Search This Blog

Tuesday 14 November 2023

|| पुनरागमनाय च ||

|| पुनरागमनाय च ||

 

 


,”आणि प्रथम पारितोषिका चा मान पटकावलाय रवीन्द्र नानिवडेकर या सातवीतल्या विद्यार्थ्यानं... ...रवि नानिवडेकर या विद्यार्थ्यानं कृपया पारितोषिक स्वीकारायला व्यासपीठावर यावं...”

शाळेतल्या आमच्या चित्रकलेच्या जोग मास्तरांनीं सदर पुकारा केला, आणि मी टाळ्यांच्या गजरात ऐटीत व्यासपीठावर जाऊन माझे आद्य गुरू मुख्याध्यापक श्री. टिकेकर मास्तरांना वांकून नमस्कार करीत तांठ मानेनं तें पारितोषिक घेतलं... ...

मला पारितोषिक दिल्यावर समोर पटांगणांत बसलेल्या चारएकशे विद्यार्थ्यांकडं आपला मोर्चा वळवूून मग टिकेकर मास्तर म्हणाले, " मी आतां काय सांगतो, तें नीट लक्ष्यांत ठेंवा बाळानों... ...मोठे झाल्यावर तुम्ही सगळे च आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत नोक-या-व्यवसाय वगैरे कराल आपापल्या उपजीविकांसाठी......पण लक्ष्मी च्या मागं लागतांनाही सरस्वती च्या दरबारातल्या चौसष्ट कलांचा कधीही विसर पडूं देऊं नकां...त्यातली एखादी तरी कला आत्मसात करून घ्यायला कष्ट करण्यांत अजिबात चुकारपणा करूं नकां, एव्हढं च मला तुम्हां सगळ्यांना सांगायचंय... ... ...

मी हें जे कांही सांगतोय, त्याचं महत्त्व तुम्ही जेव्हां माझ्या वयाचीं व्हाल ना, तेव्हां तुम्हांला नक्कीच समजेल...तथास्तु ...”

मास्तरांचे तब्बल साठ वर्षांपूर्वीचे हे शब्द मला २०१० सालीं पुण्याच्या इण्डिया आर्ट गॅलरी नं भंरवलेल्या माझ्या जलरंगचित्रांच्या प्रदर्शनातल्या निर्गमनद्वाराजवळच्या मेजावरच्या प्रेक्षकांच्या अभिप्राय वहीत खाली वांकून नोंद करणा-या त्या पांठमो-या उतारवयीन बाईंकडं बघून जसे च्या तसे आंठवले... ... ...

साधारण सत्तरी-पंच्याहत्तरी ला टेंकलेल्या उच्चशिक्षित भासणा-या त्या बाई नीं त्या वहीत अशी नोंद केलेली होती... ...

आज एक तासभंर मी स्वतःला च हंरवून बसलेले होते...

अशी एखादी तरी कला आत्मसात करून घ्यायला तरूण-कमावत्या वयात आपण कसलेही कष्ट घेंतले नाहीत, याचं आज मला अतीव दुःख होत आहे... ....’

मास्तरांच्या ' पुनरागमनाय च ' या भविष्यवाणी चा तो वास्तवातला आविष्कार बघून आवाक् होत मी च कपाळाला हात लावला... ...!!!

श्रीगणेशपूजनात एक श्लोक असा आहे

                                            || यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकीम्

                                                                          इष्टकामसमृध्यर्थ पुनरागमनाय च ||

या अनुष्टुभात ' माझ्या मनोकामनासिध्दिसाठी तूं पुन्हां परत ये ' अशी परमेश्वराला ला बोळवतांना प्रार्थना केलेली आहे...

खरं तर मला असं नेहमीच वाटतं, की माणसानं स्वतःच्या ' मनोकामनासिध्दि ' अर्थात् ' स्वार्थसिध्दि ' साठी परमेश्वराला असं दावणीला बांधणं हें मुळातच चूक आहे... ...स्वतःच्या ' स्वार्थसिध्दि ' साठी माणसानं स्वतःच कष्ट उपसायचें असतात... ...परमेश्वराकडं फार फार तर ' माझ्या कष्ट-प्रयत्नवादा ला यश येईल असा वर दे ' इतकंच मागायचं असतं...तें कष्टही परमेश्वराच्याच माथीं मारायचे नसतात, हें मला पटलेलं तत्त्वद्न्यान... ...असो.

माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, तर आजपावेतों या ' पुनरागमनाय च ' च्या अनेक गंमती-जंमती झाल्या...

थोडक्यात सांगायचं तर

                                          || पश्चाद्षड्दशाब्दायुर्कलात्मताऽर्जनार्थाय

                                                        शालायां च प्रशालायां पुनारागमनं कृतम् ||

असं कांहीतरी वयाच्या साठीच्या आसपास जें सुरूं झालं, तें आजतागायत सुरूं च आहे... ... ...

