Search This Blog

Tuesday, 20 August 2024

नॉलेज इज पॉवर – भाग १ - || बंदिवास ||

                                 || बंदिवास ||


," आतां तूं पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला - म्हणजे परगांवी - रहायला चाललेला आहेस...तेव्हां आतां मी ज्या सांगतोय, त्या ती-चार कळीच्या गोष्टी कायम लक्ष्यांत ठेंव रवि...” माझे आद्य गुरू टिकेकर मास्तर माझ्या पांठीवर कौतुकानं थोंपटत म्हणाले... ...

१९६९ सालातल्या त्या मे महिन्यातली ती मास्तरांबरोबर झालेली गांठभेंट पुढं आयुष्यभंर मला पुरणार होती... ...प्री डिग्री ( शास्त्र ) चं वर्ष विशेष प्राविण्य श्रेणीत गुण मिळवून पूर्ण केल्यावर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला प्रस्थान ठेंवण्याआधी मी प्रथम पेढे घेऊन माझ्या मास्तरांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या घरीं गेलेलो होतो...

मास्तरानी मोठ्या मायेनं मला शेंजारी जवळ बसवून घेऊन माझं गुणपत्रक अभिमानानं न्याहाळलं , आणि माई नां हांक मारली, ” अहो...बाहेर या जरा... ...बघा तर...आपले अॅरिस्टॉटल् प्री डिग्री चं मैदान गाजवून आले आहेत पेढे द्यायला...”

माई स्वयंपाकघरातनं माझा आवडता हळीवाचा लाडू वाटीत घेऊन बाहेर आल्या...मला चौ-याहत्तर टक्के गुण मिळाल्याचं त्यांना मास्तरांनी सांगितल्यावर माईं चा चेहरा कसा सूर्यफुलागत उमलून आला..., " व्वा... ...छान...आतां पुढं काय ? ”

मी, “ पुण्याला निघालोय माई आतां... ...अभियांत्रिकी शिकायला... ...”

माई नी आई च्या मायेनं सल्ला दिला,” स्वतःला सांभाळून रहा रे बाबा... ...इतक्या लांबच्या परक्या गांवी निघालायस म्हणून सांगते आपलं... ... अठरा पगड माणसं असतात दुनियेत...सगळीच चांगली असतात असं नसतं... ...”

मास्तर तों च धागा नेमका पकडून म्हणाले,” ... मघांशी काय सांगत होतो मी तुला ?... ...हां...तर आपल्या गावात कसं असतं ?... ...बहुतेक सगळेच लोक एकमेकांना ओंळखत असतात...बरोबर ?”

मास्तर आतां कांहीतरी अमूल्य असं झोंळीत घालायच्या बेतात आहेत, हे जाणवून मी कान टंवकारले,” अगदी बरोबर मास्तर... ...त्यामुळं कोण कसा आहे हे आपल्याला ब-यापैकी माहीत असतं...”

" कसं लाख बोललास... ...”, मास्तर पण आतां जरा सरसावून सांगायला लागले,” पण परक्या गावातले थेट नात्यातलेच लोक जर वगळले, तर बाकी सगळेच अनोळखी... ...आणि सगळेच लोक कांही भले नसतात... ...त्यामुळं अपरिचित लोकांबरोबर बोलतां वागतांना जरा जपून रहावं लागतं, ही पहिली गोष्ट ध्यानांत घे... ...”

मी नेहमीसारखाच वकिली त मास्तरांना भिडलो,” पण मास्तर... ...”

मास्तर हंसले,” हं... ...बोला बोला...अॅरिस्टॉटल्... ...काय मनात येईल तें बोला...”

मी मग पंगा घेतला,” मास्तर...अपरिचितातले सगळे च लोग चांगले असतात, असं म्हणतां येणार नाही...हें बरोबर... ...पण व्यत्यासानं ' सगळेच अपरिचित वाईट असतात ', असंही म्हणतां येणार नाही की... ...म ऽ ऽ ऽ ऽ ग ? ”

मास्तर आतां प्रसन्न हंसले, न् माई नां म्हणाले,” बघितलंत... ...हे महाराज वकिली डावपेंचात तरबेज झालेले आहेत, म्हणून माझं - यांचं अगदी छान जमतं... ...काय ?”

