|| तथास्तु ||
करवीर निवासिनी आदिमाया आदिशक्ति जगदंबा हें आमचं कुलदैवत तर आहेच, पण माझं वैयक्तिक उपास्य दैवतही आहे...
या ' मातोश्रीं ' ची गेली चाळीसेक वर्षं मी नित्यनेमानं श्रध्देनं उपासना करीत आलो आहे... ...
या ' मातोश्री ' नां मी उपास्य दैवत म्हणून पत्करलं, त्याला कारणीभूत आहेत या दैवताचे असामान्य गुण आणि कायदे... ...
आतां कुठल्याही दैवताची ' उपासना ' करणं म्हणजे नेमकं काय करणं अभिप्रेत असतं ?
पोथ्या वाचन करणं ?
जपमाळ ओंढणं ?
पूजा-अर्चां चा थाटमाट करणं ?
आरत्या-महाप्रसाद करणं ?
फुलं-हारतुरे-भटजी वगैरे करणं ?
उपास-तापास करणं ?
नवस बोलणं न् तें फेंडत बसणं ?
की या सगळ्यापेक्ष्या वेगळंच कांहीतरी करणं ?
मी स्वतः यातलं कुठलंही कर्मकांड करीत नाही... ...
पण नित्यनेमानं दररोज सकाळीं न् सायंकाळीं दिवेलागणी च्या वेळीं स्नान करून निरांजन उजळवून मातोश्री नां फक्त ओंवाळतो, आणि त्यांच्या समोर बसून अभंग श्रध्देनं त्यांचा गायत्री करतो, ज्याला केवळ दोन-तीन मिनिटं च पुरतात...
आणि नवरात्रांतले नऊ दिवस सकाळ-सायंकाळ शुचिर्भूत होऊन ॠग्वेदातलं शक्तिसूक्त मातोश्रीं समोर करतो... ...
हा नित्यक्रम गेली चाळीस वर्षं अखण्ड चालत राहिलेला आहे...
या असामान्य दैवताकडं मी कधीच कांहीही मागितलं नाही...मागतो, तो केवळ त्यांचा वरदहस्त, आणि कणखर सामर्थ्य. याव्यतिरिक्त दुसरं तिसरं कांहीही नाही... ...
निखळ श्रध्देनं केलेल्या या साध्या निरलस उपासनेचे डझनावारी चमत्कारी अनुभंवही मी आजतागायत घेतलेले आहेत...
अगदी चांदीच्या बंद्या रुपयासारखे खंणाखंण् वांजवून... ... ...
याचं कारण असावं या दैवताचा अपार साधेपणा.
कसल्याही अवडंबराशी, वा कर्मकांडांशी या ' मातोश्री ' नां कांहीही देणं-घेणं नसतं...
आदिशक्ति च्या रणांगणावरच्या या रूपाला देणं-घेणं असतं तें फक्त उपासकाच्या आरपार मनो-कर्मशुध्दीशी, आणि लढायला रणांगणावर उतरायला असलेल्या त्याच्या तयारीशी...
कांहीतरी आधिभौतिक फायदे पदरांत पाडून घेण्यासाठी, किंवा स्वतःच्या चिंता-समस्या निस्तरण्यासाठी त्यांच्याच डोक्यावर थांपण्यासाठी रांगा लावून नवस-बिवस बोलायला आलेल्या तथाकथित भक्तांचं मातोश्री नां कांहीही सोयर-सुतक नसतं...
त्यां चा कर्मकठोर कायदा त्या सगळ्यांना नेहमीच बजावून सांगत असतात... ...
, “ शस्त्र माग......देते.
अस्त्र माग......देते.
स्वत्व माग.....देते.
धैर्य माग........देते.
सामर्थ्य माग...देते.
पराक्रम माग....तो ही देते.
पण तुझं धर्मयुध्द तुला च लढावं लागेल... ...समजलं ? ”
हें सगळं असं आहे, म्हणूनच या दैवतावर माझी अभंग श्रध्दा जडलीय...
उपरोक्त कायदा ज्या उपासकांना स्वच्छपणे पंचलाय-रुचलाय, अश्या उपासकांच्या पाठीशी मातोश्रीं चा वरदहस्त सदैव असतो...त्यांच्या धंडपडीं - परिश्रमां चं बावन्नकशी सोनं कसं होईल, याची दक्षताही त्या सदैव घेत असतात...
अश्याच एका जगावेगळ्या अनुभंवाचा हा किस्सा... ...
,“ अहो...जरा इकडं या बघूं लगेच...”