त्या सगळ्याची सुरुवात मी चोपन्नाव्या वर्षात जेव्हां पदार्पण केलं, तेव्हां - म्हणजे २००६ सालीं - झाली.

मी पुष्कळ आधीपासूनच लौकिक नोकरी-धंद्यातनं, साठीतल्या रीतसर सेवानिवृत्ति च्या आधीच पांचएक वर्षं सेवानिवृत्ति घेऊन स्वतःला हवं तसं अभियांत्रिकी सल्लागार तद्न्याचं काम करायचं ठंरवलं होतं, आणि त्यानुसार साठी उलटेपर्यंत ती हौस पण यथेच्छ फेंडून घेंतलेली होती... ...

मी आणि माझे सल्लागारी च्या व्यवसायातले, वयानं जंवळपास एखादं वर्ष च पुढे-मागे असलेले बाकी तीन मित्र-सहकारी, आम्ही सगळेच जसे साठीपार झालो, तसं सगळे म्हणायला लागले, की आतां ही हौस पण फिटली...तेव्हां हें आतां बस् करूं, आणि तरूण वयात जे जे कांही शिकायचं-करायचं राहून गेलंय, त्याकडं इतउप्पर मोर्चे वळवूं ...

तेव्हां योगायोगानं आम्हां चौघांच्या आपापल्या कार्यक्षेत्रांतलेच चार कर्तबगार द्विपदवीधर विद्यार्थी आमच्या संपर्कात आले, आणि मग मात्र आम्ही निष्कारण काथ्याकूट करत न बसतां एकमुखीं निर्णय घेंऊन सगळा व्यवसाय त्यांच्या हंवालीं करून मोकळे झालो... ...

घरीं हा आमचा निर्णय जेव्हां सांगितला, तेव्हां सौ. इंदिराजी कांहीच म्हटल्या नाहीत, पण कन्या चि. बापू नी मात्र माझी उलटतपासणी सुरूं केली...,” आतां हें चालतं सगळं सोडून देऊन पुढं करणार काय आहांत बाबा... ?... नुस्तेच कोप-यावरच्या चौकात बसणा-या वयस्करांत सामील होऊन गांवभंरच्या कुटाळक्या करत बसणार असाल ना, तर तें चालणार नाही मला... ...त्यापेक्षा मग सध्या जे कांही चाललंय तुमचं, तें च चांगलं आहे म्हणते मी...”

मी, “ अगं कांही ना कांही करीनच की मी...नुस्ता बसून थोडाच राहणार आहे ? “

चि. बापू ,“ कांही ना कांही.........म्हणजे काय ?...तें सांगा आधी...”

मी, “ अगं करण्यासारखं बरंच कांही आहे डोंक्यात...आधी पंधरवडाभंर आराम तर करूं देशील मला ? ”

चि. बापू ,“ अजिबात तसलं कांही करायचं नाही...कळलं ?...आधी तुमच्या डोंक्यात काय कल्पना आहेत तें सांगा मला...”

मी, “ बरंच कांही आहे डोंक्यात... ...”

चि. बापू ,“ उदाहरणार्थ ? ”

मी, “ उदाहरणार्थ चित्रकला शिकायची राहून गेलीय...ती शिकतां येईल...वाचनही भंरपूर करायचं आहे अजून...आपल्या भारताचा कांही भाग अजून बघायचा राहूनच गेलेला आहे की...तो ही फिरून बघतां येईल...तसंच संगीत दुनियेकडं पण परत फिरतां आलं, तर तें ही बघतां येईल...पण तें आमच्या सत्तरीच्या दशकातल्या संगीत चमूतले कुणी नादिष्ट आतां तिकडं परत वळायला तयार होतील काय, यावरही अवलंबून राहील... ...”

चि. बापू ,“ जे कांही तुम्हांला आवडेल तें करा...पण निरुद्योगीपणाकडं अजिबात फिरकायचं नाही...रोजचा आठ-दहा तासांचा तरी रगाडा मागं लावून घेणार असाल, तरच सध्याचा चालता उद्योग बंद करा...आणि मी पण बघते तुम्हांला अजून काय काय करतां येईल तें... ...ठीकाय ? ”

मी,“ चालेल की...मला काय...कांहीतरी नवीन रमण्यासारखं करतां आल्याशी कारण...”

त्या दिवशीं तो विषय तेंव्हढ्यावरच थांबला... ...

पण फक्त त्या दिवसापुरताच विषय थांबला होता, हे मात्र माझ्या गांवीही नव्हतं... ... ...

पुढचे दोन चार दिवस जरा आंळसात घांलवल्यावर मग मात्र मलाच वाटायला लागलं, की हा आळसोटगेपणा कांही खंरा नाही...पुन्हां आपला बारा तासांचा धंबडगा सुरूं करावा, हें उत्तम.

