म्हणजेच ' आपुले अंधत्त्व पाहिले ( किंवा अनुभंवले ) म्या डोळां '...
आतां सदर अंधत्त्व जर महासती गांधारीसारखं जाणून बुजून पत्करलेलं असेल, तर भाग वेगळा...पण असा अंधत्त्वा चा जंळता अनुभंव जर नकळत अवचितपणें अपघातानं नशिबाला आला... ... ... तर ?
त्याची च ही थंरारकथा...
केंवळ चार तासांच्या कालावधीत घडलेली... ... ...
************************************************************
मी विजे चं बटण बंद करून हातातली तांपलेली कथिलाचे डाग मारायची डागणी तिच्या तार वेटोळ्याच्या खोळीत गार व्हायला ठेंवली...गुंजांएव्हढे बारीक कपॅसिटर्स ठेंवलेली चंपटी डबी मेजाच्या खणातनं बाहेर कांढली, आणि जोर लावून तिचं झांकण उघडलं... ...तत्त्क्षणीं डबी हातांच्या पकडीतनं निसटून धंराशायीं झाली, न् तीतले जोंधळ्याएव्हढे बारीकसारीक कपॅसिटर्स खोलीभंर उधळले... ... ...!!
आणि मी सुन्न होत कपाळाला हात लावला...
आतां हातातलं दुरुस्ती चं काम राहिलं बाजूला च...तें खोंलीभंर उधळलेले कपॅसिटर्स शोंधून पुनश्च डबीत नीटपणे भंरून ठेंवणं हा दुसरा नवीनच उद्योग समोर उभा राहिला...
१९९८ सालातल्या नोव्हेंबर महिन्यातली ती एक टंळटंळीत दुपार होती. वार होता गुरुवार...सौ. इंदिराजी चा साप्ताहिक सुट्टीचा दिवस रविवार असल्यानं त्या कार्यालयात गेलेल्या होत्या, तर चि. बापू ऊर्फ मुग्धाबाई आणि चिरंजीव मीलन आपापल्या महाविद्यालयांत गेलेले होते. तात्त्पर्य, मी घरीं एकटा च होतो... ...वेंळ होती दुपारीं चार ची.
गुरुवार हा आमच्या टाटा मोटर्स च्या नोकरीतला साप्ताहिक सुट्टी चा दिवस असायचा...पण माझ्यासाठी हंटकून तो घरचीं न् दारचीं आदला आंठवडाभंर साठलेलीं कामंधामं उरकण्याच्या कामीं लागायचा...
नवरात्र अवघ्या आठवड्यावर येऊन ठेंपलेलं होतं, म्हणून घरातल्या दिव्यांच्या माळांच्या दुरुस्तीचं काम मी कांढलेलं होतं, आणि तें अर्धवट झालेलं असतांना हें विघ्न उपटलेलं होतं... ...
आतां खोलीभंर उधळलेले ते कपॅसिटर्स वेंचत बसणं ही एक महा वेंळखाऊ डोंकेदुखी झाली असती. त्यापेक्षा सगळी खोली च झांडून घेऊन मग ते कपॅसिटर्स गोळा करणं सोपं होतं...
पांच साडेपांच च्या सुमाराला सौ. इंदिराजी न् पोरं घरीं परतलीं असतीं, आणि नंतर मग हातातल्या कामासाठी फुरसद मिळणं कठीणच झालं असतं, म्हणून काम त्याआधीच हातांवेगळं करायची माझी घाई उडालेली होती... ...
खुर्चीतनं उठून मी तरांतरां सौ. इंदिराजींच्या शयनकक्षांत गेलो...
तिथला दरवाजा बंद करून त्याच्या पांठीमागं कोंप-यात ठेंवलेला झाडू घ्यायला वांकलो, न् तो हातात धंरून बाहेर ओंढला... ...
तो दिवस मला जणूं जन्माचा धंडा शिकवायलाच उगवला होता की काय कोण जाणे.
घरातली धुणीं वाळत घालायची ऍल्युमिनियम ची तीन फूट लांबीची काठी त्या झाडूसोबत तिथंच कोंप-यात भिंतीला टेंकवून उभी ठेंवलेली होती.
मी खाली वांकून झाडू हातात धंरून पुढं ओंढायला न् ती नतद्रष्ट कांठी उभी व्हायला एक च गांठ पडली, आणि कांही कळायच्या आंत क्षणार्धात कांठी चं खंरबरीत कड असलेलं वरचं टोंक सपकन् डाव्या डोंळ्यात घुसलं... ...!!!
