Search This Blog

Monday 28 November 2011

॥ निरोप समारंभ ॥

॥ निरोप समारंभ ॥




" आपल्या सर्वांचे लाडके नी आदरणीय ज्येष्ठ सहकारी श्री. बाळकृण गंगाधर ऊर्फ बाळासाहेब उपाध्ये सर, हे तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. इथून पुढं जरी ते आपल्याबरोबर दररोज असणार नाहीत, तरी सदैव आपल्यां पाठीशी असतील अशी माझी खात्री आहे........."


भरगच्च भरलेल्या डी. आर्‌. डी. ओ. च्या सभागृहात आमचा बालमित्र बाळू उपाध्ये याचा निरोप समारंभ रंगला होता. बाळूचेच एक सहाय्यक सहकारी अगदी भारावून, मनापासून बोलत होते.
सभागृह खचाखच्‌ भरलेले. व्यासपीठावर संस्थेच्या डाय्‌रेक्टर साहेबांसह अनेक ज्येष्ठ नामवन्त मण्डळी बसलेली. एकेक ज्येष्ठ-कनिष्ठ सहकारी बाळूच्या सान्निध्यात वेंचलेल्या क्षणांच्या आठवणी सांगत होते.....

बाळकृष्ण ऊर्फ बाळू उपाध्ये हा आमचा अगदी लहानपणापासूनचा सवंगडी.
इयत्ता पहिली ते थेट मॅट्रिक्‌ पर्यन्त एका बाकड्यावर शेजारी बसणारा.
गल्लीत गोट्या विटिदाण्डू पासून क्रिकेट फुटबॉल पर्यन्त अनेक खेळांतला भिडू नी प्रतिकारीही.
अत्यंत तैलबुद्धिमत्तेचे जन्मतःच वरदान लाभलेलं चतुरस्र व्यक्तिमत्त्व.
आम्ही मॅट्रिक्‌ नंतर इंजिनियरिंग निवडलं, नी बाळूनं फिजिक्स्‌ ची वाट चोंखाळली. नुस्ती चोंखाळली नाही तर गाजवलीही. फिजिक्स्‌ ची पदवी संपादन करून हा मास्टर्स करायला अमेरिकेत स्वपात्रतेवर गेला. तिथं कॅलिफ़ोर्निया विश्व विद्यापीठाची मास्टर्स तर केलीच, पुढं डॉक्टरेट्‌ही मिळवून कांही काळ अधिव्याखाता म्हणून कामही केलं.
पण अमेरिकेत हा बाळू रमला नाही. मायभूमीतच कांहीतरी केलं पाहिजे या ध्यासानं बाळासाहेब डॉलर कमाई वर पाणी सोडून, रुपयातली कमाई स्वखुशीनं पत्करून भारतात परतले.

डिफ़ेन्स रिसर्च्‌ डेव्ह्‌लप्‌मेण्ट ऑर्गनायझेशन्‌ ऊर्फ डी. आर्‌. डी. ओं. या संस्थेत बाळू सीनियर रिसर्च्‌ सायंटिस्ट्‌ म्हणून रुजूं झाला, नी बघतां बघतां चिकाटी-बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढच्या पाचसहा वर्षांतच 'असिस्टंट डायरेक्टर' या मानाच्या हुद्यावर पोंचला. त्याचाच सांप्रत समारंभात लेखाजोखा सुरूं होता.
अगदी पोंखरणच्या पहिल्या अणुस्फोटापासून ते अग्नि-३ प्रक्षेपणास्त्रापर्यन्त राष्ट्रीय संरक्षणाच्या अनेकविध प्रकल्पांत बाळूचं अमोल योगदान.... पैकी कांही प्रकल्पांचं तर प्रत्यक्ष सुकाणूंच त्यानं सांभाळलेलं.
एकेक सहकारी बोलत होते.... श्रोते ऐकत होते, नी बाळासाहेब सपत्निक व्यासपीठावर बसून निरागस चेहर्‍यानं सगळं पहात होते.

तथापि या बाळासाहेबांची आम्हां बालमित्रांनाच द्‍न्यात असणारी एक गोची होती.
प्रकाण्ड बुद्धिमत्ता लाभलेले हे बाळासाहेब अत्यंत विसराळू नी नादिष्ट होते. शाळेत असतांना रस्त्यातनं चालताना देखील त्याची कुठंतरी तन्द्री लागलेली असे.
हवेतल्या हवेत आकडे लिहीत त्याचं गणिती प्रमेयं सोडवणं चालूं असे. एकदोनदां तर हा रस्त्यातल्या विजेच्या खांबावरही धडकलेला होता.
अफाट सृजनशक्तीबरोबर त्याला अफाट विसराळूपणाचंही लेणं निसर्गानं बहाल केलेलं होतं. कित्येकदां तर आत्तां हातात असलेली वस्तूं कुठं विसरली हे त्याला आठवत नसे, नी ती शोधण्यात त्याचे तासन्‌ तास खर्ची पडत.