मग प्रथम वाचनाकडं लक्ष्य वळवलं...इतक्या वर्षांत शोंधून-निवडून संग्रहित केलेला निरनिराळ्या विषयांवरचा पुस्तक संग्रह आधी बाहेर कांढला, आणि त्याची विषयवार नीट विल्हेवारी लावून तो परत कपाटांत लावून ठेंवला, आणि एकेका पुस्तकाच्या वाचनाला सुरुवात केली... ...

वेळ बराच चांगला व्यतीत होत होता...आणि ' आयुष्यभंर अखंड वाचत रहा...आपोआप समृध्द होशील ' हें मास्तरांनी शिकवलेलं तत्त्वद्न्यान पण हळूं हळूं अनुभंवाला यायला सुरुवात झाली होती...

पण सकाळची आंवराआवर झाली, की वाचन...दुपारीं भोजन झालं, की परत वाचन... ...सायंकाळचं चहापाणी झालं, आणि जरा मोकळ्या हंवेला फिरून आलं, की पुन्हां वाचन... ...रात्रीं चं जेवण झालं की परत पुन्हां तें च... ...असं अखण्डपणे किती काळ ' वाचन एके वाचन ' करणार ? कधीतरी त्याचाही जर कंटाळा यायला लागला, तर मग काय करायचं ? हा विचार डोंक्यात आल्याबरोबर मग लक्ष्यात आलं, की असं करून चालणार नाही... ...रोजच्या रोज चार पांच तरी रुचिपालट करतां येतील, इतके आवडते छन्द आतां सुरूं करायला हंवेत... ... ...

असा साधारण पंधरवडा उलटला असेल-नसेल, तों एका शनिवारीं सकाळीं सकाळीं च माझा भ्रमणध्वनि खंणखंणला... ...

, “ नमस्कार...नानिवडेकर बोलतोय... ...”

पलीकडून आवाज आला, “ नमस्कार सर...आपण रवीन्द्र नानिवडेकर च बोलत आहांत ना ?”

मी, “ होय...मी च रवीन्द्र नानिवडेकर... ...आपला परिचय ?”

,” सर मी पुण्यातल्या ' इंडिया आर्ट गॅलरी ' मधून देशपांडे बोलतोय...अरविंद देशपांडे...”

मी, “ नमस्कार...बोला... ...”

देशपांडे, “ सर...हा आपला भ्रमणध्वनि क्रमांक ' व्हॉट्स ऍप ' वर ही आहे ना ? “

मी, “ बरोबर...हा ' व्हॉट्स ऍप ' वरचाच क्रमांक आहे माझा... ...कश्यासाठी विचारताय आपण ?”

देशपांडे, “ जरा एक च मिनिट होल्ड करा बरं कां... ...”

...............................................................................

...............................................................................

पलीकडून परत आवाज आला, “ सर...मी आपल्याला या क्रमांकावर एक यादी पांठवली आहे आत्तांच... ...”

मी गोंधळलो, “ कसली यादी ?...जरा खुलासा करून सांगाल काय ?”

देशपांडे, “ अरे बापरे...मी तें सांगायला विसरलो की काय ?... ...सर उद्यापासून आमच्या आर्ट गॅलरीत जलरंग चित्रकलेचा वर्ग सुरूं होतोय आपला बरं कां... ...त्यासाठी आणायच्या साहित्याची यादी आणि आमचा पत्ता मी आत्तां च तुमच्या ह्या नंबरला ' व्हॉट्स ऍप ' वर पांठवेला आहे...सकाळी साडेनऊ तें साडेबारा दर गुरुवार - रविवारीं, असं वर्गाचं वेळापत्रक आहे...आणि... ...”

मी आतां चक्रावलोच, “ एक मिनिट ... एक मिनिट ... मि. देशपांडे... ... आपण चुकून हा माझा भ्रमणध्वनि क्रमांक लावलेला आहे काय ?”

आतां चक्रावायची पाळी देशपांड्यांची होती, “ असं कां विचारताय सर ?"

मी," अहो तुम्ही सांगताय ना...तश्या कुठल्या चित्रकलेच्या वर्गा-बिर्गा ला मी कुठंही प्रवेश घेतलेला नाही... ...म्हणून विचारतोय...”

देशपांडे, “ नाही...नाही सर... ...हा च क्रमांक नोंदलेला आहे आमच्याकडं... ...जरा एक मिनिट थांबा हं... ...मी परत एकदां खातरजमा करून सांगतो... ...”

एक मिनिटभंरानं देशपांड्यां चा आवाज परत आला, “ सगळं बरोबर आहे सर...हा च क्रमांक नोंदलेला आहे आमच्या प्रवेश नोंदीमध्ये... ...”

आतां मात्र मी कपाळाला हात लावला, “ हे बघा देशपांडे...मी खुद्द रवीन्द्र नानिवडेकर च बोलतोय तुमच्याशी...आणि मी स्वतःच तुम्हांला खात्री नं सांगतोय, की मी अश्या कुठल्याही चित्रकलेच्या वर्गासाठी कुठल्याच संस्थेकडं प्रवेश घेऊन माझं नाव-बीव कांही नोंदवलेलं नाही म्हणून... ...काय भानगड आहे ही मग ?”

