Search This Blog

Friday 16 December 2011

॥ वरात ॥


" यंवडंच बोला, पोरीच्या अंगावर ईस तोळे सुनं घालायची कबलायत झालिव्‌ती कां नाय? मंग हाइत काय ह्ये डागिनं ईस तोळ्याचं... ऑं?"
नवरदेवाचा बाप अंगात आल्यागत गरागरा डोळे फिरवीत गरजला.
नवरीकडची माणसं सुन्न होऊन तोंडाला कुलूप बसल्यासारखी चिडीचुप्‌ उभी होती.....

कारण श्वशुर जे म्हणत होते ते धडधडीत सत्य नवरीच्या अंगावरच दिसत होतं......
लग्नकार्य पार पडून जेवणाच्या पंगती सुद्धा आटोपलेल्या....
पाठवणीची घडी उगवल्यामुळं नवरीकडच्या आयाबाया डोंळ्याला पदर लावून मुसमुसत नवरीभोंवती कोंडाळं करून उभ्या होत्या.
अन्‌ बिचारीच्या वैवाहिक जीवनाच्या नमनालाच असा भाण्डणाचा नाट लागला होता.
वर्‍हाडी-वाजंत्री तांटकळत उभे.... अन्‌ वराती बॅण्डवाल्यांचा ताफा डोईवरच्या गॅसबत्त्या खाली ठेंवून अवघडून थांबलेला.
दोन हजार आठ सालांतल्या भर लग्न सराईतला तो एक मुहूर्ताचा दिवस होता. सायंकाळचे सात वाजत आलेले.....

पुण्यातल्या गजबजलेल्या नारायण पेठेतील ’धुण्डिराज मंगल कार्याल’ हे छोटेखानी अन्‌ परवडणार्‍या दराचं असल्यानं, शेतकरी,कष्टकरी,नी गोरगरीब वर्गात लोकप्रिय असलेलं कार्यालय.
ह्या कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. बाळासाहेब केतकर, हे माझे जुने मित्र. एकदम मोकळा अन्‌ गप्पिष्ट माणूस. त्यामुळं त्या बाजूला जाणंयेणं झालं अन्‌ बाळासाहेबांच्याकडं
चक्कर झाली नाही असा प्रसंग विरळाच. त्या दिवशीही असाच त्यांच्या ऑफिसांत आमच्या गप्पांचा फड रंगला होता.
बाळासाहेबांना जवळपास रोजच एखादा ... लग्न / मुंज / डोहाळेजेवण असला कसलातरी समारंभ बघायला मिळायचा.
आणि त्या समारंभांत घडलेले एकेक इरसाल किस्से ते असे कांही सजीव करीत ऐकवायचे की ’क्या बात है’ !
ऐकणारा मुरकुंडी वळूनच बाहेर पडायला हवा. !!
तर त्या दिवशीही आमच्या गप्पा अश्याच रंगल्या होत्या.
पण ’तसलं’ कांहीतरी जिवन्त नाट्य च बघायला मिळेल, असं मात्र आम्हांला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं......

मांडवातले आवाज जसे चढायला लागले, तसे ," दोन मिनिटं थांबा हं...आलोच" म्हणत बाळासाहेब उठून मांडवाकडं गेले.
मी चहाचा कप उचलून ओंठांना लावला, अन्‌ समोरचं वर्तमानपत्र चाळत बसलो.
पांच दहा मिनिटं झाली, अन्‌ बाळासाहेब परतले. मांडवातलं भांडण अजून सुरूंच होतं.... उलट त्यांत आतां रंग ही भरायला सुरुवात झाली होती.

मी विचारलं," काय झालंय्‌ हो बाळासाहेब मांडवात?"
"अहो नेहमीचेच तमाशे ह्या आडग्या लोकांचे......" बाळासाहेब खुर्चीत टेंकत म्हणाले,"देण्या-घेण्या वरनं भांडणं जुंपलीय्‌त..... दुसरं काय?"
मी चहा संपवून कप बशीत ठेंवत म्हणालो,"काय जातिवंत अडाणी माणसं असतात नाही ही, बाळासाहेब? लग्नासारख्या प्रसंगातही असले तमाशे.....
कसं निभावत असतील ह्या समाजतल्या मुलींचे आई-बाप, कोण जाणे. मुळात परिस्थिती ओंढातांणीचीच असते बहुधा.... भरीला असल्या आपत्ति."
"अहो कसली ओंढाताण अन्‌ कसल्या आपत्ति घेंऊन बसलाय्‌त नाना?", बाळासाहेब उद्गारले,"मस्त बेरकी असतात ही माणसं.
लग्नकार्यात, विशेषतः मुलीच्या, असलं कांहीतेरी ऐनवेळी उपटणार हे सगळ्यांना पक्कं ठाऊक असतं, असल्या गोरगरीब समाजांत... अन्‌ त्याला तोंड द्यायचीही तयारी असते त्यांची.
आतां बघा....ही जुंपलीय्‌ नां? कश्यासाठी माहीत आहे? मुलीवाल्यानी याद्या करतांना कबूल केलेलं दिसतंय्‌ की वीस तोळे सोनं अंगावर घालून लग्न करून देऊं म्हणून.
आणि प्रत्यक्षात बघाल तर आठ दहा तोळेच चंढवलेत पोरीवर.... मग जुंपेल नाहीतर काय होणार? मुलीवालेही काही कमी नसतात आजकाल."
"हे ही खरंय्‌ थोडसं....पण बहुतांशी तसं नसेल",मी म्हटलं,"अहो, पदरांत मुलगी असली तर, हतबल होऊन, माणसं कधीकधी न झेंपणार्‍या कबुल्या ही देत असतील या गोर गरीब वर्गांत.....
काय करतील बिचारे ते तरी?"
बाळासाहेब हंसूं लागले," ते कांही बिचारे वगैरे नसतात बरं का नाना, अगदी बेरके असतात.... तुम्हीच बघा आतां काय होतंय्‌ ते"!!