आश्चर्य हें की मला क्षणभंर कांही कळलंच नाही काय झालं तें... ...वेदना-बिदना पण कांही संणकली नाही डोळ्यातनं... ...
मात्र जेव्हां मी झाडू घेऊन उभा रहायला लागलो, तेव्हां डाव्या डोळ्यात कांहीतरी चिकट स्राव सुटल्यासारखं वाटलं...त्या डोळ्यानं कांही दिसेच ना, आणि उजव्या डोळ्याला मात्र खालीं फंरशीवर गळणारी रक्ताची धार दिसली... ...!!!
दुस-या क्षणीं काय झालं, तें कळून माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं... ...
डोळा कायमचा गेला...आतां आजन्म एकाक्षा चं जिणं नशिबाला आलं, या कल्पनेनं माझ्या हातांपायांतलं त्राण च गायब झालं, न् मी तिथं च घाबरून बसकण मारली.
मग त्याही अवस्थेत ध्यानांत आलं, की कार्यमेज पुसायचं फडकं हातात होतं...दुस-या क्षणीं प्रतिक्षिप्त क्रियेनं त्याचा पंज्यात बोळा झाला, न् तो डाव्या डोंळ्यावर घट्ट दाबला गेला... ... ...!!
खाली फरशीवर भळभळां गळणारं रक्त एकदाचं थांबलं...
घरात दुसरं कुणी च नाही...
तसं घरापासून हांकेच्या अंतरावर दोन तीन दवाखाने होते खरे, पण ते सगळे सायंकाळीं सहा वाजतां उघडणारे... ...तिथं कुठं दवाखान्यात जायचं जरी म्हटलं, तरी त्या तश्या अवस्थेत एकट्यानं कसं काय जाणार ?
बरं...शेंजारी पाजारी कुणाला हांक मारावी, तर तेंही सगळे माझ्याच वयाचे... ... कामाचा दिवस असल्यानं आपापल्या नोक-यांवर गेलेले... ...हांक तरी कुणाला मारणार ?
आतां मात्र माझा धीर सुटायला लागला...
अपघातीं वेंळ उगवली, की सगळं असून हतबलता कशी येते, तें तेव्हां मी पुरेपूर अनुभंवलं...
आमच्या जुन्या कौटुंबिक नेत्रवैद्य सौ. फरांदेबाई नां दूरध्वनि करावा म्हणून मी एका डोळ्यानं च माझ्या ऑफिस च्या थैलीत शोंधाशोंध करून माझा भ्रमणध्वनि बाहेर काढला... ...
तोंपावेतों दुस-या डोंळ्यात पाणी भंरून तें वहायला लागलेलं होतं...त्यामुळं हातातल्या भ्रमणध्वनि वरची बटणं पण मला धड दिसेनात... ...!!
आतां काय करायचं ?
कदाचित तोंपावेतों मातोश्रीं ची निःस्वार्थपणे केलेली उपासना च फंळाला आली, न् त्यांनी च सगळं निस्तरायला आपल्या हातांत घेतलं की काय कोण जाणे...
अचानक दरवाज्याची घंटा खंणखंणली... ...
एका हातानं डाव्या डोळ्यावरचा बोळा दाबून धंरत दुस-या हातानं मी दरवाजा उघडला, तर कधी नव्हे, तें दुपारनंतरची दोन व्याख्यानसत्रं रहित झाल्यामुळं घरीं लवकर परतलेले चिरंजीव मीलन दारात उभे...!!
त्याला बघतांच माझा सगळा जीव भांड्यात पडला, अन् त्याचा घश्यात गोळा झाला कपाळाला हात लावत चिरंजीव किंचाळले, " बाबा...बाबा...अहो काय झालं काय तुम्हांला हें ?...हा डोळ्यावर दाबलेला फडक्याचा बोळा रक्तानं भंरलाय सगळा... ... "
तरी आश्चर्य हें होतं, की मला डोळा फक्त थंडगार झाल्यासारखं वाटत होतं, पण वेदना अजिबातच होत नव्हत्या... ...
मी, “ काय झालंय तें नंतर सांगतो तुला मिली...ताबडतोब फरांदे बाईं च्या नेत्र रुगणालयाकडं गाडी हाण " म्हणत मी मिली च्या ' सुझुकी फायरो ' वर पाठीमागं ढांग टांकून बसलो...