गेल्या वर्षीच्या - म्हणजेच २०२४ सालातल्या सप्टेंबर महिन्यातली ती एक धांदलीची सकाळ होती...सकाळचा चहा झाल्या झाल्या सौ. इंदिराजी नी मानगुटीवर बसवलेल्या दुरुस्ती चं काम हातावेगळं करायला मी बसलो होतो... ...
आमचा अभियांत्रिकी चा व्यवसाय सांभाळणा-या पुढच्या चमूतल्या माझी खुर्ची व्यापणा-या गौरी रानडे नं मला आदल्या दिवशी दूरध्वनि करून एका प्रकल्पातल्या कामासंबंधी दूरस्थ बैठक सकाळीं अकरा वाजतां ठंरवलेली होती...त्यामुळं सौ. इंदिराजीं चं काम हातावेगळं करायची माझी धांदल उडालेली होती... ...
सौ. इंदिराजी नी घरातल्या दिवाणखान्यातनं मला आवाज दिला, आणि मी त्यांच्या भ्रमणध्वनीच्या विद्युद्भंरणकाच्या दुरुस्ती चं हातातलं काम बाजूला ठेंवून उठलो, न् दिवाणखान्यात आलो...
हातातला लिफाफा माझ्याकडं देत सौ. इंदिराजी म्हणाल्या,“ हे बघा तुमच्या नांवानं कसलं पंजीकृत पत्र आलंय तें...”
माझ्या हातात तो लिफाफा देऊन सौ. इंदिराजी सकाळची धुणी वाळत घालायच्या कामाला चालत्या झाल्या....
मी लिफाफ्यावरचं नांव-पत्ता पाहिला...माझ्याच नांवानं आलेलं पत्र होतं तें. मग लिफाफा मी उलटा करून बघितला, तर ' पोस्ट मास्तर – डेक्कन जिमखाना टपाल कार्यालय – पुणे ' असा प्रेषकाचा पत्ता त्यावर दिसला...
,“ अहो...हे पत्र डेक्कन जिमखाना टपाल कार्यालयाकडून आलेलं दिसतंय... ...कांहीतरी घोटाळा दिसतोय हा...” मी वाळवण घालायचं काम उरकून परत आलेल्या सौ. इंदिराजी नां म्हटलं...
सौ. इंदिराजी ,“ अहो आधी लिफाफा फोंडून त्यात कसलं काय पत्रबित्र आहे, तें बघाल तरी ?” म्हणत सौ. इंदिराजी स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या...
मी ' कसलं काय सरकारी खरकटं लचाण्ड उपटलंय, मातोश्री च जाणे ' म्हणून करवादत तो लिफाफा फोंडून आतला कागद कांढून बघितला...
टपाल खात्यातनं आलेलं तें चार ओळींचं पत्र असं होतं...
************************************************************
दि. १० सप्टेंबर २०२४
महाशय,
आम्ही आपणास कळवूं इच्छितो, की दि.१ ऑक्टोबर १९९० रोजीं सुरूं केलेली ' राष्ट्रीय बचत योजना ' येत्या १ ऑक्टोबर पासून केंद्र शासनानं बंद केलेली आहे...
तरी सदर तारखेपासून पुढे या योजनेतल्या कोणत्याही खात्यातल्या शिलकीवर कसलेही व्याज मिळणार नाही, याची नोंद घेऊन कृपया जरूर ती कार्यवाही पूर्ण करावी.
-- सहाय्यक पोस्ट मास्तर
भारतीय डाक-तार विभाग
डेक्कन जिमखाना टपाल कार्यालय
पुणे - ४११ ००४.
तो सरकारी खलिता वांचून कसला कांही बोध होण्याऐवजी, मी उलट पुरता बुचकळ्यात पडलो, न् सौ. इंदिराजी नां हांक मारली,“ अहो... ...अहो जरा इकडं या बघूं ताडतोब...हें बघा कसलं सरकारी लचाण्ड उपटलंय तें... ...
, “ काय झालंय काय तुम्हांला असं वंतवंतायला ?... आणि कश्याला हांका मारत सुटलाय असे ?” सौ. इंदिराजी कमरेच्या फंडक्याला ओंले हात पुसत उपस्थित झाल्या...
मी त्यांच्या हातावर तें सरकारी पत्र ठेंवत करवादलो, “ मी म्हटलं नव्हतं तुम्हांला ? ...आधीच आपले व्याप आपल्याला झालेत कमी...त्यात आतां ह्याची भंर...”
, “ काय झालंय असं इतकं वैतागायला ? ” सौ. इंदिराजी...