देशपांडे, “ जरा परत एक च मिनिट संधान चालूं ठेंवा सर... ...हा कसला काय घोटाळा झालाय तें समग्र नोंद बघून च सांगतो तुम्हांला...एक च मिनिट...”

पलिकडून कसलेतरी कागद बिगद चांळल्याचे आवाज आले, आणि देशपांड्यांचा आवाज परत आला... ...नानिवडेकर सर...सगळं बरोबर आहे... ...कांही चूक-गफलत वगैरे अजिबात नाही...कालच्या मंगळवारची ही तुमच्या च प्रवेशाची नोंद आहे इथं...फी पण सगळी रोखी नं भंरलीय... ...आणि आपण तर म्हणताय प्रवेश घेतलेलाच नाही म्हणून... ...”

मी आतां मात्र हंबकलो, “ एक मिनिट देशपांडे... ...तुम्ही म्हणताय तसा माझं नांव नोंदवून प्रवेश कुणी घेतलाय हे सांगूं शकाल काय मला ?...म्हणजे... ...”

देशपांडे, “ आलं लक्ष्यांत माझ्या सर...प्रवेश घ्यायला आलेल्या व्यक्तिंच्या पण नोंदी असतात आमच्याकडं ....अं.... ....हां...सापडली नोंद...मुक्ता श्रीकांत नांवाच्या कुणीतरी मॅडम आल्या होत्या नांव नोंदणी करायला... ...आणि सहा महिन्यांच्या वर्गाची सगळी फी पण त्यांनी रोंखीनं भंरलेली आहे... ...या मॅडम ना ओंळखता ना आपण सर ?”

तेव्हां कुठं सगळा उलगडा झाला... ...म्हणजे हा उद्योग चि. बापू नी च परस्पर करून ठेंवलेला होता तर... ...

पलीकडून देशपांड्यांचा आवाज परत आला, “ या मॅडम ना ओंळखता ना आपण सर ?”

, “ होय होय...चांगलं च ओंळखतो" असं म्हणून अजून अधिक शोभा व्हायच्या आंतच मी , “ हो...हो...उद्यां सकाळीं मी येतोय वर्गाला...” म्हणत भ्रमणध्वनि बंद केला... ... ...

आणि सौ. इंदिराजी नां हांक मारली, “ अहो.......जरा इकडं या बघूं ताबडतोब...”

, “ आले...आले...थांबा जरा मिनिटभंर...माझा हात गुंतलाय स्वैपाकात... ...”

दोन मिनिटांनी सौ. इंदिराजी प्रश्नार्थक मुद्रेनं रुमालाला हात पुसत आल्या, “ काय झालं ?...कश्याला हांकारा केलात एव्हढा ?”

मी मग त्यांना काय झालं होतं, तें समग्र लचांड सांगितलं... ... ...

तसा सौ. इंदिराजीं चा चेहरा कधी नव्हे इतका उजळला, “ बरं झालं...लेकीनं च मुसक्या आंवळून ठेंवल्या तें... ...”

मी, “ काय बरं झालं म्हणून एव्हढ्या खूष झालाय तुम्ही ?...”

सौ. इंदिराजी, “ काय वाईट झालंय यात ?...चांगलं चित्रकलेच्या वर्गाला नांव नोंदवलंय लेकी नं... ...”

मी, “ अहो पण... ...”

सौ. इंदिराजी नी माझा भ्रमणध्वनि आणून माझ्या तळहातावर ठेंवला, आणि हांत झंटकून मोकळ्या झाल्या “ पण बीण काय तें थेंट लेकीला च सांगा तुमच्या... ...काय ?...ती च बरोबर खंमकी भेंटलीय तुम्हांला... ...छान केलंन अगदी तिनं...गेला बाजार माझं डोकं पिकवणारे घरातले नस्ते उपद्व्याप तरी थांबतील तुमचे... ...!!...हीः हीः हीः हीः... ...”

सौ. इंदिराजीनी च असे हात झंटकून टाकल्यावर मग चि. बापू नां कांही सांगायला जाण्यात कांही अर्थ नव्हता... ...

मी कपाळाला हात लावत कपडे चंढवून ' रंग सामान ' आणायला बाजाराकडं सुटलो... ... ...

आई-बाप शाळेची फी भंरून पोरांना शाळांत भंरती करतात, अशी सर्वसाधारणपणे जगरहाटी असते.

इथं लेकी नं च फी भंरून शाळेत डांबलेला मी जगातला पहिलाच बाप ठंरलो...!!!

आणि असं माझं कलाक्षेत्रांतलं जे ' पुनरागमनाय च ' सुरूं झालं, तें अखण्डपणे पुढं सुरूं च राहिलंय...अगदी आजतागायत.

माझ्या बाबतीत तहहयात एक मजा घडत आलेली आहे...