चिरंजीवां चं तेव्हां वय होतं केवळ अठरा वर्षांचं...पण त्याला जात्याच प्रसंगावधान चांगलं आहे..., “ बाबा...फरांदे बाईंच्या रुग्णालयात पोंचायला दहा मिनिटं तरी लागतील... ...त्यापेक्ष्या काळे नेत्रवैद्यांचं रुग्णालय तीन गल्ल्या पलीकडंच आहे ...तिथं च जाऊं या की."
बसलेल्या मानसिक धंक्क्यापायीं मी तें सफाचट् विसरलोच होतो...!!...म्हटलं, “ बरं झालं तुला आंठवलं तें...घे गाडी तिकडंच... ...”
तोंपावेतों दुपारचे साडेचार वाजलेले होते...
दोन-चार मिनिटांत च आम्ही काळ्यांच्या नेत्र रुग्णालयात दाखल झालो... ...प्रवेश दालनात गल्ल्यावर कुणीतरी सकाळी उठून कुणी तोंड बघूं नये, अश्या मख्ख चेह-याची बाई बसलेली होती... ...
, “ डॉक्टरांना सांगा...आपद्ग्रस्त रुग्ण आहे... ...ताबडतोब दांखवायचंय म्हणून...” मी कसलाही शिष्टाचार न पाळतां सरळ सांगितलं...”
बाई तितक्याच मख्खपणें उत्तरली, “ ड़ॉक्टर आत्तां झोंपलेत...!!! "
मला तो मख्खपणा खंटकला न् मी डोळ्यावर दाबून धंरलेल्या रक्तानं भंरलेल्या बोळ्याकडं निर्देश करत तिला फर्मावलं, “ मग उठवा की त्यांना... ...न् सांगा तपासायला इथं यायला... ...बघताय ना हे काय झालंय तें... ...अॉ ? “
बाई आतां निगरगट्टपणे उत्तरली, " डॉक्टर साडेपांच ला उठतील...त्यांना हांक मारून उठवायची मला परवानगी नाही...!!!”
आतां मात्र चिरंजीव तंडकले, “ हांका मारून उठवायची परवानगी नसेल, तर मग दरवाज्यावर लाथा घालून उठवा त्यांना... ...तुम्हांला काय काळवेळ समजतेय की नाही बाई ?”
तरी बाई ढिम्म च... ...!!! , “ सॉरी सर...डॉक्टर उठेपर्यंत थांबावं लागेल तुम्हांला...ते खाली आले, की पहिला नंबर तुमचा च लावते... ...”
आतां मात्र मीही तंडकलो, “ त्यापेक्ष्या तुमच्या डॉक्टरांना झोंपूनच रहायला सांगा, आणि ते उठून खाली आले की, तुमचा च पहिला नंबर लावा...!!! ...काय ?... ...चल मिली ...फरांदे बाईंच्या रुग्णालयाकडं गाडी घे ताबडतोब... ...”
मी मग त्या मुर्दाड बाईच्या समोरच फरांदे बाईं च्या व्यक्तिगत भ्रमणध्वनि चा क्रमांक लावला, आणि माझ्या भ्रमणध्वनि चा आवाज पंचक्रोशीत ऐकूं जाईल इतका मोठा करून तो ध्वनिक्षेपकावर टांकला... ...”
फरांदे बाई नी ताबडतोब फोन उचलला, “ बोला नाना...कसं काय चाललंय एकूण ?... ...असा आडवेळेला फोन केलात, म्हणून विचारते...काय झालंय ?”
काय झालं होतं तें सांगितल्यावर फरांदे बाईं चा आवाज दालनात घुमला, “...अजिबात घाबरून जाऊं नकां नाना... नाहीतर रक्तदाब चंढेल तुमचा... ...मी आहे ना काय तें निस्तरायला?...तुम्ही अजिबात चिंता करायची नाही...ती सगळी माझ्यावर सोडा, न् ताबडतोब रुग्णालयात या... ...मी लगेच घरून निघते आहे...दहा मिनिटांत पोंचते तिथं... ...फक्त माझी गांठ पडेतोवर हाय खायची नाही, एव्हढंच सांभाळा...ठीकाय ?...या तुम्ही लगेच...”
आतांपावेतों समोर बसलेल्या मुर्दाडी चा नक्षा पुरता उतरलेला दिसत होता... ...