मी,“ हें पत्र वाचा आधी नीट...कुठली नव्वद सालातली ' राष्ट्रीय बचत योजना ' ही...तिच्याशी संबंध काय आपला ?...वर आणखी हें पत्र आलंय डेक्कन जिमखाना टपाल कार्यालयातनं... ...तिथं तरी कधीकाळीं आपला कांही संबंध आलाय काय ?... ...लेकाच्यांनी ' हाण शिक्का की कर रवाना ' असला कांहीतरी उद्योग करून ठेंवलेला दिसतोय हा... ...”
तुम्हांला तरी गेल्या दहा पंधरा वर्षांत डे. जि. टपाल कार्यालयाकडं आपण फिरकल्याचं आंठवतंय काय...ऑं?... ...केराची टोपली दांखवा ह्या सरकारी खलित्याला सरळ... ”
भंडकलेल्या नव-याला वेंसण घालायच्या कलेत आमच्या सौ. इंदिराजी महा तरबेज...
, “ आधी नाष्टा उरकून घेऊं चला... ...गार होतोय तो... ...नाष्टा करतां करतांच बघूं या हें काय आलंय तें...आलेच मी चष्मा घेऊन. ”
भोजनमेजावर मांडून ठेंवलेल्या बेंगलोरी मसाला डोश्याचा आस्वाद मी घ्यायला सुरुवात करीतोंवर सौ. इंदिराजी त्यांचा वाचायचा चष्मा घेंऊन मेजावर येऊन बसल्या... ...
तो डोळ्यांवर चंढवून डोसा खातां खातां त्यांनी तो खलिता नीट वाचला...
आणि चहा घेतां घेतां विचारत्या झाल्या, “ तुम्हांला कांही आंठंवतंय कां...आपण टपाल कार्यालयात – विशेषतः डे. जि. टपाल कार्यालयात – असलं कांही खातं उघडल्याचं ? “
मी, “ छे... ...असं कांही खातं उघडायचंच असतं, तर आपल्या जवळच्या कोथरूड टपाल कार्यालयात नसतो कां गेलो आपण ?... डे. जि. टपाल कार्यालयात कश्याला जातोय आपण अडमडायला ?...”
सौ. इंदिराजी, “ अहो आपण याआधी टपाल कार्यालयात कांही गुंतवणूक केलीच नाही, असं नाही कांही...इंदिरा विकास पत्रं होती...मुदतबंद ठेंवीही होत्या की आपल्या... ...”
मी, “ खरंय तुम्ही म्हणताय तें...पण तें सगळं आपल्या सेवानिवृत्तीपर्यंत – म्हणजे २०११ सालापर्यंतच होतं... ...
तोपावेतों त्या सगळ्या गुंतवणुकांतला पैसा मोकळा झाला...आणि त्यानंतर सरकारी योजनात मी तरी कुठंही गुंतवणूक केल्याचं मला स्मरत नाही... ...तुम्हांला कांही आंठवतंय कां तुम्ही डे. जि. टपाल कार्यालयात कसलं कांही खातं उघडल्याचं ? ”
सौ. इंदिराजीं च्या कपाळाला आंठ्या पडल्या... ..., “ छे बुवा... ...असं कांही केल्याचं आंठवत नाहीय मला...”
मी मग चहाचा रिकामा कप मेजावर ठेंवत उठायला लागलो, “ मग द्या फेंकून हा चिटोरा कच-यात...सरकारी कार्यालयांत डोईजड जावई झालेत उदंड... ...लोकांची कामं करायची सोडून हे...हे असले दळभद्री उपद्रवी उद्योग करून ठेंवण्यात महा हुषार असतात तें... ... ”
सौ. इंदिराजी नी मला बखोट धंरून परत खुर्चीत बसवलं, “ हे बघा...हे पत्रं जर दुस-या कुठल्या सरकारी कार्यालयातनं आलं असतं ना, तर कदाचित तुमचं म्हणणं पटलं असतं मला... ...पण टपाल खात्याचं तसं नाही... ...आजही आपल्या टपाल खात्याचा कारभार इंग्रज लोकांनीं घालून दिलेल्या शिस्तीनुसारच चालतो...तिथनं हें पत्र आलंय, याचा अर्थ त्यामागं कांहीतरी कारण नक्कीच असलं पाहिजे... ...आपण असं करूं... ”
पुढं काय वाढून ठेंवलेलं असणार, याचा वास लागून मी तंडकलो, “ आतां काय करायला सांगणार तुम्ही, तें मला कळलंय... ... तो कागद कच-यात फेंकून द्या एकदाचा, अन् व्हा मोकळ्या...!! काय ? ”
सौ. इंदिराजी कुठल्याही गोष्टीची तड लावण्यात तश्या महा चिवट ,“ हे बघा... ...मी सांगतीय ना तंसंच असणार असा आतला आवाज मला सांगतोय...पैश्याचा प्रश्न आहे हा... ...खंरोखरीच कधींकाळीं कष्टाच्या पैश्यातनं टपाल खात्यात केलेली बचत कालौघात विसरली जाणं अगदी सहज शक्य आहे... ...चला, ताबडतोब या प्रकरणाचा निकाल च लावून टाकूंया काय तो... ...”, म्हणत सौ. इंदिराजी खुर्चीतनं उठायला लागल्या पण...!!