आम्ही उत्सुकतेनं मांडवातला तमाशा निरखायला सुरुवात केली.... तो तर आतां अगदी टिपेला चढलेला होता.
वधूपिता अजीजीनं कळवळून वरपित्याला हात जोडून विनवीत होतां,"आसा मांडव उधळूनश्यान्‌ नकां दीऊं आण्णासायेब....
तुमच्यासारख्यांच्या घरांत पोर पडली, म्हून व्हतं न्हवतं त्ये भरीला घालूनश्यान्‌ लगीन लावून दिलंय्‌ आमी....
काय कमीज्यास्त झालं आसलं तर सांबाळून घ्या जरा.....सवडीनं त्येचं बी कायतरी करूं की आमी....न्हाई म्हन्तोय्‌ काय?"
"न्हाई बी म्हनत न्हाईसा आन्‌ करत बी न्हाईसा... त्येचं काय?", आण्णासाहेब भडकले,"त्ये काई बी ऐकायचं न्हाई आमास्नी आत्तां.....
लगीन ठरीवतानां पोरीच्या मामानं ईस तुळे सोनं घालूनश्यान्‌ लगीन लावून द्याचं कबूल केलंया....याद्यातबी लिवलंय्‌.....
पोरीच्या मामानंच केल्याल्या हायती याद्या.......ह्ये बगा....", म्हणत आण्णासाहेबानी सदर्‍याच्या खिश्यातनं यादीच बाहेर काढली......
अन्‌ वधूपित्यासमोर नाचवीत गरजला," हाइत न्हवं ईस तोळं लिवल्यालं? मंग आत्ताच्या आत्तां ठिवा फुड्यांत सुनं"!!

असं पेंचांत सापडल्यावर नवरीकडची वर्‍हाडी माणसं सटपटली...... पोरीच्या आईनं तर गळाच काढला भर मांडवात.
"आण्णासायेब... माजं आयका जरा....असं घायकुती यिऊं नगासा....", वधूपिता हांत जोडत कळवळला,"हिच्या पाठीवर आजून तीन पोरी उजवायच्या हाईत आमास्नी....
येवडी पोर सुखानं घिउन जावा घरला....ह्यो सुगीचा हंगाम सरूं द्या.... मंग करूं कायतरी र्‍हायलं सवरलं आसलं तर"
"र्‍हायलं सवरलं आसलं तर....मंजी?,"आण्णासाहेब इरेला पेंटले,"धाकल्या तिघीजनी उजिवतांनी धा सुग्या जातील तुमच्या....तंवर काय टाळ्या पिटत बसायचं आमी?...ऑं?
त्ये काई न्हाई....वरचं धा तोळं सुनं ताब्यात दिल्याबिगर वरात न्हाई हालायची....हां"!!!
पेंच सुटायची कांहीच चिन्हं दिसेनात.... वर्‍हाडी रेंगाळले, नी वाजंत्रीही तांटकळली.

तेंव्हढ्यात कार्यालयाच्या प्रवेश्द्वारातनं बॅण्डवाल्याची बाजाची गाडी आंत आली, अन्‌ ड्रायव्हर शेजारी बसले्ला, पहिलवानी थाटाचा, एक रगेल गडी गाडीतनं खाली उतरला.
कुणीतरी गिल्ला केला,"आन्दामामा आला...आन्दामामा आला".
तालमीतल्या आखाड्यात कमावलेली भरदार तब्येत, झुबकेदार मिश्या, भेंदक नजर, पायांत करकरणार्‍या वहाणा, चेहर्‍यावर बेरकीपणा ठाण मांडून बसलेला....
एकूण तयारीचा पठ्ठा असावा. एका क्षणांत त्यानं परिस्थिती बरोबर जोखली.....अन्‌ पोरीच्या बापाच्या जवळ जात विचारता झाला,"काय झालंया दाजी? आक्का कश्यापायी रडतीया?"
दाजीनीं मग आन्दामामाला घडलेलं सगळं थोडक्यात सांगितलं......
वस्तादांचा चेहेरा ऐकतां ऐकतां हळूं हळूं लाल व्हायला लागला......
आण्णासाहेबही जरा सटपटलेच.....पण तरी आखाडा सोडीनात.
"आनि आतां आन्नासायेब म्हंत्यात वरलं धा तुळं सुनं आत्ताच्या आत्ता ताब्यांत पायजे....न्हायतर वरात न्हाई हालनार.....काय करावं रं आन्दा आतां?", दाजींच्या डोळ्यांत पाणी तरारलं.
"तुमी नगां घोर लाऊनश्यान्‌ घिऊं दाजी.....बगूंया वरात कशी न्हाई हालत ती.....", म्हणत पहिलवान करांकरां वहाणा वाजवत आण्णासाहेबांपुढं जाऊन उभे ठाकले.
अन्‌ त्यांनी कोर्टमार्शल सुरूं केलं.......