बाळूचं लग्नही असंच जुळलेलं. त्याची बायको सौ. भामिनी ही पण आमच्याच शाळेत शिकलेली. आमच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान.
बाळू बी. एस्‌. सी. ला असतांना ती बी. एस्‌. सी. च्या दुसर्‍या वर्षाला शिकत होती. दोघेही विद्यार्थी परिषदेचे निष्ठावन्त कार्यकर्ते. एकत्र वावरलेले.
भामिनी पदवी धारिका झाल्यावर दोनएक वर्षांतच तिच्या घरच्यानी वरसंशोधनाची सुरुवात केली. तोंपावेतो बाळू डॉक्टरेट्‌ करून स्वदेशी परतही आलेला होता.
घरची ओंळखपाळख-जाणंयेणं असल्यामुळं 'भामिनीसाठी सुयोग्य वर आढळात आला तर लक्ष ठेंवा' असं बाळूच्या घरीही त्यांनी सांगून ठेंवलेलं असावं.
त्यामुळं बाळासाहेबही भामिनीसाठी हिरीरीनं वरसंशोधन करीत असत. चार ठिकाणी जाऊन येणं, चौकश्या करणं, माहिती काढणं हे तो मनापासून करीत होता.

अश्यांत एक दिवस वैशाली हॉटेलात आम्ही दोघेतिघे दोस्त नाष्टा करायला गेलेलो असतांना बाळूची गांठ पडली. जरा चिंतेतच दिसत होता...
म्हटलं," काय झालं रे ? कसला विचार चाललाय्‌?" तर म्हणाला," नाना, अरे मिनीसाठी स्थळं शोधतोय्‌. काय नशीब आहे बिचारीचं, चारपांच महिने झाले पायपीट करतोय्‌......सालं अजून कुठं जमत नाहीय्‌ बघ. काका-काकू नां पण काळजी लागून राह्यलीय्‌.... तुझ्या आढळात कुणी असलं तर लगेच सांग.... काय?"

आमच्यातला शिरीष रानडे जरा डॅंबीस होता. त्याला बाळ्याची फिरकी ताणायची हुक्की आली.... म्हणाला," बाळ्या, अरे मग तूंच कां वरत नाहीस तिला? पोरगी तर एकदम फक्कड आहे."!!
बाळू सटपटला...," कांहीतरीच काय शिर्‍या... भलतंच्‌"!!
रम्यानंही मग मांजा गुण्डाळायला सुरुवात केली,"काय हरकत आहे रे बाळ्या.... चांगले हिण्डलाय फिरलाय की बरोबर....त्या परिषदेच्या भाकर्‍या भाजत....! ते पण आईबापांच्या साक्षीनं.... !!
आतां काय.... फक्त माळ घातली की झालंच की!! आहे काय त्यात एव्हढं...... ऑं?"
बाळ्या आतां चक्क लाजला. म्हणाला,"तसं नाही रे बाबा.........."
"मग कसं?", शिरीष
बाळ्या म्हणाला,"त्याचं काय आहे, काका काकू मिनी सगळे अगदी घरच्यासारखेच.... म्हणून हा उद्योग करतोय्‌..... खरं तर मिनीकडं मी 'त्या' दृष्टीनं कधी पाहिलंच नाही." !!

जमलं तर बाळ्याला जरा रेंमटावं म्हणून मग मीही त्या गदाड्यात उतरत म्हटलं,"मग आता बघ की !......काय बाळ्या तूं पण... इतकी फक्कड पोरगी... वयानं शिक्षणानं अनुरूप.... दिसायलाही फाकडी.... वर घरच्यासारखी....
अरे घरच्यासारखीला घरवाली बनवायला जमत नाही तुला? की तिच्याबरोबर नुस्ताच हिण्डलास कॉलेजात असतांना,,,, लष्कराच्या भाकर्‍या भाजत.... ऑं?"
बाळ्या आतां मात्र खरंच सटपटला... म्हणाला,"नाना, तसा कधी विचारच डोंक्यात आला नाही बघ.... म्हणजे असं की.....की.... मी विसरलोच." !!
टेबलावर खसखस पिकली. शिर्‍यानं कपाळाला हात लावला.!!
पण रम्या सीरियस झाला. म्हणाला,"बाळ्या खंरच सांग.... मिनी तुला मनापासून आवडते की नाही?"
"हो", बाळू.
रम्या," म्हणजे ’तश्या’ दृष्टीनं रे....."
बाळू," सांगितलं ना...मी ’तश्या’ दृष्टीनं कधी तिला पाहिलंच नाही म्हणून?"
शिर्‍यानं घोडं रेटलं,"टांग मारूं नकोस बाळ्या आम्हांला....आवडते की नाही बोल फक्त"
बाळ्या,"हो... तसं म्हणायला हरकत नाही."
रम्या,"अरे मग विचार की तिला.....की तिनंच  विचारायची वाट बघतोय्‌स?"
बाळ्या,"माफ करा लेको.... हे....हे‍... असलं कांही नाही जमणार आपल्याला....." !!
रम्यानं फिरकी ताणली,"मग काय आम्ही विचारायचं तिला.... ऑं?
काय उपयोग साल्या डॉक्टरेट्‌ करून?...साधी पोरगी नाही पटवतां येत.... ती पण घरच्यासारखी..."!!
बाळ्या उसळला," डॉक्टरेट्‌ चा काय संबन्ध इथं? ..... पण हे नाही जमणार आपल्याला"!!
" मग बस एकतारी वाजवत.... स्थळं शोधत...", शिर्‍या.