पडेल थोबाडानं ती म्हणाली, “ बसा सर तुम्ही...पांच दहा मिनिटांत येतीलच डॉक्टर खाली... ...”
आतां चिरंजीव तंडकले, “ आतां खाली उतरून तुमचे डॉक्टर कुणाला तंपासणार ?... ...त्यांना ' परत वर जाऊन झोंपा ' असा निरोप द्या आमचा....!!! ...काय ?”
तिथनं बाहेर पडतां पडतां चिरंजीव म्हणाले, “ बाबा...आई ला फोन केलाय काय ?”
मी, “ आत्तां लगेच नको तिला फोन करायला मिली... निष्कारण घांबरून धांवत सुटेल ती...भंरीला ही खंचाखंच वाहतुकीची वेंळ...आधी फरांदे बाई डोळा तंपासून काय म्हणतायत तें बघूं या, न् मग ठंरवूं काय करायचं तें... ...चल "
काळे नेत्ररुग्णालयाचं असं श्राध्द घालून मग आम्ही तिथनं थेट फरांदे बाईं च्या रुग्णालयाकडं सुसाट सुटलो ... ...
आम्ही तिथं पोंचायच्या आधीच फरांदे बाई येऊन आमची वाटच पहात थांबलेल्या होत्या. त्यांच्या कक्षाच्या दारावर टक् टक् करून आम्ही आंत गेलो, न् पहातच राहिलो...
बिचा-या बाई अक्षरशः ' नेसत्या वस्त्रांनिशी ' म्हणतात ना, तश्या घरातल्या गाऊन मध्येच पायांतल्या घरीं वापरायच्या सपातांतच रुग्णालयाकडं धांवलेल्या दिसत होत्या... ...!!
, “ या...या नाना... ...भंलताच पराक्रम गांजवून आलेले दिसताय...!!...या बसा असे इथं दुर्बिणीसमोर, न् मला आधी बघूं द्या प्रत्यक्ष्य काय झालंय तें...”
मी चांचरत म्हटलं, “ डोळ्यानं मला कांहीच दिसत नाहीय...आधी डोळा गेलाय काय तें बघून सांगा चंट्कन् ...”
बाई हंसल्या, “ इथं पोंचलाय ना आतां ?... ...मग काय झालंय, न् तें कसं निस्तरायचं, त्याची चिंता मला करूं द्या की...ती तुम्ही कश्याला करत बसलाय ?...हं डोळा उघडा बघूं जरा तुमचा...हें औषध आधी घालूं द्या मला डोळ्यात... ...”
मी डोळ्यावर दाबून धंरलेला कपड्याचा बोळा दूर केला, पण डोळा उघडतांच येई ना... ...”
बाई नी मेजावरची घंटा वाजवून परिचारिकेला आंत बोलावलं, “ सिस्टर...यांचा डोळा जरा अगदी हंलक्या हातानं उघडा बरं... ...हे विलक्षण घाबरलेले दिसतायत डोळा फुटला की काय म्हणून...”
परिचारिकेनं पुढ्यात येऊन ' घाबरूं नकां सर ' म्हणत बोटांच्या चिमटीनं हंलकेच डोळ्याची पापणी उघडली, आणि फरांदे बाई नी डोळ्यात औषधाचे चांगले पांच-सात थेंब टांकले... ...डोळा जरा गार झाला...त्यातनं घंळघंळून पाणी बाहेर पडलं, आणि बाई नी मला दुर्बिणीसमोर बसवून तो नीट तंपासला एकदाचा... ...
, “ डोळा गेलाय काय डॉक्टर ? ”...माझा परत तों च प्रश्न.
फरांदे बाई, “ सगळी चिंता सोडा तुम्ही...डोळ्याला कांहीही झालेलं नाहीय तुमच्या... ...”
तरी शंका कांही फिटली नाही, “ मग झालंय काय नेमकं डोळ्याला ?... ...हातातलं रक्तानं भंरलेलं फडकं त्यांना दांखवत मी विचारलं... “ हा एव्हढा जबर रक्तस्राव...म्हणून विचारतो...”