मी त्यांना हातानं च खुर्चीत बसायची खूण केली, “ काय झालंय काय तुम्हांला ?...गेल्या तीस-पस्तीस वर्षांचे दस्तावेज सगळीं कामंधामं बाजूला सारून धुंडाळत बसायचं... म्हणजे खायची गोष्ट वाटतेय की काय तुम्हांला... ...ऑं? ... ...आणि कोण करत बसणार हा जगड्व्याळ उपद्व्याप ? ”
सौ. इंदिराजी नी आतां खुर्चीतनं उठत माझ्या तंगड्या माझ्या च गळ्यात अलगद घातल्या...
, “ तुम्ही च घरातल्या सगळ्यांना मातोश्रीं चा कायदा बारा महिने बजावून सांगत असतां ना, ‘ तुझं धर्मयुध्द तुला च लढावं लागेल ' म्हणून ?... म S S S S S S ग ?... ...चला...कंबर कसा आतां या ' धर्मयुध्दा ' साठी पण... ...तुम्ही शयनकक्षातलीं कपाटं धुंडाळून बघा... ...मी बाकीच्या खोल्यातलीं बघतें... ...”
झा S S S S S लं... ...दस्तुरखुद्द सौ. इंदिराजीनी च अशी कंबर कसल्यावर मग कांही ' सुटकेचा इलाज-उपाय शिल्लक राहिलाच नाही आणि दुपारची जेवणीखाणी झाल्यावर आम्ही घरातल्या तमाम कपाटां-फडताळां वर यल्गार पुकारला... ... ...
कपाटं पालथीं घालतांना काय काय त्यांत सापडायला लागलं, तें बघून मी च कपाळावर हात मारून घेतला... ...!!
आयकराची विवरण पत्रं...छायाचित्रांचे अल्बम्स... निरनिराळ्या गृहोपयोगी वस्तूं च्या खरेदी अन् वापरपुस्तिका....वर्तमानपत्रांतनं कांपून जंपून ठेंवलेलीं कात्रणं....पत्र व्यवहार....काय न् काय... ...अगदी चौ-याहत्तर सालीं झालेल्या आमच्या विवाहाची निमंत्रणपत्रिका सुध्दां त्या गदाड्यात सापडली...!!!
पण डे. जि. टपाल कार्यालयातलं कांही हाताला लागायचं नांव नाही.........
कंटाळून मग मी सौ. इंदिराजी ना म्हटलं, “ अहो, काय साधणाराय ही सगळी उस्तवारी करून ?... ...आणि खंरोखंरीच कांही सापडलं जरी, तरी आतां एव्हढ्या तीस-पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्या खंरकट्या टपाल कार्यालयात तरी कसलं काय सापडणाराय त्याबद्दल ?... मरूं द्या हा सगळा खटाटोप. ”
सौ.
इंदिराजी
नी समोर पसारलेल्या कागदपत्रांच्या
ढिगातनं मान वर करून माझ्याकडं
बघितलं,
“ मी
शोंधतीय ना न कुरकुरतां ?...
...मग
तुम्हांला काय धाड भंरलीय...ऑं?
”
मी
कपाळाला हात लावत पुनश्च
शोंधकार्य आरंभलं...
...!!
तो दिवस तसा वायाच गेला. दुस-या दिवशीं परत ' मागील पानावरून पुढें चालूं ‘...!!
होतां होतां आमच्या शयनकक्षातल्या पोलादी कपाटाच्या तिजोरीतले कागद धुंडाळतांना त्यात एक गुलाबी रंगाचं छोट्या स्मरणवहीसारखं एक पुस्तक पालथं पडलेलं सापडलं... ... तें उताणं करून बघितलं , आणि मला ४४० व्होल्ट्स चा धंक्का च बसला...
