Search This Blog

Sunday 27 November 2011

॥ निराधार ॥




ऐन वैशाखाच्या वणव्यातली १९८० सालांतली ती एक दुपार होती. जेवणंखाणं आवरून जरा आडवं व्हायची खरं तर ही वेळ. पण अजयभाऊं च्या मंगळवार पेठेतल्या घरच्या दिवाणखान्यांत कॉंग्रेस पक्षाच्या शहर पातळीवरच्या कार्यकर्त्यांची बैठक भरलेली होती. सेक्रेटरी, खजिनदार, प्रवक्ते, कार्यकर्ते, अन्‌ हौशे-नवशे-गंवशे, असली तीस चाळीस तरी मंडळी हजर होती. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीवर खलबतं चालूं होती. तोंडातले पानतंबाखूचे तोंबरे सांभाळत, जो तो हिरीरीनं बडबडत होता.

अजय हा माझ्या बायकोचा सख्खा मावसभाऊ.
जेमतेम पदवीपर्यन्त पोंचलेला, पण तरूणपणापासून गल्ली ते दिल्लीपर्यन्त अनेक उचापती करणारा हा इसम. ह्याच गुणांच्या जोरावर गल्ली पातळीच्या साध्या कार्यकर्त्यापासून आज पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतेपदापर्यंत त्यानं मजल मारलेली होती. अगदी चपराश्या पासून कलेक्टर पर्यंत अनेकविध स्तरांवर अजयभाऊं चं वजन असायचं. निवडणुकांचा हंगाम आला रे आला, की बुक्का-गुलालवाल्यापासून,  तिकिटेच्छुक कार्यकर्त्यापर्यंत, सार्‍यांचे या अजयभाऊ कडं हेलपाटे सुरूं व्हायचे. अजयभा चं उखळ त्यांत अमाप पांढरं होतं, असही कुणी कुणी पुटपुटायचे.
कांहीही असो, हा अजयभाऊ त्या वेळी कॉंग्रेसमधली एक पावरफ़ुल्ल असामी होती एव्हढं नक्की.

बैठक ऐन रंगांत आलेली असतांनाच, मालिनी नं-म्हणजे अजय च्या बायकोनं- त्याला हांक मारली,
"अहो, ऐकलत काय ? जरा आत या. बालगंधर्व मावशी आल्याय्‌त तुम्हांला भेंटायला."
या बालगंधर्व मावशी म्हणजे अजय ची ( म्हणजे माझ्या बायकोचीही) सर्वात मोठी मावशी.जुन्या काळातल्या, सांठीच्या ठेंगण्या ठुसक्या बाई, पण बालगंधर्वांच्या नाटकांचं त्यांना विलक्षण वेड.नाटकांतली पदंबिदं गायच्या. आवाजही सुरेल होता. त्यामुळंच, त्यांचं असं नांव पडलं होतं.
घरातलीच काय, पण पेठेतली माणसंही त्यांना बालगंधर्व मावशी च म्हणायची. आवाजांत गोडवा असला,
तरी तोंड चांगलंच फटकळ होतं.
संतापल्या, तर पुरुष माणसाला लाजवील अश्या शिव्याही बेधडक द्यायच्या.!!
गल्लीतली कांही टंवाळ तरूण पोरं तर मावशीना ए के ४७ म्हणूनही हांक मारायची. !!
बाकी मावशी म्हणजे शेजारधर्माला लाख मोलाची बाई. त्यामुळं पेठेतली माणसंही त्यांची मुलुखमैदान मुकाट ऐकून घेत असत.

अजय आंत आला. बालगंधर्व चिंताग्रस्त चेहर्‍यानं डोंक्याला हात लावून त्याचीच वाट पहात बसले होते.
अजय: " काय झालं मावशी ? इतक्या तांतडीनं बरी आलीस ?"  
मावशी: " निम्मी परत आलीय्‌. नवरा नांदवत नाही म्हणतीय्‌."