,” तुमचे च लाडके शिष्य... ...हें तरी दुसरं काय करणार ? !! ” माई मास्तरांचीच विकेट उडवत स्वयंपाकघराकडं गेल्या...

मास्तर आतां दिलखुलास हंसले,” मला दुसरी महत्त्वाची जी गोष्ट तुला सांगायची होती ना, तीवर अचूक बोंट ठेंवलंस बघ तूं... ...छान...उत्तम... ...विद्यार्थी असाच स्वतंत्रपणे विचार करणारा व्हायला हंवा....तर ' या अपरिचितांतले भंले कोण न् टगे कोण, हें कसं ओंळखायच ? ’ असं च विचारायचं होतं ना तुला ? ”

मी नुस्ता हंसलो... ...

मास्तर,” मला प्रश्न विचारून भंडावून सोडणारे विद्यार्थी फार आवडतात...तर हें ओंळखायची युक्ति अगदी साधी आहे, पण भंल्याभंल्यांना ती ठाऊकच नसते ...”

मी,” म्हणजे काय मास्तर ? ”

मास्तर,” सांगतो... ...समोरचा माणूस काय बोलतोय-सांगतोय, यापेक्ष्या तो इतरांशी कसा वागतोय, आणि काय करतोय, इकडं बारकाईनं लक्ष्य दिलं की मग कोण भंला न् कोण टग्या तें एका झंटक्यात समजतं... ...कळलं ? ”

मी,” नीटसं कळलं नाही मास्तर... ...”

मास्तर,” दुस-या भाषेत सांगायचं, तर माणसांच्या बोलण्यापेक्ष्या, त्यांच्या कृतीवरून त्यांचा भंलेबुरेपणा अचूक पारखतां येतो... ...कारण तोंडच्या गप्पा मारणं फार फार सोपं असतं...त्यासाठी माणसाला ना कसली तोशीस पडत असते, ना कसली झळ बसत असते...होय की नाही ?... ... पण बोललेलं करून दांखवायला मात्र अमाप तोशीस तर पडत असतेंच, पण प्रसंगीं दुस-यासाठी झंळ सोसायची पण तयारी ठेंवावी लागते...आणि या दोन्ही गोष्टी दुस-यासाठी पत्करायची टग्या माणसांची ना तयारी असते, ना त्यांच्या अंगीं ती धंमक असते... ...तें फक्त वाचाळवीर...म्हणून समोरचा माणूस सांगतोय काय, यापेक्ष्या तो करतोय काय, हें माणसाची प्रत जोंखण्यासाठी निर्णायक महत्त्वाचं असतं...... ...आतां आलं लक्ष्यांत सगळं ?”

मास्तरांचं तें विवेचन ऐकून मी गार झालो,” होय मास्तर...आतां आलं सगळं बरोबर ध्यानांत...”

मास्तर," आतां तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, तीही नीट ध्यानांत ठेंव...”

मी,” ती काय मास्तर...?”

मास्तर परत हंसले,”...काका - म्हणजे तुझे वडील – त्यांच्याबद्दल ब-याच तक्रारी करत असतोस तूं माझ्याजवळ... ... होय ना ? ”

मला कांही कळे ना,” होय...कां नाही करणार मास्तर ? ...काय वाट्टेल तसली कामं करायला लावतात आम्हांला काका... ...गेल्या आंठवड्यात तर तिस-या मजल्याच्या छपराच्या पत्र्यावर चंढवलं त्यांनी मला....”

मास्तर,”....हूं ?... ...तें कश्यासाठी ?”