ती म्हणजे प्रत्येक बाबतीत माझ्या नशिबाला ' मातोश्रीं ' चा कुठला ना कुठला अवतार येत राहिलेला आहे... ...

या मातोश्रीं च्या ' अवतारां ' ना मी ' इंदिराजी ' असं संबोधतो...!!!

पैकी पहिल्या खुद्द मातोश्री...ज्यांनी माझा धर्म सुतासारखा सरळ करून ठेंवला...

दुस-या जन्मदात्री...ज्यानीं माझं कर्म सुतासारखं सरळ करून ठेंवलं... ...

तिस-या गृहस्वामिनी सौ. इंदिराजी...ज्यांनी माझा लौकिक संसार सुतासारखा सरळ करून ठेंवला... ... ...

चंवथ्या संगीत पण्डिता उषाबाई पण्डित...ज्यांनी माझा संगीत संसार सुतासारखा सरळ करून ठेंवला... ... ... ...

आतां या पांचव्या लेक मुक्ताबाई...यांनी खुद्द मला च सुतासारखा सरळ करून ठेंवलाय... ... ... ... ...

आतां आरश्यासमोर उभा राहिलो ना, की मला फक्त सुता चा सरळसोट धागा च तेंव्हढा दिसतो...!!!

या समस्त ' इंदिराजीं ' ची एक गंमत असते...त्यांच्या बाबतीत दोन कडक पथ्यं अगदी कसोशीनं पाळावी लागतात...

पहिलं हें, की ' इंदिराजी ' जें जें कांही करायला सांगतील, तें तें तांतडीनं बिनदिक्कतपणें करून मोकळं होणं...

कसलीही खेंकटीं न कांढतां... ...

कारण त्याची सगळी जबाबदारी ' इंदिराजी ' नीं स्वतःच्या माथीं घेंतलेली असते...

दुसरं पथ्य हें, की ' इंदिराजीं ' च्या राजदण्डा ला आव्हान द्यायला जायच्या भानगडीत कधीही न पडणं... ...कारण कुठल्याही आव्हाना चं तत्त्क्षणीं सफाचट श्राध्द घालून ठेंवण्यांत ' इंदिराजीं ' चा हात त्रैलोक्यात कुणी धंरूं शकत नसतं... ...!!!

तर अश्या त-हेनं माझं निरनिराळ्या कला क्षेत्रांत ' पुनरागमनाय च झालं... 

दुस-या दिवशीं सगळं ' रंग सामान ' कांखोटीला मारून अस्मादिक नव्या ' शाळेत ' हंजर झाले... ...

सर्वप्रथम श्री. देशपांड्यांची गांठभेंट झाली...त्यांनी दिलखुलासपणे स्वागत-बिगत करून मग हंळूच बजावलं, “ नानिवडेकर सर...वर्गाला नियमित यायचं बरं कां... ...दांड्या-बिंड्या मारायच्या नाहीत अजिबात...”

मी, “ हया प्रेमळ तंबीबद्दल धन्यवाद देशपांडे... ...पण असं आवर्जून कां सांगताय...?”

देशपांडे, “ तसं कांही नाही सर...पण त्याचं काय आहे... ...”

मी, “ हं बोला बोला देशपांडे...काय आहे त्याचं?”

देशपांडे, “ काय आहे ना सर...की तुमचं नांव घालायला ज्या मुक्ता मॅडम आल्या होत्या ना....त्या सांगून गेल्यायत की... ...”

मी, “ काय सांगितलंय तुम्हांला मुक्ता मॅडम नी ?”

देशपांडे, “ त्यांनी सांगून ठेंवलंय, की ' हे विद्यार्थी जर वर्गाला दांड्या-बिंड्या मारायला लागले, तर दूरध्वनि करून मला लगेच कळवा ' म्हणून...!!! ”

मी कपाळाला हात लावून कांखोटीतलं सामान सांभाळत वर्गात प्रवेश केला... ... ...!!

बघतो तर तमाम विद्यार्थीवर्गांत मी च सगळ्यात वयानं मोठा दिसत होतो...

पांचएक मिनिटांनी वर्गात सौ. जोशी नांवाच्या ' सहाव्या इंदिराजी ' नी मोठ्या झोंकात प्रवेश केला... ...

आणि नशिबाला दिलखुलास दाद देत मी पुन्हां वर्गात च कपाळाला हात लावला...!!!

या ' इंदिराजी ' नी पण पहिल्या च तासाला तंबी भंरली, “ हा वर्ग एकूण अठ्ठेचाळीस दिवसांच्या सत्रांचा आहे...इतक्या मर्यादित वेळांत ज्यांना ज्यांना ' जलरंग चित्रकला ' बालंबाल हस्तगत करायची असेल, त्यांनी एकाही सत्राला दांडी न मारण्याची दक्षता घ्यावी...!! ”

या जोशी बाई व्यवसायानं जरी वास्तुशास्त्रविशारद होत्या, तरी चित्रकलेवरचं - विशेषतः जलरंग चित्रकलेवरचं - त्यांचं प्रभुत्त्व मात्र वाखाणण्याइतकं वादातीत होतं. त्यांनी सर्वप्रथम प्रत्येक विद्यार्थ्याच्या चित्रकलेतल्या आवडी निवडी जाणून घेतल्या, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्या त्या अंगातले बारकावे आणि कौशल्य शिकवत गेल्या.