१९९० सालीं डे. जि. टपाल कार्यालयात माझ्या च नांवानं उघडलेल्या राष्ट्रीय बचत योजनेतलं तें खातेपुस्तक होतं... ...!!!
तें उघडून बघितलं, तर १९९० सालीं केवळ कांही शे रुपये भंरून उघडलेल्या त्या खात्यात त्यापुढं दोन तीन वर्षं नगण्य रकमा भंरलेल्या-कांढलेल्या च्या फुटकळ नोंदी दिसत होत्या... ...बस्स तेंव्हढंच... त्यानंतर स्वतः बांधलेल्या घरात वास्तव्य करायला जातेवेळीं घरसामान हंलवतांना तें खातेपुस्तक मी बहुधा तिजोरीत ठेंवलेलं असावं, आणि त्यापुढं आपलं असं कांही खातं आहे, हें च मी सफाचट् विसरून गेलेला दिसत होतो...!!
धन्य धन्य या टपाल खात्याची...!!!
तें सगळं बघून मी कपाळाला हात लावत किंचाळलोच, “ इंदिराजी... ...अहो इकडं या ताबडतोब...”
सौ. इंदिराजी डुलत डुलत हंजर झाल्या, “ कश्याला हांका मारत सुटलाय एव्हढे आग लागल्यासारखे ?...काय झालं ?”
मी तोंडातनं चकार शब्द न कांढतां तें खातेपुस्तक त्यांच्या हातात दिलं...
सौ. इंदिराजी नी तें उलटं-सुलटं करून पाहिलं... ...
मग तें उघडून त्यातल्या नोंदी वांचल्या... ... ...
असं आपलं म्हणणं खरं ठंरलं, की लगेच, “ बघा... ...मी सांगत नव्हते तुम्हांला ?” असली शेरेबाजी सौ. इंदिराजी कधीही करीत नाहीत...त्यांचं सारं अवधान प्रसंगाची सफाचट् विल्हेवाट लावण्यावर केंद्रित झालेलं असतं...
, “ चला...आतां जेवणं आटोपलीं, की जाऊं या... ...”
मी, “ कुठं जाऊं या म्हणताय आतां तुम्ही ?”
सौ. इंदिराजी, “ कुठं म्हणजे काय ?... ...डे. जि. टपाल कार्यालयात... ...”
मी, “ जाऊं चार दोन दिवसांत...काय घाई आहे एव्हढी ?...खातेपुस्तक तर सापडलंय ना आतां ?”
सौ. इंदिराजी मला असा थोडाच सैल सोडणार ?... ..., “ असल्या कामांना मुहूर्त शोंधत बसायचं नसतं....समजलं ?”
मी काय तें यथासांग समजून चुकलो...!!
दुपारीं जेवणं झाल्या झाल्या सौ. इंदिराजी नी फंतवा काढला, “ चलो...”
आम्ही गाडी कांढून डेक्कन जिमखाना टपाल कार्यालयाच्या दिशेत पिटाळली.
त्या दिवशीं आमचं नशीब चांगलंच सिकंदर असावं. एरव्ही मुंगी शिरायला टीचभंर जागा नसलेल्या त्या भागात टपाल कार्यालयाच्या शेंजारच्याच गल्लीत गाडी लावायला अगदी सोयिस्कर अशी छान जागा मिळाली, आणि आम्ही एकदाचे त्या टपाल कार्यालयात दाखल झालो...
एव्हांना दुपारचे सव्वा तीन वाजलेले होते... ...
आंत गेलो, तर ' पी. एफ. - पी. पी. एफ. ' च्या खिडकीसमोर पंधरावीस लोकांची रांग लागलेली दिसली...वाटलं, गेला एक तासभंर आतां रांगेत तांटकळत उभे राहण्यात...
जरा इकडं-तिकडं बघितलं, तर दोन बंद खिडक्या सोडून पलीकडच्या तिस-या खिडकीवर ' डाक घर बचत / केंद्रीय बचत खातीं ' अशी पाटी दिसली, आणि जीव भांड्यात पडला...पण खिडकी तर बंद झालेली दिसत होती... ...' झा S S S S S लं...आतां घाला हेलपाटा परत उद्यां ' म्हणून चंडफंडत मी जरा टांचा उंचावून बघितलं, तर आंत कुणीतरी गृहस्थ संगणकावर कांही नोंदी करत बसलेले दिसले...
मी सौ. इंदिराजीं कडं भिवया उंचावून पाहिलं... ...
