Search This Blog

Wednesday 30 November 2011

॥ माहेरवास ॥



" आज इकडं कसे काय? पतूं बरी आहे ना ?", पुढ्यांत नाष्ट्याचं भरगच्च ताट ठेंवीत माझ्या सासूबाईनीं विचारलं.
१९७६ सालांतल्या ऐन हिवाळ्यातल्या एका प्रसन्न सकाळी मी सासर्‍यांच्या घरी बसलो होतो.
सासरे फिरायला बाहेर गेलेले. सासूबाई घरी एकट्याच होत्या.... नव्हे, तसा मुहूर्त साधूनच मी घरी गेलो होतो.


आमचे सासू- सासरे ही एक विलक्षण वेगळी जोडगोळी होती.सासरे त्या काळांत इंग्लंडला जाऊन बी. ई. (मेक्‌)- बी.ई.(इलेक्‌) करून आलेले. त्यावेळच्या तेलुगु समाजातले पहिले इंजिनियर.
ब्रिटिश काळातल्या हाय्‌ड्रॉलिक्स्‌ ऍंड्‌ पॉवर डिपार्ट्‌मेंट्‌ चे चीफ्‌ इंजिनियर पद भूषविलेले कर्तबगार गृहस्थ, तर सासूबाई जुन्या वळणाच्या...केंवळ मराठी चवथी झालेल्या.
सासरे बहुश्रुत, शान्त, अबोल....तर सासूबाई विलक्षण धंडाकेबाज, बोलक्या, अन्‌ व्यवहारी सूद्न्यपणांत मुरलेल्या.
त्यांना तिन्ही मुलीच. मुलगा नाही. माझी बायको सौ. सुमीता [पूर्वाश्रमीची प्रतिमा], ही मधली.
एकोणीसशे सत्तर सालच्या जुन्या वळणाच्या, स्वजाती-पोंटजाती बाहेर रोटी-बेटी व्यवहार न करण्यार्‍या कर्मठ जमान्यांत, केंवळ माणूस पारखून ज्येष्ठ कन्या कामाठी समाजात, मधली ब्राह्मणांत, अन्‌ धांकटी मुलगी सिंधी घरात द्यायचं धाडस करणारं हे दांपत्य.
ह्या कामाठी लोकांचा एकूण खाक्याच तसा बेदमपणाचा..... खाणं बेदम, कमावणं बेदम, बोलणंही बेदम अघळपळ.... आमचे सासरेच तेव्हढे अपवाद असावेत.
सासरे अगदी ब्राह्मणी थाटाचे पण सासूबाई मात्र पक्क्या कामाठी.... पंचवीस तीस पाहुणे जरी अचानक उपस्थित झाले, तरी धडाक्यात एकटीनंच त्यांचं सगळं करायच्या.
बोलण्यातही ऐसपैस.... जरा फटकळ होत्या इतकंच.
गम्मत म्हणजे ज्येष्ठ-कनिष्ठ जावयांशी फारसं बोलायच्या नाहीत. माझ्याबरोबरच त्यांची सम कशी काय जुळायची कुणास ठाऊक.
त्यामुळं सासू-जावयातलं अन्तर त्यांच्याबरोबर बोलतांना मलाही विसरायला व्हायचं. म्हणूनच त्या एकट्याच असतील अशी वेंळ साधून मी सासरी गेलो होतो.
डोंक्यांत एक चमत्कारिक प्रश्न घोंळत होता.... विषय कसा काढावा हे कळत नव्हतं.
आमचं लग्न होऊन दोनएक वर्षं होत आलेली.... पण या काळांत सौ. सुमीता एक दिवसही माहेरी रहायला गेलेली नव्हती.... हांकेच्या अन्तरावर माहेर असून.!!!
पहिल्या दिवाळसणावेळीच जी काय दोन दिवस राहिली असेल तेंव्हढीच. पण त्यावेळी तर मीही तिथेच होतो.
तात्पर्य सौभाग्यवती एकट्या अश्या एक दिवसही कधी माहेरी रहायला गेलेल्या नव्हत्या. !!