डॉक्टरीणबाई हंसल्या, “ काय झालं असेल नाना, की उभ्या काठीवर तुमचा डोळा जेव्हां आदळला, तेव्हां काठी चं तीक्ष्ण टोंक बुब्बुळावर लागलं असावं...त्यानं बुब्बुळावरच्या नेत्रपटलाला चंरा पडलाय...पण डोळ्यात जो चिकट बुळबुळीत स्राव असतो ना, त्यामुळं काठी चं टोंक बुब्बुळात न घुसतां बाजूला सटकलं, आणि पापण्यांच्या बाहेरच्या कोंप-यात तें अडकून तिथं इंचभंर फांटलेलं आहे... ...त्यामुळंच हा असा घाबरवण्याइतका रक्तस्राव झालाय... ...
...आतां काळजी करूं नकां अजिबात... ...सगळं कांही ठीक होईल ... ...डोळ्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करून जखमा मला शिवाव्या लागतील... त्याचीही सगळी तयारी मी आधीच करून ठेंवलेली आहे... ...या सिस्टर तुम्हांला शीतपेय देतील, तें घ्या आरामात, आणि पांच दहा मिनिटं शस्त्रक्रिया दालनाच्या निगडित कक्ष्यांत छानपैकी पडा तुम्ही... ...तयारी झाली की घेते आंत तुम्हांला मी... ...चालेल ना ?...त्याचं काय आहे, की आत्यंतिक भीति नं तुमचा रक्तदाब वाढलाय...तो खाली उतरल्यावरच डोळ्याला हात लावतां येईल मला... कळलं सगळं ?”
बाईनी डोळा तपासून निदान केल्यामुळं मी आतां जरासा सांवरलो होतो... ...
, “ हें सगळं किती वेंळाचं आणि किती जोखमीचं आहे डॉक्टर?...काय आहे, की सौ. इंदिराजी आहेत त्यांच्या कार्यालयात, आणि त्यांना अजून तरी कश्याचीच कल्पना दिलेली नाही...शस्त्रक्रिया झाल्यावर किती दिवस इथं रहावं लागेल मला? तें सांगा, म्हणजे तसा त्यानां निरोप द्यावा लागेल मला... ...म्हणून विचारतोय...”
फरांदे बाई, “ फक्त दोन तास इथं थांबावं लागेल...दोन तासांनी तुम्हांला तपासलं न् सगळं ठीक ठाक झालं, की घरीं परत... ...तेंव्हढ्यासाठीं कश्याला उगीच वहिनी नां फोन करून त्यांना घांबरवताय नाना ?...चिरंजीव आहेत ना तुमच्यासोबत इथं ?...आतां वाजलेत सव्वापांच ... शस्त्रक्रियेला लागेल फार फार तर अर्धा तास... ...ती एकदां पार पडली, की मग करा त्यांना फोन हंवातर...”
मी मग चिरंजीवांना आई ला फोन करून ' बाबांच्या चेह-याला जराशी दुखापत झालीय म्हणून दवाखान्यात आलोय...इथलं काम उरकलं, की घरीं येतोय आम्ही...काळजी करूं नकोस ' असा ' नरो वा कु़ंजरोवा ' मोघम निरोप द्यायला सांगितलं... ...भुकेची वेंळ झालीय...तेव्हां इथंच जंवळपास कुठंतरी शस्त्रक्रिया होईपर्यंत उदरभंरण उरकून घे म्हणूनही सांगितलं, आणि शस्त्रक्रिया दालनाच्या निगडित कक्ष्यात जाऊन तिथल्या बाकड्यावर उताणा झालो.
पांच मिनिटांनी परिचारिके नं आंत येऊन डोंळ्यात बधिरीकरणाचं औषध घातलं... माझ्या हातात कोका कोला ची बाटली दिली, न् ती बाहेर निघून गेली... ...
बाटली संपेतोंवर डोळ्या चा पार दगड झाला, आणि परिचारिका मला बाकड्यासकट शस्त्रक्रिया दालनात घेऊन गेली... ... ...
फरांदे बाई जय्यत तयारी करून सज्ज झालेल्या होत्या...
मी मेजावर आडवा झाल्यावर त्यांनी मेजाच्या दोन्ही बाजूंच्या सरकत्या फळ्या माझ्या डोक्याच्या दोन्ही बाजूनां भिडवून डोकं हलणार नाही याची व्यवस्था केली...मग शस्त्रक्रियेचं प्रतिमावर्धक यंत्र संरकवून माझ्या डोळ्यावर आणून त्यातनं बघत मला म्हणाल्या, “ आतां माझं काम सुरूं होईल...तुमचा डोळा आतां औषध घालून बधिर केलेला आहे, त्यामुळं तुम्हांला कांही जाणवणारही नाही अजिबात...फक्त एकच लक्ष्यांत ठेंवायचं नाना... ...डोळा मी जरी बधिर केलेला असला, तरी त्याची दृष्टी कांही बधिर झालेली नाही... ...इथपर्यंत कळलं ?"