मला मात्र रम्याच्या फिरकीतनं एक कल्पना सुचली. म्हटलं,"हे बघ बाळ्या, जर मिनीनंच हा विषय काढला.......... तर?"
क्षणार्धात बदललेल्या वार्‍याची दिशा शिर्‍या-रम्याच्याही लक्षात आली.....
बाळू चक्क लाजला," चालेल की "!!
"बाळ्या.... अगदी नक्की ना? बघ हं...तोंडघशी पाडलंस तर आमच्याशी गांठ आहे साल्या....", शिर्‍या
रम्या म्हणाला,"बाळ्या तूं तयार आहेस ना शंभर टक्के? बाकीचं आम्ही बघून घेऊं... बस्स करा आतां ही वणवण"

विषय तिथंच संपला.....
वैशालीचं बिल बाळूच्या गळ्यात लटकवून आम्ही तिघे सटकलो.
रम्या मात्र दिलेल्या शब्दाला जागला.
त्यानं मिनीला गांठलं...... गम्मत ही, की मिनीच्याही डोंक्यात 'तसला' प्रकाश पडलेला नव्हता. !!
मग काय, रम्यानं काका-काकूना गांठलं....
काका-काकूनी बाळूच्या आई-अण्णांना गांठलं......
काका-काकूंना हा कांखेतला न दिसलेला कळसा निहायत आवडला......
बाळ्या-मिनीनं 'गावाचा वळसा' दंवडला......
बाळूच्या आई-अण्णांनाही ही 'घरची तुळस' बेहद्द पसन्त पडली.......
आणि आठवडाभरातच या भामाबाईनी बाळकृष्णाचा पत्कर कायमचा घेतला.!!

बाळ्याला बिचारीनं आयुष्यभर अक्षरशः सांभाळला.
त्याचा संसार करणं ही एक कसरतच होती...... तीही तिनं धडाडीनं नी आनंदानं निभावली.
बाळ्या-मिनीनं आयुष्यभर ही आठवण ताजी ठेंवली.
त्यामुळंच परंपरेची पर्वा न करतां, आमची कार्यक्षेत्रं वेगळी असूनही, बाळूनं या निरोप समारंभाचं आमन्त्रण आम्हां तिघांनाही आवर्जून दिलं होतं.
आणि म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाचे साक्षीदार झाले होतो.
एकामागून एक बाळ्याचे सहकारी बोलत होते. मी रम्या आणि शिर्‍या जरा गप्पा टाकत शेंवटच्या रांगेत विसांवलो होतो......