आन्दामामाः "काय म्हननं काय हाय अन्नासायेब तुमचं?"
अण्णसाहेबः"आमचं काय म्हननं आसनार? याद्यात लिवल्यापरमानं ईस तुळं सुनं पोरीला घालाय पायजे व्हतं.....फकत धा तुळंच घातलंया..."
आन्दामामाः"बरं मंग?..... तुमी तरी कुटं याद्यांत लिवल्यालं पाळलंय्‌सा?"
अण्णसाहेबः"मंजी? काय म्हनायचंय काय तुमास्नी?" अण्णासाहेबही आतां जरा सटपटलेच....पण सूर नरमला.!!
आन्दामामाः "दावतो की......काडा ती यादी भाईर खिश्यातनं"!!
अण्णासाहेबांच्या हातातली यादी हिसकावून घेत त्यांच्याच तोंडापुढं नाचवीत मग पहिलवान गरजले,"लगीन ठरीवतांनाच्या वख्ताला काय सांगितलंवतं तुमी आमास्नी?
पोरगं आत्तांच चिकटलंय्‌ झेड्‌ पी. त शिपाई म्हून.....आत्तां टेंपरवारी हाये.... पन म्हैन्यात पर्मनन्ट्‌ हुईल म्हनून.....लिवलंया न्हवं यादीत?"
अण्णसाहेबः "लिवलंय्‌ की.....मंग त्येचं काय?"
आन्दामामाः "मंग झाल‍ंय काय पर्मनन्ट्‌ पोरगं तुमचं.......ऑं?" !!!
अण्णसाहेबः " न्हाई झाल्यालं.......पन व्हईल की......"
आन्दामामाः " ’व्हईल की’ न्हाई चालायचं आन्नासायेब....आत्ताच्या आत्ता.....काय? !!!
            आनि आत्तां व्हत नसंल, तर जवा व्हईल, तवा द्या पाटवून पोरगी आन्‌ जावयाला....
मंग र्‍हायल्यालं धा तुळं सुनं बी घालतो पोरीच्या आंगावर...... आनि जावयाला कोंबडी बी घालतो खायाला प्वाट फुटंस्तंवर....."!!!!

अन्दामामाची अचाट धोबीपछाड बघून मी थक्क होत कपाळाला हात लावला.!!!!

आणि दुसर्‍या क्षणीं चितपट झालेल्या अण्णासाहेबांकडं ढुंकूनही न बघतां रुस्तुमे हिन्द आन्दामामानं एकेका बखोटीत धंरून नवरा-नवरीला उचललं, न्‌ वरातीच्या बग्गीत आदळलं.!!
आणि गळाठलेल्या बत्तीवाल्या बायाबापड्या अन्‌ हेलपाटलेल्या बॅण्डवाल्यांकडं वळून हिन्दकेसरी कडाडले,"काय तमाश्या बगाय्‌ आलाय्‌ व्हंय्‌ रं सुक्काळीच्यानो?
कां चिच्चुकं दिल्यात तुमच्या मालकाला?
उचला बत्त्या गुमान, आनि लागा तुमच्या पिपाण्या फुकायला.!!....आरं ए गाडीवाल्या..... हालीव गाडी तुजी झटक्यात."!!!

आणि इतकावेळ अवघडलेल्या ताश्या वाजंत्र्यांत अक्षरशः कल्ला उडाला......
ताश्या तडतडायला लागला.....
वरातीच्या गाडीवरचा कर्णा कोंकलूं लागला......
नवरा-नवरी लाजत एकमेकांना खेंटून बसले.....
पोरंटारं गाडीसमोर नाचूं लागलीं......
आणि गळाठलेले बॅण्डवाले जीव खाऊन आपापल्या पिपाण्या फुंकायला लागले....
"कोंबडी पळून तंगडी धंरून लंगडी घालाया लागली............
कॉक्‌ ...कॉक्‌...कॉक्‌...कॉक्‌...कॉक्‌...कॉक्‌...कॉक्‌...कॉक्‌" !!!!

बॅण्डवाल्यांची अफाट समयसूचकता बघून आम्ही खो खो हंसायला लागलो. !!
अन्‌ खुद्द बाळासाहेबांनीच कपाळाला हात लावला. !!!!

----- रविशंकर.

*******************************

No comments:

Post a Comment