मी होकार दिला न् त्या पुढं म्हणाल्या," आतां आधी मी फांटलेला पापणी चा कोंपरा शिवणार आहे...ती जखम जरा लांब असल्यामुळं तिथं आंठएक टांके घालावे लागतील...त्यानंतर बुब्बुळावरच्या पटलाला जो चंरा गेलेला आहे ना, त्याला अंदाजे सहा टांके घालावे लागतील... ...असे एकूण फक्त चौदा टांके घालायचे आहेत... शस्त्रक्रिया अगदी मामुली स्वरूपाची आहे ही... ...
तेव्हां मी मघांशी सांगितलं ना, तशी डोळ्याची दृष्टि कांही बधिर झालेली नाही...त्यामुळं नेत्रपटल शिवतांना माझ्या हातातली ही सुई तुम्हांला अगदी जंवळून पण अंधुकशी दिसेल... ...
...आतां तुमची जबाबदारी इतकीच, की त्यामुळं उगीच घाबरून रक्तदाब वाढूं द्यायचा नाही, न् डोकं पण अजिबात हंलवायचं नाही... ...ही परिचारिकाही डोंक्याशीच उभी असेल तुमची काळजी घ्यायला... ...सगळं पंधरा वीस मिनिटांतच आंवरेल...तेव्हां तुम्ही फक्त स्वस्थ पडून रहायचं... ...आलं लक्ष्यांत सगळं नीट ?”
बाईं च्या शस्त्रकौशल्यावर माझा दांडगा विश्वास...
सौ. इंदिराजीं च्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदु च्या शस्त्रक्रिया त्यांनीच तर सफाचट् केलेल्या होत्या... ...इतक्या सफाचट् , की अपेक्षित कालावधीच्या निम्म्या कालावधीतच सौ. इंदिराजीं चे डोळे अगदी ठंणठंणीत बरे झालेले होते... ...
त्यामुळं मी फक्त हो म्हणून निवांत तांणून दिली... ... ...
तथापि त्या दुपारपासून लागलेलं ' अपघात नक्षत्र ' तोपावेतों संपलेलं नसावं कदाचित... त्यामुळं मेजावर तांणून द्यायचं सुखही कांही माझ्या नशिबात नसावं... ...
फरांदे
बाई डोळ्याच्या पापणीच्या
फांटलेल्या कोंप-याला
पुढच्या दहा-बारा
मिनिटांतच सफाईनं टांके घांलून
मोकळ्या झाल्या... ...
मग प्रतिमावर्धक नेत्रबुब्बुळावर संरकवीत म्हणाल्या, “ आतां नेत्रपटलाचे टांके घालतेय मी...बिल्कुल घाबरायचं नाही...हं ?”
बाई नी डाव्या हातात धंरलेल्या चिमट्यानं बुब्बुळावरचं पटल अलगद पकडून केंसभंरच वर उचलल्याचं मला अंधुकसं दिसलं...न् अंग किंचितसं शहारलं... ...
पांठोंपांठ त्यांनी उजव्या हातातल्या चिमट्यात पकडलेली तीक्ष्ण चंद्रकोराकार सुई अंधुकशी च पण बुब्बुळाच्या अगदी जंवळ आलेली दिसली ...
आतां मात्र सा-या अंगावर संरसंरून कांटा आला... ...
मी विलक्षण घाबरलो, न् नकळत मेजावरनं उठायलाच लागलो... ...!!!
तत्त्क्षणीं परिचारिके नं छातीवर हात दाबून मला मेजाला खिळवून ठेंवलं, न् फरांदे बाई पुटपुटल्या, “ हलूं नकां नाना आतां... ...पांच-सात मिनिटांतच उरकेल सगळं ... ... बघा...रक्तदाबमापकाचा पाराही जरासा वर संरकायला लागलाय... ...शांत पडून रहा बघूं अगदी... ...”
मग अवांतर गप्पा त मला गुंगवून ठेंवत बाई नी पहिले दोन टांके सफाईनं घातले सुध्दां...तेव्हां कुठं जीव जरासा शांत झाला, न् छातीतली धंडधंड थांबली...