त्यांनी मानेला झंटका देत... ‘ हूं...व्हा पुढं ' चा इशारा केला... ... ...
मी खांकरलो, “...नमस्कार सर...जरासं काम होतं...मी नानिवडेकर ...”
समोर बसलेल्या गृहस्थांनी मान वर करून पाहिलं, न् हंसले, “ नमस्कार...मी अब्दुल खान...काय काम होतं आपलं ? “
सदैव टपाल खात्याच्या कार्यांलयांतले निर्विकार ओंढग्रस्त चेहरे च बघायची संवय असलेला मी तें ' सुहास्यवदन स्वागत ' बघून जरासा चंपापलोच. मग हातातला त्यांच्या च कार्यालयानं धाडलेला तो खलिता त्यांना दांखवला...हें काम होतं...जरा तांतडीचं"
जनाब खानांनी तो खलिता मागून घेऊन वांचून बघितला, न् म्हणाले..., “ खातेपुस्तक आणलंय काय सर तुम्ही ? "
मी मग खिश्यातलं खातेपुस्तक बाहेर कांढून त्याना दांखवलं... ...
आणि तें बघितल्यावर जनाब खानानी च स्वतःच्या कपाळाला हात लावला...!!
," पस्तीस वर्षांचं जुनं खातेपुस्तक सापडलं तुम्हांला सर ?... ...धन्य आहे तुमची...”
मी, “ तें सहजासहजीं नाही कांही सापडलेलं...गेले दोन दिवस आमच्या सौ. इंदिराजी नी त्या कामाला जुंपलेला होता मला... ...मला सांगा...आख्ख्या हिंदुस्तानात आजतागायात इंदिराजींपुढं कुणाचं तरी, कधी तरी, कांही तरी चाललंय काय...ऑं?”
जनाब खान आतां मात्र मला फाड् दिशी टाळी देत कपाळाला हात लावून खो खो हंसायला लागले, “ अगदी खरंय सर तुमचं...!!...त्याचं काय आहे, की ही खिडकी खरं तर दुपारीं तीन वाजतांच बंद होते... ...पण ब-याच लांबून आलेले दिसताय तुम्ही, तर एक पांच दहा मिनिटं च थांबतां काय सर ? खातेपुस्तकांतल्या नोंदी करायचंच काम चाललंय हें माझं ...तें उरकतो आणि काय हंवी ती सगळी मदत करतो तुम्हांला... ...बसा तिथं खुर्च्यांवर निवांत... ...माझं आंवरलं की देतो हांक तुम्हांला.....”
टपाल कार्यालयातली ती सोज्वळ वागणूक बघून आतां सौ. इंदिराजी पण चाट पडल्या...न् चंटकन् म्हणाल्या, “ कांही हंरकत नाही...थांबतो आम्ही...खात्यांतल्या नोंदींचं हें जोखमीचं काम चाललेलं दिसतंय तुमचं...त्यात आम्ही हे असे समोर उभे ठांकून तुमचा ताण नको निष्कारण वाढवायला...”
खान आतां आकर्ण हंसले..., “ कसं बोललात बाई...बरं वाटलं ऐकून... ...अहो इथं रोज च वैतागलेले चेहरे बघण्यात दिवस जातो आमचा...म्हणून विचारतो...कुठं काम करतां आपण ?”
सौ. इंदिराजी हंसल्या, “ मी ना...आयुर्विमा महामंडळात नोकरीला आहे...”
जनाब खान आतां परत हंसले, “ तरीच...तुम्हांला आमची अडचण बरोबर कळली... ... तुमच्या तिथं ही सगळं असं च असतं की...' रोजच कुरुक्षेत्र ‘...होय ना ?...ठाऊक आहे मला तें...बसा निवांत फक्त पांच मिनिटं च...”
आम्ही दालनातल्या खुर्च्यांवर विसांवलो, न् मी सौ. इंदिराजी ना म्हटलं, “ आज मातोश्री नी ' तथास्तु ' म्हटलेलं दिसतंय खरं... ...”
सौ. इंदिराजी असली सुवर्णसंधी कशी सोडतील ?
, “...तसं दिसतंय खरं, पण या ' तथास्तु ' च्या प्राप्तिसाठी करावं लागणारं ' धर्मयुध्द ' लढायला कुरकुर कुणाची चाललेली होती ?...ऑं?...मैदानात उतरायचीही मारामार तुमची... ...काय ?”
आतां भंर टपाल कार्यालयात ' द्रौपदी वस्त्रहरण सोहळा ' नको, म्हणून मी धोरणीपणा दांखवत तोंड मिटून गप्प बसलो... ...