त्यामुळं हळूं हळूं माझं या कलेतलं स्वारस्य वाढायला लागलं, आणि जसजसा रंगांत रंगत गेलो, तसतसं तें दौडायला पण लागलं... ...

तरूणपणीं मास्तरानीं मला एक मौलिक तात्त्वद्न्यानिक तत्त्व समजावून सांगितलं होतं, “ हे बघ रवि...आपल्याला जर खं-या अर्थानं समृध्द व्हायचं असेल, तर जेव्हां केव्हां घोड्याचं ओंझंही ओंढायला अवघड वाटायला लागतं ना, तेव्हां बिनदिक्कतपणे सर्वप्रथम हत्ती चं ओझं ओंढायला सुरुवात करावी...तें एकदां केलं, की मग यथावकाश घोड्याचं ओझं करंगळीनं पण अगदी आरामात ओंढतां येतं...!!!, हें कधीही विसरूं नकोस...”

महत्त्वाची एक गोष्ट तेव्हां माझ्या ध्यानात आली, ती अशी, की सुवातीला वाचन एके वाचन अखण्डपणे किती काळ करणार ? अशी जी एक समस्या मला सतावायला लागली होती, तिला हा कलां चा उत्तम रुचिपालट आपसूकच उपलब्ध झालेला होता. त्यामुळं अखण्ड वाचनापायीं येणारा एकसुरीपणाही निकालात निघाला, आणि त्यातलीही मजा वाढायला लागली... 

पुढं बर्षभंरातच, परदेशात स्थायिक झाल्यामुळं कांही काळ दुरावलेल्या आमच्या महाविद्यालयीन वयातल्या संगीत चमू मधल्या संगीत पण्डिता उषाबाई पण्डित याही अचानकपणें पुनश्च संपर्कात आल्या...


त्यातला अजून एक मित्र तर मुंबईतच होता, आणि संपर्कातही होता. तें सगळं जुळून आल्यावर मग संगीत प्रांतातही अस्मादिकांचं जे ' पुनरागमनाय च ' झालं, तेंही अगदी आजतागायत सुरूं च आहे.


१९७४ साली पहिली नोकरी लागली, तेव्हांपर्यंत आमची संगीत क्षेत्रात ९९ सादरीकरणं झालेलीं होतीं, आणि अश्या वळणावर रंगमंच सोडावा लागतोय...केवळ एका सादरीकरणासाठी शतक हुलकावणी देतंय, याचं मला विलक्षण वाईट वाटलं होतं... ...

पण 

|| उत्सवे व्यसने युध्दे दुर्भिक्ष्ये राष्ट्रविप्लवे

        राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः ||

या सुभाषिताच्या पलीकडची निष्ठा न् धंमक असलेल्या खंमक्या जिद्दी उषाबाई नीं मला अजिबात ढिला सोडला नाही, आणि ' पुनश्च हरी ॐ ' रीत यू ट्यूब वर संगीत सादरीकरणांचं शतक तर ठोंकलंच,शिवाय यू ट्यूब वर शतकोत्तरीं सादरीकरणंही मला करायला लावली... ...

 

लवकर च यू ट्यूब वर शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमही त्या मला करायला लावतील, अशी चिन्हं आतां दिसायला लागलीत... ... ... 

दुस-या बाजूला घरचा ' लौकिक संसार ' घरातल्या ' सौ. इंदिराजी ' अखंडपणे करंगळी नं चालवत होत्याच. या ' इंदिराजी ' नी पण उभ्या आयुष्यात चुकूनही घरातलं एकही काम मला कधी करायला सांगितलं नाही...अगदी आजतागायत...
 

एकदां हें सगळं नीट समजल्यावर मग काय... संगीतापांठोंपाठ अगणित गोष्टींची रांग च लागली... बघतां बघतां होमिओपॅथी सुरूं झाली...मग फलज्योतिषाची पण वर्णी लागली...छायाचित्रणाचेही प्रयोग सुरूं झाले... अर्थशास्त्र, गुंतवणूक शास्त्र, लेखन, कविता...काय न् काय...एकूण पंचेचाळीस विविध क्षेत्रांत माझा मुक्त संचार सुरूं झाला... ...

आणि चोवीस तासांच्या आसमंतात नुस्ता धुरळा उडाला... ... ...

तरूणपणापासून मला लेखन करायची आवड होतीच...तें करायला जेव्हां आंतरजालावर लेखणी उचलली, तेव्हां त्यालाही रसिक वाचकांचा बघतां बघतां उदण्ड प्रतिसाद मिळाला... ...सुरुवातीला फक्त महाराष्ट्रापुरती वाचकसंख्या हजार-बाराशे च्या आसपास च होती, ती पुढच्या पांच-सात वर्षांत पंचवीस हजारांच्या वर गेली, आणि वाचकही सुमारे चाळीस एक देशांत पसरले.