पण उपरोक्त ' अपघात नक्षत्र ' अद्यापही जोरात असावं ...
बाई नीं तिसरा टांका घालायला सुई अलगद नेत्रपटलात खुपसली...
ती दुस-या बाजूनं बाहेर ओंढून टांका आंवळायला चिमट्यात धंरली... ...
नेमकी त्याक्षणींच उभा दावा साधल्यासारखी फक्क् दिशी वीज च गेली...!!
आणि अवघं शस्त्रक्रिया दालन काळ्याकुट्ट अंधारात बुडून गेलं... ...!!!
जिवापाड धंसकून टाहो फोंडायला माझा आं वांसायला लागला, अन् फरांदे बाई नी हातातला चिमटा खालीं टांकून विलक्षण चपळाईनं दोन्ही हातांनी माझं डोकं घट्ट धंरून ठेंवलं, न् पुटपुटल्या, “ घाबरूं नकां नाना बिल्कुल...मी तुमचं डोकं धंरून ठेंवलंय...कांही होणार नाही तुम्हांला... ...माधवी...बाहेर धांव न् सदाशिव ला जनित्र लगेच सुरूं करायला सांग... ...पळ लंवकर... ...”
जनित्र सुरूं होऊन दिवे उजळेतोंवर पुरी दहा बारा मिनिटं फरांदे बाईं चा न् माझा अक्षरशः दगडी पुतळा झालेला होता... ...
मी निश्चल...!
फरांदे बाईही निश्चल... ...!!
आणि नेत्रपटलात खुपसलेली ती सुईही निश्चल... ... !!!
दिवे उजळल्यावर मात्र बाई पुढच्या पांच च मिनिटांत शस्त्रक्रिया उरकून मोकळ्या झाल्या... ...
मग डोळ्यात कसलीशी द्रावणं घालून त्यांनी तो परत स्वच्छ केला...त्यात जंतुनाशक मलम घातलं...त्यावर कापसाची जाड घडी लावून वरनं चिकटपट्ट्या घट्ट डंकवून त्यांनी मग खंरोखंरीच श्वास सोडला... ...!!!
, “ उठा आतां नाना...झाली तुमची शस्त्रक्रिया... ...हुश्श्श्श... ...बा S S S S S S प रे बाप...!!
माझा च जीव टांगणीला लावलात की तुम्ही...
अगदी वरचा श्वास वर न् खालचा खाली... ... !!
शाब्बास पठ्ठे...!!! ”
शस्त्रक्रिया दालनातनं परिचारिकेनं बाहेर आणून मला बसवलं...रक्तदाब तपासला... ...प्यायला दुसरं शीतपेय आणून दिलं, आणि , “ बसा आतां आरामात काका इथं...तासाभंरानं येते परत मी रक्तदाब तपासायला...” इतकं बोलून ती आंवराआंवर करायला आंत निघून गेली...
चिरंजीवानी जवळ येऊन माझा तो अवतार बघितला, न् पुटपुटले, “ च्यायला...बाबा तुमचा चक्क ' मोशे दायान ' झालाय की... !!”
मी त्याला बगल दिली, “ आई चा कांही फोन बिन आला होता काय ?”
चिरंजीव, “ आला होता...? चांगले चार फोन आले होते आई चे... ...नेमकं झालंय काय ?...कुठं-कितीसं लागलंय ?... ...मलमपट्टी करायला इतका वेळ कां लागतोय ?... ...मी येऊं काय तिथं लगेच ?... ...एक ना दोन...”
मी, “ म S S S S S S ग ?”
चिरंजीव, “ मग काय ?...तुम्ही सांगितलं होतं तसं बसलो कांहीबाही ठोंकून देत... ... आतां घरीं गेल्यावर पुढचं काय तें तुमचं तुम्ही च निस्तरा...!!!”
१८० पर्यंत चंढलेला रक्तदाब १३० पर्यंत खाली उतरेतों रात्रीचे आठ वाजले, आणि मग फरांदे बाई नी आम्हांला घरीं परतायला परवानगी दिली एकदाची... ...
घरीं पोंचल्यावर माझा तो एकाक्ष अवतार बघून सौ. इंदिराजी हंबकल्याच... ...
सर्वप्रथम, “ मला खरं काय तें सांगायला तुला काय झालं होतं ?” असा तोफेचा मोर्चा चिरंजीवांकडं फिरतांच , “ मी काय करूं ?...बाबा च म्हणाले की ' सगळं निस्तरून झालं की मग आईला सांग...उगीच घाबरेल ती ' म्हणून...” असं रोखठोंक प्रांजळ उत्तर देत चिरंजीव कांखा वर करून मोकळे झाले...!!