मी,” छपरातनं पावसाचं पाणी कुठं कुठं गळत होतं म्हणून... ...पत्र्याला जे लोखंडी आंकडे लावलेले असतात ना, त्यांच्या डोंक्याखाली भोंकं झांकणयासाठी पत्र्याच्या चकत्या असतात... ...तर कांही चकत्या तुटलेल्या-वांकलेल्या होत्या, आणि त्यांखालच्या भोंकांतनं पावसाचं पाणी झिरपून खाली ठिकठिकाणी गळत होतं बघा... ...तीं सगळीं भोंकं त्यांत डांबर भंरून बुजवायला लावली काकांनी मला... ...मान पण दुखायला लागली तीं भोंकं सगळीं बुजवेंतोवर... ...भंरीला हे सगळं थोडा पाऊस पडत असतांना...!!!... ...मग कां संताप होणार नाही माझा ?”

मास्तर आतां खो खो हंसायला लागले,” अगदी योग्य केलं काकांनी... ...पण तूं तें काम करीत असतांना काका स्वतः काय करत होते ? ”

मी आतां ओंशाळलो,” खरं सांगायचं तर तें पण भोकं बुजवत होते माझ्याबरोबर... ...”

मास्तर,” होय ना ?....तात्त्पर्य, काकां चा बघ्या झालेला नव्हता...तुझ्यासारखंच तें स्वतःही तें च काम करीत होते... ...तेंही पाऊस पडत असतांना... ...काय ?”

मी आतां खरोंखर खजील झालो,” बरोबर आहे मास्तर तुमचं... ...आतां पटतंय मला...”

मास्तर आतां सूचक हंसले,” हें पटणंच महत्त्वाचं असतं रवि...हें कधीही विसरूं नकोस, की नुसत्या पुस्तकी पांडित्यापेक्ष्या, व्यवहारी द्न्यान हें केव्हांही निर्णायक महत्त्वाचं... ...मी ही तिसरी कळीची गोष्ट तुला सांगतोय, कधीही विसरूं नकोस... ...इथनं पुढं तुझं प्रत्येक काम हें तुला स्वतःलाच करावं लागणार आहे...परक्या-अनोळखी गावांत निभाव लागायचा असेल तर...अगदी बुटाला पॉलिश लावण्यापासून तें बॅंकेतले पैश्याचे व्यवहार करण्यापर्यंत, एकजात सगळी कामं धडाडीनं स्वतःची स्वतः च करायला शीक... ...

या करण्यातनं तुला जे द्न्यान न् व्यवहारी शहाणपण प्राप्त होईल, तें कितीही पुस्तकांची पारायणं जरी केलीस, तरी प्राप्त होत नसतं... ... आणि हें व्यहार दन्यान न् शहाणपण निव्वळ पुस्तकी द्न्यानापेक्ष्या लाख पटीनं मोलाचं असतं, हें तुलाच मोठेपणीं अनुभंवाला येईल... ...

असं बघ...की मनुष्य जेव्हां फंसवला-लुबाडला जातो, किंवा अडचणीत सापडतो ना, तसं केव्हां होतं ?....काय कारण असतं त्यामागं ?”

मी,” काय कारण असतं मास्तर ?”

,” त्यामागचं एकमेव कारण हें असतं अॅरिस्टॉटल ", मास्तर हंसत म्हणाले," की त्या विशिष्ठ गोष्टीबद्दल असलेलं त्याचं ठार अद्न्यान...आणि ती करण्यातला त्याच्याजंवळ असलेला शून्य स्वानुभंव... ...

तात्त्पर्य, ' नॉलेज ईज पॉवर, अॅंड अॅब्सोल्यूट नॉलेज ईज अॅब्सोल्यूट पॉवर ' ही तिसरी गोष्ट कधीही विसरूं नकोस... एव्हढं च मला तुझ्या मनावर ठंसवायचं होतं... ...

ये बेटा...यशस्वी भंव...समृध्दो भंव...दीर्घायुष्यमस्तु... ... ...

काका नेहमी मला सांगायचे,” बाबा रे...अभियांत्रिकी ही नुस्ती वर्गांतली शिक्षकांची प्रवचनं ऐकून न् पुस्तकं वांचून प्राप्त होणारी विद्या नव्हे... ...हत्यारं - अवजारं उचलून बेधंडक कामांना हात घाला...आभियांत्रिकी निश्चित पंचवाल... ...