बरोबर पांचएक मिनिटांनी ' नानिवडेकर सर...या ' अशी जनाब खानांनी हांक मारली, न् मी त्यांनी उघडलेल्या खिडकीपाशी हंजर झालो....
आतांपावेतों दालनातल्या सगळ्याच खिडक्या बंद होऊन तें निर्मनुष्य झालेलं होतं... ...
खान, “ हं...आणा सर तुमचं खातेपुस्तक इकडं...”
मी खातेपुस्तक त्यांच्या हातात दिलं.
पुढं दहा-पंधरा मिनिटं खान समोरच्या संगणकात बघून त्यात कांही नोंदी करीत होते...
त्यांनी काम संपवून मला हंसत विचारलं, “ सर...आपलं असं कांही खातं आहे, हें च तुम्ही विसरून गेला होतां... ...होय ना ?”
मी, “ अगदी बरोबर ओंळखलंत तुम्ही...अहो तब्बल दोन दिवस घाम कांढला या पुस्तकानं माझा, तेव्हां कुठं तें सापडलं बघा...”
खान, “ म्हणूनच म्हटलं ' धन्य आहे तुमची... ...अहो या नोटिसा रवाना झाल्यापासून इथं चंवकश्या करायला नुस्ती गर्दी च गर्दी उसळलीय...पण ' खातेपुस्तक च सांपडत नाही...आतां काय करायचं ? ' म्हणून नुस्त्याच चंवकश्या...आतां खातेपुस्तक च नसेल, तर खात्यातले पैसे आम्हांला त्यांना कसे काय देतां येतील ?...तुम्हीच सांगा...
हें असं खातेपुस्तक बरोबर घेऊन येणारे तुम्ही च पहिले भेंटलात...म्हणून म्हटलं धन्य आहांत...काय ?...”
इतकं बोलून खातेपुस्तक मला परत देत खान म्हणाले, “ हें तुमचं खातेपुस्तक सर...त्यात नव्वद सालापासून राहिलेल्या पुढच्या पस्तीस वर्षांच्या सगळ्या नोंदीं मी केलेल्या आहेत...!! ”
मी कपाळाला हात लावत जनाब खानांचे आभार मानले, “ धन्यवाद खान सर...अगदी मनापासून...”
खान हंसले, “ अहो धन्यवाद कसले काय त्यात सर ?...तें कामच आहे आमचं...आतां असं करा...”
जनाब खानानी मग खातं बंद करायचे सगळे कागदपत्र मला दिले...
त्यांत कुठं काय माहिती भंरायची...दोन साक्षीदारांचे सह्याशिक्के कुठं घ्यायचे, सोबत कुठले दाखले जोडायचे, इ. सगळं नीट समजावून सांगितलं, न् म्हणाले, “ हें एव्हढं पुरं करून सगळं इथं माझ्याकडं आणून द्या सर...आणि इलेक्ट्रॉनिक फण्ड ट्रान्सफर चा पर्याय जर निवडलात, तर तुमच्या बॅंक खात्याचा रद्द केलेला धनादेश ही सोबत जोडा...
...खातं बंद करायला हें सगळं आम्हांला मुख्य डाक कार्यालयाकडं पांठवावं लागतं पण हें एव्हढंच केलंत, तर तुमचं खातं बंद होऊन सुमारे तीनएक आंठवड्यांत खात्यातली सगळी शिल्लक तुमच्या बॅंकेत परस्पर च जमा होईल...तुम्हांला हेलपाटा मारायलाही इथं परत यावं लागणार नाही...”
मी, “ धन्यवाद खान सर ... ठीकाय...दोन चार दिवसांत हें सगळं करतो हंजर , पण आजच्या घडीला खात्यात जमा शिल्लक किती आहे तें सांगतां ?...म्हणजे... ...”
खान माझं बोलणं मध्येच तोंडत म्हणाले, “ तें मला असं भंर चंव्हाट्यावर नाही सांगतां येणार...खातेपुस्तक मी अद्ययावत करून दिलंय...तें घरीं जाऊन बघा...फक्त शिलकीचा आकडा आजच्या घडीला कुठल्याकुठं पोंचलाय इतकंच मला सांगतां येईल...”
मी, “ तरी... कांही अंदाजाखातर ?”
खान हंसून म्हणाले, “ तुमच्या सौ. इंदिराजीं ना धन्यवाद द्या साहेब... ...खात्यातली मूळ जमा आजपावेतों चक्रवाढ व्याजानं सुमारे अठ्ठावीस पट फुगलीय...!!!”