ह्या बालगंधर्व मावशीला दोन मुलं. मालक आठ दहा वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झालेले.
आर्थिक परिस्थितीही ओढाताणीचीच.
धांकटा अनिल. तो अर्धवट होता. सगळे त्याला ढग्या म्हणत.
वयानं जरी तिशीचा असला, तरी सगळे व्यवहार चार वर्षाच्या मुलासारखे.
मावशीचं आतडं त्याच्यासाठी तिळतिळ तुटायचं. पण करणार काय ?
"कपाळीचे भोग बालगंधर्वानाही चुकले नाहीत, तिथं माझी काय कथा ?"
असं म्हणायची, अन्‌ ढग्या चं सगळं मायेनं करायची.
थोरली निर्मला ’. हिला सगळी निम्मी म्हणत.
ही तशी चार चौघीसारखीच, पण डोंक्यानं चांगलीच निम्मी होती.!!
भरीला काळी-कुरूप, अंगानं वेंताच्या कामटीसारखी सुकट, स्वभावानंही चमत्कारिक.
पण नवल म्हणजे ह्या अश्या निम्मी चा प्रेमविवाह झालेला होता. !!
नवरा दिसयला बरा, अन्‌ पैसाही बाळगून होता. !!
तिच्यावर भाळलेल्या त्या महाभागाची मला कींव यायची.
बिचारा, ’प्राप्ते तु षोडषे वर्षे गर्दभी अप्सरायते या सुभाषिताचा जिवंत पुरावाच होता जणूं.!!

अजय म्हणाला," अगं, मग भावजीं बरोबर बोलली‌स काय ? काय म्हणताय्‌त ते ?"
बालगंधर्व तडकले," ते काय म्हणणार ? घेऊन जायला तयार होते, पण ही धड वागेल,
ह्याची खात्री कोण देणारम्हणताय्‌त!. खरं तर ही भडवी च जायला तयार नाही.!!
अवदसा माझ्या उरावर येऊन बसलीय्‌ ह्या वयांत. तूंच काहीतरी कर बाबा."
अजय:  " बघूं या. ह्या निवडणुका एकदां पार पडल्या, की कांहीतरी मार्ग कांढूं ह्यातनं"
मुलुखमैदान गरजली," आणि तोवर मी काय निम्मीला जोंजवत बसूं ? ?
अरे सगळ्या गांवाचे राडे उपसताय्‌... पैसा ओंरपत!! घरची चार धुणी फुकट बडवलीत, तर काय बिघडतंय्‌ ? ढग्याचं च मला आतांश्या होत नाही, वर ही घोंपरड घेऊं गळ्यांत बांधून ? तूं घेतोस ?
चांगलं कर्ज कांढून लग्न लावून दिलं...कुठंतरी एकदाची नीट नांदूं दे म्हणून, तर मस्ती चढलीय्‌ अवदसेला."

एव्हढी तोंफ डागून बालगंधर्वां नी डोंळ्याला पदर लावला…. वातावरण एकदम गंभीर अन्‌ हळवं झालं.!
शेंवटी अजयच म्हणाला," हे बघ मावशी, घरांत आत्तां पार्टीची बैठक चाललीय्‌.
असं करूं या, मी उद्या सकाळीच तुझ्याकडं येतो. निम्मीशी पण बोलून बघतो काय म्हणतीय्‌ ते.
चिंता करूं नकोस. कांहीतरी मार्ग काढूं नक्की. मग तर झालं ना?"
" विसरूं नकोस रे बाबा. मी वाट बघते. आतां तुमच्या शिवाय कुणाच्या तोंडाकडं बघूं मी ?" म्हणत
बालगंधर्व मावशी मार्गस्थ झाल्या.

