Search This Blog

Friday 9 December 2011

॥ खिळसाण्ड ॥

॥ खिळसाण्ड ॥




" नानिवडेकर साहेब.... जरा-चहा बिहा प्यायला थांबायचंय्‌ काय ?" दिलीपरावांनी गाडी सेकण्ड गियरमध्ये घालून वेग कमी करीत मला विचारलं.
"चालेल की..... जरा आळोखे-पिळोखे देत घेऊं या चहा.... काही हरकत नाही." मी खिडकीची कांच वर करत म्हणालो.
दिलीपरावांनी एक त्यांतल्या त्यांत जरा बरी टपरी हेंरून स्कॉर्पिओ रस्त्याकडेला घेऊन थांबवली, अन्‌ आम्ही सगळेच आळोखे-पिळोखे देंत खाली उतरलो.


२००९ सालातला नोव्हेंबर महिना चालूं होता. आम्ही चौघे म्हणजे मी स्वतः, पत्नि सौ. सुमीता, चिरंजीव मीलन आणि स्नुषा सौ. क्षिति
मुलांच्या पहिल्या दिवाळसणासाठी, दिलीपरावांच्या ’पडेल’ या कोंकणांतल्या गांवी गेलो होतो. दिवाळसण पार पडल्यावर आमच्या सौ. नं फतवा काढला की ’पंचक्रोशी बघाय्‌चीय्‌’.
म्हणून मग दिलीपरावांनी त्यांची ’स्कॉर्पिओ भल्या पहाटेंच बाहेर काढली होती... अन्‌ आम्ही देवगड,कशेळी,राजापूर,रेडेबान्ध, कुणकेश्वर, इत्यादी आजूबाजूची सुन्दर स्थळं पालथी
घालत दिवसभर भ्रमन्ती करून, गोवा-मुंबई हायवे नं ’पडेल’ कडं परतत होतो.

दिलीपराव ठाकुरदेसाई हे आमचे व्याही...सौ. क्षिति चे वडील. विजयदुर्ग पासून चौदा कि. मी. दूर असलेलं ’पडेल’ हे दिलीपरावांचं मूळ गांव.
घरची भात शेती, आंब्याच्या बागा, वडिलोपार्जित चौसोपी घर, ट्रान्स्पोर्ट चा ही व्यवसाय, असलं सगळं खटलं होतं. वीस पंचवीस माणसं....गडी-मोलकरणी..... असला ऐसपैस कारभार.
तसे दिलीपराव स्वतःही ऐसपैस खाक्याचे. पन्नास माणसं आली काय न्‌ शंभर आली काय... सारखंच.!! बोलायचालायलाही एकदम ऐसपैस गडी.
’आंत एक बाहेर दुसरं’ असलं कांही नाही.... ’आपण बरं अन्‌ आपले व्याप बरे’ असा एकूण खाक्या.
विहीणबाई सौ. माधुरी ह्या पण तश्याच... एकूण ’मेड्‌ फॉर ईच अदर‌’ जोडी.
ह्या विहीणबाईनां घरी सगळी पोरं ’इया’ म्हणून हांक मारायची. त्यामुळं असेल कदाचित, आमच्या तोंडीही तेंच नांव पडलं होतं. तर ’इया’ पण ह्या भटकन्तीत बरोबर आलेल्या होत्या.

दिलीपरावांची म्हणजे आमच्या व्याह्यांची एक गम्मत आहे. त्यांच्याजवळ विनोदी अनुभव भरपूर. बर्‍याचदां बोलतां बोलतां देखील त्यांच्या बोलण्यांत भन्नाट विनोद होतात, पण
ह्यांचा चेहेरा बघावा तर अगदी निरागस.... आपलं बोलणं हंश्या पिकवतंय्‌ हे त्यांच्या गांवीही नसतं. त्यामुळं हंश्याची कारंजी आणखी ज्यास्तच फुसांटत उडतात.