काकांनी अशी नानाविध कामं मला मला मदतीला घेऊन मान मोडेस्तंवर तरूणपणीं करायला लावली होतीं... ...

इतकी, की पुढं १९७० सालीं एफ्. वाय. बी. एस्सी. प्रथम वर्गांत उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष आभियांत्रिकीला प्रवेश घेईतोंवर माझी पंचवीस-तीस टक्के व्यावहारिक आभियांत्रिकी आधीच शिकून पूर्ण झालेली होती... ...!!!

काका नेहमी दुसरंही एक सांगायचे...की ' बैल जुंपून जे काम होण्यासारखं असतं, तिथं दहापट खर्च करून हत्ती कामाला लावणं, ही पण अभियांत्रिकी नव्हे , तर कुठलंही काम कमीतकमी श्रमांत, कमीतकमी वेळात, कमीतकमी खर्चात, आणि तरीही दर्जेदार-टिकाऊ करून दांखवणं, म्हणजे अभियांत्रिकी पंचवणं... ...’

माझे मास्तर आणि काका हें त्यांच्या तरूण वयातले वर्गमित्रच होते... ...

या दोघांनीं माझ्या तरूण वयात तेव्हां जें कांही माझ्यात ठांसून भंरलं, तें पुढं आयुष्यभंर मला पुरून उरलं... ...

या शिकवणीचे मी आजतागायत शेंकड्यांनी वांजवून स्वानुभंव घेंतलेत... ...अजूनही घेंतोय...

लक्षावधी रुपये वांचले, आतोनात वेंळही वांचला, आणि कुठल्याही माणसाच्या मर्जी-नख-यांना कधीच भीक घावी लागली नाही, हे वेंगळंच.

त्यातलाच हा एक थंरारक अनुभंव... ...

पांच वर्षांपूर्वीचा...


,” येतो नाना... ....धन्यवाद, आणि नवीन वास्तु तुम्हांला उदंड लाभों, ही मनःपूर्वक शूभेच्छा पण...अच्छा...”

२७ मे २०१७ या दिवशीं चि. सौ. बापूं च्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरच आयोजिलेल्या आमच्या पुनर्विकसित वास्तुशांति च्या सोहळ्याला आलेल्या शेंवटच्या अभ्यागतानं निरोप घेतला, आणि मी दिवाणखान्यातल्या कोंचावर जरा विसावलो... ...

दिवसभंर मी आणि सौ. इंदिराजीं चा आल्यागेल्यांची सरबराई नीट होतीय ना, हें बघण्यांत चांगलाच पिट्टा पडलेला होता... ...

घरातले बाकीचेही सगळेच – म्हणजे कन्या सौ. मुग्धा ऊर्फ बापू , जावईबुवा चि. श्रीनित , चिरंजीव चि. मीलन, सूनबाई सौ. क्षितिबाई, आणि आजो च्या घरातलं कार्य जातीनं बघणारे आद्य धुरीण चि. दीक्षा ऊर्फ गुण्डाप्पा - सगळेच भेलकांडलेले होते, आणि कधी एकदां चार घास पोंटांत ढंकलून झोंपतोय, अशी सगळ्यांची अवस्था झालेली...

पण ना झोंप ना भोजन त्या दिवशीं कुणाला सुखासुखीं मिळणार होतं , हें मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं... ... ...

,” दिकू... ...आटप तुझं जेवण आतां पटापट, नाहीतर मी चालले बघ आतां आपल्या घरीं...तूं बस इथंच... ...”

बापू गुण्डाप्पा वर डाफरले, तसा गुण्डाप्पा ताटातलं उरलं-सुरलं संपवून हात धुवायला मोरीकडं पळाला...न् धाडदिशी मोरीचा दरवाजा लावल्याचा आवाल आला...”

बापू-श्रीनित सामानसुमानाची आंवराआंवर करायला लागले...

सौ. इंदिराजी त्यांचा घरीं न्यायचा डबा भंरायच्या तयारीला लागल्या... ...