अजय दुसर्‍या दिवशी  सकाळीच पक्षाच्या कामाला दांडी मारून बालगंधर्वां च्या घरी उपस्थित झाला.
निम्मी बरोबर  बोलून तिची समजूत काढायचा प्रयत्न पण त्यानं केला, पण निम्मी ढिम्म होती.
अडून बसलेल्या तट्टासारखी.
तिचं एकच पालुपद चालूं होतं, "मी दुसरं लग्न करीन, पण परत जाणार नाही."!!
आतां ह्या असल्या, महत्कष्टानं एकदां उजवलेल्या निम्मी ला कोण गाढव पदरांत घेणार ?
शेवटी अजयनंही हात टेंकले.
बालगंधर्वांनी तर आधीच साष्टांग घातलेला होता. !!
मावशीची मुलुखमैदान गरजली," मग काय गळ्यांत ढोलकं बांधून दारोदार फिरणार आहेस काय गं ?
 की मलाच आतां चार घरची धुणी-भांडी करायला लावणार आहेस ?"

शेवटी मावशी फिस्कारल्या," हे बघ अजय, ह्यां ची जी काय पेन्शन मिळतीय्‌, त्यांत माझं अन्‌ ढग्याचं ही धड भागत नाही, तुला माहीतच आहे सगळं. कश्याकश्याला असं तोंड देऊं आतां ? तूंच सांग."

अखेरीस अजयलाच एक कल्पना सुचली. तो मावशीला म्हणाला," हे बघ मावशी, एक मार्ग दिसतोय्‌ मला.
जरा याचना करावी लागेल खरं, पण लोकांकडं नाही."
बालगंधर्व : "कसला मार्ग काढलाय्‌स बाबा ?"
अजय:"मावशी, हे बघ. दोनएक महिन्यापूर्वीच सरकारनं निराधार परित्यक्ता साठी नवीनच मदत योजना जाहीर केलीय्‌. तीखाली नवर्‍यानं सोडलेल्या निराधार महिलांना, सरकार दरमहा निर्वाहखर्च देणार आहे.
म्हणजे एक प्रकारे ही पोटगीच आहे असं समज, फक्त ती सरकारकडनं पेन्शन सारखीच मिळते... पण..."
मावशी: "पण काय अजून ?"
अजय:" मावशी, ही मदत मिळवता येईल. फक्त निम्मी ला निराधार परित्यक्ता म्हणून कलेक्टरपुढं
एकदाच उभं रहावं लागेल. आहे ह्या परिस्थितीत हा एव्हढा एकच मार्ग मला दिसतोय्‌.
निम्मी तयार असेल तर बघूं या प्रयत्न करून."
शेंवटी मावशीच म्हणाली," तिला काय विचारायचंय्‌ त्यांत? तिनंच राडा करून ठेंवलाय्‌ ना सगळा ?
मग तिलाच निस्तरायला नको तो ? "
मग निम्मीकडं वळत कडाडली," मुक्काट्यानं अजय सांगतोय्‌ तसं करायचं, काय?
नाहीतर चंबूगबाळं आवरून रस्ता सुधारायचा.!!"
निम्मी कांहीच बोलली नाही. नुस्तीच खालमानेनं "हूं" म्हणाली.
अजय म्हणाला," असं करूं निम्मे, मंगळवारी कलेक्टरच्या ऑफिसांत ह्याचं काम चालतं.
तिथं वेळेत ये, ठीक अकरा वाजता.
आणि हो! एक लक्ष्यांत ठेव नीट. माझ्या नात्यातली आहेस, असं चुकुनही कुणाला सांगायचं नाही.!!
नाहीतर फुकटच तोंड वाजवून माझीच पंचाईत करून ठेंवशील... काय ? तर मग ये अकरा वाजतां.
मी कलेक्टरच्याच ऑफिसात असेन. तिथंही ओंळख दाखवायची नाही !!.
तुझं नांव पुकारलं, की फक्त कलेक्टर समोर हजर व्हायचं, अन्‌ तो जे विचारील, तेव्हढ्याच प्रश्नांची
मोजकी उत्त्तरं द्यायची.
नीट लक्षांत ठेंव. नवर्‍यानं तुला टाकलेली आहे, एव्हढंच त्याला पटलं की झालं .!
बाकी ज्यादा तोंड अजिबात वाजवायचं नाही !!. कळलं नीट?"