तें ऐकून मी भंर टपाल कार्यालयात कपाळावर हात मारून घेंतला... ...!!!
पुढचं सगळं जनाब खानानीं सांगितल्याप्रमाणंच पार पडलं...
दोन दिवसांनी सगळीं कागदपत्रं पूर्ण करून मी जनाब खानांच्या हंवालीं केलीं...
आणि त्यानंतर मला परत एकदाही तिथं हेलपाटत चक्कर मारावी लागली नाही... ...
कागदपत्रं दाखल केल्यापासून बरोबर तेविसाव्या दिवशीं माझ्या बॅंक खात्यात सदर पूर्ण शिलकी चा एकरकमीं भंरणा वांजवून झाल्याचा बॅंके चा मला भ्रमणध्वनीवर संदेशही पावला...!!
त्या दिवशीं घरीं च सौ. इंदिराजी नीं गोडधोड स्वयंपाकाची जंगी मेजवानी घालून तो साजराही केला... ...
, “ मातोश्रीं चा कायदा किती सर्वव्यापी असतो नाही ?” मेजवानी झाल्यावर मी सौ. इंदिराजी ना सहज म्हटलं...
सौ. इंदिराजी नी तेव्हढी संधी अचूक साधली..., “ हो...असतो की...तुम्हीच तर सगळ्यांना तिन्हींत्रिकाळीं त्याचं प्रवचन झोंडत असतां ना घरात ?”
मी, “ मातोश्रीं चा कायदा वांजवून अनुभंवल्याशिवाय कां सगळ्यांच्या गळीं उतरवत असतो मी ?...काय ?... ...आतां असं बघा, की पस्तीस वर्षांनी टपाल खात्याचं हें पत्र आपल्याला मिळणं...आपण सगळी शोधाशोध केल्यावर आपल्याला सदर खातेपुस्तक सापडणं...तिथं टपाल कार्यालयात खानांच्या सारखा नेक माणूस आपल्याला गांठ पडणं...आणि हें सरकारी काम असं झंटक्यात पार पडणं...हें सगळे सुदैवाचे योगायोग वाटतात तुम्हांला ?... ...
समजा, की या घराच्या पुनर्विकसन काळांतच जर तें पत्र या पत्त्यावर आलं असतं, तर काय झालं असतं ? "
, “ तसं झालं असतं, तर त्याची गंधवार्ताही लागली नसती आपल्याला...”, सौ. इंदिराजी बोलल्या.
मी, " बरोबर ना...?...तात्त्पर्य, हें जे सगळं विना हालअपेष्टा साध्य झालं ना...तें तसं व्हायला मातोश्रीं चा वरदहस्त कायम पाठीशी असावा लागतो... ... म्हणूनच मी त्यांचे कायदे घरात सगळ्यांना बजावून सांगत असतो... कळलं ?”
सौ. इंदिराजी, “ हो...ठाऊकाय मला तें सगळं...पण मातोश्रीं चे कायदे स्वतः पाळायच्या बाबतीत काय ?... शोधाशोधी च्या रणांगणावर उतरायच्या नांवानं तुमच्या बाबतीत आनंद च होता की सगळा...काय ? ”
मी मग बगल देत हंळूच गळ टांकला, “ तसं नाही कांही ...केवळ ' टपाल कार्यालयात असेल कांहीतरी ' या शंकेपायीं व्यर्थ रक्त आंटवणं मान्य नव्हतं मला...फक्त एकच ठाऊक नव्हतं ...”
सौ. इंदिराजी नी गळ अचूक गिळला, “ काय ठाऊक नव्हतं तुम्हांला ?”
मी सौ. इंदिराजीं च्या ' मुल्क-ई-मैदान ' च्या मारगिरीच्या पल्ल्याबाहेर सटकत त्यांच्याकडं च निर्देश करीत म्हटलं, “ मातोश्रीं चा कायदा मला समजलाय खरा...पण त्याची अंमलबजावणी करायला त्या स्वतः च भूतलावर ह्या अश्या अवतरतातही, हें मात्र ठाऊक नव्हतं मला... ...!!!”
सौ. इंदिराजी आतां कपाळाला हात लावत डोळे बशीएव्हढे मोठे करून माझ्याकडं बघायला लागल्या... ...!!
आणि ' जगदंब जगदंब ' चा गजर करत मी कपाळाला हात लावून त्यांच्या पुढ्यातनं धूम ठोंकली... ... ...!!!
-- रविशंकर.
१४ मार्च २०२५.
No comments:
Post a Comment