आणि अचानक गुणडाप्पा शिरलेल्या स्नानगृहाचं दार धंडाधंडा वाजायला लागलं... ... ...!!

पांठोंपांठ त्या आठ वर्षांच्या पोरा चा रडवेला आवाज घर दंणाणत घुमला,” अम्मा...बाथरूमचं दार उघड लवकर... ...आतनं अडकून बसलंय... ...अम्मा...अम्मा गं...”

माझ्यासकट सगळे पोंटात धंस्स् होऊन माझ्या शयनकक्षाच्या स्नानगृहाकडं धांवले...!!

बघतों तर कांहीतरी अगम्य गडबड होऊन स्नानगृहाच्या दरवाज्याचं कुलूप अडकून बसलेलं होतं...आणि आतनं गुण्डाप्पा घाबरून जिवाच्या आकांतानं ओंरडायला लागलेला होता...!!!

तें बघून माझ्या पायांखालची जमीनच सरकली, आणि सगळं अवधान च सुन्न-बधिर झालं...

गुण्डाप्पा आतनं दरवाजा उघडायला कुलुपाशी झोंबत आकांत करतच होता...!!!

मला काय करावं तें सुचेच ना...वेंळ रात्रीं साडे दहा ची...

असल्या अवेळीं तें नतद्रष्ट कुलूप उघडायला चावीवाला कारागीर तरी कुठून पैदा करणार ?

बरं...नेहमीची खंटक्यांची - म्हणजे ' मॉर्टाईस लॉक्स ' म्हणून जी कुलुपं ओंळखली जातात - तीं बसवायचा-खोलायचा अनुभंव मला उदंड होता, पण हें कुलूप नवीन पध्दतीचं फॅशनेबल् दंडगोलीय - म्हणजेच सिलिंड्रिकल - कुलूप होतं... ...आणि तंसल्या कुलुपांची ना रचना मला माहीत होती, ना तीं कांढा-बसवायचा अनुभंव होता... ...!!

मी सुन्न-बधिर व्हायचं कारण हें होतं... ... ...

पण आमच्या सौ. इंदिराजी तश्या धीराच्या...त्यांनी चंटकन् स्कूटर ची चांवी कपाटातनं कांढली, न् मला,” तुम्ही लोक खंटपट करून बघां...मी बघते चावीवाला कुणी कुठं भेंटतोय काय तें " इतकं सांगून अंगावरच्या घरात घालायच्या झग्यानिशीच स्कूटर ला किक् मारून सुसाट सुटल्या देखील... ...

आम्ही आधी गुण्डाप्पा ला धीर दिला...’ आज्जी चांवीवाल्याला आणायला गेलीय...फक्त घाबरूं नकोस, आणि कुलुपाशी झोंबूं नकोस ' इतकं च सांगितलं.

गुण्ड्या तसा चुणचुणीत...,” पण आज्जी ला चांवीवाला आत्तां मिळालाच नाही, तर ? “

मी गुण्डाप्पा ला धीर दिला... ,” बिल्कुल घाबरायचं नाही गुण्ड्या...आज्जी ला कुलूपवाला जर भेंटला नाहीच, तर आजो दरवाजा फोंडून तुला बाहेर कांढील... ...काय ? “

आणि गुण्डाप्पा लाखंड बोलता ठेंवायचं काम बाकीच्यांवर सोंपवून मी जरूर तीं हत्यारं कांढून तें कुलूप बारकाईनं न्याहाळायला लागलो... ...

त्याची धंरून फिरवायची पोलादी गोलाकार मूठ च तेंव्हढी दरवाज्याबाहेर दिसत होती, पण ती खोलायला खिळा-स्क्रू सारखं मात्र कुठंच कांहीही दिसत नव्हतं...!!!





मी मग दरवाज्यावर बसलेली कुलुपाची पोलादी चकती, आणि दरवाज्याचा पृष्ठभाग या दोहोंमध्ये स्क्रू ड्रायव्हर खुपसून जरा चकती कटवून ती मूठ निघतीय कां तेंही बघीतलं...पण मूठ जागच्या जागीं च ढिम्म होती... ...आतां मात्र मला मानसिक तांण जाणवायला लागला... ...