निम्मी नं आपलं निम्मं डोकं परत एकदा होकारार्थी हलवलं.
बालगंधर्वांचाही चेहरा उजळला.

अजयनं मग कसल्यातरी एका पिवळट सरकारी अर्जावर निम्मीची सही घेंतली, अन्‌ मावशीला
म्हणाला," निघतो आता मावशी मी. मंगळवारी पाठव हिला."

मंगळवार उजाडला. अजयनं सकाळी सकाळीच पक्षाच्या कार्यकर्त्या पोरासोरांना, कांहीबांही
निवडणुकीची झेंगटं गळ्यांत मारून दशदिशांत पिटाळलं, अन्‌ साडेदहालाच कलेक्टर ऑफिस गाठलं.


नेहमीप्रमाणंच कलेक्टर कचेरी खास सरकारी थाटात फुलली होती.
मॅजिस्ट्रेट च्या कार्यालयासमोर कागदी गरजूं ची गर्दी उसळली होती.
पलीकडं जमीन नोंदणी कार्यालयातही तोंच प्रकार.
कोर्टांत वकिलीची प्रॅक्टिस न जमलेले, काळे डगलेवाले भाडोत्री वकील प्रतिद्न्यापत्रं वाली सावजं टिपत
सगळीकडं हिंडत होते.
कोर्ट फी स्टॅम्प च्या काऊंटरसमोर भलीमोठी रांग लागली होती.
जागोजागी एजंटाकरवी कामं करवून घेणारी मंडळी, पान-तंबाखू चघळत, पिचकार्‍या मारत, नुस्तीच
रेंगाळत उभी होती.
जरा आतल्या बाजूला विवाह नोंदणी कार्यालयांत बरीच नवविवाहित जोडपी स्वतःच्या गाढवपणा ची
रीतसर नोंदणी करायला लाजत रांगेत उभी होती.!!
एकूण एखाद्या राणीच्या बागेसारखं कलेक्टर ऑफिस फुललं होतं.

अजयनं यातल्या कश्याकडंच फारसं लक्ष न देतां सरळ कलेक्टरचा दरबार गांठला.
साहेबांच्या केबिनच्या दरवाज्यावरचा सरकारी पहारेकरी, पेंगत, तंबाखू मळत बसला होता.
अजयला पहातांच तो चटकन्‌ तोंडात बकाणा कोंबत, सांवरून बसला.
कोण कोण आलं की सांवरून बसायचं, अन्‌ कोण कोण आलं की मख्ख चेहरा करून बसायचं हे ह्या सरकारी चपराश्यांना उपजतच तोंडपाठ होंत असावं!!
अजयनं उपकृत करून ठेंवलेल्यापैकी हे एक बेणं होतं. त्यानं चटकन्‌ सलाम ठोंकला. 

" काय परशुरामभाऊ, ठीकाय्‌ ना सगळं ? साहेब यायचेत की काय अजून ?" विजय म्हणाला.
"बरं हाय्‌ सायेब, तुमच्यासारख्यांच्या किरपेनं…. सायेब अजून आल्यालं न्हाईत.
यितीलच येवड्यात बगा. बसा आंतमदी हवं तर आरामात." इति परशुराम.
तेंव्हढ्यात दस्तुरखुद्द दळवी साहेबच दाखल झाले. विजयला पाहून म्हणाले,
" काय बालम साहेब, आज इकडं कशी काय पायधूळ झांडलीत? या आंत या
परशुरामजरा चहा दे पांठवून लगेच."