अखेर पुढची पंधरा वीस मिनिटं सौ. इंदिराजींच्या घनगर्ज तोंफे च्या तोंडीं मलाच जावं लागलं...
अखंड पंधरा मिनिटं ' धडाड् धूम् ' चाललेलं होतं... ...!!!
फरांदे बाई नी पुढचा आंठवडाभंर काळजी घ्यायला सांगितलं होतं, म्हणून सौ. इंदिराजी रजा कांढून घरीं च थांबल्या... ...
मी सहज त्यांना म्हटलं, “ कश्याला उगीच रजा वांया घालवताय ?...मी घेईन की काय ती काळजी...”
असा आपसुक दिलेला ' फुल टॉस ' सोडतील तर त्या सौ. इंदिराजी कसल्या ?
, “ म्हणजेच आतां ' दुस-या डोळ्याची तयारी ‘...!!... ...काय ?”
त्यांचं तें उत्तर ऐकून मी कपाळाला हात लावला...!!!
पुढचे आंठ दिवस घरांत फक्त ' सौ. इंदिरा उवाच ' ची पारायणं झंडत होतीं...
आंठवडा उलटल्यावर आम्ही परत फरांदे बाई ना डोळा दांखवायला गेलो... ...
फरांदे बाई तश्या घंरच्याच म्हणाव्या इतक्या जंवळच्या...त्यामुळं आमच्याशी बोलतांना चांगल्या मोकळ्या-ढांकळ्या बोलायच्या...
पट्टी कांढून त्यांनी डोळा तपासला...समोरच्या प्रज्वलित फंलकावरची अक्षरं मला वाचायला सांगितली... ...
मग डोळ्यात पुढचा पंधरवडाभंर घालायला एक मलम लिहून देतां देतां माझ्याकडं निर्देश करीत सौ. इंदिराजी ना म्हणाल्या, “ खरंच कौतुक आहे तुमचं इंदिराजी...”
सौ. इंदिराजी, “...म्हणजे हो ?”
फरांदे बाई हातातली लेखणी खाली ठेंवून हंसल्या, “ नाही...म्हणजे यांच्यासारखे यजमान सांंभाळताय ना... म्हणून म्हटलं...!!...अहो इतके चुळबुळतात हे...शस्त्रक्रिया करतांना यांनी मला च असा काय घाम फोंडला ना...की सांगतां सोय नाही...थेट वरचा श्वास वर न् खालचा खाली...!!”
सौ. इंदिराजी, “ तें कसं काय ?”
फरांदे बाई नी मग सौ. इंदिराजी नां काय काय झालं तें सगळं सविस्तर ऐकवलं...न् म्हणाल्या, “ म्हणून म्हटलं कौतुक आहे तुमचं...”
सौ. इंदिराजी आतां कधी नव्हे इतक्या प्रसन्न हंसल्या, “ खरं तर झालं तें उत्तम च झालं म्हणायचं...”
आतां फरांदे बाई बुचकळ्यात पडल्या, “ म्हणजे काय ?”
सौ. इंदिराजी, “ म्हणजे असं बघा, की या सगळ्यातनं नाना आरपार गेले...सगळ्याचा अनुभंव ही त्यांच्या गांठीला लागला...हे उत्तम च झालं नाही काय ?”
फरांदे बाईं चा आतां त्रिफळा च उडाला, “ मला कळलं नाही इंदिराजी...यात ' उत्तम ' काय झालंय तें...”
सौ. इंदिराजी नी मग मैदानापार षट्कार ठोंकला, “ अहो...हा सगळा अनुभंव गांठीला लागला ना नानांच्या...आतां दुस-या डोळ्याची शस्त्रक्रिया करतांना तें अजिबात हूं की चूं पण करणार नाहीत...!!!...काय ?”
दस्तुरखुद्द फरांदे बाई च आतां कपाळाला हात लावून खीः खीः खीः करायला लागल्या ...!!
आणि मीही कपाळावर हात मारून घेत सौ. इंदिराजीं ची बखोटी धंरून त्यांना ओंढत फरांदे बाईं च्या तपासणी कक्षातनं कांढता पाय घेतला...!!!
-- रविशंकर.
२० मार्च २०२५.