Search This Blog

Thursday 1 December 2011

॥ घाश्या-पुश्या ॥

" बाबा बाबा...लंवकर या इकडं....ते बघा", आमच्या सूनबाई सौं क्षिति नं मला हांक मारली.
जून महिना लागला होता. पावसाळा सुरूं होण्यापूर्वीचे दिवस होते. चिरंजीव सपत्निक पंधरवड्याच्या सुट्टीवर पुण्याला घरी आले होते. 
सकाळी नाष्टा वगैरे उरकून जरा वाचायला पुस्तक उघडलं होतं....तेंव्हढ्यात क्षिति नं हांक मारली.
"कां हांक मारलीस गं?" म्हणत मी अभ्यासिकेतनं उठून दिवाणखान्यांत गेलो.
सौ. क्षिति खिडकीजवळ उभी राहून बाहेर कांहीतरी टक लावून बघत होती..... मला जरा नवलच वाटलं.
"बाबा ते बघा......" म्हणत तिनं बाहेर बोंट दाखवल. मी पण खिडकितनं बाहेर डोंकावलो.
शेजारच्या एमारतीतली दोन तरूण मुलं त्यांची गाडी साफ करायचं काम करीत होती.
एक जण गाडी पुसत होता, तर दुसरा पुसून झालेल्या भागाला बफिंग मशिननं पॉलिश्‌ करीत होता. 
मशीनची कनेक्शन वायर थेंट चंवथ्या मजल्यावरच्या फ्लॅट्‌ च्या खिडकीतनं खाली लोंबत होती.
निरनिराळ्या आकाराची फडकी,जाळ्या,स्पंजाचे तुकडे,पॉलिशच्या डब्या... इत्यादी सामान, एखाद्या पेंटिंग च्या गॅरेज मध्ये असावं, तसं इतस्ततः विखुरलेलं होतं
क्षितिः " बाबा, अहो ते बघा काय चाललंय्‌...."
मी म्हटलं," अगं त्यांत आहे काय एव्हढं बघण्यासारख...अं? गाडी चकाचक्‌ करताय्‌त झालं"
क्षितिः "तसं नव्हे हो बाबा..... आत्तां सव्वा नऊ वाजलेत....बरोबर?...अहो हे दोघे सकाळी पावणेसात वाजल्यापासून हेंच करताय्‌त.!!"
मी म्हटलं," अगं आम्हांला त्यात कांहीच नवीन नाही....रोजच बघतोय्‌."
क्षितिः " म्हणजे? रोजच हे दोघं हा असला उद्योग करतात? मग कामधंदा तरी काय करतात हे?"
मीः "कांही कल्पना नाही बुवा.... रोजच नाही अगदी.... पण दर एक दिवसा आड तरी हा सत्यनारायण चालूंच असतो.!!" 
क्षितिः " कम्माल आहे..... रिकामटेकडेच दिसताय्‌त.... काय नावं काय ह्यांची?"
मीः " अगं हल्लीच रहायला आलेत... नावंगावं काय मलाही माहीत नाहीत...मी आपला त्याना ’घाश्या-पुश्या’ म्हणतो.!!"
क्षिति फिदीफिदी हंसायला लागली," व्वा बाबा...काय नावं ठेंवलीय्‌त तुम्ही....’घाश्या-पुश्या’...ही ही ही ही.... आणि किति वेळ चालतो म्हणे हा सत्यनारायण?"
मी म्हटलं,"तूंच पाळत ठेंवून बघ....मजेशीर जोडी आहे."
झा.........लं, क्षितीला तो एक चाळाच लागला. दर पांच दहा मिनिटांनी ती खिडकीतनं बाहेर डोंकवायला लागली... हंसायला लागली.
मी माझ्या उद्योगात गुरफटून तो विषय विसरूनही गेलो.....
दुपारी जेवणंखाणं उरकली.... अन्‌ पुनश्च हरि ओम्‌ !!
"बाबा बाबा, लवकर या इकडं...... ", क्षिति किंचाळली.
मीः " काय झालं आतां आणखी?"
क्षितिः " अहो ते बघा बाबा.... त्यांनी कसली कसली हत्यारं नी ब्रश काढलेत बघा कांचा साफ करायला...... या लवकर" !!
मी पाहिलं...... स्वयंपाकाचा ओंटा साफ करायचा असतो, तसल्या कसल्यातरी लांबच लांब दांडीच्या रबर लावलेलल्या ब्रशनं साबण लावून ’घाश्या’ कांचा घांसत होता,
अन्‌ घांसून झालेल्या कांचा ’पुश्या’ कोंरड्या फडक्यानं पुसून साफ करत होता..... भोंवतालचं जग विसरून एकाग्रतेनं त्यांचं काम निष्ठेनं चाललेलं होतं.
गाडी अगदी शोरूम मध्ये उभी केलेल्या नवीन गाडीसारखी चकचकीत व्हायला सुरुवात झाली होती.......
"हे दोघं हा असला उद्योग दररोज करतात बाबा?" कपाळाला हात लावत क्षिति बोलली,"धन्य आहे यांची....निरुद्योगीच दिसताय्‌त." 