स्थानापन्न होतांहोतां अजय म्हणाला," तसं कांही विशेष नाही दळवी साहेब. सध्या तुमची ती
निराधार परित्यक्ता योजना सुरूं आहे ना ? म्हटलं, जरा स्वतःच बघून यावं की
कांही लोककल्याण होतंय्‌ की नाही ते…… म्हणून आलो."
दळवी साहेबही तसे मुरलेले होते. शिवाय आय्‌-ए-एस्‌ ची विद्वत्ताही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतीच.
शालजोडीतला हाणायची संधी त्यांनी सोडली नाही. म्हणाले," काय बोलताय्‌ बालम साहेब, योजना तुमच्याच सरकारची. अहो निराधार परित्यक्तां ची काळजी घ्यायला तुम्ही लोक आहातच की !
आम्हां लोकांचा तो प्रांत नव्हे. !! आम्ही फक्त योजना राबवणारे..... काय?"
अजयनं मुद्द्याला बगल देत म्हटलं," त्याचं काय आहे साहेब, निवडणुका अगदी तोंडावर आल्याय्‌त, तुम्हाला माहीतच आहे. म्हटलं, ही नवी योजना जोरांत चालली असली, तर पक्षाच्या प्रचारालाही ह्याचा उपयोग करून घेतां येईल.
आज या योजनेच्या हजेरीचा साप्ताहिक दिवस ना ?
म्हटलं, कितपत जोरांत चालली आहे, स्वतःच बघावं.... चालेल ना थांबलो तर ? ”

दळवी साहेब: "अहो चालेल ना ?’ म्हणून काय विचारताय्‌ बालम साहेब, थांबा की अवश्य!. योजना अगदी धुमधडाक्यांत सुरूं आहे.!
सरकारच्या खिश्यांत हात घालायला कसले कसले नग इथं उपस्थित होताय्‌त, ते स्वतःच बघा."!!

इतकं होतंय्‌ तोंवर परशुरामभाऊ डोंकावले," सायेब ती बायाबापड्यांची मिटिंग हाय्‌ न्हवं आत्तां ?
तशीलदार सायेबआल्यात भाईर...पाटवूं कां आंत?"
दळवी साहेब म्हणाले," पाठव त्यांना. बालम साहेब, बसा असे माझ्या समोरच्या खुर्चीवर."
तहसीलदार साहेब त्यांच्या लेखनिकासह दाखल झाले. नमस्कार चमत्कार वगैरे आटोपले,
अन्‌ बायाबापड्यांची मिटिंग सुरूं झाली…..

लेखनिक एकेका नावाचा पुकारा करूं लागला.
दळवी साहेब आंत आलेल्या प्रत्येक महिलेचं खरं-खोटं रडगाणं शांतपणे ऐकत होते.
प्रत्येकीला चारदोन चपखल प्रश्न विचारून केस च्या खरेखोटेपणाची खातरजमा करीत होते,
अन्‌ योग्यायोग्य शेरे मारून अर्ज निकालात काढीत होते.
ह्याचा निवडणुकीच्या प्रचारासाठी चांगलाच उपयोग होईल, हे उमजुन अजयभाऊंची कळी खुलली.