तेंव्हढ्यात दाराची बेल वाजली...

आणि सौ. इंदिराजी नी चावीवाल्यासह घरांत प्रवेश केला... ...बहुधा सौ. इंदिराजीं चं नशीब जोरावर असावं... ...जंवळच्या चौकातल्या टप-यांवरचा कुणी एक चांवीवाला नेमका उशीरा टपरी बंद करून घरी निघायच्या तयारीत असलेला त्यांना सापडला होता, आणि त्याला तसाच पुढं घालून सौ. इंदिराजी लगोलग घेऊन आलेल्या होत्या... ...!!


चावीवाला बघितल्यावर सगळ्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला...

तोंपावेतों चि. गुण्डाप्पा पण रडायचा थांबलेला होता... ...

चावीवाला दरवाजा बघतांक्षणींच म्हणाला,” ह्या कुलुपांचे स्क्रू दरवाज्याला आंतल्या बाजूनं बसवलेले असतात बाई... ...ते कसे खोलणार ? ”

आतां सगळेच हतबल होऊन चावीवाल्याच्या तोंडाकडं बघायला लागले... ... ...

मी मग माझ्या हत्यारांच्या खणातला चार पाउंडी हातोडा कांढून तो चावीवाल्याच्या हातात दिला... ...

चावीवाला काय समजायचं तें बरोबर समजला, आणि कामाला लागला...

त्यानं कुलुपाची मूठ दोन तीन वेळां उलट-सुलट फिरवून बघितली... ...

मग त्याच्या पोतडीतनं एक फूटभंर लांब बारीक तार बाहेर कांढली...ती कुलुपाच्या मुठीवर कुठंतरी टोंचली, आणि एका झंटक्यात मूठ ओंढून बाहेर काढली... ...

आम्ही सगळेच श्वास रोंखून पहात होतो... ...

मग त्यानं कुलुपाची दरवाज्यावर बसलेली पोलादी चकती गोल गोल फिरवून बाहेर कांढली.

आतां आतला कुलुपाचा सांगाडा दिसायला लागला... ...

                      


मग कुलुपवाला माझ्याकडं वळला,” साहेब...मी मघांशी म्हटलो ना, तसं हें कुलूप ठोंकूनच बाहेर काढावं लागेल, आणि तें तुटून वाया जाणार... ...दुसरं कांही करतां येणार नाही...नवीन कुलूप बसवावं लागेल दरवाज्याला... ...आत्तां असलं कुलूप नाही माझ्याजंवळ...मग हें तोडायला हरकत नाही ना ? ”

मी त्याला म्हटलं,” बेशक हातोडा घाल त्याच्यावर... ...आधी पोर बाहेर येऊं दे... ... नवीन कुलुपाचं बघूं सावकाश... ...”

चावीवाल्यानं मग ओंरडून आतल्या गुण्डाप्पा ला दरवाज्यापासून लांब सरकायला सांगितलं, आणि हातोड्याच्या दोन रट्ट्यांत कुलूप तोंडून आंतल्या बाजूला पाडलं. मग बारीक पक्कड दरवाज्याला कुलूप बसवायला पाडलेल्या भोंकात घालून चौकटीच्या भोंकात अडकून बसलेली कुलुपाची खिट्टी ओंढून बाहेर काढली, न् दरवाजा उघडला एकदाचा... ... ...

तसा गुण्डाप्पा नं आतनं बाहेर धांवत आज्जीच्या कुशीत शिरून जे भोंकाड पसरलं, की सांगतां सोय नाही... ...!!!

मी मग गुण्डाप्पा ला जवळ घेंतला,” हे बघ गुण्ड्या... ...एक तासभंरच तूं स्नानगृहात अडकला होतास... ...म्हणजेच बंदिवासात पडला होतास म्हणूं या...तुला सावरकरांची गोष्ट सांगितलीय ना मी ?... ...किती वर्षं त्यांना इंग्रजांनी कोंडून ठेंवलं होतं ? “

गुण्डाप्पा मुसमुसत म्हणाला,” वीस वर्षं आजो...”