विद्यार्थी दशेत पुण्यात सदाशिव पेठेतल्या अस्सल पुणेरी ब्राह्मणी वाड्यात राहिलेला मी..... तिथं हरघडी फुटकळ सबबी शोधून माहेरी पळण्यार्‍या न्‌ तिथंच महिना महिना मुक्कम ठोंकणार्‍या सुना तर मी ढिगानं .पाहिलेल्या.........
त्या पार्श्वभूमीवर बायकोचं हे माहेरी न जाणंच मला जरा खटकत होतं. बायकोचं आईबापांबरोबर फारसं पटत नसावं काय? असली विचित्र शंकाही अस्वस्थ करीत होती.
पण रोजचे व्यवहार तर मजेत सुरळीत चाललेले. आठवड्या-पंध्रवड्यातनं कधितरी तिच्या माहेरी आमची चक्करही व्हायची. भेंटीगांठी मजेत व्हायच्या...
पण तेव्हांही ही कधीच ’चारदोन दिवस माहेरी राहते’ असं म्हटलीही नाही, अन्‌ राहिलीही नाही.!!
सगळी गोची ही अशी होती.!!
माझी बायकोही तशी फटकळच असल्यानं तिला खुलासा विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता.!!
म्हणूनच बराच साधक बाधक विचार करून, मी ही नामी शक्कल लढवली होती, अन्‌ तडक सासुरवाडी गांठली होती.
पोंट फुटेतोंवर बेदम नाष्टा झालेला होता....
समोर कांठोकांठ भरलेला चहाचा टंपर ठेंवीत सासूबाईनी पुन्हां विचारलं,"अचानक कसे काय फिरकलांत? पतूं बरी आहे ना? कसल्या विचारांत पडलाय्‌? काय भांडलीबिंडली काय पतूं?"
चहा पीत मी म्हटलं,"तसं कांही नाही हो..... पण....हिचे-तुमचे कांही मतभेद .....वगैरे?"
"कसले मतभेद डोंबलाचे? सासूबाई बोलल्या,"काय असेल मनांत ते खळखळून बोला की... कसला आडपडदा आला‌य्‌?"
इतकं झाल्यावर मात्र मी त्यांना सगळं सांगितलं... म्हणजे हिचं माहेरि न जाणं.... वगैरे, अन्‌ पुढे म्हणालो,"म्हणून मला जरा शंका आलीय् इतकंच.‌"
सासूबाई हंसून म्हणाल्या,"अहो काय घेऊन बसलाय्‌ त्याचं एव्हढं? नसेल जमत रहायला तिला इकडं.... तिला स्वतःच्या घरचे व्याप काय कमी आहेत? आणि ती काय इथं येऊन आमच्याशी भांडलीबिंडलेलीही नाही..... काढून टाका डोक्यातनं ह्या शंका सगळ्या........ मी बोलते तिच्याशी हवंतर."
तरी मी माझं घोडं पुढं रेंटलंच,"तशी आवश्यकता नाही वाटत मला...." अन्‌ मग ते 'सदाशिव पेठ' पुराणही ऐकवलं सगळं त्यांना.
आतां मात्र सासूबाई खो खो हंसल्या....म्हणाल्या,"सदाशिव पेठ होय? आत्तां आलं लक्ष्यांत सगळ....अहो पोरींचे हे असले फाजिल लाड भटा-ब्राह्मणांत चालवून घेंतले जातात....आमच्यात नाही चालत...समजलं? आणखी एक असं की ....."
मी म्हटलं," दुसरं आणखी काय अजून ?"
" आतां असं बघा..." सासूबाई पुढं म्हणाल्या, " की जर  मी  पण  दर एक दिवसाआड  'आई-आई'  करत माहेरी पळायचं ठरवलं तर?......... दररोज उठून मला स्वर्गावासी व्हावं लागेल.!!!!........ काय?"