तेंव्हढ्यात लेखनिकानं पुकारा केला, "श्रीमति निर्मला जक्कल." !!
अजयनं कान टंवकारले…… निम्मी चं काम व्हायचा क्षण उगवला होता.!!
पण कुणाला शंका येऊं देणं जरा धोक्याचंच होतं, शिवाय निम्मी ला ही बजावलेलं होतंच.
उगीच घोटाळा नको व्हायला, म्हणून अजयभाऊ निर्विकार चेहरा करून बसले.
पाठीकडच्या दरवाज्यातनं निम्मी आंत येऊन आपल्या पाठीमागच्या बाजूला, कलेक्टर साहेबांसमोर उभी राहिल्याचं त्याला जाणवलं…..
दुसर्‍या क्षणीं जिव्हेंची सेंट चा भपकारा भस्स्‌कन्‌ त्याच्या नाकांत शिरला,
अन्‌ दळवी साहेबांचे डोळे आश्चर्यानं विस्फारलेले त्याला दिसले.!
कुणाच्या नजरेत भरणार नाही, अश्या बेतानं अजयनं सावकाश पाठीमागं वळून पाहिलं….
अन्‌ बसल्या जागी त्याला फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं !!
पाठीमागं जरीकांठी पैठणी नेसलेली, हातांत पाटल्या अन्‌ गळ्यात तन्मणि ल्यालेली निम्मी ’,
 एखाद्या करवली च्या थाटांत, दळवी साहेबांसमोर मोठ्या अदबीनं उभी होती. !!!

विसाव्या शतकातल्या स्वतंत्र भारतातली ती आदर्श निराधार परित्यक्ता बघून
दळवी साहेबांनी कपाळाला हात लावला. !!!!

आणखी शोभा व्हायच्या आंतच इथनं सटकलेलं बरं, म्हणत अजयभाऊ नी गडबडीनं, निवडणुकांचं
कारण पुढं करत, दळवी साहेबांची रजा घेतली, अन्‌ थेट बालगंधर्व मावशी चं घर गांठलं.!!
पाठोपाठ निम्मीही आली, ती चीत्कारतच, " अजय, बरी दिसत होते ना रे मी ?" !!



अजयनं मावशीला हांक मारून, निम्मी वर बरसायला सुरुवात केली,
" निम्मे गाढवे !! कवडीची तरी अक्कल आहे काय तुला ?, ऑं ?"
निम्मी नं निर्विकारपणे विचारलं, "काय झालं एव्हढं ओरडायला ? काय केलंय्‌‌ मी ?"
अजय ओरडायला लागला," काय केलंय्‌ ? एव्हढं सगळं हातातोंडाशी आलेलं मातीत घातलंस्..
बेअकल्ल कुठली! हा असला वेष करून तिथं यायला, सांगितलं कुणी तुला ?"
निम्मीही फणकारली," मी काय करू ? आई च म्हणाली की, कलेक्टरला भेंटायला जातीय्‌स,
जरा  धड कपडे करून जा म्हणून !!"
विजय: "मग?"
निम्मी म्हणाली," मग घरी जाऊन आणले कपडे अन्‌ दागिने" !
विजय: "आणि भावजीनीं दिले तुला ?"
निम्मी: "सांगताय्‌त कुणाला न देऊन ? म्हणाले,’काय हवं ते घेऊन जा,
फक्त परत इथं पाऊल टाकायचं नाही ‘ " !!
अजयभाऊ नं हतबुद्ध होत, कपाळाला हात लावला. !!!

तेंव्हढ्यात बालगंधर्व उगवले," काय झालं रे बाबा ? मिळाली ना पोटगी एकदाची ?"
विजय गरजला," आतां तूंच दे मावशी, ह्या शर्मिला ला आयुष्यभर पोंटगी. !!
नशीब माझं, ’कशी दिसतेय्‌ मी?’ म्हणून तिथं च नाही विचारलंन्‌ मला.!!"
बालगंधर्व क्षणभर स्तब्ध झाले…..
दुसर्‍या क्षणीं त्यांचा हेमगौर चेहरा लालेलाल  झाला…..!
कपाळावरची शीर ताड्‌ताड् उडायला लागली…..!!
बालगंधर्वांनी मग सांवकाश त्या शर्मिला कडं आपला मोर्चा वळवला....

आणि मुलुखमैदान तोंफेचा अर्वाच्य धूमधडाका कांनी आदळायच्या आंत
जिवाच्या आकांतानं , ’अजयभाऊ नं उलटपावली धूम ठोंकली. !!!

                                                                                                            ----- रविशंकर.


**********************************

No comments:

Post a Comment