मी म्हणालो," जवळ जवळ रोजच..... वाहन फक्त बदलतं !!....आणि हे ’निरुद्योगी’ कसे काय गं? चाललेला ’उद्योग’ तर दिसतोय्‌च ना तुला....काय?"
क्षितिः "तसं नव्हे हो बाबा....ह्यांना पोंटापाण्याचे कांही उद्योगधंदे आहेत की नाहीत म्हणते मी?   
अहो सकाळी सात वाजल्यापासून हे खुळे एक गाडी साफ करताय्‌त.....दुपारचे चार वाजत आलेत.....अजून चालूंच आहे त्यांचं.... कधी आटपणार हे रामायण?"
मीः "कधी आटपणार हे ’घाश्या-पुश्या’ नां च माहीत..... झालं समाधान की करतील की बंद....तूं कश्याला अस्वस्थ होतेय्‌स?"
पण आतांपावेतो सौ. क्षिति चा ही संयम सुटायला लागला होता.... ती आतां दर दोन मिनिटांनी खिडकितनं डोंकवायला लागली.
तिची अस्वस्थ चुळबुळ सुरूं झाली..... ’घाश्या-पुश्या’ चं काम मात्र शांतपणानं सुरूंच होतं.... 
क्षितिचं बी. पी. आतां मात्र चंढायला सुरुवात झाली.
मला म्हणाली,"बाबा, मीलन जर असा गाडी पुसत बसला असता ना...... तर मी त्याला घरातनं हांकलूनच दिला असता.... कायमचा.!!"
मीः " अगं ’घाश्या-पुश्या’ काय ’मीलन’ वाटले काय तुला... घरातनं हाकलुन द्यायला?आणि गाडी पण तुझी कुठाय्‌? त्यांचीच तर आहे...." 
क्षिति आतां मात्र खरंच चंवताळली,"बाबा, अहो काय वेडेपणा चाललाय्‌ हा दिवसभर? मी सांगून येऊं काय त्यांना,,,’ चार वाजत आलेत, आतां बंद करा एकदाचं’ म्हणून?
अहो अशी रोज दिवसभर घांसून-पुसून-खंरवडून पांढरी होईल ही गाडी........ !! "
मीः " कांही उपयोग होणार नाही..... मी हे त्यांना वर्षापूर्वीच सांगितलंय्‌ !!"
क्षिती नं कोंचावर बसकण मारत दुसर्‍यांदा कपाळाला हात लावला.!!
इतक्यात उन्हाची तिरीप जरा मन्द झाली.... वारा सुटला....धूळ उडायला लागली.... अन्‌ पाऊस पडायची चिन्हं दिसायला लागली. 
खरं तर हलकी सर पडायला सुरुवातही झाली.......’घाश्या-पुश्या’ नी मोठ्या कष्टानं चकाचक्‌ केलेली गाडी परत घाण व्हायला लागली..... 
अन्‌ क्षितीला परमानन्द झाला.!!!
म्हणाली,"बरं झालं बाबा...चांगली खोड तुटली या खुळ्यांची!!!..... बघा जातात की नाही घरी आतां, हा वेडेपणा बन्द करून !!!"
मी फक्त हंसलो...न्‌ वर्तमानपत्रांत डोकं खुपसलं.
क्षिति स्वयंपाक घरांत दुपारचा चहा करायला पळाली.
पांच दहा मिनिटंच फार तर उलटली असतील.... पाऊसही आतां रपारप्‌ कोंसळायला लागला होता.
क्षिति ट्रे मध्ये बिस्किटं अन्‌ चहाचे कप भरून बाहेर घेऊन आली. सर्व सामान तिनं टी पॉय्‌ वर मांडलं.
चहा ओंतून कप माझ्या पुढ्यात ठेंवला..... खिडकितनं बाहेर डोंकावली......
अन्‌ क्षणार्धांत तिचा आ वासला.....डोंळे विस्फारले.... अन्‌ कपाळाला हात लावत चक्कर आल्यासारखी धप्पकन्‌ कोंचावर बसली!!!
मी कप खाली ठेंवत धांवलो....म्हटलं," काय झालं गं? चक्कर बिक्कर आली की काय तुला? 
क्षितिः " मी ठीकाय्‌ बाबा.....खिडकितनं बाहेर बघा....."
मी खिडकितनं  डोंकावून बाहेर बघितलं, अन्‌ मलाही चक्कर यायचीच काय ती बाकी राहिली.......
बाहेर पाऊस धों धों कोंसळत होता....
घाश्या-पुश्यांची गाडी धूळ पाण्यानं बरबटून घाण झाली होती....
अन्‌ ’घाश्या-पुश्या’ नी रेनकोट-गमबूटाचा पेहेराव चंढवून, भर पावसात पुन्हां अथःपासून गाडी घासापुसायला सुरुवातही केली होती.!!!
हतबुद्ध होत, क्षिति शेंजारी कोंचावर बसकण मारून, मग मीही कपाळाला हात लावला. !!!!

*******************************

----- रविशंकर.

No comments:

Post a Comment