सगळं लेखन या ना त्या प्रकारें तत्त्वद्न्यानाशी संबंधित असल्यानं पुढं परदेशांतल्या दोन विद्यापीठांकडून त्यांच्या त्या विषयातल्या ' वाचस्पति ' च्या अभ्यासक्रमांसाठी संदर्भ साहित्य म्हणून माझ्या लेखनातला कांही निवडक भाग वापरायची मला परवानगीसाठी विनंति आली...मीही ती आनंदानं विनामोबदला देऊन टांकली... ...आणि अश्या प्रकारे शारदा देवी ची सेवा अप्रत्यक्षपणें कां होई ना, केल्याचं समाधान मला मिळालं... ... ...


मघांशी म्हटल्याप्रमाणं या प्रत्येक क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातल्या ' इंदिराजी ' जेव्हां माझ्या नशिबीं आल्या, तेव्हां एक साक्षात्कार झाला...तो असा, की या प्रत्येक ठिकाणीं खुद्द ' मातोश्री ' च त्या त्या रूपांत माझी काळजी वाहतायत की...मग आपण कश्याला निष्कारण ती आदळ-आपट करत बसायचं ?

मग मी एक मजेशीर व्यवस्था लावली... ...ती म्हणजे जें तें क्षेत्र ज्या त्या ' इंदिराजीं ' च्या हंवालीं करून टाकलं... घराच्या उंब-याच्या आंतला राजदण्ड माळ घातली तेव्हांच सौ. इंदिराजीं ना बहाल करून टांकलेला होता... ...उंब-या बाहेरच्या क्षेत्रांपैकी ' संगीत संसार ' उषाबाईं च्या हंवालीं केला, तर इतर क्षेत्रं त्या त्या संबंधित ' इंदिराजीं ' च्या ताब्यांत देऊन टांकलीं...आणि शेंवटीं वाटून टांकायला जेव्हां कांहीच शिल्लक उरलं नाही, तेव्हां मस्तपैकी अंघोळ करून मोकळा झालो...!!!

 तात्त्पर्य,

                      राजदण्ड ' इंदिराजी ' हातीं | जोखिमा ' इंदिराजी ' माथीं

                               घालूं हुंदडी काय हंवी ती | मनःपूत !!!     ||

हें च आपल्या तब्येतीसाठी हितकारक असतं... ...!!!

चित्रकला प्रांतात मला मुळात जलरंगांचं च सर्वाधिक आकर्षण...त्यातही संकल्पना चित्रं [ ज्याला ' थेमॅटिक पेंटिंग्ज ' असं इंग्रजीत म्हणतात ] आणि निसर्गचित्रांचं मला आतोनात वेड...तें समजल्यावर मग जोशीबाई अधनं मधनं वर्ग संपल्यावरही मला थांबवून घ्यायच्या, आणि या दोन प्रकारांतले बारकावे शिकवायच्या.

अगदी पहिलं वहिलं जें जलरंगचित्र मी त्याकाळीं काढलं, तें बघून ' या माणसाला जलरंगचित्रकारी कधी काळीं अवगत होईल ', असं म्हणायलाही कुणी धंजावलं नसतं... ...

पण वर उल्लेख केल्यानुसार जसजसं स्वारस्य दौडायला लागलं , ओंल्याचिंब कागदावर रंगानं भंरलेला कुंचला टेंकवतांच भंसाभंस दशदिशांत उधळणा-या रंगांना वेंसण घालण्यातलं कसब जसजसं अवगत व्हायला लागलं, तसतशी मग त्यातली कला हातात मुरायला लागली , आणि मी रंगांत आकंठ रंगत गेलो... .... 

कधी कधी ती तंद्री इतकी बेदम लागायची, की मला जेवणाखाणाचीही शुध्द रहायची नाही, आणि मग सौ. इंदिराजीं चा शंख वाजायला लागायचा... ...

यथावकाश आंतरजालावरच्या ' आर्टब्रेक डॉट् कॉम ' नांवाच्या स्थळानं मला वेगळी स्वतंत्र जागा देऊं केली, आणि तिथं माझ्या चित्रांचं दालन पहिल्यांदा सुरूं झालं.

 

पुढं ' इंडिया आर्ट गॅलरीनं २०१० सालीं माझ्या जलरंगचित्रांचं तीन दिवसांचं प्रदर्शन भंरवलं -ज्याचा उल्लेख या कथेच्या सुरुवातीला आलेला आहे - त्यालाही चित्ररसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला... ...