आम्ही दोघे, दिलीपराव-माधुरीबाई, मुलं असे सात आठ जण एक मोकळं बाकडं पकडून विसांवलो. चहा- बिस्किटं-चुरमुरे असलं कांहीबांही टपरीवाल्यानं टेबलावर पुढ्यात आणून ठेंवलं.
चहा बरोबर गप्पाटप्पाही सुरूं झाल्या. पोरं आपापल्या कॅमेर्‍यांत रोल भरणं, फोटो ’एडिट’ करणं असले उद्योग करीत चहा पिऊं लागली.
टपरीत इतर बाकड्यांवरही कोणी कोणी स्थानिक म्हणा, प्रवासी म्हणा... गिर्‍हाइकांची टोळकी बसलेली होती. एका टोळक्यांत तालुका निवडणुकीवर तावातावात पैजा लागत होत्या.
दुपारचे साडेचार होत आलेले असल्यामुळं हॉटेलवाल्यानं वडा-भजी-मिसळ असल्या खास ’टपरी स्पेशल’ पदार्थांचा घाणा लावायला सुरुवात केली होती.
तळणीचा खमंग वासही सुटायला लागलेला होता....अन्‌ आमचा शिणवटाही पळायला लागला होता.

इतक्यांत दूर क्षितिजापासून एस्‌. टी. बसचा आवाज ऐकूं येऊं लागला..... हळूंहळूं तो मोठा होऊं लागला... अन्‌ चार-पांच मिनिटांत ’राजापूर-विजयदुर्ग’ ही गाडी
माती धुरळ्याचा फुफाटा उडवीत आमच्या टपरी समोरच गंचके देत थांबली.
’गाडी फक्त पांच मिनिटं थांबेल बरं का’ ची स्टॅण्डर्ड आरोळी ठोंकून ’ड्रायव्हर-कण्डक्टर’ ची जोडगोळी अर्ध्या तासासाठी गायब झाली.
एकेक प्रवासी बसमधनं उतरूं लागला.....एस्‌. टी. च्या टपावर कांही जण चढून आपापलं सामन उतवरू. लागले.....

अन्‌ अचानक दिलीपराव डोळ्यानं एस्‌ टी. कडं खूण करत ’इया’ नां म्हणाले,"माधुरी.... ए माधुरी....ते बघ ’खिळसाण्ड’ उतरतंय्‌ गाडीतनं"!!
" उगीच खेतरीपणा करत बसूं नकां आतां...." इया दिलीपरावांना दटावत बोलल्या," घरी पोचायचंय्‌ लवकर."
आम्ही सगळेच एस्‌. टी. कडं बघायला लागलो. दिलीपराव इयांच्या बोलण्याकडं काणाडोळा करत, जरा चार पावलं टाकून रस्त्याकडेला थांबले.

गाडीतनं तिशीच्या आंत-बाहेरची, गांवातलीच वाटणारी एक बाई उतरत होती....
डाव्या हातांत एक गांठोडं...उजव्या खांद्यावर एका पिशवीचं ओंझं, एव्हढं सामान कसंबसं सावरत ती उतरली...
रंग च फक्त जरा गोरागोमटा होता हीच काय ती जमेची बाजू..... बाकी ध्यान अगदी बघण्यासारखंच होतं.....
नाक-डोळ्या बाबतीत आनंदच होता.... बांधा अगदी खराट्याची काटकी म्हणावी असा. ’पार्सल’ खेड्यातलं असलं तरी ’कार्टन’ मात्र ’म्हमई’ कडचं दिसत होतं.
चकमक्‌ लावलेली राणी कलर ची जॉर्जेट्‌ ची पांचवारी साडी, कानांत मोठठ्या कड्यांच्या रिंगा, डाव्या मनगटावर घड्याळ,....
डोंळ्याला गो-गो गॉगल, पावडर फांसून गिरणीवाली सारखं पांढरंफक्क्‌ केलेलं तोंड, ओंठांना लाल भडक लिप्‌स्टिक्‌ लावलेली....
कपाळावर दोन्ही बाजूंनी केसांचे फुगे काढलेले..... एकदम ’हाफ्‌कट्‌ सॅंपल’ दिसत होतं......
"ही ’खिळसाण्ड’ काय भनगड आहे?" मी इया नां विचारलं
" अहो कांही नाही... गावातला टगेपणा सगळा...." इया प्रश्नाला शिताफीनं बगल देत म्हणाल्या.
" हो, ते कळलं...." मी माझा मुद्दा रेंटत म्हटलं," पण ’खिळसाण्ड’ म्हणजे काय? तुमच्या कोंकणीतला कुठला शब्द आहे काय हा?"
"ते ’ह्या’ नां च विचारा....." इया म्हणाल्या," सगळं गांव हिला ’खिळसाण्ड’ म्हणतं एव्हढं बाकी खरंय्‌"
आमची उत्सुकता आतां मात्र चांगलीच चाळवली.

