तसा मी निरोप देईन ते आले की."
पाहुणे," केव्हां येतील नानासाहेब परत?"
’पाना’," नक्की माहीत नाही....नात्यातल्या एका लग्नाला गेलेत....बहुधा परवांपर्यंत यावेत.
       तेव्हां आपण कश्यासाठी आलात ते सांगितलंत तर मी निरोप देई त्यांना नक्की....चिंता करूं नका.....
       अगदी मोकळेपणानं सांगायला कांही हरकत नाही मला."
’पाना’ च्या च तोंडातनं च लग्ना चा उल्लेख झालेला ऐकून पाहुणे जरा सैलावले.....
अन्‌ खांकरत म्हणाले,"......त्याचं काय आहे....की..."
"हं बोला.....", ’पाना’.
पाहुणे," लग्नासंबंधी च जरा नानाहेबांनां भेंटायचं होतं.....त्यांचे चिरंजीव लग्नाचे आहेत असं             समजलं, म्हणून आलोय्‌......
      आमची ज्येष्ठ कन्या ’अपर्णा’ लग्नाची आहे.....सध्या 'बी. एस्सी.' करतीय्‌.....
      बरं झालं ’तुमची’ च गांठ पडली ते.....हा मुली चा फोटो."
’पाना’," अहो फोटो बिटो बघायची तशी आत्तां आवश्यकतां नाही‌................
सध्या तरी मला कर्तव्य नाहीय्.....म्हणजे अजून दोन वर्षं तरी नाही."
पाहुणे," अहो फोटो तरी बघा.....त्यांत काय एव्हढं लाजायचं....अं?"
पाहुणे ’पाना’ च्या हातांत फोटो कोंबत म्हणाले," अपर्णा आमची अगदी आदर्श गृहिणी होईल बरं.....
अहो शिकते तर आहेच, पण घरचं ही सगळं.....शिवण टिपण वगैरे....शिवाय ’संगीत विशारद’ पण आहे."
पानां नं फोटो न्याहाळला,,,,,,,पोरगी तर एकदम झकास वाटत होती..........!!
अन्‌ पाहुणे पण अगदी बारीक नजरेनं ’पाना’ ना न्याहाळत होते..............!!!
’विश्वामित्रा’ चा त्रिफळा उडायची घटिका बहुधा आलेली असावी.......
इतक्यात पाहुणे च म्हणाले," अहो हल्ली ह्या नवीन पिढीचं कांही समजतच नाही बघा.........
आतां ह्या अपर्णा चं बघायला सुरुवात केली....पण तिचं चाललंय्‌ 'एम्‌. एस्सी.' करायची म्हणून...."
’पाना’ नं बुडत्याची काडी पंकडत म्हटलं," मग करूं द्यायची की.... लग्न कुठं पळून चाललंय्‌ ?"
पाहुणेही कांही कच्च्या गोट्या खेंळलेले नसावेत......
पाहुणे," अहो म्हणून काय झालं? लग्न कार्य ही वेळेवरच व्हायला हवीत ना?....परत मुलीची जात......
आणि अजून पांठीवरच्या तिघींजणी आहेत.....त्यांचं कसं व्हायचं मग, ही च शिकत बसली तर अजून दोन वर्षं?
तुम्ही फक्त फोटो पसंती चं तेंव्हढं सांगा.....बाकीचं मी नानासाहेबांबरोबर बघून घेंतो..............काय?"
’पाना’ आतां मात्र जरा वैतागले," अहो पण........"
पाहुणे," अहो पण बीण काय आतां?.... फोटो तरी पसंत आहे ना?.......काय?"
’पाना’ आतां मात्र वैतागले ह्या चेंगटपणाला........
म्हणाले," मुलगी नापसंत करण्यासारखी नाही हे खरं‌........ 
अहो पण मला जर सध्या ’कर्तव्य’ च नसेल, तर त्याचा काय उपयोग?"

तरी पण पाहुणे मागं हटेनात," ठीकाय्‌‌.............. पण नानासाहेब भेंटतील ना परवादिवशी नक्की?"

आता मात्र ’पार्था’ तला ’पाना’ जागा झाला," नानासाहेबांना भेंटून कांही उपयोग होणार नाही.!!" 
पाहुणे," कां हो........कां बरं ?"
’पाना’ नी पाहुण्यांचा क्षणांत त्रिफळा उडवला," अहो त्यां चं शुभमंगल होऊन छत्तीस वर्षं झालीं....!!!!"
पाहुणे ’पाना’ कडं डोंळे विस्फारून पहातच बसले................
अन्‌ दुसर्‍या क्षणीं त्यानीं कपाळाला हात लावत कांढता पाय घेंतला.!!!!!

*********************************


रविशंकर.

२४ नोव्हेंबर २०१३.

No comments:

Post a Comment