 

त्या प्रदर्शनाला चि. बापू आवर्जून उपस्थित राहिलेले होते...सुरुवातीला उल्लेख केलेला प्रदर्शनाच्या नोंदवहीतला त्या बाईं चा अभिप्राय जेव्हां बापू नी वाचला, तेव्हां ते माझ्याकडं बघून म्हणाले, “ बाबा... ...एकदम मस्त..."

तेव्हां चि. बापूं च्या चेह-यावर - विशेषतः नजरेंत - जें कांही ' मस्त ' उमटलेलं होतं, तें बघून माझ्या सगळ्या मुशाफिरीचं चीज झालं... ...

पुढं दोन हजार अकरा सालीं मला ' इम्मागिने ऍण्ड पोएशिया ' - म्हणजेच इंग्रजीत ' इमेजिस् ऍण्ड पोएट्री ' - नांवाच्या एका इटलीस्थित संस्थेकडून एक ई-मेल आली. या कवि-चित्रकारांच्या आंतरराष्ट्रीय मंचाचे त्याकाळीं जवळपास अठ्ठावीस हजार मानद सदस्य होते. या संस्थेनं त्यांच्या मासिक प्रकाशनात माझं ' वर्शिप ' नांवाचं एक जलरंगचित्र वापरायची परवानगी मागितलेली होती, जी मी निरपेक्ष भावनेनं देऊन टांकली...या चित्राला श्रीमति ऐरोनवी थॉमस नांवाच्या एका इंग्रज कवयित्रीच्या सुंदर कवितेची जोड लागून तें त्यांच्या मासिकात प्रकाशित झालं. या संस्थेनं मग मला त्यांचं आजीव सदस्यत्त्व विनामूल्य दिलं, आणि संस्थेचं बोधचिन्ह वापरायचे अधिकारही बहाल केले... ...

२०११ सालीं इटली संघराज्याच्या स्वातंत्र्यदिनाचा एकशे पन्नासावा भंव्य सोहळा झाला , त्याच्या कांढलेल्या स्मरणिकेतही माझं ' व्ही फॉर व्हिक्टरी ' नांवाचं जलरंगचित्र त्यांनी झंळकवलं...

याच्या आसपास च जपान मध्ये एक भूकंप झाला. त्यातल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जगभंर प्रसारित केलेल्या आवाहन पत्रिकेतही माझं ' ट्रॅप्ड् ' नांवाचं चित्र प्रकाशित झालं ... ...

तें सगळं जेव्हां चि. बापू नां दांखवलं, तेव्हां बापू माझ्याकडं बघून हंसत सौ. इंदिराजी ना म्हणाले, “ आई गं...हे बघ...बाबांनी काय काय करून ठेंवलंय तें... ...”

सौ. इंदिराजी डुलत डुलत आल्या..., “ बघूं जरा...तुझ्या बाबांनी काय काय उपद्व्याप करून ठेंवलेत तें...”

त्यांनी तें सगळं डोंळे बारीक करून मनसोक्त न्याहाळलं... ...

आणि म्हणाल्या, “ छान च झालंय खरं हे सगळं...पण...”

चि. बापू , “ आतां पण काय आई ?”

सौ. इंदिराजी, “ या सगळ्यापेक्ष्याही वरताण अशी एक मस्त गोष्ट केलीय तुझ्या बाबांनी ... ...ठाऊकाय तुला ?”

आतां मी च चंमकलो, “ मला नाही समजलं इंदिराजी... या सगळ्यापेक्ष्याही वरताण मस्त असं काय केलंय मी ?”

सौ. इंदिराजी नी मग पांठमो-या वळत बुध्दिबळातली त्यांची हुकुमी मात केली, “ आतां बापू जे सांगत होते ना, तें ' काय काय ' करत असतांना,घरांत एकही ' नस्ती उचापत ' तुम्ही करून ठेंवलेली नाही...!!!... समजलं ?...”

ती निर्णायक कोण्डी बघून मी कपाळाला हात लावला... !!!


शेंवटी फक्त पुरुष मण्डळींसाठी च एक तात्पर्य... ...

ज्या कुठल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याला मनसोक्त हुंदडायचं असतं ना, तें क्षेत्र कुणातरी ' जातीच्या इंदिराजीं ' च्या ताब्यात असणं, हें आपल्या तब्येतीच्या दृष्टीनं फारच हितकारक असतं... ...

आपण बरे, आणि आपलं हुंदडणं बरं... ...

बाकी सगळं ' इंदिराजी ' जाणे... ...!!!

काय ?

 

अजूनही कधी कधी चिंतनमग्न असतांना मनांत असा विचार येतो, की उपरोक्त सगळ्या ' इंदिराजी ' आपल्या वाट्याला जर आल्याच नसत्या, तर आपण एकट्यानं काय करूं शकलो असतो?

या प्रश्नाचं उत्तर शोंधायच्या भानगडीतही मी कधीच पडत नाही... ...

कारण त्याआधीच माझा हात कपाळाला लागलेला असतो ...!!!

 *******************************************************************

-- रविशंकर.

१४ नोव्हेंबर २०२३.


No comments:

Post a Comment