अर्ध्या शतकाहून ज्यास्त काळ पुणं जोंखलेल्या आमच्या मुरब्बी सासूबाई, माझ्या ब्राह्मणी समजुतींचं असं क्षणार्धांत श्राद्ध घालून मोकळ्या झाल्या. !!!

मी कपाळाला हात लावत घरचा रस्ता धरला.!!!
 माझ्या घरांत पुढं पंचवीस वर्ष तरी हा विषय परत उपटला नाही.!!

यथावकाश आमच्या लेकीचंही लग्न पार पडलं. उड्या मारीत तीही सासरी निघून गेली. लेकही आईच्याच तालमीत तयार झालेली...... पुनश्च हरि ओम्‌ !!
लग्न होऊन चारपांच वर्षं होत आली... नातही अवतरली.... तरी एक दिवसही माहेरी यायचं नांव नाही.!!
मलाच अस्वस्थ व्हायला लागलं.....
अखेर अचानक तो योग जुळून आला. जावई पंधरवड्यासाठी ऑफिसच्या कामासाठी अमेरिकेला गेला.
आठ दहा दिवस उलटले, अन्‌ लेकीचा फोन आला.... 'दीक्षाला घेऊन दोन दिवस रहायला येईन'. !!!
मी विलक्षण सुखावलो......
बायकोला कुजकट टोलाही हाणला,"तुम्ही जन्मांत कधी गेला नाहीत माहेरी....पण लेक घरची ओढ विसरलेली नाही." !!!
सौभाग्यवतीनी हंसून फक्त दुर्लक्ष केलं......जणू कांही काय बल्ल्या होणाराय्‌ ते तिला बहुधा माहीत असावं.
शनिवारी सकाळी वीकएण्ड्‌ गांठून लेक नातीसह हजर झाली. माझ्या कवेत आभाळ आलं.
नातीबरोबर सकाळ मजेत गेली....दुपारी गोडधोडाचंही जेवण यथासांग पार पडलं.....
अन्‌ जावयाचा दुपारीच मुंबईवरून फोन आला," काम लवकर आटपलं म्हणून परत निघालो...मुंबईला पोचलोय्‌...सहा वाजेपर्यंत घरी पोहोचतो."
लेकीनं फोन खाली ठेंवून सामानाची आवराआवर सुरूं केली.... हिला म्हणाली,"श्रीनित सहा वाजेपर्यंत घरी पोचतोय्‌... मी निघते."!!!
मला राहवेना..... इत्क्या वर्षांनी बिचारी माहेरी आलेली..... मनांत कालवाकालव व्हायला लागली...
म्हटलं,"अगं आली आहेस तशी चारदोन दिवस रहा तरी सुखानं..... मी स्वतःच पोंचवीन घरी तुला."
माझ्याकडं वळत लेक म्हणाली," तो येतोय्‌... घरी कामं पडलीत ढीगभर....नी इथं काय करूं मी आईच्या माण्डीवर बसून?  निघते मी....परत येईन सावकाश."
सामान आणि नातीला कांखोटीला मारून लेकीनं चप्पल चढवली........
बायकोनं माझ्याकडं खंवचटपणे पहात म्हटलं,"तुम्ही म्हणत होतां तेंच बरोबर आहे....
लेक घरची ओंढ विसरलेली नाही... कुठल्या घ्ररची ते समजलं नां आतां?  जा...रिक्षा घेंऊन या चटकन्‌...तिला उशीर होतोय्‌..."
मी ’माहेरवास’ या विषयावर दुसर्‍यांदा कपाळाला हात लावत रिक्षा आणायला बाहेर पडलो. !!!!
                                                                                                           
                                       **********************************

                                                                                                        ----- रविशंकर.

No comments:

Post a Comment