खिळसाण्ड हळूं हळूं रस्ता ओलांडून अलीकडं आलं, अन्‌ कडेकडेनं गावाकडं चालूं लागलं....
तेंव्हढ्यांत दिलीपरावांनी जोरदार हाळी दिली," खिळसाण्डा.... अगो खिळसाण्डा...."!!
आम्ही कान टंवकारून संवाद ऐकूं लागलो.... चहा गार होतोय्‌ हे पण सगळे विसरले....
कांहीतरी मजा बघायला मिळणार एव्हढं सगळ्यानांच एव्हानां कळलेलं होतं.
खिळसाण्ड थांबलं," काय म्हणतंस दिलूअण्णा?"
दिलीपरावः " खंय्‌सून इलंस खिळसाण्डा?"
खिळसाण्डः" राजापुरास्नं इलो"
दिलीपरावः "बापुस बरां हां तुजो? झिलाची शाळा कशी चाल्ली?"
खिळसाण्डः "बापसांक्‌ काय झालां माज्या...बरा हां.... झिलाची शाळा बेस चाल्ली."
दिलीपरावः " आणि घोंवाचो दुकान..... कसां काय?"
खिळसाण्डः " झ्याक्‌ चाल्लंय्‌ दिलूअण्णा.... आसल्या चंवकश्या कित्याक्‌ करतंस"?
दिलीपरावः " तसं न्हाई गो खिळसाण्डा.... चांगला चाल्ला ना? म्हणून पुसलो नुस्तां..."
खिळसाण्डः " सग्गलां चांगलां चाल्ला.... जाऊं"?
दिलीपरावः " खिळसाण्डा... सगलाच चांगला चाल्ला... तं तूं असो कित्याक्‌ चलतं गो........खिळसाण्डागत"?
दिलीपरावांच्याकडं रागानं बघत, मानेला झटका देत, कपाळावरच्या झिपर्‍या मागं झटकत, ’खिळसाण्ड’ फिस्कारलं," तुकां कित्यांक्‌ हव्या रे पंचायती? हांव्‌ असोच चलतंय्‌"!!