मी,” आणि तासभंरच अडकून पडल्यावर तूं इतकं भोंकाड पसरतोस...अं ?... ...मग सावरकरांनी काय करायला हंवं होतं ?”

गुण्डाप्पा आतां मात्र डोंळे पुसून रडायचा थांबला, न् नकळत हंसला देखील... ...

आणि चावीवाला तेंव्हढ्या कामाचे तब्बल आठशे रुपये वांजवून घेऊन चालता झाला... ...!!

माझ्या ठार अद्न्यानाची किंमत त्यानं पुरेपूर वसूल केलेली होती... ... ...

आणि कसं कां असे ना...पोर सुटलं एकदाचं , म्हणून सौ. इंदिराजी नी ती आनंदानं मोजलेली होती...!!!

बापू-श्रीनित गुण्डाप्पा ला घेऊन त्यांच्या घरीं रवाना झाले...

मीलन-क्षिति-सौ. इंदिराजी सगळे झोंपायला गेले... ...

मी एकटाच त्या तुटक्या कुलुपाकडं हताशपणे बघत पुढचा तासभंर तरी माझ्या पलंगावर विषण्णपणे विचार करीत नुस्ताच बसून होतो... ...’ असं कसं चंकवलं त्या कुलुपानं आपल्याला ? ‘

शेंवटी सौ. इंदिराजी नी ,” झोंपा बघूं आतां " असा फंतवा काढल्यावर मनाशी कांहीतरी ठंरवून केव्हांतरी उत्तररात्रीं झोंप लागली असावी... ...


दुस-या दिवशीं सौ. इंदिराजी सकाळी उठल्या, तेव्हां सकाळचा चहा वगैरे आंवरून , खणातली हत्यारं बाहेर कांढून अस्मादिकांची बाल्कनीच्या दरवाज्याच्या तसल्याच दंडगोलीय कुलुपाबरोबर झंटापट चाललेली त्यांनी बघितली... ...

,” आतां हा कसला नवीन उपद्व्याप चाललाय तुमचा भंल्या सकाळी उठून ? “, सौ. इंदिराजी करवादल्या...

मी करवादण्याकडं कानाडोळा केला,” हे कुलूप बघतोय खोलून... ...कालच्या कुलुपानं चंकवलंय मला...”

सौ. इंदिराजी आतां वैतागल्या," चावीवाल्यानं स्नानगृहाच्या कुलुपाची वाट लावलेली आहेच... ...आतां तुम्हांला ह्या कुलुपाची पण वाट लावायची आहे काय ?... ...दहा मिनिटांच्या कामाचे आठशे रुपये घॆतलेन् मेल्यानं काल...“

मी हातांतला स्क्रू ड्रायव्हर खाली ठेंवला,” होय ना ?... ....ती त्याच्या डोंक्याची, तसल्या अवेळीं येऊन काम करायची, आणि मुख्य म्हणजे माझ्या अद्न्यानाची मोजलेली किंमत होती... ...तें च आतां निस्तरतोय...”

सौ. इंदिराजी,” म्हणजे काय ?...मला नाही कळलं...”

मी हंसलो,”...असं बघा...तुमच्या-माझ्या स्नानगृहाला पण असलीच कुलुपं आहेत... ...होय ना ? “

सौ. इंदिराजी,” बरं... ...त्याचं काय ?”

मी,” समजा...की उद्या तुम्ही च असं कुलूप बिघडून जर स्नानगृहात अडकून पडलात...तर मग काल जें केलं, तें च परत करत बसायचं ?... ...काय ?... ...तुम्ही जा तुमच्या कामाला, न् मला करूं द्या माझं काम निवांतपणे... ...”

सौ. इंदिराजी काय तें समजल्या, आणि निमूटपणे नाष्ट्याची तयारी करायला गेल्या...

मी दरवाज्याच्या कुलुपाची मूठ सावकाश फिरवून नीट न्याहाळली, तेव्हां कुठं चावीवाल्यानं ती झंटक्यात कशी खोलली होती तें समजलं... ...