अचानक शिर्‍या म्हणाला," नाना, हा बाळ्या थोडाफार तरी बदललाय्‌ कां रे? की होता तसाच आहे अजून?"
"बाळ्या कसला बदलतोय्‌?", रम्या बोलला,"ही मिनीच कशी टिकली हयातभर...तीच जाणे..... अजूनही तस्साच विसराळू राहिलाय्‌‌."
"काय सांगतोस काय?",मी म्हटलं,"तसं असलं तर खरंच मिनी धन्य आहे"
"नाहीतर काय?",रम्या बोलला,"गेल्या महिन्यात घरी गेलो होतो तेव्हां मिनी च सांगत होती....
म्हणे तिनं बाजरातनं भाजी आणायला ह्याला पाठवला...
हा गेला लॅम्ब्रेटा घेऊन...लक्षांत आहे ना? ते ७६ चं मोडेल... ते च वापरतोय्‌ अजून."
मी  म्हटलं,"हो आठवतंय्‌.... फूटबोर्डला डिकीच्या जागी जाळीची बास्केट असलेलं... तेच नां?"
रम्या म्हणाला," बरोबर...तेच. त्या जाळीचीच गम्मत झाली बघ....."
"काय झाली गम्मत?", शिर्‍या.
रम्या म्हणाला," काय झालं... हा गेला मण्डईत... भाजीबिजी घेतली... नी पैसे देतांना लक्षात आलं की पिशव्या घरीच विसरलाय्‌  म्हणून"!!
मी," मग?"
रम्या बोलला,"मग काय... भरलीन्‌ सगळी सुटी भाजी जाळीच्या बास्केटमध्येच, अन्‌ निघाला घरी..... तर रस्त्यांत ब्रेक च लागेना.
बरं, गाडी तर आदल्या दिवशीच मिनीनं सर्व्हिसिंग करून आणलेली......
झालं... बाळ्याची कवटी सटकली... तसाच गॅरेजवर गेला गाडी घेऊन... अन्‌ मेकॅनिकची बिन पाण्यानं सुरूं केली....
’साघी सर्व्हिसिंग धड करतां येत नाही.... गॅरेज खोलून बसलेत’... वगैरे वगैरे."
शिर्‍या," बरं पुढं?"
रम्या," अरे पुढं काय.... मेकॅनिक्‌ मिनीला 'ओंळखत' होता, अन्‌ बाळ्याला 'ओंळखून' होता, म्हणूनच पुढचं रामायण टळलं....
      त्यानं शांतपणानं ब्रेक तपासला... अन्‌ भाजीच्या बास्केटमधनं खाली घरंगळून, ब्रेकखाली अडकलेला बटाटा बाळ्याच्या हातावर ठेंवला. !!
      असला हा बाळ्या.... आतां इथं कांही गडबड नाही केलीन्‌ म्हणजे मिळवली."

रम्या म्हणायला आणि फान्दी मोडायला तो मुहूर्तच लागला होता की काय देव जाणे.
बाळ्याचे एक वरिष्ठ सहकारी बोलत होते," आणि आतां मी माननीय बाळासाहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायची विनंति करतो".
बाळू बोलायला उभा राहिला.... आम्ही कान टंवकारले.....

बाळूनं सुरुवात केली,"मित्रहो यश हे कुणाही एकट्या माणसाचं नसतं... आजवरच्या सेवेत आपण सर्व मित्रांनी माझ्या कामांत जे मनस्वी सहकार्य केलंत ते बहुमोल आहे.
किंबहुना आजवरचं यश हे माझं एकट्याचं नसून ते आपल्या सगळ्यांचं आहे असं मला मनापासून वाटतं. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

दुसर म्हणजे कुठ्ल्याही पुरुषाच्या यशाचं श्रेय हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार्‍या त्याच्या अर्धांगीकडंही जातं.....
म्हणूनच इथं उपस्थित असलेली माझी पत्नि.....माझी पत्नि.....माझी पत्नि....."
इतकं बोलून बाळ्या अचानक कोरा झाला.......
अन्‌ शेजारी बसलेल्या मिनिकडं वळून कांही कळायच्या आंत म्हणाला," ए, नाव काय गं तुझं?" !!!

सभागृह क्षणभर स्तब्ध झालं.... अन्‌ दुसर्‍या क्षणीं हास्यकल्लोळ झाला......!!!
श्रोते हसूं लागले...व्यासपीठावरच्या नामवंतांतही खंसखंस पिकली.....
डायरेक्टर साहेबानी कपाळाला हात लावला....!!!
मिनीचा चेहरा बघण्यासारखा झाला.... पण क्षणभरच.
तिनंही आयुष्यभर हा बाळकृष्ण सांभाळून पचवलेला असावा.

मिनी शांतपणे खुर्चीतनं उठून उभी राहिली.....
तिनं माइक्‌ हातीं घेंतला....
आणि खणखणीत आवाजात तिनं सुरुवात केली.....
"व्यासपीठावरील सन्माननीय, आणि श्रोते मित्र हो.....
मी स्वतःच माझी ओंळख करून देते........
मी सौ. भामिनी बाळकृष्ण उपाध्ये........."
अन्‌ शेजारी बसलेल्या किंकर्तव्यमूढ बाळ्याकडं निर्देश करीत पुढं म्हणाली," यांची विसरलेली बायको."!!!!
आख्खं सभागृह हंश्याच्या बॉंबस्फोटानं दणाणून गेलं......
बी.एस्‌.सीं. झालेल्या मिनीनं दोन वाक्यांत मैदान मारलं........!!!
अन्‌  पीं. एच्‌ डी. केलेल्या बाळासाहेबांनी, भर सभागृहांत  कपाळाला हात लावला. !!!!


----- रविशंकर.

****************************************

1 comment:

  1. Ravi,

    Nice story. Your style of writing is very informal and endearing. The theme is quite day-to-day. A reader can very easily relate to your story.

    Only one suggestion, if you don't mind - at places, the narration stretches a bit too much. For example, the discussion between the friends where an alliance between the two is first thought of.

    On the whole, a very good effort. Do keep it up. All the best.

    - Kishor Kulkarni

    ReplyDelete