इतकं बोलून खिळसाण्डानं पिशवी उचलली, गांठोडं काखोटीला मारलं... अन्‌ खी खी करण्यार्‍या दिलीपरावांकडं एक जळजळीत कटाक्ष टांकून गावाकडचा रस्ता पकडला.
खी खी खू खू करतच दिलीपराव टपरीकडं परत आले.... डोंळे वटारून बघणार्‍या इयां कडंही त्यांचं लक्ष नव्हतं........
न राहवून मी विचारलंच," काय हो दिलीपराव.... ही ’खिळसाण्ड’ काय भानगड आहे? इया तर कांही पत्ता लागूं द्यायला तयार नाहीत."
हसूं आवरत दिलीपरावांनी पुढ्यातला थंड झालेला चहा बाजूला सारत दुसर्‍या चहाची ऑर्डर सोडली.....अन्‌ मला म्हणाले,"अहो ती समोरनं बैलगाडी येतीय्‌ ना.... ती बघा जरा."
मी बाहेर बघितलं....खिळसाण्डाच्या पांठोपांठ एक बैलगाडी येत होती. तिच्या आंसाच्या दोन्ही बाजूच्या चाकांच्या खुण्ट्या निखळलेल्या असाव्यात बहुधा....
चालतांना आळीपाळीनं डाव्या उजव्या बाजूंनां ती गदागद गंचके मारत चालली होती.... दोन्ही चाकंही डावी-उजवीकडं लडबडत होती......
दिलीपराव म्हणाले," नानिवडेकर साहेब ती गाडी बघितलीत नां कशी चाललीय्‌? एकदा ह्या बाजूला ’धडाक्‌’...मग त्या बाजूला ’धडाक्‌’.............
’धडाक्‌’..’धडाक्‌’..’धडाक्‌’..’धडाक्‌’..." दिलीपराव ’ऍक्शन्‌पॅक्ड्‌ अभिनय करत म्हणाले.
मीः " हो बघीतली की.... बहुतेक दोन्ही चांकांच्या ’कॉटरपिना’ निखळल्याय्‌त....त्यामुळं अशी मजेदार गंचके मारतीय्‌."
दिलीपरावः " तर ही तुमची ’कॉटरपिन्‌’ असती की नाही... त्याला कोंकणांत ’ खिळा’ म्हणतात.... आणि तुम्ही म्हणतां ना ’हरवलं’ म्हणून? त्याला इकडं म्हणतात ’साण्डलं’....
           म्हणजे असं बघा.... ’पेन साण्डलं’... ’पिशवी साण्डली’....असं.... कळलं नां?" दिलीपराव अगदी निरागसपणे समजावून सांगत होते.
मीः " हो... आलं लक्ष्यांत.... "
दिलीपरावः " तर अश्या ’कॉटरपिना’ निखळल्यामुळं गचके मारत चालणार्‍या गाडीला इकडं ’खिळे साण्डलेली गाडी’ म्हणजेच ’खिळसाण्ड’ म्हणतात."!!
आत्तां कुठं आमच्या डोंक्यांत जरा प्रकाश पडला... पण मी म्हटलं," हो....ते कळलं, पण त्या बाई चा काय संबंध इथं"?
दिलीपराव म्हणाले," अहो... ही बाई आहे ना....डोंक्यानं चांगलीच ढिली आहे बघा......सगळ्या पडेल गावांत प्रसिद्ध आहे.... ही
ते खिळसाण्ड चाललंय्‌ की नाही समोर.....त्याच्यागत ही रस्त्यानं चालती,.... म्हणून सगळं गांव तिला ’खिळसाण्ड’ म्हणून हांक मारतंय्‌‌.... ही ही ही" !!!

मी समोर बघितलं.....
गदांगदां गचके मारत ती बैलगाडी चालली होती......!!
आणि गाडीच्या पुढं, ते ’खिळसाण्ड’ बरं म्हणायची पाळी, अशी ’हेलन’ च्या थाटात दिलीपरावांची ’खिळसाण्डी’ चालली होती....’धडाक्‌’....’धडाक्‌’....’धडाक्‌’....’धडाक्‌’!!!
दिलीपरांवांच्या अफाट निरीक्षणशक्तीला भरभरून दाद देत सगळे खदांखदां हंसायला लागले.....!!!
आणि ’इया’ नी हतबुद्ध होत कपळाला हात लावला.!!!!


**************************************

-----  रविशंकर.



1 comment:

  1. Ha Ha Ha Ha Ha Ha Ha Ha Ha............:)
    Baba, Dhamal Story. Enjoyed a lot.

    ReplyDelete