मुठीच्या दंडगोलाकार बुडख्यात एक बारीकसं छिद्र होतं, जे जमिनीच्या बाजूला असल्यामुळं आदल्या दिवशीच्या गडबड गोंधळात मला दिसलंच नव्हतं... ... ...!!


                                           

मी मग दरवाज्याच्या खोलीतल्या बाजूकडं असलेल्या मुठीच्या बुडख्यातल्या त्या छिद्रात सौ. इंदिराजीं ची केसांत लावायची क्लिप घालून छिद्रात दिसणारी कळ दाबली, न् मूठ सावकाश बाहेर खेंचली न् काय... ...ती सफाचट् बाहेर निघाली...!!

मग बाहेरच्या बाजूची मूठ पण मी त्याच पध्दतीनं कांढली.

आतां कुलुपाचा उघडा पडलेला सांगाडा दोन्ही बाजूनी नीट दिसायला लागला... ...


                                            


लगोलग आंतल्या बाजूनं दोन स्क्रू लावून बासावलेली पत्र्याची चकती मी जेव्हां कांढली, तेव्हां कुठं  त्या कुलुपाची रचना आणि यंत्रणा यथातथ्य समजली, आणि त्यापुढं चावीवाल्याच्याच सफाईनं तें आख्खं कुलुप च मी मोजून पांच मिनिटांत बाहेर कांढलं, आणि सगळं सुटं करून नीट बघून ठेंवलं... ...



तें बघितल्यावर मग गुण्डाप्पा स्नानगृहात कसा काय अडकला होता, तेंही ध्यानात आलं...कुलुपाची दरवाज्याच्या चौकटीतल्या भोंकात अडकणा-या खिट्टी ची स्थितिस्थापिका - म्हणजेच स्प्रिंग - मुळातच खराब झालेली होती... ...आणि सुतारानं तें कुलूप तसंच बसवलेलं होतं. त्यामुळं गुण्डाप्पा नं दरवाजा धाडदिशी आपटून बंद केल्यावर, ती स्प्रिंग मोडून खिट्टी चौकटीच्या भोंकातच अडकून बसलेली होती...!!




सौ. इंदिराजी नां मग हांक मारून मी त्या कुलुपाचा माझ्या कार्यशाळेतल्या मेजावर मांडून ठेंवलेला कोथळा जेच्हां दांखवला, तेव्हां त्यांनी कपाळाला हात लावला,” केलंत ना चांगल्या धड कुलुपाचं वाटोळं ?... ...तरी मी सांगत होते...”

मी सौ. इंदिराजी ना हातानंच गप्प रहायची खूण केली, आणि पुढच्या पांच मिनिटांत सगळं कुलुप परत जोडून दरवाज्याला बसवून दांखवलं, तेव्हां त्यांनी दुस-यांदा कपाळाला हात लावला... ...!!

पुढच्या आंठवड्यात चि. गुण्डाप्पा ला घेऊन जेव्हां बापू-श्रीनित आले होते, तेव्हां त्यांनाही कुलूप खोलून त्याची रचना दांखवली आणि तें दरवाज्याला कसं बसवतात तें पण दांखवलं... ... ...

आतां आमच्या घरात कुणालाच दण्डगोलीय कुलुपांची धास्ती राहिलेली नाही...

गुण्डाप्पा ला तर अजिबात नाही.

त्यानं तर मला बोलून दांखवलं, की तो इतर कुठंही तसलं कुलूप असलेल्या खोलीत अडकलाच, तर तो आतनं बाहेरच्या माणसाला तें कुलूप खोलून दरवाजा कसा उघडायचा, त्याचं मार्गदर्शनही करूं शकेल... ...

आ ऽ ऽ ऽ ऽ ऽ गदी शंभर टक्के खात्रीनं... ...

आफ्टर ऑल...नॉलेज ईज पॉवर, अॅंड अॅब्सोल्यूट नॉलेज ईज अॅब्सोल्यूट पॉवर... ... ...


-- रविशंकर.

१९ ऑगस्ट २०२४.


No comments:

Post a Comment